थंड अंधारानं तुडुंब भरलेल्या विहिरीच्या पाण्याचा चांदण्यांनी गोंदलेला आरसा वार्याच्या ओझरत्या स्पर्शाने हलकेच शहारून यावा तसा खिडकीच्या पडद्याआडून दिसणारा रात्रीच्या आभाळाचा काळाभोर तुकडा शहारून आला. पहाटे पहाटे, अंगणात बहरलेल्या जाईच्या वेलीवरून हलकेच निसटून गेलेल्या कोवळ्या फुलांसारखा लुकलुक चांदण्यांचा पांढराशुभ्र शीतल सडा आभाळाच्या चौकोनी तुकड्यावर चमचमत होता. सगळीकडे नीरव शांतता भरून राहिलेली, उरला फक्त खिडकीतून आत वाहणार्या वार्याचा उन्मादक आवाज आणि डोळ्यांवरून ओझरणारा त्याचा तलम नाजूक स्पर्श.
राहून राहून देवाच्या मनात एक अनोळखी हूरहूर दाटून येत होती, एक अनामिक गूढ ओढ, एक थरथरती आठवण, मनाच्या कोपर्यात पुरून टाकलेला एक पुसट चेहरा.
आतआत फुटू पाहणारी कुठल्यातरी तीव्र भावनांची प्रचंड लाट त्याला एकदम दाबून टाकावीशी वाटली.
त्याला वाटलं, ही तीच आठवण, हे तेच आभास. एवढ्या दिवसांनी आज पुन्हा सगळं फिरून दाटून येतंय. ऊर दडपेपेर्यंत सदैव एकटेपणाची जाणीव करून देणारा हा आभाळाचा तुकडा आज फितूर झाला. ही आठवण नवी नाही, हा चेहराही नवा नाही. ही हूरहूर आता कायमचीच सोबतीण झाली. हे भयाण चांदणं, ही थंड हवा, हे वेडे विचार आता पुन्हा फिरून येणार. मग पुन्हा कितीतरी रात्री अशाच तळमळत, हूळहूळत जातील. शलाकाला आपण आल्यापासून टाळतो आहोत. आपण स्वार्थी, आत्मकेंद्री, आपल्याच आयुष्यात, आपल्याच प्रश्नांच्या दलदलीत खोलवर रूतलेले. वांझोट्या प्रश्नांनी भरलेल्या मनाच्या बाहेर आपल्याला विश्वच नाही, अस्तित्त्वही नाही. मागे उमटलेल्या पाऊलखुणाही आपण हळूहळू पुसून टाकत आहोत. तिच्यावर जीव जडलेला देवा आता आपल्यात उरला नाही.
पण यात त्या बिचारीचा काय दोष? महिन्यापूर्वी स्टेशनवर आपल्याला निरोप देताना तिचे डोळे भरून आले आणि आपण नुसता निरोपाचा हात हलवून मोकळे झालो. आपल्या मनाची स्थिती असेल तसं आपण रगेल वागतो, वाटेल तेव्हा नुसत्या प्रेमाच्या गोष्टी बोलून तिला दडपून टाकतो, वाटेल तेव्हा आपलेच दु:ख आणि आपल्याच प्रश्नांच्या नादात संबंध नसल्यासारखं तिच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो. आपल्याला लाज आणणारं हे वागणं आहे. हा स्वार्थीपणा थांबवला पाहिजे. सगळ्या जगाला लाथाडून, असं आतल्या आत कुढत राहून प्रश्नांची उकल करण्याचा अधिकार आता आपल्याला उरला नाही. असे ढकलल्यासरखे दिवस आणि तडफडत रात्री काढणंही आता शक्य नाही. शलाकाला आता भेटलंच पाहिजे, लग्नाचंही लवकरंच ठरवून टाकू. तिच्याशिवाय आता या भकास, उजाड आयुष्यात आनंद नाही. आपण कोणी कृतघ्न, माणूसघाणे नाही. आपल्यासाठी जीव टाकणारे बाहेर कितीतरी मित्र आहेत, कोळ्यासारखे आपण स्वतःच विणलेलेल्या प्रश्नांच्या पाशात गुरफटत आहोत आणि हे प्रश्नांचं वाढतच जाणारं जळमट आपल्याला आत ओढतंय. हे अलिप्त जगणं आता नको, सगळीकडे निर्भेळ आनंद शोधला पाहिजे. समाधानी राहिलं पाहिजे.
