Submitted by संयोजक on 4 September, 2010 - 01:25
कार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.
६. यात एक व्यक्ती कितीही वेळा मुद्यांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहू शकते. फक्त ते करताना सलग दोन अगर अधिक प्रतिसाद लिहू नयेत.
७. या कार्यक्रमासाठी दर तीन दिवसांनी मुद्यांचा एक संच दिला जाईल.
८. या कार्यक्रमासाठी विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत लघुकथा लिहू शकता.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
एकदा होते एक पडके गाव. त्यात
एकदा होते एक पडके गाव.
त्यात होते एक पडके पोष्ट.
पोष्टमास्तरांच्या घरात झाला भासाचा पुरातत्व संशोधक म्हणुन पुनर्जन्म.
(इथे झाली आमची गोष्ट असे लिहिले नाही तर लोक विचारतील पुढचा भाग केंव्हा म्हणुन).
कसलं भन्नाट आहे कथाबीज! आता
कसलं भन्नाट आहे कथाबीज! आता ह्यावरच बहुतेक रात्री स्वप्नं पडणार की कॉय? बघते काही लिहायला सुचलं तर!
चक्र "काय जोक झाला रे
चक्र
"काय जोक झाला रे मुलांनो?"
"सर, तुम्ही दररोज नर्मदेच्या तीरावर जाऊन बसता ना, तर संजीव म्हणाला, 'सर इन लव्ह विथ नर्मदाबाई. कम एएसएपी.' अशी तार मॅडमना करायला पाहिजे."
" बरं, तुमच्यातील काहींचं हे पहिलंच डिग. कसं वाटतंय?"
"भन्नाटच. सर, नर्मदेच्या काठी इ.स.पूर्व ४०००च्या आसपासचं निओलिथिक शहर सापडण्याने बर्याच थिअरीज उलटपालट होणार आहेत. सिंधु संस्कृतीची सुरुवात मेहेरगढ की इथले डिग हा वाद पहिले झडेल. टु बी अ पार्ट ऑफ सच अ ह्यूज डिस्कव्हरी इज अनबिलिव्हेबल. आणि सर तुमच्याबरोबर काम करायला मिळणे हेच आमच्यासाठी खरंतर खूप आहे. तुम्हाला पर्फेक्ट माहिती असतं कुठे काय असणार आहे ते. तुम्ही सांगितलंत इथे सामूहिक स्वयंपाकघर असेल तिथे बरोबर तेच सापडले. तीच गोष्ट गोठ्याची. जणू काही या नगररचनाकाराने शहराचा आराखडाच तुम्हाला दाखवलाय. सिंप्ली अमेझिंग! तरी सर एक कळत नाही. एवढ्या मोठ्या शहराची मातीच्या भांड्यांची गरज भागवण्यासाठी इथे नक्की किती कुंभार असतील? आय मीन, हाताने मातीची भांडी घडवायला चिकार वेळ लागत असेल तरी इथे प्रचंड प्रमाणावर भांडी दिसतायत. बीपीएन-७चा खापरांचा खच पाहता तिथे नक्की कुंभारवाडा असणार."
"ह्म्म्म..... उद्या बघू काय मिळतंय तिथे. गुडनाइट."
**************************
इथे डिगला आलो तेव्हा असे काही होईल वाटले नव्हते. शहराचे पुरावे सापडायला लागले आणि मी केवढा उत्तेजित झालो. झपाटून गेलो होतो. पण मग 'ती' कवटी सापडली आणि स्वप्ने सुरू झाली. कुठल्यातरी जुन्या शहरात मी राहतोय, फिरतोय आणि एक माणूस सतत माझ्याकडे पाहतोय असली स्वप्ने. माणसाला चेहरा नाही, नुसतीच कवटी.... 'ती'च. आधी वाटलं, खूपच एक्साइट झाल्यामुळे असेल. पण जसा डिग वाढतोय तसतसं स्वप्नंसुद्धा जास्त ग्राफिक होत आहेत. त्यातलं डिटेलिंग.... माय गॉड! स्वप्नात एके ठिकाणी गोठा दिसला. अगदी स्पष्ट, त्यातल्या गुरांच्या रंगांसकट. तिथेसुद्धा कवटीवाला माणूस होता. गुरांचं हंबरणं ऐकू आलं. ते तर नंतर साइटवरही ऐकू येऊ लागलं. बीपीएन-१४ला काम सुरू केल्यावर लगेच त्या रात्री स्वप्न मोठ्या स्वयंपाकघराचं. कवटीवाला माणूस चुलीवर कुठलंतरी मांस