मंडळ - भाग ४

Submitted by हायझेनबर्ग on 1 September, 2009 - 01:54

लहान मुलांच्या स्पर्धा संपून आवराआवरी झाली आणि रोजच्यासारखाच सगळा ग्रूप मंडळात गप्पा मारत बसला. माणिक, अजय, रेणुका आणि विकी अजूनही सत्यनारायणाची अणि कालच्या गाण्यांच्या मैफिलीचीच चर्चा करत होते.

अजय म्हणाला, दोनदा बोलावणं पाठवूनही साठे आजोबा प्रसादाला आले नाहीत, शेवटी साठे आजींकडेच मी त्यांचा प्रसाद बांधून दिला.

विकी म्हणाला, शैलेशला पूजेला बसवण्याचा डाव त्यांच्या ध्यानात तर आला असेल ना?

माणिक म्हणाला, काही सांगता येत नाही, तब्येत बरी नाही म्हणून निरोप पाठवला होता त्यांनी, उद्या सकाळी ऑफिसला जाताना भेटून येईन मी.

रेणुका म्हणाली, ए तो मल्हार बापट काय मस्तं गायला रे काल! 'अश्विनी ये ना' काय सही जोशात झालं नाही त्याचं, किशोर असता तर त्यानेही शाबासकी दिली असती पठ्ठ्याला. काय सूर! काय आवाज! मी तर एकदम फिदाच झाले त्याच्यावर. विकीनं आणलेला ऑर्केस्ट्रापण जबरीच होता, पब्लिक काय भन्नाट खूष होतं रे.

अजय म्हणाला, देवाशेठला धन्यवाद दिलेस का तू त्याबद्दल, त्याने फोन केला म्हणून तो बापट आला, देवाने बाकी काही नाही पण एवढं काम एकदम बेस्ट केलं. खरं तर धन्यवाद मलाच मिळाले पाहिजेत, चार दिवस डोकं खाल्लं त्याचं तेव्हा कुठे त्याने वैतागून एक फोन लावला.

स्टेजच्या फळकुटाला पाठ टेकवून दोन्ही हातांच्या घडीसहित काटकोनात दुमडलेल्या मानेनं देवा शून्यात नजर थिजवून उभा होता, तपे लोटल्यावरही अंगाखांद्यावर चढत जाणार्‍या वारुळाचं ओझं घेऊन तपश्चर्येला बसलेल्या स्थितप्रज्ञ योग्यासारखा.

तेवढ्यात एक मोटारसायकल भयाण आवाज करीत कॉलनीच्या गेटजवळ येऊन थांबली. एक पोट सुटून आडव्या तिडव्या पसरलेल्या देहाचा गष्टील आणि एक किडकिडीत अशा दोन माणसांच्या आकृत्या समोरच्या अंधारातून संथ पावलं टाकत मंडळाकडे चालत येत होत्या. हॅलोजनच्या दिव्यांनी अंधाराच्या घोंगडीला जिथे भोक पाडलं होतं तिथे दोन्ही माणसांच्या आकृत्या आणि चेहरे स्पष्ट दिसले.

विकी हळूच कुजबूजत म्हणाला, च्यायला हा रेडा इन्स्पॅक्टर केतनवार कशाला उपटला आता. वर्दीत नसलातरी काहीतरी मतलब असल्याशिवाय फिरकायचा नाही. पैशे खायचा भस्म्या रोग झालाय त्याला, एक नंबरचा निलाजरा आहे साला.

माणिक, अजय आणि रेणुका तिघांनीही एकदम शू शू करून विकीला गप्प राहण्यास खुणावले. अतिशय अलिप्तपणे मांडवात आलेल्या त्या दोघांकडे क्षणभर बघून देवाने पुन्हा मान खाली घातली.

इन्स्पेक्टर केतनवार दोन्ही हात कमरेवर ठेऊन जेलरसारखे त्या चौघांच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले. हॅलोजनच्या पिवळ्याधमक उजेडात त्यांचा राकट चेहरा आणि तांबारलेल्या लाल डोळ्यांतला भेसूरपणा अतिरेकाने ओसंडून वहात होता. निर्ढावलेल्या कसाबासारख्या राकट चेहर्‍यावरून कर्कश्य वाटणार्‍या राक्षसी आवजात ते म्हणाले, काय विकीशेठ, माणिकशेठ कस्काय गणपती यंदा? परस्पर सत्यनारायण उरकून घेता तुम्ही? काही आमंत्रण बिमंत्रण द्यायची पद्धत आहे की नाही तुमच्यात? का मंडळ टाकायची आणि मिरवणूका काढायची पर्मिशन मिळाली की विसरले आम्हांला?

