प्रेरणा: दिनेशदा
केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.
त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.
माबोवर येणारे कवी- काही फुटपट्टी घेऊन रचना करणारे, काही मुक्तछंदवाले, काही यमकं जुळवणारे, काही अनाकलनीय असे लिहिणारे, काही कवितेतून कथा सादर करणारे तर काही कवितेतून आधार शोधणारे- दु:खी मनाचे कवी ह्या सगळ्यांविषयी आम्ही बोललो.
शिवाय या कवींना प्रतिसाद देणारे- काही नुसतेच प्रशंसा करणारे- छान, सुंदर, मस्त असा प्रतिसाद देणारे, काही केवळ टिका करणारे- फालतू, वाईट इत्यादी शेरे मारणारे, काही कवितेचे विवेचन, रसग्रहण, विस्तार करणारे, काही कवितेकडे निखळ मनोरंजन म्हणून बघणारे तर काही कवितेकडे कुचेष्टेच्या उद्देशाने पाहणारे, काही जण मात्र कवितेकडे, कवीकडे सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून बघणारे, कवीच्या लेखनातल्या तृटींकडे आपुलकीने पाहून त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून झटणारे याही विषयी आम्ही बोललो....
मी मानसशास्त्राची विद्यार्थीनी असल्याने अभ्यासात शिकलेले काही थोडे-फार मुद्दे नकळतपणे माझ्या बोलण्यात उतरले, त्यावरुन दिनेशदांनी मला या विषयावरच लेख लिहायला सांगितला!!! झालं....मी चर्चा वगैरे करायला एका पायावर तयार आहे हो दिनेशदा!!!! पण लेख वगैरे, तो ही कवितेवर आणि कळस म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहायचा, म्हणजे फारच झालं... एकतर माबोवर इतकी ज्ञानी मंडळी आहेत. मी त्यांच्या कवितेवरील समिक्षा, विचार सर्व वाचलंय, तेंव्हा मी लिहिणार तरी काय आणि कसं याचं माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं...आणि मी हा विषय लिहायचं कायम टाळत आले, ते आजपर्यंत. पण आज...आज नाही टाळू शकले. आज पुन्हा दिनेशदांची आज्ञा आलीच...आणि ती का आली हेही माहितीये...
एका दु:खी मनाच्या एकाकी कवीने एक मोठं पाप केलं...काव्यचौर्याचं!!!!आणि ते उघडकीस आलं. मग पुन्हा सुरु झालं एक चर्चासत्र...त्या चर्चासत्रातच एक मुद्दा पुढे आला- या आणि अशा सर्व निराशाजनक काव्यलेखन करणार्यांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता येईल का??? आणि मग आलेली दिनेशदांची आज्ञा...तेंव्हा आता 'तशा' दृष्टीकोनातून पाहण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. पहा, आवडतोय का...
*****************************************************************************************************************
"In the desert of the heart Let the healing fountain start." - W. H. Auden
कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो, हे मानसशास्त्रीय गृहितक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही, तर मनातल्या जखमा भरुन काढण्याचे सामर्थ्यही कवितेत असते. त्यामुळे मानसशास्त्रीय उपचारपद्धतीमधे पोएट्री थेरपीला(काव्योपचार-पद्धती) एक वेगळेच स्थान प्राप्त झाले.
थेरपीसाठी येणार्या, मनमोकळ्या गप्पा मारु न शकणार्या, आपल्या भावना बोलून व्यक्त करु न शकणार्या मनोरुग्णांना कविता करायला सांगण्यात येणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निरोगी, निकोप मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. याविषयी अधिक माहिती गोळा करायला गेले, तेंव्हा फार छान माहिती हाती आली. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला नक्की आवडेल.
(डिस्क्लेमरः खाली देतेय ती माहिती म्हणजे पोएट्री थेरपी या विषयाशी संबंधित आंतरजालावर सापडलेल्या लेखांचा निव्वळ अनुवाद/ भाषांतर आहे आणि त्या लेखांचे दुवे तळाशी दिले आहेत. )
कविता लेखनाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली असावी???
वाचून आश्चर्य वाटेल, पण त्याच्या खुणा अगदी आपल्या आदीमानवाजवळही सापडतील! प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असलेले होम-हवन हे त्याचेच एक उदाहरण आहे... अति-प्राचीन काळात (म्हणजे इसवीसन पूर्व हजारो वर्षे) इजिप्तमधे कवितेचे शब्द लिहून ते एका पेयात विरघळून रुग्णाला प्यायला दिले तर तो लवकर बरा होतो, अशाप्रकारच्या उपचाराचे दाखले सापडलेले आहेत.
