कोजागिरी

Submitted by dreamgirl on 19 October, 2010 - 09:09

खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आढळल्यास... आश्चर्य कसले? घरोघरी.............!
-----------------------------------------------------------------------------------
"आज आपण कोजागिरी सेलिब्रेट करणार आहोत." हातातल्या पर्सबरोबरच स्वतःला धाडकन सोफ्यावर झोकून देत आल्या आल्या तिने जाहीर केलं. टिव्ही कडे चष्म्याचे दोन आणि स्वतःचे दोन असे चार डोळे लावून बसलेल्या आणि एरवी भुकंप झाला असता तरी सिरीयलवरची नजर जरा इकडे-तिकडे न हलवणार्‍या सासूबाईंनी (चष्म्याचे दोन डोळे टिव्हीवरच रोखून ठेऊन) अलगद स्वतःचे दोन डोळे सुनेच्या सोफ्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या अवताराकडे वळवले... "माझीया प्रियालाSS" पार्श्वगायिकेच्या सुरात सूर मिसळून अनुप्रिया गुणगुणू लागली...

पाण्याचा ग्लास हातात घेऊन बाहेर आलेल्या श्रीने हसत हसत विचारले,"काय आज झाशीची राणी विरार मोहीम फत्ते करून आलेली दिसतेय..." टिव्हीवरचे चारही डोळे सिरीयल सोडून दोघांकडे वळले... आधीच अनुप्रियाच्या ऑफीसातून उशीरा येण्याबद्दल कुरकुरणार्‍या सा.बांच्या भव्य कपाळावर आपसूकच आठ्या उमटल्या. 'आता नवर्‍याने हातात पाण्याचा ग्लासही द्यायचा काय राणीसरकारांच्या! आता फक्त जेवण बनवून भरवणं बाकी ठेवलं असेल' असे काहीतरी छद्मी भाव चष्म्याआड उमटले.

"थॅन्क्स." घाईघाईने पाण्याचा मोठ्ठाला घोट घेत अनूची किलबील चालू झाली..."अर्रे काय ती गर्दी! कश्शा चढतात बायका...!!! श्वास घ्यायलापण जागा नसते माहीतेय! त्यातून त्या मिरारोड, दहीसर नी भाईंदरच्या रांगा... बायकांची धक्काबुक्की, कचकच..."
"अगं हो हो, श्वास घे आधी अनू, पाणी पी... कळलं लढाई जिंकून आलाय ते...!" श्रीने तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत म्हटलं.. नवर्‍याच्या उबदार प्रेमामुळे अनूच्या डोळ्यात डोकावणारी स्निग्ध्तेची चमक समोरच्या चष्म्याआडचं तरतरीत नाक मुरडलं गेलेलं पाहून पटकन ओसरली.

आवंढा गिळत तिने पर्सच्या कप्प्यातून दूध मसाला मिक्स चं पाकीट काढलं. ओसरू जाणारी चमक पुन्हा डोळ्यात डोकवायला लागली.. श्रीपुढे तिने ते पाकीट लहान मुलीच्या उत्साहाने फडकावलं... "हे बघ, मस्त आटीव मसाला दूध करते आज.."

"डाळ करा म्हणावं आधी नीट...!" पलिकडचा पुटपुटता आवाज तिच्या सळसळत्या उत्साहाला बांध घालू पाहत होता. मनात उमटणार्‍या नैराश्याच्या ढगांना तिनं निग्रहानंच बाजूला लोटलं. आजचा दिवस तिला खासम खास बनवायचा होता. रोजचे प्रोजेक्ट्सचे टेन्शन्स, विरार लोकलचा जीवघेणा प्रवास, रोजच होणारा उशीर... ती अगदी त्रासून जायची. भरीला भर म्हणून सा.बां.च्या टोमण्यांचा डोळ्याला पाणी फोडणारा झणझणीत तडका असायचाच. नवरा बिचारा समजूतदार मिळाला होता. दमून आलेल्या बायकोला पाणी देण्यात त्याला अजिबात कमीपणा वाटायचा नाही, उलट आनंदच व्हायचा... एकदाच म्हटलेलं श्रीला अगदी डोळ्यात पाणी आणून, "श्री, ऑफीसात टेन्शन्स असतात रे, पुन्हा गाडीमध्ये मरणाची गर्दी! जीव अगदी मेटाकुटीला येतो.. तू लवकर येतोस, कंपनीच्या गाडीतून येतोस, तुला नाही कळणार रे कित्ती दगदग होते ती! घरी आल्यावर मलापण वाटतं रे अगदी गरमागरम चहाचा कप नको पण निदान पाण्याचा ग्लासतरी मिळावा!" आजतागायत ते बोलणं लक्षात ठेऊन श्री ती आल्या आल्या तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरायचा. त्याच्या काहीच हौशी पुरवता येत नाहीत, सणासुदीला काही चांगलं चुंगलं करून खायला घालता येत नाही (तशी मी काही अन्नपूर्णा नाहीय, पण अगदीच गिळवणार नाही असं बेचव काही बनवत नाही हं!), नाहीतर त्याला खाण्याची कसली आवड आहे! ते काही नाही, आजची कोजागिरी पौर्णिमा स्पेशल झालीच पाहीजे!

