पहिली ओळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 April, 2010 - 13:08

"तू बदललास मित्रा,
हल्ली पुर्वीसारखं अलवार लिहीत नाहीस.
त्या प्रीतीच्या गझला, त्या चंद्र चांदण्याच्या कविता,
त्या भावनांच्या चारोळ्या.... काही.... काहीच लिहीत नाहीस."
तो हसला......
"अरे, पुर्वी मी माझ्याच जगात वावरायचो.
आता मात्र वास्तवाची जाणिव झालीय.
शब्द फक्त रद्दी वाढवतात बघ.
भूक भागवत नाहीत की
जखमांवर फुंकर घालत नाहीत.
अंधार पुसत नाहीत की
कोसळलेलं घर उभारत नाहीत....
आता मी शब्दांचा रतीब घालणं बंद केलय.
आता निव्वळ प्रयत्न करतोय....
एखाद्या उपाश्याला एक वेळ जेवू घालण्याचा...
एखादी ओली जखम पुसून बँडेज बांधण्याचा...
अंधाराला दिवा दाखवण्याचा.....
नव्याने एखादं छप्पर उभारण्याचा.....
इतिहासात होणार नाही माझ्या नावावर कुठेही माझ्या साहित्यिक कर्तॄत्वाची नोंद...
पण मरताना काहीतरी केल्याचा जो आनंद माझ्या चेहर्‍यावर असेल,
तीच माझी शेवटची कविता....
एक दिवस तू नक्कीच वाचशील." तो बोलता-बोलता थांबला आणि....
.... मी त्या कवितेची पहिली ओळ तेव्हाच वाचली.

गुलमोहर: 

सकाळपासून माझ्याही मनात काहीसे अशाच प्रकारचे विचार
घोळतायत आणि अचानक ही कविता वाचनात आली.

जबरदस्त ..... Hats off

कौतूक...

कशी आणी काय दाद देऊ?...
एवढ्या 'सुंदर विचारां'वर माझं 'अ-ज्ञान' प्रकट करण्या पेक्षा, मी गप्पच बसतो... तीच एक 'दाद' समजून घ्या...

शब्द फक्त रद्दी वाढवतात बघ.
भूक भागवत नाहीत की
जखमांवर फुंकर घालत नाहीत.
अंधार पुसत नाहीत की
कोसळलेलं घर उभारत नाहीत..
.

क्या बात है....अप्रतिम.

निवडक १०.......... बास........... अजुन काही नाही बोलणार.......

Pages