कल्याणकारी राज्य

Submitted by नितीनचंद्र on 24 October, 2010 - 13:52

रात्रीचे सात वाजुन गेले होते. आज शनिवार उद्या सुट्टी म्हणुन मी काम संपवत होतो. काल पासुन रविवारच्या कामांच्या याद्या तयार होत होत्या. काही खरेदी करायची होती, नातेवाईकांना भेटायचे होते. शनिवार हा शनिग्रहाच्या नावाच्या साधर्म्य असलेला वार शनि या ग्रहाच्या मंदगती सारखा संथगतीने पुढे सरकत होता.

या क्षणाला अख्या प्लँट मधे स्टोअर असिस्टंट, मी आणि सिक्युरीटी गार्ड्स येव्हडीच परीचयाची माणसे उपस्थित होतो . आमच्या कंपनीने औषधी टॅबलेट बनवण्याचा जुनाच प्लँट मुंबई पुणे नविन हायवेवर तळेगावच्या जवळ विकत घेतला होता. माझी एच. आर. व अ‍ॅडमिन मॅनेजर म्हणुन नेमणुक केली होती. यात आता कॅपसुल बनवण्यासाठीच्या प्लँट्चे वाढीव बांधकाम सुरु झाले होते. एच. आर. व अ‍ॅडमिन मॅनेजर म्हणजे मी नविन कर्मचारी भरती, त्यांचे सुरवातीचे ट्रेनिंग यासोबत प्लँट च्या क्षमता वाढीसाठी चाललेल्या सिव्हील कामाची जबाबदारी पण घेऊन काम करत होतो.

जुन्या औषधी टॅबलेट बनवायच्या प्लँट मध्ये कामाची एकच शिफ़्ट होती. तिथले कामगार कर्मचारी, मॅनेजर्स सगळे आपापल्या घरी पोहोचले होते. कशाला पाहिजे कॅप्सुल प्लँटला प्रोजेक्ट मॅनेजर, मी पाहिन सगळ सिव्हील काम अशी फ़ुशारकी मारुन आता अडकलो होतो.

सिमेंटची तात्पुरती बाजारात कमतरता होती म्हणुन मी जवळच्या सिमेंट डिलर रमणशेठ कडुन तो सांगेल त्या भावाने, तो सांगेल त्या वेळेला एक हजार पोती सिमेंटची डिलिव्हरी घेण्यासाठी शनिवारी अडकलो होतो. दुपारी तिन वाजता ट्रक सिमेंट घेऊन येईल अस आश्वासन होत आणि प्रत्यक्षात ट्रक संध्याकाळी सहा वाजता कंपनीत आला होता. स्टोअर असिस्टंटला मी सिमेंटची पोती मोजुन घ्यायला थांबवला होता. तोही नाखुषीने आपली ड्युटी करण्यासाठी तात्पुरत्या बांधलेल्या सिमेंट गोडाउनच्या समोर उभे राहुन पोत्यांची गणती करत होता.

सिमेंट उतरवणारे मजुर एका लयीत पोती उतरवत होते. सगळ काही ठीक चालल आहे हे पाहुन मी माझ्या ऑफ़िसमध्ये येऊन आणखी काही इमेल पहात बसलो. पाचच मिनिटात इंटरकॉम ची रिंग वाजली. मी फ़ोन घेतला.

" नमस्कार साहेब मी सिक्युरीटी गार्ड रमेश बोलतोय. आपल्याला स्टोअर्सच्या ठाकुर साहेबांनी सिमेंट गोडाउनला बोलवल आहे."

" का काय झाल ?"

" सिमेंट उतरवणाया कामगारांनी काम बंद केलय. अजुन ट्रक मधे साधारण २५० पोती आहेत. कामगार बसुन आहेत आणि ट्रकवाला जायची घाई करतो आहे."

" अरे, पण अस काय झाल म्हणुन ते कामगार पोती उतरवत नाहीत ?" मी विचारल.
" हो मी आणि ठाकुर साहेबांनी पण विचारल तर म्हणतात त्यांचा आठवड्याचा पगार झाला नाही म्हणुन त्यांनी काम थांबवलय."
" अरे पण त्यांना सांग की ट्रकच भाड आणी सिमेंट उतरवायची मजुरी सगळ रमणशेठला देऊन झालय. कंपनी तुमचा पगार देऊ शकत नाही."