पण यात आपलं मन आपल्याला साथ देईल? आनंद मिळवण्याचा नुसता आव आणून तो कधीच मिळणार नाही. हा इथे आनंदानं भरलेला प्याला आहे आणि तहानल्यासारखा तो पिऊन टाकला असा आनंद कुठे शोधणार? आपण खूप प्रेमाचा आव आणू, माझं चुकलं, म्हणून शलाकाला मिठीत घेऊ, पण त्याने आनंद मिळेल? त्याने आतली प्रश्नांची वावटळ शमेल? उत्तर न सापडलेला एकही प्रश्न आपल्याला पडला नाही, पडला तरी तो आपल्यासाठी नाही म्हणून किती दिवस स्वतःलाच फसवू शकू? आनंदी राहण्याचं हे नाटक किती दिवस आपल्याला जमेल? ते संपलं की मग आपलं काय होणार? शलाकाचं काय होणार? हे काही खरं नाही. मनात उठणारा प्रत्येक नवा विचार, प्रत्येक नवीन भावना पुन्हा नवीन प्रश्न घेऊन येतेच आहे आणि पुन्हा त्यांच्या उत्तरांचा अट्टहास आपण धरतोच आहोत. आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरे, आपलाच अट्टहास.
ह्या अशा सगळ्या वांझोट्या प्रश्नांनी त्याला प्रचंड उबग आला, त्रागा करावासा वाटला, अतिशय चिडचिड झाली. आता या खोलीत एकट्याने राहणेच नको म्हणून कपडे करून, धाडधाड जिना उतरून तो मंडळाकडे निघाला.
मंडळात आज नेहमीपेक्षा जास्तच खळबळ दिसली. माणिक, अजय, रेणुका आणि विकी सगळा नेहमीचा ग्रूप होताच, आणखीही दोन तीन नवेच चेहरे होते. तो मंडळात पोहोचला तेव्हा विकीच्या विनोदावर जो तो खदाखदा हसत होता. पोट धरून हसताहसताच अजय म्हणाला, अशक्य आहेस विकी तू आणि तुझं देऊळगाव, अशक्य !
रेणुका म्हणाली, अशक्य! अरे भयानक म्हण भयानक, एवढ्या विचित्र किश्श्यांवालं गाव जगाच्या पाठीवर दुसरं असणंच शक्य नाही.
माणिक म्हणाला, आणि लोकं पण कसली इपितर! कुठल्या देवाने असं गाव वसवलं आणि असे लोक जन्माला घातले काय माहीत. हा बघ देवा आला, सांग पुन्हा आता तुमच्या देऊळगावची भन्नाट कथा.
विकी म्हणाला, च्यायला घ्या आता, कथा थोडीच होती ती? ही तर संस्कृतीच है आमच्या देऊळगावची.
अजय म्हणाला, अरे हो रे हो! तेच ते, संस्कृती तर संस्कृती, सांगकी आता पुन्हा.
विकी म्हणाला, तुम्ही तर च्यायला मजाकच करू राह्यले. हां देवा! तर आमच्या देऊळगावात असं है, कुठलाबी बाप्या लग्नाला उभा राहिला की त्याला एक शर्त पुरी करावीच लागते. आता विचार शर्त कसली? तर शर्त अशी है की, आमच्या देऊळगावापासून चार मैलावर धुर्याबाबाचा एक डोंगर है. शंभर वर्षापूर्वी हा धुर्याबाबा म्हणे लई मोठा आवलीया बाबा होता. कितीबी भली थोराड वांझ बाई असू दे की बाईचा दादला कितीबी नाच्या असू दे, एकदा का नवराबायको धुर्याबाबाच्या दर्शनाला गेली की नऊ महिन्यात घरात पाळणा हलायलाच पाहिजे. तर ह्या धुर्याबाबाच्या आशीर्वादाची तर्हाबी लईच निराळी. डोंगरावर त्यानं एक मोठा हौद बांधला होता, त्यात कायम गुडघाभर राख भरलेली. मग हा धुर्याबाबा, बाईला मंत्र म्हणायला सांगून आपल्याजवळ बसवून घ्यायचा आणि बाईच्या दादल्याला पूर्ण अंगाला, पूर्ण अंगाला म्हणजे पूर्णच अंगाला बरंका, पूर्ण अंगाला राख फासून डोंगराला एक प्रदक्षिणा घालायला सांगायचा. दादला प्रदक्षिणा घालून बाईला घरी घेऊन आला की एका महिन्यातच बाईला राखेचे कडक डोहाळे लागलेच पाहिजे.
रेणुका म्हणाली, राखेचे डोहाळे? अगं आई गं, राखेचे डोहाळे!
विकी म्हणला, हो राखेचेच डोहाळे, मग काय खोटं सांगतो का मी? आता धुर्याबाबा नाही, पण आमच्या गावानं त्याचा नेम काही चुकवला नाही. कुठल्याबी बाप्याला बोहल्यावर चढायच्या आधी पूर्ण अंगाला, पूर्ण म्हणजे पूर्णच बरं का, पूर्ण अंगाला राख फासून धुर्याबाबाच्या डोंगराला एक प्रदक्षिणा घालावीच लागते. रिवाजच है तसा आमच्या देऊळगावचा, एकवेळ पोरीसाठी बाप्याची सासू बाप्याला हळद माफ करील पण धुर्याबाबाची राख, आजिबात नाही.
