असा कसा हा पेपरवाला!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2010 - 09:01

आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला.

बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात. आमच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत भल्या पहाटे वर्तमानपत्रांचा टेम्पो दे दणाद्दण वर्तमानपत्रांचे गठ्ठे टाकून जातो. मग पहाटे चार वाजल्यापासून सॉर्टर्स येऊन त्यांचे वर्गीकरण करतात. साडेपाच-सहा च्या दरम्यान पेपर टाकणारी मुले आपापल्या सायकल्स, बाईक वरून ही वर्तमानपत्रे घरोघरी टाकायला घेऊन जातात. हे काम एवढे शिस्तीत चालते की गल्लीच्या कुत्र्यांना पण ह्या लोकांची सवय झाली आहे.

तर अशा परिस्थितीत आम्हाला अगदी घरबसल्या विविध पेपरवाल्यांचा सहवास मिळत होता. दररोज पहाटे साखरझोपेची दुलई बाजूला सारून नित्यकर्माला लागण्यासाठी ह्या पेपरवाल्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गप्पांचा , त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचा फार फायदा होई. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात त्यांच्यापैकी कोणी शिंकले तरी खणखणीतपणे ऐकू येई. आजीबाई सर्व पेपरवाल्यांची वर्दळ संपली की इमारतीच्या दारातच सकाळची कोवळी उन्हे खात एका तरटावर बसून पेपर विकायला सज्ज होत असत. शिवाय त्यांची नजर चौफेर असे.... त्यामुळे कोठे काय चालले आहे ह्याची बऱ्यापैकी खबर त्यांना लागलेली असे.

एक दिवस आजीबाई अचानक आजारी पडल्या. एक-दोन महिन्याचे हॉस्पिटलाचे दुखणे झाले आणि आजीबाईंची प्राणज्योत मावळली. त्यांच्या घरच्यांनी पेपर एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरेच दिवशी आमच्याकडे अजून एक पेपर एजंट आला. (ह्या एजंटांना कसा सगळा पत्ता लागायचा कोणास ठाऊक! ) चांगल्या झुबकेदार मिशा, कपाळाला टिळा, अंगात शर्ट -पँट, काखोटीला चामड्याची बॅग, पायात वहाणा अशा वेषातला हा एजंट बोलण्यावरून शिकलेला वाटला. झाले! त्याने दुसऱ्या दिवशीपासून पेपर टाकायचे ठरले. त्याच्या भेटीत त्याने सांगितले होते की तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी. खरे तर आपल्या पेपरवाल्याची कोण एवढी चौकशी करतो! पण त्याने आपण होऊनच ही माहिती दिली.

त्या नंतर सुरू झाला एक मजेदार अनुभव!

आमच्या मातुःश्रींचे व पेपर टाकायला येणाऱ्या मुलाचे वारंवार खटके उडू लागले. कधी तो दाराच्या बाहेर कोणीही उचलून न्यावा अशा पद्धतीने पेपर टाकत असे तर कधी त्याला उशीर होत असे. मातृदैवताला सकाळी साडेसातच्या आत वर्तमानपत्र वाचण्याची सवय असल्याने तिला हा उशीर जराही खपत नसे. मग काय! आई तो यायच्या वेळेला दबा धरूनच बसत असे आणि तो अवतरला की त्यांची किरकोळ हुज्जत रंगत असे. मग एक दिवस कंटाळून आईने त्या पेपर एजंटचा फोन नंबर धुंडाळून थेट त्याच्याकडेच तक्रार केली. दुसऱ्या दिवसापासून आमचा पेपर वेळेत येऊ लागला, दारात लोळत पडण्या ऐवजी कडी-कोयंड्यात खोचला जाऊ लागला. पण मग त्या महिन्यापासून पेपरचे बिल येणेच बंद झाले.

आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अशी उधारी ठेवायची म्हणजे काय! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे, राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते.

तर अशा आमच्या ह्या वर्तमानपत्राचे बिल घेण्यास उदासीन पेपर-एजंटला आईने अनेक निरोप धाडले, फोन केले. त्याचे उत्तर ठरलेले, "ताई, काय घाई आहे! घेऊ की निवांत बिल, कुठं पळून का जातंय... " त्याच्या अशा उत्तरांनी आम्ही अजूनच अस्वस्थ होऊ लागलो. दरम्यान येथील रीयल इस्टेट वाल्यांचे राजकारणी व गुंडांशी असलेले संबंध कोणीतरी मोठ्या अक्कलहुशारीने आमच्या कानी घातले होते. मग तर काय! आम्हाला दरदरून घाम फुटायचाच काय तो शिल्लक राहिला. न जाणो हा पेपर एजंट कोणत्या गँगचा माणूस असला तर? तो उद्या-परवा कर्जवसुलीसारखी दारात माणसे घेऊन उभा ठाकला तर? निरनिराळ्या हिंदी पिक्चर्समधील असे गावठी गुंड, त्यांची दहशत वगैरे सीन्स आमच्या चक्षूंसमोर तरळू लागले. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर एक खाटिकखाना आहे. तिथे घेऊन जाणाऱ्या बकऱ्या, बोकडांमध्ये आम्हाला आमचे चेहरे दिसू लागले.