ती लगबगीने उठली, चेहर्‍यावर थंड पाण्याचे हबके मारून, हात्-पाय धुवून फ्रेश झाली. एकीकडे डाळ्-भाताचा कुकर चढवून दुसर्‍या गॅसवर दुध आटवत ठेवलं. "आत्ताच करून फ्रीजमध्ये ठेवते रे, मग मस्त थंडगार पिता येईलSS" तिने आतूनच ओरडून सांगितलं. "फ्रीजमध्ये ठेऊन प्यायला ते काय तुमचं कॉकटेल मॉकटेल का काय म्हणतात तस्लं कोल्ड्रिंक आहे??? चंद्राला नैवेद्य दाखवायचा असतो... तो काय दूध कोल्ड्रिंकचा दाखवणार? कोजागिर्‍या साजर्‍या करताहेत!" बाहेरच्या खोलीतून तडतडलेल्या फोडणीचा ठसका चांगलाच बसला. "चारही डोळे टिव्हीला चिकटलेले असले तरी कान मात्र मी काय बोलतेय त्याकडेच लागलेले असतात!" अनू कुरकुरली, पण तेवढ्यापुरतीच. तिला आज कुठल्याही कारणासाठी कोजागिरीच्या ठरवलेल्या प्रोग्रॅमचा आनंद हिरावून द्यायचा नव्हता, अगदी कोणामुळेच नव्हे! आजच तर तिचं ऑफीसमधल्या मैत्रीणींशी डिस्कशन झालेलं, 'असे छोटे छोटे आनंद वसूल करायचे, मग रोजच्या स्पर्धेत धावण्यासाठी बळ मिळतं वगैरे...'

लगबगीने किचनमधलं काम उरकलं... चपाती-भाजी तर सकाळीच केलेली होती डब्यासाठी. तसंपण रात्रीच्या जेवणात तिच्याशिवाय कोणालाच चपात्या लागत नाहीत, त्यामुळे आताचा वेळ तसा मोकळाच होता. ती लगबगीने हॉलमध्ये धावली. टिव्ही वर नवी सिरीयल लागली होती... 'लज्जा, लज्जा, लज्जा... हं गिरीजा ओक, बरी करते अ‍ॅक्टिंग, दिसतेपण फ्रेश. विषयही जरा वेगळा! काय मुर्ख आहे ही बया! सांगत का नाहीये सगळं मनातलं त्या इन्स्पेक्टरला? सगळं काय नेहमी त्यानेच शोधून काढायचं? कित्ती कळकळीने सांगत असतो, मी तुझा मित्र म्हणून करतोय हे सगळं... तिचंही बरोबर आहे म्हणा, एकदा विश्वासघात झाल्यावर दुसर्‍यावर एवढ्या पटकन कसा विश्वास टाकेल बरं!' अनूची मनातल्या मनात पण बडबड चालू होती. टिव्ही सिरीयल्स म्हणजे अगदी तिचा वीक पॉईंट! तसे तिचे बरेचसे वीक पॉईंट्स होते, जे वेळोवेळी सासूबाई वर्मावर बोट ठेऊन दाखवून द्यायची एकही संधी सोडायच्या नाहीत.