मात्र, पहिल्या काव्योपचारपद्धतीची नोंद मात्र इ.स. पहिल्या शतकात झालेली आहे. रोमन फिजिशियन सोरानसने त्याच्या मेनियाक (सकारात्मक भावनांची अतिशय उच्च पातळी, जसे, अत्यानंद) रुग्णांना शोकांतिका (दु:खी, निराशाजनक) तर डिप्रेसिव्ह रुग्णांना सुखांतिका कविता लिहायला प्रवृत्त केले.
त्यानंतर मात्र अनेक शतके काव्य आणि वैद्यक यांचा मेळ बसवणारे असे काहीच घडले नाही. एकदम १७५१ साली अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन यांनी स्थापन केलेल्या पेन्सिल्व्हेनिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 'साहित्यिक उपचारांची' सुरुवात करण्यात आली. यात रुग्णांना वाचन आणि लेखन करायला सांगून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. अमेरिकन सायकियाट्रीचे जनक म्हणून संबोधले जाणारे डॉ. बेंजामिन रश यांनी संगीत-उपचार पद्धतीची जगाला ओळख करुन दिली. मनोरुग्णांना कविता लिहायला सांगून खास त्यांच्यासाठी असलेल्या "द इल्युमिनेटर" या वर्तमानपत्रात त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्यात येत असे.
त्यानंतर १९६० ते १९७० या या काळात बिब्लिओथेरपी अधिक नावाजली. बिब्लिओथेरपीचा शब्दशः अर्थ म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी साहित्याचा उपयोग करणे.
नंतर मात्र काव्योपचार पद्धती खर्या अर्थाने नावारुपाला आली. "मी नाही, पण कविताच नेणीवेचा शोध घेते" असे मनोविश्लेषक सिग्मण्ड फ्रॉईड म्हणून गेला. त्यानंतर अॅडलर, युंग, अॅरिटी, आणि राईकने सुद्धा फ्रॉईडच्या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. मोरेनोने सायको-पोएट्री, सायको-ड्रामा हे शब्द प्रचलित केले. १९६० साली पोएट्री-थेरपी नावाने एक समविचारी लोकांचा गटही स्थापन झाला. ज्याचा नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात-जसे शिक्षण, पुनर्वसन, ग्रंथशास्त्र, मनोरंजन, आणि सर्जनशील कला यात अधिक चांगला व्यापक असा विस्तार होत गेला.
काव्योपचार संघटनेची स्थापना:
१९२८ सालात अली ग्राईफर या मुळात फार्मासिस्ट आणि व्यवसायाने वकील असणार्या कवीने कवितेत मनाच्या जखमा भरुन काढण्याची ताकद असते अशा संदेशाची प्रचारमोहिमच हाती घेतली. ह्या काव्यमोहिमेसाठी त्याने आपले आख्खे आयुष्यच वाहून घेतले. त्याच्याचसारखे नंतर अनेक लोक होऊन गेले. कवितेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी, अनेक संस्थांचीही निर्मिती झाली.
नॅशनल असोसिएशन फॉर पोएट्री थेरपीची १९८१ साली स्थापना झाली. ही असोसिएशन चालवत असलेल्या पोएट्री-थेरपीची मुख्य उद्दिष्ट्ये:
१. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यातली अचूकता वाढवणे.
२. सर्जनशीलता, व्यक्त होण्यातला सुस्पष्टपणा, आणि आत्म-सन्मान वाढवणे.
३. व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आणि सुसंवाद कौशल्ये वाढवणे.
४.नवीन कल्पना, माहिती, प्रचिती यांच्यातून नवीन अर्थ शोधणे आणि
५. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी नवीन वातावरण निर्मिती करणे.
या संघटनेची वाटचाल अजूनही चालूच आहे. या संघटनेच्या आणि नॅशनल कोलिशन ऑफ क्रिएटिव्ह आर्टस, थेरपीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० मध्ये पोर्टलंड येथे "क्रिएटिव्ह आर्ट्स थेरपी विक" साजरा करण्यात आला.
******************************************************************************************************************
पोएट्री थेरपीविषयीची माहिती हा कवितेकडे पाहण्याचा एक निराळा पैलू म्हणून लिहिली आहे. बाकीच्या पैलूंवर आपण सगळे मिळून चर्चा करुया. हा लेख म्हणजे कवितेविषयी चर्चेचे मुक्त व्यासपीठ व्हावे ही मनापासून इच्छा!!!
