कविता करणे - एक मानसोपचार - काव्योपचार पद्धतीची ओळख!

Submitted by सानी on 13 September, 2010 - 11:13

प्रेरणा: दिनेशदा

केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्‍या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.

त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.

माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.

शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....

मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...

एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्‍यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का... Happy

*****************************************************************************************************************

"In the desert of the heart Let the healing fountain start."
- W. H. Auden

कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.

थेरपीसाठी येणार्‍या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्‍या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्‍या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.

(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )

कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.

मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.

त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.

त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.

नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्‍या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अ‍ॅडलर, युंग, अ‍ॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.

काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्‍या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.

नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.

या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.

******************************************************************************************************************

पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या Happy

संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सानी,
तुम्ही लिहिलेली १५ वाक्य वाचली तरी त्यातुन एखाद्या शब्दाखेरिज नविन काहीच हातात सापडत नाही आहे. तुमच ९:०८ च पोस्ट मी वाचल. ते आणि त्या अगोदरच्या कित्येक पोस्टमधुन, "चर्चा करुया , अभिप्रेत आहे , तादात्मीकरण इत्यादी शब्दांखेरिज नविन काहीच नाही. "
मी तुमच्या कविता वाचल्या नाहीत. आणि मुळात कवितांमधल मला काही कळत नाही. एक वाचक म्हणुन चांगल आणि वाईट लेखन यामधला फरक कळण्याइतपत कुवत जी सर्वसामान्य लोकांच्यात असु शकते , तितकीच असेल माझ्यात. (त्याचीही खात्री नाही. Happy )
पण तरीही मला यातुन नविन काही ज्ञान मिळाल नाही. मग ज्या लोकांना कविता कळतात किंवा ज्यांचा कवितेचा अभ्यास आहे अशांना ही चर्चा पुरक कशी ठरणार ते कळल नाही.
तुम्ही चर्चा सुरु करुन दिली आहे तर थोड थांबा. इतरांची मत येवुद्यात. तुम्हीच सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देत राहिलात तर ती चर्चा न ठरता प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. नाही का?

सीमा, बरोबर आहे. मी सुरु केलेला हा धागा म्हणजे मीच उत्तर द्यायला हवे अशी जबाबदारी माझ्यावर आहे, असे मला उगीचच वाटतेय.... पण खरंच त्यात काही अर्थ नाही. आता मी खरोखर थांबते. इतरांना चर्चा करु देत.

सीमा तुझे मन फार मोकळे आहे.....
पण... पण.. मला तुझे म्हणणे काही पटले नाही.

सानी यांचा लेख आहे हा.
त्यात प्रतिक्रियांना त्यांनी उत्तरे दिली तर त्याचे इतके मनावर घेऊ नकोस.
मुळात सानी यांच्यात एक बोल्डनेस आहे त्यामुळे त्या निर्भिडपणे आपली मते मांडत आहेत.
कदाचीत ही त्यांची एक मानसिक गरज सुद्धा असु शकेल याचा तु एकदा मनाला सुंदर करून विचार करुन पहा बरं. विचारमंथन हे झालेच पाहिजे.
आपल्या विचारांची सुतळी घेऊन लोक जेव्हा दोन्ही बाजुने या कविते सारख्या अगम्य जीवाला घुसळून काढतील तेव्हाच एक नवे लखलखीत काव्यामृत यातून बाहेर येईल.
तेच कदाचीत नंतरच्या उपचारांसाठी कामी येईल.
तेव्हा माझी तुला अगदी कळकळीची विनंती आहे की असा संकुचितपणा करू नकोस.
मायबोली हे मुक्त-पीठ आहे त्यातून जितके दळण होते आहे ते होऊ देत त्याला आडकाठी नको.

कदाचीत ही त्यांची एक मानसिक गरज सुद्धा असु शकेल याचा तु एकदा मनाला सुंदर करून विचार करुन पहा बरं. >>> हह Rofl भापो आणि मुपो (मु=मुद्दा)सुद्धा Rofl

मायबोली हे मुक्त-पीठ आहे त्यातून जितके दळण होते आहे ते होऊ देत त्याला आडकाठी नको.>>> हहं(टर) माझं तुला अनुमोदन Happy

सीमाचे मत पटत नाही.