अजय म्हणाला, हळद माफ करील, धुर्याबाबाची राख नाही हॅ हॅ हॅ.
विकी म्हणाला, मग खरंच है हे, म्हणूनच शंभर टक्के पोर होणारं गाव है आमचं, आता तर लई लांबून लांबून लोक येतात धुर्याबाबाची राख फासून घ्यायला. त्याचा महीमा लई प्रसिद्ध है तिकडं.
माणिक म्हणाला, शंभर टक्के पोर होणारं गाव हा हा हा! हे आवडलं.
अजय म्हणाला, विक्या तू देऊळगावची पोरगी केलीस तर तू पण घालणार का प्रदक्षिणा पूर्ण अंगाला धुर्याबाबाची राख फासून,?
विकी म्हणाला, मग! घालणार का म्हणजे? ती तर घालावीच लागणार, त्याशिवाय सासू पोरीला बोहल्यावर चढूच द्यायची नाही.
अजय म्हणाला, पूर्ण म्हणजे पूर्णच बरं का रे! हॅ हॅ हॅ.
माणिक म्हणाला, च्यायला डेंजरच आहे विक्या तुमचं देऊळगाव. मग एवढं करूनपण एखादीला काही झालंच नाही तर रे?
विक्या म्हणाला, नाही कसं, आसं होतंच नाही कधी, अरे धुर्याबाबाच्या डोंगरावर चरायला गेलेली म्हैसबी माहिन्याभरातच गाभण होतेय. गुणंच है तसा त्या डोंगराचा.
माणिक खदाखदा हसत म्हणाला, म्हैस पण गाभण? अरे बापरे! हे काही खरं नाही, म्हैस पण गाभण!
रेणुका पोट गच्चं धरत म्हणाली, बास रे बास विकी! आता बास, माझं पुन्हा पोट दुखतंय हसून. म्हैस पण गाभण! आई गं!
बाकीचे नवीन दिसणारे तीनही चेहरे भान विसरून प्रचंड हसत होते. देवाला काही केल्या हसावेसे वाटेना. तो अजूनही मख्ख चेहरा करून हसणार्या सगळ्यांकडे आळीपाळीने बघत होता. त्याला वाटले आपल्याला काहीतरी भयंकर रोग झाला. हे सगळे लोक जीव जातो की राहतो असे प्रचंड हसतायेत आणि आपल्याला साधे ओठ विलग करण्याएवढेही हसू वाटू नये. आपण कुठल्यातरी भयानक जहरी मनस्थितीत आहोत.
माणिक म्हणाला, देवा हा माझा आजोळचा मित्र सारंग, मुलगी बघायला आला होता, मी म्हटलं मुलगी बघितली आता गणपतीही बघून जा, म्हणून थांबला दोन दिवस, आणि ही रेणुकाची ऑफिसातली मित्रमंडळी, सीमा आणि पारस.
अजय म्हणाला, माणिक! तू देवाला नावं सांगितलीस ना ह्या तिघांची, आता सांग बरं देवाला पुन्हा नावं घ्यायला, तिघांपैकी एकजरी नाव देवाला आठवलं तरी मी काहीही हरायला तयार आहे.
विकी म्हणाला, ह्या देवाचं काही खरं नाही. आजकाल कुठल्यातरी भलत्याच जगात त्याची कायम तंद्री लागून है. बघावं तेव्हा च्यायला खाली मान घालून काहीतरी विचार करत बसतो, पहिल्यासारखं धड बोलतबी नाही, त्या आदिवाशी पाड्यावरून आल्यापासून ह्याचं तंत्रच बिघडलंय.
पारस म्हणाला, आदिवासी पाडा यानेकी, समाजसेवक वगैरा है क्या देवाभाई? के कोई संगठन, धरणा-बरणा का चक्कर है.
विकी म्हणाला, कायका संगठन बंगठन, ऐसा कुछ नही इनका, इनकी बस अभी शादी होनेको होना, फिर इनके दिमाग के चकरा बंद हो जायेंगे.
रेणुका म्हणाली, विकी, अरे तो सिंधी असला तरी मराठी कळतं त्याला, तू आपला मराठीच बोल, अय्या शादीवरून आठवलं, हे सीमा आणि पारस एकमेकांचे वुडबी-वुडबी आहेत बरंका, डिसेंबरात लग्न आहे त्यांचं.
