'अपोलोचे वंशज - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख' - चिनूक्स

Submitted by संयोजक on 7 September, 2010 - 00:58

2010_MB_Ganesha4_small.jpg

कुठेतरी मोठ्या सभागृहात, किंवा ताडपत्रीच्या सावलीत शे-दोनशे काळा चष्मा घातलेले रुग्ण आणि त्यांचे दोन-चारशे नातेवाईक बसलेले असतात. नातेवाइकांच्या हातात औषधांची चिठ्ठी असते. न खोचलेला पांढरा शर्ट, काळी पँट, साधी चप्पल घातलेली एक उंच व्यक्ती भाषण करत असते. "लोकहो, आता मी काय सांगतो ते नीट ऐका. सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडे. आता काल आणि आज मी तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं. आता तुम्हांला काही तकलीफ होणार नाही. चांगलं दिसेल. पण कधी? डोळ्याची काळजी घेतली तरच. डोळ्याला हात लावायचा नाही. पदर, धोतराचं टोक डोळे पुसायला वापरायचे नाहीत. शेगडीजवळ जायचं नाही. सून देईल ते खायचं, नातनातू जवळ आले तर त्यांना दूर ठेवायचं.."

अर्धा तास हे गृहस्थ लोकांशी बोलत असतात. त्यांना सूचना देत असतात. त्यांच्याच भाषेत. भाषणाआधी या गृहस्थांचा स्थानिक खासदारांच्या हस्ते मोठा सत्कार झालेला असतो. ते खासदार स्टेजवर बसलेले असतात. पण भाषणात या खासदारांचा, सत्काराचा वगैरे काहीच उल्लेख नसतो. फक्त लोकांशी संवाद. "तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला आलात म्हणून धन्यवाद. आता नीट काळजी घ्या. मी पुन्हा एका महिन्यानंतर तुम्हांला बघायला येतो. तेव्हा परत यायचं. औषध घेऊन जायचं. पुन्हा काही झालं डोळ्याला तर मला फोन करायचा. तुमच्या चिठ्ठीवर माझा मोबाईल नंबर आहे. कधीही फोन करायचा, घाबरायचं नाही", असं म्हणून भाषण संपवतात.

हे डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता. एक लाखांहून जास्त नेत्रशस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम नोंदवणारे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तीचे नेत्रशल्यविशारद. महाराष्ट्राभर शिबिरांमधून बिनटाक्याच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणं, एका सरकारी रुग्णालयातला एक विभाग अत्याधुनिक मॉडेल म्हणून विकसित करणं, जबरदस्त निष्ठावान सहकार्‍यांचा संच तयार करून महाराष्ट्रातल्या लाखोंना मोफत उपचार मिळवून देणं, प्रसंगी पदरचा पैसा खर्च करून वैद्यकीय सुविधा दुर्गम भागांत उपलब्ध करून देणं, हे डॉ. लहान्यांचं विलक्षण कर्तृत्व आहे. भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मान केला आहे. भारतात दरवर्षी मोतीबिंदूमुळे सत्तर लाख लोकांना अंधत्व येतं. त्यात भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी. मधुमेहामुळे अंधत्व येणार्‍यांची संख्याही पन्नास लाखांच्या घरात. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने करत असलेल्या कामाचं महत्त्व उठून दिसतं. हे काम एका सरकारी रुग्णालयात होतं, हे अजून एक विशेष.

सरकारी दवाखाने, तिथली सेवा, सरकारी डॉक्टर, नर्सेस आणि एकूणच यंत्रणेबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती असते. तिथली अस्वच्छता, हलगर्जीपणा यांमुळे रुग्ण नाइलाजास्तवच सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. ज्यांना परवडतं ते खाजगी रुग्णालयांत उपचार करून घेतात. अर्थात खाजगी रुग्णालयांतही सारं काही आलबेल असतं असं नाही. इथेही हलगर्जीपणा, बेपर्वा वृत्ती असतेच, फक्त ती रुग्णालयातल्या चकचकाटामागे लपली जाते. खाजगी रुग्णालयांच्याही हल्ली अवाढव्य इमारती असतात. नवीन प्रॅक्टिस सुरू करतानाच दोन-तीन मजली इमारत असते, गुळगुळीत फरशा असतात. हा खर्च थेट रुग्णांकडून भरून काढला जातो. त्यात भर पडते ती कट प्रॅक्टिसची.

१९८०च्या दशकापासूनच मुंबई-पुण्याकडे कट प्रॅक्टिसने मूळ धरायला सुरुवात केली, आणि आज कट प्रॅक्टिस सर्वदूर सर्वमान्य झाली आहे. कट प्रॅक्टिस म्हणजे काय? तर समजा एखादा नवीन कन्सल्टंट आहे, त्याने आजूबाजूच्या फॅमिली डॉक्टरांकडे किंवा जनरल प्रॅक्टिशनरांकडे जायचं. त्यांच्याशी कमिशन, म्हणजे कट ठरवून घ्यायचा. त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक रुग्णामागे कन्सल्टंटाने काहीएक ठरावीक रक्कम प्रॅक्टिशनराला द्यायची. ही कट देण्याची टक्केवारी अगदी साठ-सत्तर टक्क्यांपर्यंतही असू शकते. खाजगी रुग्णालयं, पॅथालॉजी प्रयोगशाळा, अल्ट्रासोनोग्राफी केंद्रं या सार्‍या ठिकाणी ही कट प्रॅक्टिस चालते. बडे डॉक्टर तर वसूलीसाठी पदरी एजंटही बाळगून असतात.

या पार्श्वभूमीवर एकंदरीतच आरोग्ययंत्रणेकडे सर्वसामान्य लोक साशंक नजरेनेच बघतात. सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांत जायला घाबरतात. जे.जे. रुग्णालयातला नेत्रशल्यचिकित्सा विभाग मात्र याला सणसणीत अपवाद आहे. किरकोळ उपचारांसाठी पंतारांकित रुग्णालयांमध्ये दाखल होणारे राजकारणी, पांढरपेशे मध्यमवर्गीय आणि ठाणे, नंदुरबार, गडचिरोलीचे आदिवासी किंवा विदर्भ-खानदेशातले शेतकरी अशी रंगीबेरंगी गर्दी इथे दिसते. या विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. अतिशय आपुलकीनं माहिती देणारे, उपचार करणारे कर्मचारी आणि डॉक्टर आहेत. सेवाभाव आणि व्यावसायिक निष्ठा एकत्र आल्या की किती प्रचंड मोठं काम उभं करता येतं, हे या विभागात आलं की लक्षात येतं.

