शब्दांकुर : पर्ण- ३

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 23:30

2010_MB_kavyasphurti-3.jpgस्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता २१ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा.त्यानंतर नविन विषय देण्यात येईल.
५. आपली कविता ही स्वतः लिहिलेली असावी.तसेच पूर्वप्रकाशित नसावी.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देहभानाची चौकट निखळून पडताच
तुझ्या माझ्यात शून्य दुरावा
एक श्वास, एक घास, एक ध्यास
तुझे अन् माझे वेगळे नांदणे नाही

तुझा माझा संवाद आता आतल्या आत
तिसर्‍यास का उमगावा?
आकृतीत तुझ्या असण्या नसण्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही

मोक्षाची घडावी भेट म्हणोनी,
त्रिवार वंदनास त्राण उरले नाही,
चालला देह आपसुक वैकुंठास,
आत काही देणे घेणे उरले नाही..

आत्म्यास का मिळावी शांती,
सत्कर्म असे हातून घडलेच नाही,
पापांची बांडगूळं सांभाळता उरी,
आता काही देणे घेणे उरले नाही...

अतीव झाले दु:ख जीवनी,हरले नाही
दु:खाला बनवेन सखा,विस्मरले नाही

आनंदी क्षण कधी उलटले, कळले नाही
दु:ख चिकटले इतुके,अजुनी सरले नाही

दु:खाला इतुकी जागा जीवनात माझ्या,
रिते मनाचे कुंभ्,सुखाने भरले नाही

दु:खाशी व्यवहार जाहला,........ आनंदाशी
आता काही देणे घेणे उरले नाही.

-डॉ.कैलास गायकवाड

चाराण्याची कोंबडी,
बारा आण्याचा मसाला,
एकच रुपया होता खिश्यात,
दात पाडून दिले तेलाला..
वाणी सुद्धा हसून म्हणाला..
ते बोळकं पाहून्..
शाब्बास ! आता देणे घेणे काही उरले नाही...

किनार्‍याची उध्वस्त कैफियत मांडण्या,
आता देणे घेणे काही उरले नाही...

चांदण्यांची निखळती पडझड थांबवाया,
आता देणे घेणे काही उरले नाही..

वेल फुलांची निष्पर्ण होता सावराया,
आता देणे घेणे काही उरले नाही..

निघून गेलीस तू मिटूनी नयने अंती,
अडखळत्या श्वासाविना काही उरले नाही..

अश्वे..........
खूप छान लिहिलयस कारण मन उलगडून लिहिलयस

घ्यायचे होते, ते सारे घेऊन झाले
द्यायचे तर नव्हते काही हेही उमगले
कशास्तव ओळखीचे हासु ओठांवरी, जर
आता काही देणे घेणे उरले नाही

तुझी न माझी ती नजरभेट होताच,
क्षणात सगळी सुखं सभोवताली जमलेली,
ती नाजूकशी वेल सुद्धा फुलांनी भारलेली..
तेव्हापासून सये माझी रात्रसुद्धा स्वप्नांसोबत जागलेली..
मात्र..काल सहज तळ्यातल्या तरंगांचा संदर्भ॑,
तुझ्या मनातल्या विचारांशी जुळवताना अचानक..
तुझ्या होकाराची काही फुले माझ्या ओंजळीत पडली,
अन हसून म्हणाली.. बघ आता देणे घेणे काही उरले नाही...

श्वासात मिसळले श्वास
बाहूत मिसळले बाहू
आता काही देणे घेणे उरले नाही
कारण स्वत्वच वेगळे राहिले नाही...

तुझ्या मिठीत विरघळून जाता
माझीच मी राहिले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही
कारण स्वत्वच वेगळे राहिले नाही...

आता काही देणे घेणे उरले नाही

डोळ्यामधुनी त्यांचे गाणे झरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही

मीच बिलगलो त्याला रडत्या बाळाजैसा
त्या झाडाचे पान कधी थरथरले नाही

आठवते का ऊब मला ती विझल्यावरती?
छातीशी का कोणी तैसे धरले नाही?

रोज उठावे नाचावे अन नाचत जावे
भोग परीचे स्वर्गामधल्या सरले नाही

ह्यांचे काढा, त्यांचे मोजा, नसते धंदे
बहुधा माप फिकीरीचे त्या भरले नाही

- ह. बा.

