पुण्य, की प्रायश्चित्त?...

Submitted by झुलेलाल on 2 October, 2010 - 12:06

'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला.
... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता.
’बघितलंत?...’ पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं.
मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं.
... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं.
’तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण’...
बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला...
’अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...’ तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं.
मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो.
’... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?’... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं.
’ नक्कीच चांगलं’... मी लगेच उत्तरलो.
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
’नाही... अजिब्बात नाही.’ तो ठामपणे म्हणाला.
... ’अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...’
पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता.
’तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...’ पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला.
त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.
तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो.
’काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...’ मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला.
... ’अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...’ तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती.
मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो.
’सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?’ पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं.
मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती.
’साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...’
’मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...’ तो संथपणे बोलत होता.
आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं.
’राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला’...
... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं.
मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं.
एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं.
’... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..’ तो कळवळला.
’बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ’
... समोरचा चहा थंड झाला होता.
’मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...’ तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला.
मी भुवया वर करून खुणेनंच त्याला ’काय’ म्हणून विचारलं.
’तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...’
..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं.
’हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर’... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला.
चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो...
हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकड्डली होती.
...’ आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ’ बोलताबोलता तो थांबला.
... ’मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? 'तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...'
- तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले!

http://zulelal.blogspot.com
-----------------------------------------------------

गुलमोहर: 

वर्षूताई, ते अथश्री परांजप्यांचंच आहे Happy मतिमंद मुल असेल तर त्याला घेऊन आईवडिलांनी वेगळंच राहिलेलं बरं असतं कारण बाकिच्या मुलांच्या संसारावर त्याचा परिणाम होतो.

पण वार्धक्यामुळे आलेलं विकलांगपण आणि त्यामुळे दुबळं झालेलं मन यांना आधार द्यायला तो भरपूर पैसा उपयोगी ठरला नाही. >> exactly का नाही उपयोगी आला पैसा, कारण जिथे त्यांच्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना म्हातारपणी काळजी घेणारी व्रुध्दश्रम माहित नसेल किंवा उप्लब्ध नसेल्,किंवा अशा ठिकाणी जाणे कमीपणाचे वाटत असेल. हे माहित नसणे,उप्लब्ध नसणे ,किंवा कमीपणाचे वाटणे कुठुन आले , तर , मुलांनीच म्हातरपणी आपल्यबरोबर रहावे ह्या हट्टातुन.त्याच उलट ह्या प्रश्नाचा भावनिक न होता विचार केला असता तर एव्ह्ड्या श्रीमंत माणसाला शेजार्‍यावर तरी का अवलम्बुन रहावे लागले असते.
तुम्ही म्हणताय ते डॉक्टर काय किंवा तुमचा स्वत;चा लेख काय, तुमचे काहीच रोल नाही का ह्या भावनाप्रधानतेला कमी करुन प्रॅक्टिकल सोलुशन्स सुचवण्याचा.असे लेख लिहुन तुम्ही 'मुलेच कशी वाइट,कसे होणार आता म्हातार्‍या माणसांचे ,अरे अरे व्रुध्दाश्रमात जावे लागले त्यांना' अशी भीतीच नाही का पसरवत आहात? मला स्वतःला तरी तसेच वाटले .

मुला नातवंडांमध्ये रमणार्‍या वृद्धांना कधीही वृद्धाश्रमांचा ऑप्शन आवडणार नाही हे ही तितकंच खरं. आणि असं असेल तर जबरदस्तीने त्यांना तोडून दूर ठेवू नये.
>>अश्विनी अग मुला नातवडांना वेळच नसेल,शक्यच नसेल तर काय हरकत आहे नवीन जागेत समवयस्कर लोकांबरोबर आनंदाने राहण्यात.

जर घर वृध्द माणसाच्या मालकिचे (जनरली ते त्याच्याच मालकिचे असते)असेल तर त्याला घरातुन हाकलण्याचा कुणालाही अधिकार नाही, पटत नसेल त्याने स्वतः घरातुन बाहेर पडावे,अशा वृध्दांनी सरळ पोलिसांना फोन करुन मदत घ्यावी.

मी प्रॅक्टिकल सोल्युशनचा विचार करतोय.
समजा, परदेशात किंवा देशात- कुठेही- राहाणार्‍या कुणाचे वृद्ध आईवडील एकटे असतील, आणि त्यांच्या देखभालीसाठी भरपूर पैसा खर्च करायची मुलांची तयारी असेल, त्यांच्यासाठी स्वतंत्र घर असेल, तर, आपल्या आईवडिलांसोबत आणखीही अशा एखाद्या गरजू वृद्धालाही आधार द्यावा. देखभालीसाठी केअर्टेकर असणारच, त्यामुळे, त्यासोबत आणखी एकाचीही देखभाल होईल. ज्यांना शक्य आहे, त्यांनी वृद्धांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आधार द्यावा. जी मुले वृद्ध आईवडिलांसोबत राहात नाहीत, त्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे आपापल्या घरातील वृद्धांच्या सोयीसाठी असे 'घरच्या घरी वृद्धाश्रम' उपक्रम सुरु करावेत. हे अवघड नाही. असे झाले, तर 'प्रॅक्टिकल विचारसरणी'ला काहीतरी सक्रियतेचीही जोड मिळेल.
केवळ चर्चेतून असे प्रश्न सुटत नाहीत, हे आपंण सगळेच जाणतो.

अगं ते तर मी म्हटलंच आहे ना डे-केअरचा ऑप्शन छान आहे म्हणून Happy रात्री तर सगळे कुटुंबातील सदस्य आपापल्या घरीच येतात असं मी गृहीत धरतेय.

माझ्या स्वभावाप्रमाणे हे अत्यंत भावूक वाटेल, पण खूप वय झाल्यावर असे कितीसे दिवस आपल्याला त्यांच्या सहवासाची संधी मिळणार? एकदा माणूस हे जग सोडून गेलं की कितीही परत बघावंस वाटलं तरी एका क्षणासाठीही परत येत नाही गं. मग उरलेत त्यातले सगळे दिवस शक्य असेल तर प्रामाणिकपणे स्वतःजवळच ठेवावं.

रच्याकने, माझ्याजवळ माझी ब्रेन अ‍ॅट्रॉफी झालेली आई, खूप कमी ऐकू येणारे वडील, अत्यंत थकलेले (खूपदा बसून बसूनच बेसीनपर्यंत सरकणारे) अविवाहित मोठे काका व ८२ वर्षांच्या सासूबाई आहेत. साबा येऊन जाऊन असतात. माझे आईवडील व साबा यांना उशीरा मुलं झाल्याने ते आता खूप म्हातारे आहेत. मला एकदाही त्यापैकी कुणाला वृद्धाश्रमात ठेवावं असं मनाला चाटूनही गेलं नाहिये. उलट त्यांची दिवसेंदिवस म्हातारपणामुळे खालावत जाणारी तब्बेत पाहून जीव उडून जातो की जास्तीत जास्त यांच्याजवळ मला राहता आलं पाहिजे. देवाच्या कृपेने दिवसा ५ तास येऊन यांचं प्रेमाने करणारी बाई मला मिळालीय. मलाही समाधान मिळतंय की मला यांच्यासाठी काही करता येतंय. वयाप्रमाणे येणारी anxiety त्यांच्यात असते पण चालून जातं Happy

arc अनुमोदन!!