मुळात हा लेख सानीने लिहिला आहे आणि इथे ती सुत्रधाराच्या भुमिकेत आहे. एखाद्या विषयावर अशी उघड चर्चा घडताना प्रत्यक्ष व्यासपीठावरही सुत्रधार लागतोच. इथे तर जगाच्या कानाकोपर्‍यातुन एकमेकांचे पिंड न जाणणारी माणसे चर्चेत सहभागी होतात. मग एकाने मत मांडणे, त्याला दुसर्‍या तिसर्‍याने उत्तर देणे पुन्हा नवे मत समोर येणे आणि त्यावर चर्चा होणे हे घडत असते. या वेळी सुत्रधाराची गरज लागतेच. ते काम सानी चोखपणे बजावत आहे यात शंका नाही.

पुन्हा तिच्या कुठल्याही प्रतिसादात "हा लेख माझा आहे मी मांडेन ती पुर्व दिशा" असा अहंपणा अजिबात आलेला नाही. मांडलेल्या मतांचा उल्लेख, आदर तिने ठेवलाय. न पटणार्‍या गोष्टींचे ठळकपणे मांडल्यात जेणेकरुन त्यावर पुन्हा चर्चा होतेय. एकंदर विषयाचा आवाकाही वाढतच चाललाय.

उलटपक्षी ज्या संयमाने सानी हे हाताळतेय, ती नक्कीच एक उत्तम सुत्रधार आहे हे जाणवते.

सानी तुझे चालु दे ग. बरीच मंडळी खुप चांगले लिहितायत आणि या विषयाचे नवनविन कंगोरे उलगडतायत........ चर्चा चालु द्या अशीच.......... बरीच नवीन माहीती समोर येतेय. "व्हॅल्यु अ‍ॅडिशन".
Happy

सानी खरं तर भरकटलेल्या चर्चेस पुन्हा मूळ मुद्द्यावर आणून या बाफ चा ''जेन्युईन'' पणा जपतेय..... अन्यथा बर्‍याचदा सुरु झालेली एखादी चांगली चर्चा भलत्याच दिशेस जाते.... किंबहुना बाफ सुरु करणारा/री सुद्धा असा काही विषय मी सुरु केलेला हे ही विसरुन जातो/ते....... पण सानीचे हा विषय सुरु करणे कौतुकास्पद आहेच शिवाय इतकी उत्तम चर्चा गुंफणेही ग्रेट आहे.
दिनेशदांनी खूप वॅल्यु अ‍ॅडेड प्रतिसाद दिलेयत..... आणि त्यामुळेच इतक्या कमी वेळात खूप छान चर्चा होतेय.... धन्स सानी.... चालू दे.

मला पडलेला प्रश्न. इथली व्यासंगी मंडळी नक्की उत्तर देऊ शकतील.
माझी एक शेजारीण. तिचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. तो तिनं मला वाचायला आणून दिला. त्यातल्या
ब-याच कविता अगम्य होत्या. स्मशान, राख, लाल डोळे वगैरे. मी तिला त्या कवितांचा अर्थ विचारला. त्यावर तिनं शून्यात नजर लावून, मख्ख चेह-यानं मला सांगितलं'' मलाही नीटसा कळला नाही गं!''
मग त्या कविता लिहिण्यामागचं मानसशास्त्र काय असावं?

मी '' कवयित्री'' आहे... हा अहं तिला जपायचा असावा.
मी इंट्लेक्चुअल आहे हे तिला दाखवायचं असेल....
मी ही एक प्रसिद्ध व्यक्ती आहे... कुणी साधी नाही.... असं तुम्हाल इंप्रेस करायचं असावं..... ह्या मागे खूप मोठं मानस शास्त्र आहे.

