कलंदर, मी आणि जाहिराती (१)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

"नमस्कार! मी अमर जोशी.."

माझ्या ऑफिसात आज सकाळी माझी आणि ह्यांची एकाच वेळी एंट्री. पाच-सव्वा पाच फुट उंची असावी. किंचितसे सुटलेले पोट. निळ्या रेघांचा शर्ट, त्यावर टाय, पांढरी पँट आणि काळे, लेदरचे, लख्ख पॉलिश केलेले बूट, हातात काळी छोटी ब्रीफकेस. घारे डोळे, मंद स्मित.

"गॅस गिझर्सचे ट्रेडिंग करणारी कंपनी आहे माझी. इन्स्टिट्युशनल सप्लाय असतो नॉर्मली. शाळा-कॉलेजेस, हॉस्पिटल्स, हॉटेल्स इ. ना. पण आता रिटेल सेलदेखील करावा असे वाटते आहे. त्यासाठी जाहिराती करायच्या आहेत..."

मी सगळ्या वर्तमानपत्रांचे आणि सगळ्या प्रकारच्या जाहिरातींसाठीचे रेट्स, स्ट्र्क्चर्स, स्कीम्स इत्यादी समजावून सांगितले.

"ठीक आहे. एक प्रयोग म्हणून एक आठवडाभर एक दिवसाआड सगळ्या पेपरांत दहा सेंटीमीटरची क्लासिफाईड डिस्प्ले करू या. आठवड्यानंतर पुढले शेड्यूल ठरवू या".
आठवडाभराचे बजेट ऐंशी हजारांच्या आसपास जात होते. पेमेंट कसे करणार, ते मी नंतर विचारले. नवीन, अनोळखी क्लायंटचे तरी पूर्ण पैसे अ‍ॅडव्हान्स घेणे आवश्यक असते.

"आता हे सारे अ‍ॅडव्हान्स देता येणे शक्य नाही. आठवड्यानंतरचे पोस्ट डेटेड चेक्स देऊ का? चालेल?" त्यांनी विचारले.

"या क्लासिफाइड डिस्प्ले जाहिराती आहेत. बर्‍याच ठिकाणी आम्हांलाच क्रेडिट नसते. त्यामुळे क्लायंट्सना देणे अवघड आहे साहेब", मी म्हणालो.

"ते मला मान्य आहेच. पण जरा समजून घ्या. पुढल्या आठवड्यात ससून हॉस्पिटलमधून माझे तीनेक लाखांचे पेमेंट रिलीज होईल. मग काही प्रॉब्लेम नाही. इन्स्टिट्युशनल सेलचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पेमेंट थोडे लेट होते. खेटे घालावे लागतात. म्हणूनच आता रिटेलमध्येही काम करावे असे ठरले आहे. पण पेमेंट कुठे जाणार नाही, हे नक्की.."

"तुम्ही ससूनला सप्लाय करता?"

त्यांनी ब्रीफकेस उघडून ससूनची पर्चेस ऑर्डर दाखवली. मागच्या आठवड्यातल्या तारखेची. पाचशे गॅस गिझर्स सप्लाय करण्याची.

मी ती बारकाईने बघितली. मग म्हटले, "तुम्ही उत्पादक नाही. कुठून घेता हे गिझर्स? आणि आणखी कुठे सप्लाय आहे तुमचा पुण्यात?"

"डेक्कनचे तेजस कॉर्पोरेशन. ससूनचे गिझर्स तिथूनच सप्लाय केले आहेत. इन्स्टॉलेशन आणि आफ्टर सेल्स सर्व्हिसची जबाबदारी अर्थातच आमची".

"अच्छा. पण पेमेंटचे बघावे लागेल. पार्ट पेमेंट द्या. आणि त्यानंतर दोन-दोन दिवसांच्या अंतराने लगेचचे चेक्स द्या". चेक्सचे काही भलेबुरे झाले, तर जाहिराती लगेच थांबवता येतील, या हिशेबाने मी म्हणालो.

खिशातून त्यांनी काही कॅश काढून मोजली. मला म्हणाले, "ठीक आहे. हे वीस हजार कॅश देतो. याची पावती द्या. आणि दोन-दोन दिवसांच्या अंतराचे प्रत्येकी वीस हजारांचे तीन चेक्स देतो. खरं तर हे चेक्स फक्त सिक्युरिटी म्हणून. त्या त्या तारखेच्या आधीच मी तुम्हाला कॅश देऊन चेक्स परत घेईन. चालेल?"

मी क्षणभर विचार करून ओके म्हणालो. त्यांनी मागितल्याप्रमाणे संपूर्ण आठवड्याच्या जाहिरातींचे बिल आणि आता मिळालेल्या रोख रकमेची पावती दिली.

दुसर्‍या दिवशी फोन आला, "जाहिरातींना रिस्पॉन्स उत्तम आहे. आपले आभार".

तिसर्‍या दिवशी सकाळीच त्यांचा एक माणूस दारात हजर. "आजच्या तारखेचा चेक भरू नका. आमचे सर कॅश घेऊन संध्याकाळपर्यंत येतील.." त्याच्याकडे गिझर्सच्या काही अ‍ॅक्सेसरीज होत्या. कुठेतरी इन्स्टॉलेशनला निघाला असावा.

मी थोडा विचार करून ठीक म्हणालो. दुपारी जोशींना फोन करून ते संध्याकाळी नक्की येत असल्याची खात्री केली. संध्याकाळी उशीर होऊ लागल्याचे बघून पुन्हा फोन केला. एका मिटींगमध्ये अडकलो होतो, आणि तिकडेच येत असल्याचे त्यांनी सांगितले. साडेआठच्या सुमारास त्याच ड्रेस कोडमध्ये हातात ब्रीफकेस घेऊन जोशी हजर. उत्साहाने सळसळत.

