ओट्स चे धिरडे (फोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 17 July, 2010 - 06:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप रोल्ड ओट्स, अर्धा कप बारिक रवा किंवा पाऊण कप तांदळाचे पिठ, एक कप आंबट ताक,
एक चमचाभर हिरव्या मिरचीचे लोणचे, (किवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या वा मिरपूड.) एक चहाचा चमचा जिरे, हिंग, मीठ, आवडत असेल तर अर्धा चहाचा चमचा साखर, (थोडी साखर घातली तर सोनेरी रंग येतो ) तेल वा तूप.

क्रमवार पाककृती: 

आंबट ताकात ओट्स पंधरा ते वीस मिनिटे भिजवा. त्यात मिरचीचे लोणचे वा मिरच्या मिसळून, मिक्सरमधून फ़िरवून घ्या. मग त्यात बाकिचे जिन्नस (तेल सोडून) मिसळा आणि नीट ढवळून घ्या. साधारण इडलीच्या पिठाइतपत सैल असूद्या. लागल्यास पाणी वा रवा (वा तांदळाचे पिठ मिसळा)

नॉन स्टिक पॅनवर थोडेसे तेल वा तूप टाकून त्यावर या मिश्रणाचे धिरडे टाका. गॅस अगदी मंद असु द्या.
आधी झाकण ठेवा आणि मग झाकण काढा. उलटायची वा परतायची घाई करु नका. पॅन थोडेसे हलवून बघा,
जर धिरडे खालून सूटले असेल तरच उलटा. दोन्ही बाजूने, सोनेरी रंग आला पाहिजे.
वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असे धिरडे होते. यात हवा तर बारिक चिरलेला कांदा व आल्याचे तूकडे, कोथिंबीर पण टाकू शकता. सोबत जवसाची चटणी घ्या, म्हणजे आरोग्यपुर्ण अशी न्याहारी होईल.

रव्यापेक्षा, तांदळाच्या पिठामूळे जास्त कुरकुरीतपणा येतो. तसेच मिरच्यांच्या जागी लोणचे वापरले तर जास्त चांगली चव येते.
बाकी मी आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणाऱ्यांपैकी असल्याने लोणचे संपवायचे, असे वेगवेगळे उपाय शोधावे लागतातच.

वाढणी/प्रमाण: 
चार मध्यम धिरडी होतील.
अधिक टिपा: 

हा प्रकार मंद आचेवरच करायचा आहे. वेळ नसेल तर सगळे मिश्रण एकदम पॅनमधे घाला, व खाताना तूकडे करुन घ्या.
उद्या परवा फोटो टाकतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हे धिरडे, मिक्सर न वापरता करुन बघितले. तर तसेही चांगले होते. हा घ्या फोटो. मी तांदळाचे पिठ वापरले आहे, तसेच चटणी कारळ्याची आहे !!!

Oats DhiraDe.JPG

कारळाची चटणी .. जल्ला जळवले.. दशक जाहले खावून .. आयडिया भारी .. उद्याच करते भाज्या बिज्या टाकून मुलांसाठी .

कुठलेही ओट्स चालतील, ओट्स रोज खाणे चांगले, पण ते पॉरिज, आपल्या जीभेला मानवत नाही, म्हणून हे वेगळे प्रकार, करायचे.

दिनेशदा, कालच हे धिरडे केले. (तुमच्या रेसिपीत नसलेला) लसूण घालुन. सगळ्यांना खूपच आवडले. खाराच्या मिरच्या किंवा लोणचे घालण्याची कल्पना खूपच आवडली. त्यातल ओटचं अस्तित्व कोणालाही ओळखू आलं नाही.
धन्स !

दिनेशदा,

कालच केली होती ही धिरडी. शुगोल प्रमाणेच (तुमच्या रेसिपीत नसलेला) लसूण घालुन केली मी ही. आलं-लसणीची पेस्ट घातली. नो कांदा. तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार केली तर साधारण मीडीयम साईझ ची ८ धिरडी झाली.