मी '' कवयित्री'' आहे... हा अहं तिला जपायचा असावा. >>>> हम्म.. आता मलाही आत्तापर्यंत बरेच दिवस पडलेला एक प्रश्न . आपण कवी/कवयित्री आहोत यात अहं वाटण्याजोगे काय आहे ? मला तरी कोणी कवी/कवयित्री आहे म्हणजे कोणी ग्रेट आहे असे अजिबात वाटत नाही. जोकस अपार्ट पण लग्न करतानादेखिल माझी कवी नको अशी एक अट होती. Proud

येस अनिता ताई..... माझ्या ओपीडी त येणार्‍या प्रत्येक रुग्णावर त्याचा आजार पाहून उपचार केले जातात..... त्याचं स्टेतस पाहून नाही..... पण तरीही बरेच जण (यात राजकीय लोकं,नगरसेवक्,बडे अधिकारी) .. मला आपलं कार्ड वगैरे देउन जवळीक साधतात..... की ज्यायोगे माझा दृष्टीकोण बदलून मी त्यांस स्पेशल ट्रीटमेंट द्यावी.... पण मी त्यांना काय सांगू की गरीब्/श्रीमंत... प्रसिद्ध्/अप्रसिद्ध व्याक्ती विथ सेम आजार आर ट्रीटेड द सेम वे.... असो....

तद्वत कविता हे अभिव्यक्तीचं साधन आहे.... त्याद्वारे माणूस आपल्या व्यथा,भावना,दु:ख्,असहायता व्यक्त करतो..... म्हणजे तो/ती जे काही लिहीतो/ते,ते त्याला/तिला ज्ञात असायलाच पाहिजे..... जर ज्ञात नसेल तर.... कमालच आहे.. नाही का?

डॉ. अनिताताई यांनी विचारलेल्या प्रश्नाचे अजुनही एक शक्यता असु शकते.....
केवळ अहं जपणे किंवा माझा संग्रह आलाय छापून म्हणून मिरवणे असे नसुन जरा वेगळेही असेल. म्हणजे नेहमीच्या अनिताताईंच्या अनुभवावरुन (बोलणे ई.) त्या स्त्रीला जर "अनिताताईंना" काही कवितेतले कळत नाही असा समज (किंवा गैरसमज) असेल तर असा प्रश्न केल्यावर ती खोलात न शिरता सरळ नाही ग मलाही तितकासा नाही कळलाय असे म्हणून विषय टाळू शकते.
प्रत्येकवेळी अहं सुखावणे हेच जरुरिचे नाही. कधीकधी (किंवा बर्‍याचदा) आपण समोरच्या आपल्या मनात बांधलेली प्रतिमा प्रमाण मानून त्याप्रमाणे त्यात्या विषयावर त्या व्यक्तीशी संवाद साधतोच की. मग ती प्रतिमा आपल्या मनातली योग्य असेल किंवा अयोग्य पण असेच घडते.

अनिताताई, बर्‍याच शक्यता असु शकतात. आतापर्‍यंत दोन कळल्यात. उद्या आणि काही इतर मुद्दे समोर येईल.......... Happy

अजुन एक अनिताताई. कदाचित त्या वेळच्या मनस्थितीवरही ते अवलंबुन आहे. उद्या कदाचित हीच स्त्री त्याच प्रश्नावर तुमच्याशी तिच्या कवितेवर भरभरुन बोलेल...... यु नेव्हर नो.......
प्रयत्न (प्रयोग) करुन बघा. थोडे काव्यावर बोला, आपल्यालाही थोडे कळते किंवा आवडते काव्य असे. आणि कदाचित तीच व्यक्ती तुमच्याशी त्यावर खुलुन बोलेल...... Happy

एखादी गोष्ट समजवुन घेताना समजवणार्‍याला वाटले पाहिजे ना की समोरच्याला समजु शकते..... Happy
शेवटी त्याचाही काही "कंफर्ट झोन" असणारच ना........ नाही का????