माणिक म्हणाला, नाही नाही केतनवार साहेब, तुम्हाला कसं विसरू हो आम्ही? दरवर्षी आमंत्रण असतंच की तुम्हांला, पण यावेळी सत्यनारायण घालण्याचं अचानक ठरलं आणि प्रसादाची बरीच आमंत्रण द्यायचीच राहून गेली. आम्ही खरोखर दिलगीर आहोत, पण तुम्हीही काय आमंत्रणाची वाट बघत बसलात? मंडळ काय तुम्हांला नवीन आहे, हक्कानीच यायचं तुम्ही.

केतनवार म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्यासवरलेल्या तरूण मुलांनीच जर पोलिसांना असं परस्पर टाळलं तर पोलीस कसा माणसात यायचा? वर तुम्हीच बोलायला आणि पेप्रात छापायलाही मोकळे, पोलिसांना माणुसकी नाही? पोलीस म्हणजे शासकीय गुंडगिरी वगैरे, नाही का रे वाघमोडे.

वाघमोडे म्हणाला, तर तर! आज काल लईच छापत्यात हे पत्रकार बेणं, आणि शिनेमाबी हायेच की. पोलीस तर घरचाच व्हिलेन हायना समद्यांचा. पार अमली पदार्थापासून तर थेट भडवेगिरीपर्यंत कायबी खपिवतेत पोलिसांच्या नावानं. आता तर त्यो नवा पिक्चर न्हाई का आला, त्यात तर रातच्याला डोस्क्यात दगडं घालून खूनबी करतोय पोलीस असं दाखिवलंय, मी तर म्हणतो सरकारनं नियमच काढाया पाहिजे की शिनेमात फकस्त खर्‍याखर्‍या पोलिसांनाच रोल देयाचा नाही तर ते रॉयल्टी का फॉयल्टी तरी देयाला पाहिजे पोलीस डिपार्टमेंटला. आणि..

वाघमोडेला मध्येच तोडत दरडावून केतनवार म्हणाले, बास झालं वाघमोड्या, लईच सिनेमे बघायाला लागला की तू आजकाल?

वाघमोडे उगीचच लाजल्याचा आव आणत म्हणाला, न्हाई साहेब, उगीच आपलं आसंच कवातरी. परवा त्यो सिंधी गँगचा जिमी थेट्रात येणार म्हणून खबर आली नव्हती का, मग माझी ड्यूटीच तिकडं लागली, टाकला बघून मग उभ्याउभ्याच.

वाघमोडेच्या वाक्यावर मंडळात चांगलीच खसखस पिकली.

केतनवारांना त्याचा राग आला असावा, ते म्हणाले, वा रे मर्दा, मग बायकोला नाहीतर तुझ्या देखण्या पेठेतल्या सामानाला घेऊनच जायचं होतंस ड्यूटीला थेट्रात, आणि करायची होतीस मजाहजा कोपर्‍यातक्या शीटावर ह्या पोरांसारखी, जिमी काय आज नाही गावला तर उद्या येईलंच परत सिनेमा बघायला? जातोय कुठं तो उपटायला? नाही का? कामचोर साले एकजात.

विकी म्हणाला, केतनवार साहेब फारंच तडकलेले दिसताय तुम्ही, रात्रीची ड्यूटी लागली वाटतं यावेळी गणपतीत?

केतनवार म्हणाले, ड्यूटीला असल्यावर दिवस रात्र बघत नाही आपण, पण कायतरी थ्रिल नको का त्यात ? हे काय च्यायला, वाट चुकलेल्या खोंडाना गुराख्यानं शेपटी पिरगाळून घराकडे हाकलल्यासारखं करत फटीफटीवरून हिंडायचं, दोन चार स्पीकर जप्त करायचे, चार दोन जणांना ढुंगणावर काठ्या हाणायच्या, जमलंच तर एक दोन बेवडे, रोडरोमिओ धरून चौकीत आणायचे. हाड तेच्याआयला ह्याला काय ड्यूटी म्हणतात. त्या चिन्या झेल्याची गँग पाच तासात संपवली सानप चाळीत, तेव्हा दोघा जणांना आडवा केला होता मी खांद्यावर एक गोळी खाऊन.

कडक उन्हाळयात अकालीच वीज कडाडल्यासरखा देवा म्हणाला, मग त्या रात्री कोहिनूर हॉटेलात गेला होतात का तुम्ही? तिथे चांगले पाच-सहा जण मिळाले असते आडवे कारायला? ते झीलमन हाऊसही सानप चाळीसारखंच आहे की.