lahane11.jpg

लातूर जिल्ह्यातल्या मकेगाव नावाच्या खेड्यात तात्याराव वाढले. घरी प्रचंड गरिबी होती. दोन एकर शेतीवर नऊ जणांचं कुटुंब गुजराण करत होतं. तात्याराव इतर भावंडांबरोबर शेतात काम करत किंवा गुरं राखायला जात. गावात शाळा निघाली तेव्हा तात्याराव सात-आठ वर्षांचे असतील. शाळा सुरू करायला वीस-तीस मुलं हजेरीपटावर असणं आवश्यक असतं, म्हणून तात्यारावांची रवानगी शाळेत झाली. जन्मतारीख माहीत नव्हती म्हणून मास्तरांनीच २४ जून अशी नोंद केली. शाळेत नाव घातलं तरी शेतीची, घरची कामं होतीच. त्यामुळे तात्याराव वेळ मिळेल तेव्हा शाळेत जात. एरवी पूर्णवेळ गुरं राखणं, शेतात काम करणं किंवा पाझरतलाव खणणं ही कामं. मात्र शाळा अनियमित असूनसुद्धा तात्याराव चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यातून पहिले आले. हा मुलगा खूप हुशार आहे, हे मास्तरांना कळलं. चौथी झाली, आता शाळा पुरे, असं तात्यारावांच्या वडिलांना वाटत होतं. पण मास्तरांच्या आग्रहापुढे त्यांचा विरोध टिकला नाही. तात्यारावांचं शिक्षण पुढे सुरू राहिलं.

शाळा सुरू राहिली तरी तात्यारावांच्या दिनक्रमात फारसा बदल झाला नाही. शेतीची कामं पूर्ण झाल्यावरच शाळेत जायची वडिलांनी परवानगी दिल्यानं अभ्यासाला वेळच मिळत नसे. पहाटेपासून सकाळी दहापर्यंत शेतात काम करायचं, मग शेतात काही काम नसेल तर दुपारी तीनपर्यंत शाळा आणि नंतर गुरं राखायला जायचं. तात्यारावांची एक लाडकी म्हैस होती. या म्हशीच्या मागे फिरत तात्याराव थोडाफार अभ्यास करत. घरी अभ्यास करायची सोय नव्हती. शिवाय घरात रात्री दिवेही नसत. त्यामुळे या म्हशीमागे हिंडत जो काही अभ्यास होईल तेवढाच. रोज शाळेत जाणंही शक्य नव्हतंच.

मॅट्रिकच्या परीक्षेत तात्याराव बोर्डात आले. लहाने गुरुजी हे तात्यारावांच्या शाळेचे मुख्याध्यापक. तात्यारावांच्या वडिलांना ते म्हणाले, 'तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला सायन्सला घाला. इथे गावात ठेवू नका.' हेडमास्तरांना नाही कसं म्हणणार? तात्यारावांनी सायन्सला प्रवेश घेतला.

तात्याराव सांगतात, "त्या काळी ग्रामीण भागात परिस्थिती खूप वाईट होती. आता तरी सगळीकडे शाळा आहेत, मास्तर थोडंफार शिकवतात, मुलं शिकतात. पण आमच्यावेळी सगळ्यांच बाबतीत खूप अज्ञान होतं. मी वडिलांबरोबर जाऊन शहरात कॉलेजला प्रवेश घेतला. तिथे एक ओळखीचा भेटला. त्यानं विचारलं, 'काय, विज्ञानशाखेत अ‍ॅडमिशन घेतली का?' मी म्हटलं, 'नाही, सायन्सला घेतली.' म्हणजे इतकं अज्ञान होतं बघ. कॉलेजात गेलो तर तिथल्या मुलांच्या चटपटीतपणामुळं भांबावून गेलो. त्यावेळी मेडिकलला जाण्याची सर्वांची इच्छा असायची. कुठेही जा, चर्चा मेडिकलला कसं जाता येईल, याचीच असायची. आमच्या विज्ञान महाविद्यालयात वीस मुलांची एक वेगळी तुकडी असायची. हुशार मुलांची ही तुकडी. मेडिकलला जाण्यासाठी या मुलांकडून विशेष तयारी करून घेत. मला या तुकडीत जायचंच होतं कारण या मुलांना होस्टेल, जेवण, पुस्तकं, गणवेश सगळं फुकट असायचं. फक्त कॉलेजची फी तेवढी भरायची. माझ्याकडे पैसे नसल्यानं या तुकडीत जाता आलं तर काळजी मिटेल, असं वाटत होतं. मला मार्क चांगले होते, मी बोर्डात आलो होतो. त्यामुळे माझी निवड होईलच, याची मला खात्री होती. पहिल्याच दिवशी या तुकडीसाठी निवडचाचणी होती. मला एका शिक्षकांनी एक इंग्रजी परिच्छेद वाचायला दिला. मी वाचायला सुरुवात केली. दुसर्‍या की तिसर्‍या ओळीतच stomach असा शब्द आला. आता आमच्या शाळेचे चांदे गुरुजी या शब्दाचा उच्चार स्टमच असा करायचे. मीसुद्धा तसाच उच्चार केला. त्याबरोबर ते कॉलेजातले शिक्षक भडकले. 'हा मुलगा गावरान आहे. कसा मेरिटला आला कोण जाणे', असं म्हणून मला हाकलून दिलं. मी आणि माझे वडील तर हबकूनच गेलो. राहण्याजेवणाचा खर्च, पुस्तकांचा खर्च करायचा कसा? फार मोठा प्रश्न होता. आता माझे गुरुजी स्टमच असा उच्चार करायचे, यात माझी काय चूक? पण ही चूक मला भोवली, आणि आता शिक्षण थांबतं की काय, असं वाटायला लागलं."

"माझ्या वडिलांनी माझ्यासाठी शंभर रुपयांचं कर्ज काढलं होतं. त्या पैशांत सगळाच खर्च बसवणं भाग होतं. कॉलेजची फी भरल्यावर फार थोडे पैसे शिल्लक राहिले. शिक्षकांनी सांगितलं की कॉलेजात यायचं तर चप्पल घालावीच लागेल. मी तोपर्यंत पायात चप्पल घातलीच नव्हती. शिवाय कपडेही धड नव्हते. मी दहा रुपयांत दोन शर्ट - पँट आणि दोन रुपयांची चप्पल अशी खरेदी केली. पण पुस्तकांचं काय? माझ्या सुदैवानं मला काळे नावाचे शिक्षक भेटले. बॉटनी शिकवायचे ते. त्यांनी मला त्याच्याकडची जुनी पुस्तकं दिली. एक मोठा प्रश्न मिटला. पण राहण्याजेवणाचा खूप मोठा प्रश्न समोर होता. संध्याकाळी मी आणि वडील कॉलेजच्या दारात बसलो होतो, तर आमच्याच तालुक्यातला एक मुलगा भेटला. तो एक खोली भाड्याने घेऊन राहणार होता. मीही त्याच्याबरोबरच राहायचं ठरलं. राहण्याजेवणाचा महिना पंधरा रुपये खर्च येणार होता. वडिलांनी अगोदरच सावकाराकडून बरंच कर्ज काढलं होतं. अजून पैसे हवे असतील तर शेत गहाण टाकावं लागलं असतं. आता हे पैसे कुठून आणायचे ही चिंता होती. "

मित्राचा दोन्ही वेळचा स्वयंपाक तात्यारावांनी करायचा आणि त्याचा मोबदला म्हणून मित्रानं तात्यारावांना एक वेळचं जेवण द्यायचं, असं ठरलं. एका शिक्षकांनी तात्यारावांना 'कमवा आणि शिका' योजनेची माहिती दिली. कॉलेजातल्या बागेतल्या शंभर झाडांना रोज पाणी घालायचं काम होतं. प्रत्येक झाडाला एक घागर पाणी घालायचं. विहीर अर्धा किलोमीटर लांब. या कामाचे महिन्याला तीन रुपये मिळत. काबाडकष्ट करतच तात्यारावांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं.