भाजतोय. दुसर्या दिवशी तिथे अचानक स्वयंपाकाचा घमघमाट आला. अगदी व्यवस्थित..... मला एकट्यालाच. स्वप्न आणि वास्तव फरकच अस्पष्ट होत चाललाय की काय असं वाटू लागलं. बीपीएन-७ला काम सुरू केल्यावर सतत डोक्यात चाक येऊ लागलं आणि स्वप्नात पहिल्यांदाच कवटीच्या जागी चेहरा दिसला.... माझाच. मला चाकांबद्दल विचित्र फॅसिनेशन वाटू लागलं. चक्र.... जगातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं यंत्र. मेसोपोटेमियाच्या आसपास चाकाचा जन्म झाला असं आपण मानतो. तो संशोधक अज्ञात आहे. कसं सुचलं असेल त्याला? नर्मदेच्या काठी बसावेसे वाटू लागले. तिथले गोटे तासन् तास न्याहाळू लागलो, ते नर्मदेत कसे पडतात..... घरंगळत, घरंगळत.... फॅसिनेटींग! (दोन दिवसांनी बीपीएन-७ला नर्मदेचे गोटे आढळले) एक मोठा दगड घ्यायचा..... तासून गोट्यासारखा वाटोळं बनवायचं.... तो मजेशीर फिरतो. दगड घासायला अवघडच. लाकूड घेतले तर? त्याला कोरून वाटोळं बनवायचं. गोट्यापेक्षाही जास्त चांगलं वाटोळं. तेही गोट्यासारखं घरंगळतं.... लाकडापेक्षाही भाजक्या मातीचं खापर तासायला सोपं. त्याला गोट्यासारखं करत असताना हातातून खाली पडलं..... खापरावर एक टुंबुक होतं.......आपटून जागच्या जागीच मजेशीर फिरलं. हे नवीनच. मग मुद्दाम जमिनीवर टाकायला लागलो..... जास्त चांगलं वाटोळं केलं की जास्त मजेशीर आणि जास्त काळ फिरतं हे लक्षात आलं........... स्वप्न कुठले आणि वास्तव कुठले? मला काय होतंय याचा मी अंदाजच करू शकतो.
काल बीपीएन-७ साइटला एक सुरईसारखे निमुळत्या तोंडाचे भांडे सापडले. त्यात मोठ्या माणसाचा हात जाणे शक्यच नाही. निमा गंमतीने म्हणाली, सर इथली लहान मुलेसुद्धा कुशल कुंभार होती असे दिसते.
उद्या आम्ही बीपीएन-७ला अजून खोल जाऊ. मला माहिती आहे तिथे काय मिळणार आहे. तिथे मला चक्र सापडणार आहे..... दुसर्यांदा.
पायर्या *** माथेरानचा माऊंट
पायर्या
***
माथेरानचा माऊंट बंगला.
हनीमूनसाठी यापेक्षा चांगली जागा सापडलीच नाही का? याचं काही उत्तर नव्हतं. आलो खरं.
बंगल्याच्या आवारात दाट झाडं आणि शंभरेक तरी माकडं. त्यातली काही तर भली थोरली. भितीदायक दिसत होती. निशाचे घाबरणे बघून मलाही जरा अवघडल्यासारखे झालेच. आणि थोड्या काळजीत पडूनच मागचा दरवाजा उघडला.
आणि अक्षरशः थक्क झालो. नजर पुरेस्तोवर हिरवंकंच जंगल. गुढ दाट धुकं.
खोलीच्या मागल्या दरवाज्याला लागूनच लाकडी उतरत्या छताखाली भलाथोरला लांबलचक पॅसेज. पलीकडे मोठी मोकळी जागा. त्यात भलीमोठी लांबरूंद दगडाची बाकडी. 'सी' आकारात मांडलेली. इंग्रज लोकांनी केलेली ही विश्रांतीची व्यवस्था- असं तिथल्या आर्डर्लीनं- शांतारामानं सांगितलं. या अख्ख्या मोकळ्या जागेवर आणि त्या दगडी बाकांवरही शेवाळाचं साम्राज्य होतं. या प्रशस्त विश्रांतीच्या ओट्याच्या कडेला आलो, तर उजव्या आणि डाव्या- दोन्ही बाजूला खालच्या घनदाट जंगलात उतरण्यासाठी केलेल्या छान गोलाकार पायर्या. हे म्हणजे हिंदी सिनेमातल्या मोठ्या घरांत वरती जाण्यासाठी दोन्ही बाजूला भव्य गोलाकार जिने असतात, तसं दिसत होतं. या पायर्यांवर तर इतकं शेवाळ साचलं होतं, की दुरून बघितल्यावर त्या खालच्या रानात बेमालूम मिसळल्यागत वाटत होत्या.