" सांगीतल साहेब पण ते काही बोलायला तयार नाहीत. मान खाली घालुन सिमेंट गोडाउनसमोर बसलेत."
"थांब जरा आलोच" मी म्हणालो. मनातल्या मनात शिव्या मोजत मी ऑफ़िस सोडल आणि साधारण दोन मिनीटांच्या अंतरावर असलेल्या गोडाउन पाशी पोचलो.

मला पहाताच ट्रक ड्रायव्हर माझ्याकडे आला. " साहेब ही पोती उतरवायची असतील तर उतरवा नाहीतर राहुद्यात. आज आपला वार आहे. सात वाजुन गेल. अंगठावर करुन ड्रायव्हरने त्याची आठवड्याचा पिण्याचा वार असल्याचे सांगीतले.

"सात वाजता आपण गुत्यात राहतो साहेब. अजुन ट्रक खाली होणार, गाडी परत न्यायची, मालकाच्या दरवाज्यात लावायची, चावी द्यायची म्हनजी नऊ वाजणार. मायला... आज सकाळपासुन पिडा लागली आहे. तीन वाजता तुमचा ट्रक लोड झाला. तुमच्या कंपनीकड यायला लागलो आन रस्त्यात एक आडवा आला. त्याला जरा धक्का लागला तर तो लागला हजार रुपये मागायला. त्याच मिटवल तर वाजल सहा. इथ आलो अन घाई लावली तर हे लेबर पडल आडव. यांच्यातर आयला.... मी यांचा मालक असतो ना तर इथल तंगड्या मोडल्या असत्या येकेकाच्या. कामच्या वेळेला खोटी केली का त आपल्याला नाय चालत ."

ड्रायव्हर त्या कामगारांना शिव्या घालत होता. ते त्या ड्रायव्हरकडे न पाहता उकीडवे बसुन होते.

"थांबा, मी आलोय ना. बघतो काय झाल" मी शांतपणा धारण केला. अश्यावेळी प्रश्न समजाउन घेतल्या शिवाय तोडगा निघत नाही.

ड्रायव्हर ऐकुन मी सिमेंट उतरवणाया कामगारांकडे वळालो.

" काय झाल तुम्हाला ? सिमेंट का नाही उतरवत ?" मी त्यातल्या एका कामगारकडे पहात जरा खोट्या रागाने विचारल.

दोन वेळा विचारुन उत्तर देत नाही म्हणल्यावर मी आणखी आवाज वाढवला.

"रमणशेठ्ला मी तुमची मजुरी आणि ट्रक भाड सगळ दिलय. आता कामाच्या वेळेला आडव लावल तर समोर बांधकामाचे लेबर आहेत त्यांच्याकडुन राहिलेल सिमेंट उतरवुन घेईन. पण एक तांबडा पैसा जास्तीचा देणार नाही. ड्रायव्हर यांना जाताना गावात घेऊन जाउ नका. बघुया रात्रीच कस जातात गावात परत."

"साहेब जास्तीच पैस राहुद्या पण आज आठवड्याचा पगार आज मिळला न्हाई. आत्तापतुर रमणशेठ गेल असतील त्यांचा कामला. आमी काय कराव? राशनला पैका न्हाही तर खायच काय ? खायच राहुद्या पण आजच्या गुळाला बी पैक न्हाहीत कुणाकड." एक कामगार बोलला.

त्या कामगाराकडे मी पहात होतो. आज इतक्या जवळुन सिमेंट ची पोती चढवणे उतरवणाया कामगारांना जवळुन पहात होतो. सर्व कामगार सिमेंटने माखलेले होते. अंगावरचे कपडे,डोक्यावरचे केस, भुवया, मिशा अशी कोणतीच जागा नव्हती जिथ सिमेंट नव्हत. बरेच दिवस अंघोळ न केलेले असा चेहेरा होता. भाकरी सोडुन त्यांना गुळाची काय चिंता लागली होती काही कळत नव्हत.

" हे मला काय सांगता ? रमणशेठ्ला सांगाना ?" मी रागाने बोललो.

"निघताना म्हणाल व्ह्त येव्हडी गाडि खाली करुन या मग देतो पगार" त्यातला दुसरा कामगार बोलला.

" या डायवरन येकाला उडवला आण लेट झाल वरुन आमलाच कावतो. आता शेट गेल त्यांच्या कामाला. त्यांच्या ध्यानात ह्रातय व्हय आमच्या पगाराच ?"
मी मोबाईल काढला आणि रमणशेठला फ़ोन लावला. रमणशेठ ने फ़ोन उचलला. माझा आवाज ओळखुन रमणशेठ म्हणाला " काय हो साहेब काय झाल?"

