मनमोकळं-३

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मी ऑफिसातून येते तेंव्हा सोसायटीच्या आवारात मुलांचा दंगा चालू असतो. एखादी छोटी गोड मुलगी कधीकधी
तक्रार करते. " आंटी ही मुलं बघा कसं चीटींग करतायत. " मग एखादा तसलाच गब्बू मुलगा तिरतिरतो,
" एक तर खेळायला येत नाही आणि मधेमधे करतात. रडूबाई.. "
आणि शांतपणे खेळ पुन्हा सुरू होतो. रडूबाई पण नाक मुरडून इतर काहीतरी शोधतात किंवा थोडा वेळ
बघून पुन्हा खेळात सामील होतात.
सुट्टीत भाचेकंपनी येते तेंव्हा भाची विरुद्ध दोन भाचे असा खेळ बहुतेकदा चालू असतो. ती लहान आहे पण खूप
ऍग्रेसिव्ह. बर्‍याचदा तक्रार सांगत येते की ते दोघं मिळून मला त्रास देतायत. पण मुलं शांतपणे सांगतात तिनंच
खोडी काढली आणि तिला चिडवलं तर तीच आम्हाला मारायला लागली. आम्ही फक्त तिचे हात पकडून ठेवले. हे
सांगतानाही ते हसत असतात आणि तिचा चेहरा रागाने लाल झालेला असतो. कधीकधी गोबरे गाल ओले पण होतात.
हे इतकं आत भिनलेलं असतं का? का आपण ते बिंबवत रहातो? मुलगा विरुद्ध मुलगी किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असं?
या बायका ना... किंवा हे पुरुष म्हणजे.. वगैरे सारखी वाक्यं चालू फ्याशनप्रमाणे शब्द किंवा भाषा बदलतात
पण अर्थ तोच.
बायकांचं शॉपिंगचं वेड तर पुरुषांची क्रिकेटची किंवा वर्तमानपत्रांची ओढ किंवा टेबलफ्यानगिरी
(म्हणजे प्रत्येक सुबक गोष्ट १८० प्लस डिग्रीजमधे मान वळवून वळवून पहाणे. तेही बायको किंवा गर्लफ्रेंड मागे
किंवा शेजारी बसलेली असताना.) हे चेष्टांचे हमखास विषय.
फक्त एक जाणवणारी गोष्ट म्हणजे मुलं हे सगळं चेष्टेच्या सुरात बोलतात आणि बायका वैतागून. बचाव करतानाही
मुलगा नेहमी कूल असतो तर मुलगी नसलेले पदर खोचून स्वतःचे मुद्दे हातात ठेवून ठाम उभी असते.
माझा एक कलीग वेळ जात नसला की " बायकांची जागा ना सैपाकघरातच " अशा प्रकारचे एखादे वाक्य बोलतो
की टीममधल्या सगळ्या मुली वसावसा ओरडायला लागतात. मग तो जोरात हसतो आणि म्हणतो " चला आता थोडा
वेळ टाईमपास होईल. " हे सगळे माहीत असूनही त्याच्या अशा स्फोटक वाक्यांवर आम्ही दरवेळी तितक्याच तावातावाने
बोलायला लागतोच. मग तो अधूनमधून फक्त " बघ आता कशी अगदी मुलीसारखी ब्बोललीस? " असं घृतार्पण करतो.
आणि आग तेवती ठेवतो.
नुसता स्वभावच असं नाही तर खूप पुराणकाळातले संदर्भ असणार या वेगळेपणाला. शिवाय पुरुषाला इतक्या युगांच्या
वर्चस्वामुळं अजूनही मी म्हणेन तसं शेवटी होणारच आहे तर घे बाई बोलून असा विश्वास असू शकेल. किंवा चल या
छोट्या गोष्टीत तू जिंकून घे मग मोठ्या गोष्टी मी ठरवणार आहेच असाही कदाचित.
बाईच्या अशा प्रत्येक गोष्ट सिरियसली घेऊन सतत डिफेंडींग एंडला रहाण्यामागचे कारण नक्की आहे.
प्रत्येक गोष्टीला वय असतं, निर्मिती आणि र्‍हास असतो. तसाच तो समाजाला आणि संस्कृतीलाही असतो. आताचा आपला समाज
अशा वयात पोचलाय की पुरुषाच्या बरोबरीचं स्थान मिळवायला स्त्री धडपडतेय.तिला स्वतःला सिद्ध करायचंय.
