शालनवहिनी : काय वहिनी, हल्ली तुम्ही बाहेर गॅलरीत उभ्या राहिलेल्या दिसत नाही, अचानक झाले काय म्हणून चौकशी करायला आले? (बाईला जगाच्या पंचायती करायच्या सोडून दुसरे काम असलेले दिसत तर नाही)
मालनवहिनी : (मनातल्या मनात यांना कशाला हव्यात चांभारचौकशा?) छे हो, काहीही झालेले नाही बरी आहे की मी.
शालनवहिनी : हे कागदाचे बोळे कसले हो सगळ्या हॉलभर?
मालनवहिनी : अच्छा अच्छा, ते होय? अहो मायबोलीच्या गणेशोत्सवातील स्वरचित आरत्यांमध्ये यावर्षी मी स्वत: लिहिलेली आरती पाठवणार आहे नां, ते लिहून पहाते आहे.
आपण लिहीलेलं साहित्य मग ते कथा, ललित, कविता कोणत्याही प्रकारचे असो, ते वाचून छान अभिप्राय मिळाला की लिखाणाचे सार्थक होते. त्यात मग ती आपण रचलेली बाप्पाची आरती असेल आणि ती बाप्पाचा आशीर्वादरुपी अभिप्राय मिळाला तर अजून काय पाहिजे. मायबोली गणेशोत्सव २०१० चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहुया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोचवूया.
गजानना गजानना प्रणाम घ्या
गजानना गजानना
प्रणाम घ्या ,गजानना
गा मोरया मोरया
शब्द त्रिवाचे मोरया
टाळ मृदुंगे मोरया
एकरूपता मना मना----गजानना गजानना
नीवांतसे सुखासनी
सुहास्य झळके आननी
धन्य धन्य दर्शने तुझ्या
विरून जाती कामना----गजानना गजानना
सूर्यप्रभा देखणी उभी
तुझ्या पाठीशी जशी नभी
मनामनातील धुके विरो
तरल तरल हो भावना----गजानना गजानना
श्री गणराया कृपावंत व्हावे
श्री गणराया
कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥
चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥
भवमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥
अनुष्ठान हे तव पुजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥
गंगाधर मुटे
..........................................
गणपतीची आरती जय गणेश, श्री
गणपतीची आरती
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
गंगाधर मुटे
................................................
देवा तुझ्या दोळ्यामध्ये
देवा तुझ्या दोळ्यामध्ये करुणेचे सागर
एकदा भरून द्यावी माझी रीती घागर
कीती वाळवावे तरी मन हे वळेना
तुझ्या नजरेस माझी नजर मिळेना
तुला पाहता मज भासशी तू माय
माय करी लेकरासी अनेक उपाय
सुखं द्यावे, धैर्य द्यावे, द्यावा मज सय्यम
हसत हसत जावा जाताना हा दम
गणपती बप्पा मोरया!!!