अश्विनी के , मस्त पोस्ट.
तू आणि तुझे आईवडील खरेच लकि आहात. तुला तुझ्या आईवडीलांची स्वतःच्या घरी काळजी घेता येतेय हे पण छान. एकच मुलगी असली तरी मुलीच्या घरी रहाणारे आईवडील हे अजुनही आपल्या समाजात पचनी पडत नाही किन्वा सासरच्यांनाही फारसे मानवत नाही.

मुले म्हातारपणी जवळ असतील आणि ती पुर्णवेळ आपल्याबरोबर राहु शकतील या आता आपल्या पीढीसाठी तरी जवळपास स्वप्नवत गोष्टी आहेत असे मला वाटते. ती जगाच्या पाठीवर कोणत्या देशात रहातील काय माहित ? आपण तिथे जाउन तरी राहु शकु का ?
तसेच अत्ताच एक अवघड परीस्थिती पहायला मिळतेय. घरातील २०-३० ची तरुण पीढी परदेशात, ५५-६० चे आई वडील आणि ८० च्या आसपासचे आजीआजोबा एव्हढेच घरात. बरे, या आई वडीलांची तब्बेत चांगली असेल असे नाही. त्यांना ही हृदयविकार , मधुमेह असे आजार जडलेले असण्याचीच शक्यता अधिक. तेव्हा ज्या मुलांवर आपण म्हातारपणी काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतोय तीच स्वतः च्या प्रकृतीने थकली असतील तर ?
तेव्हा वृद्धासाठी मदत संस्था निघाल्या पाहिजेत.

चांगले मंथन चालू आहे. कथा म्हणून ठीक आहे, परंतु दुसर्‍या बाजूचाही विचार होणे काळाला धरून आवश्यक आहे. झुलेलाल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अजून तरी खेड्यांमध्ये, गावांतून वृध्दांची देखभाल करायला कोणीच नाही असे सहसा होत नाही. कारण बायका अनेकदा घरातच असतात, त्या नोकरी-व्यवसायासाठी बाहेर जात नाहीत. आणि त्या घराबाहेर असल्या तरी एकत्र कुटुंबांमुळे व शेजारधर्माचे पालन आजही तिथे पाहायला मिळत असल्यामुळे घरात वृध्दांकडे दुर्लक्ष होणे, त्यांची आबाळ होणे इत्यादी प्रकार सहसा कानावर येत नाहीत.

त्याउलट शहरातील परिस्थिती. घरातील सर्व सदस्य काम, नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेर. फ्लॅट संस्कृतीत शेजार धर्म हा प्रकार लोप पावत चाललेला. छोट्या जागा. महागाई. अवास्तव खर्च. नोकरमाणसांची टंचाई किंवा बेभरवसा. वाढत्या चोर्‍यामार्‍या, दरोडे. सुरक्षिततेचा प्रश्न. जवळपास नात्यातील कोणी राहात असले तरी त्यांच्याकडेही वेळेचा अभाव. अशा प्रसंगी किंवा मुलेबाळे परदेशी आहेत, आपले करायला कोणी नाही अशा अवस्थेत वृध्दांना जिथे आपली व्यवस्थित काळजी घेतली जाईल, दोन वेळेला ताजे गरम पथ्याचे अन्न आयते मिळेल, औषधपाणी-वैद्यकिय सुविधा, समवयस्कांचा शेजार, मनोरंजन साधने असतील अशा ठिकाणी स्वेच्छेने आपला मुक्काम हालवायला काहीच हरकत नाही.

परंतु.....

हा पर्याय सर्वसामान्य माणसाला तितका परवडणारा नाहीए. म्हणजे जिथे घरी नोकरमाणूस परवडत नाही, घर छोटे आहे, वृध्दांकडे बघायला कोणीच नाही अशा अतिसामान्य परिस्थितीच्या घरात. पेन्शनरांना तर असा पर्याय फक्त पेन्शनच्या जोरावर परवडणारा नाहीच नाही! आणि जर मुलाबाळांनी त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद केली असेल किंवा वृध्दांनी तसे पैसे वेगळे साठवले असतील तरच हा पर्याय परवडणारा आहे. अथश्री सारख्या सोयी अजून कमी किंमतीत उपलब्ध झाल्या तर अशा वृध्दाश्रमांमध्ये किंवा वृध्दांसाठीच्या सदनिकांमध्ये जाण्यास अनेक वृध्द आपण होऊन तयार होतील.

डे केअर फॅसिलिटी हा देखील चांगला पर्याय आहे.

जर मुलाबाळांनी राहात्या घरातून सक्तीने बाहेर काढले, दमदाटी करून किंवा बळजबरी घराच्या मालकीच्या कागदपत्रांवर सह्या घेऊ गेले तर वृध्दांसाठी पोलिस आयुक्तालयाने हेल्पलाईन काढली आहे. त्यांच्यातर्फे ते अशा मुलांना ''समज'' देण्याचे काम करतात व आईवडिलांना त्यांचा न्याय्य हक्क देण्यास भाग पाडू शकतात. कथेतील सोडून दिलेली आई अशा हेल्पलाईनचा आधार घेऊन मुलाला आपल्याला घरी घेण्यास भाग पाडू शकते. किंवा त्याच्याशी पुन्हा संपर्क साधू शकते. किंवा अन्य कोणी तिच्यासाठी हे काम करू शकते. त्यामुळे आईवडिलांना फसवून घराबाहेर काढणार्‍या मुलांनाही योग्य तो धडा मिळेल.

लेख आणि त्यावरील चर्चा अतिशय उत्तम.

आपण लक्षात घ्यायला हवे की आपल्या आधीच्या पिढीची (म्हणजे आता ७०-७५ ला असलेल्यान्ची) आपल्यात भावनीक गुन्तवणुक जास्त असते (अपवाद असतीलही) त्याना या प्रॅक्टीकल गोष्टी या वयात पचनी पडणे जरा अवघडच असते त्यामुळे त्यान्च्या दृष्टीकोनातुन वृद्धाश्रमाचा सकारात्मक स्वीकार होणे जरा कठीणच आहे. त्याना आपल्या मुलानातव.न्डान्बरोबर रहावे , मुलाने सेवा करावी असे वाटणे साहजिक आहे. (मी इथे मध्यमवर्गीय बद्दल्च बोलत आहे..जे जरासे सधन किन्वा आर्थिक्दृष्ट्या भक्कम असतील ते वृद्धाश्रमाचा सकारात्मक स्वीकार करत असतीलही)

नीधपचा मुद्दा हा आपण आपल्या पिढीपासुन मात्र गान्भीर्याने घेणे आवश्यक आहे. आता ३०-४० वयोगटातील लोकानी आतापासुनच वानप्रस्थाश्रमासाठी आर्थिक आणि मानसिक तयारी ठेवायला हवी.

बरोबर म्हणूनच मी म्हणाले की माझ्या वडिलांना, सासू-सासर्‍यांना(आम्हाला दोघांनाही भाऊ बहिण कोणीच नाही त्यामुळे जबाबदारी पूर्णतः आमची दोघांचीच आहे.) या पर्यायाकडे कधीच नेणार नाही पण स्वतःसाठी हा पर्याय नक्कीच निवडेन.
आणि ह्यासाठीच ही लेबलं लावणं, एकांगी विचार करणं हे आपल्या पिढीने बंद केलं पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या स्वेच्छेने घेतलेल्या निर्णयामुळे नको ते ऐकायला लागू नये.