चला, तर मग माबोकर, आपणही कवितेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहूया... माझे या विषयातील मर्यादित ज्ञान आणि चिंतन आणि तुमचा त्यातील अभ्यास याचा मेळ घालून ही चर्चा पुढे नेऊ या
संदर्भः
http://www.poetrytherapy.org/articles/pt.htm
http://www.poetrytherapy.org/government_affairs.htm
http://www.poetryconnection.net/poets/W._H._Auden/18489
http://www.nccata.org/poetry_therapy.htm
http://www.poetrymagic.co.uk/literary-theory/freud.html
http://ecam.oxfordjournals.org/cgi/content/full/2/2/161
http://www.recover-from-grief.com/grief-poem.html
http://www.poetrymagic.co.uk/therapy.html
http://www.spcsb.org/pdfs/resources/a-poetry_as_therapy.pdf
कविता लेखन : एक मानसिक गरज हे
कविता लेखन : एक मानसिक गरज हे समजले पण माय्बोलीवर कवितेवर अभिप्राय/ टिका / विडंबन / प्रहसन / शिविगाळ इ. लिहिणे अशी मानसिक गरज असलेले जास्त लोक आहेत. अशा लोकांचे मानसशास्त्रिय विश्लेशण केल्यास ह्या विशयाला एक पुर्णत्व येइल असे वाटते
मानसिक गरज म्हणून कविता
मानसिक गरज म्हणून कविता करायला(!) हरकत नाही.. पण वाट्टेल त्या कविता प्रसिद्ध करणं म्हणजे जरा ....
मुळात कविता अशी 'ठरवून' करता येते का? केली तर त्यात तो उत्कटपणा येईल का? त्या कवितेला उंची गाठता येईल का?
'आज सूर्यावर कविता करायची', 'हेच तंत्र वापरून कविता करायची', 'आज कविता करायचीच करायची' असं ठरवून चांगली कविता कशी बाहेर येईल? (निदान मला तरी शक्य नाही).
कधी बाहेर येण्यासाठीची तगमग तर कधी सहज उत्स्फुर्तपणा, सहजसोपी रचना कधी-वरकरणी अवजडपणा.. जे काही असेल ते आतून यायला पाहिजे - अगदी गाभ्यातून... आपलं आपल्याला नीट कळलं पाहिजे
स्वतःच्या मनासारखी बाहेर पडेपर्यंत तगमग व्हायलाच पाहिजे..
विषय/तंत्र इतर गोष्टी ठरवून कविता करताना हे साध्य होईल असं वाटत नाही. (अनलेस, कवीमधे ठरवून पूर्ण घुसण्याची ताकद आहे)
आणि अगदीच आपल्याला जमत नसेल आणि तरिही हौस असेल तर दुसर्याच्या उत्तम (आपल्याला खरच उत्तम वाटणार्या (आपल्याला = आपल्याला स्वतःला - कुणीतरी दुसरं चांगलं म्हणतं म्हणून नव्हे!)) कविता वाचूनही चालेल, नाही का?
(आत उलगडत जाते, ती कविता आपलीच तर असते!)
नाहीतर अशा आपण 'पाडलेल्या' कविता वाचून दुसर्यावर उपचारांची वेळ नाही आली, म्हणजे मिळवलं!
असो, हे ज्याचं त्यालाच उमगायला हवं -( ह्यावर बरीच चर्चा झाली आहे - पण विषय निघाला की स्वगत बोलतानाचा व्हॉल्यूम वाढतोच वाढतो :))
सानी, इन्टरेस्टिंग माहिती, पण स्वतःला जमत नसताना कविता करायचा उद्योग करण्यापेक्षा, दुसर्याच्या कविता वाचून मानसिक उपचार होऊ शकतात का ?
मनोरुग्णांकडून मानसोपचाराचा
मनोरुग्णांकडून मानसोपचाराचा भाग म्हणून कविता लिहून घेणं या बद्दलची आंतरजालावरची माहिती लिहिली आहे ( भाषांतर बरं आहे ). पण बहुसंख्य कवि, कवयित्री कविता का करतात, इतर लेखन प्रकार आपापल्या मगदुराप्रमाणे हाताळणारे लोकसुद्धा कविता का करतात याचं काहीच विवेचन नाही. त्यामुळे शीर्षकाचा आणि लेखाच्या कंटेंटचा संबंध ओझरताच आहे.
या लेखाकरता इतके धन्यवाद, इतकं कौतुक अन इतके परस्परांचे आभार ? कठीण आहे
चांगला लेख लिंका वाचते आता
चांगला लेख
लिंका वाचते आता
पण माय्बोलीवर कवितेवर
पण माय्बोलीवर कवितेवर अभिप्राय/ टिका / विडंबन / प्रहसन / शिविगाळ इ. लिहिणे अशी मानसिक गरज असलेले जास्त लोक आहेत. अशा लोकांचे मानसशास्त्रिय विश्लेशण केल्यास ह्या विशयाला एक पुर्णत्व येइल असे वाटते>
सौ सुनार की एक पेशवा की
प्रबोधनाबद्दल सानि, दिनेशदा व
प्रबोधनाबद्दल सानि, दिनेशदा व इतर विचारवंतांचे आभार.