"आज आणखी एक मोठी ऑर्डर फायनल झाली. दिवसभर त्याच गडबडीत होतो. हे बघा. आता काम जोरात सुरू होण्याची खात्री आहे!"

नगर रोडवरच्या कुठल्याशा कॉलेजच्या हॉस्टेलसाठी चारशे गिझर्स पुरविण्याची ती पर्चेस आर्डर होती. शिवाय काही बिल्डर्सच्या एन्क्वायरीज. काही रिटेल क्लायंटचे करंट डेटेड चेक्स.. इत्यादी बरेच काही दाखवले. दोन दिवसांत इतका रिस्पॉन्स आला, याचा आनंद चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.

"दिवसभर याच कामांत अडकलो. रोख रकमेचे काम करता आले नाही. उद्या सकाळी कुणाला तरी पैसे घेऊन पाठवतो".

क्लिअरिंगच्या वेळेपर्यंत पैसे घेऊन कुणी आलं नाही, तर तो थांबवलेला चेक सरळ भरून टाकायचा, असा मनाशी विचार करून त्यांना निरोप दिला.

सकाळी दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन त्यांचा तोच माणूस पुन्हा हजर. उरलेले दहा हजार संध्याकाळपर्यंत मीच घेऊन येईन असंही त्याने सांगितलं.

आता सार्‍याच क्लायंट्सबद्दल कधी ना कधी थोडेफार इकडे तिकडे होणार, हे गृहित धरलेलेच असते. रिस्क तर सगळीकडेच असते. त्याला इलाज नाही.

पण संध्याकाळीही कुणी आले नाही, तसा मी फोन केला, तर तोच प्रचंड गडबडीत असल्याचा, पण उत्साही आवाज. काम जोरात सुरू झाले आहे. भरपूर इन्स्टॉलेशन्स केलीत, पण पेमेंट अजून जमा व्हायचे आहे. उद्या नक्की भेटतो.. वगैरे.

दुसर्‍या दिवशी मी फोन करून सांगितले, उरलेले दोन चेक्सही ड्यु झाले आहेत. आज एक आणि उद्या एक असे बँकेत जमा करतो.. म्हणून. मग जोशीही ओके म्हणाले. शिवाय पहिल्या चेकमधले राहिलेले दहा हजार आज किंवा उद्या पाठवतो.

आज-उद्याची भाषा ऐकून मी काळजीत पडलो. कारण राहिलेले चेक्सही बँकेत भरून ते क्लिअर होईस्तोवर आठवडा आणि अर्थातच सार्‍या जाहिराती संपणार होत्या. पण आता इलाज नव्हता. त्यानंतरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी वीस-वीस हजारांचे दोन्ही चेक्स जमा करायला, जोशींच्या राहिलेल्या आणि इतरही काही लोकांच्या कॅश पेमेंटसचा फॉलोअप असिस्टंटला करायला सांगून त्यानंतर मी काही कामानिमित्त दिवसभर बाहेर गेलो.

त्यानंतर कॅश पेमेंटसाठी त्याने उरलेले दोनही दिवस टोलवाटोलवी केली. पण फोन मात्र उचलत होताच. तेच गोड बोलणे, उत्साह.. टिपिकल कौन्सेलर्स टॉक!

वीकेंडनंतर सोमवारी सकाळीच आधी ज्याची भिती वाटत होती, ती बातमी मिळाली. जोशीचे दोन्ही चेक्स बाऊन्स झाले होते.

फोन केला तर तो तत्परतेने उचलला गेला. पण आता भाषा बदलली होती. तुम्हाला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही, असं त्याने सुनावूनच टाकलं सरळ.

मी दोन-तीन जणांना घेऊन त्याच्या ऑफिसला गेलो. तर आधी आपण बघितलेले ऑफिस हेच का, असा प्रश्न पडला. गिझर्सचा ढीग गायब होता. सारी माणसे गायब. फक्त एक हरकाम्या पोर्‍या. लीफलेट्सच्या थप्प्या जिकडे तिकडे दिसत होत्या. त्या पोराला दमात घेतल्यावर, "मी इथेच पलीकडे राहतो. मला कामाची गरज होती. नवीन ऑफिस बघितले, म्हणून आलो. त्यांनी ठेवून घेतले. सारा माल काल घेऊन गेले. इतकेच माहिती आहे.." असं म्हणाला.

तिथले लॅडलाईन नंबर्सही बंदच होते. जोशीला फोन करून पोलिसात जाण्याची धमकी दिली. आता मात्र त्याने "काय करायचे ते करा. पैसे मिळणार नाहीत!" असंही सांगून टाकलं.

पोलिस स्टेशनला गेलो. दोन तास बसवल्यावर 'तक्रार अर्ज लिहा' म्हणून सांगण्यात आले. आयुष्यात पोलिसांशी संबंध येण्याची ही पहिलीच खेप. त्यानंतर पुन्हा तासभर बसवल्यावर, 'तुमच्यासारखे धंदेवाईक लोक असं करूच कसं शकतात? धंदा करायचा, तर जपून, हातपाय सांभाळून करायला नको?..' इत्यादी भलेमोठे लेक्चर साहेबांनी दिले.

