धुमसत्या युद्धभुमीवर, मांडीत रूतलेल्या बाणाची जखम भळभळत असतांना एखाद्या अज्ञात दिशेने कुठल्यातरी धूसर आशेवर निग्रहाने खुरडत खुरडत रांगणार्या जखमी सैनिकासारखा पाय उचलत तो मंडळाकडे चालत होता. तिरवड्याहून परतल्यापासून भयंकर त्रासदायक कल्पना आणि प्रश्न मनात, समुद्रात उठणार्या वावटळीसारखे थैमान घालत होते. प्रश्नांच्या उंचचउंच लाटा आणि उत्तरांचे भोवरे, फक्त एकातून दुसर्यात अडकत रहाणे, सुटका नाहीच.
पहाटे उठून गणरायाला न्याहाळण्याचा नेम दोन दिवसापासून चालू झाला पण आईचे दर्शन पुन्हा झाले नाही. डोळ्यांतून कणव झिरपणारा, फोटोतल्यासारखा तिचा जिवंत चेहरा पुन्हा एकदाच जरी बघायला मिळाला असता तरी ह्या आयुष्यात निरिच्छ प्रेमाच्या एका आयामावर क्षणभरासाठी का होईना पोट गच्च धरून आभाळात उंच गेलेल्या झुल्यातून खाली येतानांचा खरा निरागस आनंद आपल्याला गवसला असता.
का त्या रात्रीसारखा पुन्हा आईचा चेहरा आपल्याला दिसला नसेल? मुळात तो जसा फोटोत आहे तसाच आपल्या मनातही आहे पण अचानक साक्षात्कार व्हावा तसा तो आपल्याला एकदाच दिसावा?
स्मृतीमध्ये ठसलेल्या अगणित गोष्टी आपण ठरवून मनःपटलावर आणू शकतो पण पूर्वानुभवाशिवाय एखाद्या गोष्टीची अनुभूती होणे हाच साक्षात्कार! ध्यास घेतल्यास देवाचा आणि ज्ञानाचाही होतो म्हणे, पण ठरवून, ध्यास घेऊनही आपल्या आईचा साक्षात्कार आपल्याला झाला नाही. देवाचे आणि ज्ञानाचेही साले तसेच असेल? मुळात ध्यासाची परिभाषाही आपल्याला नीट ठाऊक नाही, साधनेचा नेमका मार्गही आपण जाणत नाही.
साक्षात्कार घडून येण्यासाठी ध्यास आणि साधना हीच मात्र साधनं असतील तर त्यांचं काही परिमाण तरी असायला हवं. साधना समजून आपण देव देव म्हणून हे आकाशपाताळ धुंडून काढू, ध्यास घेऊन ज्ञान ज्ञान म्हणून ऊर फुटेस्तोवर ही दुनियाही पिंजून काढू, पण अशाने होईल आपल्याला साक्षात्कार?
नरेंद्राला देवाचा झाला, सिद्धार्थाला ज्ञानाचा झाला तसा आपल्याला होईल? कोण साला छातीठोकपणे सांगू शकतो?
देवाचा साक्षात्कार होण्याएवढे आपण काही आस्तिक, अध्यात्मिक पुरूष नाही आणि पवित्र, निर्मळ तर नाहीच नाही. त्याच्या अस्तित्त्वावर आपणाला विश्वास वाटावा असेही आपले वर्तन नाही. ह्या कुणातरी अज्ञात शक्तीने आपली माया रचून घडवलेल्या लोलकात राहून आता ज्ञानाचा साक्षात्कारही आपल्याला होणे केवळ अशक्य, आता आपल्या ह्या विदीर्ण, अमंगळ आयुष्यासाठी साक्षात्कार हा शब्दच निषिद्ध की साक्षात्कार होण्यासाठी आपले आयुष्यच निषिद्ध?
हे असे सगळे प्रश्न, प्रश्नांच्या नुसत्या उंचचउंच लाटा आणि उत्तरांचे भोवरे, किनारा असा नाहीच.
मनात ऊचंबळलेला समुद्र घेऊन संथ पावलं टाकत तो मंडळाजवळ पोहोचला तेव्हा माणिक, विकी, अजय आणि रेणुका स्टेजवर पाय सोडून बसले होते. गणरायाच्या गजमुखाकडे बघण्याचे त्याने कटाक्षाने टाळले. सगळेच जण शांत क्लांत होते, कसल्यातरी गंभीर चिंतेत असल्यासारखे. त्याला पाहताच माणिकला बरे वाटले असावे, तो म्हणाला, अरे देवा! बरं झालं तू आलास, आम्ही तुझ्या रुमकडेच निघालो होतो. हा गुंता सोडवायला आता फक्त तुच मदत करशील असं वाटतंय.
रेणुका म्हणाली, हो ना! भलताच सॉलीड प्रॉब्लेम झालाय रे. आपल्या मंडळाचं हे दहावं वर्ष, पण कधीच अशी वेळ आली नाही. कुठलाही मार्ग निवडला तरी लोकांची बोटे आपल्याकडे उठणारंच, फक्त कमी की जास्त एवढाच काय तो फरक. पण बोटे उठणार हे नक्की.
