टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ९ - लाजो

Submitted by संयोजक on 20 September, 2010 - 01:29

ऑल-इन-वन आणि वन-इन-ऑल

जगात कुठेही जा तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्वत्र मिळतील. काही अंशी या बाटल्या परत वापरल्या जातात, काही रिसायकल केल्या जातात, तर काही बाटल्यांचे प्लॅस्टिक बायोडिग्रेडेबल असते. परंतु ५०%हून अधिक बाटल्या कचर्‍यात जातात आणि पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत ठरतात. ही होणारी हानी कमी करायला आपल्याकडून हातभार लागावा या उद्देशाने प्लॅस्टिकच्या बाटलीचे काही कलात्मक उपयोग इथे देत आहे.

--------------------------------

साहित्य:

प्लॅस्टिकच्या बाटल्या (पेट बॉटल्स) कोक, पेप्सी, मिनरल वॉटर वगैरेच्या बाटल्या, दुधाच्या बाटल्या, तेलाच्या बाटल्या इ. जुने पुठ्ठे, उरलेले मणी, बटणं, जुनी मासिके/कॅलेंडर, धारधार चाकू, फेव्हिकॉल/सुपर ग्लू.
--------------------------------
पूर्वतयारी:

प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ धुवून, त्यावरील स्टिकर काढून टाकावे. बाटली कोरडी झाली की त्यावर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे मार्किंग करावे. आता धारधार चाकूने बाटली त्या मार्किंग वर कापावी. बाटलीचे ३ भाग होतील. त्याला आपण वरचा भाग - 'अ', मधला भाग - 'ब' आणि तळाचा भाग - 'क', असे म्हणू.

TT_Lajo_All-in-one -1.JPG

---------------------

सुरुवात बाटलीच्या 'अ' पासुन करु...

१. दिव्यांची रंगीत माळ : साधारण ८-१० बाटल्यांचे 'अ' भाग. सारख्या साई़जचे नसले तरी चालेल. झाकण व रिंग्स काढून टाकावेत. आपल्या आवडीप्रमाणे 'अ' भागांना रंग, चमकी, टिकली लावून तयार करावेत. छोट्या दिव्यांच्या (लेड लाईट्स - जे जास्त गरम होत नाहित) माळेमधले दिवे बाटलीच्या तोंडातुन आत घालावेत आणि माळेची वायर व 'अ' भाग सेलोटेप ने बंद करावेत. बाटलीच्या तोंडावर वरतून हवे तर एखादी उरलेली रॅपिंग ची रिबीन गुंडाळावी - झाली सुंदर रंगीबेरंगी माळ तयार Happy

TT_Lajo_All-in-one -2.JPG

२. वॉल आर्ट: एका जुन्या बॉक्सच्या पुठ्ठ्यावर जुन्या मासिकातील चित्रांचे तुकडे/ रॅपिंग पेपर आणि बाटल्यांची वेगवेगळ्या रंगांची/ साइझ ची झाकणं उलट सुलट लावुन कोलाज अरेंज करावं आणि पुठ्ठ्याला चिकटवावं. मी जुने कॅलेंडर आणि गिफ्ट पेपर वापरुन ह्या वॉल आर्टस बनवल्या आहे. शर्ट, पँट, ड्रेस यांच्याबरोबर येणारी एक्स्ट्रा बटणे शिवणाच्या डब्यात पडून होती, ती बटणे आणि काचेचे मणी वापरले आहेत.

अ‍ॅक्रलिक रंग किंवा चमकी, टिकल्या लावून देखिल आपले वॉल आर्ट सजवता येईल. एखादी जुनी फोटो फ्रेम असेल तर त्यामधे हे लावावे. फ्रेम ही रंग, टिकल्या वगैरेनी सजवता येईल. फ्रेम नसेल तर अजून एखादा जाड पुठ्ठा/ पॅकिंगमधे आलेला थर्माकोलचा तुकडा यावर आपली कलाकृती माऊंट करावी.

--------------------------------

भाग 'ब' चे उपयोग:

३. पडदा/स्क्रिन: मधल्या भागावर वर प्रचि १ मधे दाखवल्याप्रमाणे मार्किंग करुन त्याची कडी कापावीत. या कड्यांना दोन विरुद्ध बाजुंना सुईने (क्रॉसस्टिच/छोटे दाभण) भोके पाडावीत. ही कडी आणि जुने मणी, बटणं, वगैरे नायलॉनच्या किंवा रेशमी दोर्‍यात ओवून आपल्याला हव्या त्या उंचीची माळ बनवावी. वरती अडकवायला बाटल्यांच्या तोंडावर असलेल्या रिंग्स काढून त्या वापराव्यार किंवा जुने वॉशर्स देखिल वापरता येतील. आपल्याला हव्या तेव्हढ्या माळा बनवून सुंदर पडदा/स्क्रिन तयार करावा Happy

TT_Lajo_All-in-one -4.JPG

४. सन कॅचर/चिमणाळं: 'ब' भाग मधे कापून ओपन करावा. त्याच्यावर पेनने आपल्या आवडीचे आकार काढावेत. चाकूने, कात्रीने हे आकार कापून घ्यावेत. या आकारांना आवडीप्रमाणे रंगवून अथवा चमकी, टिकल्या लावाव्यात. असेल तर खाली छोट्या घंटा, घुंगुर लावावेत. हे आकार दोर्‍यात ओवावेत. मधे मधे मणी घातले तरी छान दिसेल. हे तयार आकार भाग 'अ' मधे ओवावेत. बाटलीच्या झाकणाला भोक पाडून त्यातुन एक रिबीन, दोरा ओवावा. वरती हवा तर एक जुना वॉशर/रिंग लावुन सुर्यप्रकाश येणार्‍या खिडकीत/दरवाज्यात टांगावे. ऊन पडल्यावर हे पारदर्शक रंगीत आकार घरातल्या भिंतींवर मस्त रंग उधळतात Happy