"परीक्षा संपल्यावर मी सामान बांधून घरी जायला निघालो. मेडिकलला प्रवेश मिळतो की नाही, याची फार मोठी चिंता होती. मी ज्यांच्या खोलीत भाड्यानं राहायचो ते एस.टी.मध्ये कंडक्टर होते. त्यांची मुलगी दहावीला होती, आणि तिच्यासाठी स्थळं बघणं सुरू होतं. मला वाटलं की माझं लग्न या मुलीशी झालं तर आपल्या शिक्षणाचा खर्च सासरचे लोक करतील. मला चार बहिणी आणि दोन भाऊ. जमीन थोडकी. सगळ्यांची पोटं भरायची मारामार, शिक्षण तर दूरची गोष्ट. मी शिकलो असतो, तर घरात पैसे आले असते. खाण्याची ददात मिटली असती. भावंडांची शिक्षणं झाली असती. मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, माझं पुढचं शिक्षण तुम्ही करा. त्यांनी लगेच होकार दिला. मी गावाला गेलो. घरी सांगितलं. ते लोक दुसर्‍या दिवशी येणार होते. मी परत कर्ज काढून थोडे पोहे विकत आणले आणि आम्ही सगळे त्यांची वाट बघत बसलो. पण झालं असं की, ती मंडळी गावात आली, आणि त्यांनी काही गावकर्‍यांकडे आमच्या घराची चौकशी केली. गावात सहसा कोणी कोणाबद्दल चांगलं बोलत नसतं. त्यात आमची परिस्थिती तर खरंच वाईट. पाहुणे घरी न येताच माघारी फिरले. आता शिक्षणाचं काय, ही चिंता परत मागे लागली."

जून महिन्यात निकाल लागला आणि तात्याराव मराठवाड्यातून दहावे आले. केलेल्या कष्टांचं सार्थक झालं. मेडिकलला प्रवेश मिळाला. शेत गहाण टाकून हजार रुपये मिळाले. त्यातले सातशे रुपये फी म्हणून भरले. मॅट्रिकनंतर घेतलेले दोन शर्ट-पँट आता जुने झाले होते. मेडिकल कॉलेजात रॅगिंग बरंच असतं, असं तात्यारावांनी ऐकलं होतं. जुन्या कपड्यांमुळे आपण आयतेच तावडीत सापडू, अशी त्यांना भीती वाटत होती. एका मित्राने मग एक नवीन शर्ट-पँट घेऊन दिली. तात्यारावांनी ती पुढे चार वर्षं वापरली. मित्रांनीच पुस्तकंही घेऊन दिली.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तात्यारावांचं लग्न बीडचे आमदार असलेल्या श्री. रघुनाथराव मुंडे यांच्या कन्येशी ठरलं. पुढचं शिक्षण आरामात होईल, याच विचारानं तात्यारावांनी लग्नाला होकार दिला होता. खरं म्हणजे आपल्यासारख्या हाती काहीही नसलेल्या मुलाशी रघुनाथराव आपल्या मुलीचं लग्न का लावून देत आहेत, हा प्रश्न तात्यारावांना पडला होता. पण रघुनाथरावांना तात्यारावांच्या जिद्दीबद्दल, हुशारीबद्दल खात्री होती. लग्न झालं, आणि तात्यारावांनी पदव्यत्तर शिक्षणासाठी नेत्रशल्यचिकित्सा हा विषय निवडला. त्यांना Pediatricsमध्ये M.S. करायचं होतं. पण त्या वर्षी या विषयासाठी विद्यावेतन मिळणार नव्हतं, आणि तात्यारावांना तर पैशाची निकड होती. नाइलाजास्तव मग ते नेत्रशल्यचिकित्सा या विषयाकडे वळले.

डॉ. लहाने सांगतात, "मला वाटलं होतं की आता आपल्याला बिनघोर शिकता येईल, पण तसं काही झालं नाही. दुसर्‍या वर्षी माझा शेवटचा पेपर होता त्या दिवशी माझे सासरे एका अपघातात वारले. मला परीक्षा देता आली नाही. माझा संसार कसाबसा मी सांभाळत होतो, आता पत्नीच्या माहेरची जबाबदारी अंगावर आली. तिच्या माहेरी भाऊबंदकी होती. इस्टेटीवरून तंटे होते. या सार्‍यांत मी कसाबसा अभ्यास केला आणि वर्षभरानं परीक्षा उत्तीर्ण झालो. अंबेजोगाईच्या कॉलेजात लेक्चरर म्हणून मला लगेच नोकरी मिळाली. तिथल्याच दवाखान्यात मी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. अधूनमधून मी धुळ्यालाही शस्त्रक्रियांसाठी जात असे. पण या सरकारी नोकरीत माझं मन काही रमत नव्हतं. सगळीकडे विचित्र कारभार होता. कशाचा कशाला मेळ नसे. त्या वातावरणात मला चांगलं काम करता येत नव्हतं. खाजगी प्रॅक्टिस करावी असं मला वाटत होतं. पण एकदा उन्हाळा मागे लागला की पावसाची कितीही वाट बघितली, तरी उन्हाच्या तडाख्यातून सुटका नसते. माझ्या मागची संकटं काही संपत नव्हती."

अंबेजोगाईला असताना डॉ. लहान्यांची दोन्ही मूत्रपिंडं निकामी झाली. नियमित डायलिसिस करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, आणि अंबेजोगाईत ही सोय उपलब्ध नव्हती. औरंगाबाद किंवा मुंबईला जाणं भाग होतं. डॉ. लहाने दर गुरुवारी मुंबईला डायलिसिससाठी जात. इतर दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज आणि दवाखाना सुरुच असे. तीन वर्षं डॉक्टर मुंबईच्या वार्‍या करत होते. मात्र ९४ साली तब्येत जास्तच बिघडली. मुंबईला जा-ये करण्याची दगदग सोसेनाशी झाली आणि उपचारांसाठी डॉक्टरांनी मुंबईला बदली करून घेतली. जे. जे. रुग्णालयात डॉक्टर दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी 'तुम्ही फार तर एक वर्ष जगाल', असं सांगितलं होतं. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं. डॉ. लहान्यांच्या आईंनी आपलं एक मूत्रपिंड डॉक्टरांना दिलं आणि डॉक्टरांचे प्राण वाचले. ही ९५ सालची गोष्ट.