तीन शिट्ट्यांनंतर कुकरखालचा गॅस बंद करायला उठली तेव्हा न विसरता आटणार्‍या दुधाकडेही एक नजर टाकली तिने. खबरदारी म्हणून आत लांब दांड्याचा चमचाही टाकला होता तिने दूध ओतून जाऊ नये म्हणून. 'ठीक आहे, दहा मिनिटांनी पुन्हा एक फेरी!' तिने स्वतःलाच बजावत मनाशी म्हटलं

"अर्रे अमरप्रेम!" तिच्या उत्साहाने उतू गेलेल्या स्वरांनी विचलीत होऊन चष्म्याआडचा एक करडा दृष्टिक्षेप तिच्या दिशेने झेपावला, पण अनूच्या डोळ्यांची भिरभिरती पाखरे आता स्क्रीनवरच्या अ‍ॅडवर स्थिरावली होती... 'होSSओ ओ ओ सोन्याहून सोनसळी...' अनू अ‍ॅड आणि सिरियल्स बघण्यात अगदी तल्लीन होऊन गेलेली..

"अगं अनूSS, वास कसला येतोय? भात करपला काय??" श्रीने पुस्तक वाचता वाचता बेडरूम मधूनच ओरडून विचारले. "अगं बाईSS" अनू धडपडत उठली आणि थोडंस धसकूनच किचनकडे धाव घेतली. समोरच्या काळ्याधुस्स पातेल्याच्या बुडाशी सायीचा थर पांघरलेले तांबूस तपकिरी रंगाचे ओंजळभर दूध रटरटत होते. त्या करपलेल्या भांड्याकडे आश्चर्याने मोठ्ठाले डोळे रोखून बघता बघता अनूच्या टपोर्‍या डोळ्यांमध्ये हलके हलके आसवांची गर्दी जमली. सगळा उत्साह त्या करपलेल्या भांड्यात आटून गेला होता. सासूबाई आणि श्री तिच्या मागे येऊन उभे राहीले तरी तिला समजलं नाही. सात्विक संतापाची लाली तिच्या नाकाच्या शेंड्यावर पसरली. तिने एक जळजळीत दृष्टीक्षेप सासूबाईंकडे टाकला. "एरवी फोडणी जरी नेहमीपेक्षा जास्त तडतडली तरी यांच्या धारदार नाकाला लग्गेच झोंबते, मग आजचा करपट वास जाणवला नसेल का? नाही, सुनेच्या उत्साहावर पाणी टाकणं हाच तर आवडता उद्योग आहे ना यांचा. नाहीतरी आधीपासूनच मी यांच्या डोळ्यांत खुपत होती. माझ्या रूबाबदार फॉरेन रिटर्न मुलाला मुलगी कशी अनुरूप मिळाली पाहीजे. अनुरूप नाही मिळाली, फक्त अनू मिळाली! श्रीने माझ्यात काय बघितलंन कोण जाणे! सामान्य घरातली, सामान्य रूपाची जातीबाहेरची मुलगी आणलीन नं त्याने... जाऊ दे! यांच्यावर चिडून काय करू? मीच वेंधळी! आजच्या दिवस ती भिक्कारडी सिरीयल नसती बघितली असती तर काय मी मरणार होते? पण नाही! हे टिव्हीचं भूत बसलंय ना डोक्यावर! भोगा अनूबाई आपल्या कर्माची फळे!..." अनू मनातल्या मनात धुसफुसत होती.

श्रीने काही न बोलता पातेलं उचलून थंड पाण्याखाली धरलं आणि अनूच्या उत्साहाने उतू जाणार्‍या आटीव दूधाची रवानगी सिंकमधल्या खरकट्या भांड्यांच्या गर्दीत झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सासूबाई गप्पपणे टिव्ही रूमकडे वळल्या. "का? आता का? दूधासारखे आटले वाटते यांचे टोमणेपण!" अनू मनातच करवादली. हताशपणे तिने श्रीकडे पाहीले. श्रीने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेऊन नजरेनेच तिला धीर दिला. आता सिरीयलच्या भानगडीत न पडता तिने निमूटपणे जेवणाची तयारी केली. अनू श्रीच्या ऑफीसातल्या गंमतींवर नेहमीप्रमाणे न खिदळता, एकही शब्द न बोलता, खालच्या मानेने पटापट घास गिळत होती. तिघांची जेवणे आटोपली तशी, अनूने भराभर भांडी आवरून, टेबल, ओटा पुसून गाद्या घातल्या आणि मांडीवर उशी ठेऊन आणि हाताच्या ओंजळीत उदास चेहरा खुपसून विचार करत बसली. सासूबाई बाहेर टिव्ही बघत होत्या. ५ मिनिटांच्या वॉकनंतर श्री परतला तेव्हा अनूच्या नर्व्हस चेहर्‍याकडे बघून समजला की प्रकरण गंभीर आहे आणि करूणरसाचा पूर येणार आहे.

