हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 20 April, 2010 - 09:18

हाफ़ राईस....... दाल मारके

असहाय्यता हे एकमेव भांडवल घेऊन जन्माला येणारी बालके जगात असतात याची कल्पना चार भिंतींच्या आड सुखेनैव जीवन व्यतीत करत असलेल्या कनिष्ठ, मध्यम, उच्च मध्यम व उच्च वर्गीयांना फ़क्त पेपर वाचल्यामुळे येते. ती कल्पना येते तेव्हा त्यांच्या हातात टोस्ट बटर असते व त्यांचा मुलगा टिपटॊप पोषाख घालून स्कूलव्हॆनमधून जाताना ’बाय’ म्हणत असतो. झोपडीत राहणारा मजूर असला तरी तोही त्यावेळेला मोफ़त वर्तमानतपत्र असलेल्या खांबापाशी तंबाखू चोळत इतरांशी त्या विषयावर गप्पा झोडून स्वत:तले संवेदनशील मन पुराव्यानिशी सिद्ध करत असतो.

पण ही बालके कोणत्याही आधाराविना स्वत:चे सुदैव, किमान दैव तरी, शोधत इतस्तत: फ़िरत असतात. ती जेव्हा पन्नास वर्षांची होतात, तेव्हा त्यांच्या मनात जीवनाबाबत टोकाचा तिटकारा असू शकतो. अशी माणसे नकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगू शकतात व इतरांना तसे जगायचीच स्फ़ुर्ती नकळत देत राहतात. त्यांची लढाई त्यांच्या मरणाबरोबर संपते. पण... संस्कृतीची, समाजाची ’मानसिक सुधारणेबरोबर’ चाललेली लढाई प्रदीर्घ असते. कदाचित, पाच हजार वर्षांनी तरी... अशा बालकांची काळजी घेण्याची व त्यांना आपल्यात सामावून घेण्याची मानसिकता या समाजाला लाभावी अशी इच्छा!

हाफ़ राईस दाल मारके ही अशाच एका असहाय्य बालकाची कहाणी आहे, ज्यात त्या बालकाच्या जन्मापासून ते जीवनातील शेवटच्या टप्प्यापर्यंतचा आढावा घेतला गेला आहे. कथानकाचा हेतू लक्षात येण्याइतके वाचक नक्कीच अनुभवी आहेत याची नम्र जाणीव आहे. वरवर ही एक प्रेमकहाणी आहे. मात्र त्यात माझ्या क्षमतेप्रमाणे मी काही प्रश्न जमतील तसे मांडले आहेत. उत्तरे देणे हे कदाचित मला जमणार नाही. तसेच, ’उत्तरे देणे’ हा मुळी कथानकाचा हेतूच नव्हता असे सांगून मी पळवाटही काढू शकेन. मात्र, प्रश्न मांडणे शक्य आहे. तेवढे करत आहे.

निसर्ग प्रत्येक क्षणी माणसाच्या मनावर आपले प्रभाव पाडत असतो. गोड गुलाबी लिहिणे अवघड नाही. मात्र निसर्गाचा प्रभाव पडत असलेल्या मानवी मनातील उलटसुलट प्रवाह व त्यातून घडत असलेल्या गोष्टी उल्लेखताना, याही कथानकात, मला अशी विनंती करावीशी वाटते की ’वास्तवाशी तडजोड करावी लागू नये’ म्हणून काही प्रसंग, काही उल्लेख हे चारचौघात नोंदवणे जरी धीट समजले गेले, तरी ते आवश्यक आहे असे मानून मला उदारपणे तितके स्वातंत्र्य कृपया मिळावे.

मी काश्मीर व अतीपुर्व भारतातील चार, पाच राज्ये सोडली तर संपूर्ण भारत गेली बावीस वर्षे कामानिमित्त फ़िरत आहे. असंख्य लोकांना असंख्य ठिकाणी प्रवासात वाट्टेल त्या वेळेला मी भेटलेलो आहे. माझ्याकडे सुदैवाने अनुभवांचा प्रचंड खजिना आहे. अशा साठ्यातूनच कथानक सुचवणारे काही मुद्दे आठवतात. ढाबा संस्कृती महाराष्ट्रात सुरू झाली तेव्हापासून मी त्याचा साक्षीदार आहे, खरे त्याही आधीपासून प्रवास करत आहे.

