पुण्य, की प्रायश्चित्त?...

Submitted by झुलेलाल on 2 October, 2010 - 12:06

'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला.
... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता.
’बघितलंत?...’ पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं.
मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं.
... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं.
’तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण’...
बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला...
’अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...’ तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं.
मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो.
’... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?’... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं.
’ नक्कीच चांगलं’... मी लगेच उत्तरलो.
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
’नाही... अजिब्बात नाही.’ तो ठामपणे म्हणाला.
... ’अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...’
पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता.
’तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...’ पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला.
त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.
तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो.
’काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...’ मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला.
... ’अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...’ तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती.
मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो.
’सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?’ पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं.
मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती.
’साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...’
’मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...’ तो संथपणे बोलत होता.
आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं.
’राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला’...
... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं.
मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं.
एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं.
’... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..’ तो कळवळला.
’बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ’
... समोरचा चहा थंड झाला होता.
’मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...’ तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला.
मी भुवया वर करून खुणेनंच त्याला ’काय’ म्हणून विचारलं.
’तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...’
..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं.
’हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर’... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला.
चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो...
हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकड्डली होती.
...’ आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ’ बोलताबोलता तो थांबला.
... ’मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? 'तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...'
- तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले!

http://zulelal.blogspot.com
-----------------------------------------------------

गुलमोहर: 

झुलेलाल, फार बिकट होणार आहे सगळं Sad

पण निदान त्या वृद्धाश्रमातील कर्मचार्‍याला अशी तरी जाणीव झाली की कदाचित आपण कुठल्या जन्मी असं जन्मदात्यांना टाकलं असेल म्हणून त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपल्याला हे काम करायला मिळतंय. त्याने ते काम त्रासाचं म्हणून टाळलं नाही. १०० वृद्धांच्यात सतत राहून त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणींना सोडवायला मदत करणं हे सोपं काम नाही.

आपण जे कर्म करु ते आपल्याला कधी ना कधी या ना त्याप्रकारे फेडावंच लागणार आहे ही जाणीव जिवंत राहिली तर आज तरुणाईची रग, वार्धक्याने दुबळ्या झालेल्या शरिरांना असं कुठेतरी आपल्यापासून दूर नेऊन टाकणार नाही. माझा भगवंतावर जगातील कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त विश्वास असल्याने मी नेहमी स्वतःला बजावते की जसं त्या भगवंताने माझ्याशी वागावं असं मला वाटत असेल तसं मी दुसर्‍याशी वागलं पाहिजे. आज माणसाचा जन्म मिळालाय तर जितकं फेडता येईल तितकं फेडून टाकलं पाहिजे की पुढच्या प्रवासाला निघताना ओझं बाळगत जायला नको.

नवदी मधली बाई नोकरी करत होती हे जरा खटकले आहे !! बाकी ठीक !! म्हणजे १०० वर्षांपूर्वी भारत स्वतंत्र नव्हता !! तेव्हा नोकरी ?? आणि निवृत्ती पण ?? काहीतरी चुकतंय
कथा उत्तम
आमचे गुरुजी ( ब्राह्मण ) म्हणतात कधी वृद्धाश्रमाला दान देऊ नका !! त्या संस्था आपण पोसतो आणि नालायक मुलांना सांगतो आणून सोडा तुमच्या पालकांना

अहो, ती बाई आता नव्वदीत आहे. मुलं लहान असताना त्यांचे वडील वारल्यावर नोकरी करून तिनं मुलांना वाढवलं, म्हणजे तेव्हा ती नव्वदीतली नसणार.. नाही का?
... आणि पारतंत्र्यात कुणी नोकर्‍या करत नव्हते?