अजय म्हणाला, अरे वा हे चांगलंय की, नवरा बायको एकाच घरात आणि एकाच ऑफिसात, पण पारसराव तुमची गोचीच होणार की मग, कुठं ढुंकून बघायलाही चान्स नाही, चोवीस तास जागता पहारा झाला की हा! हॅ हॅ हॅ
पारस म्हणाला, तुम दुसरे गांव की लडकीसे शादी करोगे फिरभी ये जुलूम होगाही, उसके लिये एकही ऑफिस या घर मे होना जरूरी नही. कही भी जाओ, तुमको लडकीयां हमेशा शक्कीही मिलेंगी.
सीमा चिडून म्हणाली, लडकीया कशाला शक्की? मुलंच जास्ती लफडेबाज असतात. त्यांना खोडच असते इथे तिथे तोंड मारायची. आता तू सहा महिने जर्मनीला गेला होतास तर मी काय तुला विचारलं, तू तिथे किती मुलींना भेटलास म्हणून? तुम्ही प्रत्येक दार वाजवून बघणार उघडतंय का आणि नाही उघडलं की म्हणणार, हे गाव फारच संशयी बुवा!
सारंग म्हणाला, हे तू लाख बोललास पारस! आता मी काल माझ्या काकाकाकूंबरोबर माधवपेठेतल्या जोश्यांकडे त्यांची मुलगी बघायला गेलो होतो की नाही, तर गेल्यागेल्या जोशी म्हणतात, या या! एकटेच आलात? आईबाबांना नाही आणलंत? नाही! तुम्हाला मुलगी आवडली तर, म्हणजे आमची मुलगी तुम्हाला आवडणारंच हो! यात शंकाच नाही, पण मुलगी आवडली तर पुन्हा तुम्ही आईबाबांना पाठवणार की नाही? म्हणजे ती वेगळी चक्कर आणि पुन्हा वेगळा कार्यक्रम होणार. नाही! हे बघण्याबिघण्याचं एकदाच उरकून गेललं बरं असतं, म्हणून आपलं सहज म्हणालो.
मी म्हणालो, एकटा कुठे? आहेत की माझे काकाकाकू, मला ते आईबाबांसारखेच आहेत. तेच बोलतील माझ्या आईबाबांच्या वतीनं. त्यांना मुलगी पसंत पडली की माझ्या आईबाबांनाही ती आवडेल.
काका म्हणाले, आमच्या पसंतीचं काही विशेष नाही, मुलांची पसंती ती आपली पसंती. काय म्हणता जोशी! हॅ हॅ.
जोशी म्हणाले, हो ते ही खरंच, नाही! आपण केवळ प्रसंगमात्र.
मग लगेचच त्यांनी मुलीला चहा घेऊन बोलावलं. मुलगी सुंदरच होती. आमचे काका म्हणाले, तुम्हांला दोघांना एकमेकांशी बोलायचं असेल तर या टेरेसवर चक्कर मारून.
मग आम्ही टेरेसवर गेलो तर मुलगी म्हणाली, तुम्ही काकाकाकूंकडे दत्तक गेलायेत का हो?
मी म्हणालो, दत्तक? नाही बॉ! असं का विचारलंत?
ती म्हणाली, नाही! तुम्ही एकटेच मुलगी बघायला येणार होतात तर मित्राला वगैरे घेऊन यायचं ना मग. काकाकाकू तुम्हांला आईवडलांसारखे, म्हणजे आपलं लग्न ठरलं तर माझ्या बाबांना तुमच्या आईबाबांसारखाच तुमच्या काकाकाकूंचाही मानपान पहावा लागणार आणि मलाही लग्नानंतर त्यांच सगळं करणं आलंच की नाही.
मी म्हणालो, मला चार काका आहेत आणि मामाही आहेत दोन. चुलत-मामे-मावस अशी पंधरा सोळा भावंड आहेत. आमचा मोठा वाडा आहे, सगळे काकाकाकू नेहमी येऊनजाऊन असतात. आता नव्या सुनेनं सगळ्यांसाठी राबलं पाहिजे असा काही आमचा दंडक नाही. परिवार मोठा असला तरी प्रत्येक जण जे-ते करायला मोकळं आहे.
ती म्हणाली, माझ्या एका मैत्रिणीचं असंच एकत्र कुटूंबात लग्न झालं. बिचारीला रोज वीस पोळ्या कराव्या लागतात आणि शेपूची भाजी केली तर सात आठ जुड्या शेपू निवडावा लागतो, तिचा नवराही काही मदत करत नाही. फार हाल आहेत हो तिचे. तुमच्याकडे कसं काय स्वैपाकाचं?
मी म्हणालो, आमच्या वाड्यात प्रत्येक बिर्हाड आपापला स्वैपाक बघतं. आमच्या घरात फक्त पाच माणसांचाच स्वैपाक होतो. आईबाबा, आजी, माझा भाऊ आणि मी.
