लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपांजली,
आपल्या देशात हुंडा घेणे व देणे हा क्रिमीनल ऑफेन्स आहे.
त्याच्या संदर्भात येणारे कायदे इथे बघा.
http://en.wikipedia.org/wiki/Dowry_law_in_India#The_1961_Dowry_Prohibiti...

तसेच सुप्रीम कोर्ट व प्रत्येक राज्यांच्या हाय कोर्ट हे वेगवेगळ्या केसेस मधुन या कायद्यांचे जास्तीत जास्त व्यापक इंटरप्रिटेशन करीत असते. त्यामुळे नवीन प्रिसीडन्टस तयार होतच असतात.

आपण एक करु शकतो, लग्न करायच्या आधी काय काय चौकशी करायची ? (थोडक्यात प्रश्नावली ) याची यादी करु या ! या माहितीची गरज किती ? ती पडताळून कशी पाहता येईल ? याबाबत चर्चा करु या. हि माहिति विचारताना, स्वतःबद्दल सुद्धा हि माहिती देण्याची तयारी ठेवायला हवी !
चला सुरवात करु या !
प्राथमिक माहिती नंतर
लग्न का करायचे आहे ? असा प्रश्न असायला हवा.
याला पर्याय म्हणून. सगळेच करतात. घरचे मागे लागलेत. वय झालय. पासून लैंगिक गरज वाटते पर्यंत असू देत. ( पर्याय देखील देऊ या )
आता आपले आपण जमवायचे असा कल आहे. त्यावेळी मार्गदर्शक ठरेल असे याचे स्वरुप असावे.

सगळेच करतात. घरचे मागे लागलेत. हाहाहा.

दिनेशदा,
लग्न का करायचे आहे ?>>> ह्म्म्म (अजूनतरी) दुसरी सक्षम पर्यायी व्यवस्था आहे का ??

थँक्स स्वाती.
माझी अ‍ॅडमिन ना विनंति ,
मायबोलीवरून indirectly चुकीचा/कायदा मोडणारा संदेश जाऊ नये म्हणून कि हुंड्याला सपोर्ट /मागणी करणार्‍या इथल्या पोस्ट्स डिलिट कराव्यात.
Thanks in advance !

प्रयोगने उपस्थित केलेला मुद्दा खरंच गंभीर आहे. अशी केस नुकतीच खुप जवळून अनुभवली, त्यासाठी हा पोस्टप्रपंच.

नाशिकजवळच्या एका गावात राहणार्‍या माझ्या मामांची मुलगी. २००८ साली, म्हणजे तिच्या २१-२२ वयातच लग्न करायला निघाले. जवळच्या एका गावातलं स्थळ बघून फायनल झालं. सांपत्तिक स्थिती बरी. सामाजिक ओळख, प्रतिष्ठाही बरीच. मुलगा मुंबईत, एका कंपनीत. पगार अंदाजे वीसेक हजार. दिसायला नीटस, गोरा, उंच वगैरे. म्हणजे मुलगी अन मुलीचा बापही 'छान' म्हणेल असा.

मुलगी नुकतीच बीए झालेली. सुंदर, नाजूक, बुजरी. जास्त न बोलणारी. 'एकत्र' कुटूंबात वाढलेली. मर्यादा पाळणारी वगैरे वगैरे. लग्न झाले. मुलाच्या म्हणण्याप्रमाणे- सुरुवातीलाच मुंबईत नेणार नाही. काही दिवस तिने सासरी राहावे. तेवढीच ओळख- तिथल्या माणसांची अन रीतीभातींची. हे सर्वांना ओके वाटले. मुलीलाही. मामांनाही.
लग्न करून मुलगा लगेच मुंबईत गेला, रजा नसल्याचे कारण सांगून. कुलदेवी-दर्शन वगैरे पारंपारिक उपचार तसेच राहिले. तिथे गेल्यावर फोन-बिन काही नाही. दोन महिन्यांनी आला तेव्हा मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत. मग घरात गुपचूप येऊन बाहेरच झोपणे वगैरे. असंच २ दिवस थांबून निघून गेला. हे अस्सेच सहा महिन्यांत २-३दा झाले. त्यानंतर मुलगी मुंबईत गेली- त्याच्यासोबत. पण त्याचे तसेच- रात्री उशिरा येणे, न बोलणे, वेगळे राहणे. थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचे, तर हातही न लावण्याचे रोज नवे बहाणे!