शेवटी आम्ही गृह-सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.... पेपरवाला बदलायचा.... आमच्याकडे पेपर टाकणाऱ्या पोराकडे निरोप दिला. तो तर हसायलाच लागला. झाले! आमच्या छातीचे ठोके चुकले. दुसऱ्याच दिवशी त्या पेपर एजंटचा फोन आला.... "ताई, काय नाराज आहात का आमच्यावर? जाऊ की घेऊन बिलाचे पैसे निवांत! तुम्ही नका काळजी करू!" (त्याने सबंध वर्ष बिलाचे पैसे घेतले नव्हते!)
पण आमचा निर्णय ठाम होता. एकतर बिलाचे पैसे घे, नाहीतर पेपर टाकणे बंद कर. आम्ही दुसरा पेपरवाला शोधतो. काहीसे कुरकुरतच त्याने फोन ठेवून दिला. पुढचे दोन दिवस पेपर आला नाही. एरवी सकाळी सकाळी पेपर दृष्टीस पडला नाही की अस्वस्थ होणारी आमची आई कधी नव्हे ते पेपर आला नाही म्हणून आनंदात होती! दोन दिवसांनी शेजारील फ्लॅटमध्ये पेपर टाकणाऱ्या नव्या पेपर-एजंटला सांगून पुन्हा आमच्याकडे पेपर सुरू झाला. त्या आधीच्या पेपरवाल्याने अजूनही बिल दिले नव्हते व बिलाचे पैसेही नेले नव्हते. वाटले, लवकरच तो बिलासकट हजर होईल. पण छे! तिसऱ्या दिवशी त्याच्या पेपर टाकणाऱ्या मुलाने आधीप्रमाणे पुन्हा आमच्याकडे पेपर टाकायला सुरुवात केली.

जणू काही मधल्या काळात काहीच घडले नव्हते! आता मात्र अती झाले होते. एकाच वेळी घरात दोन-दोन पेपर एजंट्सकडून पेपर येत होते! पुन्हा एकदा आमची गोलमेज बैठक झाली. दुसऱ्या दिवशी आई पेपरवाल्याच्या प्रतीक्षेत दबाच धरून बसली. तो आल्यासरशी त्याला 'का टाकतोस आता पेपर? ' म्हणून फैलावर घेण्यात आले. त्यावर तो मुंडी हालवत, हसत 'तुम्ही आमच्या मालकांनाच विचारा' असे म्हणून खांदे उडवित निघून गेला....!!!!! मालक अर्थातच फोनवर उपलब्ध झाले नाहीत!

आता रोज आम्ही दोन-दोन पेपर्स चा संशयी मनाने आनंद लुटतो. कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल, कदाचित घेणारही नाही. आमच्या दमल्या थकल्या मनांनी त्याच्या वागण्याचे कोडे उलगडविण्याचे तूर्तास रहित केले आहे. रात्री झोपेत पेपरच्या गठ्ठ्यांखाली आपण गुदमरत आहोत असले काही स्वप्न पडल्यास आम्ही त्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो. कसली वर्गणी मागायला कोणती तरुण मंडळे आली की 'आली आपल्या पेपर एजंटची माणसं! ' असा डरपोक विचार आम्ही अजिब्बात म्हणजे अजिब्बात करत नाही. त्यांना जुजबी पैसे देऊन वाटेला लावतो. वेळप्रसंगी घरात कोणीच नसल्याचा बहाणा करतो. आणि रोज देवाकडे आमच्यासारखा उदार, कनवाळू पेपर एजंट इतर कोणालाही न मिळो म्हणून कळकळीने प्रार्थना करतो. न जाणो देव ऐकेल आणि पुन्हा एकदा आमच्या राज्यात सर्व काही आलबेल होऊन आम्ही सुखाने झोपू लागू!

--- अरुंधती

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

गुलमोहर: 

Lol

अकु.. असा पेपरवाला भेटल्यावर नक्कीच आमच्याकडे पाठवून दे. इतका उदार पेपरवाला Wink

बाकी, आमच्या घरात सुद्धा पेपर ७:१५ च्या आधी मिळणार असेल तरच त्याला पेपट टाकण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळते.