ज्या अकाऊंट्सचे चेक्स दिले होते, ते अकाऊंट एव्हाना बंदही झाले होते. कुणा तिसर्‍याच नावाचे सेव्हिंग अकाऊंट होते. शिवाय सही मॅच होत नव्हती ते निराळेच! ब्रांच मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याचे अ‍ॅड्रेस प्रुफ बघितले. त्या पत्त्यावर जाऊन पाहिल्यावर अर्थातच आनंदीआनंद होता.

डेक्कनच्या तेजस कॉर्पोरेशनला जाऊन विचारले. तर त्याने माझ्या एजन्सीचे बिल दाखवून, जाहिराती दाखवून शेकडो गिझर्स क्रेडिटवर उचलले होते. अर्थातच त्यांनाही ससूनची पीओ पण दाखवलीच होती.

ससूनला तपास केल्यावर त्यांनी वेड्यात काढलं, हे निराळं सांगायला नकोच. त्या नगर रोडवरच्या होस्टेलला तपास केल्यावर तीच कथा. अशा अनेक फोर्ज्ड पीओ बॅगेत घेऊन तो फिरत असल्याचे नंतर तेजस कॉर्पोरेशन आणि इतर अनेक लोकांनी सांगितले. मी पन्नासेक हजारांना, तेजसवाला काही लाखांना आणि अजून कोण कोण कितीतरी रकमांना झोपले. त्याचा मोबाईल बंद. ऑफिस बंद. घरचा पत्ता नाही. कुठच्याही लीगल डॉक्युमेंटसच्या आधारे माग काढण्याची शक्यता नाही.

अनेक महिने अनेक खेटे पोलिसांत मारून झाल्यानंतर 'काहीच उपयोग नाही' हे ब्रम्हज्ञान सावकाश प्राप्त झाले.

याला आता झाली काही वर्षे. पण अजूनही कुणीतरी हसतमुख, ब्रीफकेसवाला, कौन्सेलर दिसणारा माणूस ऑफिसात आला, की माझ्या छातीत एक सुक्ष्म कळ उठते.

***

"माझी टुर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आहे. इथेच सहकारनगरमध्ये ऑफिस आहे. जाहिराती सुरू करायच्या आहेत. सगळ्या वृत्तपत्रांत आपण करता ना?" एक अंदाजे चाळिशीचे पण पंचविशीचा उत्साह असलेले गृहस्थ एक दिवस आले.

"हो. अर्थातच. देशभरातली सारी वृत्तपत्रे. शिवाय इलेक्ट्रॉनिक मिडियातदेखील", मी म्हणालो. मग त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाची संपूर्ण माहिती घेतली. रेडिओ, टीव्हीवर कशा जाहिराती केल्या जातात, त्यांचे रेट्स, पॅकेजेस कसे असतात- हे सारे काही समजावून घेतले.

"आपले बजेट भरपूर आहे. जाहिराती करताना काटकसर अजिबात नको, असं मी ठरवलं आहे. आपण प्रिंट मिडिया, म्हणजे वर्तमानपत्रांतल्याच जाहिरातींपासून सुरू करू".

"चालेल की. क्लासिफाईड्स, म्हणजे छोट्या जाहिरातींपासून ते मोठ्या, डिस्प्ले जाहिरातींपर्यंत प्रकार असतात. त्यातही साईझ, कोणत्या पानावर हवी- त्यावरून एकून किंमत ठरते.." मी बोललो.

"आजच्या अंकातली ती बॅकपेजवर जाहिरात आली आहे ना, साधारण तशीच झाली पाहिजे. बजेटचा काही प्रश्न नाही. त्या जाहिरातीसारखीच कलरफुल, क्रिएटिव्ह आणि भारदस्त झाली पाहिजे".

मी बॅक पेज बघितले, तर एका सुप्रसिद्ध सहल कंपनीच्या वेगवेगळ्या टुर पॅकेजेसची माहिती देणारी, फुल पेज जाहिरात होती.

"ठीक आहे. करू या. रेट्सची कल्पना आहे ना तुम्हांला?" मी विचारले.

"नाही, ते सांगा ना. पण सढळ हाताने जाहिराती करायच्या असं ठरलं आहे माझं, हे सांगितलंच ना मी तुम्हांला. लगेच तयार करायला घेऊ या जाहिरात. सीझन सुरू झाला आहे. आणखी वेळ वाया घालवायला नको.." असं म्हणून त्यांनी एक कच्चा कगद घेऊन रफ लेआऊटसुद्धा करायला सुरुवात केली.

"ही पूर्ण पानभर जाहिरात आपल्याला आठ लाखांच्या आसपास जाईल. फक्त पुणे एडिशन". रेट्स आधी सांगायला हवेत असं वाटून मी म्हणालो.

"आठ लाख?" ते जरा उडाल्याचं मला स्पष्ट कळलं. "वर्षभर जाहिराती करून काही फायदा नाही. आपल्याला फक्त सीझनमध्येच करायच्या आहेत. तेही रोज नाही.."

"कुठल्याही वर्तमानपत्रांच्या दरपत्रकात जहिरातीचे दर हे एक दिवसाच्या प्रसिद्धीसाठीच दिलेले असतात.." मी शांतपणे म्हणालो, "मी तुम्हांला एका दिवसाचा, ब्लॅ़क अ‍ॅंड व्हाईट जाहिरातीचा, जनरल पेजेससाठीचा दर सांगितला आहे".

"काय सांगता?" आता ते जरा सचिंत झालेले दिसले. "या, या जाहिरातीची किंमत आठ लाख रुपये आहे? जरा नीट चेक करून सांगणार का प्लीज?"

