"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता.
आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची.
अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते. तरीही माझ्या एका बहिणीचा व एका मास्तरीणबाईंचा मी पिच्छाच पुरविला होता जणू! जेव्हा भेटतील तेव्हा विचार असे करून त्यांना भंडावून सोडले होते. बहिणीने बराच विचार केला आणि म्हणाली, "तुला तिथे सुरंगीच्या फुलांची वेणी मिळाली तर आण नक्की! " मास्तरीण बाईंनी ज्यूटची पिशवी आणायला सांगितली. "फार महाग नक्को हं! खूप बोजड पण नको. आणि पिशवीचे बंद नीट तपासून आण गं बाई!! नाहीतर तुटायचे लगेच! " इति मास्तरीण बाई. आणि आमच्या एका परिचितांनी "तो बेसिनवर टांगायचा साबण मिळतो ना, नाही का नाडी असते त्याला.... तो गोल्डफिशचा साबण.... हां तोच तो.... मिळाला तर घेऊन ये दोन-तीन वड्या! बरेच दिवस टिकतो म्हणे! " अशी खास फर्माईश केली मी गोव्याला जाणार हे कळल्याबरोबर!
आता सुरंगीच्या फुलांबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होते. ती कशी दिसतात, त्यांचा सुवास कसा असतो, कोठे मिळतात ह्याबद्दल ठार माहिती नव्हती. ह्या अगोदर ज्यूटचीच काय, साधी गोणपाटाची पिशवी घ्यायला पण मी बाजारात गेले नव्हते. आणि त्या अद्भुत गोल्डफिश साबणाचे नावही मी उभ्या जन्मात (उण्यापुऱ्या पंधरा वर्षांच्या आयुष्यात) ऐकले नव्हते! पण प्रथमच परगावी, आईवडीलांच्या देखरेखीविना शॉपिंग करायची संधी मिळत होती, ती कोण सोडणार! मागे शाळेची ट्रीप मुंबईला गेल्यावर मी एलिफंटा गुंफांजवळच्या बाजारातून पिसापिसाची टोपी घेऊन आले होते. नंतर ती टोपी कपाटाची शोभा वाढवित अनेक वर्षे तशीच पडून होती. तिच्यावरची पिसेसुद्धा मी इतर कोणाला काढू दिली नव्हती. शेवटी घर बदलताना हरवली (की तिचे अजून काही झाले?). पण ह्या खेपेस असली काही वायफळ खरेदी करायची नाही अशी मातृदैवताची सक्त ताकीद होती.
गणपतीपुळ्याला थोडा वेळ थांबून आमची इयत्ता नववीची सहल गोव्याला मार्गस्थ झाली खरी, पण गोव्यात वेगळेच भयनाट्य घडत होते. आम्ही रात्रीच्या अंधारात, उशीरा गोव्यात पोहोचलो. मुक्कामी रात्रभर विश्रांती घेतली व दुसरे दिवशी सकाळी स्थलदर्शनासाठी तय्यार होऊन बसलो. परंतु आमचे सहल संयोजक, बरोबर आलेले शिक्षक व मुख्याध्यापिका तणावात होते. रात्रीतून गोव्यात दंगल उसळली होती. लोक रस्त्यांवर चॉपर, लाठ्याकाठ्या, रॉकेल -पेट्रोलचे डबे घेऊन उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली होती. काही रस्ते बंद झाले होते, काही बंद केले होते. गोव्यात काही ठिकाणी कर्फ्यू लागला होता. आणि आंदोलकांनी गोव्याच्या सीमा रस्ते अडवून बंद केल्या होत्या.