लग्नाला १०-११ महिने होत आले, तसा त्या मुलीचा धीर सुटला. मग मामांना सांगितले. (पण खरे तर, याआधी मामींना ही शंका आलीच होती). मामा गर्भगळित. आमचे इतर मामा याआधीच 'गेलेले'. ही नाजूक गोष्ट इतर भाऊबंदांना, अन कळणार नाही अशांना सांगून फायदा नव्हता. मामा सरळ आमच्या आईकडे आले, आणि मान खाली घालून हे सारे आमच्या आईला सांगितले.

आता त्यांना 'इतके होईस्तोवर वर्षभर तुम्ही काय भजी तळत बसला होता काय?' छाप बोलून काही फायदाही नव्हता. आईने मला फोन केला. मी मुलाला गोड बोलून मुंबईहून बोलावून घेतले आणि मामांसह ४-५ लोक घेऊन त्याच्या घरी गेलो. जाब विचारल्यावर त्याचे उत्तर, 'सध्या सांपत्तिक स्थिती बरी नाही. शिवाय मनेही जुळली नाहीयेत. तोवर 'हे सारे' आताच करण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी हिला सांगत होतो, की काही दिवस 'को-ऑपरेट' कर...!!!!!'

माझ्या डोक्यात वीज कोसळून मी अक्षरशः त्याला सर्वांसमोर दोन फटके मारले. म्हटले 'नालायक माणसा, सगळे प्रॉब्लेम्स जिथे सुटू शकतात अन मने मिळण्याची सुरुवात होऊ शकते अशी जागा म्हणजे नवरा-बायकोची बेडरूम. त्यात तुझे लग्न तर नव्यानवलाईचे. तुझा प्रॉब्लेम काय आहे? नीट सांग.'

तो खाली बसून मुळूमुळू रडू लागला. आम्ही काय समजायचे ते समजलो. आणखी थोडे प्रश्न दरडावून विचारल्यावर सारे समोर आले. आम्हालाच नाही तर त्याच्या आईबापांनाही हादरा बसल्यासारखे झाले. आणखी भिजत घोंगडे ठेवण्यात अर्थ नव्हता. घटस्फोटाचा प्रस्ताव दिल्यावरही त्याने तो पटकन स्वीकारला.

नंतर मामांच्या मुलीने त्याचे एकेक प्रकार सांगितले. मुंबईला बिर्‍हाड नेणे जास्तीत जास्त लांबवत होता. आपुलकीने काही विचारले, जवळ गेले, तरी लांब जात होता. त्यानंतरही मुंबईत गेल्यावर डोळे लालभडक करून घेऊन 'लेटनाईट' ड्युटीचे निमित्त करून रोज उशिरा येत असे. ड्रग्ज घेत असल्याची शक्यता. मित्र तर अत्यंत तर्‍हेवाईक, तेही सदासर्वकाळ सोबत. नेहेमी धुंदीत अन सुस्त असल्यासारखा. घरात दिवसातून जेवण्याखाण्या-झोपण्यापुरताच. तेवढा काळ नजरेला नजरही मिळवत नसे.

हे असे होते तर लग्न कशाला करायचे? तर, बहूतेक घरच्याच्या रेट्यामुळे. लोकांनी नसते प्रश्न विचारू नयेत म्हणून! मुलीच्या घरचे मुलाचे घर, ऑफिस, नोकरी सारे बघून आले होते. त्या दोन दिवसांत हे वरचे डिटेल्स कसे मिळणार? पाच-पन्नास हजार खर्चून सरळ डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घ्यावी असे कुणीतरी म्हटले, ते बरोबरच आहे असे वाटते अशावेळी.

वर्षभर एका मुलासोबत नांदून मुलगी माहेरी परत. पण तिला कुणी साधा हातही लावलेला नाही, हे नवीन स्थळे शोधताना लोकांना पटवून पटवून सांगावे लागते. सांगितले तरी लोक आठवे आश्चर्य बघितल्यासारखे करतात, विश्वास ठेवत नाहीत.