जे. जे. रुग्णालयात असताना डॉ. लहान्यांच्या लक्षात आलं की, मुंबईपेक्षा उर्वरित महाराष्ट्र कमीत कमी दहा वर्षं मागे आहे. महाराष्ट्राच्या शहरांमध्येही आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. ग्रामीण भागात तर मूलभूत सोयींचीही वानवा होती. नेत्रशल्यचिकित्सेच्या बाबतीतही कठीण परिस्थिती होती. डॉ. लहाने अंबेजोगाई, धुळे इथे ज्या शस्त्रक्रिया करत होते, त्या शस्त्रक्रिया करण्याचं मुंबईतल्या डॉक्टरांनी कधीच थांबवलं होतं. डोळ्यात लेन्स टाकायला, बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करायला सुरुवात झाली होती, आणि या शस्त्रक्रियांची नावंही डॉ. लहान्यांना ठाऊक नव्हती. आपलं ज्ञान मुंबईतल्या डॉक्टरांच्या मानानं खूप तोकडं असूनही आपण गावाकडे उत्तम डॉक्टर म्हणून ओळखलं जातो, याचं त्यांना वाईट वाटलं.

सरकारी यंत्रणा आणि सरकारी रुग्णालयांतली एकूण परिस्थिती बघता मधल्या काळात त्यांच्या डोक्यात खासगी प्रॅक्टिसचा विचार सुरू झाला होताच. शिवाय कौटुंबिक जबाबदारी, आजारपणामुळे वाढलेला आर्थिक बोजा या समस्या होत्याच. पण आईच्या मूत्रपिंडामुळे आपल्याला जीवदान मिळालं आहे, हा आपला दुसरा जन्म आहे आणि तो लोकांसाठीच घालवायला हवा, असं त्यांना वाटू लागलं. डॉ. लहान्यांनी मग मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईत राहून ज्ञान अद्ययावत करायचं, आणि त्याचा फायदा गोरगरिबांना, खेड्यात राहणार्‍या जनतेला करून द्यायचा, असं त्यांनी ठरवलं.

जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागात डॉ. लहान्यांची ओळख डॉ. रागिणी पारेख यांच्याशी झाली. डॉ. पारेख याही त्याच विभागात कार्यरत होत्या. त्यांनी डॉ. लहान्यांना आधुनिक पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यास शिकवलं. डॉ. रागिणी पारेख या विभागात रजू झाल्या तेव्हा तीन मजली इमारत होती, एकशे दहा खाटांचा बाह्यरुग्ण विभाग होता, पण रुग्णच नव्हते. इतर सरकारी रुग्णालयांप्रमाणेच या विभागाचा कारभार चालत असे. डॉ. पारेख यांना एकूण परिस्थिती बदलण्याची इच्छा होती. पण त्या एकट्या काही करू शकत नव्हत्या. डॉ. लहाने या विभागात आले, आणि या दोघांनी मिळून नेत्रशल्यचिकित्सा विभागाचा कायापालट करायचं ठरवलं.

ragini_parekh.jpg

जे. जे. रुग्णालयाच्या या विभागात रुग्ण फारसे येत नसत कारण मुळात रुग्णांना आधार वाटावा अशी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. डॉक्टरांनी तपासावं यासाठी रुग्णांना बराच वेळ थांबावं लागे. शिफ्ट संपली की नर्सेस, वॉर्डबॉय त्याक्षणी चालू लागत. रुग्णांची गैरसोय झाली तरी कोणाला काळजी नसायची. डॉक्टरसुद्धा फार वेळ रुग्णालयात थांबत नसत. हे सगळं डॉ. लहाने व डॉ. पारेख या दोघांसाठीही फार त्रासदायक होतं, पण यातून मार्ग काढणं आवश्यक होतं. या दोघांनी मग जादा वेळ काम करायला सुरुवात केली. एकही रुग्ण उपचारांशिवाय परत जाता कामा नये, असं ठरलं. कितीही उशीर झाला तरी हे दोन डॉक्टर रुग्णालयात थांबू लागले. वॉर्ड स्वच्छ करण्यापासून ते ड्रेसिंग करण्यापर्यंत पडेल ते काम या दोघांनी केलं. नर्स, वॉर्डबॉय, किंवा सहकारी डॉक्टर नसले तरी रुग्णांवर उपचार थांबले नाहीत. हळूहळू कर्मचार्‍यांच्या वागणुकीत फरक पडू लागला. आपले वरीष्ठ इतकं काम करतात, तर आपणही काम केलं पाहिजे, हे त्यांना जाणवलं. दुपारी बारा-एक वाजेपर्यंत उगवणारे वॉर्डबॉय सकाळी आठाच्या ठोक्याला हजर राहू लागले. रुग्णालयात रुग्ण येण्यासाठी विभागातल्या प्रत्येकानं जीव ओतून काम करण्याची गरज होती. डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांनी कृतीतून कर्मचार्‍यांना योग्य ती प्रेरणा दिली, आणि नेत्रशल्यचिकित्सा विभागाची एक पक्की टीम उभी राहिली. आता या विभागातल्या कर्मचार्‍यांची त्यांच्या कामावरील निष्ठा अक्षरशः अचंबित करणारी आहे. मध्यंतरी डहाणूजवळ एका गावात शस्त्रक्रिया शिबिर होतं. सकाळी सहा वाजताच सगळेजण त्या गावी जाण्यासाठी निघणार होते. डॉ. लहान्यांना मदत करणारा एक सहकारी त्या दिवशी जरा अस्वस्थच होता. गरजेपुरतंच प्रत्येकाशी बोलत होता. डॉ. लहान्यांनी चौकशी करूनही तो काही बोलला नाही. रात्री शिबिर संपल्यावर घरी जाताना तो हमसाहमशी रडू लागला. तेव्हा सगळ्यांना कळलं की, त्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता तो वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी जाणार होता.