केतनवार म्हणाले, च्यायला, जे उठतंय ते अजूनपण त्याच्याबद्दलच बोलतंय, नऊ महिने झाले तरी पब्लिकला चघळायला दुसरा विषय सापडेना. आपलं पब्लिकपण च्यायला एकजात मेंढरासारखं, एकानं बे केलं की आख्खा कळपंच बेबे करत सुटतो. झालं गेलं सोडून द्यायचं तर एकाचाच पिट्ट्या पाडल्याशिवाय थांबतंच नाही.

देवा म्हणाला, नाही तुम्हाला सानप चाळीचा चांगला अनुभव होता तर तो तिथे कामी आला असता, कशाला मग तीस-बत्तीस तास लागले असते? म्हणून म्हणालो.

केतनवार म्हणाले, हेच तर राजकारण आहे च्यामारी, आमच्यासारख्या ब्रेव्ह ऑफिसरला गणपतीची ड्यूटी आणि हागलं मुतलं घेऊन कमिशनरकडं जाणार्‍याला वरच्या पोष्टी, मग बत्तीस तास लागणार नाही तर काय? वरतून बाकीच्या डीपार्टमेंटशी ह्यांचा सवतीसुभा आहे तो वेगळाच.

माणिक म्हणाला, पण केतनवार साहेब, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणता तुम्ही, मग ती खलप्रवृती आतंकवादी असो नाही तर रोडरोमियो, त्या प्रवृत्तीचा नि:पात महत्त्वाचा नाही का? फक्त माणसंच मारण्यात थ्रिल असेल तर ही प्रवृत्ती देखील पाशवीच होते की.

केतनवार म्हणाले, माणसं मारणं पाशवी आणि प्रवृत्तीचा नि:पात महत्त्वाचा, च्यायला मग आता पोलिसांनी बंदुकीच्या होसमध्ये गुलाबाचं फुल लटकवून गांधीगिरी करावी असंही म्हणा.

मध्येच वाघमोडे म्हणाला, टाडा लागलेल्या खर्‍या व्हीलनलाबी शिनेमामध्ये काम हाये, पब्लिक त्येला हीरोबी बनिवतं, पण एका तरी खर्‍या पोलिसाला हीरो बनिवला का आजपातूर शिनेमामध्ये. ते फिरोजभाऊनांच फकस्त पोलिस काय तो कळाला, ते म्हणायचं आगुदर म्या पोलिस इनसपेक्टर मग तुमचा शिनेमा लिव्हा, पर तेबी नाही रायलं बघा आता.

अजय म्हणाला, वाईट लोकांना उठताबसता पेकाटात लाथ पडण्याचा धाक असावा हे मान्य पण सन्याशालाही फुकट फाशी जायची भिती वाटावी, पोलिसांना पाहून त्यानं आपला रस्ता बदलावा या वर्तमानाला पोलीस जबाबदार आहेतच की. माझ्या मनात सैनिकांबद्दल जितका आदर आहे तितका पोलिसांबद्दल खचितंच नाही.

केतनवार म्हणाले, तुम्हाला पोलिसांबद्दल आदर नाही म्हणून पोलीस काय तुमच्याकडे गुलाबाचं फूल घेऊन तो मागायला येणार नाही. आदर नाही म्हणून भीती वाटते आणि तुम्ही पोलिसाला पाहून रस्ता बदलता, पण तुम्ही बदललेला रस्ता अडवून तो बदलल्याबद्दल तुम्हाला चोर ठरवायचं की संन्यासी हे देखील पोलिसाच्याच हातात आहे की नाही? मग अनादर करून तुम्ही जाणार कुठे, तर पोलिसाच्या डोक्यात, आणि वरून बोंबा ठोकणार की पोलिसातला माणूस मेला, पोलिसांनी माणूसकी सोडली.

देवा म्हणाला, असा अडवून, ओरबाडून आदर मागणारा एक तर राजा असतो नाहीतर दरोडेखोर, अशा राजांना त्यांचीच प्रजा एक ना एक दिवस तो निर्वंश होईपर्यंत दगडाने ठेचून काढल्याशिवाय राहत नाही. बाकी उरला दरोडेखोर तर त्याचा पोटचा पोरगाही त्याच्या साक्षीला उभा रहात नाही की डोक्यावर आलेल्या किटाळात वाटेकरी होत नाही.