ती म्हणाली, मी आत्ता माझ्या मैत्रिणीबद्दल संगितलं ना, तिचा नवरा कॉलेजात प्रोफेसर आहे, त्याची म्हणे लग्नाआधी कॉलेजातल्या एका लेक्चरर बाईबरोबर काहीतरी भानगड होती, माझी मैत्रीण फार सोशीक म्हणून सगळं सांभाळून घेते. तो तर सिगरेटही पितो म्हणे, मला तर बसमध्येही कोणी सिगरेट पिऊन चढला तर मळमळायला होतं. फार सहन करते हो माझी मैत्रीण.
मग च्यायला माझी सटकलीच, मी म्हणालो, तुमच्या मैत्रिणीला माझा नमस्कार सांगा, आता आपण खाली जाऊ.
मग खाली आलो तर जोशी म्हणाले, झाली ना चांगली ओळख? फार मनमिळाऊ आहे बरं आमची लेक, तिच्या मैत्रिणींचं तिच्याशिवाय एक पानही हलत नाही. कायम मैत्रिणींचे फोन चालू, आम्हीच गमतीनं म्हणतो, पोरीनों उद्या तिचं लग्न झालं तर तिच्या सासरचे लोक फोनचं बिल आमच्याकडून घेतील बरं हॅ हॅ हॅ.
तर च्यायला हे असं! पोरगी एकांतात काय म्हणाली, तर माझ्या मैत्रिणीला सात जुड्या शेपू निवडावा लागतो आणि सिगरेटच्या वासानं मला मळमळायला होतं. आपण तर एकदम आउटराईट नकारच कळवून टाकायला सांगितला काकांना.
माणिक म्हणाला, अरे तिच्या बापानेच तिला हे पढवून पाठवलं असणार. आता जर ती सरळ रोखठोक म्हणाली असती, तुमची जॉईंट फॅमिली आहे आणि मला एवढ्या मोठ्या स्वैपाकाची सवय नाही, तर आपलं काही जमणार नाही किंवा माझ्या बरोबर लग्न करायचं असेल तर वेगळं व्हा, मग?
आणि हे मैत्रिण वगैरेपण एकदम झूठ असणार.. तिला हेच विचारायचं होतं, बाबारे! तुझं काही लफडं-बिफडं तर नाही ना किंवा तू सिगरेट, दारू तर पित नाहीस ना?
तुला काय वाटलं ती लाजत म्हणेल, तुमची पर्सनॅलिटी छान आहे, मला आवडली हं!, किंवा कानांसमोरच्या केसांचे कल्ले मोठे ठेवल्यावर तुम्ही एकदम डॅशिंग दिसाल गडे! हे हे हे ते दिवस गेले महाराजा.
सारंग वैतागून म्हणाला, अरे मग सरळच विचारायचं ना... तुझं काही लफडं आहे का? तू बेवडा मारतोस का? हे असं मैत्रिणीचं प्यादं पुढं करून तिरका डाव कशाला? म्हणजे आपणंच म्हणायचं का, नाही हो! तुमच्या सोशीक मैत्रिणीच्या बाहेरख्याली नवर्यासारखा मी नाही, मी शुद्ध पाण्याशिवाय दुसरं कुठलंही
ड्रिंक किंवा सिगरेट पित नाही, परस्त्री मातेसमान पहातो, असं? च्यायला ही तर लाजच आहे.
सीमा म्हणाली, का का? तिने का सरळ विचारावं? मला तर ती मुलगी प्रचंड हुशार वगैरे वाटली. तिने एकदम तिच्या हुशारीची झलकच दाखवली की तुला. तिने हेही ताडलं असणार की ह्या माणसाची बुद्धी किती तल्लख आहे? हा त वरून तपेलं ओळखतो की ताकभात? हा विटी आहे का? ह्याचा सेंस ऑफ ह्यूमर किती लीटर-मीटर-सीटर आहे? तिला नकार कळवून तू तिचंच काम सोप्पं करणार की! तू होकार देतोस तर तिची पंचाईत होणार, की मी एवढं काही सुचवूनही हा मुलगा हो म्हणाला, म्हणजे याच्याशी अजून वेगळ्या पद्धतीने बोलायला पाहिजे.
रेणुका म्हणाली, आणि तिला हेही कळणार की ह्या मुलाला इगो प्रॉब्लेम आहे की नाही. आता एखादी मुलगी जर अतिशय जुजबी ओळखीवर तुला लग्नासाठी हो म्हणणार, तर तिच्याकडून तू उथळ, व्यसनी नाहीस ना अशी पृच्छा होणार नाही किंवा होऊ नये असं तुला का वाटतं? अमावस्या-पौर्णिमेला साधा पाच रुपड्याचा नारळसुद्धा आपण दहा वेळा वाजवून घेतोच की नाही. आणि समजा तिच्या बोलण्यातली खोच ओळखून दिलीसच तू कबूली की, मी मारायचो पोरींवर लाईनी पण काही कुठं जमलं नाही, किंवा जुम्मेवारी घेतो मी एखादं दुसरा पेग मित्रांबरोबर, तर कुठे बिघडलं. त्यात इगो हर्ट व्हायचं काय कारण.