<<प्रतिमांचा डोलारा, संदर्भ सगळे मान्य. पण ते नाहि दिसत हो इथे !>> दिनेशदा, आपला रोख "इथे"वर होता व मी "कविता" या सर्वसाधारण विषयावर मला वाटतं ते लिहीलं, म्हणून
जरा गोंधळ झाला असावा !
<< आपापल्या मगदुराप्रमाणे हाताळणारे लोकसुद्धा कविता का करतात याचं काहीच विवेचन नाही.>>या देशी यांच्या आरोपाबाबत माझा बचाव- स्वतःला भावलेल्या एखाद्या कल्पनेवर/ विचारावर/परिस्थितीवर कल्पनाविलासाने औचित्यपूर्ण शब्दछटा, प्रतिमा, उपमा इ. गुंफण्याचा आनंद
ही कविता करण्यामागची प्रमुख प्रेरणा असावी; तो आनंद इतरापर्यंत किती पोचतो, हे कवीच्या कुवतीवर व वाचकाच्या मानसिकतेवरही अवलंबून असावं. हा या चर्चेतील माझा प्रामाणिक सहभाग.
एका प्रसिद्ध व्यंगचित्रकाराचं एक पुस्तक वाचनात आलं. हौशी/नवोदित व्यंगचित्रकाराना त्याने दिलेला सल्ला, कानपिचकी म्हणा हवं तर,-
" माझी चित्रं मी स्वतःच्या आनंदाकरता काढतो; इतराना दाखवण्याकरता नाही", अशा भ्रामक मस्तीत राहू नका. चित्र काढण्याची प्रक्रीयाच मुळात ते इतराना दाखवल्याशिवाय पूर्णच होत नसते !
सर्वच कलांच्या बाबतीत मला वाटतं हे लागू पडतं. तेंव्हा, आपली कविता इतरांसमोर मांडण्याची ओढ
कविता करण्याच्या मानसिक गरजेपासून वेगळी करणं अप्रस्तुत व कठीणही आहे. पण आपली कलाकृति
केंव्हा व कोणत्या व्यासपिठावर सादर करावी, हा कठीण प्रश्न प्रत्येकानं स्वतःच विवेकानं सोडवायला हवा !
सानी.... खुप मस्त
सानी....
खुप मस्त लिहीलस्.....तुझ्या या लेखणाच्या निमित्ताने खुप गोष्टी कळाल्या....ज्ञानात भर पडली...
तुझ खुप अभिनन्दन्....नी कौतुक....लिहीत रहा...छान मान्डलस....
आणि हो आणखी एक सान्गायचय ते म्हणजे तुझ मन खुप छान आहे....गोड आहेस....एखद्याला समजुन घेणे,एखद्याच ऐकुन घेण छान जमतय तुला ...हे आपल माझ मत..
सावरी
पेशवा, नानबा, देशी, लाजो,...
पेशवा, नानबा, देशी, लाजो,... लेख वाचून, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल, मत मांडल्याबद्दल आपले सर्वांचे आभार
सावरी, ह्या गोड शब्दांबद्दल तुझेही आभार
मनोरुग्णांकडून मानसोपचाराचा भाग म्हणून कविता लिहून घेणं या बद्दलची आंतरजालावरची माहिती लिहिली आहे ( भाषांतर बरं आहे ). पण बहुसंख्य कवि, कवयित्री कविता का करतात, इतर लेखन प्रकार आपापल्या मगदुराप्रमाणे हाताळणारे लोकसुद्धा कविता का करतात याचं काहीच विवेचन नाही. त्यामुळे शीर्षकाचा आणि लेखाच्या कंटेंटचा संबंध ओझरताच आहे.
देशी, शीर्षकात मानसिक गरज हे वेगळ्या अर्थाने वापरलेले शब्द आहेत, ही शक्यता तुम्ही गृहित धरत नाही आहात... बरं ह्या लेखाला 'काव्योपचार पद्धती: एक ओळख' असे नाव दिले, तर ठिक आहे का? पण मग मी भाषांतरीत केलेली माहिती खुपच त्रोटक होईल आणि माबोवरील कविता लेखनाशी त्याचा जोडण्यात आलेला संबंध सुद्धा अर्थपूर्ण राहणार नाही. असो, तुम्हाला समर्पक असे शीर्षक तुम्हीच सुचवा मला आता आणि तुम्ही सुचवलेल्या विषयांवर प्रतिसादांमधे चर्चा चालू आहेच ना? आणि मी ही माझे मत मांडते आहेच ना? सगळी चर्चा लेखातच केली पाहिजे, असा काही नियम आहे का?