छानच मांडलंय.
आपल्याकडील संयुक्त कुटूंब व्यवस्था मोडीत काढली गेली, त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटील होत चालला असावा ! कांही मुलांची खरोखरच ईच्छा असूनही त्याना म्हातार्‍या आई-वडिलाना संभाळणं कठीण होत चाललंय व हे आई-वडिलानाही समजून आल्याने सर्वांचीच घुसमट होते आहे. आर्थिक आधार महत्वाचा असतोच पण बर्‍याच ठीकाणी, विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये, भावनिक आधाराच्या अभावाने ज्येष्ठ नागरिकांचं निवृत्तिचं आयुष्य शुष्क व अर्थहीन होतंय, हे धगधगतं वास्तव आहे ! वृद्धाश्रम ही एक तडजोड असली तरी प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही. झुलेलालजी, कथेच्या स्वरुपात हा प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद.

रुपाली, त्या नोकरी करणार्‍या बाई (अक्कलकोटला निघालेल्या) शंभरीच्या घरातल्या नसाव्यात. तो शंभरी गाठलेल्या वृद्धांच्या सत्काराच्या फोटोवरुन वृद्धाश्रमाचा विषय निघाला आणि लेखकाला भेटलेला माणूस अशाच एका वृद्धाश्रमात जाऊन आला होता तेथिल अनुभव त्याने सांगितला आहे.

त्या माणसाने निदान आईला वृद्धाश्रमात तरी नेऊन ठेवलं. पोटच्या पोरांनी आई वडिलांना फसवून कुंभाला नेऊन आणतो सांगून कुंभमेळ्यात सोडून आल्याच्या गोष्टीही मी ऐकल्या आहेत. कुंभमेळ्यात सोडलेले आई वडिल तर भिकेलाच लागत असतील :-(. वर घरी जाऊन आई हरवली असं सांगत गळे काढतात.

झुलेलाल तुम्ही खूपच सुंदर लिहिता. नेहमी वेगळ्या पण ज्वलंत विषयावर. असेच विचार करायला लावणारे लिहित जा.

सुंदर लिहिलंय...

कधी वृद्धाश्रमाला दान देऊ नका !! त्या संस्था आपण पोसतो आणि नालायक मुलांना सांगतो आणून सोडा तुमच्या पालकांना

हे योग्य नाही. दान्\देणग्या दिल्या पाहिजेत. ज्या नालायक मुलांना आईबाबांना सोडायचे असते ते कुठेतरी सोडणारच. कुंभमेळ्यात सोडुन त्यांचे अखेरचे दिवस भिक मागण्यात घालवण्यापेक्षा अशा वृद्धाश्रमात सोडलेले बरे. निदान शेवटच्या दिवसात शारिरीक हाल तरी होणार नाहीत. आणि आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवणारे सगळेच काही नालायक नसतात. परगावी/परदेशी राहणा-या मुलांच्या पालकांवर दिवसभर कोणीतरी पाहावे अशी वेळ आली तर त्यांनी कुठे जावे? ब-याच वेळा पैसे देऊनही माणुस मिळत नाही घरी राहुन करायला. नोकरी सोडुन आईबाबांना सांभाळत बसणे सगळ्यांनाच जमेल असे नाही.

मला स्वतःला तरी वाटते की वृद्धाश्रमांची संख्या वाढायला पाहिजे. माझ्या जवळच्या नात्यातल्या एक वृद्ध बाई आहेत ज्यांना आईची काळजी करणारी मुलेही आहेत. पण एका सुनेशी पटत नाही, दुसरीला नोकरीशिवाय पर्याय नाही. आईजवळ राहात असलेला मुलगा-सुन सकाळी लवकर निघुन रात्री उशीरा घरी परत येतात. त्यामुळे घरात आई दिवसभर एकटीच. त्यात प्रकृती नाजुक. आपल्याला दिवसाचे काय झाले तर मुले येईपर्यंत कोणाला कळणारही नाही ही त्यांना काळजी. घरी दिवसभर राहणारी बाई शोधताहेत, पण अजुन तरी सापडली नाही.... Sad अशा वेळी मला तरी वाटते वृद्धाश्रम हा चांगला पर्याय आहे. निदान तिथे दिवसभर काळजी घेणारे कोणीतरी असेल... पण वृद्धाश्रमाचे नाव काढले की आपण नकोसे झालोत म्हणुन टाकुन देताहेत ही भावना येते मनात ब-याचजणांच्या.