वृध्दाश्रम चांगला की वाईट हे परिस्थिती सापेक्ष आहे. कशामुळे वृध्दाश्रमात आले आहेत त्यावरही अवलंबून आहे. घरात आईवडिल म्हणजे मुलांचे आजीआजोबा असूनही डे केअरमधे मुलांना पाठवण्यामागे उद्देश की आईवडिलांनी आतापर्यंत मुलांना वाढवून मोठ्ठ केल. आता ह्यावयात लहान मुलांची जबाबदारी पूर्ण्पणे त्यांच्यावार टाकून जाणं मनाला पटत नसेल. तसच आपली जबाबदारी मुलांवर पूर्णपणे टाकण्यापेक्षा सांपत्तीकदृष्ट्या शक्य असेल तर वृध्दाश्रमात जायच आईवडिलांनी ठरवलं तर मुलांवरही तो टॅबू लावण्यात अर्थ नाही.

मी व माझा नवरा वेळ येईल तेंव्हा सिनीयर सिटिझन कम्युनिटीमध्ये रहाणं पसंत करू. मुलांच्या वाढत्या संसारात त्यांच्या वाढत्या जबाबदार्‍यात आम्हाला स्वतःची अ‍ॅडिशनल जबाबदारी टाकावी असं वाटत नाही. असही असू शकेल की आम्ही जेंव्हा रिटायर होवू तेंव्हा सोईस्कर वृध्दाश्रमपण अव्हेलेबल असतील. आणि मुलांच्या संसारात रहाण्यापेक्षा आम्हाला स्वतःची स्वतंत्र सोय जास्त आवडू शकेल. किंवा स्वतःच स्वातंत्र्य जपायला आवडेल. मुलांना आमची जेंव्हा गरज असेल तेंव्हा आम्ही नक्कीच आनंदाने मदत करू.

त्यामुळे जसं प्रत्येकवेळी डे केअरमधे जाणार्‍या मुलांच्या आजीआजोबांना नावं ठेवण्यात अर्थ नाही तसच वृध्दाश्रमात रहाणार्‍यांचा मुलांना दूषण लावण्यात अर्थ नाही.

खर तर चांगले वृध्दाश्रम कसे असावेत किंवा कसे काढावेत ह्यावर लक्ष केंद्रीत करणं महत्वाच आहे. ज्यामुळे पालक आपल्या वयाच्या लोकांबरोबर आनंदात राहू शकतील आणि मुलांची काळजी दूर होईल. जसं पाळणाघर ही काळाची गरज आहे तसंच वृध्दाश्रम ही काळाची गरज होणार आहे.

बागबान आणि तत्सम एकांगी छापाच्या दळणापेक्षा ही चर्चा जास्त सकारात्मक मार्गाने चाललेली बघून बरे वाटले.
आर्च पटले.
वृद्धांसाठी योग्य काय याचा विचार करण्यापेक्षा आपण जेव्हा वृद्ध होऊ तेव्हा आपल्या गरजा काय काय असतील आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय काय उपाय अवलंबता येऊ शकतील तसेच मध्यमवर्ग किंवा गरिब दोघांनाही परवडू शकतील असे उपाय काय असतील याचा विचार केला तर कदाचित त्यातून काही नवीन कल्पना उभ्या राहू शकतील.

समजा, परदेशात किंवा देशात- कुठेही- राहाणार्‍या कुणाचे वृद्ध आईवडील एकटे असतील, आणि त्यांच्या देखभालीसाठी भरपूर पैसा खर्च करायची मुलांची तयारी असेल, त्यांच्यासाठी स्वतंत्र घर असेल, तर, आपल्या आईवडिलांसोबत आणखीही अशा एखाद्या गरजू वृद्धालाही आधार द्यावा. <<
पण आपल्या आईवडिलांना अश्या कुणाबरोबर रहायचं नसेल आपली स्पेस शेअर करायची नसेल तर? आपली समाजसेवा आपल्या आईवडिलांनी का झेलावी? आता त्यांनाच वाटलं अशी काही व्यवस्था करावी तर त्यांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे हे मान्य.

>>ज्यांना शक्य आहे, त्यांनी वृद्धांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आधार द्यावा. जी मुले वृद्ध आईवडिलांसोबत राहात नाहीत, त्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे आपापल्या घरातील वृद्धांच्या सोयीसाठी असे 'घरच्या घरी वृद्धाश्रम' उपक्रम सुरु करावेत. हे अवघड नाही. असे झाले, तर 'प्रॅक्टिकल विचारसरणी'ला काहीतरी सक्रियतेचीही जोड मिळेल.<<
प्रॅक्टिकल विचारसरणी हा शब्द अवतरणात टाकल्याने त्यावरची खोच लक्षात आली. पण बाकी विचार थोडे जास्त युटोपियन वाटतात. आपल्या घरात आपल्या आईवडिलांबरोबर अजून एक वृद्ध व्यक्ती आणून ठेवणे हे आपल्या आईवडिलांना नको असेल तर का लादायचे? त्यांनी या वयात आपली स्पेस अनोळखी वृद्ध व्यक्तीबरोबर का शेअर करायची? या वयात वयानुसार स्वत:च्या मुलाबाळांशी अ‍ॅडजस्ट नाही करता येत अनेकांना, नुसती रोजची चष्मा ठेवण्याची जागा बदलली तरी चिडचिड होते आणि त्यात एक अनोळखी वृद्ध व्यक्ती घरात? वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा हे क्रूर आहे.

<<आता ३०-४० वयोगटातील लोकानी आतापासुनच वानप्रस्थाश्रमासाठी आर्थिक आणि मानसिक तयारी ठेवायला हवी.>> मला वाटतं या मानसिक तयारीसाठी पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं. आयुष्यभर नोकरी करून संसार सांभाळलेल्या माझ्या खास माहितीच्या अनेक जोडप्याना निवृत्तिच्या काळात आपले हक्काचे विश्रांतिचे/मोकळेपणीचे दिवस केवळ कर्तव्य म्हणून ज्या वातावरणात ते रमू शकत नाहीत तिथे यामुळे घालवावे लागतात. हे मुद्दाम सुचवायचं कारण कीं वृद्धाना त्यानी नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घेतलं पाहिजे हे सांगताना, "मग अशावेळी मुलीच्या/सूनेच्या आई-वडीलानी/सासू-सासर्‍यानी इथं येऊन रहायची आपल्यात पद्धतच आहे ना !" असा जुनाट सूरही लावू नये.