अगदी अगदी.... हा ही मुद्दा आहेच.... आपल्या आवडीचा विषय असला तरी त्या विषयावर आपल्या नावडत्या माणसाजवळ्/सोबत चर्चिणे टाळणे होतेच.. तसलाही प्रकार असू शकतो.'' कंफर्ट झोन''.. भुंगा म्हणाल्या प्रमाणे.

भुंगा आणि डॉ. कैलास Happy तुम्ही माझे चांगले मित्र आहात म्हणून आभार मानणार नाही...पण इतकेच म्हणेन, तुमच्या शब्दांनी मला खुप खुप धीर आला...

"मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा..." (तुम्हाला तर हेही काहीच सांगायची गरज नाही मला.... भाग्यवान आहे मी त्याबाबतीत Happy )

बाकी चर्चा अतिशय अप्रतिम चालू आहे. अनिताताईंच्या मैत्रिणीच्या वाक्यातला अजून एक शक्यता असलेला पैलू म्हणजे, तिला खरोखरच त्या कविता समजल्या नसतील... आता तुम्ही म्हणाल, काय विनोद आहे! तिनेच लिहिलेल्या कविता तिलाच कळणार नाहीत का? तर मी म्हणेन, ते खरोखर शक्य आहे... तिच्या मनातून उतरलेल्या त्या अभिव्यक्तींचा तिला स्वतःलाच काही अर्थ उमगला नाही, हे होऊ शकतेच ना? ह्यावरही विचार व्हावा...

सानी,
“मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला (काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.”
ही आणि अशाच स्वरूपाची माहिती नव्याने कळली.अभ्यास आणि माहितीपूर्ण लेख वाचून समाधान मिळाल.
मात्र अशा स्वरूपाच्या मानसोपचार पद्धती साठी कविता सकारात्मक असणं आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे विचार काही प्रतिसादांमध्ये मांडण्यात आले आहेत आणि मी त्याच्याशी सहमत आहे.
………………………...........................................................................................
कविता लिहिण्यामगची कारणे, वाचकावर होणारा परिणाम इ. बाबत वरील चर्चेत बरेच मुद्दे येऊन गेले आहेत. कविता लिहिण्यामागे २/३ कारणं असू शकतात.
१) भावनांची अभिव्यक्ती. २) कविता सादर करून आपल्या लिखाणाची लोकांनी नोंद घ्यावी, प्रतिसाद द्यावा, आपली ओळख निर्माण व्हावी, प्रसिद्धी मिळावी. ३) काही प्रसंगी लोकांपर्यंत आपले विचार पोहोचावेत.
…………………....................................................................................................
कवीची मनोधारणा
‘कवितेचा वाचकावर होणार्‍या परिणामाचा विचार’ हा मूळचा विषय असला तरी त्याच्या अनुषंगाने कवीची (कविता लिहिणार्‍याची) मनोधारणा याबाबत देखील विचार होणं गरजेच वाटत. कारण सामान्यत: कालचा कविमनाचा रसिक आजचा कवी होत असतो. कारुण्य, दु:ख, विवंचना इ. भावना मांडणारी कविता इतर कवितांपेक्षा उजवी असते अशी धारणा अनेकांची झाली आहे की काय अशी दाट शंका येते, कारण या विषयांवरच्या कविता अधिक प्रमाणात आढळतात. त्याबरोबरीने किंवा त्याखालोखाल ’ती’ वरच्या कविता.
त्यातसुद्धा ’ती’च दु:ख, ’ती’ने केलेली प्रतारणा हेच विषय अधिकांशाने आढळतात. बाकी भावना / संवेदना व्यक्त करणार्‍या किंवा भक्ती, वीर, शृंगार इ. रसांचा आस्वाद देणार्‍या कविता अभावानेच आढळतात.
क्वचित प्रसंगी एक उफराटा विचार मनात येतो, की करुणरस हे कवितेच्या जगातील चलनी नाणं आहे का ?
(कृपया कोणीही वैयक्तिक स्वरूपात याचा विचार करू नये. माझा विचार चुकत असल्यास मला विक्षिप्त/वेडा
म्हणावे.) कवी जर विशिष्ट विचारांच्या कोषात गुरफटला असेल तर जीवनातील त्याच्या प्रतिभेला जीवनातल्या अनेक अंगांना स्पर्श करायची संधीच उप्लब्ध होणार नाही. अर्थात् प्रत्येकाने प्रत्येक रसात कविता लिहावी अस मला अजिबात म्हणायच नाही. खर तर कविता ही स्फुरते प्रयत्न करून लिहिता येत नाही हे माझं प्रांजळ मत आहे. जीवनाकडे व्यापक दृष्टीकोनातून पहावं इतकीच माफक अपेक्षा. प्रतिभा कुठल्याही कोषात गुरफटली जाऊ नये, तिला झापडं लागू नयेत ही प्रांजळ इच्छा.