डॉ. लहान्यांना सहकार्‍यांची साथ मिळाली आणि काम उभं राहू लागलं. हळूहळू रुग्णांची संख्या वाढायला लागली तशी रुग्णांसाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध होत गेल्या. फेको इमल्सिफिकेशन तंत्राचा वापर करून डॉ. लहान्यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. त्यासाठी लागणारं यंत्र त्यांनी विभागात सर्वप्रथम आणलं. या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला जास्तीत जास्त सात दिवसांत परत कामावर जाता येतं. पूर्वी चाळीस दिवस सक्तीची विश्रांती असे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे ही शस्त्रक्रिया करून घ्यायला उत्सुक नसत. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे फार मोठी सोय झाली. शिवाय या शस्त्रक्रियेला वेळही फार कमी लागतो. इथे येणारे बहुतेक रुग्ण हे हातावर पोट असणारे. जे. जे.ला यायचं म्हणजे एका दिवसाचा पगार बुडला. डॉक्टरांना वेळ नाही, म्हणून तो दुसर्‍या दिवशी रोजंदारी बुडवून कसा येणार? म्हणून विभागात आलेल्या प्रत्येक रुग्णाला त्याच दिवशी तपासलं जाऊ लागलं. बरेचसे रुग्ण गावाकडून आलेले, अशिक्षित असे असतात. मुंबईत या मंडळींची राहायची सोय नसते. डॉ. लहान्यांच्या लक्षात आलं की अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेर पदपथावर झोपायचे. मग एक मोठ्ठा वॉर्ड रिकामा होता, तो स्वच्छ करून घेण्यात आला. या वॉर्डात रुग्णांचे नातेवाईक राहू लागले. स्त्रियांना स्वच्छतागृहांच्या अभावी त्रास सोसावा लागे, तो त्रासही या सोयीमुळे नाहीसा झाला. काही दिवसांनी या नातेवाइकांच्या जेवणाची सोय करावी, असं डॉ. लहान्यांना वाटलं. मुंबईत दोन-तीन दिवस राहायचं तर जेवणाचा खर्चही अनेकांना परवडत नसे. दाखल झालेल्या रुग्णांना इस्पितळातच जेवण मिळण्याची सोय होती. डॉ. लहान्यांनी मग रुग्णाच्या नातेवाइकांनाही दाखल करून घ्यायला सुरुवात केली. त्यांचं नाव रुग्ण म्हणून पटावर आलं की त्यांनाही रुग्णाच्या बरोबर जेवण मिळू लागलं. त्यांचा एक मोठा खर्च वाचला. शासनाकडून जेवणासाठी बराच निधी मिळतो. हा पैसा बरेचदा वाया जातो. डॉ. लहान्यांनी हा निधी वापरला आणि रुग्णाच्या खर्चाचा भार हलका केला. या सर्व सोयीसुविधांमुळे रुग्णांची संख्या वाढतच गेली. डॉ. लहाने जे. जे.ला आले तेव्हा या विभागात वर्षाला जास्तीत जास्त सहाशे शस्त्रक्रिया होत असत. आता दरवर्षी इथे सुमारे वीस हजार शस्त्रक्रिया केल्या जातात.

मुंबईत जे. जे.ला येणार्‍या रुग्णांची संख्या वाढल्यावर डॉ. लहान्यांना वाटलं, की मुंबईतल्या रुग्णांना मिळणारे उपचार इतर लहान गावांतही उपलब्ध व्हायला हवेत. मुंबईला उपचारांसाठी येणं हे काही प्रत्येकाला शक्य नसतं. आर्थिक अडचणी असतात. मुंबईला तब्येत दाखवायला जायचं, या कल्पनेनंच रुग्ण आणि नातेवाईक चिंतित होतात. बराच विचार केल्यावर मग त्यांनी गावोगावी जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्यावर डॉ. लहाने आणि त्यांचे सहकारी लगेच कामाला लागले, आणि पहिलं शिबिर अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर आजपर्यंत डॉ. लहान्यांनी १५७ शिबिरांमधून पंचावन्न हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे, गडचिरोली जिल्ह्यातला दुर्गम भाग असो, किंवा कोकण-खानदेश, डॉ. लहान्यांनी बहुतेक सर्व जिल्ह्यांतल्या गावांमध्ये अशी शिबिरं घेतली आहेत. ठाणे-गडचिरोली भागातल्या दहा हजार रुग्णांना या शिबिरातून दृष्टी मिळाली आहे. डॉक्टर फक्त शस्त्रक्रिया करून थांबत नाहीत. गावातून जीप फिरवतात, लोकांना गोळा करतात. त्यांना डोळ्यांच्या विकारांविषयी, चकणेपणाविषयी माहिती देतात. त्यांचे गैरसमज दूर करतात. डोळ्यांची निगा कशी राखायची ते शिकवतात. खेड्यापाड्यांत तर अनेक अंधश्रद्धा असतात. डोळे गेले म्हणजे देवाचा कोप झाला, अशी समजूत. 'ऑपरेशन केलं तर तुम्हांला दिसेल', हे डॉ. लहाने त्यांना समजावून सांगतात. जास्तीत जास्त प्रमाणात नेत्रदान व्हावं, म्हणूनही ते प्रयत्नशील असतात. डॉ. लहाने लोकांना नेत्रदानाचं महत्त्व समजावून सांगतात. डोळे काढल्यावर माणसाचं भूत होत नाही, हे परोपरीनं समजावतात. शाळा-कॉलेजांतून मुलांशी बोलतात. त्यांच्यावर पालकांना समजवण्याची जबाबदारी सोपवतात.

२००० साली मात्र डॉ. लहान्यांना हे काम थांबवावं असं वाटलं. तब्येतीवर पडणारा ताण, आर्थिक मदत मिळावी म्हणून करावी लागणारी दगदग यांमुळे खाजगी प्रॅक्टिस सुरू करावी, असं त्यांना परत वाटू लागलं होतं. त्याच दरम्यान ते आनंदवनात बाबा आमट्यांना भेटले. बाबांनी डॉ. लहान्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना आपला मार्ग स्वच्छ दिसला. बाबांकडून प्रेरणा, उत्साह घेऊन डॉ. लहान्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. तेव्हापासून डॉ. लहाने दरवर्षी नियमितपणे आनंदवनात शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करतात. आजपर्यंत आनंदवनातल्या सुमारे दोन हजार कुष्ठरुग्णांवर डॉ. लहान्यांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पूर्वी कुष्ठरोगाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर कोणी आनंदवनातल्या शिबिरात शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत नसत. मात्र आता या शिबिरांना आनंदवनातल्या रुग्णांपेक्षा बाहेरून आलेल्यांचीच संख्या जास्त असते. बाबांनी पाहिलेलं एक स्वप्न डॉ. लहान्यांच्या शिबिरात हल्ली दरवर्षी पूर्ण होत असतं.