या लेखाकरता इतके धन्यवाद, इतकं कौतुक अन इतके परस्परांचे आभार ? कठीण आहे
ह्म्म्म!!!! आता याबद्दल मी काय बोलू
>>माय्बोलीवर कवितेवर
>>माय्बोलीवर कवितेवर अभिप्राय/ टिका / विडंबन / प्रहसन / शिविगाळ इ. लिहिणे अशी मानसिक गरज असलेले जास्त लोक आहेत. अशा लोकांचे मानसशास्त्रिय विश्लेशण केल्यास ह्या विशयाला एक पुर्णत्व येइल असे वाटते
विश्लेषणाची गरज आहे का पेशव्या? जी मानसिक गरज लिहीण्याची तीच प्रतिक्रीया देण्याची फक्त "व्यक्त" करण्याची पध्धत वेगवेगळी आहे.
("अनुल्लेखाचे" मानसशास्त्रीय विश्लेषण अधिक रंजक ठरेल.. शिवाय अलिकडे कवितेने ऊपचार नव्हे तर कवितेवर ऊपचार करायची गरज प्रकर्षाने दिसून येते).
चांगला विषय. धन्यवाद.
चांगला विषय. धन्यवाद.
. शिवाय अलिकडे कवितेने ऊपचार
. शिवाय अलिकडे कवितेने ऊपचार नव्हे तर कवितेवर ऊपचार करायची गरज प्रकर्षाने दिसून येते
आणि कवीवर?
आभार सानी, माझ्या बर्याच
आभार सानी,
माझ्या बर्याच शंकांचे निरसन झाले.
पण माझ्या विचारांना चालना मिळाली, (म्हणजे आणखी शंका आल्या.)
यावर आपले एकमत झाले कि सहज सोप्या कविता, सर्वानाच आवडतात.
आणि हा सहज निघणारा अर्थ, जर सामान्य आशयाचा असेल, तर त्यात
दखल घेण्याजोगे काही नसतेच.
सामान्य आशय म्हणजे, जे अनुभव सगळ्यांनाच येतात, समजू शकतात,
तेच जर कवितेत आले, तर नवे काय, असे मनात येणारच. अशा वेळी,
वेगळी शब्दकळा, अनुभवाचा वेगळा अर्थ, किंवा त्या अनुभावाला सामोरे
जाण्याची वेगळी रित, हे शोधणारच.
सकाळचे कोवळे ऊन, आपण सगळेच बघतो, पण हा सामान्य अनुभव,
ज्यावेळी पाडगांवकर, मोर केशराचे झुलती, पहाटेस दारी, अशा शब्दात मांडतात,
त्यावेळी दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
विरहात जळणे, हा तसा काही वेगळा अनुभव नाही, पण त्याच विरहाला
अत्यंत समंजसपणे सामोरे जाणे, जर एखाद्या कवितेत दिसले, तर निदान
मला तरी ती आवडेल.
मराठीतली नाही पण हिंदीतली दोन उदाहरणे देतो. चलो इकबार फिरसे
अजनबी बन जाय हम दोनो, (चित्रपट गुमराह) आणि, छोड दे सारी
दुनिया किसी के लिये ( चित्रपट सरस्वतीचंद्र )
आता मला का आवडेल, तर माझी हि प्रवृत्ती आहे. जर मला स्वत:
दु:खाचा बाऊ करत बसणे, आवडत असेल तर मला तशा कविता आवडतील.
आणि जर माझ्या मनात, विरहास कारणीभूत झालेल्या व्यक्तीचा सूड घ्यावा,
त्या व्यक्तीला शिव्याशाप द्यावेत, अशी सुप्त जरी इच्छा असेल, तर मला
तशा कविता आवडतील. (तू हां कर या ना कर, तू है मेरी... टाईप.)
मला वाटते, कि कविच्या आणि वाचकाच्या तारा जूळणे, हा महत्वाचा
भाग असावा का ?
हेच लॉजिक थोडे पुढे नेतो. जर मला देवदास सारखे दारू पिऊन दु:ख
विसरायची सवय असेल, तर मला दारूविषयी शेर आवडतील, पण जर
मला दारूबद्दल प्रचंड तिरस्कार असेल, तर मला अर्थातच, ते आवडणार नाहीत.