" रमणशेठ तुमचे लेबर सिमेंट उतरवत नाहीत. पगार नाही दिला म्हणतात."

" हो हो साहेब, गडबड झाली. आज शनिवार, त्यांचा पगाराचा दिवस. तुमची गाडी खाली करायच्या आधीच पगार दिला असता तर या लेबरनी सुट्टी केली असती. तुमचा वांदा झाला असता म्हणुन त्यांचा पगार मागे ठेवला. मला फ़ोन आला म्हणुन मी घाईन इकड खालापुरला आलोय. तुम्ही तेव्हडा त्यांना प्रत्येकी शंभर प्रमाणे सहाशे रुपये द्या. मी तुम्हाला सोमवारी परत देतो तुमचे पैसे. राम्याला फ़ोन द्या मी सांगतो समजाऊन"

मी न बोलता राम्या कोण विचारल. त्यातल्या त्यात तरतरीत कामगार फ़ोन घ्यायला पुढे झाला. दोघांच काहीतरी फ़ोनवर बोलण झाल.
" पर साहस रुपयांच्या जागी शंभरान काय व्हतय " तो फ़ोनवर रमणशेठला म्हणाला. रमणशेठन सोमवारी उरलेले पैसे द्यायचा वादा केला. मग रुजवातीला मंडळी माझ्याकड आली.
"साहेब नक्की देनार नव्ह शंभर परत्येकाला ? " माझ्या हातात फ़ोन देत राम्या म्हणाला

मला मान हलवण्याखेरीज पर्यायच नव्हता.

"चला रे, काढा पोती बिगी बिगी" राम्यान आवाज दिला तशी उरलेले पाच कामगार वेगाने कामाला लागले. साधारण अर्ध्यातासात सिमेंटच्या उरलेल्या पोत्यांची थप्पी लाउन पैसे घ्यायला माझ्या समोर उभी राहिले. मी गुमान सहाशे रुपये त्यांच्या हातवर ठेवले.

पैसे मिळताच राम्या सोडुन पाच कामगार पटापट उड्यामारुन ट्रकमधे बसले. राम्या तेव्हडा माझ्या समोर उभा होता.
राम्या म्हणाला " साहेब आता तुमी पुण्याकड जाणार ना ? मला सोडाना सोमाटण फ़ाट्याला. बाकीच्यांना वडगावला जायच हाय ते जातील ट्रक बरुबर.

" तुला रे काय माहित मी पुण्याला रहातो ?" मी विचारले.

" तो वॉचमन नव्हता का मगा म्हणत सायबांना लांब पुन्याला जायच हाय तवा म्हणल मला सोडा सोमाटण फ़ाट्याला. माझ घर तिथ हाय."

" थांब मग जरा मी येतो ऑफ़िस बंद करुन" मी हो म्हणताच राम्याने आवाज दिला " निघार तुमी "

ड्रायव्हर ने स्टार्टर मारला. बाकीच्या पाच कामगारांना घेउन ट्रक कंपनीच्या बाहेर गेला. ठाकुरनी सिमेंट गोडाउन बंद करुन घेतले. सिक्युरीटीकडुन सगळ ऑफ़िस सिल करुन घेतल. तो जवळच रहात होता म्हणुन मोटार सायकलवर येत होता. मला विचारुन तोही निघाला.

आमच्या कंपनीन आम्हाला नेण्या आणण्याकरता बस ठेवली होती. उशीर झालातर सुमो ठेवलेली होती. सिक्युरीटीने आधिच सुमो बोलावलेली होती. मी सुमो ड्रायव्हर आणि राम्या आता जायला निघालो.

मगाच पासुन हे गुळाच काय लफ़ड आहे ते विचारायच होत.

कंपनीच्या बाहेर येताच मी राम्याला विचारल " राम्या मगाशी तु म्हणत होतास की गुळ खायला पैसे नाहीत. हे काय आहे ? "

" साहेब तुमाला माहित नाही व्हय ? " राम्याने विचारले. मी नकारार्थी मान हलवली.

"ह्या कामाला कोण टिकत न्हाही साहेब. कुणाकूनाची मजबुरी असती म्हणुन सिमिट्च काम कराव लागत. रातीचा गुळ खाल्ला आण पानी प्यायल म्हणजी काय तरास होत नाय सिमिटिचा."

