थकले रे नंदलाला...
"वाचाल तर वाचाल" असं कोणीतरी म्हणून गेलंय म्हणे. पण यातल्या कुठल्या "वाचाल" चा अर्थ नक्की काय होतो असा मला प्रश्न पडलाय्. वाचनाची 'आवड' वगैरे तशी आहे असं म्हणता येईल. पण रोजच्या आयुष्यातल्या रामरगाड्यात हल्ली अजिबात वेळच होत नाही. त्यातून वाचलात तर काहीतरी 'वाचाल' हा अर्थच अभिप्रेत असावा असं वाटतं. पण 'वाचलंच पाहिजे' असं दडपण येतं हो! लोकांना सहज 'कसं काय, जेवलात का, काय जेवलात' विचारलं तर लोक पुढचा प्रश्न 'सध्या काय वाचताय' असा विचारतात. आता 'काहीच नाही, वेळच नाही' असे कारण दिले तर ते आपली कीव करतील असे वाटते. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून 'मिळाला वेळ की वाच, मिळाला वेळ की वाच' असं होऊन आता 'वाच वाचुनी अति मी दमले..' अशी परिस्थिती आहे.
सध्या "वाचनीय"(वाचता येतील अश्या) गोष्टींचा इतका भडीमार होतोय.. म्हणजे असं पहा, लायब्ररीतून विनामूल्य मिळणारी पुस्तकं, कोणी recommend केली म्हणून, कुठला पुरस्कार मिळाला म्हणून, तर नुसतीच 'चर्चेत' आहेत म्हणून ती आणली जातात. इथे २ आठवड्यासाठी मिळतात आणि बाकी कोणी क्लेम केला नसेल तर ३ वेळा renew करता येतात. तशी ती हटकून ३ वेळा renew होतातच. मग देशवारी झाली की मराठी काही वर दिलेल्या कारणांसाठी आणि कोणी भेट दिली म्हणून येतात. यावर पुन्हा "असावीत" म्हणून subscribe केलेली २-३ magazines. (ही तशी बर्यापैकी जाड असतात, आणि एक चाळून होते न होते तोवर दुसरे हजर!) ही मासिकं, पाक्षिकं वगैरे असतात तरी ती मला ४-५ दिवसांनीच किमान दर आठवड्याला पाठवत असावेत असा संशय येतो. ( आपल्या नकळत एक पंधरवडा किंवा महिना निघून गेला आहे अशी कल्पनासुद्धा करवत नाही.)
पुन्हा इन्टरनेट वरचे अमर्याद साहित्य! "ब्लॉग" नामक काहीतरी प्रकार असतो तिथे कोणालाही जागा मिळते लिहायला मग जागा मिळाली आहे तर त्याचा उपयोग हा केलाच पाहिजे असा स्वभावधर्म त्यामुळं "लेखकू उदंड झाले". यापैकी काही जवळचे लोक, मित्र-मैत्रिणी. कोणीतरी लिन्क देणार, "ए, इकडे माझा ब्लॉग सुरु केलाय. वाच हां. प्रतिक्रिया कळव." पहिल्यांदा बरं वाटलं, कोणी आपल्या मताला किंमत देत असावं म्हणून वाचलं बरंच. अगदी "माझा ब्लॉग तसे यंग लोक वाचतात, पण तुझ्यासारख्या मध्यमवयीन, चाळीशीतल्या लोकांचे जरा अभिप्राय हवे होते" असं एक जण म्हणाली, तरीही! आता मात्र मी 'वेळ काढून वाचेन' म्हणून लांबवते. (मला हल्ली फक्त "तिकडेच" वाचायला वेळ मिळ्तो हे सांगायची हिंमत नाही!) पुन्हा हा वाचनासाठी काढलेला वेळ म्हणजे अगदी स्वत:चा असा. कोणाच्या वाटचा काढून घेतलेला नाही! पण म्हणून काय झाल? असा बहुमोल वेळ घालून वाचलेलं काही अगदीच सुमार निघायला लागलं तर मन:स्तापच होतो.
आपला सर्वपरिचित असा 'गुलमोहोर' किंवा 'रंगीबेरंगी' विसरुन कसं चालेल? कधी कधी फार सुंदर लेखन वाचायला मिळतं. म्हणजे वेळेचा अपव्यय केला असं अजिबात वाटत नाही. पण एकूण हे वाचन जरा डेन्जरच. जीवाला घोरच लागतो. अगदी महत्वाच्या जागी पॉज घेतलेल्या अपूर्ण गोष्टीतल्या पात्राचे पुढे काय होईल, एखादे पात्र एखाद्या कथेत असेच का वागले, तसे वागले नसते तर काय झाले असते, एखादे लेखन पोस्ट केल्यावर त्याच्या लेखकाचे (प्रतिक्रिया वाचून) काय होईल किंवा एखादे लेखन वाचून वाचकांचेच काय होईल अश्या असंख्य काळज्या लागून राहतात!