मला एकच मुलगी आहे. माझ्या म्हातारपणी मला प्रकृतीअस्वास्थ आले आणि दिवसभर कोणी सोबत राहावे लागणार अशी वेळ आली तर मी मुलीवर भार टाकण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे योग्य समजेन.

भावनिक ओलाव्याचा अभाव = घरातील वृद्ध व्यक्तीची मुले-सुना यांचा दोष असं सरळसरळ समीकरण मांडण्याइतका हा विषय काळापांढरा आहे का?
वृद्ध व्यक्तीची देखभाल करण्यासाठी घरात धडधाकट व्यक्ती नसण्यापासून, जागांचे प्रश्न, वृद्धांचे आजार, बिकट शारीरिक परिस्थिती, पूर्वी दाखवलेला कडवटपणा... असे अनेक पैलू आहेत या मुद्द्याचे.
वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी भयाण, टाकून देण्याची जागा इत्यादी लेबलं थोडीशी सोडता नाही का येणार?

आपल्या भारतीय संस्कृतीत वानप्रस्थाश्रम पण आहे. तो का विसरला जातो?

वरची उदाहरणे वाईट आहेतच पण सरसकट असंच होतं असं म्हणता येईल का?
मी माझ्या वडिलांना, सासू-सासर्‍यांना कधीच या पर्यायाकडे नेणार नाही पण भविष्यात मी आणि माझा नवरा मात्र नक्की या पर्यायाचा विचार करून व्यवस्था करून ठेवू. मूल असलं तरी. यामधे भावनेचा ओलावा नसणं किंवा तत्सम काळीपांढरी कारूण्ये नसून अतिशय प्रॅक्टिकल विचार आहे.

असो तपशीलात नंतर कधीतरी.....

साधना, १००% अनुमोदन.

झुलेलाल, त्या माणसाला ते पुण्याचं काम वाटण्यापेक्षा पाप फेडणारं काम वाटलं यामधे मला तरी न आवडणारं काम पोटासाठी करावं लागण्यातली अगतिकता दिसली. जी कुठेही असू शकते. उदा. वॉर्डबॉइज पासून हमालापर्यंत. त्याचा वृद्धाश्रमांशीच आणि वृद्धांच्या समस्येशीच संबंध जोडणं हे मला तरी पटलं नाही.

छान लिहीले आहे.

पण नीधपचाही मुद्दा बरोबर आहे. मी ही काही उदाहरणे जवळून पाहिली आहेत. बर्‍याच वेळा ती पुढची पिढी वाईट असते म्हणून असे होते असे नाही. तशीही उदाहरणे असतात पण साधनाने दिलेल्या उदाहरणासारखीही असतात. आता त्यांनी आई वडिलांना घरातच ठेवून यातून मार्ग काढावा वगैरे वाटणे बरोबर आहे पण त्यांचे ही काही प्रॉब्लेम असतील.

येथे थोडा रिलेव्हंट आहे हा मुद्दा म्हणून लिहीतोय - "बागबान" सारखे पिक्चर्स असले प्रश्न अत्यंत मठ्ठपणे दाखवतात. पूर्वीच्या जुन्या चित्रपटांमधे ("उनपाऊस"?) तसे दाखवणे ठीक आहे. पण ३०-४० वर्षांनंतर एकत्र कुटुंब वगैरे मधे एवढे बदल झाल्यावर सुद्धा त्याच ठोकळेबाजपणे हे प्रश्न दाखवलेला आहे बागबान मधे. मुले, सुना एकदम टोकाची व्हिलन्स, एक मानलेला मुलगा, त्याची बायको एकदम दुसरे टोक. मुंबईसारख्या शहरात छोटी जागा, दोघांच्या नोकर्‍या वगैरे मधून निर्माण होणार्‍या अडचणी, त्यामुळे मुळात नेहमीसारखी असणारी मुलेसुद्धा दुसरा पर्याय नसल्याने असे करतात आणि त्यामुळे म्हातार्‍या आईवडिलांची परवड होते वगैरे दाखवले असते तर बरोबर होते. पण असले पिक्चर्स उगाच लोकांना रडवायला काढतात आणि असले स्टीरीओटाईप्स आणखी प्रचलित होतात.