मी ऐकत होतो. सिमेंट ची वहातुक करुन नाकातोंडात सिमेंट रोजच जाण्याने काहीना काही रोग होणारच. यावर पर्याय म्हणुन हे कामगार रात्री जेवणा आधी गुळ खाउन पाणी पितात. याने कोणताही रोग होणार नाही याची त्यांना खात्री असते. सर्वच ठिकाणी हा परंपरागत उपाय प्रसिध्द आहे हे मला आजच समजल होत.

"काय रे राम्या तु म्हणालास की मजबुरी असलेले लोक या कामाला येतात? तुला काय मजबुरी आहे म्हणुन तु सिमेंटच्या गाडीवर आलास ? "
"काय सांगु साहेब, गावाकड माझी अन एका मानसाची दुष्मनी झाली. तुला मारुन टाकीन म्हनाला. रातीच बायका मुलांना घेऊन गाव सोडला अन हिकड पुन्याच्या बाजुला आलो. दुसर काय काम येत न्हाही. पावसाळ्यात शेतात मजुरी आन पावसाळा संपला म्हनजी हे सिमिटाच काम करतो. या कामाला कोण टिकत नाय म्हणुन मजुरीबी जास्त मिळती अन काम बी जास्त रहात नाय."

"बाकिच्यांची काय मजबुरी आहे ?" मी न राहवुन विचारल.

" मी सोडल तर आमच्या गॅग मधी कोण बी परपंच वाला नाय. कोणी जेलातुन सुटलाय खुनाच्या सजेतुन. लोक काम देत नाहीत अश्या मानसाला. कोणाची बायकु पळुन गेली तोंड दाकवाया जागा न्हाई म्हनुन इकड आल्यात. ते राहातात गोडाउनलाच. शेटन त्यांना खोल्या दिल्यात बांधुन. एक बाई गावातुन येती त्यांच्यासाठी भाकर तुकडा रांधाया. माझ तस नाय मी परपंच वाला हाय. आमची मंडळी भाजी विकती इकड नाक्यावर. लेकर साळत जातात. मी त्यांच्यावाणी नाय रहात रोज राती अंगुळ करतो. चार सहा महिन्याला चेक अप करतो. बाकी टेस्टर वाहतुक पंटर होण्यापेक्षा हे बर हाय.

"टेस्टर आणी वहातुक पंटर म्हणजे काय ?

" मला सोडा सोमाटण फ़ाटा आला " राम्या म्हणाला.

ड्रायव्हरने गाडी बाजुला घेतली आणि राम्याला उतरवल. तो उतरल्यावर गाडी पुढे चिंचवडच्या दिशेने चालु लागली.

" साहेब तुम्हाला टेस्टर आन वहातुक पंटर माहित नाही ?" सुमो ड्रायव्हरने आता तोंड उघडले.

" नाही रे बाबा. ही काय भानगड आहे ?"

"भानगड काही नाही. जे फ़ुल बेवडे असतात ते अर्ध्या मजुरीत हातभट्टीची दारु रबरी फ़ुगे,टायर मधुन वहातुक करतात."
"बाकी अर्धी मजुरीच काय ?" मी प्रश्न विचारला.

" त्यांना अर्ध्या मजुरीच्या बदल्यात पहिल्या धारेची प्यायला मिळते. " ड्रायव्हरनी मला आणखी नविन माहिती पुरवली. " हे वाहतुक पंटर असेच असतात ज्यांना घरदार नाही बायका पोर नाहीत. पोलिसांची धाड पडली की आत जातात. सजा भोगुन परत बाहेर येतात."

"आणि त्या टेस्टरच काय ?" मी न राहवुन प्रश्न विचारला.

"त्यांची जिंदगी एकदम खराब आहे साहेब. दारुधंदेवाला त्यांना एकदम ताजी दारु फ़ुकट पाजतो. जेवायला पण देतो.माल ओक्के असेल तर टेस्टरला काही होत नाही. मग तो ओक्के माल विकला जातो. पण माल खराब आला तर टेस्टर मरतो. त्याला कुणीच नसत. त्याची मयत दारुधंदेवाला करतो. हक ना बोंब. पोलीस पण याला सामील असतात कारण असा टेस्टर जिथ नाही तिथ माल बिघडला की शंभर दोनशे लोक मरतात. पेपरला झापुन येत. पोलीसांच्या बदल्या होतात."

"अरे, पण हे टेस्टरच काम करायला लोक तयारच का होतात ?"