आपल्या घरात आपल्या आईवडिलांबरोबर अजून एक वृद्ध व्यक्ती आणून ठेवणे हे आपल्या आईवडिलांना नको असेल तर का लादायचे? त्यांनी या वयात आपली स्पेस अनोळखी वृद्ध व्यक्तीबरोबर का शेअर करायची?
हेच म्हणतो. आपली इच्छा आईवडिलांवर लादण्याआधी त्यांच्या इच्छेचा आदर करण्याची मनापासून इच्छा असेल, तर आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्याआधीही त्यांची तशी इच्छा आहे किंवा नाही हेही जाणून घ्यावे. नाही तर, आईवदिलांना नको असेल तर ते त्यांच्यावर का लादायचे?
त्यांनी या वयात आपली स्पेस अनोळखी वृद्ध व्यक्तीबरोबर का शेअर करायची? हेही खरे. वृद्धाश्रमातील लोकांना सगळेच ओळखीचे कुठे भेटतात. तिथेही त्यांना अनोळ्खी वृद्धासोबतच आपली स्पेस शेअर करावी लागतेच ना...
या वयात वयानुसार स्वत:च्या मुलाबाळांशी अ‍ॅडजस्ट नाही करता येत अनेकांना, नुसती रोजची चष्मा ठेवण्याची जागा बदलली तरी चिडचिड होते ...
खरंय. मग, असे वृद्ध, वृद्धाश्रमात कसे वागतील? तिथे त्यांच्या अशा वागण्यानं त्यांना काय भोगवे लागेल, याचाही विचार करायला हवा... (ना?)
म्हणूनच प्रॅक्टिकल विचारसरणी हा मुद्दा मला महत्वाचा वाटला, आणि अवतरणात टकला असावा. कदाचित त्यामुळे चर्चेला विधायक वळण कायम राहिले, तर चांगलेच आहे...

पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं.>>>

भाऊ, याचा त्या आधीच्या वाक्याशी काय संबंध आहे कळाले नाही. आत्ता ३०-४० वर्षाचे असलेल्या पिढीने पुढे आपल्याला मनासारखे राहता येइल आणि कोणावर आपला भार पडणार नाही याचा विचार करणे आणि आत्ता आपल्याला गरज असताना पालकांची मदत घेणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी नाहीत काय?

<<भाऊ, याचा त्या आधीच्या वाक्याशी काय संबंध आहे कळाले नाही.>> व्रृद्ध आई-वडीलांशी संबंध हा एव्हढाच जीवनपद्धतिचा व विचारसरणीचा एक तुकडा काढून त्याला नवीन परिस्थितीची परिमाणं लावणं योग्य नाही, असं मला सुचवायचं आहे. आणि हे नवीन व जुन्या दोनही पिढ्याना सारखंच लागू होतं. मुलाचं किमान शिक्षण झाल्यावर त्याने आपल्या हिमतीवर पुढे काय ते करावं, ही पद्धत इथं रुळलेली नाही. नंतरच्या परदेशी शिक्षणासाठीही आई-वडील कर्ज काढतात, ही इथली सर्वसाधारण प्रथा आहे. मग अचानक त्यांच्या वृद्धापकाळात मुलांनी नवीन परिस्थितीची त्याना जाणीव करून द्यायला सुरवात केली तर त्याना ते असह्य होणं स्वाभाविक आहे. तेच जर आई-वडील व मुलं यानी प्रथमपासून स्वतःच्या जबाबदार्‍यांच्या व स्वतंत्रतेच्या मर्यादा स्पष्ट केल्या असतील, तर यात त्रासदायक कुणालाच काहीच होणार नाही. पण तसं इथं होत नाही, हा खरा कळीचा मुद्दा असावा.

तेच जर आई-वडील व मुलं यानी प्रथमपासून स्वतःच्या जबाबदार्‍यांच्या व स्वतंत्रतेच्या मर्यादा स्पष्ट केल्या असतील, तर यात त्रासदायक कुणालाच काहीच होणार नाही. पण तसं इथं होत नाही, हा खरा कळीचा मुद्दा असावा.>> तुमचा मुद्दा पटला Happy

मला वाटतं या मानसिक तयारीसाठी पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं.>> I buy your point. पण मी उलटे म्हणेन,आई वडीलांनी उगीच भावनिक होउन झेपत नसताना मुलांच्या मदतीला जाउ नये असे मी म्हणेन. रोखठोकपणे आईवडीलांना बोलता आलेच पाहिजे. मुलांसमोर गुळमुळीत/गरीब होऊ नये.मुले बघुन घेतील त्याम्चे त्याम्चे असा अत्यंत firm stand हवा.

"मग अशावेळी मुलीच्या/सूनेच्या आई-वडीलानी/सासू-सासर्‍यानी इथं येऊन रहायची आपल्यात पद्धतच आहे ना !" असा जुनाट सूरही लावू नये.
>> अशा जुनाट मुलांना दोन खडे बोल आईवडीलच नाही ऐकवणार तर कोण?

तर आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्याआधीही त्यांची तशी इच्छा आहे किंवा नाही हेही जाणून घ्यावे. नाही तर, आईवदिलांना नको असेल तर ते त्यांच्यावर का लादायचे?>> कोणीच कुणावर काही लादत नाहिये. फक्त मुले लांब असतील तर मुलांवर ,जवळ येउन रहा ही सक्ती नको .अशा वेळेस एकटे रहाने शक्य असेल तर एकटे रहा,मुलांना पर्यायी व्यवस्था तयार करा.जर अगदीच अशक्य असेल तर व्रुध्दाश्रमात जाणे कमीपणाचे मानु नका,हा मुद्दा आहे.
आधुनिक पालक लहान मुलांना जितक्या सहजतेने day-care मधे ठेवतात तितक्या सहजतेने हे झाले पाहिजे, उगाचच "इतक्या खस्ता खाल्या ह्याच्यासाठी, आणि आता बघा कामाच्या व्यापात आमच्याकदे बघतही नाही" ही तक्रार नको

नमस्कार लोकहो,

झुलेलाल यानि एका चान्ग्ल्या विशयाला सुरुवात केलि आहे.
अगदि बागबान सिनेमा नहि तरि पन लेखा मधल्या आजिबै सारखि फसवनुक होनारे म्हातारे कहि कमि नहि. हे मि स्वताहा बघितल आहे.

परन्तु अस होउ नये म्हनुन घरोघारि म्हातार्या लोकान साठि दिवसा पुरते साम्भाळ्ण्या चि सोय व्हावि अस म्हणाण जरा अति होतय.

लाहान मुलान चि रोज च्या रोज ने आण करण सहज शक्य आहे.
पण तेच म्हातार्या न च करा बरा, देव आठवतिल. त्यातुन जर पाय काम करत नस्तिल तर काय कराल ?

आनि स्वताहा च्या घरात केवळ सोबत म्हनुन अजुन कोणि म्हतारि व्यक्ति आणण्या चा विचार पण हास्यास्पद आहे. जे लोक वयाने ८०+ म्हातार्यान चा सम्भाल करतात ते च समजु जाणे.

कधि कधि शरिरा च्या त्रासा पायि घरा पेक्शा दवाखान्या चि जास्त गरज अस्ते.
सध्या आपल्या कडे अशा क्लिनिक कम व्रुध्धाश्रमान चि खुप गरज आहे.

त्यामुळे इमोशनल होउन विचार करण सोडुन दिल पहिजे.

माझ्या सा.बा. ना २ वर्श अशा एका चान्ग्ल्या होस्पिटल कम व्रुद्धाश्रमात पुण्यात च ठेवल होत.
आम्हि परदेशात असुनहि त्याना ६-७ वर्श स्वताहा कडे ठेवुन त्यान चि जेवढि जमेल तेवढि सेवा केलि.
परन्तु, पैसा, वेळ अणि भरपुर इच्छा असुन हि तुम्हि बेड रिड्डन माणासा ला लागणार मेडिकल अटेन्शन
देउ शकाल च असा नाहि.