म्हणजे निदान माझ्यापुरते तरी खरे आहे, कि जर कवितेतला अनुभव,
त्याचे शब्दांकन आणि लावलेला अर्थ, जर माझ्या मानसिक क्षमतेच्या
खालच्या पातळीवर असेल, तर ती कविता मला आवडणार नाही. जर
माझ्याच मानसिक पातळीवर असेल, तर ती मला पटेल, आणि
जर माझ्या मानसिक पातळीच्या वरची असेल, तर मला आवडेल.
सध्या एवढेच, मग आणखी डोके खातो.
योग, तुमचे उत्तर आवडले... जसा
योग, तुमचे उत्तर आवडले... जसा कवीचा दृष्टीकोन -जसे-नकारात्मक, निराशावादी, आशावादी, आनंदी, विनोदी इ. त्याच्या कवितेत दिसून येतो, तसाच प्रतिसादकाचा दृष्टीकोनसुद्धा समजतोच की! त्यातूनही त्याची नकारात्मक, सकारात्मक विचार करण्याची पद्धत समजून येते.
अनुल्लेखाविषयी तुम्ही बोलताय... हं त्याची मात्र अनेक कारणे असू शकतील आणि तो मात्र माबोपुरता मर्यादित विषय झाला. जुन्या माबोकरांनी या विषयावर प्रकाश टाकला तर बरे होईल.
मुटेजी, कवीवर उपचार... तो तर माबोकर करतच असतात...मानसशास्त्रज्ञापेक्षाही प्रभावीपणे
दिनेशदा, खुप मस्त शेअरींग... या शेअरींगमधे मला नाही वाटत तुम्हाला काही शंका आहेत. (आहेत का?)तुम्ही उलट त्यात बर्याच प्रश्नांची उत्तरंच दिली आहेत. कवी त्यांच्या मनोवस्थेला साजेशी कविता त्या त्या वेळी करतो. हे तर स्पष्टच आहे. त्याच्या रचनेतून त्याची मानसिक पातळी तर नक्कीच दिसून येते, यात काही वादच नाही आणि कोणत्या प्रकारच्या कवीतेला प्रतिसादक समरसून दाद देतो आहे, यावरुन प्रतिसादकाचीही मानसिक पातळी, किंवा वेगळ्या शब्दात बोलायचे तर 'विचार करण्याची दिशा' समजू शकते.
आता मला का आवडेल, तर माझी हि
आता मला का आवडेल, तर माझी हि प्रवृत्ती आहे. जर मला स्वत:
दु:खाचा बाऊ करत बसणे, आवडत असेल तर मला तशा कविता आवडतील.
आणि जर माझ्या मनात, विरहास कारणीभूत झालेल्या व्यक्तीचा सूड घ्यावा,
त्या व्यक्तीला शिव्याशाप द्यावेत, अशी सुप्त जरी इच्छा असेल, तर मला
तशा कविता आवडतील. (तू हां कर या ना कर, तू है मेरी... टाईप.)
मला वाटते, कि कविच्या आणि वाचकाच्या तारा जूळणे, हा महत्वाचा
भाग असावा का ?
>> हे मला तरी पटत नाही. अगदी वरवरचे वाचन करणार्यांबाबत सुद्धा हा मुद्दा पटत नाही. मिल्स अॅन्ड बून आवडीने वाचणार्या , त्यातल्या नायिकांवर आलेल्या आपत्ती वाचून घळघळा रडणार्या मुली इतर मैत्रिणींवर , भावजयींवर बुलिइंग, रॅगिंग करणार्या पाहिल्या आहेत. लॉर्ड ऑफ द फ्लाइज मधली दोन पानं सुद्धा या मुली वाचू शकणार नाहीत.
युद्ध कथा, रहस्य कथा, थरार कथा वाचणारे पण प्रत्यक्ष आयुष्यात अन्याय मुकाट्याने सहन करणारे पुरुष सुद्धा पाहिले आहेत.
पण लेखाचा विषय कविता लेखन
पण लेखाचा विषय कविता लेखन आहे. वाचकाला काय आवडतय काय नाही ह्याचा इथे काही संबंध नाही.
मिल्स अॅन्ड बून आवडीने
मिल्स अॅन्ड बून आवडीने वाचणार्या , त्यातल्या नायिकांवर आलेल्या आपत्ती वाचून घळघळा रडणार्या मुली इतर मैत्रिणींवर , भावजयींवर बुलिइंग, रॅगिंग करणार्या पाहिल्या आहेत. लॉर्ड ऑफ द फ्लाइज मधली दोन पानं सुद्धा या मुली वाचू शकणार नाहीत. मेधा ह्याला एकतर दुटप्पीपणा म्हणता येईल, किंवा वाचलेल्या गोष्टीचा प्रत्यक्ष आयुष्यात अंतर्भाव करण्यासाठी लागणार्या वैचारिक बैठकीचा आभाव. त्या कथांमधील नायिकांमधे ह्या मुली स्वत:ला पहात असतील आणि त्यांना रडू येत असेल, पण तिच गोष्ट ते आपल्या मैत्रीणीच्या किंवा भावजायीच्या बाबतीत नसतील करत ना? म्हणजेच त्यांचे तादात्मिकरण नायिकेशी आहे, मैत्रिणीशी किंवा भावजायीशी नाही. म्हणूनच त्यांच्यावर होणार्या अन्यायाशी त्यांना सह-अनुभूती नाही.