साधना म्हणतेय तसं कुणी बघायला नसेल तर वृद्धाश्रमाचा पर्याय चांगलाच आहे. पण सगळं काही शक्य असून केवळ म्हातारी अडगळ घरात नको म्हणून माळ्यावर टाकावं तसं भांडून वृद्धाश्रमात टाकणं किंवा फसवून वृद्धाश्रमात टाकणं हे निश्चितच चिंताजनक आहे.

बर्‍याचशा वृद्धाश्रमांत, जिथे नर्सिंगची व्यवस्था नसेल तिथे आजारी पडल्यावर नातेवाईकांनाच बोलावले जाते. अशा ठिकाणी ना वृद्धाश्रम जबाबदारी घेतो ना मुलं येऊन आजारपणात शुश्रुषा करतात, असं झालं तर काय करावं त्या लोकांनी?

वृद्धांनी देखिल आपल्या घरातील परिस्थिती ओळखून, वयापरत्वे आलेल्या हेकट, विक्षिप्तपणाचा मुलांना प्रमाणापलिकडे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मी इथे प्रमाणापलिकडे मुद्दाम म्हटलंय, कारण थोडाफार त्रास सहन करायला काहीच हरकत नाही. आपणही लहानपणी त्यांना विविधप्रकारे त्रास दिलेला असतो आणि वृद्धापकाळ हे दुसरं बालपणच असतं. जसं आपल्याला लहानाचं मोठं करणं हे आईवडिलांचं कर्तव्य होतं तसं त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.

नीधप आणि साधनाशी सहमत. आम्ही दोघांनीही म्हातारपणी अश्या म्हातार्‍या लोकांच्या संस्थेत रहायचे असे आत्ताच ठरवून ठेवले आहे. आई वडिलांची पिढी याबाबतीत जरा संवेदनशील असल्याने त्यांची काळजी आपण घेऊ पण आपण आपल्या मुलांबरोबर रहायचे नाही असे.

वृद्धाश्रमांची संख्या वाढली पाहिजे हे खरेच. पण मुख्य म्हणजे वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी टोकाचे वाईट हा समज नष्ट व्हायला हवा. आई वडिलांनी, आजी आजोबांनी अपत्याचे संगोपन करणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक रित्या मनुष्यांच्या जेष्ठांची जबाबदारी केवळ त्यांच्या मुलांची नसून संपूर्ण समूहाची / समाजाची आहे.

मृदुला, नीधप आणि फारेण्ड शी सहमत.
ह्या प्रश्नाचे अनेक कंगोरे आहेत. त्याला सदैव काळ्या-पांढर्या स्टिरिओटाइपमध्ये बंदिस्त करून जे चित्रपट, कथा, मालिका काढतात, त्यांनी समाजाचे नुकसानच होते. अगदी गरज असूनही लोक हा पर्याय निवडायला धजावत नाहीत, ते ह्यामुळेच.
शिवाय आजकाल जसे अगदी १-१.५ वर्षाच्या मुलांना डे-केअर मध्ये ठेवणे आवश्यक झाले आहे तसेच व्रुद्ध लोकांना ( विशेषतः आजारी, एकट्या) ही चांगल्या सोयी असलेल्या डे-केअर मध्ये ठेवणे हा मला उत्तम पर्याय वाटतो. रात्री घरी.
माझी आजी दिवसा घरी एकटी असते, तिला अजिबात ऐकू येत नाही. पण असे (डे-केअर) पर्याय उपलब्ध नसल्याने घरच्यांना तिची सतत काळजी लागून राहिली असते.
अनेक गोष्टी लिहायच्या आहेत. वेळ मिळेल तसे लिहीन..