फारच दुर्दैवी गोष्ट. स्पष्टपणे विचारणेही मुश्किल. मुलामुलीची वैद्यकीय व एड्स तपासणी करून रिपोर्ट दुसर्‍या पक्षाला दाखविणे अनिवार्य झाले पाहिजे.

एड्स तपासणी करून रिपोर्ट दुसर्‍या पक्षाला दाखविणे अनिवार्य झाले पाहिजे >> बरोबर आहे. पण वरच्या माझ्या पोस्ट मधल्या केसमध्ये एड्सचा संबंध नाही.

साजिर्‍याचे म्हणणे यथार्थ आहे, असे घडते, पण बर्‍याचदा पुरुष मान्य करत नाही, स्त्रीच्या हातात फक्त सहन करणे , स्वतःची मर्यादा जपणे एवढेच उरते

दिनेशदा, जीएसने व अजून काही लोकांनी काय चौकशी करावी व अनुरुपता कशी बघावी याची यादी दिलीय. एक यादीच तयार होऊ शकेल या सगळ्याची. एक्-दोन दिवसात सगळ्या पोस्टस वाचून करते.

वर्षभर एका मुलासोबत नांदून मुलगी माहेरी परत. पण तिला कुणी साधा हातही लावलेला नाही, हे नवीन स्थळे शोधताना लोकांना पटवून पटवून सांगावे लागते. सांगितले तरी लोक आठवे आश्चर्य बघितल्यासारखे करतात, विश्वास ठेवत नाहीत.>>>>

साजिर्‍या, हेच. त्या मुलाच्या मूर्खपणामुळे, एका चांगल्या मुलीच्या आयुष्यातील काही चांगली वर्षे वाया जाणार. या असल्या लोकांना फटके द्यायला हवेत.

Sad साज्या हे फारच वाईट झालं. तरी बर लवकर लक्षात आलं.

स्त्रीच्या हातात फक्त सहन करणे >> पल्ली, सॉरी टू से पण नाही करायच्या ह्या असल्या गोष्टी सहन!

साजिरा
अशीच एक केस माझ्या जवळच्या नात्यात आहे. पण ती मुलगी चारेक वर्षे सासरी राहिली होती. सुरवातीला नवर्‍याने कसलासा नवस बोलला आहे म्हणून, नंतर घरात रिनोव्हेशन चाललंय म्हणून, नंतर लहान बहिणीला बेडरुम हवी म्हणुन असल्या फडतूस कारणांनी ही स्वैपाक घरात अन नवरा हॉलमधे सोफ्यावर झोपणार. अन पुन्हा सासू कडून रोजच्या रोज छळ - तुला रीतच नाहि, तु गावढळ आहेस, तुला मुंबईत रहायची अक्कल नाही, तुला इतर पुरुषांच्या पुढे पुढे करायचंय म्हणून तुला नोकरी हवी असलं काय काय. एम सी ए ला रँकर मुलगी, एका फडतूस छोट्य इंस्टिट्यूट कम सायबर कॅफे मधे शिकवायचं काम करत होती.
घटस्फोट द्यायला पण इतका त्रास दिला तिच्या सासरच्यांनी! तिचे दागिने, साड्या, लग्नातला इतर आहेर परत मिळवण्यासाठी फार लढा द्यावा लागला होता तिच्या घरच्यांना.

घटस्फोटाचं प्रकरण चाललं होतं तेंव्हा नवर्‍याचे शेजारी हिच्या कोणा नातलगांना बाहेर भेटलेले . त्यांनी सांगितली अंदरकी बात . मग मात्र घटस्फोटाची चक्रं एकदम जोरात फिरली होती . फार, फार मनस्तात झाला होता सगळ्यांना.

अशा लोकांवर फसवणुकीची केस का टाकत नाही? हुंड्याच्या कायद्याप्रमाणे सर्व जबाबदार गुन्हेगारांना तुरुंगात डांबले पाहीजे.