विकी म्हणाला, आपण काय पण वेगळं करायचं नाही. जसं चालंत आलंय दहा वर्षांपासून तीच प्रथा पुढेबी चालू ठेवायची. तरी थोडी लोकं बोट दाखवतीलंच आपल्याकडे, पण आपण प्रथा मोडली नाही ना! मग आपण बरोबर.
अजय म्हणाला, आपल्या मंडळाची प्रथा भलेही आपण मोडणार नाही, पण धर्म, संस्कृतीला मान्य असणार्या प्रथांचं काय? विकी म्हणतो तसं केलं तर पिढीजात प्रथेला सुरुंग लागल्यावाचून रहाणार आहे? कॉलनीतील कित्येकांच्या धार्मिक भावना डिवचल्यावाचून राहतील? बरं भले आपण उदार मनाने पुढारलेला दृष्टीकोन ठेऊन ही धार्मिक प्रथा मोडली, वाकवली तरी ज्यांना खरोखर ती मोडावी लागणार आहे त्यांची तयारी आहे का?
चौघांच्याही त्या अगम्य बोलण्याचा देवाला अतिशय वैताग आला, आधीच डोक्यात खवळलेल्या प्रश्नांचा समुद्र क्षणभरही मन स्थीर होऊ देत नव्हता. ते विसरण्यासाठी इथे यावं तर ह्यांची ही अगम्य, असंबंध बडबड. करवादून तो बोलला, साल्यांनो काय झालंय ते तरी सांगाल का? मगापासून नुसतं भांग पिल्यासारखं का बरळतायेत सगळेच्या सगळे?
हिरहिरीनं चर्चेत घुसून व्यासंगाच्या जोरावर विषयाच्या कुठल्याही बाजूने ती पटलेली असतांना किंवा नसतांनाही, ठरवून थंडपणे समोरच्याला नागवा करण्यात पटाईत असलेल्या देवाला असा अचानक तडकलेला पाहून चौघांनीही भुवया ताणल्या.
तिरवड्याहून आल्यापासून देवात झालेला बदल माणिकला खुपत होताच. एवढा गणेशोत्सोव पार पडल्यावरच ह्याच्याशी सविस्तर बोलणे करावे म्हणून तो शांतपणे म्हणाला, अरे उद्या संध्याकाळी भिडे गुरूजींनी मंडळाचा सत्यनारायण घालण्याचे घाटलेय, आता वर्षानूवर्षे तेच पुजा सांगतात. आपण नेहमी रविवार बघूनच सत्यनारायण ठेवतो पण यावेळी नेमका पुढचा रविवार थेट आठव्या दिवशी, सगळं पब्लिक आरास आणि रोषणाई बघायला जाणार, म्हणून सत्यनारायण आजउद्यातंच करून घ्यावा असं सगळ्यांचं म्हणणं पडलं.
देवा म्हणाला, बरं मग? त्यात एवढं चिंता करण्यासारखं आणि चेहरे पाडून बसण्यासारखं काय आहे?
विकी म्हणाला, उद्याच सत्यनारायण करायचा म्हणून प्रॉब्लेम नाहीये रे भौ, तो काय आपण आत्ता तासाभरातबी करू, सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी हैच आपली. पण आपण दरवर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्यालाच बसवतो की नाही पुजेला? मागच्या नऊ वर्षांपासूनची परंपराच है ती मंडळाची, तर यावर्षी देसल्यांच्या दिपकचा नंबर. मे महिन्यातच झालंना त्या भावड्याचं लग्नं. पण आता त्याची बायको है केरळी सिरीयन ख्रिश्चन, लग्न झाल्यावर घरच्यांचा लग्नाला विरोध म्हणून हे येडतुताणं दोन महिने बायकोच्याच घरात संसार थाटून राहिलं. कुळाचा एकुलता एक वारस म्हणून हातापाया पडून आई चिरंजिवांला घरी घेऊन आली आणि इस्टेटीच्या लालसेनं की काय लेकबी आला. न येऊन सांगतोय कुणाला? बी-कॉम होऊन कॉल सेंटरमध्ये रात्रपाळ्या करणारं पोरटं ते, त्याचा पगार तरी किती असणार?
घरी आल्यावर दोन वेळ खायची आणि झोपायची सोय झाली, पण बापाने आजिबातंच बोलणं टाकलं. पोराचं आणि सुनेचं तोंडबी बघायला ते तयार नाहीत. देवघरात आणि स्वैपाकघरात तर सुनेला पाय ठेवायलाही सक्त मनाई. पण सुनबी भलती वस्तादंच है, ती काय कुणाला समजावण्या-बिमजावण्याच्या भानगडीत पडली नाही. तिनेही लावला आपल्या खोलीतंच गॅस, आणि केला संसार सुरू. आपणंच करून दिलंना त्यांच्या गॅसनंबराचं काम.