केतनवार म्हणाले, हे काही रामयुग नाही, इथे जो तो वाल्या कोळीच आहे की. पहा बरं कॉलनीतल्यांचे लाईट मीटर तपासून, दहातल्या पाच जणांनी तरी त्याच्याशी छेडछाड केलीच आहे. कंपाउंड घालतांना पाव फूट तरी रस्त्याची जागा मारलीच की नाही तुमच्या कॉलनीतल्या बंगलेवाल्यांनी? तुम्ही चालवता का सरळ लेनमध्ये गाडी? जागा दिसेल तिथं उभीआडवी दामटताच की नाही? नो पार्किंगमधली गाडी उचलल्यावर बिनापावतीचा कमी दंड घ्या म्हणून म्हणताच की नाही पोलिसाला, मग ही वाटमारी नाही ? भले तुम्ही एखाद्याला अडवून ती करत नसाल पण आहे तर वाटमारीच ना? मग कशाला गांजलेला पिचलेला मध्यमवर्गीय म्हणून ऊर बडवायचा आणि पोलिसाला नावं ठेऊन सोज्वळपणाचा आव आणायचा? ज्याला जसं जमतं तसा तो लुटणार एवढंच.

रेणुका म्हणाली, मी नवी स्कुटी घेतली तेव्हा एका पोलिसानं, सिग्नलला थांबलेल्यांमध्ये मी सर्वात पुढे होते तर उगीचंच मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. माझ्या बरोबर माझी कॉलेजातली मैत्रिणही डबलसीट होती. मी गाडी बाजूला घेतल्यावर त्यानं लायसन आणि पीयूसी मागितलं, मी लायसन दिलं, म्हंटलं, पीयूसी नाहीये! त्याची गरज नाही आताशी गाडी फक्त चारशे किलोमीटरच चाललीये.

तर तो म्हणाला, असला काही नियम नाही शंभर रुपये दंड भरा.

मी म्हणाले, नाही कसा? मला चांगलं माहित आहे असा नियम असल्याचं आणि गाडी घेतांना शोरूमवाल्यानंही सांगितलं होतंच की.

तर तो सरळ माझं लायसन आणि गाडीची चावी घेऊन दुसर्‍या गाड्या पकडायला निघून गेला. मी मागून मूर्खासारखी, अहो असं काय करता वगैरे ओरडत राहिले. पण त्यानं ढुंकूनही पाहिलं नाही, फक्त निर्लज्जासारखा म्हणाला, पीयूसी दाखवा नाही तर शंभर भरा.

माझी तर एकदम तळपायाची आग मस्तकात गेली, वाटलं हा काय माजोरडेपणा, ही तर निव्वळ गुंडगिरी झाली. पण आता गाडी नसतांना तिचं पीयूसी तरी कसं आणणार? मग त्याला म्हंटलं ठीके मी दंड भरते, माझी चावी द्या, आता जाते आणि आरटीओच्या नियमांचं पुस्तकंच घेऊन येते मग द्याल की नाही पैसे परत, तर तो हैवानासारखा नुसताच दात काढत हसला.

मी शंभरची नोट दिल्यावर म्हणतो, पावतीपुस्तक संपलं, पावती घ्यायला उद्या या. ते ऐकल्यावर तर माझ्या मैत्रिणीचं पण डोकं असं सटकलं तिनं शंभराची नोट खसकन ओढून घेतली आणि मला सरळ रिक्षात बसवून तिच्या घरी घेऊन आली.

मी म्हणाले अगं माझी गाडी, तर म्हणाली, काही होत नाही तुझ्या गाडीला, तू आधी रिक्षात बैस.

रिक्षातनं तिच्या घरी गेल्यावर तिनं तिच्या कुणा मोठ्या हुद्यावरच्या काकाला फोन करून गाडीबद्दल सांगितलं आणि म्हणे, आता बघ गंमत. आणि काय गंमत पंधरा मिनिटात तो पोलीसच आला तिच्या घरी गाडी घेऊन, पत्ता विचारत, वर साळसूदपणाचा आव आणत म्हणतो, ताई आधीच सांगायचं ना भोसलेसाहेब तुमचे काका आहेत म्हणून, कशाला तुम्हाला एवढा त्रास झाला असता?

माझी मैत्रीण म्हणाली, काका आत्ता इथे घरी असायला हवे होते मग कळलं असतं त्रास कुणाला झाला ते, आधी मुकाट्यानं हिच्याकडून घेतलेले शंभर रुपये परत करा आणि चालते व्हा इथून.

तो म्हणाला, अहो पण तुम्ही दिलेच कुठे शंभर रूपये? ह्या ताई देत होत्या तर तुम्हीच घेतले नाही का हिसकाऊन.

मग मीही म्हणाले, ओ काय खोटारडेपणा करताय, मुकाट्याने माझे शंभर रुपये द्या नाही तर पुन्हा हिच्या काकांना फोन करतो.

