ये परतीचा वारा...
नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.
खरोखर विल़क्षण आहे! एवढ्या मोठ्या जगड्व्याळ पसार्यात कुठेतरी एक जीव जन्मतो, दिसामासी वाढतो, वाट्याला आलेल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव गाठीशी जमा करतो, त्यातून शिकतो, कधी हसतो, कधी रडतो. वाट्याला आलेले काही क्षण मनात अक्षय जपतो, काही विसरु पाहतो. काही काही क्षणांच्या आधाराने जगण्यासाठी नव्या उमेदीने पालवतो आणि काही क्षणांपुढे पार खचतो, शरणागती पत्करुन केविलवाणा होतो. कधी सूर जुळतात, कधी बेसूर होऊन दुखरी नस बनून ठसठसतात, आणि तरीही कोड्याची भूल सुटत नाही..
*मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....
दिवस येतात, जातात. कित्येक घटना घडत राहतात. लहान, मोठ्या, लक्षणीय, नगण्य. कळत नकळत आठवणींची मोहर कुठेतरी मनाच्या तळाशी अलगद उमटवून जातात. प्रश्न निर्माण करतात, कधी कधी उत्तरं घेऊन येतात. निरुत्तरही करतात, तर कधी नव्या जाणीवांना सोबतीला आणतात आणि तुम्हां आम्हांला अधिक समृद्ध बनवून जातात, उत्तरं शोधायचीच खोटी. अर्थात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, असंही नाहीच. आणि समजा, सापडलेल्या उत्तरात नवीन प्रश्न लपलेला असेल, तर? जेति, जेति म्हणताना कधी ना कधी नेति नेति म्हणावं लागत असेल का?
लयबद्ध गतीने, तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दु:खांची चक्रं फिरतात. सुखावतात, दुखावतात. आपल्या, परक्यांची जाण देतात, शहाणं करुन सोडतात. उन सावलीचा खेळ जणू. कधी मनाची उमेद बांधण्यासाठी हात देतात, आणि कधी आपल्या सावलीलाही आपल्याचसाठी परकं करुन जातात. मन मात्र प्रत्येक क्षणामध्ये गुंतून पडतं, सुखाबरोबर तृप्त होतं, आणि दु:खानं पोळून निघतं.
... आणि चक्र सुरुच राहतं.. शेवटी हातात गवसतं काय? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही.
आणि असंच चक्र सुरु असताना, कधीतरी, हळूहळू थोडं फार उमगायला सुरुवात होते. ज्ञात अज्ञाताच्या पाठशिवणीच्या खेळाकडे नजर जाते, त्याच्या अफाट पसार्याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात. सोबतीतला एकलेपणा आणि एकलेपणातली सोबत जाणवते आणि एक दिवस कळून येतं,
*शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...
जाणीवा अधिक संवेदनाक्षम बनतात आणि आपल्या हाती तसं पाहिलं तर काही काही नाही हे जाणवून थोडंफार सुटल्यासारखंही होतं. आता कसली भिती? दिशा कधीच्याच ठरलेल्या असतात, त्यातले खाचखळगे, राजमार्ग सगळं काही आधीच रेखलेलं असतं, आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी. कळूनच जातं सारं काही. तोवर परतीचा मार्ग समोर येऊन ठाकलेला असतोच. पण, आता कसं, सारं काही लख्ख समोर असतं, कसलीच घाई नसते. आता कदाचित सगळंच सोपं बनून गेलेलं असतं.
*नाही मज घाई, पण वेग धरी होडी
जाताना एखाद्या शब्दातच गोडी
जो दुवा दिलास त्यात शीण मिटे सारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...
आता राग, लोभ मावळलेले असतात. फारशा तक्रारी राहिलेल्या नसतात. एकच छोटंसं मागणं राहिलेलं असतं, मागणं कसलं, विनंती. अगदी शेवटची. हरवलेलं काहीतरी आता गवसायला लागलेलं असतं आणि आता ते पुन्हा हरवू नये एवढीच इच्छा असते. म्हणून, एवढंच एक सांगणं होतं,
*मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....