हिम्सकूल, सूर्यकिरण, कल्पु, मंजिरी, बूमरँग, दिनेशदा.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! Happy

अरुंधती,
Lol
आमचा केबलवाला अस्साच आहे. तो वर्षातून एकदा पैसे न्यायला येतो. आणि तोवर त्याला फोन करुन करुन फोनाचे बिल वाढते. पैसे घ्यायला या असे कोणाच्या हातापाया पडावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. आणि वर मलाच मनःशांतीचे धडे देतो.
'मॅडम तुम्हाला तकलीफ काय आहे ?'
'अहो वर्षातून एकदा कसे येता तुम्ही. लोकं घर बदलतील ना. पैसे बुडतील ना तुमचे...'
' शेटचे लै धंदे आहेत हो. कोणाकोणाक्डुन पैसे घेणार? तुम्ही फार त्रास देता, सारखे पैसे काय न्यायला बोलावता' हे वर. Proud

आमच्याकडे पण अशी एकदा गंमत झाली होती. त्यावेळी इंडियन एक्प्रेसची स्कीम होती वर्षाभराचा पेपर इतक्या रुपयात आणि वर फ्राईंग पॅन मोफत. ती घेतली त्याप्रमाणे आमच्याकडे वर्षभर आला. आणि वर्ष संपला तरी चालूच राहीला. बर त्याचे बिलपण नाही. शेवटी आम्ही त्याला फोन करून सांगितले
अरे बाबा ती स्कीम संपली आता. एकाच वर्षासाठी होती.
तर एकदम दुसऱया दिवशीपासून पेपरच बंद.
परत त्याला फोन करून सांगितले, आम्हाला पेपर हवाय. फुकट नकोय त्याचे पैसे देतो ना.

मस्त Happy

कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल,
अरुंधती,
तुमची कथा आवडली ...
Happy
आता माझी ऐक ..
मी अलिकडेच २ महिन्यापुर्वी पेपर लावला (रद्दी तरी कामाला येईल ना) तसा मी नेटवर २-४ पेपर वाचतो
पण २ महिने झाले रोज पेपर मिळतो पण पैसे मागायला कुणी आलं नाही, शेवटी मीच त्या पोर्‍याकडे देऊन टाकले ...
याला एक कारण असेल पेपर हा ९ वाजता कधी १० वाजता मिळतो ...
Lol

अरुंधती, धमालच आहे तुमचा पेपरवाला. त्याचे दुसरे व्यवसाय आहेत म्हणून हे असं होत असणार हे नक्की. आम्ही दूरच्या ट्रीपला जायला गाडी हायर करतो त्या कंपनीच्या मालकाचीही अशीच गत आहे. Happy

रैना, आमच्या केबलवाल्याचेही असेच धमाल अनुभव आहेत! त्याचा ह्या भागात (राजकीय) वट असल्यामुळे समजा त्याच्या अनियमितपणामुळे तुम्ही त्याची केबल सर्व्हिस बंद केली तर इतर केबलवाले तुम्हाला कनेक्शन द्यायलाही राजी नसतात. सरळ सांगतात, तो तुमचा आधीचा केबलवाला नाराज होईल, आणि ते आम्हाला परवडणार नाही म्हणून!

आशूचॅम्प, डिट्टो! त्याच स्कीमचा आमचाही असाच अनुभव आहे!! Happy त्यांनी नंतर एक्प्रेस टाकणे बंदच केले. मग कंटाळून टाईम्स लावला.

ज्योती, आमचा रद्दीवाला खूप खूश असतो. त्याला न चुरगळलेली, व्यवस्थित घडीची भरपूर रद्दी मिळते आमच्याकडे! Happy

स्वप्ना, हो गं, असे मल्टिट्रॅक बिझनेस करणारे बरेच लोक पाहिलेत मी आमच्या एरियात. स्वतःच्या मालकीची रिक्षा असते, भाड्याने गाड्या/ टेंपो देतात, सकाळी दूध/ पेपर असे काही टाकतात, नोकरीही करतात! शिवाय रियल इस्टेट, केबल, विमा एजन्सी आणि अजून काही काही.....!!!!

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स! Happy

त्यावेळी इंडियन एक्प्रेसची स्कीम होती वर्षाभराचा पेपर इतक्या रुपयात आणि वर फ्राईंग पॅन मोफत. ती घेतली त्याप्रमाणे आमच्याकडे वर्षभर आला. >>

आशुचॅम्प, मग फ्राईंग पॅन तरी मिळाला की नाही? :उगीचच उत्सुकता:

अकु,
मनोगतावर आधी टाकलाय का हा लेख? Uhoh

Proud
मध्यमवर्गिय ताण इतका परफेक्ट लिहिलाय की वाचताना टेंशन आले!
राजकोट्ला आमच्या केबलवाल्याने असाच प्रकार केला होता, टाटा स्काय लावले आहे आता केबल नको असे कितीतरी वेळा सांगूनही तब्बल ४ महिन्यांनी त्याने कनेक्शन काढले आणि पैशाचे नावही काढले नाही.