दिवसातले अठरा तास करणं, खेडोपाडी जाऊन शस्त्रक्रिया करणं, यांमुळे डॉ. लहान्यांच्या प्रकृतीवर खूप ताण येतो. एकच मूत्रपिंड असलेल्या रुग्णानं इतकी दगदग करणं अपेक्षित नसतं. डॉ. लहाने मात्र याकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांसमोर पूर्ण अंधार असलेल्या रुग्णाला जेव्हा दिसायला लागतं तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर फुललेलं हसू, आणि त्याने मनापासून दिलेले आशीर्वाद यांच्या बळावर डॉ. लहाने जोमानं काम करत राहतात. दिसायला लागणार्‍या प्रत्येक रुग्णाचं एक हसू म्हणजे एक रुपया, आणि मला अजून करोडो रुपये मिळवायचे आहेत, असं डॉ. लहाने सांगतात. रुग्णांप्रती असलेल्या या अविचल निष्ठेमुळे त्यांचे रुग्णही डॉ. लहान्यांवर प्रचंड प्रेम करतात. अगदी हक्कानं त्यांना तब्येतीच्या तक्रारी सांगतात. महाराष्ट्रभरातल्या शिबिरांमुळे डॉ. लहान्यांचा दूरध्वनी क्रमांक सहज उपलब्ध असतो. रुग्णाचे नातेवाईक मग सरळ त्यांनाच फोन करतात. 'माह्या बुढ्याले कमी दिसून राह्यलं.. बंबईला कधी येऊ?' असा फोन पहाटे चार वाजता येतो. डॉ. लहाने न वैतागता तारीख आणि वार सांगतात. त्या दिवशी तपासणीनंतर आजोबा डॉक्टरांच्या टेबलावर वांग्याची भाजी आणि भाकरीचा डबा ठेवतात. डॉक्टरांनी सगळा डबा खाल्ल्याशिवाय तो विशीचा मुलगा आणि त्याचे आजोबा जागेवरून उठत नाहीत. मागे कधीतरी दूरदर्शनवर डॉ. लहान्यांची मुलाखत झाली होती. 'मला वांग्याची भाजी आणि भाकरी आवडते', असं ते म्हणाले होते. तेव्हापासून वांग्याची भाजी आणि भाकरीचे आठ-दहा डबे आणि पाचसात किलो वांगी आली नाहीत, असा एकही दिवस गेलेला नाही. एवढा मोठा डॉक्टर आपल्याला स्वतः तपासतो, आपलं ऑपरेशन करतो, आपल्याशी प्रेमानं बोलतो, आणि आपल्याकडून एक पैसाही घेत नाही, याचं रुग्णांना अप्रूप वाटत असतं. डॉक्टरांकडून मिळणार्‍या या प्रेमामुळे ते अक्षरशः भारावून जातात. आपलं प्रेम, कृतज्ञता व्यक्त कशी करावी हे त्यांना कळत नाही. मग बहुतेक रुग्ण डॉक्टरांना भेटायला येताना भाज्या, फळं, धान्य असं काय काय घेऊन येतात. उरणचे कोळी बांधव येताना ताजे मासे, कोळंबी वगैरे घेऊन येतात. प्रेमानं कोळंबीचं कालवण आणि तांदळाची भाकरी डॉ. पारेखांसमोर ठेवतात. एरवी कट्टर शाकाहारी असलेल्या डॉ. पारेख पेशंटचं मन न मोडता डब्यातलं खातात. चष्म्याचा नंबर कमी झालेल्या, तिरळेपण नाहीसं झालेल्या मुलींची लग्नं ठरतात. पहिली पत्रिका डॉक्टरांकडे येते. लग्न झाल्यानंतर, किंवा बाळाच्या जन्मानंतर देवाला न जाता डॉ. लहान्यांच्या पाया पडायला येणारेही अनेक आहेत. कोणी आजी-आजोबा 'तुमच्यामुळे आम्ही आमची नात पाहू शकलो', म्हणून पत्र पाठवतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात या दोन्ही डॉक्टरांना असं प्रेम मिळत असतं.

रुग्णांना आपुलकी, प्रेम वाटणं हे डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांच्यातील संवेदनशील वृत्तीमुळे, त्यांच्यातील माणूसपणामुळे घडतं. पण इतकी वर्षं सातत्यानं रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणं, तीही मोफत, हे कसं जमतं? खर्चाचा हा ताळमेळ कसा राखला जातो? "शिबिरांसाठी आम्ही जातो तेव्हा शस्त्रक्रियेसाठीचा खर्च हा अनेक संस्थांकडून वाटून घेतला जातो", डॉ. रागिणी पारेख सांगतात. "महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आम्हांला औषधं पुरवतो. शिवाय स्थानिक स्वयंसेवी संस्था, किंवा संघटना, National Association for the Blind (NAB) यांच्याकडूनही बरीच मदत मिळते. शिबिरांमध्ये होणार्‍या खर्चाची तरतूद कशी करायची, ही समस्या अजूनतरी आम्हांला आलेली नाही. जे. जे. रुग्णालयात जी यंत्रसामुग्री आहे, त्यांपैकी फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रियेसाठी लागणारी बरीच यंत्रं आम्हांला देणगीच्या स्वरूपात मिळाली आहेत. इतर काही शस्त्रक्रियांसाठीची यंत्रंही आम्हांला अशीच देणगी म्हणून काही संस्थांनी दिली आहेत. शासनाकडून बरीच मदत अर्थातच मिळते, आणि या मदतीमुळेच आम्ही मोफत उपचार करू शकतो. पण प्रत्येक वस्तूच्या मोफत पुरवठा करणं आरोग्य विभागालाही शक्य नसतं. उदाहरणार्थ, foldable lenses. या लेन्सेस बर्‍याच महाग आहेत, त्यामुळे सध्या शासन आम्हांला त्या मोफत देऊ शकत नाही. मग गेल्या दोन वर्षांपासून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आम्हांला या लेन्सेस पुरवायला सुरुवात केली आहे. आम्ही कोणाकडूनही आर्थिक मदत स्वीकारत नाही. वस्तूरूपातच देणग्या घेतो. आणि आम्हांला अनेकजण मदत करतातही. आमचा विभाग आज उत्तमरीत्या काम करू शकतो कारण शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि आमच्यांत उत्तम संबंध आहेत, ताळमेळ आहे. शासनाकडून मिळालेला पैसा, शासनाच्या योजना यांचा योग्य वापर आम्ही करतो, आणि म्हणूनच रुग्णांवर मोफत उपचार करणं आम्हांला शक्य होतं. आमच्याकडे फक्त मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात हा एक गैरसमज आहे. आम्ही डोळ्याशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया करतो. तेही अत्याधुनिक उपचारपद्धती वापरून आणि मोफत किंवा अत्यल्प खर्चात. ही यंत्रसामुग्री मिळवण्यासाठी डॉ. लहान्यांनी खूप परिश्रम केले आहेत. सरकारला या यंत्रांचं महत्त्व पटवून देणं खूप कठीण होतं. पण सर ठरवतात ते करून दाखवतात. आज अमेरिका किंवा फ्रान्सच्या मोठ्या दवाखान्यात असतील त्या सर्व सोयी आमच्याकडे आहेत. मधुमेहामुळे येणारं अंधत्वनिवारण किंवा चष्म्याचा नंबर कमी करणं, किंवा retinoplasty, या शस्त्रक्रिया तर आता आम्ही रोजच करतो. खाजगी डॉक्टर या शस्त्रक्रियांचे पन्नास हजार ते एक लाख रुपये घेतात. आम्ही पाच हजारांत ही शस्त्रक्रिया करतो. हे पैसेही आम्ही गरीब रुग्णांकडून घेत नाही. शासनाकडून मिळाले नाहीत तर सर किंवा मी या शस्त्रक्रियांचा खर्च आमच्या पगारांतून करतो. "

उपचार मोफत असले तरी गुणवत्तेत अजिबात तडजोड केली जात नाही, हे महत्त्वाचं. बहुतेक सर्व शस्त्रक्रिया अजूनही डॉ. लहाने आणि डॉ. पारेख स्वतः करतात. बाळासाहेब ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते असोत, किंवा ठाणे जिल्ह्यातला एखादा आदिवासी, डॉ. लहाने उपचार, शस्त्रक्रियापद्धती यांत कोणताही फरक करत नाहीत. इथे वापरल्या जाणार्‍या यंत्रसामुग्रीचा दर्जाही उत्कृष्ट असतो.