>>>वर्षभर एका मुलासोबत नांदून मुलगी माहेरी परत. पण तिला कुणी साधा हातही लावलेला नाही, हे नवीन स्थळे शोधताना लोकांना पटवून पटवून सांगावे लागते. सांगितले तरी लोक आठवे आश्चर्य बघितल्यासारखे करतात, विश्वास ठेवत नाहीत.<<
ही अशीच केस मी जवळच्या व्यक्तीची पाहिली असल्याने हा विषय आला की जीव तुटतो. ती माहीतीतली मुलगी अजुनही एकटी रहाते घट्स्पोटीत म्हणून भारतात. स्वताच्या पायावर उभी आहे पण घटस्पोटीत म्हणून खूप कमी जण स्वीकारतात. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते असे आहे हे.
हाच तर प्रॉबलेम आहे ना आपल्या देशात, घटस्पोट म्हटले की काहीतरी वाईटच. घट्स्पोटात कधी कधी इनोसन्ट व्यक्तीच ज्यास्त मारली जाते. लग्न करायचे दूरच पण अश्या केसेस मध्ये खवचट प्रश्ण ज्यास्त विचारणार. असो. (विषयांतराबद्दल माफी).

आई वडिलांच्या प्रेशर मूळे लग्न करायला तयार असलेली मुल-मुली ह्यांचे परदेशात म्हणा किंवा बाहेर कुठेही असेच प्रेमप्रकरण असल्याने किंवा 'सरळ' नसल्याने फसवणूक खूपच वाढलीय आजकाल. बरे हे लोक इतके मस्त नाटक करतात जेव्हा 'सरळ' नसतात तेव्हा. ३-४ भेटीत कळणे कठीण असते.
त्यात देशात भेटायची अजुनही मोकळीक नाही व हे मुलगा वा मुलगी 'सरळ' वा 'वाकडे' आहेत हे शोधणे जरा कठीणच आहे. Happy

किंवा शारीरीक व लैंगिक रित्या कमजोर असलेले सुद्धा find out करणे कठीण आहे. २-३ भेटीनंतरच लग्न करा म्हणून आई वडिलांचे प्रेशर देशात अजुन खूप असते पाहिलेय.

वरती आधी लिहिलेल्या माझ्या पोस्टीत मुलगा 'सरळ' न्हवता पण उगाच मुलींचा वेळ घ्यायचा. इथे आई देशात येण्याआधी १०-१५ मुलींच्या आई वडिलांना सांगून थांबवून ठेवायची. लोकांना जराही मनाला काही वाटत नाही मुलगा ४ महिन्याने येणार असेल तर कशाला ते आधीच सांगून ठेवतात. मुलीचे आई वडिल पण फॉरेनचा मुलगा म्हणून कशाला थांबतात कळत नाही. आता सगळेच फसवे नसले तरी इतके थांबून वाट बघायची काही पटत नाही.
एकावेळी १० वगैरे स्थळांना गुतंवून ठेवायचे प्रकार काही मुल-मुली करतात काही वेळा.

शेवटी जुगारच आहे वरती कोणीतरी म्हटल्याप्रमाणे कारण काही अश्या सुफ्त गोष्टींचा पत्ता लागणे कठीण आहे.

हा बीबी लग्नाळुंना अत्यंत उपयोगी पडु शकतो आणि चर्चा अगदी छान वळणावर चालली आहे. वाचत आहे नियमीत. GS आणि इतर काहीजणांनी यादीसाठी छान मुद्दे दिले आहेत.