माझे पण साधनासारखेच. वृद्धाश्रमात राहणारे सगळेच काही घरात अडचण झालेले नसतात. त्यांच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला घरात कुणाला वेळ नसतो. त्यांचे कामधंदे असतात. हा पर्याय वृद्धानी स्वेच्छेने स्वीकारणे गरजेचे आहे. माझे तर असे मत आहे, कि तरुणपणीच आपल्या म्हातारपणाच्या वास्तव्याची तरतूद करुन ठेवावी.

साधना,दिनेश दा १००% अनुमोदन..
आम्ही सर्व मित्र मैत्रीणींनी आत्तापासूनच एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात बुकिन्ग करून ठेवायचं ठरवलंय
आमच्या माहितीतल्या एका वृद्धेला ,नवरा गेल्यावर पॅरेलिसिस चा अटॅक आला/ तिची दोन मुले परदेशात स्थायिक असल्याने तिची जबाबदारी ,भारतात राहणार्‍या ,नोकरी करणार्‍या मुलीवर येऊन पडली. नोकरांच्या त्रासामुळे बरेचदा त्या वृद्धेला घरी एकटेच राहावे लागे. मुलगी जेंव्हा केंव्हा घरी येईल तेंव्हा तिला औषध,खाणे मिळे इतकच नाहीतर ततिला अस्वच्छ पँपरमधे दिवसभर पडून राहावे लागे.. अश्या वेळी हॉस्पिटल्स मधून पेशंट्सना पूर्णवेळ ठेवायची सोय आहे का भारतात??

काही ठिकाणी आहे. दिल्लीमधे रोशेन अल्काझी अश्या नर्सिंग होम मधे होत्या शेवटी काही दिवस. तिथेही त्या त्यांच्या रिसर्चबद्दल (प्राचीन भारतीय वस्त्रप्रावरणांच्याबद्दलचं त्यांचं पुस्तक हे या विषयात अक्षरश: बायबलसारखं वापरलं जातं.) आणि अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल बोलत असायच्या. अंथरूणात पडून भरपूर नवीन फिल्म्स बघणे, नवीन काही ऐकणे, रिसर्च असं चालू असायचं. कोणी स्पेशल महत्वाचं भेटायला येणार असेल तर त्यांची हेअर ड्रेसर येऊन त्यांचे केस सेट करून देणे इत्यादी पण करायची. त्यांची एक पर्सनल असिस्टंट पण होती जी हे सगळं प्लॅन करायची. त्यांची रिसर्च असिस्टंट रेग्युलर येऊन नोटस आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करायची. त्यांचं संशोधन, काम त्या नर्सिंग होम मधून बघायच्या पडल्या पडल्या. नर्सिंग होम मधे असण्याबद्दल त्यांना खंत बिंत अजिबात वाटत नव्हती.
अर्थात हे सगळं खर्चिक होतं खूप आणि अल्काझी फॅमिलीसाठी शक्य होतं.

वेल हे शक्य होईल एवढातरी पैसा कमवायचा असं मी ठरवलं तेव्हाच. Happy
मध्यमवर्गीय वृद्धाश्रमात राहणार्‍या प्रत्येकाला खंत वाटत असेलही सध्या पण पुढच्या पिढीतल्या वृद्धाश्रमात स्वेच्छेने जाऊ पाहणार्‍या प्रत्येकाला सुद्धा वाटलीच पाहिजे असं काही नाही.

छान कथा.
पण नीधप ला अनुमोदन,
एक फूल फार चांगला मुद्दा आहे. डे केअर फॉर एल्डरली अ‍ॅन्ड सिक. वृद्धाश्रमापेक्षा वेगळा म्हणजे घरात दिवसभर कोणी नसताना म्हातार्‍या / आजारी आज्जी आजोबांना, सांभाळायला असलेल्या संस्था फार उपयोगी होतील ना?
अशा संस्थांची मदत मिळाली तर वृद्धाश्रमाची संख्या कमी होऊ शकते.