अजय म्हणाला, विकी, हे प्रकरण च्यायला तुझ्या धुर्याबाबाच्या डोंगराला पूर्ण अंगाला राख फासून प्रदक्षिणा घालण्यापेक्षाही अवघड आहे की.
विकी म्हणाला, हॅ हॅ अरे पूर्ण काय? पूर्णच अंगाला राख फासण्यापेक्षाबी अवघड प्रकरण आहे ह्या शहरातल्या पोरींशी लग्न करणं म्हणजे. आपण तर च्यायला राख फासून दिवसभर प्रदक्षिणा घालू पण देऊळगावातल्या पोरीशीच लग्न करू. लई जोरदार पोरी हैत तिकडं, एक से एक.
पारस म्हणाला, तुम शहरकी छोकरीसे शादी करो या गावकी, लडकी पढीलिखी हो या गवार, अरेंज मॅरेज करो या लव्ह मॅरेज पापड तो तुमको बेलनेही पडेंगे. अभी टाईम है तो मजे करले विकीजानी, झुलेलाल कसम बादमे बस भुगतना और पछतानाही है. ये सब लोग जो दिखाते है ना की, हमारी बहोत खुषीसे कट रही है, हम दोनोंकी क्या सहीसे निभती है, असल में यहीं लोग सबसे ज्यादा इस बिमारी का शिकार है. मुझे कितने पापड बेलने पडे सीमा को पटाने में पुछो अपनी दोस्त रेणुकासे. हां मगर एक बात पक्की है, ऐसे मामलों मे आपके बहोत करीबी दोस्तही आपके काम आयेंगे, बाकी दुनिया सिर्फ तमाशा देखती है.
सारंग म्हणाला, च्यायला माझ्या करीबी दोस्तांनीच मला वैताग आणलाय राव. माझे शाळेतले आणि कॉलनीतले सगळे दोस्त मारवाडीच. एकसुद्धा धड मॅट्रीकपर्यंत शिकला नाही. शाळेला जायची वेळ झाली की हे सगळे गच्चीवरच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जाऊन लपायचे. ह्यांच्या घरचा व्यापार आणि बापाकडं बक्कळ पैसा. माझ्या वर्गातल्या काहीजणांचे आईबाप तर हे पोरं खाजगी शिकवणीलाही जाईनात म्हणून, मलाच पैसे द्यायचे, काही करून ह्यांच्याकडून थोडा अभ्यास करून घे म्हणून. त्या माझ्या मित्रांना दहावीत शुद्धलेखनाची एकही चूक न करता स्वतःचं पूर्ण नावही मराठीतून लिहिता येत नव्हतं, पण साले समजायला लागल्यापासून कायम दुकानात जायचे. जेव्हा विशीत असताना ह्यांना धड शेंबूडसुद्धा पुसता येत नव्हता तेव्हा ह्यांच्या आईबापांनी ह्यांची लग्न लावून दिली, आणि ह्यांना पोरी पण कशा मिळाल्या तर एकदम मलईसारख्या मऊसूत, रोजची तूपरोटीच घरची मग त्या थोडीच चरबट चेहर्याच्या असणार! आणि कुठल्याही असेनात का एकदम गाईसारख्या सालस. नवर्याची भरपूर सेवा करणार, शहरी पोरींसारखे नखरेही आजिबात नाही. लग्न झाल्यावर तर दोनदोन महिने घरातून बाहेरच नाही पडायचा एकही मारवाडी. एखाद्या लहानग्याला नवीन खेळणं दिल्यावर तो कसा बाकीचे खेळ विसरून जातो तसंच. जिथं ह्यांना वर्षापूर्वी नाकाचा शेंबूडही पुसता येत नव्हता तिथं हे बावीशी-तेवीशीतंच दोन-दोन पोरांचे बाप झाले, खिशात हजारोंनी नोटा, आणि जगाची कुठलीच पर्वा नाही. आहे की नाही अमेरिकन टीनएजर सारखं लाईफ. हनी आणि मनी दोन्ही खिशात. आपण च्यायला नुसतं करीयर-करीयर बोंबलत बुड घासणार. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते काही खोटं नाही राव.