माझ्या वेळेस दुर्दैवानी मुलाला योग्य शिक्षण, नोकरी आणि घर इतकेच निकष पाहिले जायचे. माझा कल प्रेम विवाह करण्याकडे होता कारण मला तो मार्ग सोयीस्कर वाटत होता. आणि सुरुवातीलाच गोरी नसल्याने जे काय अनुभव आले त्याने तर अगदी पक्की खात्री झाली की arrange काही मला शक्य होणार नाही. पण प्रेम ठरवुन करता येत नाही त्यामुळे मी arrange पद्धतीनी मुलांना भेटायला सुरुवात केली होतीच. (मी शेवटी प्रेम विवाह केला, त्यामुळे माझ्या निर्णयाला जबाबदार मीच राहीन, असो). पण त्या वेळेस मी shaadi.com, jeevansathi.com चा शक्य असुन सुध्धा उपयोग करुन घेतला नाही. माझ्या बर्‍याच ओळखीच्या मुला-मुलींनी स्वतःच त्या websites वरुन लग्ने जुळवली आहेत. ह्या मधे फसवणुक होण्याची शक्यता नक्की आहे , पण तरीही खरेच ज्यांना लग्न करायचे आहे असे तिथे जास्ती आहेत, आणि त्यामुळे आपल्या आई-वडीलांचे आधीचे कितीतरी कष्ट आणि वेळ (आणि कधीकधी अपमान पण) वाचतात.
मुला-मुलीनी फक्त एकटे एखाद्या हॉटेलात भेटावे, पालकांना प्राथमिक पसंती च्या मधे आणुच नये.
एकदा प्राथमिक पसंती झाली की पुढे पालक भेटु देत. मग वरील यादीतील चौकशी करण्याचे, तपासणी करण्याचे सर्व मुद्दे लागु होतातच. डिटेक्टीव सोडणे बेष्ट :).
पण arrange लग्नासाठी (ओळखीतुन होण्याचे शक्यता नसेल तर अनुरुन जीवनसाथी शोधायला) मला तरी internet खुप उपयोगी वाटते (अर्थात internet ची सोय असेल तर Happy ). नाहीतर त्या विवाह मंडळात जा, तिथे बाकी २५ पालाकांबरोबर एका खोलीत बसुन अनुरुप मुलांची यादी बनवा, दुसरे कोणी आपल्याला हवे असलेले बाड घेउन बसले असतील तर ते रिकामे होण्याची वाट पहात बसा, तसेच वि.म. मधील लोकांकडुन आपले नाव नोंदवताना फाजील उपदेश ऐका, हे सर्व मी केले होते. हे नको असेल तर टाळावे. मनस्ताप होतो.
दुसरे म्हणजे आपण जेव्हा मुलाशी/मुलीशी, त्यांच्या पालकांशी बोलतो तेव्हा कुठेतरी कळतेच की बाबा ह्या कुटुंबाशी संबंध किती मोकळीपणाचे, खेळीमेळीचे होउ शकतील. त्यावर पण लक्ष ठेवावे.

ता.क. - वि. मं. वाईट आहेत असे मला म्हणायचे नाही. ते एक प्रकारे समाजसेवाच करत असतात. फक्त तिथे वैयक्तीक अनुभव वेगवेगळे येउ शकतात, आणि माझा प्रतिसाद त्या अनुभवानुसार आहे.

एका लग्नाची गोष्ट, लिहिल्या शिवाय रहावत नाही.
एका जून्या काळच्या प्रसिद्ध नटाची सून. नवरा व्यसनी. विभक्त होते. पुढे कधी लग्न करु अशी आशा नसते तिला. मन रमवते. तिला भेटतो एक मित्र. विचारतो, परत लग्न का करत नाहीस, झाले त्यात तूझा काहीच दोष नव्हता. ती म्हणते असा विचार करणारा कोण भेटणार ? तो म्हणतो मी आहे ना !
मुलाचे पहिलेच लग्न. घरचा विरोध. पण मुलगा ठाम.
या लग्नाला २१ वर्षे होऊन गेली. त्या सुनेला, मागे वळून बघायची कधी गरजच पडली नाही.

असंही घडू शकतं !!!
मी माझ्या लेखात, माझ्या इतक्या वर्षांच्या गप्पांतून लक्षात आलेली, बेबनावाची कारणे लिहिलीत. सगळीच टाळणे वा त्याची चाहूल लागणे शक्य नसते. पण त्या बाबी, आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत, ते ज्याने त्याने ठरवायचे. इतरांच्या दृष्टीने अगदी साधी गोष्ट असते, पण त्या बाबतीत जर आपल्या भावना तीव्र असतील, तर त्या मोकळेपणी बोलणे आवश्यक आहे.
साधे उदाहरण घ्या. तोंडात बोट घालून (म्हणजे बोटाला थुंकी लावून ) पुस्तकाची पाने उलटणे, नोटा मोजणे हा प्रकार मला अत्यंत गलिच्छ वाटतो. अगदी ऑफिसमधला सहकारी असे करत असेल, तर मी त्याचा निषेध करतो. अशी एखादी सवय, जोडिदाराला असेल, तर कसे निभावणार ? पण त्याववेळी बहुसंख्य लोकाना त्यात काहि वावगे वाटतच नाही, त्याचे काय ?