या विषयाच्या अनुषंगाने माझी बर्‍याच दिवसांपूर्वी लिहिलेली अप्रकाशित कविता इथे सादर करतोय.

दु:ख कवितेच

माझ्या नावे दु:ख लिहून, सदानकदा दु:खात लोटता
करुणेच गुर्‍हाळ घोटून, तुम्ही काव्यानंद घेता

दु:ख सोडून बाकी जाणीवा, बोथट झाल्येत काय ?
’करूण’ सोडून सारे रस, आटून गेलेत काय ?
………….
…. ठाऊक आहे...... माझा जन्म,
करूणेतूनच झालाय.
पण त्यात दोष कुणाचा ?
रतिक्रीडेत मग्न क्रौंचद्वयाचा ?
की शरसंधान करणार्‍या निषादाचा ?
विलाप करणार्‍या क्रौंचाचा ?
की परपीडेने व्यथित झालेल्या वाल्मिकीचा ?
की असल्या पार्श्वभूमीवर जन्म घेतला,
म्हणून खुद्द माझा ???? …….
………..
तुम्ही काय उत्तर देणार ?
यावर तुम्ही काय बोलणार ???
पुनश्च मला दु:खात लोटणार.
माझ्या डोक्यावर कारुण्याचा काटेरी मुकुट घालून,
तुम्ही काव्यानंदाची फुलं फुलवणार .......
मग, मी माझ्याशीच, गदिमा style म्हणणार …....
...... “खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा”

...... उल्हास भिडॆ (१-८-२०१०)

सानी, तूझ्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, आणि सुत्रधाराच्या भुमिकेत तू कायम असावेच, इथे. आपण दोघांनी सुरु केलेल्या चर्चेत सर्वांची मते कळावीत, म्हणुन तर मी लिहायचा आग्रह केला.

इथे जे कविता करतात, त्यांनी पण मला हि कविता, का करावीशी वाटली, ती इथे लिहावीशी का वाटली, आणि शक्य झाल्यावर प्रतिसादांबद्दल काय वाटले, तेहि लिहावे. (नकारात्मक प्रतिक्रिया मी सहसा देत नाही, पण समजा जर मी उघडपणे लिहिले कि हि कविता आवडली नाही, किंवा हा शब्द खटकला, तर त्यांना काय वाटेल, याची भिती वाटते. कवि, आपल्या कवितेबाबत हळवे असतात, असा माझा समज आहे. तो गैर आहे का ? )

मेधा,
मी मनातील सुप्त इच्छांचा उल्लेख केलाय. जरी वाचक अन्याय सहन करत असला, पण जर त्याला मनातून त्याचा प्रतिकार करण्याची इच्छा असेल तर त्याला साहसकथा वा कविता आवडणारच.
कधी कधी तर मनातील सुप्त इच्छा प्रबळ करण्यासाठी काव्य वापरले गेले. (स्वा. सावरकरांच्या बहुतेक सर्व कविता.)
शिवाय सानी म्हणतेय तसे हा दुट्टपीपणा झाला (मांजराला कुरवाळत बसलेला, जेम्स बाँड च्या सिनेमातला खलनायक, कसा क्रूर होतो, तसे. म्हणजे सानीचा दुभंग व्यक्तीमत्वाचा पेशंट झाला कि तो.)