मंत्रमुग्ध होऊन, निशाचं न ऐकता त्या पायर्या मी जपून उतरून जाऊ लागलो. खाली पोचल्यावर वरती बघितले, तर निशाचा भयग्रस्त चेहेरा. इथून तर अख्खाच माऊंट बंगला गायब झालेला दिसत होता. या स्वर्गीय शांततेचा मोह मला क्षणभर पडला, पण निशाचा पुन्हा आवाज आल्यावर मी गंमतीने तिला काहीतरी बोलत वरती चढायला सुरुवात केली.
आठ-दहा पायर्या चढल्यावर कसलासा आवाज आला, नि मी चरकलो. मागे वळून पाहण्याच्या नादात जे व्हायचे तेच झाले आणि शेवाळावरून सरकून मी त्या पायर्यांवर अक्षरशः साष्टांग घातला. तशाच पडून राहिलेल्या अवस्थेत मी वरती निशाकडे बघितले खरे, पण तिच्या थरकापलेल्या हाकांच्या व्यतिरिक्तही काही आवाज येत होते, ते भास होते का- याचा अंदाज घेत मी दोन क्षण तिथेच पडून राहिलो.
मला क्षणभर दरीच्या अगदी टोकावर असल्यागत भोवळ आली, आणि अंगावर सरसरून काटा आला. हीच अवस्था. हेच आवाज. हेच भास. आणखी कुठेतरी. कुठे बरं?
***
"आता सारखी खिल्ली उडवत राहणे बंद कर. इतर सांगतात त्यातही काही तथ्य असेल, असं तुला वाटत नसेल तरी सांगितलं ते कर. मी म्हणतेय म्हणून.." आईने खमक्या आवाजात सांगितलं, तसं मला नाईलाजाने का होईना गंभीर व्हावंच लागलं. पुढल्या आठवड्यात माझं लग्न, म्हणून गावच्या आद्य दैवताला नारळ फोडणे, नैवेद्य दाखवणे हा कार्यक्रम. 'कुंवारपणाची पूजा' असं काहीतरी होतं ते.
हे आमचं जुनं गाव. कड्याच्या अगदी काठावर वसलं होतं, पण काही कारणाने अख्खं गाव काहीशे वर्षांपुर्वी शेजारीच दोन फर्लांग अंतरावर विस्थापित झालं. इतक्या वर्षांनतरही घरांचे अवशेष दिसत होते. आमच्या एका पणजोबांनी ते तरुण असताना इथल्या जुन्या घराची जागा खजिन्याच्या हव्यासाने झपाटल्यागत खणून काढली होती, ती जागा आता मी पुन्हा पाहिली. कितीतरी दिवसांनी मी इथे येत होतो. संधीप्रकाश आहे, तोवर जरा फिरावं असा विचार करून मी कड्याच्या दिशेने चालू लागलो. टोकाला आलो, तर खालच्या दरीत उतरण्यासाठी पायर्या दिसल्या. याआधीही त्या बघितल्या होत्याच, पण आता मी त्या उतरून जायचं ठरवलं. वेड्यावाकड्या दगडांतून केलेल्या चाळीसेक तरी पायर्या असतील त्या. खाली गेल्यावर वरती बघितलं तर फक्त पायर्या आणि त्यामागे आकाश. खाली सरळ दगडी कडा. हे खरंच स्वर्गीय, सुंदर आणि गुढसं वाटत होतं. ते अनुभवत असतानाच आईच्या हाका ऐकू आल्या म्हणून चढू लागलो. थोडं चढल्यावर दगडांच्या फटीतून उगवलेल्या एका झुडपात पाय अडकून सपशेल पडलोच. तशाच अवस्थेत वरती बघितलं तर काठावर उभ्या असलेली आई भयग्रस्त चेहेर्याने हाका मारतेय. पण कसलेतरी आवाज आता खालूनही येत होते. हा माझाच आवाज आहे की काय? आणखी कसले तरी आवाज. माती-दगड खणत, उपसत असल्याचे.
मी वरती आलो. एकदा दरीकडे पाहून परत वळलो खरं, पण काहीतरी सुटून जात असल्याचं, राहून गेल्याचं वाटत राहिलं, ते घरी येईस्तोवर.
***
रात्री मी पुन्हा माऊंट बंगल्यामागे जाऊन खाली उतरायचे ठरवले. हे निशाला सांगून फायदा नव्हता. तिने गोंधळ घालून आताच परतीची वाट धरायला लावली असती.