"नाही. ही जाहिरात कलर आणि बॅक पेजवर असल्याने तिला दीडशे टक्के लोडिंग आहे. म्हणजे वीस लाख रुपये झाले. हे झाले पुणे एडिशनचे. सगळ्या एडिशनमध्ये ही आजची जाहिरात प्रसिद्ध झाली असेल, तर ती पंचवीस लाखांच्या वर जाईल". मी पुन्हा शांतपणे सांगितले.

पण त्यांचा विश्वास बसत नसल्याचे दिसत होते. ते खुर्चीवरून उठून उभे राहिले. आणि अस्वस्थ होत त्या जाहिरातीकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने पाहू लागले.

"आणि पूर्ण पानाऐवजी अर्धे पानभरून केली तर?"
"सांगितलेली किंमत अर्धी करा!"
"आणि पाव पान?"
"क्वार्टर पेजसाठी ना? पावपट करा!"
"म्हणजे दोन लाख?"
"हो. आणि तीच रंगीत जाहिरात केली, तर चार लाख. तीच फ्रंट पेजला पाहिजे असेल, तर सहा लाख.." मला आता थोडी गंमत वाटू लागली होती.

"तशी अगदीच फ्रंट पेजलाच हवी, असं काही नाही. केवढे दर आहेत हो या वर्तमानपत्रांचे!" ते थोडे निराश होत म्हणाले.
"हो ना. दर हे सर्क्युलेशनवरच ठरतात ना. ते जास्त, तर दरपण जास्त, असा सारा मामला.."
"असे आहे होय..! आतल्या पानांतल्या जाहिरातींना येतो का पण रिस्पॉन्स?"
"येतोच की. जाहिरात चांगली असेल, पुन्हा पुन्हा लोकांच्या नजरेस पडत असेल, तर आतले पेज काय, पण ब्लॅक अँड व्हाईट जाहिरातदेखील परिणामकारक ठरते बघा.." मी म्हणालो.
"हो ना? आपल्याला नकोच ती कलर जाहिरात. बजेटचा तसा काही प्रश्न नाही, पण आपण ब्लॅक अँड व्हाईटच करू या, असं मला वाटतं आहे".
"ओके. बजेट सांगितलंत तर मी तुम्हाला प्रपोजल देऊ शकेन.." मी पुन्हा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.
"बजेटचा काही इश्यू नाही हो.." पुन्हा त्याच समेवर ते आले. मग पाने चाळून त्यांनी एका गार्मेंट्स आऊटलेटची जाहिरात दाखवली. "उदाहरणार्थ, हिची किंमत काय होईल?"
"बारा बाय वीस सें.मी. आहे ती. अंदाजे सव्वालाख रुपये. लोडिंग्ज असतील, तर ती अर्थातच वेगळी. मघाशी सांगितल्याप्रमाणे". इति मी.
"बाप रे! तरी पण सव्वा लाख? फार होतात हो! आता याच्या निम्मा आकार म्हटला तरीदेखील पन्नास-साठ हजार. शिवाय एवढी छोटी जाहिरात दिसणर की नाही, हाही प्रश्न आहेच.."

मी आता जरा रिलॅक्स झालो. थोडे हसून म्हणालो, "मी मघाशीच बोललो, की बजेट सांगितलेत, तर तुम्हांला त्या किंमतीतले वेगवेगळे ऑप्शन्स देता येतील. आपला निर्णय लवकर होईल, आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही!"

"बजेटचे तसे काही नाही हो! आता जाहिराती म्हटल्यावर पैसे खर्च करण्याची तयारी आहेच आपली! पण उपयोगही झाला पाहिजे ना.." ते काळजीच्या सुरात म्हटले.

"होईल ना उपयोग.." मी बर्फ फोडायला घ्यायच्या तयारीने म्हणालो, "डिस्प्ले जाहिरातींचे सोडा. पण त्यापेक्षा अंदाजे निम्मे दर असणार्‍या, तीन सें.मी. कॉलम विड्थ असणार्‍या, क्लासिफाईड डिस्प्ले जाहिरातीदेखील बर्‍याच लोकप्रिय आहेत. या बघा, क्लासिफाईड्सच्या, म्हणजे छोट्या जाहिरातींच्या पानावर या बॉक्समधल्या जाहिराती आहेत ना, त्यांना क्लासिफाईड डिस्प्ले जाहिराती म्हणतात. या प्रकारच्या जाहिरातींचा फायदा असा, की त्या स्पेसिफिकली 'सहल, टुर्स, यात्रा, पर्यटन..' अशा हेडरखालीच येतात. आणि त्या बघणारे लोक हे तुमचे 'रेडी कस्टमर्स' असतात. ती स्पेसिफिक सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट त्यांना लगेच पाहिजे असल्याने ते त्याच हेडरखाली शोधत आलेले असतात..."

ते एक डोळा बारीक करून माझ्याकडे टक लावून पाहत होते आणि चेहेर्‍यावर संमिश्र भाव होते. त्यामुळे यातलं किती त्यांना कळलं असेल, याचा काही अंदाज येत नव्हता.

त्यांना तशा काही जाहिराती दाखवल्या. त्यातली एकीकडे बोट दाखवून ते म्हणाले, "हिची किंमत किती असेल, अंदाजे?"

"अंदाजे कशाला? नक्कीच सांगतो की!" मी म्हणालो, "ही वीस सें.मी. उंचीची जाहिरात आहे. वीस गुणिले तीन गुणिले तीनशे म्हणजे अठरा हजार रुपये!"