व्रुद्धाश्रम हि आज च्या काळा चि गरज झालि आहे.

अनिता रमाकान्त

खुप चांगली कथा..आणि ह्या विषयावर होणारी चर्चा देखील.
साधना,नी,मॄ,आर्क..सगळ्यांशी सहमत.
आता ३०-४० वयोगटातील लोकानी आतापासुनच वानप्रस्थाश्रमासाठी आर्थिक आणि मानसिक तयारी ठेवायला हवी.>>> हे मात्र अगदी १००% पटलं..
"न सर झुका है कभी..और न झुकेगा कभी.." एच.डी.एफ.सी ची अ‍ॅड आठवली Happy

<< मला वाटतं या मानसिक तयारीसाठी पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं. >> पटलं!! असे बाळंतपणासाठी गेलेले आईवडील दर वेळीस स्वेच्छेनेच जातात असेही नाही. अनेकदा गत्यंतर नसते. पण अशा वेळी इमोशनल होणे जरा बाजूला ठेवून, आपल्या तब्येतीचा - प्रवासाचा व नंतर होणार्‍या दगदगीचा विचार करून मगच आपल्याला हे सर्व झेपणार असल्यासच जायचा विचार करावा. मुली/ सुनांच्या बाळंतपणाला परदेशात जाऊन परत भारतात आल्यावर तब्येती बिघडलेली अनेक वृध्द दांपत्ये मी पाहिलेली आहेत. कितीही म्हटले तरी त्या देशातील हवा-पाणी, सवयी, लांबचा प्रवास व दगदग त्यांना झेपतेच असे नाही. परंतु पोरा-नातवंडांच्या ओढीने जातात. झेपत नसताना धावून धावून चार गोष्टी करतात. आणि परत आल्यावर आजारी पडतात. त्यापेक्षा मुला/मुली ला तुझे तू मॅनेज कर म्हणून सांगावे.

<< मला वाटतं या मानसिक तयारीसाठी पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं. >>
मान्य.
अकु ला अनुमोदन

<< मला वाटतं या मानसिक तयारीसाठी पहिलं पाऊल म्हणून या वयोगटातील परदेशस्थ मुलीनी आपल्या बाळंतपणासाठी आपल्या आई-वडीलाना/ सासू-सासर्‍याना परदेशात बोलावणं बंद करावं. >>
हे ही बरोबर!!
प्रत्येकाने दुसर्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आहे, त्यानुसार त्यांची स्वप्न, आवडीनिवडी असणार हे मान्य करायलाच हवं.

हे सर्व वाचुन असे जाणवले की प्रत्येक घराची situation वेगळी असते.
सब घोडी एक बराबर न्याय बरोबर नाही.
एखाद्या घरात एखाद्या विधवेने आपले सर्वस्व खर्चुन मुलान्ना शिक्षण दिले असते तर एखाद्या
घरात आइवडील आपले career महत्वाचे ठरवितात व मुलांवर त्याप्रंआणे संस्कार करतात.
सर्वान्ना एकच सुचना आपली परिस्थिती कशी आहे आणि आपली आपल्या आईवडिलांबद्दलली कितपत करण्याची तयारी आहे, याची आपल्या जोडीदाराला पण लग्नाआधीच कल्पना द्यावी.
व्रुद्धाश्रम हा वाइट option नाही पण भाउ नमसकर म्हणाले त्याप्रमाणे HR management च्या भाषेत "equitable situation" असावी. कोणी कोणाचा गैरफायदा घेउ नये. विवाह कायद्यांबद्दलही माझे हेच मत आहे. कायदे आणि नियम सतत बदलणार्या समाजव्यवस्थेला एकाप्रकारेच लागु होत नाहीत.
प्रत्येक गोष्ट वेगळी असते.

झुलेलाल...... काय पण म्हणा..... श्रीनिवास पेंढारकरांची प्रकर्षाने आठवण झाली.... लेख वाचुन नव्हे.... प्रतिक्रिया वाचुन......

एवढे ज्ञानी, विचारवंत, प्रगल्भ मायबोलीकर practical solution म्हणून असा विचार करत असतील असे स्वप्नात देखिल वाटले नसते.....
माणूस जगतो कशासाठी ? Sad

>>> हेच म्हणतो. आपली इच्छा आईवडिलांवर लादण्याआधी त्यांच्या इच्छेचा आदर करण्याची मनापासून इच्छा असेल, तर आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्याआधीही त्यांची तशी इच्छा आहे किंवा नाही हेही जाणून घ्यावे. नाही तर, आईवदिलांना नको असेल तर ते त्यांच्यावर का लादायचे?
वृद्धाश्रमातील लोकांना सगळेच ओळखीचे कुठे भेटतात. तिथेही त्यांना अनोळ्खी वृद्धासोबतच आपली स्पेस शेअर करावी लागतेच ना...
खरंय. मग, असे वृद्ध, वृद्धाश्रमात कसे वागतील? तिथे त्यांच्या अशा वागण्यानं त्यांना काय भोगवे लागेल, याचाही विचार करायला हवा... (ना?)
<<<<
झुलेलाल, तुम्ही सरळ सरळ सगळ्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात ठेवूनच केवळ विचार करताय. तुमच्यामते चुकीच्या असलेल्या प्रॅक्टिकल विचारसरणीच्या लोकांपैकी कोणीही कुठलीही गोष्ट वृद्धांवर लादायचा विचार मांडलेला दिसत नाहीये. तुम्हीच ते तुमच्या मनाने ठरवलंय.
घरातल्या वृद्ध लोकांची काळजी घेणे या गोष्टीला प्राधान्य देताना मुले (जी ६०-७० च्या घरात पोचलेले असतात) आणि नातवंडे (ज्यांचे आयुष्य/ करीअर सुरू होत असते) यांनी संपूर्णपणे आपल्या सगळ्याच इच्छा, आशा, आकांक्षा यांना मुरडच घालावी हे तुम्ही सुचवताय.
४ खोल्यांच्या घरात जिथे मुळात तीन पिढ्या आहेत आणि तिसर्‍या पिढीचे लग्न झाल्यामुळे चौथ्या पिढीचीही शक्यता आहे किंवा प्रवेश झालेला आहे तिथे कोणी कोणाचे किती आणि कसे करायचे याला मर्यादा आहेत. नवीनच आई झालेल्या मुलीने आपल्या बाळाकडे लक्ष द्यायचे की नाही? घरातल्या मोठ्या दोन पिढ्या आणि आपले मूल यांची काळजी घेण्यासाठी करीअर/ नोकरी यावर तिसर्‍या पिढीने किंवा पिढीतल्या एका कुणीतरी फुली मारायची? आणि मग घरात खायचं काय? औषधोपचार इत्यादीसाठी पैसा कुठून आणायचा? आणि मग तिसर्‍या पिढीतल्या या सुनेला भाऊ नसेल आणि तिच्या आईवडिलांना तिची जास्त गरज असेल तर मग तिने काय करायचे? की ते महत्वाचे नाहीत? तिच्यावर हक्क तिच्या सासू-सासरे, आजेसासू-सासरे यांचा की तिला ज्यांनी वाढवले त्यांचा की तिने जन्माला घातलेल्या बाळाचा की तिच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा?