कदाचित, कोडं उकलायला सुरुवात झालेली असते...
समाप्त.
*कवितांच्या ओळी कवीवर्य बा. भ. बोरकर ह्यांच्या.
तेह्वा ह्याचं किंवा त्याचं
तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.>>>>!!!!!!!
फार छान लिहिलयंस शैलजा. हल्ली अश्या चांगल्या लिखाणाची मायबोलीवर फार वाट बघावी लागते.
छान लिहीलयस त्यावरुन एक जुनं
छान लिहीलयस
त्यावरुन एक जुनं काही खरडलेलं आठवलं
राग लोभ अन खेदं खंतही
दिले घेतले इथेच ठेवू
तिथे न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघून जाऊ
शैलजा, मस्त लिहिलं आहेस..
शैलजा, मस्त लिहिलं आहेस..
सुरेख. श्यामलीला अनुमोदन.
सुरेख. श्यामलीला अनुमोदन.
बोरकरांची कविता कशी लख्ख आरस्पानी त्यांच्याबरोबरीने प्रवास करत सहज आली ते नेहमीच जाणवते.
मागच्या आठ्वड्यातील सकाळमध्ये छान लेख आला होता. चितविलासवाद (पाय कसा मोडायचा त चा ?)
आणि कैवल्यवाद दोन्ही बोरकरांच्या कवितेत कसे लख्ख झळकले असे लिहीले होते. ते पटले एकदम.
छान लिहीले आहे. बोरकरांची
छान लिहीले आहे. बोरकरांची कविताही सुंदर आहे.
शैलु, फार दिवसांनी असं छान
शैलु, फार दिवसांनी असं छान काही वाचलं.
शैलजा, एकदम मस्त जमलयं
शैलजा, एकदम मस्त जमलयं
सुंदर लिहीलयस
सुंदर लिहीलयस
खुपचछान लिहिल आहेस, अर्थ खुप
खुपचछान लिहिल आहेस, अर्थ खुप सुन्दर उतरला आहे.
सुंदर लिहिलेस गं... मला एक
सुंदर लिहिलेस गं...
मला एक प्रश्न नेहमी पडतो. हे नियतीने घातलेलं कोडं सोडवत बसायचे की नाही?? सोडवत बसले की त्या सोडवण्याबरोबर येणा-या सुखदु:खाना तोंड द्यावेच लागते. आणि अशा वेळी नेमके सुख जवाएवढे तर दु:ख पर्वताएवढे वाटायला लागते.. मग हे कोडे सोडवायचा जाच सोडुन द्यायचा आणि आपल्या आजुबाजुला शांतपणे कसलीही कोडी सोडवायच्या मागे न लागता आला दिवस घालवायचा असे करत आयुष्य जगणा-या माणसांसारखे राहायचे??
सगळे आधीच ठरलेले असते, पण त्या आधीच ठरलेल्या मार्गावरुन स्वतःला ढकलत न्यायचे मनाला पटत नाही. पटले नाही तरी काय, चालावे तर लागणारच... म्हणुन मग चालताचालता ही कोडी सोडवायचा प्रयत्न करायचा.. तेवढाच विरंगुळा...
सुंदर. स्वच्छ आणि प्रवाही...
सुंदर. स्वच्छ आणि प्रवाही... खूप आवडलं.
सुरेख लिहिलयस
सुरेख लिहिलयस
छान लिहीले आहे
छान लिहीले आहे
सुंदर आणि अतिशय स्मूथ
सुंदर आणि अतिशय स्मूथ लिहिलयं... कविता पण खूप आवडली...
छान लिलिलय्स.. पुलेशु.
छान लिलिलय्स.. पुलेशु.
छान..! अस काही कागदावर यायला
छान..!