"मजबुरी साहेब मजबुरी. या मानसांनी फ़क्त दारु पिऊन संसाराची वाट लावलेली असते. असले कुणी राहिलेले नातेवाईक जेवायला घालत नसतात. फ़क्त खोट रडायला येतात तो मेल्यावर. दारुधंदेवाला पाच दहा हजार रुपये देतो मग कोणी रडत नाही. उभ आयुष्य नातेवाईक रडलेले असतात असल्या माणसासाठी. तो मेल्यावर रडायला डोळ्यात पाणी येत नाही."

"तुला माहिती दिसती बरीच या लाईनची ?" मी विचारल.

" साहेब, आमच्या लाईनीत ड्रायव्हर आण दारु यांच नात आहे. पण मी पित नाही. कारण माझा बाप टेस्टर म्हणुन मेला. त्याचा पोस्टमार्टेम रिपोर्ट मला बघायला मिळाला नाही. बाप फ़क्त दिसला पण मेलेला. बाकी सर्व उस्मानशेठ न केल. बाप मेल्यावर चार महिने पैसे पुरवले. मला ड्रायव्हिंग शिकायला पैसे दिले. मी ठरवल दारुच नाही पिणार."

हम...... मी सुन्न झालो होतो या कहाण्या ऐकुन. चिंचवड आल. माझ घर आल. मी गप्प होतो. मला सोडुन ड्रायव्हर परत सुमो घेऊन गेला.

आता मला आठवत होती ती कल्याणकारी राज्याची कल्पना असलेली आपली राज्यघटना. खुप काळ गेला पण असंघटित कामगारांच्या क्षेत्रात अजुन काहीच भरीव नसल्याची जाणिव होत होती. अजुन काही दिवसांनी काही घडेल अस वाटतही नाही. इथे कोणताच कायदा लागु पडत नाही. विषमता हा समाजाचा स्थायी भाव आहे. कोणी कार्ल मार्क्स यावर काहीच करु शकत नाही.

गुलमोहर: 

असंघटीत कामगारांची परिस्थिती फारच हृदयद्रावक आहे.
दु:ख या गोष्टीचं की याबाबत काहीच ठोस पाउले उचलली जात नाहीत.

Sad

धन्यवाद,

मी अद्याप अनिल अवचटांचे 'माणसे' वाचलेले नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आगाऊ, नीधप आता "माणसे " वाचतो.

आवडली. तुमच्या सगळ्याच कथांमधे backdrop ला एक industrial unit /opearations असतात, पण कुठेही मुळ human content ला ते डोइजड होत नाही.

खरी गोष्ट असेल तर कथा म्हणण्यापेक्षा अनुभवच म्हणावे.
सरळ, थेट लिहिलेले असल्याने आवडले.

छान लिहीले आहे. हे तुमचे खरे अनुभव असतील तर कथा विभागातून दुसरीकडे ललित/लेख किंवा तत्सम ठिकाणी हलवा.

सर्वांनाच धन्यवाद,

ही घटना खरी आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. याला कथेचे स्वरुप देण्यासाठी काही काल्पनिक पात्रे व या कथेशी संबंध नसलेला परंतु वास्तव अनुभव असलेला भाग जोडावा लागला आहे.

ही वास्तववादी कथा आहे. अन्यत्र ललित/लेख किंवा तत्सम ठिकाणी हलवणे चुकिचे वाटते आहे.

नि३ जी.. खरच "एक फूल" ला १००% अनुमोदन... ! सुंदर लिहिलं आहे.. तुमच्या एकंदरीत अनुभवावरून अन तुमच्याशी मारलेल्या गप्पांवरून तुम्ही जे काही लिहिलं आहे ते छान मांडलं आहे.

पुलेशू..

टेस्टरच्या धंद्याचे स्वरुप वाचून अंगावर काटा आला... अशी सुद्धा कामे असतात, ही गोष्ट नव्याने समजली... कसे कसे जीवन लोक जगत असतात आपल्या आजूबाजूला... आपण त्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असतो.
गरिब, व्यसनाधीन, निराधार आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लागलेल्या लोकांचे आयुष्य कसे असते, याचीही एक छोटीशी झलक तुम्ही दाखवलीत... मन सुन्न झाले आहे... Sad

नितिनचंद्र - मी तर लगेच च फॅन झालो आपल्या कथांचा. छान आहेत, बर्‍याच जुन्या वाचुन काढल्या. १-२ कथा मधेच संपवल्यासारख्या वाटल्या. पण मस्तच आणि वास्तववादी.

ही पियु "हळु हळु" का फॅन होतीय ते कळत नाही.