अजय म्हणाला, त्यांच्या घरातल्या धर्मविविधता आणि सहकार-असहकाराशी आपल्याला काही देणघेणं नाही देवा, पण आता गोची अशी झाली की, ज्यांना घरातल्या देवाजवळही जाण्याची परवानगी नाही त्या जोडप्याला मंडळाच्या प्रथेप्रमाणं सत्यनारायणाला बसवलं तर आपण उदारमतवादी, जात्योच्छेदक वगैरे ठरू पण कॉलनीतली बंगल्यांवाली, रेगे, चित्रे, भाटे आणि बाकी धार्मिकतेचा सोयीस्कर डमरू बडवणारी मंडळी इंगळ्या डसल्यागत चवताळून जाब विचारायला येतील आपल्याला. भिडायला आणि नियमाला धरून वाद घालायला आपण तर नेहमीच तयार असतो रे! पण एका मोठ्या गटाला नाराज करून गणेशोत्सोवाचं कुठलं फलित आपण पदरात पाडून घेणार आहोत काय माहित?
माणिक म्हणाला, आणि त्यांना ह्या पुजेला बसवू नये तर एकतर त्यांचा हक्क नाकारल्यासारखं तर होईलच आणि वरून बाकीची बापू, साठे आजोबा आणि ती आयटीवाली मंडळी आपल्याला बुरसटलेल्या विचारसरणीची, दांभिक, 'आम्ही एकविसाव्या शतकातले धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते' म्हणून नुसत्या पोकळ गप्पा हाणणार्यांचं लेबल चिकटवून मोकळे होतील ते वेगळंच. खरं तर आपल्याही बुद्धीला त्यांना पुजेला न बसवण्याचं कारण पटत नाहीच, पण ह्या चिपाडात आपल्यावर प्रतिगामीच काय थेट मूलगामी असल्याच्या दांडग्या आरोपांचे शिंतोडे उडाल्याशिवाय रहायचे नाहीत.
आता त्या दोघांना जाऊन म्हणावं बाबांनो तुमच्यामुळे इथे फार धुराळा उठवला जाईल आणि मग कितीतरी जणांच्या पांढर्याझोत सदर्यांवर चिखलफेक होईल. आम्ही सारे नामर्द आहोत आणि हे निस्तरण्याची आमच्यात हिम्मत नाही तर तुम्हीच आपलं समजून उमजून बाजुला व्हा.
पण विकीनं संगितल्यासारखा खरंच त्या नव्या पोरीचा स्वभाव असेल तर ती काही तिच्या सासर्याच्या नाकावर टिच्चून ह्या सत्यनारायणाच्या पुजेला बसल्याशिवाय रहाणार नाही.
विकी म्हणाला, च्यायला हे सार्वजनिक आणि सामाजिक कामं म्हणजे गुर्हाळात काम करण्यासारखंच है राव. गोड काकवी प्यावीशी वाटते आणि मळीची शिसारी पोट ढवळून काढते. डोकं फिरलं विचार करून. च्यायला ह्या पुराणकाळच्या भटाबामणांनी चांगलीच मारून ठेवलीये आपली. नुसत्या सतराशेसाठ रितीरिवाज आन परंपरांचं जू ठेऊन दिलंय मानेवर, जूबी नाही गिरमिटंच है हे तर, आणि आता हे त्यांचे वंशज तयारंच हैत तलवारी घेऊन.
रेणुका म्हणाली, पण असं कसं? आपण का म्हणून आपल्या मंडळाची प्रथा आणि विचार सोडायचे? आपण इथे काही कुण्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, सर्व-जनांचा म्हणूनच तर सार्वजनिक उत्सव आहे ना हा? जर आपल्यापैकी कोणालाच त्यांचा पुजेचा अधिकार डावलणं पटत नसेल तर मग संपलंच! कशाला काही धार्मिक आणि सनातन लोकांच्या रोषाचं बुजगावणं आपणंच उभं करून आपणंच घाबरायचं?
अजय म्हणाला, तू समजतेस तेवढं सोपं नाहीये हे रेणुका, तुला काय वाटतं सत्यनारायण पुजा त्यांना करू द्यायचीकी नाही एवढ्यावरूनच ही साठमारी रंगणार?
देसल्यांचा बंगला चित्रे आणि रेग्यांच्या मध्ये, पंधरा वर्षांपूर्वी कॉलनीत प्लॉट पडले तेव्हा चित्रे आणि रेग्यांनी घरं बांधून आपापल्या जागांना चांगली नऊ-नऊ इंच रुंदीची भली थोरली पक्की कुंपणं घातली. मागाहून वर्षभरानी देसले आले, दोन वर्ष रडतखडत चाललेल्या त्यांच्या घराच्या कामाने ह्या दोघांचा पार घाम काढला. त्यात एकेदिवशी चित्रेंच्या घरी चोरी झाली आणि चोर निघाला देसल्यांच्या बांधकामावरचा गवंडी. पोलीस केसही झाली पण गवंड्याकडून एक सुपारी घेण्याएवढी फुटकी कवडीही परत मिळवता आली नाही. मग त्या चित्रेंची अचानक काय सटकली काय माहित, त्यांनी देसल्यांचीच कॉलर धरली, 'तुझ्यामुळे माझा तीस हजाराचा ऐवज गेला, आता भरून दे' म्हणून त्यांनी देसल्यांनाच दम भरला. पण किडकिड्या चित्र्यांना देसले काय ऐकतात? रस्त्याच्या कामांची कंत्राटं घेणारा माणूस तो, एकदम नंगड, त्यांनी तिथंच चित्र्यांची एक दोन हाडं नरम केली.