"कम्माल आहे बुवा!" त्यांच्या चेहेर्‍यावर पुन्हा एकदा आश्चर्य उमटले. "तरीही एवढे? आपल्याला जाहिरातीतले मॅटर बरेच कमी करावे लागणारसे दिसते आहे. हरकत नाही. करू या. बजेटचा तसा काही प्रॉब्लेम नसला, तरी सुरुवात लहानापासूनच करू या, नाही?"

मी आज्ञाधारकपणे मान डोलावली तसा त्यांनी क्लासिफाईड डिस्प्लेतला सर्वात लहान साईझ म्हणजे पाच सें.मी. चा साईझ दाखवला, तसा मी म्हणालो, "साडेचार हजार रुपये!"

"अरे वा!" ते म्हणाले. बर्फ फुटला आहे की नाही, काही कळत नव्हते. चष्मा कपाळावर चढवून नाक चिमटीत पकडून, मग ते खळखळून हसत म्हणाले, "किती पैसे जमत असतील हो यांच्याकडे, एका दिवसांत जाहिरातींपोटी?"

"नक्की सांगता येणार नाही, पण अंदाजे पन्नास लाख रुपये". मी 'कर्म करते रहो'च्या सुरात म्हणालो.

"बाप रे बाप! एवढ्या पैशाचं काय करतात तरी हे लोक?" पुन्हा आश्चर्य मुक्कामाला आल्याचे दिसले. मग क्षणभराने ते काळजीच्या सूरात म्हणाले, "एका दिवसाचे साडेचार हजार, नाही? हम्म. अवघड आहे. सामान्य व्यावसायिकांनी जाहिराती करायच्याच नाहीत, असं ठरवून टाकलेलं दिसतं आहे यांनी. च्च.. काही खरं नाही.."

"नाही, तसं नाही हो. शेवटी व्यवसाय वाढावा म्हणूनच तर जाहिराती केल्या जातात ना.." काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो.

"तेही खरेच. क्लासिफाइड डिस्प्लेचं थोडं लांबवावं असं मला वाटतं आहे. पण आता या चार-चार पाने भरून इतक्या छोट्या जाहिराती. त्याही एवढ्या छोट्या अक्षरांत. यादेखील लोक देतात, वाचणारे वाचतात म्हणजे कमालच, नाही?"

"प्रत्येक प्रकारच्या जाहिरातींना वाचक मिळतातच. कमी जास्त प्रमाणात किंवा वेगवेगळ्या आर्थिक वर्गातले- इतकंच. पण छोट्या जाहिरातीदेखील वाचल्या जातातच. त्या शिवाय का इतके सारे लोक देतात छोट्या जाहिराती?" मी म्हणालो. विचारल्या प्रश्नांना उत्तरे देणे भाग होतेच.

"अच्छा. तेही आहेच. पण किती किंमत असते या छोट्या जाहिरातींची?"
"पाचशे रुपये.." मी उत्तर दिले.
"एका दिवसाला? पाचशे रुपये??" त्यांचा नकळत आवाज वाढला. मग ते जाणवून नरमल्यासारखे ते म्हणाले, "लेट्स स्टार्ट विथ धिस. एक दिवस देऊन बघूया. मग नंतर महिना-दोन महिन्याची स्कीम वगैरे घेऊ बघावी नाही? तुमचे काय मत?"
"हरकत नाही. एक दिवस घेऊन बघा. छोट्या जाहिराती या मुख्यत्वे करून हॅमरिंगसाठी वापरल्या जातात. त्यामुळे जितके जास्त रिपीटेशन होईल, तितके फायदेशीर.."
"करूया की. रिपीटेशन. भरपूर करावे लागणार. बजेटचा तसा काही प्रश्न नाही. आता एक दिवसाची करूया. रिस्पॉन्स मिळेल ना? आणि तुम्हाला पाचशे रुपयांचा चेक काय नावाने देऊ?"
"क्लासिफाईड्ससाठी चेक पेमेंट घेत नाही. माफ करा.." मी बोललो.
"च्च..च्च. ही अशी पंचाईत करता बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोक आमची!" पुन्हा एकदा प्रसन्न खळखळून हसत ते म्हणाले, "ठीक आहे. काय करणार? देतो आता पाचशे रुपये कॅश, झालं!"

मी छोट्या जाहिरातीचा फॉर्म भरायला घेतला. त्यांनी त्यांच्या छोट्या जाहिरातीचा मायना सांगायला सुरूवात केली.. "अष्टविनायक यात्रा फक्त अडीच हजार रुपये प्रतिव्यक्ती. दोन वेळचे मराठी खानावळीतले चविष्ट भोजन व चहा; प्रवासखर्च आणि स्वच्छ धर्मशाळेतल्या राहण्याच्या, आंघोळीच्या सोयीसह..."

***

शिरूरचे भावेश दुगड म्हणून एक क्लायंट आहेत. अंदाजे चाळिशीचेच, पण उत्साह एखाद्या टीनएजरचा! प्रत्येक बाबतीत भलतेच पर्टिक्युलर. अगदी कपड्यांपासून, ते खाण्यापिण्याच्या, बायकोला आणि हाताखालच्या लोकांना फोन करण्याची पद्धत आणि वेळा.. अनंत गोष्टी. या गोष्टींचा मला नेहेमी हेवा वाटे. हे सारे इतके काटेकोर आपल्या बापाजन्मात जमणार नाही, असे वाटत असल्यामुळे असेल एखादे वेळी.