या सगळ्याला एक सोल्युशन नाही. प्रत्येक घराचे यावर उत्तर वेगळे असते. आणि ते त्यांच्यासाठी बरोबर असते.

इथे कोणीच फसवून वा लादून काही करण्याचा विचार मांडत नाहीये. पण एकगठ्ठा वृद्धाश्रमात असणारे सगळेच दु:खी आणि फसवले गेलेले असतात आणि त्या सगळ्यांची मुले नालायक असतात. घरात रहाणारे वृद्ध खुशीत असतात आणि अश्या घरात सगळं काही आलबेलच असतं. इत्यादी समीकरणे खरंच हास्यास्पद आहेत.

मी कोणासही आपोरीच्या पिंजर्‍यात उभे केलेले नाही. तसा सूर कुठे दिसला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नीधप यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत इटॅलिकमध्ये नमूद केलेली वाक्ये ही त्यांच्या अगोदरच्या प्रतिक्रियेवर व्यक्त झालेली माझी मते आहेत. वृद्धाश्रमात ठेवण्याऐवजी, ज्यांचे आईवडील घरी एकटे आहेत, आणि ज्यांची त्यांच्यासाठी पैसा खर्च करायची तयारी असेल, अशा मुलांनी त्यांना शक्य असेल तर आणखी एखाद्या गरजू वृद्धाला त्यांच्यासोबत ठेवून आधार द्यावा असे माझे मत मी मांडले होते. नीधप यांना ते पटले नाही. असे करणे म्हणजे आईवडिलांची इच्छा नसताना त्यांची स्पेस शेअर करायला भाग पाडणे ठरेल व ते वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षाही क्रूर ठरेल असे त्यांचे मत आहे. हेही मला मान्य आहे. पण, आपण वृद्धांच्या इच्छेचा आदर करत असू, तर वृद्धाश्रमात ठेवण्याबाबतचीदेखील त्यांची इच्छा विचारात घ्यावी, असे त्यावर मला वाटले, आणि ते मी नमूद केले. तिथे त्यांना ज्यांच्यासोबत स्पेस शेअर करावी लागते, ते सगळे त्यांनी निवडलेले नसतातच. वृद्धांच्या इच्छेचा विचार करण्याचा मुद्दा पुढे आला, त्यावर माझी ही लगेच व्यक्त झालेली प्रतिक्रिया होती.
त्याआधीच्या एका प्रतिक्रियेत, खेडेगावात म्हातार्‍या गाईलादेखील सांभाळले जाते, कारण तिच्या दुधावर आपली एखादी पिही पोसल्याची जाणीव असते, असे मी म्हटले होते.
ही दोन्ही मते माझी आहेत, आणि खेडेगावातले उदाहरण हे तर वास्तव आहे. त्यामध्ये इतर कोणासही अरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा उद्देश नाही वा तसा सूरही नाही. ही मती सर्वांनी स्वीकारलीच पाहिजेत, असा सक्तीचा सूरही नाही. आणि कोणतीही गोष्ट वृद्धांवर लादायचा विचार कुणी करत आहे, असा दूरान्वयानेही आरोप नाही.
घरातल्या वृद्ध लोकांची काळजी घेणे या गोष्टीला प्राधान्य देताना मुले (जी ६०-७० च्या घरात पोचलेले असतात) आणि नातवंडे (ज्यांचे आयुष्य/ करीअर सुरू होत असते) यांनी संपूर्णपणे आपल्या सगळ्याच इच्छा, आशा, आकांक्षा यांना मुरडच घालावी हे तुम्ही सुचवताय, असे नीधपना वाटले. पण मी असे काही सुचवत असल्याचा त्यांचा समज मी नम्रपणे नाकारतो. कारण, ज्यांना शक्य आहे, त्यांनी असे करावे, असे माझे मत असल्याचे मी नमूद केले आहे. 'सगळ्यांनीच, असेच करावे किंवा वागावे, अन्यथा...' असा कोणताही सूर मी कुठे लावल्याचे मला आढळलेले नाही.
मी मराठी वृत्तपत्रसृष्टीत काम करणारा पत्रकार आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या जीवनशैलीचा प्रामाणिक वेध घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे, कळत, नकळ्त, शहरी आणि ग्रामीण कुटुंबव्यस्थेची कधीकधी तुलना होते, आणि शहरी जीवनशैली माणसामाणसात अंतर/ दरी निर्माण करते आहे, असे मला वाटते. (हेही माझे मत आहे. मी हे कुणावर लादत नाहीये. याबद्दल दुमत असू शकते, आणि दुसर्‍या मताचाही मला आदरच असेल.)
या लेखनामुळे खूप साधकबाधक चर्चा झाली. या विषयावर जाणकारांची आणि आस्था असलेल्यांची मते जाणून घ्यावीत हाच माझा हेतू होता. त्यामुळे, जवळपास प्रत्येक प्रतिक्रिया मी अजूनही अभ्यासतोय. यातील एकही मत झिडकारून नाकारावे आणि आपलेच मत खरे असावे असा विचार माझ्या मनातदेखील नाही.
यात व्यक्त झालेल्या मतांवरून मी माझ्यापुरता एक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे, यातील बहुसंख्य प्रतिक्रिया महिलांच्या आहेत. हा प्रश्न केवळ महिलांशी नाही, तर कुटुंबाशी म्हणजे, पुरुषांशीदेखील निगडीत आहे, तरी (बहुधा) पुरुषांनी या चर्चेत फारसे ठोस मतप्रदर्शन केलेले नाही. दुसरे म्हणजे, ह्या प्रश्नाचे गांभीर्य सर्वांनाच माहीत असल्यामुळे, आपल्या म्हातारपणी काय केले जावे, यावर एकमताचा सूर दिसला. आपल्यावर अशी वेळ (उपेक्षेची?) येऊ नये, यासाठी अनेकजण सजग असावेत. आपल्या आधीच्या पिढीच्या समस्यांवरून आपल्य भविष्यासाठीचा बोध घेण्याचे गांभीर्य आपण सगळेच दाखवतो आहोत.
एखाद्या समस्येचा आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर भार पडत असेल, तर तो नाकारण्यात गैर नाही, असा अस्पष्ट सूरही मला जाणवला. काही मते परखड आहेत.
एखाद्या घरात तीन्-चार पिढ्या असतील तर ज्याला जन्माला घातले त्याचा विचार करायचा की ज्यांनी जन्माला घातले त्याचा विचार करायचा हा नीधप यांना पडलेला प्रश्न मला कोड्यासारखा वाटतो. इथे माणसाची अवस्था द्विधा व्हायला हवी. पण कदाचित आपण हा प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि, अर्थातच, ज्याला जन्माला घातले त्याचाच विचार करावा, असे उत्तर सहज देऊन टाकतो. पण, ज्या घरात अगोदरच्या तीन्चार पिढ्या असतील, त्यांना हा विचार का सुचला नाही, त्यांनी त्या वेळी हे उत्तर का शोधले नाही, हे प्रश्न मला पडले.
ह्याला उत्तर नाही.
वृद्धाश्रमात ठेवले गेलेले सगळेच फसविले गेलेले असतात, किवा त्या सगळ्यांची मुले नालायक असतात, असे मी कुठेही म्हटलेले नाही. आपण अनेकदा वृद्धाश्रमांबदल कुटुंबापुरत्या चौकटीतून विचार करत असू, किंवा वाचनातून, ऐकण्याबोलण्यातून मिळालेल्या माहितीतून काही मते तयार करत असू, तर ते अपुरे होईल, असे मला वाटते. ह्या प्रश्नाबद्दल आस्था असणार्‍यांनी शक्य असल्यास कधीतरी एखाद्-दुसरा वृद्धाश्रमात भेटी द्याव्यात. कदाचित, आपली मते अगदी बरोब्बर असल्याचे आपले ठाम मत असले, तरी या भेटीतून आपल्याला एखाद्या वास्तवाचा आणि मतांना धक्का देणारा अनुभवही येऊ शकेल.
या चर्चेत व्यक्त झालेल्या मतांचा मी पूर्ण आदर करतो, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो!