आंबट ताकात हे पीठ भिजवायचे असल्याने याला आंबोळी म्हणणे जास्त बरोबर वाटेल नाही का?

आभार शुगोल आणि निंबुडा, आता मला पण लसूण घालून बघायला पाहिजे. (माझा आळस लक्षात घेता, सरळ लसुण चटणीच घालेन !!)

Hi Dineshda,

It was awesome!! Atishay sundar dhirdi zalit..kalch try keli. me Oats takat bhijvayla thevale tar sasubai mhanalya..yachi honarch nahit dhirdi Happy but I knew tumchi recipe nakki barobar asel and the result was very tasty! Ata Sasubai mhantayet w/o mixer honarch nahit..so thats my next project:-) Hope it works! Navryala pan avdalit far!! thanks much again..please keep posting such tasty, healthy and simple recipes!! Sorry Marathit typayla yet naslyane English madhe typela ahe.

दिनेशदा, मी आज ही धिरडी केली होती मस्तच लागतात. मी फक्त त्यात कोथिंबीर अ‍ॅड केली. त्यातल ओटचं अस्तित्व कोणालाही ओळखू आलं नाही. सगळे विचारत होते कशाची म्हणुन.
मस्त रेसीपी बद्दल थँक्यु हं Happy

मागे एकदा खवय्येवर कुणीतरी अशीच ओत्सची फ्रँकी बनविली होती. त्यात तिने ऑट्समध्ये सोया ग्रॅन्युल्स घालून केली होती ती पण छान लागते आणि होतेही पटकन. बाकी दिनेश्दांची रेसिपी नेहमीच हिट असते ,धन्स दिनेशदा:)

नक्की करून बघणार आता. Happy
कारण मी ओट्सचं पॉरिज खायला घेतलं की सगळे हसतात मला Angry
सगळ्यात आधी नवरा खुसफुसतो ," कडबाकुट्टी "
मग ल्योक---हम्मॅ हम्मॅ करून हंबरायला लागतो.
आणि साबा मला दिसणार नाही अशा पद्धतीने खाली मान घालून खुदखुदतात.
आधी चिडायचे मी.....आता चक्क दुर्लक्ष करते ! वरून ऐकवते त्यांनाच..." तुम्हाला पौष्टिक खायची माहितीच नाही "

दिनेशदा,
मस्त ..!
धिरडे तुमच्याकडुन ऐकल, घरी बनवायलाही सांगीतल !
आता दिवाळीची सुट्टी आहे ...मला तर काही बनवता येत नाही ..!
अस एखादं धिरडे पाठवुनच दिलं द्या सरळ इकडे !

आजच केले होते हे धिरडे. मस्तच लागते. धन्यवाद दिनेशदा Happy

रच्याकने, पाककॄती शोधण्यासाठी माबोच्या सर्च विंडोमध्ये 'ओट्सचे धिरडे' असे टाईप केले असता एकही पाककॄती आली नाही. मग फक्त 'धिरडे' देऊन शोधले असता त्यात ही कॄती दिसली. एखादी पाककॄती शोधताना असा प्रॉब्लेम ह्यापूर्वीही आला आहे Sad

खूपच छान रेसिईपे. माझ्या मुलांनी आवडीने खाल्ली. आदल्या रात्री करून freeze मध्ये ठेवली तर चालेल का ?

मी पण आता खूपवेळा करतो.
उजू, पीठ भिजवून ठेवले तरी चालेल. हे पिठ काहि आंबायचा प्रश्न नाही. शिजवून ठेवले तर परत गरम करावे लागतील, मग कदाचित चिवट होतील. (मी बघितले नाहीत, फ्रिजमधे ठेवून.)

हो उजू, आदल्या दिवशी भिजवून ठेवले तरी चालेल. तसे चार पाच दिवसही बॅटर टिकेल, फ्रिजमधे. जर करताना घट्ट वाटले, तर पाणी घालून सारखे करायचे.

Pages