मग चार महिन्यानं देसल्यांची वास्तूशांत होती तर रेगे आणि चित्रे मंडळी, आता ह्याचा नातेवाईकात चांगला अपमान करायचा आणि याच्याकडून चांगले पैसेही काढायचे असं ठरवून ऐन पुजेच्या वेळी समारंभात घुसली. 'आधी कंपाउंडच्या भिंतीचे अर्धे-अर्धे पैशे टाक', म्हणत त्यांनी पुजाच थांबवली. पण देसल्यांचे नातेवाईक देसल्यांपेक्षाही महानंगड, रेगे कसेबसे निसटले पण चित्र्यांनी पुन्हा दोन चार थपडा खाल्ल्याच. आता तुच सांग देसल्यांची नाचक्की करायची आणि त्यांच्या विरुद्ध रान ऊठवायची एवढी चांगली संधी चित्रे, रेगे सोडतील?
रेणुका म्हणाली, अय्या! सॉल्लीड्डच आहे की हे! कॉलनीचा असा रक्तरंजित ईतिहास मला तर काहीच माहित नव्हता. मला तर आपली कॉलनी एकदम प्रेमळ, सोज्वळ, गुण्यागोविंदानं रहाणारी वगैरे वाटायची.
विकी म्हणाला, नवलंच है, साठमारीच है ना राव ही तर. च्यायला ह्यानी त्याचा हत्ती मारला तर तो ह्याचं घोडं मारतोय, मध्येच उंटाची सटकती तर तोबी तिरका घुसतोय. लई भारी है हे सगळं. आपल्याला एकदम आपल्या गावाकडची भाऊबंदकीच आठवली. तिथंबी च्यायला बांधाबांधावर भावाभावाच्या आणि काकापुतण्याच्या मारामार्या हैच. हे बायकोच्या नाजूक हातांनी साजूक तूपाची धार भातावर सोडणारे बंगलेवाले लई मिळमिळ, तिथं आमचे देऊळगावचे पाटील भाऊबंद तर कोयते आणि कुर्हाडी घेऊन रक्ताच्या धारात न्हाऊनंच घरी येतीन आसं काही झालं तर. हिशोब जिथल्या तिथंच, मग घरी येऊन बायको है, तूप है आणि धार है.
विकीचे वाक्य संपताच मंडळात मोठा हशा पिकला, सत्यनारायण प्रकरणावरून गंभीर झालेली चर्चा थोडी निवळली.
तेवढ्यात मंडळात बापू आले. त्यांच्याबरोबर आणखी कोणी तरी पस्तिशीची असून चाळीशीची वाटणारी, समोरून टक्कल पडलेली गोरी पण जराशी स्थूल व्यक्ती होती.
बापू म्हणाले, वा वा सगळेच आहेत इथे अन काय? बघा शैलेश मी म्हंटलं नव्हतं तुम्हाला आमचे सगळे कार्यकर्ते इथेच सापडणार म्हणून. फार मेहनती आहेत बरं ही सगळी मंडळी आणि हुशारही तेवढीच. अरे हो तुमची ओळख करून देतो. हे आपल्या कॉलनीचे सुपुत्र श्री शैलेश साठे. आपल्या साठे आजोबांचे चिरंजीव. आजच आलेत अमेरिकेहून सहकुटूंब, कितीहो? हो बरोबर, आठ वर्षांनी आलेत ते आपल्या मातृभुमीत. आज आरतीचा नंबर साठे आजोबांचा, म्हणून आठवण करून द्यायला गेलो तर ह्यांची ओळख झाली, मग आलोच त्यांनाही बरोबर घेऊन. तसे मी ह्यांना ते फार लहान असतांना पाहिले होते, फार हुशार, दहावीला बोर्डात देखील आले होते, मग आयआयटीलाही गेले. नाव काढलंत बघा तुम्ही शैलेशराव साठे आजोबांचं आणि आपल्या कॉलनीचं सुद्धा.
जीन्सच्या दोन्ही खिशात दोन्ही हातांचे अंगठे अडकवून, चेहर्याच्या मुलायम कातडीवर मांसलपणाचीच पुटं भासावी तसा चिकटलेला कसलातरी अभिमान आणि नजरेत काठोकाठ भरलेल्या बेफिकीरीनं सगळ्यांकडे बघत शैलेशनं अतिशय बळजबरीने मंद स्मित केलं. रेणुका आणि अजयनं आदरयुक्त पुसटसं 'हॅलो' म्हंटलं, तेव्हा त्यानं त्यांच्याही पेक्षा पुसट 'हॅलो' पुन्हा तीच डोळ्यातली बेफिकीरी उधळत म्हंटलं.
विकी म्हणाला, 'हॅलो शैलेश! मायसेल्फ विकी, विकास देऊळगावकर!' आणि त्याने शेकहँडसाठी हात पुढे केला. शैलेशच्या मेंदुचा वेळ बहूतेक, आता कुठल्या सांकेतिक भाषेतल्या देवाणघेवाणीची किती तीव्रतेची लहर किती वेळाने उजव्या हाताच्या पेशींकडे पाठवावी ह्याचं त्रैराशिक मांडण्यात गेल्यामुळे की काय, प्रतिक्षिप्त क्रियेसारखा त्याचा हात झटकन पुढे आलाच नाही आणि आला तो इतक्या उशीरा आणि इतकाच की विकीला हात पुढे केल्यानंतरही एक पाऊल पुढे होऊन शेकहँड करावा लागला.