आपण जेमतेम काही घटका जेथे थांबून पुन्हा हायवेला लागतो तो ढाबा, त्या ढाब्यावरील जीवन, आपण पुढे निघून गेल्यानंतर कसे असते व त्यात ’दिपू’सारखा मुलगा कसे जीवन व्यतीत करतो, याची ही कहाणी!

हाफ़ राईस दाल मारके!

- 'बेफिकीर'!
------------------------------------------------------------------------------------

टहेरं आणि मुंगसे या लहानश्या गावांच्या मधे ती वस्ती होती. मालेगावहून टहेरंला किंवा नाशिक / चांदवडहून मुंगश्याला आल्याशिवाय त्या वस्तीला जाताच यायचं नाही. मुहरवाडी! साधारण साठ उंबरे आणि तीनशे लोकसंख्या! रानटी फ़ळे, फ़ुले अन लहान प्राणी / पक्षी आणून ते चांदवडला जाऊन विकणं हा एकमेव धंदा! येताना तिकडूनच मोबदला व मोबदल्याच्या काही भागातून नशा आणली की वस्तीवर रात्री नुसता गदारोळ असायचा.

रात्री अकरा वाजता मन्नू लडखडत सुनंदाच्या घरापाशी पोचला तेव्हा त्याच्या मनात पुर्वीप्रमाणे कसलीही धाकधूक नव्हती. पुर्वी यायचं म्हणजे कुठे चाहुल वगैरे तर लागत नाहीयेना, कुणी पाहात तर नाहीयेना! हजार भानगडी! पण आता वस्तीने त्यांचे नाते स्वीकारले होते. तेही मन्नूला तिच्याकडे जाताना बघून वगैरे नाही, किंवा त्याला घाबरूनही नाही. घाबरण्याचे कारण फ़ारसे नव्हतेच! मन्नू हा काही मोठा दादा वगैरे नव्हता. पण वस्तीतल्या एका म्हातारीने, जिला सगळे आक्का म्हणायचे, चारचौघा अनुभवी बायामाणसांना जमवून सांगीतलं होतं! आक्काचा वट जरा बरा होता. तिने मुद्दा मांडला होता की आपल्याच जातीतल्या बाईला आपण संरक्षण दिलं नाहीतर उद्या बाहेरची माणसं इथे पोचतील. त्यापेक्षा तिला कुणीतरी सहारा द्यावा, त्या बदल्यात तिने त्याच्याबरोबर पत्नीप्रमाणे व्यवहार करायला हरकत नाही. पण सुनंदाला होता एक सावत्र मुलगा! तिचा नवरा वर्षभरापुर्वी मेला. त्याचे अन सुनंदाचे सात वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यावेळेसच त्याला एक वर्षाचा मुलगा होता. त्याची आधीची बायको जळून मेली होती. आता वस्तीतल्या सगळ्यांना खरी कहाणी काय आहे ते माहीत होते. पण केस तरी तशीच झालेली होती अन नवरा कैद होण्यापासून वाचला होता. मग त्याने वर्षभराने निवांत गावाला जाऊन आपल्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या सुनंदाला सरळ बायको करून वस्तीत आणलं होतं! तिच्या स्वत:च्या इच्छेला मान देऊन तिचं ऐकायची तिच्या बापाला काही गरजच नव्हती. त्याला आधीच पाच मुली होत्या अन एकही मुलगा नव्हता. कुठेतरी मुली खपल्या की झाले या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन त्याने आपल्या चार नंबरच्या मुलीचे या माणसाशी लग्न लावून दिले होते. उलट जावयानेच त्याला दिड हजार रुपये अन पस्तीस माणसांना बोकडाचे जेवण दिले होते.

सुनंदा रुपाने सामान्य होती. पण आपल्या मुलाला सांभाळायला घरात बाईमाणूस पाहिजे म्हणून तिची वर्णी लागली होती. पण तिचा नवरा हळूहळू तिच्यावर प्रेम करू लागला. पहिली दोन वर्षे तर तो तिला सोन्यासारखे जपत होता. नंतर तिने स्वत:ला मूल हवे म्हणून आग्रह धरला. मात्र त्याला ते मान्य नव्हते. किंचित कुरबुरी चालू झाल्या. मात्र त्याच्या मुलाला ती जीव लावायचा प्रयत्न अजूनही करत होती. मुलालाही हळूहळू तिचा लळा लागत होता.