सध्याच्या वृद्धाश्रमापेक्षा परदेशात ज्याप्रमाणे old age communities असतात तशा प्रकारची सोय आपल्याइथे व्हायला पाहिजे. एकंदरीत परीस्थिती बघता काही वर्षात होईल असेही वाटतेय.
details माहित नाहीत पण मधे DSK नी खास सीनियर सिटीझन्स साठी पुण्यात अपार्ट्मेंट्स बांधल्याचे ऐकले होते.

वेल हे शक्य होईल एवढातरी पैसा कमवायचा असं मी ठरवलं तेव्हाच.

येस्स्स्स्स्स, मी केवळ याच उद्देशाने आजही नोकरी करतेय. नाहीतर कधीच नोकरी सोडुन स्वतःसाठी शेती करत बसले असते. अर्थात मी यासाठी टाईमफ्रेमही ठरवलीय. नाहीतर अजुन नोकरी सोडण्याची वेळ आली नाही असे म्हणत बसेन आणि मग यमराजच येऊन 'your time is up now' म्हणतील... Happy

नीधप खुप आभार अशा संवेदनशील विषयावर अत्यंत परखड पण दुसरी बाजु मांडल्याबद्दल.मी जिथे राहते तिथे अनेक व्रुध्द लोक by choice मुलांपासुन वेगळे राहतात.ते आर्थिकद्रुष्ट्या अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहेत.स्वतंत्र विचारांचे लोक आहेत.त्यांना मुलांबरोबर राहणे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखे वाटते.त्यांना एकटेपणाची भावना मुळीच नाही,त्यांची मुले त्यांचे परवानगी घेउन त्यांना भेटायला येतात कारण त्यांचे स्वत:चे व्यस्त वेळापत्रक आहे.व्यस्त वेळापत्रक याच अर्थ लगेच कुठेतरी बाहेरच गेले पाहिजे असा नाही, घरातच जेवणे, tv बघणे,हलका व्यायाम,पुस्तक वाचन्,रमी खेळणे,आराम करणे ,फोनवर गप्पा मारणे.त्यांची काही कामे ते त्यांच्या पगारी caretaker कडुन करुन घेतात.
नीधपला मिळालेल्या अनेक अनुमोदनानंतर मल एव्हडेच लक्षात येतेय की भारतीय समाज बदलतोय,rationally विचार करायला लागलाय,दुखा:चे कढ काढुन रडारड करण्यापेक्षा समस्यांवर constructive solutions शोधणे ही व्रुत्ती वाढीस लागतीये
needhapa once again thanks a lot for breaking the ice at right time.
नाहीतर उगीचच रडारड करणारे लोक इथे आले असते आणि ह्या अत्यंत एकतर्फी ,डोळ्यातुन पाणी काढु लेखाला कारण नसताना उचलुन धरले असते.

<<नाहीतर उगीचच रडारड करणारे लोक इथे आले असते आणि ह्या अत्यंत एकतर्फी ,डोळ्यातुन पाणी काढु लेखाला कारण नसताना उचलुन धरले असते.>> समस्या मांडलेल्या एका कथेच्या स्वरुपातल्या लेखाला असं लेबल लावणं हें <<भारतीय समाज बदलतोय,rationally विचार करायला लागलाय,>> याच्याशी विसंगत वाटतं. या लेखामुळेच तर इथ चांगलं विचारमंथन - तेंही rationally - होतंय ना !

पुण्यात बावधन आणि पाषाणला आहेत सिनियर सिटीझन्ससाठी परांजप्यांनी बांधलेल्या बिल्डिंग्ज. चांगल्या आहेत.

वृद्धाश्रमात जाऊन रहाण्याचा ज्यांचा स्वतःचा निर्णय आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. ज्यांच्याकडे दिवसभर नोकरीला जाणारी मुलं, सुना, जावई असतील त्यांना डे-केअरचा ऑप्शनही छान आहे.