पहिल्यांदाच भेटतांना साध्या सौजन्याचा एक भाग वाटावा इतपतही देवाला शैलेशशी बोलावे वाटले नाही. एक फॉरेनरिटर्न्ड आसामी म्हणून त्याच्याबद्दल आदरही वाटला नाही की ज्यांच्याबद्दल आपल्या मनात अतिशय आदर आहे, आयुष्यातल्या अत्यंत कठीणतम क्षणी देखील ज्यांनी आपल्या तत्त्वांशी कुठल्याच प्रकारची हीन तडजोड केली नाही त्या साठे आजोबांचा मुलगा म्हणून त्याला शैलेशबद्दल आपुलकीही वाटली नाही. अजून एवढा वेळ माणिक कसा आजिबतंच काही बोलला नाही? असे वाटून त्याने माणिककडे पाहिले, तर तो तंद्री लागल्यासारखा शैलेशकडे एकटक पहातंच होता. माणिकच्या डोळ्यात त्याला एक विचित्र चमक एक अनाकलनीय, लबाड लकाकी दिसली, कुठलातरी गंभीर प्रश्न नुकताच सोडवून हातावेगळा केल्यासारखी.
अजय म्हणाला, माझा मोठा भाऊ मिलिंद जो आता बंगळूरात असतो, तो आणि तुम्ही सरस्वतीमंदिरमध्ये एकाच वर्गात होता ना? तो सांगतो नेहमी तुमच्याबद्दल. बराच मोठा ग्रूप होता नाही तुम्हा लोकांचा?
शैलेश म्हणाला, तू मिलिंदचा भाऊ का? बरं बरं! कुठे बंगळुरात असतो का मिलिंद आता? मागे त्याची मुंबईतली नोकरी गेली तेव्हा संपर्क झाला होता त्याचा नि माझा. मी त्याला म्हणालो, काय तुम्ही लोक त्या घाणेरड्या, दरिद्री शहरात काम करता रे! मोकळा श्वास घ्यायलाही तिथे स्वच्छ, शुद्ध हवा नाही की निवांत चालायला फुटभर मोकळी जागा नाही, त्यापेक्षा तू विसा काढून सरळ कॅनडाला का जात नाहीस? तुझ्यासारख्यांसाठी तिथे नोकर्यांची आजिबात कमी नाही आणि ऐषोआरामाच्या आयुष्यासाठी अमाप सुखसुविधा मिळतील त्याला तर तोडच नाही. तू जायला तयार असशील तर मी करतो प्रयत्न तुझ्यासाठी. पण त्याला भलताच देशप्रेमाचा उमाळा, 'भारतातंच कुठेतरी मिळून जाईल' म्हणत सरळ 'नो थँक्स' म्हणाला तो मला.
देवा म्हणाला, मिलिंदच्या नकाराला देशप्रेमाचा उमाळा म्हणता तर 'त्या' देशावरच्या तुमच्या प्रेमाला कंढ म्हणता येईल.
गुडूप अंधारातून सुळ्ळकन आलेल्या बाणासारख्या अचानक आदळलेल्या देवाच्या वाक्याने क्षणभर सगळेच हादरले. एकुणेक स्तंभित नजर चमकून त्याच्याकडे वळती झाली, पण 'तू पाहुण्यांशी असं कसं बोलू शकतोस?' म्हणून विचारायची कुणाचीच छाती नव्हती. शैलेशही मनातून चांगलाच चपापला. वादाचा प्रसंग घडू नये म्हणून बापू पटकन म्हणाले, अरे हो शैलेश! तुमची यांच्याशी ओळख करून द्यायचीच राहिली. हे देवदत्त! सहाय्यक दिग्दर्शक आहेत, डॉक्यूमेंट्री बनवतात. फार छान विषय असतात बरं ह्यांच्या फिल्म्सचे! बक्षीसही मिळवलीयेत त्यांनी भरपूर. वाचन आणि अभ्यासही खूप दांडगा आहे त्यांचा.