ठिके कदाचित माझा गैरसमज झाला असावा. पण तुमच्या काही पोस्टस ना अनुमोदन देणार्‍यांच्या पोस्टस वाचून हा गैरसमज होणे सहज शक्य आहे.
तुमच्या आधीच्या लेखांवरून तुमच्याकडून अतिशय बॅलन्स्ड आणि परखड लिखाणाची अपेक्षा आहे. त्यामुळे काही प्रमाणात एकांगी वाटलेल्या लेखावर थोडी जास्त जोरात प्रतिक्रिया दिली गेली असण्याचे नाकारता येत नाही.
तरीही क्षमस्व.

>>एखाद्या घरात तीन्-चार पिढ्या असतील तर ज्याला जन्माला घातले त्याचा विचार करायचा की ज्यांनी जन्माला घातले त्याचा विचार करायचा हा नीधप यांना पडलेला प्रश्न मला कोड्यासारखा वाटतो. इथे माणसाची अवस्था द्विधा व्हायला हवी.<<
आहेच झालेली. मी पण केवळ प्रश्नच उपस्थित केलेत. ठोस उत्तर प्रत्येक कुटुंबाप्रमाणे बदलणारे. तसंच जन्मदाते आईवडील की सासू-सासरे हा पण प्रश्न अनेक ठिकाणी असतो मुलींसाठी.

>>अर्थातच, ज्याला जन्माला घातले त्याचाच विचार करावा, असे उत्तर सहज देऊन टाकतो. पण, ज्या घरात अगोदरच्या तीन्चार पिढ्या असतील, त्यांना हा विचार का सुचला नाही, त्यांनी त्या वेळी हे उत्तर का शोधले नाही, हे प्रश्न मला पडले.<<
आपल्या हौसेसाठी आपण जीव जन्माला घातलेला असतो तेव्हा आपल्या हौसेखातर घेतलेली जबाबदारी पहिली येणं साहजिक नाही का? अगोदरच्या तीनचार पिढ्यांच्यात सुचला नाही याची कारणे माझ्यामते पुढीलप्रमाणे.
१. एकत्र कुटुंबपद्धती - ज्यात कुटुंबप्रमुख पुरूष सोडला तर बाकी कुणाला व्यक्ती म्हणून स्थान नसते. एका मोठ्या यंत्राचा सगळे भाग असत आणि आपला आपला कार्यभाग पार पाडत. घरात माणसे भरपूर असल्याने कामे विभागली जात. वृद्धांची काळजी घेणार्‍या व्यक्तीवरच रोजचा स्वैपाक, मुलांना सांभाळणे, साफसफाई, अर्थार्जन, बाहेरून वस्तू आणणे या जबाबदार्‍या नसत.
२. मुलाबाळांची संख्या भरपूर - जबाबदार्‍या विभागल्या जात. शक्यतो प्रत्येकीला सख्खा किंवा चुलत भाऊ असल्याने आपल्या आईवडिलांकडे कोण बघणार ह्याची काळजी कमी असे.
३. घरातल्या बायकांचा कार्यभाग घरापुरताच मर्यादित - यामुळे घरात कायम कोणी ना कोणीतरी काळजी घेणारे असे.
४. वैद्यकीय मर्यादा आणि आयुर्मर्यादा - कुठल्याही आजारांवर एका मर्यादेपलिकडे उपचार नव्हते. त्यामुळे ठराविक काही आजारानंतर मृत्यू अटळ आहे हे स्वीकारले जायचे. एका ठराविक वयानंतर मरण यायचेच हे ही स्वीकारलेले होते. संशोधनांमुळे अर्थातच असे अनेक अटळ मृत्यू टाळता येऊ लागले. त्यामुळे अर्थातच आयुर्मर्यादा वाढली.

या चारही मुद्द्यांमधले बदल हे पूर्णपणे दुर्दैवी आणि चुकीचे असं म्हणायची माझी तरी हिंमत नाही कारण या बदलांमधले फायदेही तेवढेच महत्वाचे आहेत असं मला वाटतं.

भेट देऊन जाणून घ्यायला आवडेलच.

ठाम मतं म्हणायची तर...
१. आपणहून आणि आनंदाने वृद्धाश्रमात असणार्‍यांची उदाहरणे माहिती आहेत.
२. माझ्या वडिलांना आणि सासूसासर्‍यांना मी कधीच वृद्धाश्रमाचा पर्याय देणार नाही पण स्वतःच्या वृद्धापकाळी नक्कीच आनंदाने आणि आपणहून मुलांना स्पेस देणे आणि आपली स्पेस ठेवणे हे करायचे ठरवले आहे.
३. यासंदर्भात कुठलीच समीकरणे योग्य नाहीत. प्रत्येक कुटुंबानुसार उत्तर वेगळं आहे हे मला मान्य आहे आणि त्यांचा आदरही आहे.

>>मुलाचं किमान शिक्षण झाल्यावर त्याने आपल्या हिमतीवर पुढे काय ते करावं, ही पद्धत इथं रुळलेली नाही. नंतरच्या परदेशी शिक्षणासाठीही आई-वडील कर्ज काढतात, ही इथली सर्वसाधारण प्रथा आहे.

भाऊराव,

माझ्या अनुभवातून (गेल्या १० वर्षात फिरलेले पाचेक देश) असे जाणवले आहे की पाश्चिमात्य (आणि जपान, चीन सारख्या पौर्वात्य) जगातही हीच परिस्थिती आहे. अमेरिकेत, युरोपात घर घेताना आधी बरेच पैसे रोख भरावे लागतात; सगळे गृहकर्ज मिळत नाही. ही रक्कम तशी बरीच मोठी असते. आई वडिल प्रसंगी आपले घर गहाण टाकून हे पैसे मुलांसाठी उभे करतात हे पाहिले आहे. एक वयस्कर सहकारी एकदा दमून, उद्वेगाने म्हणाली होती "केव्हा स्वतंत्र होणार ही मुलं?" तिला ३ मुले, तिघांच्या उच्च शिक्षणाची कर्जे, मोठ्या मुलाच्या घरासाठीचे कर्ज. आणि चक्क मुलीच्या लग्नासाठी काही बचत वगैरे माहिती सांगितली तिने. मी घरी पैसे पाठवतो हे ऐकून भारतीय संस्कृती 'अमेझिंग' आहे आणि मी किती समजुतदार आहे असे कौतुक लाभले.