विकी म्हणाला, हॅ हॅ असं वैतागून काय होणार सारंगभौ. जरा दमानं घ्या, लागंल लागंल तुमचा बी नंबर लागंल
अजय म्हणाला, आमच्या कॉलेजात तर एक किस्साच झाला मागच्या वर्षी. एक मोहन यादव नावाचा बिहारी पोरगा होता थर्ड इयर मेकॅनिकलला, एकदम सहा फूट उंच, अंगानं बैल. त्याचा बाप म्हणे तिकडं बिहारमध्ये उद्योगपती होता. बाप उद्योगपती आणि पोराचे कॉलेजातले उद्योग पण असे जोरदार की सहा वर्षानंतर हे धेंड तिसर्या वर्षाला आलं. तर हा मोहन स्वतःला एकदम यादवकुलभुषण कृष्ण मोहन समजायचा. बरं, दिसेल त्या पोरीची हा छेड काढणार. तर एकदा ह्याने मित्रांबरोबर पैज मारून एका फर्स्ट इयरच्या मराठी पोरीचा जिन्यातच शंभर मुलामुलींसमोर हात धरला. म्हणे, 'यू आर व्हेरी हॉट' आता त्या पोरीची एकदम सटकली असणार की नाही, ती म्हणाली, 'व्हाय डोंच यू टेल धिस टू युवर मदर' म्हणजे एकदम 'मुडद्या तुला आयाबहिणी नाहीत का?' असं, पण जरा इंग्रजी भाषांतर. त्याला एकदम लवंगी मिरचीचा धूर नाकात गेल्यासारखा ठसकाच लागला, पब्लिक पण जोरदार हसायला लागलं.
गर्दी बघून प्यूननं प्रिन्सिपॉलला वर्दी दिली. आता काहीतरी मोठं प्रकरण होणार म्हणून तो धावतपळतच आला आणि दोघांनाही ऑफिसात घेऊन गेला. पोरगी तर हटूनच बसली, मला ह्याची पब्लिक अपॉलॉजी पाहिजे, नाहीतर मी पोलिसांत जाणार, शंभर लोक साक्ष देतील.
मग त्याचा बाप म्हणे स्वतः प्रकरण मिटवायला आला बिहारहून. बेटी बेटी म्हणून त्यानं अशी काही सॉलीड सेटलमेंट केली की, ना अपॉलॉजी झाली ना पोलिस केस, झालं काय तर त्यावर्षी पोरगी झाली रोझक्वीन आणि हा बैल मिस्टर पर्सनॅलिटी. मग त्या दोघांचा वर्षभर कॉलेजमध्ये असा प्रेममय वावर होता की दुसर्या सेमच्या परीक्षा संपल्यावर आख्ख्या कॉलेजला ह्या दोघांच्या लग्नाचं निमंत्रणच. प्रिन्सिपॉल म्हणे लग्नभर करवल्यासारखा त्या बैलाचा बेस्ट मॅन म्हणून मिरवत होता.
तर हे असं ह्यांच प्रेम आणि ह्या अशा तर्हा.
माणिक म्हणाला, हात धरणं म्हणजे काही अॅसिड टाकणं की भोसकणं नाही. तरूण मुलं करतात मजेमजेत काहीतरी, हात धरण्यात मला अपमान-बिपमान वाटत नाही. बोलण्याचं म्हणाल तर तिनंही चांगलाच टोला लगावला की त्याला. उगीच धरला हात की मुळूमुळू रडणार्या मुलींचं काही खरं नाही. आता आवडला असेल तिला त्याच्यातला बिहारी रांगडेपणा म्हणून पडली त्याच्या प्रेमात, त्याच्या बापाजवळ पैशाची श्रीमंतीही आहेच. त्यांना नंतर एकमेकांच सगळंच पटलं असेल तर केलं त्यांनी लग्न, त्यात विचित्र काय आहे?
मला तर सॅडीझम आणि समलैंगिकवाल्यात पण काही वावगं दिसत नाही. दोन जीव त्यांच्या चार भिंतींआड परस्पर सहकार्याने आनंद शोधतायेत तर त्यात तुम्हां-आम्हांला आक्षेप घेण्यासारखं किंवा विचित्र वाटण्यासारखं काय आहे? ह्यापेक्षा लग्नाच्या बायकोला ओरबाडून घेणार्याना विचित्र, विक्षिप्त म्हणता यईल.
रेणुका म्हणाली, मला तर आमीर-सोनालीच्या सरफरोशमधल्या प्रेमाचा फॉर्म खूप आवडतो. किती तलम.... हळूवार.....सगळं कसं अगदी शांत संयत......एखाद्या नितळ निर्झरासारखं....अवखळ....पण कुठे डोंगरावरून कोसळतानाचं तांडव नाही.......निरागस पण तरीही समजूतदार........तरल भावनांची गोड भाषा......फक्त नजरांचा चोरटा खेळ.......डोळ्यांनी घातलेली गूढ कोडी.......एकमेकांच्या अंगच्या पुसटश्या गंधानेही भान हरपायला होणं......तो हिरवाकंच धुंद निसर्ग... ते ऋतूंच वेड लावणं......केवळ
अवर्णनीय सुंदर ती.....त्याच्या नुसत्या चाहूलीने होणारी तिच्या मनाची चलबिचल......एक हवीहवीशी वाटणारी हूरहूर... तिथे उद्रेकाला थारा नाही.....तिच्या रुकारासाठी त्याची कोण धडपड...