युद्ध कथा, रहस्य कथा, थरार कथा वाचणारे पण प्रत्यक्ष आयुष्यात अन्याय मुकाट्याने सहन करणारे पुरुष सुद्धा पाहिले आहेत. आणि यावरुन मात्र हे समजते, की अशा कथा वाचणार्यांचा आदर्श गुण शौर्यवृत्ती आहे, पण त्याच शौर्याचा त्यांच्यात मात्र आभाव आहे.
थोडक्यात, कवितेतून, किंवा ऐकत असलेल्या गाण्यांमधून माणसाची मनोवृत्ती दिसून येते, हे जरी असले, तरी ते त्या मनोवृत्तीनुसार प्रत्येकवेळी कृती करतीलच असे नाही. किंवा त्यांना तशी कृती जमेलच असे नाही.
कवितेतून, किंवा ऐकत असलेल्या
कवितेतून, किंवा ऐकत असलेल्या गाण्यांमधून माणसाची मनोवृत्ती दिसून येते >>> हे अजिबातच नाही पटले. मला फॅशन शो बघायला खूप आवडतात. मग मला फॅशन करणे आवडलेच पाहिजे का ? तसे नसेल तर मी दुटप्पी म्हणायचे का ?
वाचणार्यांचा आदर्श गुण शौर्यवृत्ती आहे, पण त्याच शौर्याचा त्यांच्यात मात्र आभाव आहे >>> कित्येकदा आपल्यात ज्याचा अभाव आहे अशा गोष्टी दुसर्यांनी केलेल्या बघायला/वाचायला आवडतात. स्वतःला अन्यायाचा सामना करणे जमत नाही. पण ते समाधान अशी कॅरेक्टर्स वाचून मिळत नसेल कशावरुन ?
बरोबर आहे सिंडरेला...
बरोबर आहे सिंडरेला... माझ्याही मनात अगदी हेच आले होते...:) आता हा विषय भलताच व्यापक व्हायला लागलेला आहे. कवितेवरुन, गाणी, संगीत, शब्द, प्रतिक्रिया, प्रतिसादकांच्या धारणा, अनुल्लेख आणि आता वाचन आणि वाचनातून निर्माण झालेल्या भावना आणि त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यातील वर्तणूकीशी रिलेव्हन्स...
चांगले आहे... विचारमंथनाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत
कित्येकदा आपल्यात ज्याचा अभाव
कित्येकदा आपल्यात ज्याचा अभाव आहे अशा गोष्टी दुसर्यांनी केलेल्या बघायला/वाचायला आवडतात. स्वतःला अन्यायाचा सामना करणे जमत नाही. पण ते समाधान अशी कॅरेक्टर्स वाचून मिळत नसेल कशावरुन ?>>> अगदी अगदी मला हेच तर म्हणायचेय!!!! म्हणूनतर आदर्शगुण असे म्हणाले मी...
कवितेतून, किंवा ऐकत असलेल्या गाण्यांमधून माणसाची मनोवृत्ती दिसून येते >>> हे अजिबातच नाही पटले. अगं त्याचा रिलेव्हन्स दिनेशदांच्या पोस्टशी होता... मनोवृत्ती म्हणजे त्या त्या वेळेची मानसिक अवस्था गं... तू ते मागचे पोस्ट पुन्हा वाच माझे आणि दिनेशदांचे...
इथे कम्युनिकेशन प्रॉब्लेम होतोय...
मला फॅशन शो बघायला खूप आवडतात. मग मला फॅशन करणे आवडलेच पाहिजे का ? तसे नसेल तर मी दुटप्पी म्हणायचे का ? तुला फॅशन शो अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी आवडू शकतात गं... हे असे दोन वेगळे मुद्दे एकत्र कशाला आणायचे? त्यातल्या भावना लक्षात घेऊया आणि मग चर्चा करुया...
विषयाची व्यापकता वाढली आणि
विषयाची व्यापकता वाढली आणि संदर्भांची गल्लत व्हायला लागली आहे इथे...