कधी पीस तर, कधी शिंपला, केव्हा मरवा
येण्याजाण्या कधी बहाणे केले नाही?
येताजाता, देताघेता समीप आलो
हाती धरले हात कधी, ते कळले नाही.
तुझे नि माझे आता काही उरले नाही
माझे जे जे , तुझेहि जे जे, एक जाहले
आता काही देणे घेणे उरले नाही

नेहमीच असतो जिचा वाडगा सदा रिकामा अन मुखी ’द्या’
ऐसी शेजारिण उभी दारात जरा विरजणा म्हणे दही द्या
मी म्हटले ’बाई, दूध नासले सारे माझे, तुम्हीच मज द्या!’
पाय आपटीतच गेली की ती पुढल्या दारी, घेउनि तो ’द्या’
दार लावताना, गुणगुणले मी, सांगायाचे जे तिज नाही
(दोन दिवस तरी) 'आता काही देणे घेणे(?) उरले नाही’

कळकळ नव्हती पण तेथे मी झुरले नाही
मार्गावरचे गाव तरी कुरकुरले नाही

बिंब न दिसले कोरड डोही ,ना ओलावा
म्हणुनच मजला काव्य तयांवर स्फुरले नाही

छक्के पंजे नव्हते पण मी सावध होते
लोक म्हणाले '' पाणी येथे मुरले नाही ''

काळ सरकला ,ती गावेही मागे सरली
आता काही देणे घेणे उरले नाही

माझ्या 'बॅटचे' तू' भरलेस, तुझ्या 'बासरीचे' मी भरले
माझ्या 'इंटरव्यु टाय' चे तू भरलेस, तुझ्या 'इंटरव्यु शुज' चे मी भरले
माझ्या 'क्रिकेट किट' चे तू भरलेस, तुझ्या 'सिंथेसायझरचे' मी भरले
माझ्या 'झेनचे' तू भरलेस, तुझ्या 'इंडीकाचे' मी भरले
माझ्या 'आयपीएल फायनल' चे तू भरलेस, तुझ्या 'झाकीर कॉन्सर्टचे' मी भरले
माझ्या 'ओपन हार्ट सर्जरीचे' तू भरलेस, तुझ्या 'किडनी ट्रांन्सप्लांट्चे' मी भरले
माझ्या 'वृद्धाश्रमाचे' तू भरलेस, तुझ्या 'वृद्धाश्रमाचे' मी भरले
आता काही देणे घेणे उरले नाही...आता काही देणे घेणे उरले नाही...

पावसात उभी राहून
ओलिचिंब कधीही झाले नाही;
सर्वांच्या अपेक्षांचे ओझे उचलतांना
स्वतःच्या आत्म्याकडे बघितले नाही;
पण तरीही त्यांनी मजला स्वार्थी म्हणून ठरवले.
दुसर्‍यांसाठी जगण्याचे,
आता काही देणे घेणे उरले नाही

नेत्र तिचे माझ्यासाठी भिरभिरले नाही
प्रेमाचे लोणचे माझिया मुरले नाही

प्रेमातुर मी,लग्नातुर मी,गुडघा घेउन
हृदय तिचे माझ्यासाठी आतुरले नाही

पडलेले प्रेमात कसे करतात कविता?
मला तुझ्यावरती काही का स्फुरले नाही?

विस्मरलो मी लग्नानंतर तुला,तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.

डॉ.कैलास गायकवाड

शब्द शब्द अवघे वेचूनी लिहीती
कसे आशयाशी.., नाते ते उरले नाही.,
कवि जाहले पैशापासरी, कवितेशी...,
आता काही देणे घेणे उरले नाही....!

हे मृत्यो..!

जगायचे होते ते जगून झाले
करायचे होते ते करून झाले
द्यायचे होते ते देवून झाले
घ्यायचे होते ते घेवून झाले....!

हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये
कधीही.....; तुझ्या सवडीने
तुला टाळावे असे आता कारण उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

- गंगाधर मुटे

हात जोडुनी तुला पाहता
तृप्ती मनात भरुनी राही

पूजा करू? गार्‍हाणे मांडू?
काही सुचतच नाही

पावलांस आधार तुझा
छत्र तुझे, दशदिशा व्यापुनी राही

इतुकेच पुरे, देवा
आता काही देणे घेणे उरले नाही

Pages