हे लोक मुलांनी आपल्याला संभाळावे अशी अपेक्षा बाळगत नाहीत. पण जमेचा मुद्दा एव्हढाच की त्यांची सरकारे त्यांची काळजी घेतात वेळप्रसंगी.

बाकी आपले आईबाबा आपल्याजवळ आणि आपण वृद्धाश्रमात या मताशी संपूर्ण सहमत.

झुलेलाल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी ह्या अगोदर तीन-चार वृध्दाश्रमांना भेटी दिल्या आहेत. तेथील वृध्दांबरोबर काही वेळ घालवला आहे. ह्यात अनुक्रमे पुण्यातील निवारा वृध्दाश्रम, मातोश्री वृध्दाश्रम, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने चालविलेला वृध्दाश्रम व कँपमधील कॅथलिक ख्रिश्चन कम्यूनिटीचे ओल्ड एज होम ह्यांचा समावेश आहे. मुंबईतीलही काही वृध्दाश्रमांना मी भेट दिली आहे. काही विशिष्ट समाज (उदा. गुजराती, सिंधी इ.) यांनी त्यांच्या समाजासाठी चालविलेल्या वृध्दाश्रमांनाही भेट दिली आहे.

प्रामुख्याने, ठळकपणे जाणवलेल्या गोष्टी :

१. वृध्दाश्रमांमध्ये आजही अनेक वृध्द नाईलाजाने राहताना दिसतात. राजीखुशीने आलेले, तेथील वातावरणाशी एकरूप झालेले वृध्द मी तरी खूप कमी पाहिले. माझ्याकडे त्यातील काही वृध्दांचे फोटोही आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरची उदासीनता, मरगळ, उपेक्षा, निरुत्साह ठळकपणे जाणवतो. कदाचित तेव्हा तेव्हा तशी परिस्थिती असावी. (अपवाद : कर्वे स्त्री संस्थेचा वृध्दाश्रम : इथेही अनेक वृध्द महिला नाईलाजाने राहायला आलेल्या होत्या. पण काहीजणींनी ताठ मानेने सांगितले की आम्ही आमच्या मर्जीने, आमच्या मुलाबाळांवर आमचा भार नको म्हणून येथे राहात आहोत. त्या महिला मला तुलनेने तकतकीत, अलर्ट वाटल्या.)

२. त्यांना तिथे शारीरिक स्तरावरची सर्व काळजी, सोयी, सुविधा मिळत असल्या तरी एकटेपणा, उपेक्षेची भावना, थकलेपणा, व्याधी, भावनिक व मानसिक आधार - अशा ओलाव्याचा व रक्ताच्या माणसांचा आधार नसणे ह्यामुळे वातावरण मरगळलेले असते. मलाही खरं तर आनंदी वातावरण असलेला वृध्दाश्रम बघायला आवडेल. पण अद्याप असा वृध्दाश्रम माझ्या पाहाण्यात आलेला नाही. कोणाच्या बघण्यात असेल तर तसे कृपया सांगावे.

ह्या वातावरणाचा परिणाम साहजिकच तेथील रहिवाशांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. काही ठिकाणी अनेकदा सोबतच्या रहिवाशांबरोबर त्यांचे पटत नाही, कर्मचार्‍यांबरोबर खटके उडतात किंवा जनरल नाराजी, असंतुष्टता असते. होस्टेलमध्ये नाही का, सर्वच लोकांशी आपले पटेलच असे नाही.... इथे तर म्हातारपणी, आपल्या सवयी - वृत्ती रुळलेल्या असताना अनेअक वृध्दांना हे स्थित्यंतर मानसिक व शारीरिक दृष्ट्या कष्टदायी पडते ही वस्तुस्थिती आहे.

३. अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी गट/ व्यक्ती येथे भेट देऊन आपल्या परीने मदत करतात. त्याचा फायदा होत असेलच. पण तरीही येथील लोकांचे चेहरे मग दुर्मुखलेले का? निवारा सारख्या वृध्दाश्रमात तर हलके बागकाम, हलके प्रशासकीय काम इत्यादीतही काही वृध्द मदत करताना दिसले. पण मग चेहरे असे उदास का?

ह्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन असे आहे की त्या वृध्दांचे मन रमेल अशा गोष्टी त्यांच्या भोवताली आवश्यक. त्यांना आपले कोणीतरी ऐकणारे आहे, आपल्याला मानसिक आधार - भावनिक आधार आहे हे वाटणे गरजेचे आहे. घराची ऊब वृध्दाश्रमांना येणे शक्य नाही. घरातील माणसे, गंध, सुरक्षा, परिचित वातावरण, वस्तू, शेजारी, जवळपासच्या ओळखीच्या खुणा यांपासून हे वृध्द लांब फेकले जातात. कारण वृध्दाश्रमासारख्या सार्वजनिक (शेअर्ड) ठिकाणी ह्या सर्वच गोष्टी अवलंबात आणणे शक्य नसते. पण त्यांच्याशी ह्या वृध्दांचे मानसिक व भावनिक नाते जुळलेले असते. आपल्यालाही अपरिचित ठिकाणी रुळायला बराच काळ लागतो. इथे तर आयुष्यभराच्या सवयी मोडायच्या असतात. वृध्दांना गरज पडल्यास मानसिक व भावनिक आधार देण्याची सक्षम सोय देणारे वृध्दाश्रम हवेत. अर्थात घरातील माणसांच्या आधाराची सर त्यांना नाही हेही खरेच!

ज्यांना पुढे भारतातील वृध्दाश्रमात राहावयाचे असेल त्यांना मी सांगू इच्छिते, की अचानक उठून तिथे जाण्यापेक्षा दोन-तीन वर्षे हळूहळू छोट्या छोट्या भेटी देऊन, थोडा काळ तिथे वास्तव्य करून त्या ठिकाणाची स्वतःला सवय करवून घ्यावी. तेथील लोकांची, परिसराची, वातावरणाची सवय करावी. मगच तिथे जावे. तसेच इतर कम्युनिटीशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे तिथे इतरांशी तीव्र मतभेद निर्माण होणे, नापसंती, अंतर्गत राजकारण, कंपूबाजी असू शकते. ह्यांचीही तयारी असू द्यावी. तसेच तशा व्यक्तींना तुम्ही शेअर्ड लिव्हिंगमुळे टाळूही शकत नाही हे लक्षात असू द्यावे.

तसेच आपल्या घरातील कोणी अशा प्रकारे वृध्दाश्रमात जाऊ इच्छित असेल तर त्यांनाही हेच लागू होते. शिवाय आपल्याला आर्थिक दृष्ट्या शक्य असेल व त्या वृध्दांची तशी तयारी असेल तर त्यांना मनोरंजनाची, संपर्काची सर्व साधने उपलब्ध करून द्यावीत. पण त्याचबरोबर येणारे संभाव्य धोकेही लक्षात असू द्यावेत. आणि आपल्या नात्यातील/ घरातील/ परिचयातील अशा आश्रमांमध्ये राहाणार्‍या वृध्दांना नियमितपणे भेटावे, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा. तुमच्या परिचयात असे कोणी नसले तरी तिथे जावे. त्यांच्यापैकी काहींना नीट दिसत नसते, त्यांना बातम्या - पुस्तके वाचून दाखवावीत.... त्यांच्याशी बोलावे... त्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात...त्यांना हसवावे!:-)

Pages