अस काही कागदावर यायला आधी आत ते जाणवायला हवं, मग ते पचायला नि मुरायला हवं आणि मग ते झिरपतं, तेंव्हा न ठसठसता बाहेर यायला हवं. कठीण आहे.
आत जे काही उतरलं ते फार छान मांडलयसं.
शैलू छानच लिहलयस... अत्यंत
शैलू छानच लिहलयस... अत्यंत तरल!!

श्यामलीला मोदक
नेहमीप्रमाणेच आशयगर्भित . हि
नेहमीप्रमाणेच आशयगर्भित . हि कोडी नियतीच्या उत्तराप्रमाणे उतरत नाहित म्हणूनच तर मनुष्य सुख दु:खाच्या चक्रव्युहात सापडतो. म्हणूनच फसतो. शैलजा , एक दोन प्रसंग इथे थोडक्यात आले असते तर हि वैचारीक गुंफण नक्किच प्रत्ययकारी ठरली असती.[ माझे वैयक्तिक मत ].
काय सुंदर लिहीलंयस....खूप
काय सुंदर लिहीलंयस....खूप सुरेख उतरलंय. बोरकरांची कविताही आवडली.
शैलु, खुपच सुरेख...
शैलु, खुपच सुरेख...
शैलजा, मस्तच गं. अंतर्मुख
शैलजा, मस्तच गं. अंतर्मुख झाल्ये
छान मांडलय तटी: घरची ओढ
छान मांडलय
तटी: घरची ओढ लागली आहे ते पण समजले
सुंदर लिहीलय. कविताने
सुंदर लिहीलय.
कविताने लिहीलेल्या ओळीही छान
छान लिहिलयस. बोरकराची कविता
छान लिहिलयस. बोरकराची कविता म्हणजे झर्यासारखी.
मी आज अशाच मूड मध्ये असताना
मी आज अशाच मूड मध्ये असताना हे वाचायला मिळाले.अन्तर्मुख झालो.
सुन्दरः)
मस्त!!!
मस्त!!!
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून आभार.
हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.
त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं. सगळ्यांच्या सहृदय प्रतिसादांनी खूप बरं वाटलं.
मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.
शैलजा... तुझं लिखाण वाचलं...
शैलजा...
तुझं लिखाण वाचलं... अगदी शांतपणे- आणि ते देखिल २-३ वेळा वाचून काढलं, आणि तुला अभिप्राय द्यायला बसलो... लिखाण खरोखर सुंदर, अप्रतिम... मला कवितेमधे काहिही कळत नाही, त्यामूळे त्या बद्दल काही लिहित नाही...
नियतीच्या/ सृष्टीच्या नियमा प्रमाणे प्रत्येक 'कोड्या'ला उत्तर आहे... बहुतेक कोड्यांची उत्तरं त्या कोड्यां सोबतच आलेली असतात, काही कोड्यांची उत्तरं मिळवावी लागतात... फक्त गरज असते ती, आपला कोड्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यवस्थीत ठेवण्याची... ज्याला ही गोष्ट जमली त्याला आयुष्याची सगळी कोडी सुटत गेली... बाकी उरलेले 'कोडं पडलंय, कसं सोडवायचं?', या विवंचनेत गुंतून पडले; आणि मिळालेलं सुंदर आयुष्य 'रडत-कुढत' घालवत बसले...
माझा जीवनाकडे बघण्याचा दॄष्टिकोण तुला कळवला... त्यात मोठ्ठं असं काही नाही आहे...
शेवटी एकच लिहितो - Philosophy हा माझा विषय नाही...
सुंदर उतरलंय!
सुंदर उतरलंय!
सुरेख उतरलयं. बोरकरांच्या ओळी
सुरेख उतरलयं. बोरकरांच्या ओळी अगदी समर्पक.
अगदी ह्याच परिस्थीती मधून गेलोय / जातोय. कळतय तुला काय म्हणायचय ते.
Pages