बरोबर आहे सिंडरेला... >>>>
बरोबर आहे सिंडरेला... >>>> ह्यात सिंडरेलांचं नाव बोल्ड करायचं राहिलं की !!
पराग पराग
पराग पराग
मानसिक क्षमतेशी कवितेची
मानसिक क्षमतेशी कवितेची आवड-नावड निगडीत आहे हे मान्य पण <<हेच लॉजिक थोडे पुढे नेतो. जर मला देवदास सारखे दारू पिऊन दु:ख विसरायची सवय असेल, तर मला दारूविषयी शेर आवडतील, पण जर मला दारूबद्दल प्रचंड तिरस्कार असेल, तर मला अर्थातच, ते आवडणार नाहीत.>> हे मात्र नाही सहजासहजी स्विकारता येत. दारूचा तिटकारा असूनही देवदासच्या व्यक्तिरेखेशी तुम्हाला समरस होता येणं/ करायला लावणं हीच तर खर्या काव्याची/साहित्याची महति आहे, असं मी तरी मानत आलो आहे. किंबहुना, माझ्या व्यक्तीगत आयुष्याच्या परिघाबाहेर नेणारं, कक्षा रुंदावणारं साहित्यच मला तरी आवडण्याचीच शक्यता अधिक ! पण हे झालं आपलं माझं प्रामाणिक मत व आवड.
अरेरे, मेधाचे नाव पण मी बोल्ड
अरेरे, मेधाचे नाव पण मी बोल्ड केले नाहीच की... याबाबत दिलगिरी व्यक्त करत आहे
जर मला देवदास सारखे दारू पिऊन
जर मला देवदास सारखे दारू पिऊन दु:ख
विसरायची सवय असेल, तर मला दारूविषयी शेर आवडतील, पण जर
मला दारूबद्दल प्रचंड तिरस्कार असेल, तर मला अर्थातच, ते आवडणार नाहीत.
----------------------------------------------------------------
हे तुम्ही स्वतःबद्दल लिहिले असेल तर ठीक आहे पण मला वाटते हे प्रातिनिधिक मत नसावे.
मी आयुष्यात कधीच दारु प्यायलो नाही (दु:खाच्या अगर आनंदाच्या प्रसंगी) पण मला दारुविषयीचे शेर प्रचंड आवडतात.
माझे बालपण मध्यमवर्गीय होते (गरिबी वगैरे नाही) पण ह बा यांची एक गरीब मुलांबद्दलची कविता मला अतिशय आवडली.
मला वाटते कविता असो, लेख असो वा कुठलाही साहित्याचा प्रकार असो त्याच्या लेखकाशी/कवीशी कनेक्ट होणे महत्त्वाचे. तुम्ही तो अनुभव घेतलेलाच असला पाहिजे ही अट नसते (नसावी बहुतेक).
सिंडरेलाला अनुमोदन.
भाऊ, तुम्ही आता या गोष्टीकडे
भाऊ, तुम्ही आता या गोष्टीकडे अजूनच व्यापक दृष्टिकोनातून पाहिलंय
मनस्मी, मला पण हवंय
मनस्मी, मला पण हवंय अनुमोदन... मी पण नायिकेच्या व्यक्तिरेखेशी तादात्मिकरण हा मुद्दा मांडला होता...
इथे कम्युनिकेशन प्रॉब्लेम
इथे कम्युनिकेशन प्रॉब्लेम होतोय >>> अजिबात नाही. मला कुठल्याही संदर्भाने तो मुद्दा पटलेला नाही.
त्यातल्या भावना लक्षात घेऊया आणि मग चर्चा करुया >>> कुणाच्या भावना ? मला वाटले मुद्दे लक्षात घेऊन चर्चा करायची.
असो, मी आता कल्टी.
असो, सिंडरेला... हरकत नाही...
असो, सिंडरेला... हरकत नाही... सर्वांनाच सर्वांचेच सर्वच मुद्दे पटलेच पाहिजे असे नाही... आणि माझा तसा आग्रहही नाहीये...
मला वाटले मुद्दे लक्षात घेऊन चर्चा करायची.>>> हो बरोबर... चालेल. पण तू तर कल्टी मारतेयस... असो.
बरं ह्या लेखाला 'काव्योपचार
बरं ह्या लेखाला 'काव्योपचार पद्धती: एक ओळख' असे नाव दिले, तर ठिक आहे का?
--------------------------------------------------------------------
सानी,
मला वाटते हे शीर्षक बरोब्बर होईल.
तुम्ही लिहिलेले मी पुर्ण वाचले नाही पण असे लिहिले असल्यास माझ्यातर्फे तुम्हालाही कंडीशनल अनुमोदन
Pages