मग एकदम दीनवाणा चेहरा करून शंभर रुपये काढून दिले त्यानं, मी ते येताना सावळ्यामारूतीच्या दक्षिणापेटीत टाकून दिले.

विकी म्हणाला, ह्या तुझ्या पोलिसात काहीतरी दम होता, आमच्या देऊळगावातलं पोलीस तर एकदम दळभद्री. तिथं आमचा एक रोकडे पाटील है. त्याला सगळे रोकडा पाटीलच म्हणतात. रोकडा पाटील म्हणजे आख्ख्या गावचा सावकार, त्याचे स्वतःचे दारुचे चारपाच गुत्ते, आपल्या जाधवरावांसारखी दूध डेअरी आणि एक भली मोठी लाल मातीची तालीम है. वर्षातून त्याला फक्त दोनच कामं, गावातल्या बड्या धेंडांचे भाऊबंदकीचे, जागांचे, शेतांचे आणि तिकिटावरचे वाद मिटवायचे आणि पोळ्याला आसपासच्या चार जिल्ह्यांतल्या तालमीतल्या पोरांच्या कुस्त्या लावायच्या, नाही म्हणायला दरवर्षी एका नव्या बाईला नारळ बसवायचाबी धंदा हैच म्हणा त्याचा.

तर हे वाद मिटवायचं प्रकरण है ना ते लईच मजेशीर. हा रोकडा पाटील वर्षातून दोनदा म्हणजे दिवाळीच्या टाईमाला एकदा आणि वैशाखात एकदा, एक लई मोठ्ठा दरबार भरवतो. दरबार लागला की मग वाद घेऊन येणारी बडी बडी धेंडं आणि एक पोलीसपार्टी अशे दरबारीबी येतात. दोन्ही साईडचं बोलणं ऐकलं की रोकडा पाटील विचार करून निकाल सांगणार, मग थोडी घासाघीस, भावटाव, इकडंतिकडं होऊन सगळी मंडळी एक डील पक्कं करतात आणि रोकडे पाटलाला दहा-दहा टक्के कमिशन देऊन एकमेकाच्या गळ्यात गळे घालून घरी जातात, कधी एखादा लईच नडला किंवा डील झाल्यावरबी फिरला तर रोकडे पाटील त्याला तालमीतल्या लालमातीत गळ्यापर्यंत चार दिवस पुरून ठेवतो, वरून दंड म्हणून उभी पिकं कापून आणणं, बैलजोडी नाहीतर ट्रॅक्टर उचलून आणणं हैच. तरीबी एखादा नाहीच बधला तर त्याचं हातपाय कापायलाबी कमी करत नाही, आणि पोलीस काय करतो तर निसता रिपोर्ट लिहितो, अमुक तमुक पार्टीचं ढमुक गोष्टीवरून भांडण झालं, पोलिसांनी दोघांनाबी तंबी दिली, दोन जणांना दोन दिवस आत डांबलं आणि प्रकरण रद्दबातंल.
हे आत डांबायचं आपलं नुसतं लिहायचं म्हणून लिहायचं, आत बीत कोणी जात नाही? गेलाच तर कधीमधी रोकड्यानं नारळ बसवलेल्या बाईचा बाप नाही तर भाऊ जातो, बस्सं. मागच्या वर्षीतर आमच्या देऊळगावाला तंटामुक्त आदर्श गाव म्हणून बक्षीसबी मिळालं. आमचा रोकडे पाटीलंच गेला होता राज्यपालाकडं बक्षीस घ्यायला.

माणिक म्हणाला, च्यायला चांगलीच पद्धत आहे की ही, अमेरिकेतल्या ज्यूरी सिस्टीमसारखी. आपल्याकडेही पंचायतराज आहेच की अजून खेड्यापाड्यात. आता हा देऊळगावचा रोकडे पाटील, त्यानं का म्हणून फुकटात निवाडा करून लचांड गळ्यात बांधून घ्यावं? ज्यूरीही पगार घेतेच ना? मग यानं पार्टीकडून घेतलं दोन पैसे ज्यादा कमिशन, तर बिघडलं कुठे? तंटा तर मिटतोय ना, भले न्यायदाता दलाली घेत असेल, प्रामाणिक तरी आहे ना. मी तर म्हणतो आपली सगळी पोलिस आणि न्यायव्यवस्था बरखास्त करा आणि रोकडे पाटलासारख्या हुशार लोकांची एक चांगली धष्टपुष्ट फौज आणा. त्याला म्हणावं बाबा नाहीतरी ही शेकडो उंदरं फिरतायेत ना गोदामात, करतायेत ना नासाडी, तर ह्या गोदामातल्या दहा टक्के मालाचा हिस्सा तुझा, तुझ्या पुढच्या मागच्या शंभर पिढ्यांनीही एवढा माल कधी पाहिला नसेल. तर आता तू हे दहा टक्के घे, पण नव्वद टक्के मालाला एकही उंदीर दात लावणार नाही असे बघ, त्यातला एक तीळही इकडचा तिकडं होता कामा नये. घुसलाच एखादा दांडगा उंदीर तर बिनधास्त सोटा हाण.