--------------------------------

भाग 'क' चे उपयोग:

५. ज्वेलरी सॉर्टर/स्टेशनरी ऑर्गनायझर: भाग 'क' च्या वरच्या कडांना गोंद/सुपर ग्लू लावून त्यांना चमकी/रंगीत वाळू, रंगीत कागदांचे बारिक तुकडे, गिफ्ट रिबीन चिकटवावेत. कडा नीट कोरड्या झाल्या की हे 'क' एकमेकांना तुमच्या आवडत्या त्रिकोणात/चौकोनात किंवा इतर कुठल्याही पॅटर्नमधे अरेंज करावेत. लहान मोठे 'क' असतिल तर छान अरेंजमेंट होईल. सुपर ग्लू चे थेंब किंवा डबलसाइडेड टेप चे तुकडे लावून हे 'क' जोडावेत. झाले तुमचे ज्वेलरी सॉर्टर/स्टेशनरी ऑर्गनायझर तय्यार Happy सुपर ग्लू ने चिकटवायच्या ऐवजी 'क' च्यावरच्या कडांना भोकं पाडून त्यातून तार/दोरा ओवला तरी चालेल.

प्रचि ३ मधे दाखवलेल्या स्टेशनरी ऑर्गनायझर मधे मी बाटलीच्या 'अ' भागाचा (उलटा चिकटवुन) पेन, कात्री इ ठेवण्यासाठी वापर केला आहे. पुठ्ठ्यावर जुन्या कॅलेंडरचे पान चिकटवून त्यावर हे 'क' भाग अरेंज केले आहेत.

चाव्या, सुट्टे पैसे, मोबईल हँडसेट, चष्मा/सनग्लासेस इ ठेवण्यासाठी 'क' भाग वेगवेगळ्या उंचीला कापून ऑर्गनायझर बनवलं आहे.

६. आकर्षक टी कँडल होल्डर्स: लहान साइझ च्या बाटल्यांच्या 'क' भागावर सोनेरी लेस आणि चमकी लावुन सुंदर टी कँडल होल्डर्स बनवले आहेत.

TT_Lajo_All-in-one -3.JPG

७. फ्लॉवर आर्ट: 'क' चे फक्त तळ कापून घ्यावेत. छोटी छोटी फुले तयार होतील. या फुलांना आपल्या आवडीनुसार रंगवून, चमकी/टिकली लावून दुसर्‍या बाजुला जुने मेग्नेट चिकटवावे. घरच्या फ्रिजवर सुंदर आर्टवर्क तय्यार Happy मॅग्नेटस च्या ऐवजी मागे ब्लुटॅक, डबलसाइडेड टेप लावून इतर गिफ्ट्स, आर्टिकल्स वर ही फुले चिकटवता येतील.

८. मुदाळ: भाग 'क' ला आतुन तुपाचा/पाण्याचा हात लावुन प्रसादाचा गोड शिरा, भात, उपमा यांच्या मुदा पाडण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे मुदाळं म्हणुन वापरता येईल Happy

--------------------------------

तर अशी ही एक प्लॅस्टिकची बाटली आणि त्याच्या विविध सुंदर कलाकृती. बाटलीच्या प्रत्येक भागाचा विविध तर्‍हेने केलेला उपयोग. मग या प्लॅस्टिकच्या बाटलीला हानीकारक न म्हणता, 'संपूर्णा' म्हणावे का? Happy

--------------------------------

पर्यावरणाच्या हानीला थोड्या अंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीदेखील अश्या विविध कलाकृती बनवून सहकार्य कराल याची खात्री आहे Happy थोडीशी कलात्मकता आणि थोडासाच वेळ. वरील कलाकृती अर्ध्या ते १ तासात पुर्ण होतात. टीव्ही बघता बघता करता येण्यासारख्या वस्तु आहेत Happy

या सर्व कलाकृतींसाठी वापरलेल्या बाटल्या गोळा करण्यासाठी ऑफिसमधे माझ्या सेक्शनच्या किचन मधे एक बॉक्स ठेवला होता व मॅनेजरच्या परवानगीने सेक्शन ला इमेल पाठवून बाटल्या डोनेट करायला विनंती केली. १० दिवसात २० बाटल्या गोळा झाल्या Happy या उपक्रमासाठी मदत केल्याबद्दल ऑफिसमधील सहकार्‍यांचे आभार Happy

मायबोली चे खास आभार Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! अगदी कल्पक! सगळेच उपयोग आवडले! शिर्‍याची मूद झकास आहे आणि ज्वेलरी बॉक्स, लाईटची माळ हे तर खासच!

सही आहेस गं लालु. अख्खी बाट्ली वापरली जाते ह्या मुळे. आणि त्यापसुन तयार झालेले सगळे प्रकार आवडले. मी पण नक्की करुन बघणार. Happy ( क प्रकारावर तर मी जाम फिदा आहे)

लाजो, जबरीच Happy
भात आणि शिर्‍याच्या मुदी एकदम हटके दिसतायत. सगळ्याच वस्तु छान Happy

मी आजवर बाटल्या कापून त्याचे खालचे भाग ब्रशेससाठी, रंगकामाचं पाणी ठेवायला असेच केवळ वापरलेत. पण आता हे सगळं करून बघण्यात येईल.. Happy

लाजो... या विभागातून तुझ्याकडून अपेक्षित होतं पण इतकं छान काहीतरी करशील हे अगदी अनपेक्षितच.
एकदम जबरा !

Pages