पण त्या वेळेस मी shaadi.com, jeevansathi.com चा शक्य असुन सुध्धा उपयोग करुन घेतला नाही. माझ्या बर्‍याच ओळखीच्या मुला-मुलींनी स्वतःच त्या websites वरुन लग्ने जुळवली आहेत. >>>

सुनिधी, काहींनी जुळवली असतील पण या वेबसाईटसवरच्या स्थळांवर लगेच विश्वास लगेच ठेवू नये. मला माहित असलेल्या उदाहरणात तर त्यावरची माहिती बरीच खोटी असते आणि शहानिशा करणे तसे कठीणच जाते.

भाग्यश्री, मान्य. खरे तर वेब्साईट्स चा मुख्य उपयोग असा की खुप जलद संपर्क करता येतो, कमी श्रमात, अगदी घर बसल्या योग्य स्थळ शोधता येते. मला वाटते पहिली पायरी म्हणुन ह्याचा वापर केला तर बेसिक माहिती ईमेलवरच देता-घेता येते , ईमेल वरच बोलता येते, विचार माहिती करुन घेता येतात, मग फोन आहेच.
अशी प्राथमिक माहिती बरी वाटली तर नंतर अर्थात सविस्तर चौकशी करावीच. त्याशिवाय लग्न नको. पण प्रथम हालचाली internet ची मदत घेउन खुप जलद करता येते. हल्ली कोण कोण कुठे कुठे नोकरी करतात, प्रचंड काम असते. अशात लग्नाला कसा उशीर होतो ते कळत पण नाही. म्हणुन मला नेट बरे वाटते. अर्थात शेवटी ज्याला ज्यावर विश्वास असेल तीच पद्धत वापरावी.

डु आय, बरेचदा, स्वभाव चांगला आहे हे जाणुन मग विभक्त व्हायचा निर्णय लांबणीवर टाकला जातो, नंतर सहवासाने प्रेम निर्माण होते मग शारिरीक असमर्थता महत्वाची उरत नाही, फक्त शारिरीक असमाधानासाठी दूर व्हायचे का? शरिर हेच सर्वस्व आहे का? त्यात मुल होण्यासाठी वैद्यकीय शास्त्र इतके प्रगत आहे की ,,,,,, काहि बाबतीत मानसिक प्रेम नसताना शरिर संबंध ठेवावा लागतो केवळ लाग्नाचा संस्कार म्हणुन!

मी हे जरा धाडसाचेच विधान करतोय, पण माझ्या परिचयातील ज्यानी ज्यानी वेबसाइट्सवरून लग्न जुळवली, त्यांचे अनुभव वाईट आहेत. माझा होरपळून निघणारा एक मित्र उद्वेगाने म्हणाला, कि ज्यांची लग्ने जू़ळत नाहीत, तेच या साइट्स वर नोंदणी करतात.

दिनेशदा, त्या वाईट अनुभवांबद्दल जरा लिहाल का? म्हणजे बाकिच्यांना तरी सावधगीरी बाळगता येइल.

ह्म्म्म पल्ली, असेलही. पण बरेचदा असं नाही होत माझ्या बघण्यात आलय की प्रत्येक वेळी स्त्रीच तडजोड करते. फॉर एन नं. ऑफ रिझन्स... कशासाठी?? (पूरूषही करत असेल पण माझ्या बघण्यातल हे प्रमाण अतिशय कमी आहे)

फक्त शारिरीक असमाधानासाठी दूर व्हायचे का?>> नाही फसवणूक केली असते म्हणून! विश्वास पानिपतात बुडतो अश्यावेळी सुरूवातीलाच Happy

शरिर हेच सर्वस्व आहे का?>> सर्वस्व नाहीये पण थोडफार आहे का नाही? नाहीतर रंगारूपाला अनूरूप अश्या जोड्या जुळवण्यामागच कारण काय?