केतनवार म्हणाले, पण तो स्वत:च एवढा धष्टपुष्ट असेल तर तोच का नाही सांगणार बाकीच्या नव्वद टक्क्यांवरही आपला हक्क! आणि सांगितलाच हक्क तर काय करून घेणार तुम्ही त्याचं? म्हणजे तो उरलेल्या नव्वद टक्के मालाला हात लावणार नाही ह्या त्याच्या चांगुलपणावर तुम्ही विश्वास ठेवलाच की नाही? मग एकाच व्यक्तीच्या हातात तुमच्या गोदामाची जिम्मेदारी सोपवून त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, तीच जिम्मेदारी शंभर लोकांकडे सोपवल्यावर त्यातले वीस तरी चांगले निघतील की नाही?

माणिक म्हणाला, पण वेळच आली तर शंभर उंदरांना झोडपण्यापेक्षा एका विंचवाची नांगी ठेचणं सोपंच आहे की नाही?

अजय म्हणाला, एखादा गॉडफादर, जो अशा बेईमानांचा बाप बनून राहिलाय, त्याचा वरदहस्त डोक्यावर असल्याशिवाय आपल्यासारख्यांची सरकार आणि पोलीसदफ्तरी विनाकारण अडवून ठेवलेली कामं होतंच नाहीत, आणि वरदहस्त नसेल तर मग फेका पैसे आणि घ्या कामं करून. नाहीतर पूर्वी कलकत्यात आतडी बाहेर आल्यासारखे दिसणारे महारोगी रस्त्याच्या बाजूला तळमळत पडलेले असत तसे हाल, कुत्रीही त्यांच्याजवळ फिरकत नसत. प्रत्येकाला आयुष्यात असा नाहीतर तसा अनुभव एकदा तरी येतोच.

केतनवार म्हणाले, तुम्हाला बोलायला काय जातंय, एखाद्या दिवशी दोन तास जास्ती काम केलं तरी ओव्हरटाईम मागणारी पांढरपेशी जमात तुमची, इथं अठरा-अठरा तास डोळे ताठरून काम करणारी, खाण्यापिण्याच्या वेळेचा ताळमेळ नसलेली, हजारोंच्या सैतानासारख्या अंगावर धावून येणार्‍या भडकलेल्या
जमावाला शेकड्यानेच सामोरे जाणार्‍या सगळ्या पोलिसांवरच चारदोन वाईट गोष्टींवरून तुम्ही सैतान असल्याचा शिक्का ठोकताय.

देवा म्हणाला, जास्तीचे कष्ट उपसून केलेल्या कामाचा मोबदला मागायला लाज कशाला वाटायला पाहिजे आम्हांला? ट्रेनिंगमध्ये असतांना पगार मिळतोच की नाही पोलिसांना? का तेव्हा तुम्ही म्हणता मी अजून ड्यूटीवर नाही तर मला पगार नको? अठरा तास काम केल्याने प्रकृतीची हेळसांड होते ही पळवाट आहे,
काम देणारेही पोलीसच आणि करणारेही पोलीसच, जर तुमच्यांतच ताळमेळ नाही तर अतिताणाची तक्रार पब्लिकला सांगून काय उपयोग? त्याचा राग भले तुम्ही, तुमचा पगार ज्याच्या खिशातून येतो त्या पब्लिकवरच काढला तरी तुम्हांला जाब विचारणारा कोण आहे? आम्हीच आमच्या हातांनी आमच्या शरीरावर चिकटवलेल्या ह्या पुढारी अणि नेत्यांच्या जळवा कमी नाहीत त्यात ही अजून एक परपोषी योनी. तुम्हांला ज्यादा कामाचा मोबदलाच हवा असेल तर काढा की देशद्रोही पुढार्‍यांची आणि भांडवलशहांची अंडीपिल्ली बाहेर, करा त्यांना लोकांसमोर नागवा, लुटा त्यांची बेहिशेबी मालमत्ता आणि घ्या वाटून.

विकी म्हणाला, तुम्ही पर्सनली घेऊ नका हो केतनवार साहेब, ही आपली निसती चर्चाच चालू आहे. तुम्ही आमच्या चांगल्या ओळखीचे, आमच्यातलेच जसे, तुमच्याबद्दल आम्हाला खरंच लई आदर आहे. आपलं माणूस म्हणून आम्ही आमचं गार्‍हाणं तुमच्यासमोर मांडतोय, मन मोकळं करतोय इतकंच.