हम लबोंसे कह ना पाये उनसे हाले दिल कभी
और वो समझे नही ये खामोशी क्या चीज है....इष्क किजे...फिर समझिये...
ऊफ्फ!....प्रेम व्हावं तर असं.....प्रेम असावं तर असं...हं!..
अय्या मी तर वाहवतंच गेले, फार बोलले का मी, सॉरी हां?
निळ्याभोर आकाशापलीकडच्या रम्य स्वप्ननगरीत सप्तरंगी पायदानावरून उतरल्यावर भान हरपून गेल्यासारखं रेणुकाचं बोलणं संपलं आणि अजय, माणिक, विकी हसतच सुटले.
पारस म्हणाला, नही नही रेणुका, बहोत सही बोले आप. बहोत इनोसंट और स्वीट. आप तो जैसे खो ही गयी थी.
अजय हसतच म्हणाला, करेक्ट करेक्ट एकदम इनोसंट, स्वीट और बिल्कूल फिल्मी नही, एकदम रिअल, हॅ हॅ हॅ
विकी म्हणाला, हा हा! एकदम रिअल, हमारे देऊळगावमे मैने सरफरोश चार टाईम देखी थी, तब मेरेको भी एकदम ऐसाच लगा था. लेकीन देऊळगाव में एक भी सोनाली मिली नही तो मेरा सर फिर गया..हॅ हॅ हॅ.
माणिक म्हणाला, अरे बापरे, तू अशी आणि इतकी स्वप्नाळू वगैरे पण आहेस? हे माहीतच नव्हतं. त्या समीर बापटचं गाणं ऐकून त्याच्यावर फिदा झाली म्हणालीस त्याचाच परिणाम का हा?
कुणालाही अपेक्षा नसतांना अचानक देवा म्हणाला, रेणुका! तू म्हणतेस तेच प्रेम खरं, हळूवार, संयत. नेहमी सुखाची एक उबदार सावली बरोबर घेऊन येणारं, निरागस तरीही समंजस. मुळात प्रेमाची भाषाच माणसाच्या एकमेकांबद्दलच्या आकर्षणाच्या जाणिवा-नेणिवांना आवाहन करणारी असते, त्यात स्त्रीपुरूष असा भेदही नैसर्गिक नाही. ह्या आकर्षणापलीकडेही जो एक निखळ, पवित्र आनंद आहे तो आनंद मिळवणं म्हणजे प्रेमाच्या अस्तित्त्वाचं फलित, आणि तेच सुख. आपण ह्या प्रेमातल्या सुखाचे धनी आहोत हे उमगण्यासाठी लागणारी दृष्टीही निराळी, त्यातून अनुभव होणारा आभासही निराळा, आनंदाचा..शांततेचा.. समाधानाचा.
मग एक दिवस येतो आणि हा प्रेमाच्या धाग्यात नाजूक गुंतलेला सुखाचा कशिदा आपल्याच हातांनी नकळत विस्कटून जातो, ज्यावेळी त्यात अजून एक नवा धागा गुंफणं हाच आपला अट्टहास होऊन बसतो. प्रेमाला एक परमोच्च पण जी येताच सांप्रत होते अशी स्थिती येईतोवर त्यातून मिळणारे सुख टिकते. त्यानंतरचा सगळाच मामला एकतर्फी, अतिरेकी. ज्याला फक्त आणि फक्त एखाद्या गोष्टीचा अट्टहासच कारणभाव ठरतो. शरीराचा, पैशाचा, प्रगतीचा किंवा उत्तरे नसलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा अट्टहास.......
आपल्याला आताशा उमगू लागलेल्या प्रेमाबद्दल नकळत अजूनही बोलून जावं असं वाटूनही संथ पावलं टाकत, मान खाली घालून तो रुमकडे निघाला.
क्रमशः...
सुरेख!
सुरेख!
हा भाग पण आवडला.
हा भाग पण आवडला.
संवाद छान लिहिले आहेत. पण असे
संवाद छान लिहिले आहेत. पण असे वाटले की अशा गप्पा सहसा कुठेही होतात. त्यांचा गणपती मंडळाशी विशेष संबंध वाटला नाही.
पण तरीही लिखाण आवडले.
हा भाग पण ओघवता झालाय. आवडल
हा भाग पण ओघवता झालाय. आवडल लिखाण