त्यात मुल होण्यासाठी वैद्यकीय शास्त्र इतके प्रगत आहे की ,,,,,,>> हो ते प्रत्येकालाच मान्य होईल न होईल... मूल आपण अ‍ॅडॉप्टही करू शकतो. [ अर्थात मला मेन प्रश्न हा ही आहे की आपण मूल अ‍ॅफोर्ड करू शकू का? सर्वार्थानं!! हा मुद्द्दा वेगळा आहे माहित आहे. विषयाच्या अनुषंगान इथं मांडला आहे एवढंच]

**
चुभूदेघे. मला लग्नाचा अनुभव नाही! Proud

साईटचा अनुभव वाईटच असतो हे बरोबर नाही. माझ्या माहितीत आहेत अशी माझ्यच वयाची वा आताच्याच काळातली जोडपी ज्यांनी लग्न अश्या साईटमधून भेटूनच केले.
हर एक अपना अनुभव होता है.
मी स्वःता १.५ वर्षापुर्वी माझ्या लग्नासाठी ह्या साईटस पाहिल्या, त्यातले एकसे बढकर एक नमुने पाहून कंटाळले. व सोडून दिले. Happy
त्यासाठी इथेच माबो वर मी लिहिलेले किस्से लिहिलेले वाचा. कोणाला आठवत असतीलच.(काय होते त्या बीबीचे नाव.. मस्त करमणूक आहे ते किस्से वाचून. ):)
पण त्याच दरम्यान माझ्या मित्र-मैत्रीणीचे लग्ने जुळत होती साईट्मूळे.
हो असतात काही फसवे प्रोफाईल्स पण कळते जर तुम्ही डोळे उघडे ठेवले तर. तेवढे सेन्स कुठेतरी नक्कीच होते,खासकरून तुम्ही पुर्ण प्रामाणिल हेतू ठेवून असाल व डोळे उघडे असतील तरच.

साजि-या/ मेधा/ मनु - Sad
आमच्या कुटुंबातील एक लग्न तुटले. लग्नासमारंभातच वरपक्षाकडील लोकांचा मुजोरपणा, आणि मुलाचा विक्षीप्तपणा पाहून कुटुंबिय धास्तावले होतेच. पुण्यातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय कुंटुंबातील परदेशस्थित मुलगा. मुला मुलीत ६ वर्षाचे अंतर. परदेशस्थित स्थळांची वाट पाहत मुलगे नाकारत गेले, आणि हा आला तसं वरवर सगळं ठिक वाटलं आणि मुलीच्या आईवडलांनी शेवटी तिला घाई करुन बोहल्यावर चढवली.
वर्षात मुलीनी सांगीतलं की तिला आता त्याच्याबरोबर राहणं शक्य नाही.
ती परत आली. रिसेशनमुळे जॉब मिळेना. घरचे पुन्हा तिच्यावर नांदायचा दबाव टाकु लागले तेव्हा मात्र इतर कुटुंबिय मध्ये पडले की एकदा तिच्यावर जबरदस्ती करुन परिणाम पाहिलात आता पुन्हा नको. झालं एवढं पुरे झालं.

दुसरे उदाहरण एका मैत्रिणीचे. दुस-या लग्नातुन विभक्त होत असलेल्या सहका-याशी तिची ओळख वाढली, आणि तिने त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला. सर्व मित्रमैत्रिणींनी, आईवडलांनी सर्वतोपरी समजावले पण ती बधली नाही. त्याच तिसरं आणि तिचं पहिलं लग्न झालं, मारहाणीपर्यंत मजल गेली आणि तिनी विभक्त होण्यासाठी अर्ज केला. तिला त्यांनंतर आजतागायत पुन्हा संसार थाटता आला नाही आणि त्याने चौथं लग्न करुन तेही मोडलं.
प्रेम आंधळ असतं म्हणजे काय असतं हे या उदाहरणावरून कळतं. जे आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत होतं ते या अत्यंत हुशार मुलीला दिसलं नाही. त्या काळात तिनी आमच्या सर्वांशी संबंध तोडले होते.
आता तिची आई सर्वतोपरी तिचं लग्न जमवायचा प्रयत्न करते आहे. अजूनही तिच्या मनात लग्नसंबंधाबद्दल धास्ती आहे.