त्यामुळं ती सतत आपल्याला कुणीतरी जोखंतय अशा आविर्भावात असते. आणि ते खरंही आहे. नवराच काय पण इतरही
आजूबाजूचे लोक हे करत असतातच.
मी कधी उशीर झाला म्हणून घाईनं चालत येत असले की सैपाकपाणी उरकून, नवरामुलं घरी परतायच्या
आधी निवांत कट्ट्यावर बसलेल्या सुगृहिणींमधली एखादी बोलते,
" अगं बाई किती गं धावपळ तुझी? मग काय आज नवर्‍याला नुसती खिचडी का? " काय उपयोग मग एवढं दोघं
दोघं कमावून? हे पुढचं ही मला ऐकू येतं.
छोटं बाळ पाळणाघरात ठेवून एखादी आई जात असेल तर तिच्या ऍबसेन्स मधे " किती ना बाळाची आबाळ?
रोज उशीर होतो जवळजवळ. " वगैरेसारखी वाक्यंही ऐकलीत.
साम दाम वापरून बाई स्वतःची लढाई जिंकायला बघतेय. दाम तर हल्ली सगळ्यात परिणामकारक. हौसमौज म्हणून
नाही तर पैसे मिळवायला म्हणून जातेय म्हटलं की थोडीबहूत ऍडजस्टमेंट होते हे तिला कळलंय. सामोपचार तर
सतत वापरावा लागतोच.
पण परिस्थिती बदलतेय. नवरे, सासवा अधिक कोऑपरेटिव्ह होतायत. बस गं थोडा वेळ मग आहेच. किंवा अगं तुला या
पोनीपेक्षा स्टेपच चांगला दिसतो हं किंवा कशाला तो साडीचा घोळ घालतेस? तो परवा घेतलायस तो ड्रेस घाल ना.
हे बोलणं आता फारसं अप्रुबाईचं राहिलेलं नाही.
आणि शिवाय आपली सुपरवुमनगिरी प्रत्येक वेळी दाखवायलाच हवी असं नाही हे तिच्याही लक्षात येतंय. नाही बाबा मला
वेळ होत रोज दोन भाज्या, कोशिंबीर, डाळ, भात, पोळ्या करायला किंवा रोज देवपूजा करणं नाही होत, उदबत्ती लावली
तरी चालेल. शनिवारी रविवारी करू यथासांग. हे आता ती स्विकारायला लागलीय. सगळ्यात महत्वाचं घरच्यांबरोबर
आणि विशेषतः मुलांबरोबर वेळ घालवणं आहे. तर आपला मूल्यवान वेळ तिथेच घालवावा. बाकीची कामं करायला
माणसं ठेवता येतात माया करायला आपणच हवेत हे तिला जाणवलंय. आणि पुरूष पण त्यांच्या कूल मधे अरे बायको
उशिरा येते रोज माझ्यापेक्षा मग मी आधी आलो की करतो काहीतरी किंवा जातो बाहेरच हे सहज सांगू शकतात.
तरीही ही परिस्थिती तळागाळात पोचायला वेळ लागेलच. सकाळी उठून एकत्र कुटुंबाचा सैपाक करून, आवरून कमी
पगाराच्या नोकरावर ९ ला हपिसात पोचणार्‍या बायकाही लाखांनी आहेत. वर " अगं सासू करतेच संध्याकाळी. मग मी
सकाळचा करूनच निघते. म्हणजे मग दिवसभर टेन्शन नको. ती तरी किती करणार? मुलाला पण पाळणाघर लावलेय.
तिला हवं तेंव्हा ती घरी ठेवून घेते मुलाला, नाहीतर पाठवते पाळणाघरात. " हेही अगदी सहजपणे सांगतील.
हे असं होतच रहाणार. शेवटी तू आहेस म्हणून मी आहे हे दोघांच्या बाबतीत सत्य आहे.
एका क्षणात परिस्थिती बदलणार नाहीच. तिला तिचा वेळ द्यावा लागेल. बाईला समर्थ व्हायला, आत्मविश्वास रुजवायला वेळ
द्यावा लागेल आणि तसा हे सगळं इतर आप्तजनांना पचवायलाही द्यावा लागेल. त्यांना पण हे नवीन आहे ना. नव्या गोष्टींशी
ऍडजस्ट व्हायला तिला वेळ हवा तसा त्यांनाही हवाच ना.
पण यावर नेटानं काम करत रहावं लागेल ते मात्र सगळ्यात जास्त बाईलाच.
त्यात तिच्या सुहृदाची तिला साथ लाभेल ही खात्री आहेच! हो ना?