मग सांगितलंय कोणी? नका वाचू!
तेच! नाहीतर वर्षाचा शेवट आलाच आहे. नवीन वर्षासाठी काहीतरी संकल्प करावा. तर असं ठरवलंय की पुढच्या वर्षभरात (निदान दिवाळीपर्यंत तरी) अज्जिबात अवांतर वाचन करायचे नाही! वर्तमानपत्र, टपाल, कामकाजी, गरज पडल्यास अभ्यासाचे आणि जे 'वाचून दाखवावे लागते' ते सोडून बाकीचं काहीही वाचायचं नाही. मग काय करणार? 'वेळ मिळाला की वाचन' पद्धतीमुळे बाकी काही छंद जरा बाजूला पडलेत. तिकडे वळावं. हल्लीच एका दिवाळी अंकात एक कलेचा छंद जोपासण्याविषयक लेख वाचला त्यामुळं पेंटब्रश कुठल्यातरी ड्रॉवरमध्ये पडले होते ते एकदम खुणावतायत असं वाटायला लागलं. बरेचसे सिनेमे पहायचे राहिलेत असं आठवलं. कॅमेरा जुना झालाय असं लक्षात आलं. वाचायचं नसलं तरी लिहिता येईल असंही वाटतं (घाबरु नका). पण कल्पनाशक्ती तोकडी पडण्याची शक्यता आहे. कोणी मेघनाबाई 'अनुभवकथनात निर्मिती नसते' असं म्हणाल्यात ते काही अंशी पटलं आहे त्यामुळे आणि 'पाऊस पडतोय, बर्फ पडतोय, सकाळ झाली, रात्र झाली' किंवा तत्सम रुटीन गोष्टींतून मला कधी वेगळीच अनुभूती वगैरे होत नाही त्यामुळे तसं काही लिहिण्याची शक्यता कमी. आणि वाचन करायचे नाही म्हणून बाकी छंदासाठी उपलब्ध वेळ थोडाच वाढणार आहे? तेव्हा सध्या एवढी लिस्ट पुरे झाली.
नवीन वर्ष यायला अजून १५ दिवस अवकाश आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तोपर्यंत ११ दिवाळी अंक, ४-५ पुस्तके, २-३ ब्लॉग्ज आणि काही Archives वाचायचे आहेत. त्यानंतरच एकदाचे 'हुश्श' होईल. काही काळासाठी तरी वाचनाला म्हणून डोळे लावणार नाही. बघूया कसं काय जमतं...
लालू!
'हाडाची वाचक' असशील तर असं काहीही होणार नाही इतर 'नवीन वर्षाच्या संकल्पांप्रमाणे' हाही बारगळेल! जानेवारीत काही वाचणार नाहीस कदाचित, पण फेब्रुवारीत राहवणार नाही ज्यांना वाचायला आवडतं, ते सतत काही ना काही वाचत असतातच.. असं ठरवून ते थांबवू शकत नाहीत
(तुझा हा संकल्प सिद्धीस जावू नये अशी 'दिली तमन्ना' आहे माझी )
लोल लालु
माझा ब्लॉग तसे यंग लोक वाचतात, पण तुझ्यासारख्या मध्यमवयीन, चाळीशीतल्या लोकांचे जरा अभिप्राय हवे होते >>> लोल. परत एकदा लोल.
(इकडे ते क्लीपआर्ट कसे काढायचे)
LOL!!
>>>>"माझा ब्लॉग तसे यंग लोक वाचतात, पण तुझ्यासारख्या मध्यमवयीन, चाळीशीतल्या लोकांचे जरा अभिप्राय हवे होते"
LOL!!!
>>>काही काळासाठी तरी वाचनाला म्हणून डोळे लावणार नाही.
नक्की का??
शिव! शिव!
काय हे लालू? कसलं अघोरी न्यू इयर रिझोलुशन? पत्ता कळव बरं तुझा, थोडी ऑडिओ पुस्तकं तरी पाठवते आता तुला!
विचारलं तर लोक पुढचा प्रश्न 'सध्या काय वाचताय' असा विचारतात.>>>>
पार्लेकरानो सावधान!