शैलेश म्हणाला, ओह इज इट? आणि बोलणंही फार तिखट दिसतं यांचं. नाही! काही हरकत नाही, बरेच लोक आमच्यासारख्यांना भारतद्वेष्टे, सुखलोलूप संस्कृतीचे भोक्ते वगैरे समजतात, नव्हे तसं अगदी तोंडावर बोलूनही दाखवतात, पण आम्हाला त्याचे काही वाटत नाही. हा फक्त त्यांना स्वतःबद्दलच्या नैराश्यातून आमच्याबद्दल वाटलेला मत्सर,तिरस्कार असतो, बाकी त्याला काही अर्थ नाही. सुखलोलूप कोण नसतो? इथे नरकासम भासणार्या रेल्वे गाड्यातून सकाळ संध्याकाळ धावणारा प्रत्येक माणूस कुठल्यातरी सुखाच्या ईच्छेनेच ती कुतरओढ सहन करतो की नाही? आम्ही फक्त बाहेरदेशी जरा वेल अर्न्ड कंफर्टस मध्ये काम केले आणि त्याबद्दल दोन शब्द चांगले बोललो तर आम्ही राष्ट्रद्वेषी, आणि नाक-तोंड दाबून ती कुतरओढ सहन करणारे राष्ट्रप्रेमी, देशभक्त वगैरे....असो! मी काय कोणी उदात्त हेतू मनात ठेऊन मातृभुमीचे पांग फेडण्यासाठी देशाबाहेर गेलेल्यांपैकी नाही, मी ही एक सुखलोलूप प्रवृत्तीच आहे. त्यामुळे ह्यांच्या बोलण्याचा मला आजिबात राग नाही की त्याबद्दल मला वाईटही वाटले नाही. हे चालायचेच. आनंदच झाला आपल्याला भेटून.
देवा म्हणाला, आम्हाला कुठलेही नैराश्य नाही आणि असलेच तर उघडपणे तिरस्कारातून तिर्हाईतांवर त्याचा आपटबार सोडायची आमची मानसिकता नाही. ही सगळी तुमचीच बिनबुडाची गृहीतके आणि तुमच्याच पोकळ सिद्धता. 'आम्हीही सुखलोलूप, पण जरा तुमच्यापेक्षा समाधानी' असे मान्य केले की मन मानेल ती प्रमेये मांडून, तुमच्यादृष्टीने दरिद्री शहरातल्या, नरकगामिनी रेल्वेतून जाणार्यांवर सक्तीने घडलेले देशप्रेमी असा शिक्का मारण्याचा तुम्हाला आजिबात नैतिक अधिकार नाही. आणि आनंदाचं म्हणाल तर ज्याला भेटून आनंद व्हावा असं कित्येक वर्षात मला कुणी भेटलेलं नाही.
शैलेश म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय देवदत्त, मी आपलं सौजन्याचा एक भाग म्हणून आनंद झाला असे म्हणालो, त्यात काही तिरकस सूर मला अपेक्षित नव्हता. मी काय कोणी देशातल्या घाणीचा उबग आल्यावर, व्यभिचारात जन्मलेल्या पोराची जबाबदारी झटकून नामानिराळं व्हावं तसा परदेशी पळून गेलेला कृतघ्न नाही. पण देशप्रेम म्हणून हा दरिद्रीपणा कवटाळून बसणं मला मंजूर नाही.
देवा म्हणाला, म्हणजे थोडक्यात तुम्हाला भारतीय मित्र म्हणून हवेत पण ते दरिद्री, लोकल मधून प्रवास करणारे नकोत. भारत हवा आहे पण अमेरिकेसारखा स्वच्छ करून हवा आहे. असच ना....
शैलेश म्हणाला, असं का म्हणता? मलाही माझ्या देशाबद्दल, देशबांधवांबद्दल प्रेम आहे, आपल्या संस्कृतीबद्दल रास्त अभिमान आहे. एवढी वर्षे तिथे राहून मी आजही नित्यनेमाने पुजाअर्चा, संध्या करतो. तिथेही आमचे मराठी लोकांचे मंडळ आहे, आम्हीही दरवर्षी गणपती बसवतो, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करतो. मागच्यावर्षी मी अध्यक्षही होतो मंडळाचा.
आता देवा शैलेशला पुरतं निरूत्तर करून खालमानेनं घरी पाठवल्याशिवाय रहायचा नाही हे उमगायला माणिकला वेळ लागला नाही. मुद्दाम वादाच्या विषयाला बगल देत तो म्हणाला, अरे असू दे रे आत्ताच तर आले आहेत ते, वादविवाद आणि काव्यशास्त्रविनोदाला भरपूर वेळ आहे आपल्याकडे, पण आधी आपण जबाबदार कार्यकारिणीच्या जबाबदार कार्यकर्त्यांसारखं आपल्या जबाबदारीच्या कामाबद्दल जबाबदारीने बोलू या का, नाही तर बेजबाबदारपणा दाखवल्याची भलतीच जबाबदारी आपल्याला उचलावी लागेल.
माणिकच्या शेवटच्या वाक्यावर सगळेच खळखळून हसले. शैलेशनंही अगदी बळजबरीनं मनसोक्त हसू आल्याचं दाखवून त्याच्याकडून वाद संपल्याचे निशाण फडकावले. देवाच्या चेहर्यावर मात्र एक पुसट मंद स्मित उमटण्यापलिकडे कुठलेही भाव दिसले नाही.