शिरूरला त्यांचा खाकरे-ठेपले इत्यादी बनवण्याचा एक कारखाना आहे. अप्रतिम चवीसाठी हा ब्रॅंड बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. चितळे आणि काका हलवाईंच्या दुकानांतून हे पदार्थ विकले जावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. (पुणेरी चोखंदळ खवैय्यांच्या पसंतीस हे खाद्यपदार्थ उतरले, की मग मार्केट काबीज करणे सोपे होईल, असा एकंदर हिशेब) पण त्या लोकांनी दुगडांनी ब्रँड नेम बदलून त्यावर चितळे बंधू, काका हलवाई लिहा, मग घेतो- असं सुनावलं. त्याला बाणेदारपणे नकार देऊन भावेशशेठने पुण्यात स्वतःचं मार्केटिंग नेटवर्क खूप कष्ट घेऊन उभारलं. आज ते पुण्याबाहेर तर विस्तारलं आहेच; पण हळूहळू एक्स्पोर्टही सुरू केलंय.

भावेशभाई फक्त बारावी पास. अनेक वर्षे भरपूर काम आणि संशोधन करून त्यांनी त्यांच्या उत्पादनांची चव विकसित केली. ही खास त्यांची स्वतःची अशी 'सिग्नेचर प्रोसेस' लीक होऊ नये, ड्युप्लिकेशन होऊ नये म्हणून अनेक बंधने स्वतःवर आणि कारखान्यात काम करणार्‍या कामगारांपासून स्टाफपर्यंत लादून घेतली. त्याबदल्यात कामगारांना कुणीही देणार नाही, अशा सोयीसवलती आणि विविध स्वरूपांतल्या मदती देऊ केल्या. यांत दिवाळी बोनस व्यतिरिक्त खास गणपती-नवरात्रात खास अलाऊंस, वर्षाकाठी एकदा सार्‍यांसाठी आठवडाभराची सहल, कामगारांच्या मुलांसाठी शिबिरे आणि वेळोवेळी शालेय मदत, आणि अजून बरंच काही.

या सार्‍या वाटचालीत त्यांच्या बायकोचीही फार मोठी साथ होती. प्रत्येक गोष्ट ते निर्णय घेत खरे, पण भाभींना विचारून, समजावून दिल्याशिवाय पुढे जात नसत. या दोघांचेही फारसे शिक्षण झालेले नसतानाही फक्त कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर घरात सुरू केलेला खाद्यपदार्थांचा उद्योग आता शंभराच्या वर कामगार असलेल्या एका कारखान्यात त्यांनी रुपांतर केले होते.

पण शुन्यातून जेव्हा एखादा माणूस जग तयार करतो, तेव्हा त्याच्या स्वभावात एक प्रकारची हेकटपणाची, एककल्लीपणाची, आपलं तेच बरोबर म्हणण्याची वृत्ती थोडीशी येतेच, आपोआप. (हे वाक्य खरं तर, 'प्रत्येक हुशार माणसामध्ये एक वेडसरपणाची झाक असतेच' असं वाचलं तरी चालेल!)

या दुगडशेठच्या जाहिरातींमध्ये आम्ही सुरूवातीला आमचे डोके चालवून विविध थीम्स देऊन पाहिल्या. पण त्यांना त्यातले काहीच आवडेना. शेवटी त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं, 'जाहिरातीची बॉडी, कॉपी मी तयार करणार. तुम्ही फक्त मी सांगेन तसे करायचे!'

खूप विचार करून काढलेल्या टिपणांचे खूप सारे कागद-भेंडोळी, लंच बॉक्स, बास्केटभरून फळे आणि सॅलड अशा सार्‍या जाम्यानिम्यानिशी ते दहा वाजता हजर व्हायचे. आता इतर काम शक्यतो करू नका, असा प्रेमळ दमही भरायचे. (आदल्याच दिवशी- मी दिवसभर तुमच्या ऑफिसला यायचा प्लॅन करतो आहे. तुम्ही बाहेर / बाहेरगावी जाणार नाही ना? लोडशेडिंग वगैरे नाही ना? इन्व्हर्टरचा पुरेसा बॅकअप आहे ना? प्रिंटर / फॅक्स / स्कॅनर / कॉपीयर- सारे चालू आहे ना?.. इत्यादी अनंत प्रश्न त्यांच्या चेकलिस्टमधून विचारलेलेच असायचे.)

जाहिरात शक्यतो छोटीच, पण इयर पॅनेल (फ्रंट पेजला सर्वात वरती चार बाय पाच किंवा साधारण याच साईझची जाहीरात) असायची. पण त्यांचे रिपीटेशन असायचे. आठवड्यातून दोनदा- किंवा असंच काहीतरी. प्रत्येक वेळी जाहिरातीचे कंटेंट, कॉपी वेगळी असावी, यावर कटाक्ष. पेमेंटही कधीही मागायची गरज आली नाही.

बाळबोध कॅप्शन किंवा पंचलाईन, ग्राहकराजाचे प्रचंड कौतुक आणि त्याच्याकडून आशीर्वाद मागणे, जगावेगळ्या चवीबद्दल पुनःपुन्हा ठासून ठासून सांगणे असा त्या जाहिरातींत एकंदर मामला. इथपर्यंत ठीक होते. कारण उत्पादनाबद्दल सर्वांत जास्त उत्पादकालाच कळत असते, आणि आपला ग्राहक कोण हे गणित त्याने मनाशी पक्के केलेले असते. पण आमच्या स्क्रीनचे रिझोल्युशन, क्वालिटी; जाहिरातीत वापरलेले रंग एक्झॅक्टली कसे येतील, त्याबदल अनेक शंका; वापरलेले फाँन्ट्स पेपरात नक्की दिसतील का; जाहिरातीत त्या विशिष्ट पानावर नक्की कुठे येईल; आणखी लहान किंवा मोठी साईझ केली, रंग गडद किंवा फिके केले, अक्षरे अजून लहान किंवा मोठी केली, तर रिस्पॉन्समध्ये किती फरक पडेल; अशा लाखो शंका. मग तितकीच परम्युटेशन्स-काँबिनेशन्स निमूटपणे करून दाखवण्यात आमची सारी शक्ती आणि वेळ खर्च व्हायचा; आणि दिवसभर इतर कुठचेच काम घेऊ नका- या त्यांच्या म्हणण्याचा अर्थही कळायचा.