हा प्रश्न विचारु नका. फक्त मेनु विचारा
न वाचाल तर वाचाल अशी म्हण तयार झाली आहे थोडक्यात
अभिनंदन
अभिनंदन लालु,
असा काही संकल्प करू शकलीस म्हणुन. मला ते शक्यच नाही.
पण तो टिकु नये अशी शुभेच्छाही बरं का !!!
मस्त!
लालु, एकदा विचार करत होते प्रतिसाद लिहावा की नाही, मग म्हटलं की अजुन १५ दिवस तू वाचणार आहेस तर लिहावा.
तुला काही पुस्तकं recommend करायची होती गं.. कधीपर्यंत मोडेल तुझा संकल्प? म्हणजे त्याप्रमाणे पाठवते यादी...
पण एक बरं वाटलं की आपण काहीच वाचत नाही असं depression येणारं अजुनही कोणी आहे तर... I am in good company...
शक्य नाही
लालु, शक्य होत नाही. मी हा संकल्प बरेच वेळा केला आहे. शाळेत असताना परिक्षेच्या वेळी पुस्तकं सुटत नाहीत. आता काय शक्य आहे पुस्तकांचे व्यसन सुटणे. मला आठवतय बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी मी तुंबाडचे खोत वाचुन काढले होते.
उपास करणारे लोक आणि किराणा दुकानदार...
पण यातल्या कुठल्या "वाचाल" चा अर्थ नक्की काय होतो LOL
"असे लोक उपास करायला लागले तर आमचा धंदा चालणार कसा, तेव्हा पंत तुम्ही उपास सोडा...." असे काहीसे वाटले हे वाचून. लक्षात आले नसेल तर बटाट्याच्या चाळीत मिळेल आणि त्याची कॅसेट ऐक वाचायचे नसेल तर
हाहाहा
लालू,
आता तुला सारखं माझा ब्लॉग वाच म्हणून सांगून छळायला मजा येईल
आणि माझ्या वाक्यावर तू २-३ lol वाले प्रतिसाद मिळवले आहेस ना!!! मग त्याची जाण ठेवून तरी तुला माझा ब्लॉग "वाचावा"च लागेल
खरंच...
हाणा या बडबडीला, हीच ती स्पष्टवक्ती!
प्रिया, तसं नाही ते. वाचन खूप झालंय हे खरं आहे, म्हणजे मिळणार्या वेळाच्या मानाने.
आणि लोकहो, मी ते पूर्ण सोडून वगैरे देणार नाही फक्त एक वर्षभर इतर गोष्टी करणार. बघू तरी काय होतं. आणि वर्तमानपत्रं, बालसाहित्य गाळलेलं नाही. खूपदा ते एकदम वाचनीय असतं.
ज्यांना हा संकल्प मोडावा असं वाटतंय त्यांनी तसे प्रयत्न करावेत. (पुस्तकं, कॅसेटस काय ते पाठवा बघू!) ~D.
-लालू
सेम पिंच
सध्या "वाचनीय"(वाचता येतील अश्या) गोष्टींचा इतका भडीमार होतोय.. म्हणजे असं पहा, लायब्ररीतून विनामूल्य मिळणारी पुस्तकं, कोणी recommend केली म्हणून, कुठला पुरस्कार मिळाला म्हणून, तर नुसतीच 'चर्चेत' आहेत म्हणून ती आणली >>>> मी काल तीस-यांनदा renew केली काही पुस्तके आणि library वाटेल तेव्हढी देते, म्हणुन घेतच राहायची:)...
आणि मायबोली आणि ब्लोग असतातच ..
हे हे सहीच
म्हणजे हा संकल्प लोकांनी पुस्तकं वगैरे पाठवावी म्हणून होता तर ......
न वाचण्याचा निर्धार किती तास ????
हाणा या बडबडीला, हीच ती स्पष्टवक्ती! >>>>>>>
तरीच म्हटलं की बडी आणि तू समवयस्क कशा दिसता. आत्ता मला बडीच्या वयाचा उलगडा झाला ....................
बाकी jokes apart, न वाचण्याचा निर्धार किती तास टिकला हे पण लिही, आम्ही सगळे जरूर वाचू. ........
--
अरूण
हा हा हा
लालू : lol
संकल्प आवडला... नाहीतरी काहिही संकल्प केला तरी तो मोडतोच मग असाच संकल्प करावा की मोडला तरी वाईट वाटणार नाही
मिही ह्यावर्षी संकल्प करतो की मी क्रिकेट पहाणार नाही ह्या वर्षी
http://milindchhatre.blogspot.com