सगळ्या रुग्णालयांमध्ये जे. जे.त आहेत तशा सोयी निर्माण करणं शक्य नाही. मात्र तरीही महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांत नेत्रशल्यचिकित्सेची अत्याधुनिक साधनं जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावीत, म्हणून डॉ. लहाने प्रयत्नशील आहेत. औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात डॉ. लहान्यांनी अडीच कोटी रुपयाची यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. डोळ्याच्या मागच्या पडद्याच्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईला यायला नको म्हणून नागपूरला सोय केली जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली सरकारी रुग्णालयं अद्ययावत करण्याकडे सध्या त्यांचा कटाक्ष आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जर शिबिर असेल, तर डॉ. लहाने ते शक्यतो सरकारी रुग्णालयात घेण्याचा आग्रह धरतात. शासनाकडून मदत मिळालेली असते, हे एक कारण. शिवाय तिथले डॉक्टर या शस्त्रक्रियांमध्ये सहभागी होतात, डॉ. लहान्यांकडून त्यांना बरंच शिकायलाही मिळतं. रुग्णांना सरकारी रुग्णालयाबद्दल भीती वाटेनाशी होते. याखेरीज महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत तरुण नेत्रशल्यचिकित्सकांसाठी अनेक शिबिरं त्यांनी आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये आधुनिक शस्त्रक्रिया डॉ. लहाने या तरुण डॉक्टरांना शिकवतात. ही शिबिरं मोफत असतात. मात्र या तरुण डॉक्टरांना गुरुदक्षिणा द्यावीच लागते. ही गुरुदक्षिणा काय? तर प्रत्येक नेत्रशल्यचिकित्सकाने दर महिन्याला दोन शस्त्रक्रिया मोफत करायच्या. गरीब रुग्णांकडून या शस्त्रक्रियांचे पैसे घ्यायचे नाहीत. डॉ. लहान्यांनी आजपर्यंत अशा शिबिरांत सुमारे पाचशे नेत्रशल्यचिकित्सकांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं आहे. या हिशोबाने दर वर्षी दहा हजार मोफत शस्त्रक्रिया व्हाव्यात, अशी डॉ. लहान्यांची अपेक्षा आहे.

डॉ. लहाने सध्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत. नेत्रशल्यचिकित्साविभाग एक मॉडेल म्हणून विकसित झाला आहेच. शासनाच्या योजना आणि अनुदानांचा योग्य तो वापर करून नेत्रशल्यचिकित्सा विभागानं फार मोठी मजल गाठली. याच धर्तीवर इतरही विभाग विकसित करण्याची त्यांची इच्छा आहे. उत्तम वैद्यकीय सुविधा मिळणं, हा प्रत्येकाचा हक्क आहे, असं डॉ. लहान्यांना वाटतं. त्यामुळे सर्वोत्तम अशा सोयी जे.जे. रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची त्यांची योजना आहे. मात्र या सोयींमुळे उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी सर्व विभागप्रमुखांना केली आहे. रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला त्याच दिवशी तपासावं, रुग्णांची संख्या कितीही जास्त असली तरी प्रत्येक रुग्णाची तपासणी आणि गरजेनुसार उपचार झाल्याशिवाय कर्मचार्‍यांनी व डॉक्टरांनी घरी जाऊ नये, असे काही नियम आता रुग्णालयात बंधनकारक झाले आहेत. आजही महाराष्ट्रातले बरेच रुग्ण डोळ्यांच्या गंभीर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी चेन्नई, बंगलोर किंवा हैद्राबाद गाठतात. म्हणून मुंबईत फक्त नेत्ररोगांवर उपचार करण्यासाठी एक अत्याधुनिक इस्पितळ असावं, असं डॉ. लहान्यांना वाटतं. चंडीगढच्या P.G. I किंवा चेन्नईच्या शंकर नेत्रालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय असावं, अशी त्यांची इच्छा आहे.

डॉ. लहान्यांकडून मागे एक किस्सा ऐकला होता. डॉक्टर लातूरला काही कामानिमित्त गेले होते. तिथले एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी त्यांचे मित्र. मित्राला भेटायला डॉक्टर त्याच्या घरी गेले तर मित्राचे वडील कुठे घरात दिसेनात. डॉक्टर म्हणाले, 'काय रे, आबा दिसत नाहीत.. कुठे बाहेर गेले आहेत का?' मित्र म्हणाला, 'आबा गोठ्यात आहेत.' 'आबा इतक्या रात्री गोठ्यात काय करत आहेत?' 'आबा आंधळे झालेत. त्यांना आता आम्ही गोठ्यातच ठेवतो. हागण्यामुतण्याचं कळत नाही त्यांना. गोठ्यात ते काही बघावं लागत नाही.' डॉक्टर ताडकन उठून गोठ्यात गेले. आबांना घरात आणलं. तपासलं. मित्राच्याच गाडीत घालून त्यांना आधी सरकारी दवाखान्यात नेलं. दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. आबांना पुन्हा दिसायला लागलं. गोठ्यातून आबा परत घरात आले.

अंधत्व प्राप्त झालेल्या, समाजाच्या लेखी निरुपयोगी ठरलेल्या लाखोंचं आणि पर्यायानं लाखो कुटुंबांचं आयुष्य डॉ. तात्याराव लहान्यांनी पुन्हा उजळलं आहे. सुखकर केलं आहे. आपण पाहिलेली गरिबी, सहन केलेली दु:खं यांचं भांडवल न करता त्याच परिस्थितीत असलेल्या असंख्य रुग्णांसाठी ते अहोरात्र झटत असतात. 'मी काही फार मोठं काम करत नाहीत. समाजात माझ्यापेक्षा कितीतरी जास्त काम करणारे अनेकजण आहेत. लोकांचा हक्क असलेली वैद्यकीय सेवा मी फक्त त्यांना मिळवून देतो. पैसा मिळवून मी काय करू? माझ्या रुग्णांच्या चेहर्‍यावरचं हसू पाहिलं की मला जे समाधान मिळतं त्याला रुपयाचं मोल नाही', इतकी स्वच्छ भूमिका मनात बाळगून असलेले डॉ. लहाने पाहिले की त्यांचा मोठेपण आणि वेगळेपण लगेच लक्षात येतं.