यापायी आमचे- एकाच शब्दातला 'क' वेगळ्या फाँटमध्ये आणि (दुसर्‍या फाँटमध्ये चांगला दिसतो म्हणून) 'ख' दुसर्‍याच फाँटमध्ये; इतकेच नव्हे तर फक्त वेलांटी, उकार किंवा मात्रेपुरताच दुसरा फाँट/फाँट साईझ वापरणे- असे अभिनव प्रयोगही करून झाले. हे सारे झाले, फुल-स्क्रीन-प्रिव्ह्यु बघण्यासाठी की खुर्चीतून उठून ते वेगवेगळ्या कोपर्‍यांत जाऊन मान वाकडी करून, उंचावून, बुटके होऊन, डोळे बारीक करून बघत आणि पुन्हा खुर्चीत येऊन पुढले चेंजेस..

या प्रकाराचा कितीही कंटाळा आला, तरी त्याबद्दल काही बोलण्याची आमची शामत नव्हती. ते जाईस्तोवर हे सारे सहन करणे भाग असायचे. अर्थातच त्याबदल्यात ते आमच्याशी खूप गोड बोलायचे. त्यांची फळे, सॅलड, जेवणाचा डबा शेअर करू बघायचे. काहीबाही विनोद करत पाठीवर थापा-बुक्के मारायचे. दर तासाला चहा-लस्सी-कोल्ड्रिंक इत्यादी काहीतरी मागवून नाही म्हटले तरी प्रेमाने, बळजबरीने पाजायचे. दर अर्ध्या तासाला बाथरूमला जायचे आणि तेवढ्या वेळात आम्ही मोकळा श्वास घ्यायचो!

यामुळे भावेशभाई किंवा त्यांचा फोन आला, की आमच्या अंगावर सरसरून काटा येऊ लागला. ते आमच्याकडे असण्याचा दिवस एकदाचा पार पडला, की विश्वविजेते असल्यागत आम्हाला वाटू लागले.

मागच्या महिन्यात ते येणार असल्याची खबर त्यांनी आम्हाला दिली. दुसर्‍या दिवशी आम्ही डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट बघू लागलो. सकाळी अकरा वाजता दमदार आणि हळुवार पावलं टाकत ते ऑफिसात आले, तेव्हा त्यांचा चेहेरा प्रचंड विचारमग्न, गंभीर, जबाबदार वगैरे दिसत होता. त्यामुळे मीही नेहेमीपेक्षा जरा जास्तच चिंताग्रस्त झालो.

त्यांनी टेबलावर त्यांची बॅग ठेऊन सावकाश उघडली. मग अत्यंत महत्वाचा ऐवज काढावा, त्या हळुवारपणे त्यांनी खूप सारी कागदांची भेंडोळी बाहेर काढली.

"हे बघा भाऊ, गेले आठ दिवस मी रात्रंदिवस जागून हे तयार केले आहे. आपल्या पुढच्या महिन्यातल्या जाहिरातींसाठी. बघा जरा कसे वाटते.." नुकतेच जन्मलेले बाळ हातात द्यावे, तसे ते भेंडोळे त्यांनी माझ्या हातात दिले. ऑफिसात आल्या आल्या त्यांच्या चेहेर्‍यावर जी चिंता, जबाबदारी आणि प्रसववेदना दिसत होती; त्याचा अर्थ आता मला कळला.

मलाही ते नवजात कागद हळुवार हाताळणे भाग होते. मी हलकेच उलगडून पहिला कागद वाचायला घेतला..

धन्य धन्य (हे दोन शब्द खूप मोठे, मगचे पुढचे सारे लहान अक्षरांत) आहे त्यांना, ज्यांनी जगातील सर्वात उंच अशी २०० मजली गगनचुंबी इमारत दुबईमध्ये बांधून आकाशाचे चुंबन घेण्याचा विश्वविक्रम केला त्या सम्राट बुर्ज खलीफाला आमचे शतशः प्रणाम!

आणि त्याखाली त्यांच्या खाकर्‍या-ठेपल्यांच्या ब्रँडची नावे.

मी भंजाळलो. दुबईच्या इमारतीचा आणि खाकर्‍यांचा संबंध काय ते मला कळेना. बरं, ताज्या घडामोडीचा जाहिरातीच्या कॉपीत उपयोग करून घेऊन फायदा उठवण्याचाही प्रकार असतो. पण थेट दुबई? भारतातच इतके काय काय घडत असते. हा खाकरा तर अजून दोन-चार जिल्ह्यांच्याही पलीकडे पोचला नव्हता.

"म्हणून काय झाले? उद्या दुबईत काय, पण अमेरिकेतही आपण एक्स्पोर्ट करू!" उत्साहाने ते म्हणाले. "पुढचेही कागद वाचा. कसे वाटले ते सांगा.."

मी हलक्या हाताने त्यांचे दुसरे बाळ बघायला घेतले..