केतनवार म्हणाले, च्यायला, गार्‍हाणं मांडताय का झोडून काढताय ते कळतंय मला, हरकत नाही, आमचा पगार करणारे मायबाप मालक तुम्ही, आमच्या पोराबाळांचे पोषिंदे, आणि आम्ही कोण तर सरकारी नोकर, मग नोकराचं कामंच असतं मालकाने पाठीवर ओढलेले कोरडे गुमान खायचं, बोला तुम्ही.

माणिक म्हणाला, असे कष्टी का होता केतनवार साहेब, आपण समजा सामान्य जनता आणि पोलीस! पुढार्‍यांच्या विषय सध्या बाजूलाच ठेऊ, तर जनता आणि पोलीस यांच्या संख्येचं प्रमाण शंभरास चार असं धरलं आणि दरडोई उत्पन्नासारखा सरासरी दरडोई गुन्हेगारीच्या प्रमाणाचं गणित मांडून एक मूल्य काढलं तर तुम्हाला काय वाटतं, पोलिसांच्या गटातली व्यक्ती जास्त गुन्हेगार ठरेल की सामान्य माणसाच्या गटातली? हां आता सामान्य कुणाला म्हणायचं हा प्रश्न आहेच त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता.

अजय म्हणाला, माणिकच्या बोलण्यात पॉईंट आहे. ऐनवेळी तुमच्या बंदुका चालत नाहीत, तुमच्या जिवाभावाचे साथीदार मरतात तरी तुम्ही त्याचा पाठपुरावा करत नाहीत? का तर कुठेनाकुठे भ्रष्टाचाराच्या त्या दरडीखाली तुमचाही हात अडकलेला असतो? कोण हा आमच्या जिवाशी खेळतोय? म्हणून तुम्ही त्याच्या मागावर बंदूका सरसावून पेटून निघणार नाहीत, पण खून, इस्टेटीची भांडणं, कौटुंबिक हिंसेसारख्या गुन्ह्यात पैसे खाऊन खोटे रिपोर्ट लिहिणार. हवाला, खंडणी, संघटीत गुन्हेगारी अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये स्वतः पोलिसांचे हात बरबटलेले नाहीत? किती जबरी चोर्‍यांतला ऐवज पोलिसांनी पकडल्यावरही मूळ मालकाला परत मिळतो? बलात्कार केल्याच्या आणि कोठडीत जीव जाईपर्यंत मारहाण केल्याच्या नृशंस केसेसमध्ये पोलीसच अडकले नाहीत? लायसेंस, पासपोर्ट सारख्या हक्काच्या आणि गरजेच्या बाबींमध्ये तुम्ही लोकांना अडवून अडवून घेता.
म्हणजे ह्याचा अर्थ एकच, जो खवीस तुमच्या नाड्या आवळून आहे त्याच्यासमोर तुम्ही नांग्या टाकणार आणि भलत्या नामर्द लोकांच्या नरडीत नांगी रुतवून त्याच्या रक्तानं तुमच्या तुंबड्या भरून घेणार. मग देवा म्हणतो तेच खरं, राजा नाही तर दरोडेखोर. जनता-पोलिस सौजन्यसप्ताह करावा लागतो म्हणजेच आता
लोकशाहीत काही राम उरला नाही. कुठल्याही सरकारी नोकरानं वाटेल तेव्हा तिला आपल्या अंगाखाली घ्यावी अशीच तिची स्थिती झालीये आता.

रेणुका म्हणाली, पण चांगले, इमानदार ऑफिसर्ससुद्धा आहेतच की नाही तुमच्यांत? इतकी वर्षे कसोशीनं स्फोटांचा तपास करणारे, आतंक्यांसमोर छातीचा कोट करून गोळ्या झेलणारे होतेच की आणि आजही आहेतंच ना? मी माझ्या घरात निवांतपणे झोपू शकते, रस्त्याने ट्राफिकचा त्रास सोडला तर निर्धोक चालू शकते, म्हणजे ह्या सगळ्यांवर कुणातरी चांगल्या सुत्रधाराचा वचक असल्याशिवाय का? जिची सदसद्विवेकबुद्धी अजून जागी आहे, लोकशाहीवर जिचा दृढ विश्वास आहे अशी एखादी तरी प्रवृत्ती असल्याशिवाय का हे सगळं सुरळीत चालू आहे? आतमध्ये किती खोलवर कीड लागलीये माहित नाही पण निदान वरवरचा डोलारा अजून शाबुत असल्यासारखं वाटतंय. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' कुणीतरी
कुठेतरी दृष्यअदृष्य रुपात भरून राहिला आहेच ना! माझा त्याच्यावर गाढ विश्वास आहे.