भाऊ.
मला तरीहि देवदास पटत नाही. लग्नाच्या आधी पारो, त्याच्याकडे येते, त्यावेळी तो का माघार घेतो ? अशा कचखाऊ वृत्तीचा मला तिटकारा आहे. त्याच्या अशा वागण्याची, आणि नंतर तिच्यासाठी झुरण्याची संगती मला लागत नाही.
खलनायकाला ग्लोरिफाय करणे जितके वाईट, तितकेच पराभूत नायकाला ग्लोरिफाय करणे वाइट, असे मला वाटते.
मग याचा अर्थ मी स्वार्थी आहे. मला दुसर्‍यांच्या भावना कळतच नाहीत, त्या समजून घेण्याची कुवत नाही, असा होतो का ?
कि कविता आवडली नाही, तरिही ती आवडल्याची बतावणी करण्याइतपत नाटकीपणा माझ्या अंगात नाही ?

सिंडरेला (अजून चर्चेत असेल तर.)

वाचक नसतील तर कविता काय कामाची ? वहित लिहून ठेवलेल्या कवितांबद्दल आपण बोलतच नाही आहोत. ज्या कविता प्रसिद्ध केल्या जातात. आणि ज्यावर प्रतिसादाची अपेक्षा, असते त्यावरच बोलतोय आपण.

अनिताताई
हा तर फार वेगळाच मुद्दा आहे. अशा गुढ कविता जर माझ्यासमोर कुणी टाकल्या, तर त्याच्या मानगुटीवर, बसल्याशिवाय मी राहणार नाही.
असो विनोदाचा भाग सोडा. पण अशा कविता म्हणजे त्या कविच्या गोंधळलेल्या मनाचे प्रतिबिंब म्हणायचे का ? एकाद्या मानसोपचार तज्ञाला त्यातून काहीतरी निष्कर्श काढता येतील. पण सामान्य वाचक, त्यावर अनिताताईसारखीच प्रतिक्रिया देणार,

उल्हास,
माझेही कवितांच्या विषयाबाबत हेच म्हणणे आहे.
उस्फुर्त कवितेपेक्षा लाटांवर स्वार होणेच जास्त दिसते. (यात मी विडंबन धरत नाही, तो एक वेगळ्या तर्हेचा प्रतिसादच आहे) मायबोलीचेच उदाहरण द्यायचे तर आताच एक गूढ आणि दुसरी नॉन व्हेज लाट येऊन गेली.

नेहमीच्या अनिताताईंच्या अनुभवावरुन (बोलणे ई.) त्या स्त्रीला जर "अनिताताईंना" काही कवितेतले कळत नाही असा समज (किंवा गैरसमज) असेल तर असा प्रश्न केल्यावर ती खोलात न शिरता सरळ नाही ग मलाही तितकासा नाही कळलाय असे म्हणून विषय टाळू शकते..>>>>
असं काही नव्हतं. कविता करणारी शेजारीण तशी प्रांजळ होती. आणि कविता या विषयावर आम्ही कधीच बोललो नव्हतो. आणि ज्याला कवितेतलं कळत नाही त्यानं त्याबद्द्ल जर विचारलं, तर खोलात जाऊन नाही तरी काही ढोबळ अर्थ तरी त्याला सांगायला हवा ना? मला जर एखाद्यानं माझ्या विषयाबाबत एखादा प्रश्न केला तर मी समोरच्याच्या कुवतीनुसार एखाद्या वाक्यात तरी समोरच्याला समाधानकारक उत्तर देईन.
तर असो. त्या अनाकलनीय कवितांप्रमाणे तिचे उत्तरही अनाकलनीय.
मागे एकदा टि. व्ही. वर एका संगीतकाराने कवि कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा चुकीचा नाही म्हणता येणार पण त्यांना वाटला तो अर्थ सांगितला. तो अर्थ कविवर्यांच्या मनात अभिप्रेत नव्हता! तर त्यांनी सांगितलं की कविता वाचल्यावर वाचकाला त्याचा जो अर्थ वाटेल, तो त्यानी घ्यावा!
पण काही अर्थबोध झाला नाहीतर काय करावं?