श्री. जमशेदजी जिजिभॉय या दानशूर मुंबईकरानं दिलेल्या देणगीतून जे. जे. हॉस्पिटल उभं राहिलं. या रुग्णालयात भाऊ दाजी लाड, आत्माराम पांडुरंग, डॉ. तुळपुळे, डॉ. शिरोडकर अशा धन्वंतरींनी लक्षावधी रुग्णांची सेवा केली. त्यांना नवं आयुष्य दिलं. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेखही याच महान परंपरेचे पाईक आहेत. रुग्णसेवेचं व्रत एकदा अंगिकारलं की त्या आकाशस्थ अपोलो, हायजिया आणि पॅनॅशियाच्या नावानं घेतलेल्या शपथेशी इमान राखणं बहुधा सोपं होत असावं.

lahane1.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचल्यावर काही लिहायला शब्दच नाहीएत. कौतुक करायला सुद्धा आपली लायकी नाही अस वाटतंय.
गुरुदक्षिणा सुद्धा किती वेगळी आहे.
चिनूक्स हे इथे लिहिल्याबद्दल आभार.

डॉ.तात्याराव लहाने ह्यांच्याविषयी पूर्वी थोडंफार ऐकलं होतं. त्यानंतर मध्ये झी मराठी वरील 'ह्याला जीवन ऐसे नाव' ह्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत पाहिली. त्यात त्यांच्या खडतर प्रवासाविषयी , कामाबद्दल असणार्‍या अफाट निष्ठेविषयी जाणून घ्यायला मिळालं.
पण त्या मुलाखतीपेक्षाही खूप जास्त आज ह्या लेखात वाचायला मिळालं. धन्यवाद चिनूक्स !

खरोखर आपल्या आयुष्यातली धेय्यं फारच आत्मकेंद्रित आणि प्रश्न फारच फालतू आहेत असं वाटलं...

चिनूक्स या लेखाबद्दल खुप खुप आभार !
हे असं काही वाचलं , पाहीलं की आपल्या क्षुद्रत्वाची, खुजेपणाची प्रकर्षाने जाणीव होते. पूर्वाशी १००% सहमत.
डॉक्टर लहाने.... तुम्हाला आणि आणि तुमच्या कर्तुत्वाला लाखो प्रणाम !

अतिशय सुरेख लेख वाचावयास मिळाला. डॉं. लहाने ह्यांच्यासारख्या सेवाभावी व्यक्ती हातावर मोजण्या इतक्याच आहेत. पण, त्यांच्या पुण्याईने हे जग चाललेले आहे.
ह्या थोर व्यक्तिमत्वाला विनम्र प्रणाम !!!

चीनुक्स, तुमच्यामुळे सुरेख माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद !!! Happy

मी देखिल अगो म्हणत्ये तो कार्यक्रम पाहिला होता. पण आज जास्त विस्तृत माहिती मिळाली.
धन्यवाद चिनूक्स.

डॉ. लहाने व डॉ. पारेख यांना _/\_ अत्यंत प्रेरणादायी, सामान्यातले असामान्य.

>>हे वाचल्यावर काही लिहायला शब्दच नाहीएत. कौतुक करायला सुद्धा आपली लायकी नाही अस वाटतंय.<< सहमत

या दोन थोर डॉक्टरांबद्द्ल आधी वाचले होते. अशी समर्पित सेवा देणार्‍या डॉक्टर्समूळे मुंबईतील सरकारी रुग्णालयांची प्रतिष्ठा टिकून आहे.

जबरदस्त
आपले वरीष्ठ इतकं काम करतात, तर आपणही काम केलं पाहिजे, हे त्यांना जाणवलं. >>> वरच्या पदावरील एक माणूस सचोटीचा असेल तर तो आख्खी सिस्टीम बदलू शकतो.
चिनूक्स, मनापासून आभार.

डॉ. लहाने यांच्या कर्तृत्वाला सलाम. त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना.

चिनूक्सला अनेक धन्यवाद.

चिनूक्स ! अतिशय सुंदर लेख.
डॉक्टरांच्या एवढ्या चांगल्या कामाची व अनेक बाबतीत आदर्श ठेवावा अशा व्यक्तिमत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप आभार !
नाव 'लहाने' असूनही, अपार कष्ट सोसून, प्रतिभा व चांगुलपणाने एव्हढे 'मोठे' होताना त्यांनी नियतीचा पराभव केल्यासारखे वाटले.

चिनूक्स,
उत्तम व दर्जेदार लेख नेहमी प्रमाणेच. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत दोघेही. ते पेशंट त्यांना काही बाही आणून देतात तो परिच्छेद वाचताना डोळे पाणावले. यांचा आदर्श ठेवून काहीतरी केले पाहिजे.
मनापासून धन्यवाद.

काहीही सुचत नाहीये लिहायला.. डोंगराएवढी कार्य करुनही जमिनीवर पाय घट्ट रोवलेली ही माणसं.. काय बोलणार आपण त्यांच्याबद्दल..

उत्कॄष्ट लेख.

चिनूक्स ! अतिशय सुंदर लेख.
डॉक्टरांच्या एवढ्या चांगल्या कामाची व अनेक बाबतीत आदर्श ठेवावा अशा व्यक्तिमत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप आभार !

अप्रतिम लेख.
ईश्वर डाँक्टरांना उदंड आयुष्य देवो .
व त्यांचे कडून गरीबांची सेवा अशीच घडत रहावी ही प्रार्थना.

चिनूक्स धन्यवाद!! फारच सुंदर लेख आणि माहिती!

>>कौतुक करायला सुद्धा आपली लायकी नाही अस वाटतंय.
गुरुदक्षिणा सुद्धा किती वेगळी आहे.
अगदी असेच म्हणतो

सलाम हा शब्दही अपुरा आहे. केवढं हे काम! पूर्वाशी अगदी १००% सहमत. खरच नतमस्तक व्हायला झालय.
चिनूक्स ह्या लेखाबद्दल शतशः धन्यवाद.

अतिशय सुंदर लेख चिन्मय. डॉक्टरांविषयी, त्यांनी केलेल्या कार्याविषयी अगदी व्यवस्थित माहिती मिळाली. तुला अनेक धन्यवाद!

वरील सर्वांशी सहमत.

खुप खुप धन्यवाद चिनुक्स !
डॉ. लहानेंच्या कर्तृत्वाला शत शत प्रणाम ! त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा !
डॉ. पारेखांचा फोटो पाहिल्यावर त्या रुग्णांमध्ये समरसुन जातात हेच दिसतं .

किती थोर माणसं! धन्यवाद चिनुक्स.

आजूबाजूला भ्रष्ट व्यवस्था आणि त्याहूनही भ्रष्ट पुढारी यांच्या गदारोळात, निष्ठेनं आपलं काम करत असंख्य गरजूंना मदत करणार्‍या अशा लोकांचे आदर्श समाजापुढे सतत आले पाहिजेत. मी माझ्या मुलीला हे आवर्जून वाचून दाखवणार आहे.

डॉ.लहानेंना साष्टांग नमस्कार..चिनूक्स,हे आमच्यापर्यंत पोहोचवलंत त्याबद्दल तुमचेही खूप आभार.

चिनूक्स चांगला लेख. डॉ. लहान्यांबद्दल ऐकले होते आधी. या लेखामुळे बरीच माहिती मिळाली. असे आदर्श लोक सतत समाजासमोर आणायला हवेत. हे बघून न जाणो कोणाला काही करायची प्रेरणा मिळेल.

Pages