केतनवार म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्याच बोलण्यात पॉईंट आहे. आपणपण कबूल करतो आपण काही सच्चा, प्रामाणिक, इमानदार पोलिस ऑफिसर नाही, आज मिळतो त्या पगारात अजून मी वीस वर्षे रोज अठरा तास बुड घासलं तरी आजिबात घ्यायला परवडणार नाही अशा शेकडो गोष्टी माझ्याकडे आहेत पण मी काही कोणा गरजवंताला अडवून किंवा माफियाकडून हा पैसा कमावलेला नाही. पहिले पहिले तर तुम्हांला नको असला, पटत नसला तरी हा फुकटचा वाटा सिस्टीमचा भाग म्हणून पदरात प्रसादासारखा घ्यावाच लागतो आणि एकदा का त्याची चटक लागली की अक्कल त्याच्या मागेच पळते. मग चूक बरोबर काही कळंत नाही. आता हा आमचा अठरातीस, वाघमोड्या, ह्याचा पगार सातहजार पाचशे सदतीसच्या वर एक नवा रुपयाही नाही, घरी खाणारी पाच तोंडं मग तो हातातली काठी दाखवून थेट्रात ब्लॅक करणार्‍याकडून हप्ता घेणार नाही तर काय सावळ्यामारूतीच्या मंदिराबाहेर भीक मागणार?

वाघमोडे म्हणाला, साहेब, दहा वाजायला आलंय, शिटी थेट्रात शारूखच्या नव्या शिनेमाचा फर्स्ट डे हाये आज, जायाचं ना तिकडं. पंटरांचा लई मोठा गल्ला जमा झाला आसन दिवसभरात. तुम्हीबी काय ह्या पोरांच्या नादी लागता? त्यास्नी काही कामधाम नाही रात्रभरबी तोंड वाजवायला त्यांना काय धाड भरलीये, कोपर्‍यावरच्या रसुल्याकडं भुर्जीपाव हाणू आणि जाऊ थेट्रातंच.

केतनवार म्हणाले, असं म्हणतोस! चल बाबा! माझं तर पोट या पोरांबरोबर गप्पा मारूनच भरलंय, पण आता साहेब म्हणून तुझ्याही पोटाची काळजी मला आहेच की. बराय माणिकशेठ, विकीशेठ, पुढल्यावेळी पाठवा आठवणीनं सत्यनारायणाचं आमंत्रण.

अवकाळी वचावचा पडून अंगणात घोटाभर चिखल करून गेलेल्या पावसासारखे केतनवार आणि वाघमोडे आल्या वाटेनं निघून गेले आणि मंडळ क्षण दोन क्षण पाऊस ओसरल्यानंतरच्या भिजक्या, कुबट वासाच्या शांततेसारखं स्तब्ध झालं. अचानक कुठूनतरी थंड, बोचर्‍या वार्‍याची एक झुळूक आली, आणि झाडावरचा भुत्या धाय मोकलून रडावा तसा टपाटपा पाऊस गळायला लागला. विकी आणि अजयनं भरभर मंडळाचे निळे पडदे ओढून घेतले आणि ते पावसाला शिव्या देत आतंच बसले. माणिक आणि रेणुकाही पटकन देवाचा निरोप घेऊन धावतंच घराकडे गेले.

देवाला वाटले, हा कसला अभद्र पाऊस, जोनास बाकरिचच्या पुस्तकात, नाझींनी त्याला ऑशविट्झच्या मसणखाईत नेतांना असाच पाऊस पडत होता, तेव्हा तो म्हणाला, अजूनही हा पाऊस पडतोय, माणसाच्या रक्तासारखा काळा आणि क्रुसावर ठोकलेल्या खिळ्यांसारखा टोकदार...अजूनही हा पाऊस पडतोय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोविश.

मंडळ झ्याक. प्रातिनिधिक आहे. भाषेची धार जबरी आवडली. विडीके आणि बी ला अनुमोदन.
देवाच्या मनातली आंदोलनं आणि त्याची आत्ममग्न विमनस्कता टिपताना तर सर्वात खास. प्रत्येक भागाची सुरवात आणि शेवट फार छान जमलाय.

हा शेवटचा भाग असेल तर समाप्त लिहिणार का? आणि या भागाचे पुढचे पान म्हणुन मराठी साम्राज्याचा इतिहास दिसतय, ते बदल कृपया.