माणिक म्हणाला, शैलेशराव, कॉलनीत आणि मंडळात तुमचं अगदी मनं:पूर्वक स्वागत! कॉलनीच्या प्रथेप्रमाणे आपण कॉलनीत नव्याने रहायला आलेल्या प्रत्येक कुटूंबाचं अतिशय आपुलकीनं स्वागत करतो. कॉलनीतल्या सगळ्यांशी त्यांच्या ओळखीपाळखी व्हाव्यात, शेजारपाजार कळावा तसेच स्पर्धा परिक्षात यश मिळवलेल्या कॉलनीतल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे या हेतूने मंडळातर्फे गणेशोत्सोवादरम्यान एक छोटेखानी कार्यक्रमही आयोजित करतो. तुम्ही तर आमच्या कॉलनीचे सुपुत्र, सातासमुद्रापार भरारी मारून तुमच्या अभ्यास, नोकरीच्या क्षेत्रात एवढे उत्तुंग यशही तुम्ही मिळवले. खरोखर कॉलनीतल्या सगळ्या परीक्षार्थी मुलांसमोर तुम्ही एक फार छान आदर्श उभा केलात. आम्हा सगळ्यांना तुमच्या या यशाबद्दल अतिशय अभिमान वाटतो. तुमची काही हरकत नसल्यास आमच्या कार्यकारी मंडळातर्फे मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून मी आपल्याला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करू ईच्छितो. यानिमित्ताने तुमच्या आजपर्यंतच्या यशस्वी कारकीर्दीच्या वाटचालीची ओळखही तुम्ही आम्हा सर्वांना करून द्यावी अशीही माझी विनंती आहे. कॉलनीतल्या मुलांना तुमच्या मार्गदर्शनाचा निश्चितच फार फायदा होईल. काय म्हणता बापू?
बापू म्हणाले, वा वा! तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात माणिक. शैलेशरावांच्या हस्ते कॉलनीतल्या मुलांचा सत्कार! खरोखर फार छान कल्पना आहे. शैलेशरावांच्या आजपर्यंच्या यशस्वी भरारीबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, आणि एवढं सगळं मिळवूनही त्यांनी परदेशातसुद्धा आपली संस्कृती अगदी कसोशीनं जपली. त्यांची वाटचाल खरोखर फार प्रशंसनीय आहे.
माणिक म्हणाला, मग उद्याच ठेऊयात की आपण हा कार्यक्रम, चालेलना तुम्हाला शैलेशराव? म्हणजे तुमच्या शेड्यूल मध्ये बसतोय ना? आणि बसत नसला तरी कृपया आमच्यासाठी तुम्ही तो बसवाच.
शैलेश म्हणाला, तुम्ही अगदी लाजवलंत मला. मी फक्त मेहनत केली, तेवढंच तर आपल्या हातात असतं! बाकी यश देणारा तो बुद्धीदेवता श्री गजाननच. त्याचा आशीर्वाद पाठीशी असला की जगाच्या पाठीवरची कुठलीच गोष्ट मेहनती माणसासाठी अशक्य नाही. हक्कानं बोलवा, मी येईन. माझे दोन शब्द कुणासाठी मार्गदर्शक ठरत असतील तर मला आनंदच आहे.
माणिक म्हणाला, विनंतीला मान देऊन आंमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल मंडळ आणि व्यक्तीशः मी तुमचा खूप आभारी आहे शैलेशराव! बापू, मी काय म्हणतो, शैलेशराव सहकुटूंबच आले आहेत, मग आपण त्यांच्याच हाताने उद्याची सत्यनारायणाची पुजाही करून घेऊ! लग्नानंतर पहिल्यांदाच ते इथे येतायेत, तर पुजेचा मान त्यांचाच होतो, नाही का! मग लागलीच त्यांना उद्याच्या सत्यनारायण पुजेला सपत्निक बसण्याचेही आमंत्रण देऊन टाकू. काय म्हणता?
बापू म्हणाले, हे ही उत्तम! अतिशय सुयोग्य कल्पना. तुम्ही खरोखर कार्याध्यक्ष शोभता माणिक. शैलेशराव! तुम्ही आमची ही विनंती देखील मान्य करून सत्यनारायण पुजेचे पुण्य पदरात पाडून घेण्याचे करावे. कसे?
शैलेश म्हणाला, तुमची सर्वांची ईच्छा असल्यास माझी ना नाही. यावेळी सत्यनारायण माझ्याही मनात होतंच खरं. पुजेला बसण्याची माझी अगदी मनापासून तयारी आहे. मला हा मान दिल्याबद्दल मीच तुमचे आभार मानायला हवे.
माणिक म्हणाला, वा वा! ठरलं तर मग शैलेशराव, मी आणि रेणुका सकाळी घरी येऊन सत्यनारायण पुजा आणि कार्यक्रमाबद्दल सविस्तर सांगतोच तुम्हाला.
शैलेश म्हणाला, सकाळी दहानंतर या, मी मोकळाच असेन. चहालाच या. चला बापू, बाबांची आरतीची तयारी होतेच आहे तोवर आपण हलवायाकडून आजच्या आरतीच्या प्रसादाचे पेढे घेऊन येऊ.
शैलेशने देवाकडे शेवटच्या क्षणी बाजी पलटवणार्या जुगार्यासारखा एक कटाक्ष टाकला आणि बांपूंना घेऊन जेत्याच्या थाटात तो कॉलनीच्या फाटकाकडे निघाला.