मागल्या दाराचा बोल्ट काढला आणि हळूच त्याला बाहेरून कुलुप लावून मी पॅसेजमध्ये आलो, तेव्हा थंडगार हवेने शहारायला झालं. पण क्षणभरच. माथेरानच्या जंगलाचा तो हिरवागर्द, ताजा-कच्चा पण तरीही उग्र गंध नाका-छातीत भरून घेत मी पॅसेजच्या पायर्या उतरून त्या शेवाळाने बरबटलेल्या मोठ्या चौकोनी जागेत आलो. ती संपल्यावर आता त्या पायर्या होत्या. क्षणभर थबकून मी बॅटरीच्या उजेडात त्या न्याहाळल्या, आणि किर्र अंधारात बुडालेल्या जंगलाकडे एक नजर फिरवली. मनाचा हिय्या करून मी त्या पायर्या उतरून खाली गेलो, आणि जंगलाची वाट चालू लागलो.
चक्क मशाली पेटलेल्या दिसल्या, तेव्हा आपण खूप वेळ, बहुतेक खूप युगे चालत होतो, असा भास मला झाला. त्या उजेडात काहीतरी काम चाललंय. हे दिसल्याचं मला नवल कसं वाटलं नाही? की अपेक्षितच होतं? कमाल आहे!
जवळ जाऊन पाहिलं, आणि मग मात्र क्षणभर माझ्या शरीरात वीज फिरून गेली आणि दुसर्याच क्षणी शेवाळाचा थंडगार स्पर्श माझ्या सार्या शरीराला होत असल्यागत झालं. त्या उजेडात जो कुणी त्या खणणार्या, माती बाजूला करणार्या कामगारांना सूचना देत होता- तो मी होतो! अक्षरशः मी!!
मी जवळ जाऊन निरखून पाहिलं. माझाच चेहेरा, कपडे आणि आवाजही. कितीतरी वेळ मी तिथल्या त्या मला न्याहाळत उभा असेन देव जाणे. भान आलं तेव्हा त्यांच्यापैकी कुणीतरी मला सांगत होता, ''मी आर्किऑलॉजिस्ट होणार' असं कधीकाळी तू घोकलं होतंस- आठवतं ना? झालास बघ तू! पुनर्जन्मात समज. किंवा कित्येक युगे पुढे असलेल्या काळातल्या समांतर जगात समज. पण झालास. अशी अतृप्त मुळे धरून राहिलेल्या जगातल्या तुझ्या जगातल्या अब्जावधी इच्छाआकांक्षांनी अशी अब्जावधी समांतर विश्वे जन्माला घातली आहेत. कदाचित ही सारी विश्वे आपापल्या पायर्या ओळखून एकमेकांपासून दूर राहत असतील. त्या पायर्या तू उतरलास, ओलांडल्यास; आणि काळाला कशा तरी घड्या पडून या दोन 'तू'ची भेट झाली..!!'
***
पहाटे जाग आली, तेव्हा निशाने बॅग आवरायला घेतलेली दिसली. तिच्या म्हणण्यानुसार मी मध्यरात्री मी त्या खालच्या दगडी, शेवाळानं गच्च भरलेल्या बाकड्यावर झोपलेलो होतो! कुठेतरी पडून मला बर्याच ठिकाणी खरचटले होते. शांताराम, त्याची बायको आणि निशा- सर्वांनी मिळून मला उचलून खोलीत आणलं..
निशाला चोरून मी शांतारामाला खालच्या रानात काही काम चाललंय का, असं विचारलं, तेव्हा तो म्हणाला- खूप वर्षांपूर्वी तिथे काहीतरी खणाखणी चालली होती. आता ते खड्डे तसेच पडून आहेत, आणि तिथे दाट झाडी पण उगवली आहे.
***
ऑफिसला पुन्हा रुजू झाल्यादिवसापासून तिथली लिफ्ट न चुकता वापरायचं ठरवून टाकलं. पण सगळीकडेच लिफ्ट्स नसतात. मग मला पायर्या चढाव्या-उतराव्याच लागतात. जीव मुठीत धरून. पण मग नंतर एक गुढानामिक ओढ, उत्सुकता वाटू लागते. तो पुन्हा दिसेल का- याची.
***
***
(नारायण धारपांच्या एका कल्पनेवर आधारित)
अरभाटा साजिरा, खासच रे
अरभाटा
साजिरा, खासच रे
अरभाट अन् साजिरा, मस्त
अरभाट अन् साजिरा, मस्त लिहिलंय.
वॉव! काय लिहीता तुम्ही लोक!
वॉव! काय लिहीता तुम्ही लोक! साजिरा,कसलं गूढ वातावरण उभं केलंस! अप्रतिम.
अरभाट, चक्राची संकल्पना सुंदर मांडलीस कथेत.
मस्त आहेत दोन्ही कथा.
मस्त आहेत दोन्ही कथा.
वॉव! दोन्ही कथा मस्तच!
वॉव! दोन्ही कथा मस्तच!
गणेशोत्सव २०१० अंतर्गत
गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.