पण आम्हा मुलींना यातील काहीच माहिती नव्हती. मोबाईलचा जमाना नसल्यामुळे व तेथील स्थानिक वृत्तपत्रांची दखल न घेतल्यामुळे आम्हाला या सर्व घटनांची सुतराम कल्पना नव्हती. आपण आज गोवा फिरणार, मजा करणार अशा सुंदर दिवास्वप्नांत आम्ही मुली गुंगलो होतो. सर्व मुली आपापल्या बसेस मध्ये जाऊन बसल्या. थोड्या वेळाने मुख्याध्यापिका बसमध्ये चढल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी व ताण स्पष्ट दिसत होता. पण तरीही कमालीच्या शांततेने त्यांनी आम्हाला परिस्थितीची कल्पना दिली. गोव्याच्या सीमांवरही हिंसाचार चालू असल्याने आम्ही परत पुण्याकडे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्याऐवजी त्यातल्या त्यात शांत भागांत जाऊन स्थलदर्शन करण्याची कल्पना सर्वांनाच पसंत पडली.
जसजसे रस्ते मागे पडत होते तसतशी आम्हाला हळूहळू परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव होऊ लागली होती. कोठे रस्त्यावर अर्धवट जळलेल्या, धुमसत असलेल्या टॅक्सीज, रिक्शा.... रस्त्यावर मधोमध पडलेल्या कोणाच्या तरी तुटक्या वहाणा, सुनसान ओस पडलेले रस्ते..... आमच्या मनातील गोवा शहर आणि प्रत्यक्षात दिसलेले गोवा शहर यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. काही ठिकाणी आम्हाला आपापल्या सीटवर डोके गुडघ्यांत घालून वाकून बसण्याची सूचना यायची. सगळ्या मुली एकजात चुपचाप डोकी खाली घालून ओणव्या झालेल्या. त्या त्या रस्त्यांपुरती गाणी नाहीत, भेंड्या नाहीत की गप्पा नाहीत. सर्व कसं शांत. तरीही एखादा दगड भिरभिरत यायचाच बसच्या रोखाने! एकदा पुढच्या एका खिडकीच्या काचेला तडा गेला, पण कोणाला इजा झाली नाही. एकदा एक जमाव मागे लागला, पण बसचालकाच्या कौशल्यामुळे वाचलो.
शांतादुर्गेच्या देवळाबाहेर सुरंगीची वेणी दिसली. कमळाचे हारही दिसले. पण माझ्या मनातला त्यांचा सुगंध हरपला होता. त्या सुरंगीला मात्र मी डोळे भरून न्याहाळून घेतले. पुन्हा कोठे दिसली तर ओळखता यावी म्हणून. तिचा मंद मधुर सुगंध फक्त सायंकाळी जाणवतो असे मला कोणीतरी सांगितले. मडगावच्या बाजारात मला ज्यूटच्या पिशव्याही दिसल्या व गोल्डफिशचा साबणसुद्धा! भराभर, सावध चित्ताने, कसलीही घासाघीस करण्याच्या भानगडीत न पडता त्यांची खरेदी केली. त्या खरेदीतील मजा आता गेली होती. भीतीची चव अजूनही तोंडात रेंगाळत होती. चर्चेस पाहून झाली. मंगेशीचे दर्शन झाले. ज्या बीचवर जाण्याची आम्ही उत्कंठेने वाट पाहत होतो ते बीच दंगलीमुळे लोकांना बंद होते. तरीही एका भल्या सकाळी सहल संयोजकांनी आम्हाला मोठे धार्ष्ट्य करून तिथे नेलेच! बीचच्या जवळ पोहोचायचा रस्ता काही आंदोलकांनी झाडांचे ओंडके आडवे घालून अडविला होता. आमची बस तिथे अडल्यावर मागून एक मोठा जथा आला....त्यांच्या हातात दगडधोंडे तयारच होते. आम्ही मुली व शिक्षिका बसमध्ये डोकी खाली घालून श्वास रोधून आता पुढे काय होते ह्याची वाट पाहत होतो. सहल संयोजक खाली उतरले. मोठ्या धैर्याने व कौशल्याने त्यांनी त्या जमावाच्या म्होरक्याला ही बस पुण्याहून आली आहे; बसमध्ये निरागस, कोवळ्या वयाच्या पुण्याच्या नामवंत शाळेतील विद्यार्थिनी आहेत, गोव्याला पहिल्यांदाच आलेल्या आहेत वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या. थोड्या वेळाने जमावाने मागचा परतीचा अडवलेला रस्ता सोडला. आम्ही बीचवर न जाताच परत फिरलो.