माझ्या स्वप्नात (हे दोन शब्द मोठे. मग पुढचे सारे लहान अक्षरांत) काल देव आला. तो म्हणाला, या अप्रतिम पदार्थांची किर्ती स्वर्गात पोचली आहे. त्यांच्या अतिसुंदर सुवासाने व घमघमाटाने सारा देवलोक देखील अस्वस्थ झाला आहे. तुम्ही कधी पाठवणार ते स्वर्गात???

आणि त्याखाली, नेहेमीप्रमाणे त्यांच्या ब्रँडची नावे.

मी हतबुद्ध झालो. आपल्याच उत्पादनांना स्वर्गवासी करण्याच्या कल्पनेला काय म्हणावे, तेच मला कळेना.

मी दुगडांच्या चेहेर्‍याकडे पाहिले. ते स्वतःतच मग्न होते. त्यांचा चेहेरा भयंकर काव्यमय वगैरे झाला होता. 'कसे वाटले, ते सांगा..' याचे प्रामाणिक उत्तर त्यांना देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होते.

मग मी पुढचे कागद वाचत राहिलो, आणि त्या त्या अपत्याची जन्मकहाणी ते मला उत्साहाने सांगू लागले..

ते अख्खे भेंडोळे वाचून झाले तेव्हा मी शक्तीपात झाल्यासारखा खुर्चीत बसून राहिलो. मी स्तिमित आणि शब्द सूचत नसल्यागत झालेला पाहून त्यांना आणखीच हुरूप आला. ते म्हणाले, "आज आत इथून जायचे खूप जीवावर आले आहे. कारण इतकी मस्त मैफिल क्वचित जमते. पण मार्केटला जावे लागणार आहे. मी पुन्हा परवा येईन. तोपर्यंत या सार्‍या जाहिराती तुम्ही तयार करून ठेवा. परवाचा पूर्ण दिवस आपण बसू. सारे काही फायनल करून टाकू.."

मला त्यातल्या त्यात सुटकेचा आनंद झाला. आणि ते भेंडोळे त्यांच्याच देखत व्यवस्थित कपाटात जपून ठेवले. शिवाय लॉकही करून टाकले. त्याचे महत्व मला कळल्याचा कोण आनंद त्यांना झाला!

ते गेल्यावर युद्धभूमीवरच्या अर्जूनाच्या मनःस्थितीत मी दोन मिनिटे बसून राहिलो, तेवढ्यात भावेशशेठ पुन्हा हजर! त्यांचा चेहेरा पहिल्यापेक्षाही चिंतातूर दिसत होता. मी जरा चरकलोच, आणि मग विचारले, "काय हो शेठ? काय झाले? काही राहून गेले का?"

"नाही." ते म्हणाले, "भाऊ, मी फार कष्ट करून, भुक-तहान आणि रात्र-दिवस विसरून ते सारे लिहिले आहे. जाहिराती तयार होऊन छापून येईस्तोवर ते कुणाच्याही हातात पडणार नाही असं बघा. यावर तुम्ही स्वतः काम करा पाहिजे तर. पण हे सारे अगदी टॉप सिक्रेट आहे, असं मानून चला. माझा एक फार मोठा खजिना तुमच्या ताब्यात दिला आहे असं समजा. जमाना वाईट आहे. ड्युप्लिकेशनला घटकाभरही लागत नाही आजकाल.. तेव्हा जपून, ही विनंती..!!"

भावेशभाईंनी मग सावकाश निरोप घेतला, पण त्याआधी त्यांचा तो खजिना गुप्तच राहील, हे त्यांना पटवता पटवता मला धाप लागली.

***

कितीरंगी, कितीढंगी व्यक्ती भेटतात त्याची गणतीच नाही. आणि ते रंग, ढंग, पदर उलगडावे तितके नवेच भासतात, नव्याने कळतात. मग ते समजून घेणे हे काम नाही, तर एक सोहळा होऊन बसतो. याच सोहळ्यासाठी मी अजूनही रोज वाट बघतो, एखादा नवीन कलंदर आज माझ्याकडे येईल, याची!

***
संपूर्ण
***

कलंदर, मी आणि जाहिराती (२) - http://www.maayboli.com/node/३१५२६

प्रकार: 

खूप छान !

व्यवसाय असो किंवा नोकरी रोजच्या कंटाळवाण्या रुटीनमध्ये अश्या वल्लीच आपल्याला विरंगुळा देतात.
मात्र अतिरेक झाला तर आपली स्वतःचीच दुसर्यांच्या नजरेत वल्ली होण्याची शक्यता असतेच.
तुमची narrative style आवडली.

छानच लिहीलेत तुझे अनुभव. तुझ्यासाठी जरी हे सगळे रुटीन असले तरी आमच्यासाठी हे जाहिरातींचे जग खूपच वेगळे आहे त्यामुळे वाचायला खूप मजा आली.

छान Happy

पहिल्या अनुभवाला सही कसं म्हणावं? पण वेगळं लिखाण वाचायला आवडलं.
दुसर्‍या किश्श्यात नक्की 'बजेट' किती असावं ह्याचा अंदाज अजूनही आलेला नाही Biggrin

मस्त रे...
सारखी सारखी वेगवेगळ्या निर्मात्यांशी झडलेल्या मिटींगांची आठवण होत होती... Happy

आवडल. मस्त लिहिलय.
पण मला एक कळल नाही , तुम्ही जर जाहिरातीचे ले आउट वगैरे तयार करत असाल तर व्यवहार (म्हणजे दर वगैरे सांगण ) हे काम दुसरी (administrative team) करत नाही का? कि भारतात तशी सिस्टीम नाही?

Pages