"मी तुला कसलंच सुख नाही देऊ शकले ना रे श्री? कसले सणवार नाहीत, काही गोडधोड खायला करू शकत नाही. म्हणजे मला करायचं असतं रे पण बघ ना मग आजसारखं... तुझ्यासाठी पुरेसा वेळही देऊ शकत नाही. मी कित्ती बावळटासारखी वागते, अजून अल्लडपणा करते. वेंधळ्यासारखी वागते. तुला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं ना रे? तू माझ्याशी लग्न नको करायला हवं हो..." तिचे पुढचे शब्द हुंदक्यात विरून गेले. श्रीने हलकेच तिची हनुवटी वर करत तिच्या अश्रूंनी तुडुंब भरलेल्या डोळ्यांकडे टक लावून पाहीले. एक चुकार अश्रू तिच्या गालांशी सलगी करण्यासाठी लांबसडक पापण्यांशी झगडत होता, पण तिच्या पापण्या तिच्यासारख्याच हट्टी होत्या. मोठ्या निग्रहाने त्या अश्रूला त्यांनी थोपवून धरले होते. "लग्न नको करायला हवं होतं नाही, लग्न करायला नको होतं..." तिने २ मिनिटं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि तो आपल्या बोलण्यातील व्याकरणाच्या चूका सुधारतोय नेहमीसारखाच हे लक्षात येताच स्वत:च्याही नकळत हायसं वाटून एक निश्वास सोडला. "तू पण ना श्री..." असं रडता रडता हसत पुटपुटून तिने हलकेच त्याच्या दंडावर एक चापटी मारली.

"पण बघ ना रे श्री, कोजागिरी पौर्णिमा तर अशीच गेली रे.. मी कित्ती मस्त रोमँटिक कल्पना सजवल्या होत्या रे. ऑफीसातून घरी येताना सहजच आकाशात लक्ष गेलं तर मस्त केशरी चंद्र! मग वाटलं मसालादूध देऊन चकीत करूया सगळ्यांना. सेलिब्रेशन पण होईल आणि... तर बघ ना कसचं काय! मी खरंच खूप वेंधळी आहे ना रे?"

"चांद मेरा दिल, चांदनी हो तुम... चांद से है दूर चांदनी कहाँ..." श्री ने गाण्यातूनच अनूच्या प्रश्नाला उत्तर दिले. "अरे मला चंद्राचं दर्शन झालं बरं... अशी काय बघतेस? तुझ्या डोळ्यांमध्ये बघ दोन चंद्र दिसताहेत... मी माझं प्रतिबिंब पडलंय ते सांगतोय... मग तुला काय वाटलं? तू??? हा हा..."

"काय रे श्री!" श्रीला पुन्हा एक चापट मिळाली. "हो आहेच मुळी तू माझा चांदोबा!" अनू श्रीला बिलगली. "ए एक गम्मत..!" काहीतरी आठवल्यासारखी धडपडत उठली आणि पर्समध्ये शोधाशोध करू लागली.."ह्म्म हे बघ!" हातातला कागद तिने श्रीपुढे फडकावला.
"काये हे?"
"अरे वाच ना... थांब हं मीच दाखवते वाचून... अरे मायबोलीवर तो सुकि आहे ना... सूर्यकिरण रे! अस्सा काय बघतोस? तो एंगेज्ड आहे आणि त्याला माहीतेय आय अ‍ॅम मॅरीड! लग्गेच रोखून बघायची गरज नाहीये... हा तर ऐक ना.. 'मला तुझा चंद्र व्हावंसं वाटतेय...' अरे कवितेचं नाव आहे, त्याने ना त्याच्या तिच्यासाठी लिहीलेली... कित्ती गोडंय कल्पना ना रे... 'मला तुझा चंद्र व्हावंसं वाटतंय...' व्वा...!!"