गोव्याहून परत पुण्याला येणे हेही वाटेतल्या आंदोलनामुळे अग्निदिव्यच झाले होते. वाटेतील गावे आपला आतिथ्यशील स्वभाव सोडून उग्र, हिंसक झाली होती. वाटसरूंची लुबाडणूक, त्यांना अडविणे, वाहनांवर दगडफेक ह्या गोष्टी सर्रास चालू होत्या. पण अशा परिस्थितीतही आम्हाला परत फिरणे भागच होते. सहल संयोजकांनी बरोबर घेतलेला शिधा संपत आला होता. जास्त दिवस गोव्यात राहणे परवडणारे नव्हते. पुण्यातही सर्व मुलींचे पालक गोव्याच्या बातम्या वाचून चिंतेत होते. येताना आम्हाला परतीच्या मार्गावरील एका बीचचा आनंद काही काळ लुटता आला. मग सुरू झाला एक लांबच लांब प्रवास! अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी रस्ते बंद केल्यामुळे बसचालक दुसऱ्या, नेहमी वापरात नसलेल्या आडरस्त्यांनी बस नेत होता. गावांच्या सीमेवर आलो की आम्ही बसमधील सर्वजण गुडघ्यांत डोकी खुपसून संतापलेल्या, आक्रमक जमावांपासून आपापले रक्षण करीत होतो. नेहमीचा रस्ता न घेतल्यामुळे तेवढाच पल्ला गाठायला आम्हाला दुप्पट वेळ लागत होता. सुरुवातीला अन्न-पाण्याचा पुरवठा सहल संयोजक नियमितपणे करत होते, पण प्रवासाचा काळ जसा वाढला तसतसे खाद्यपदार्थही थोडेथोडे, बऱ्याच अंतराने येऊ लागले. कधी गावठी शेवबुंदी, कधी फ्रायम्स, कधी कोरडी साटोरी.... मुलींनीही त्यांच्याकडचा सगळा खाऊ वाटून संपविला. पाणी तर जपूनच पीत होतो. कारण मधल्या वाटेत कोठे 'थांबण्याची'पण सोय नव्हती. नाहीतर मग निसर्गाच्या कुशीत, झाडांच्या आडोशाला..... आम्हाला आमच्या बसचालकाचे कौतुक वाटत होते. कारण एवढे मोठे अंतर कोठेही फारसे न थांबता, विश्रांती न घेता गाडी हाकणे, आडवाटा धुंडाळणे, जमावापासून बसचे शिताफीने रक्षण करणे ह्या सोप्या गोष्टी नव्हत्या.
पुण्यात पोहोचलो तेव्हा आम्ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल अठरा तास 'लेट' होतो. वाटेतून पुण्याला कोणालाही संपर्क साधता न आल्याने सर्व मुलींचे पालक शाळेवर व शिक्षिकांवर जाम उखडलेले होते. पण त्या तरी काय करणार होत्या बिचाऱ्या! वाटेत कोठे धड टेलिफोन बूथही दिसला नव्हता. आणि महाराष्ट्रात आल्यावर कधी एकदा पुण्याला पोहोचतो म्हणून बसचालकाने बस कोठेही न थांबविता थेट पुण्याला आणली होती. आम्ही पोचलो तेव्हा रात्रीचा बराच उशीर झाला होता. गेले दोन-तीन दिवस ना धड झोप, ना अन्न, सततचा प्रवास आणि ताण यांमुळे सर्व मुलीही गप्प गप्प होत्या. घरी गेल्यावर आवरून मी अंथरुणावर अंग लोटून दिले. पण अजूनही आपण बसमध्येच आहोत, प्रवास करत आहोत असा भास होत होता. रात्रीतून मी एक-दोनदा दचकून उठलेदेखील... पण आजूबाजूला पाहिले तेव्हा चिरपरिचित सामान, फर्निचर दिसले. आपलेच घर आहे ह्याची खात्री पटली. पुन्हा झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी घरातल्यांनी, भेटणाऱ्यांनी "काय काय खरेदी केली? " असे मोठ्या थट्टेने मला विचारले खरे, पण त्यांना काय सांगावे, काय दाखवावे असा प्रश्न मला पडत होता. न राहवून विकत घेतलेली सुरंगीची वेणी तिच्या वाळक्या द्रोणाच्या आवरणात न उमलता तशीच सुकून गेली होती. ज्यूटची पिशवी एका बाजूने चेपली गेली होती. गोल्डफिश साबणातील नावीन्य आता उरले नव्हते. पण रस्त्यावरून जाता जाता माझ्या नजरेत भरलेले आणि मी विकत घेतलेले गोव्याचे देखणे, गडद चित्र त्याच्या फ्रेममधून "आय लव्ह यू गोवा! " सांगत मला जणू हा अनुभव मागे टाकून नव्या उमेदीने जगायला सांगत होते!