क्षणार्धात सरड्यासारखा बेमालूम रंग बदललेल्या माणिककडे अजय, रेणुका आणि विकी एकटक बघतंच राहिले. माणिक म्हणाला, अरे असे तंतरल्यासारखे काय बघताय माझ्याकडे? पाठ थोपटा साल्यांनो, सत्यनारायण पुजेचा यक्षप्रश्न आता सुटलाच. साठे आजोबांचा फॉरेन रिटर्न्ड मुलगा पुजेला बसणार म्हंटल्यावर आहे का टाप कुणाची आता आपल्याकडे बोटं दाखवायची?
आणि ते चौघेही स्फोट व्हावा तसे एकदम हसत सुटले.
अजय म्हणाला, माणक्या साल्या गोड बोलून, सत्कार आणि पुजेचा मान देऊन तू आपली मान त्या धर्मसंकटातून सोडवलीस. हुशार हेस लेका तू, उगीच नाही तुला कार्याध्यक्ष केला आम्ही. काय तर म्हणे, मुलांसमोर आदर्श, कॉलनीचे सुपुत्र, हॅ हॅ हॅ.
विकी म्हणाला, च्यायला आमच्या देऊळगावच्या बडे वस्ताद तालमीतल्या शिबु पैलवानाच्या वर फर्मास डाव टाकला की रे तू, आणि कसली ती काँग्रेशी नेत्यांसारखी सोज्वळ भाषा, मानलं च्यायला. राजकारणात जा तू, नाहीतरी तिथं सगळे पैलवानंच भरलेत. कॉलनीचे सुपुत्र, हॅ हॅ हॅ.
अजय म्हणाला, बापूंना सगळीच लोकं चांगली वाटतात. माणक्याने चांगलं डोकं चालवून त्यांच्याकडून होकार मिळवला, कॉलनीचा सुपुत्र, हॅ हॅ हॅ
रेणुका म्हणाली, हा कसला सुपुत्र, हा तर कुपुत्र. आठ वर्षांनी भारतात येऊन देशप्रेमाच्या बढाया मारतोय! आठ वर्षात आठ वेळाही पैसे पाठवले नाहीत आपल्या म्हातार्या आईबापांना ह्या माणसानं. साठे आजी आठवड्यातून एकदातरी माझ्या आजीजवळ कष्टी झाल्याशिवाय रहात नाहीत. आताही काहीतरी मृत्यूपत्र करून घेण्याच्या भानगडीसाठीच आलाय म्हणे. पण साठे आजोबांच्या तत्त्वांसमोर काही एक चालत नाही त्याचं.
विकी म्हणाला, पण देवाने तेवढ्यातही चांगला सटकावलाच त्याला. 'कंढ' अहा! काय वर्मावर टोला हाणला देवा! असा टोला फक्त तुच हाणावास. चपापलंच ते सुपुत्र एकदम. हॅ हॅ हॅ
देवा मात्र कधीच आला तसा संथ पावलं टाकत पुन्हा रूमकडे निघाला होता, मनात पुन्हा, नव्या लाटा येऊन नव्याने खवळलेला प्रश्नांचा समुद्र घेऊन...
क्रमशः....
लिहि रे लवकर! पुर्ण कर बघू.
लिहि रे लवकर! पुर्ण कर बघू.
सुरेख, एकदम ओघवती भाषा.
सुरेख, एकदम ओघवती भाषा.
सुरेख. पण कथेत योग्य ठिकाणी
सुरेख. पण कथेत योग्य ठिकाणी विरामचिन्हं का नाहीत? त्याने (निदान माझातरी) रसभंग होतो.
मस्त सुरु आहे. विरामचिन्ह
मस्त सुरु आहे.
विरामचिन्ह नसल्याने थोडस गोंधळल्यासारख होतय मलाही.
वा, फटाफट वाचून काढल., फार
वा, फटाफट वाचून काढल., फार लक्षवेधी लिहीता तुम्ही.. पुढचा भाग उद्या का?
झकास आहे हा भाग ही.
झकास आहे हा भाग ही.
धन्यवाद मंडळी! चिन्मय,
धन्यवाद मंडळी!
चिन्मय, झकास,
विरामचिन्हे न घालण्याचा गुन्हा माझा, संयोजकांनी मेहनतीने ती घातली होती.
या कथांसाठी जो फॉर्म वापरायचा मी प्रयत्न केला तो व्याकरणदृष्ट्या अचूक नसेल पण काही अतिशय आवडीच्या पुस्तकांच्या फार आहारी गेल्याने त्याचा मनावर एवढा पगडा पडला की मंडळातल्या रात्रीच्या गप्पांना मी अट्टहासाने तो वापरलाच.
रसभंग झाल्याबद्दल क्षमा असावी पुढल्या लेखांमध्ये तो कमीतकमी होईल असे बघतो.
मस्त रे विशाल, हा भाग पण
मस्त रे विशाल, हा भाग पण आवडला.
आवडले लिखाण.
आवडले लिखाण.
भरगच्च वर्गणी उकळली की नाही
भरगच्च वर्गणी उकळली की नाही त्या फोरेन रिटर्न कडुन.
छान लिहिलेस..
दुसरा भाग पण खूप आवडला बोविश.
दुसरा भाग पण खूप आवडला बोविश.
हा भाग ही आवडला.
हा भाग ही आवडला.
मस्त!! एक छान लय पकडली आहे
मस्त!! एक छान लय पकडली आहे मंडळाने!