"गाण्यांच्या भेंड्या खेळून झाल्या असतील तर ते फ्रीजमध्ये आईसक्रीम करून ठेवलेय. जरा शोकेसमधले काचेचे बाऊल्स नी चमचे धुवून पुसून घ्या आणि त्यात आईस्क्रीम आणा. मला थोडंसंच द्या. घसा खवखवतोय कालपासून..." ओळखीचा आवाज नी स्वर असूनही ही ऑर्डर टिव्ही रूममधून आलेली आहे हे समजून घ्यायला अनूला काही क्षणांचा अवधी लागला. त्या सुखद धक्क्यातून सावरत तिने हळूच श्रीकडे पाहीले. डोळ्यांनीच 'काय मग, रूसवा गेला ना मघाचा? हॅप्पी??' असं विचारणार्‍या श्रीला एका लाजर्‍या हास्यातूनच प्रत्युत्तर मिळाले.

"आलेच" असं आनंदाने ओरडत अनूने फ्रिजरमधला आईसक्रीमचा डबा घाईघाईने काढला आणि "आई पण ना...!" असं म्हणत लगबगीने किचनमध्ये आपला मोर्चा वळवला."आता धडपडू नको हं, हळू.." तिच्या लगबगीकडे बघून सावधानतेचा इशारा द्यायला श्री विसरला नाही.
"चला आजची कोजागिरी स्पेशल होणारेय तर फायनली..." असं पुटपुटत श्री मजेत शीळ घालू लागला.
-----------------------------------------------------------------------------------
त्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात 'आईसक्रीम कसं दाखवणार चंद्राला नैवेद्य म्हणून?' हा प्रश्न अगदीच विसंगत आणि गौण असल्यामुळे उपस्थितच झाला नाही. आणि झालाही असता तरी त्याने उत्साह पुन्हा आटवण्यात रस कोणाला होता? नाहीतरी हे सण वगैरे असतातच कशाला? छोटे छोटे आनंदाचे क्षण साजरे करून या धकाधकीच्या आयुष्यात तात्पुरता विरंगुळा देण्यासाठी नं? आणि अनूच्या आईंना हे वेळेवर जाणवते हे काय थोडे आहे?

तर मग जशी यांची कोजागिरी उत्साहात आणि आनंदात गेली तशी तुम्हा आम्हा सर्वांची जावो. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व मायबोलीकरांना आगाऊ (advance Wink ) हार्दिक शुभेच्छा Happy

गुलमोहर: 

सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार. पहिली कथा जी कच्च्या आराखड्यावर डायरेक्ट पोस्टली... नाहीतर शक्यतो मी ती रिस्क घेत नाही Happy
कोजागिरी/कोजागरी साठी गुगलले... दोन्ही पर्याय मिळाले. कालनिर्णयमध्ये कोजागिरी आहे, wikiमध्ये kojaagari आहे... कोजागर्ति? कोण जागे आहे असे विचारतात म्हणे... शरद पौर्णिमा बरोबर नाव आहे(वाद रहित :)! ) असो... नावात काये...? कोण बरं म्हटलेला... तो आपलं हा... शेक्सपिअर... (अरेच्चा यात त्याचं नाव आहेच की) असेना... जाऊ देना... तुम्ही चंद्र पाहा, (विना करपलेलं) मसाला दूध प्या, गप्पा-गोष्टी करा, भेंड्या खेळा, सिरीयल्स बघा... आलेला क्षण आपला म्हणा हाय काय नी नाय काय... काय? Happy

अर्रेच्चा हो कालनिर्णय्मध्ये कोजागरी आहे असेना आपल्याला काय बुवा... पिने वालोंको पिने का... ओ मी मसालादूध म्हणतेय... हा! नाही, स्पष्ट केलेलं बरं बाबा... भलतेच डोकेबाज हो लोक्स इथ्ले...! त वरून ताक्-भातच काय आणखी काय काय येइल त्याची लिस्टच सादर करतात... Light 1 Happy

अरे वा!!! काय मस्त कथाय... त्यात झी मराठी आलं..चालू सिरियलमधल्या कथा आल्या, सुकी आला, मायबोली आली...त्यामुळे खुपच आपली आपली वाटली कथा... आणि गोड लिहितेस गं ड्रिम्स तू अगदी...खुप आवडली तुझी कथा. लिही... अजून लिही गं Happy

धन्स सर्वांचे! सानी Happy तू तर माझी मूळ प्रेरणा आहेस Happy

मनःस्विनी, कोजागिरी/कोजागरी या २२ ला म्हणजे उद्या आहे. Happy धन्स.

Pages

Back to top