-- अरुंधती
(पूर्वी मनोगतावर व ब्लॉगवर प्रसिध्द)
फोटो तरी काढायचास सुरंगीचा
फोटो तरी काढायचास सुरंगीचा
आवडलं
आवडलं
पण रस्त्यावरून जाता जाता
पण रस्त्यावरून जाता जाता माझ्या नजरेत भरलेले आणि मी विकत घेतलेले गोव्याचे देखणे, गडद चित्र त्याच्या फ्रेममधून "आय लव्ह यू गोवा! " सांगत मला जणू हा अनुभव मागे टाकून नव्या उमेदीने जगायला सांगत होते!>>
फारच वाईट अनुभव आला ग तुम्हाला. व्यवस्थित आलात हे महत्वाचे.
त्यानंतर गेलीस की नाही गोव्याला? गोवा मी नेहमीच शांत आणि आनंदी पाहीलाय.
शैलजा, चैत्रगंधा, स्वाती....
शैलजा, चैत्रगंधा, स्वाती.... धन्स!
स्वाती, त्या अगोदरही मी गोव्याला गेले होते, पण फारच लहान होते. ह्या ट्रीपनंतर एकदा धावती भेट झाली होती गोव्याला.... पण शांतपणे, गोव्याच्या वातावरणाचा आस्वाद घेत घेत निवांतपणे गोवा फिरणं अजून व्हायचंय.
सुरंगीचा वास दरवळला. थोड्या
सुरंगीचा वास दरवळला. थोड्या दिवसांनी यायला लागेल सुरंगी.
बाकी लिखाण छानच आहे.
गोवा मस्त. एक गोवा फॅन क्लब
गोवा मस्त. एक गोवा फॅन क्लब काढूत ना ग. पण तुम्हा मुलींची काळजी किती वाट्ली असेल आईबाबांना.
तो साबण म्हणजे अगदी अगदी.
अकु, शीर्षकावरुनच मी ओळखले
अकु, शीर्षकावरुनच मी ओळखले होते, कि गोव्यासंबधी आहे म्हणून. पण तसा गोवेकर शांतताप्रिय माणूस आहे. म्हणून आता परत जा आणि आता या यादीत, मान्कुराद आंबे, पायल चप्पल, दोदोल, बेबिंका, आळसाणे अशी भर घालायला हरकत नाहि.
छान लेख!!
छान लेख!!
ह्या दंगली कशामुळे झाल्या
ह्या दंगली कशामुळे झाल्या होत्या?
मामी, गोवा पंखामंडळ म्हणु या, आजकाल फॅन क्लब चा ईतका सुळसुळाट झालाय की आता धास्तीच वाटते.
आशुतोष, मला नीट आठवत नाही...
आशुतोष, मला नीट आठवत नाही... पण गोवा राज्य वेगळे झाले त्यासंदर्भात होती ती दंगल. गोव्याचा जुना भाग जास्त करून टेन्शन मध्ये होता.