माझ्या ओळखीत एक केस आहे ...
मुलगी हुशार आणि रूपाने सर्वसाधारण. माझ्या आईच्या ओळखीचे होते त्यांच्या नात्यात एक मुलगा होता लग्नाचा. मग आईने जरा पुढाकार घेऊन ते स्थळ सुचविले. दोन्ही बाजुंची पसंती होऊन लग्न झाले देखील.
लग्नाआधीच कळाले होते की त्या मुलाला काही वैद्यकीय उपचारा अंतर्गत गोळ्या चालू होत्या, पण मुलाकडचे म्हणाले की डिप्रेशन साठी तो तात्पुरता उपाय आहे. लवकरच बंद होईल. पण लग्न झाल्यावर कळाले की तो उपाय कायमस्वरूपी आहे. एवढेच नव्हे तर मुल होऊ शकणार नाही.
या केस मधे कोणी काही बोलले नाही तरी आईला अजुनही वाईट वाटते. मी म्हणालो की आपण जरी पुढाकार घेतला होता तरी निर्णयाची जबाबदारी ही त्यांची होती. आणि याबाबत आम्हाला काहीच कल्पना पण नव्हती. नंतर त्या मुलीच्या घरच्यांनी तिला मानसिक त्रास होऊ नये म्हणुन घटस्फोट घेण्याबद्दल विचारले. पण मुलीचे म्हणणे आहे की या गोष्टीसाठी विभक्त होणे मला पटत नाही, मुलगा स्वभावाने चांगला आहे, तसेच त्याला त्याच्या घरात भाऊबंदकीमुळे मानसिक त्रास आहे, मी जर त्याला सोडले तर त्याचे आयुष्य एकाकी होईल. ती एवढे बोलून थांबली नाही तर तिने नवर्‍याला घेऊन पुण्यात येऊन एक जागा भाड्याने घेऊन छोटे गृहोद्योग सुरू केले.
विशेष म्हणजे खुप भारी शिक्षण नसताना देखील तिने ज्या काही खंबीर मानसिकतेने हे निर्णय घेतले ते कौतुकास्पद आहे. नाहीतर बर्‍याच केसेस मधे मुली आपल्या नशिबाला दोष देत रडत बसतात.

ह्म्म
माझ्या समोरच घडलेली कालची घटना,
सतिशच्या नात्यामधे एक वयस्कर मुलगा (३८ वर्षाचा) लग्नाचा आहे. तो प्रथमवर पण आता वय झाले म्हणून त्याचे घटस्फोटित किंवा विधवा देखील बघत आहेत. नुकतेच एक स्थळ आले होते. मुलीचा घटस्फोट झालाय, ती १५ वर्षची असताना तिच्या मानेवर चाकू ठेवून त्या माणसाने लग्न करवून घेतलं म्हणे!! दहा वर्षाची एक मुलगी आहे आणि आता तिने नवरा सोडला का तर, तो तिचा रोज मानसिक छळ करायचा.

मुलीच्या माहितीमधे ती विनापत्य असे लिहिलय!! का तर, तिची मुलगी सध्या तिचे सासू सासरे सांभाळत आहेत म्हणजे त्या मुलीशी हिचा काहीही संबंध नाही. नवर्‍याने दुसरे लग्न केले आणि त्याला मुलगा देखील झालाय,,,

या घटस्फोटित बयेनं मेडिकल चाचणीला पूर्नपणे नकार दिला कारण, गरज काय आहे???

नंदिनी, चाचणीला नकार देणं हा त्या मुलीचा निर्णय होता. तो बरोबर का चूक हे आपण नाही ठरवू शकत....

एखाद्याची बाजू पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय आपण त्याच्याबद्दल मत बनवनं कितपत योग्य आहे...

Pages