वरच्या कथेतली जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे त्या वृद्ध बाईंची झालेली फसवणूक, अन् तीही तिचं स्वतःच घर पैसा असताना. मुला नातवंडांमध्ये रमणार्‍या वृद्धांना कधीही वृद्धाश्रमांचा ऑप्शन आवडणार नाही हे ही तितकंच खरं. आणि असं असेल तर जबरदस्तीने त्यांना तोडून दूर ठेवू नये.

एखाद्या विषयावरची दुसरी बाजू अत्यंत परखडपणे समोर येणं, हे रॅशनल विचारीपणाचं लक्षण भारतीय समाजात रुजतंय आणि त्यान आर्च यांन समाधान वाटलं, हे चांगलंच आहे. पण, अशा 'दुसर्‍या बाजू'चा उद्देश कधीही, 'पहिली बाजू' झाकून टाकणे हा असू नये, असं वाटत. या मुद्द्याला दुसरी बाजू आहेच, हे कोणासही अमान्य नाही. किंबहुना, दुसर्‍या बाजूचा जास्त परखडपणे विचार झाला पाहिजे, हेच खरे आहे. (आणखी काही वर्षांनी, दुसरी बाजू सहजपणे अधिक ठळक होईल, आणि अशा एकतर्फी, रडव्या विचारांना थारा राहाणर नाही, हे या 'कथे'वरील प्रतिक्रियांतून स्पष्ट झालेल्या विचारातूनही स्पष्ट झालंय) पण, आज, ही एक समस्याच आहे, आणि 'दुसर्‍या बाजू' पेक्षाही हीच बाजू आज तरी ठळक आहे, हे वास्तव आहे. मध्यंतरी, पार्ल्याच्या एका वृद्ध आईबापांची 'कहाणी' एका डॉक्टरने एका वर्तमानपत्रात लिहिली होती. (बहुधा लोकसत्ता.) परदेशात असलेली त्यांची मुले त्यांना भरपूर पैसे पाठवत असत. पण वार्धक्यामुळे आलेलं विकलांगपण आणि त्यामुळे दुबळं झालेलं मन यांना आधार द्यायला तो भरपूर पैसा उपयोगी ठरला नाही. हा 'शेजारी' अशा वेळी त्यांच्या त्या अवस्थेतील आधारासाठी पुढे आला. त्याच अवस्थेत (बहुधा) त्या वृद्धाचे निधन झाले. पण परदेशातल्या त्या 'व्यस्त' मुलांना लगेच यायला वेळ नव्हता, त्यामुळे ते कामही शेजार्‍यानेच केले, (संपूर्ण तपशील अगदी जसाच्या तसा आठवत नाही, पण हे वास्तव होते.) जे प्रत्यक्ष घडताना पाहातो, ते सांगणे, म्हणजेही डोळ्यातून पाणी आणायला लावणारे, एकतर्फी वाटणे, म्हणजे रॅशनल विचार करणे, हा विचार पचवायला काही काळ जावा लागेल. हळुहळू ते साध्य होइल. कारण, अजूनही वयोवृद्धांचा, ज्येष्ठांचा सन्मान करावा, हे विचर रुजवले जातायत.

खेडेगावात तर, भाकड, म्हातार्‍या गाईचीसुधा सेवा करतात. काराण, तिच्या दुधावर कधीकाळी आपली एखादी पिढी पोसली होती, याचा विसर पडू देत नाहीत.
असो. अशा लेखाला रडावे की हसावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. मुळात यामुळे एक साधकबाधक चर्चा होतेय, हे मात्र चांगले आहे.

अश्विनी.. एक वृद्धाश्रम पाहिलं होतं सुस्-पाषाण रोड वर ...अथश्री नावाचं.. तिकडे आमच्या जुन्या ओळखीच्या एक काकू त्यांच्या पन्नाशीच्या मतिमंद मुलाबरोबर स्वेच्छेने राहात आहेत..म्हनूनच मजेत आहेत.

Pages