वाचक नसतील तर कविता काय कामाची ? वहित लिहून ठेवलेल्या कवितांबद्दल आपण बोलतच नाही आहोत. ज्या कविता प्रसिद्ध केल्या जातात. आणि ज्यावर प्रतिसादाची अपेक्षा, असते त्यावरच बोलतोय आपण. >>> मला वाटले होते लिहिल्या जाणार्‍या प्रत्येक कविते बाबत चर्चा सुरु आहे.

थोडक्यात तुम्हाला इथे मायबोलीवर प्रसिद्ध होणार्‍या कविता आवडत नाहीत, इतरत्र लिहिलेल्या-प्रसिद्ध झालेल्या कवितांना सुंदर चाली लावल्या तर आवडतात आणि ह्या दोनच मुद्द्यांवर चर्चा करायची आहे असे दिसते. कॅरी ऑन.

आता मी चर्चेत नाही तेव्हा मला उद्देशुन काही लिहू नये.

एका कलेचा थेरपी म्हणून जेव्हा वापर होतो तेव्हा तो वापर applied artखाली येतो. तो वापर म्हणजे संपूर्ण कला नव्हे हे विसरल्यासारखं वाटतंय वरच्या चर्चेत म्हणून केवळ लक्ष वेधले.

तसेच प्रत्येक वेळेला कलेमधे एकास एक अश्या पद्धतीने अर्थ आणि आडाखे लावता येत नाहीत. मला खरोखर असं वाटतं की हा विषय या चर्चेमधे अजिबात अभ्यास नसताना चर्चिला जातोय आणि तितक्या सहजपणे चर्चा करायचा हा विषयच नाही.

बाकी माबो वरच्या ८०% कविता या लोकांनी आपल्याला कवी म्हणून आणि व्यक्क्ती म्हणूनही नावाजावं या भावनेपोटी असल्यासारख्या वाटतात (माझ्यासकट).
तेच ब्लॉगबद्दल आणि कदाचित एकुणातच कविता लेखनाच्या परिघाबद्दल म्हणता येईल.
असं मला बहुतांशी कविता वाचताना वाटतं.

हे केवळ माझं मत आहे.

सानी, माहितीबद्दल धन्यवाद.
नी, पटले.

6214, 6382, 7593, 15749
हे काही कवितांबद्दलच्या चर्चेचे धागे.

<<मग याचा अर्थ मी स्वार्थी आहे. मला दुसर्‍यांच्या भावना कळतच नाहीत, त्या समजून घेण्याची कुवत नाही, असा होतो का ?>> दिनेशदा, अजिबात नाही. पण तुम्ही घेतलेलं देवदासचंच उदाहरण घेऊन माझी भुमिका अधिक स्पष्ट करतो. देवदास हा कचखाऊपणा करतो, ते कमकुवतपणाच आहे व त्याचे भयानक परिंणामही तो भोगतो, हे सारं स्पष्ट आहे. पण मनाचं मुलभूत पावित्र्य व मोठेपणा असलेला तो एक उमदा तरूणही आहे; स्वतःच्या आत्यंतिक वैफल्यग्रस्त परिस्थितीतही चंद्रमुखीसारख्या स्त्रीला चैनीचं आयुष्य सोडून सन्मार्गाला लागण्याची प्रेरणा देणारी त्याच्या "चारित्र्या"ची ताकद आहे. एखाद्या
'दारुड्या"चंही अंतरंग किती प्रभावी व मोहक असूं शकतं याच्या अनुभुतीमुळे मला देवदास भावतो; एक आदर्श म्हणून नाही.<<तितकेच पराभूत नायकाला ग्लोरिफाय करणे वाइट, असे मला वाटते.>> हा आपला दृष्टीकोन झाला व त्याचा मी आदर करतो.