जागू, नंतर माटुंग्याला फुलबाजारात हिंडताना मला सुरंगीच्या वेण्या दिसल्या होत्या. त्या वेळी त्यांना नीट आणले घरी आणि पुढचे तीन-चार दिवस संध्याकाळी काय मस्त दरवळ सुटायचा त्या फुलांचा....
अमा, माझी आई त्याच शाळेच्या कॉलेजात प्रोफेसर, त्यामुळे आपापल्या पाल्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांच्या समवेत शाळेत तिला पालक व शिक्षिका अशा दोन्ही भूमिका वठवाव्या लागत होत्या.... माझ्या एका मैत्रिणीच्या वृत्तपत्र संपादक असलेल्या वडिलांशी तिचे ''शाळेचे बेजबाबदार वर्तन'' वगैरे वरून जोरदार वाजलेही होते, तेही सर्व पालक शाळेच्या आवारात चिंताग्रस्त चेहर्यांनी जमले असताना! नंतर त्या दोघांना आपापल्या मुली एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत हे कळल्यावर आणि आम्ही सुखरूप पोचल्यावर त्यांचा वाद आपसूकच निवळला!
दिनेशदा, मलाही एकदा त्या शांत गोव्याची सफर करायची आहे. बघूयात कधी जमते ते!
रोचीन, धन्स!
अमा, आशुतोष.... गोवा पंखा मंडळात मलाही आपलं म्हणा!
गोल्डफिश साबण .. शिर्षकावरुनच
गोल्डफिश साबण .. शिर्षकावरुनच लेख गोव्यावरचा आहे याचा अंदाज आला. पण तुम्हाला खुप वाईट अनुभव आल्याचे दिसते. हल्ली देखिल आंदोलनाच्या माध्यमातुन गोवा थोडा हिंसक बनत चाललाय. असो आता लवकरात लवकर पुन्हा एकदा गोव्याला भेट द्या.
बाप रे!
बाप रे!
मायबोलीकर, मीही त्या शांत
मायबोलीकर, मीही त्या शांत गोवा भेटीची वाट पाहात आहे! प्रतिसादाबद्दल धन्स मायबोलीकर आणि चिमण!
अरुंधती, छान लेख पण वाईट
अरुंधती, छान लेख पण वाईट अनुभव. मीही गोवा शांत असाच पाहिलाय. हे रूप नवीन आहे.
छान लेख
छान लेख
अरुंधती खरच वाईट अनुभव आहे.
अरुंधती खरच वाईट अनुभव आहे. आता पुन्हा जा. तिथलं शांत जीवन बघुन इथेच रहायला याव अस वाटेल
पण मला एका गोष्टीचे अतिशय आश्चर्य वाटते. परिस्थिती खराब आहे हे गोव्यात गेल्यावर लगेच कळल्यानंतर तुमच्या शिक्षकांनी तिथे रहाण्याचा आणि फिरण्याचा निर्णय कसा काय घेतला. खरतर आल्यापावली परत फिरायला हवं होतं.
अरुंधती खरोखरच तुमचं सगळ्यांच
अरुंधती खरोखरच तुमचं सगळ्यांच आणि ड्रायव्हरच कौतुक करावसं वाटतं.
अनुभव चांगला मांडला आहेस
अनुभव चांगला मांडला आहेस अरुंधती. पण 'आवडलं' असं कसं लिहायचं अशा आठवणीबद्दल
शांत आणि निसर्गरम्य गोवा ट्रिप लवकरात लवकर करण्याची संधी येवो म्हणजे हा अनुभव थोडा पुसट होईल.
अतिशय विस्कळीत लिखाण.
अतिशय विस्कळीत लिखाण.
ती कमळाच्या फुलांची वेणी की
ती कमळाच्या फुलांची वेणी की हार मला फार विशेष वाटला नाही. पण बकुळीच्या फुलांचा लांबलचक हार पाहिला आणि विकतही घेतला.