विषय: 
प्रकार: 

अगदी नेमक टिपल आहेस आजकालच आजूबाजूच वातावरण Happy पण खर पहायला गेल तर, स्त्रीचीच जास्त ओढाताण अजूनही होते अस मला वाटत...

१८० डीग्री.. हा हा हा
खरच मला पण आठवड्यात मनासारखी सर्वच कामं नाही जमत.
आयटीला अनुमोदन.
तु माझ्या मनातलंच लिहितेस असं वाटतं वाचतांना.

मित्रा,
खरच ग, किती नेमकं आणि बॅलेन्स्ड लिहील आहेस.
माझ्या मनात असेच विचार येतात. उगाच का मुलांना (पुरुष या अर्थाने) सतात नावं ठेवण्यात आणि त्यांच्याकडुन समजुन घेण्याची अपेक्षा करत आणि ती पूर्ण नाही झाली तर हिरमुसण्यात वेळ घालवायचा? त्यांनाही वेळ हवाच सगळ ऍक्सेप्ट करायला, अंगी बाणवायला.
आपणही शांतपणे प्रतिक्रिया द्यायला शिकल पाहिजे.. नहितर सतत ते आपल्याला चिडवणार आणि आपण चिडणार. यात वेळ घालवा कशाला? बोलण्यापेक्शा करुनच दाखवुया ना.
अनघा

सन्मे, परीस्थिती बदलतेय हे खरंच आहे गं. दोघांच्या संसारात बायकोला यायला उशीर होतो म्हणून रात्रीचा कूकर लावणारे नवरे आहेत. आणि हल्लिच्या सासव स्वतः नोकरी रीटायर्ड झालेल्या आहेत म्हणून की काय माहीत नाही पण co-operative आहेत हेही अगदी १००% खरं.......

सन्मी .. अगदी आवडतय तुझं मनमोकळं लिखाण. काही नवं लिहिलं आहेस कां हे पहायला अगदी मुद्दाम इथे चक्कर मारावीशी वाटण्याइतकं आवडतय. लिहित रहा.

सन्मे, अगदी 'दे टाळी' झालाय लेख! सगळयांच्या प्रतिक्रिया माझ्याही आहेतच.
अगदी वेचलयस निवडक.

माझ्या लेकाला सगळं चटक मटक खायला आवडतं. स्वतःहून स्वयंपाकात मदत करतो (कधी कधीच). पण हे ही नसे थोडके. म्हटलं किमान तुला आवडतं ते तरी करून खाता आलं पाहिजे आणि 'तिलाही' करून घालता यायला हवं.
स्वयंपाकघर हा फक्तं तिचा प्रांत नाही.... हे आता पुढची पिढीतली (शिकल्या घरातली) बरीच कुटुंब समजून आहेत.
लेख सुंदरच. तुझं हे मनमोकळं वाचायला मीही येते इथे.

<<नव्या गोष्टींशी ऍडजस्ट व्हायला तिला वेळ हवा तसा त्यांनाही हवाच ना.
पण यावर नेटानं काम करत रहावं लागेल ते मात्र सगळ्यात जास्त बाईलाच.>>

आईनीच लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे घरात काम करायला.मग पुढच्या पिढीत दिसून येईल फरक! तेव्हा बायकोला नवर्‍याला काम शिकवायलाच नको की त्याचा दृष्टिकोन बदलायला नको. बर्‍याच वेळा बायकाच बायकांचा शत्रू असतात असे म्हटले जाते. ते काही अंशी खरे आहे."मी कित्ती बाई सुगरण, कित्ती घरात काम करते" चे गोडवे गायला दुसर्‍यांचा बळी द्यायला काही वाटत नाही त्यांना. मग ती सून असो वा शेजारीण! कदाचित हा न्यूनगंड ही असू शकतो स्वतः पैसे मिळवू न शकल्यानं!

सॉलीड लिहीलय, एक न एक वाक्य कस अगदी पटणारच. होतोय बदल, नक्किच. लिहीत रहा.
टेबलफ्यानगिरी.... LOL , कसला सही शब्द शोधुन काढलायेस.

या प्रतिसादांवर प्रतिक्रियाच दिली नव्हती. सो इथे लिहीते. सगळं वाचल्याबद्दल आणि आवर्जून सांगितल्याबद्दल आभार.
दाद, ट्यु .. आपल्याला आवडणारं लिहीणार्‍याला आपलं लिखाण आवडतं हे वाचून खरंच खूप छान वाटलं..
इंद्रधनू, मंदार इतक्या दिवसांनी वाचलंत आणि त्या निमित्तानं माझीही उजळणी झाली. Happy
इंद्रधनू, अगं कर ना ट्रान्सलेट. मला पण पाठव आणि Happy

संघमित्रा, एकाच दिवशी तुझं बरंच लिखाण वाचलं. त्यामुळे "छान आहे" टाईप करण्याचा पण कंटाळा आला म्हणुन वर "ह्म्म्म" असं लिहीलं. Happy