जर सगळ्या प्रकारच्या काव्याला या अर्थानर्थाच्या समीकरणांच्यात बसवायचे असेल तर मग जगभरात वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रदेशांत सर्व कलांच्या संदर्भात वेगवेगळे इझम निर्माण झाले. ते निर्माण होताना आता अश्या पद्धतीनेच कलानिर्मिती करावी असा फतवा काढून निर्माण झाले नव्हते. परिस्थितीनुसार संपूर्ण समाजाच्या अभिव्यक्तीमधे बदल होत गेले. आणि बदल जेव्हा ठळकपणे व एकत्रितरित्या दिसून आले तेव्हा त्यांना एक इझम असं मानलं जाऊन त्याची वैशिष्ठ्ये, कारणे इत्यादींचा विचार केला गेला. मग आपण आजच्या चष्म्यातून देवदासकडे बघणं किंवा तत्सम अनेक उदाहरणे ही निरर्थक ठरतात. आणि तितकीच निरर्थक कवितेमागची कविची मनोधारणा समजून घेण्याची समीकरणेही.

वाचक नसतील तर कविता काय कामाची ? वहित लिहून ठेवलेल्या कवितांबद्दल आपण बोलतच नाही आहोत. ज्या कविता प्रसिद्ध केल्या जातात. आणि ज्यावर प्रतिसादाची अपेक्षा, असते त्यावरच बोलतोय आपण. >>
हे अजिबात कळले नाही. कवितालेखन ही एक मानसिक गरज आहे- या बाफच्या विषयाचा आणि याचा काय संबंध? 'प्रतिसाद येणे' ही मानसिक गरज असू नये, असं मला म्हणायचं नाही, पण तशी ती असेल तर याआधीच्या सार्‍या पोस्ट्स म्हणजे कचरा होतो की!

अजूनही मला शीर्षक, मुळ पोस्ट आणि प्रतिसाद यांचा संबंध जोडता आलेला नाही. एकमेकांशी संबंध नसलेले कमीत कमी अर्धा डझन विषय एकाच ठिकाणी बोलले जात आहेत असे वाटते.

वरती पेस्ट केलेल्या वाक्याच्याच अनुषंगानेच बोलायचे झाले, मायबोलीवर शेकडो कविता करणार्‍यांपैकी एकाचीही एकही पोस्ट इथे दिसत नाही. किती का दिवसांत होईना, पण शेकडो कविता करण्यामागे त्यांची नक्की काहीतरी पक्की मानसिकता असावी, काही तरी कार्यकारणभाव असावा, रीझनींग असावे- असे वाटते. त्यांनी ते मांडले, तर येणार्‍या नवोदितांनाही काही तरी दिशा मिळेल, ब्लॉगवर न टाकता इथे का टाकतो- यासाठी काहीतरी पक्का पाया मिळेल. आणि सर्वात महत्वाचे या बाफच्या शीर्षकाचे सार्थक होईल.

कविताच फक्त मानसिक गरज का? कथा, लघुकथा, ललित, स्फुट, कादंबरी, नाटक इ. का नाही- हाही एक प्रश्न आहे. असेल, तर या सर्वांपेक्षा कवितेचीच मानसिक गरज नक्की कुठच्या कारणामुळे प्रबळ ठरते- असेही काही प्रश्न आहेत. विंदा आणि नारायण सुर्बेंबद्दल (ही फक्त उदाहरणे) इथे ब्र देखील न काढणार्‍या इथल्या नवीन / जुन्या /प्रथितयश कवींकडून ही उत्तरे मिळाली तर खूप आनंद होईल.

या पोस्टसाठी या बाफच्या संचालिकेने नुसते आभार न मानता वरती उपस्थित केलेल्या मुद्द्यावर काही लिहिण्या-बोलण्यासारखे असेल तरच लिहावे, ही नम्र विनंती. मुद्दे असलेला निषेध करावासा वाटला, तर स्वागत आहे. Happy

Pages