मन्नू सुनंदा वस्तीत आल्यापासूनच तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता. सुनंदाला ती नजर व्यवस्थित समजली होती. पण तिच्या दृष्टीने ते पाप होते. मन्नूकडे ती बघायचीही नाही. सुदैवाने वस्तीत इतर लोक तसे नव्हते. त्यामुळे नवरा मजुरीवर गेला असला तरी ती स्वत:ला सुरक्षित समजायची.

पण आपल्याला मूल होऊ नये ही इच्छा नवरा वारंवार बोलून दाखवायला लागल्यावर तिचा त्याच्यावरचा जीव कमी झाला. मुलाकडे मात्र ती बघायची. पण आता त्या बघण्यातले प्रेम कमी होऊन कर्तव्याचे प्रमाण वाढू लागले. आता सुनंदा आजूबाजूच्या बायकांशी बोलू चालू लागली. विविध विषय निघू लागले. तिला वस्ती, वस्तीतील माणसे, वस्तीची संस्कृती, हळूहळू सगळे समजू लागले. आता हसणे खेळणे अन गप्पा नित्याच्याच झाल्या. नवरा यायच्यावेळेस मात्र ती घरात जाऊन स्वयंपाकाला लागायची!

मात्र हे होत असताना तिच्या नकळत एक गोष्ट घडत होती. मन्नूच्या डोळ्यात हळूहळू तिचे डोळे मिसळायला लागले. तो समोरच राहायचा. त्याचे लग्न झालेले नव्हते. डोळे मिसळणे जरा पळभर वाढायलाच लागले. मग एकेक पायरी पुढे जात मन्नू तिच्याशी हसून बोलायला वगैरे लागला. ती पण लोकलाजेस्तव फ़ार नाही, पण मनापासून काही ना काही उत्तर तरी द्यायचीच! मग मन्नूची कळी खुलायची!

तब्बल तीन वर्षे त्यांचे प्रेम एकेक पायरी ओलांडत चालले होते. मन्नूला दारूचे व्यसन होते. सुनंदा आता अशा पातळीवर आली होती की कुणी नाही बघून ती त्याला किती पिता असे म्हणायचीही. तोही हसून ते म्हणणे उडवून लावायचा. पण त्याची एकंदर बेदरकार वृत्ती तिला आवडू लागली होती.

एक दिवस तिचा नवरा नसताना मन्नू सरळ घरी आला. त्याने कुठूनतरी बरीच फ़ुले आणलेली होती. सुनंदा हरखली. त्याने ती देवाला म्हणून आणली असे सांगीतले. दोन तासांनी तिला त्याने घराबाहेर पाहिले तेव्हा तिने त्यातील काही माळलेली होती. नजरानजर झाली तेव्हाच संदेश व्यक्त झाले. मग नवरा घरी नाही पाहून मन्नू काही ना काही कारण काढून जायला लागला. कुणी पाहू नये म्हणून तो पटकन आत घुसायचा! काहीतरी किरकोळ गोष्ट, जसे एखादे फ़ळ, एखादी भाजी वगैरे देऊन परत यायचा.

दोघेही आपापल्या घरात एकमेकांचा गंभीरपणे विचार करण्याच्या पातळीवर आले त्याचदरम्यान ती दुर्घटना घडली. सुनंदाचा नवरा अपघातात मेला. प्रचंड आक्रोश करणारी सुनंदा पाहून वस्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

आणि सहा महिन्यात ही परिस्थिती पालटलीही! मन्नूच्या अस्तित्वामुळे सुनंदा आता उलट खुषच झाली. त्याचदरम्यान कुणीतरी मन्नूला तिच्याकडे दुपारचे जाताना पाहिले. त्या बाईने आक्काकडे कुजबुज केली. आक्काने सरळ चार माणसे बोलावून निकालच फ़र्मावला. आक्काचे महत्व असण्याचे कारण विचित्र होते. लोकांच्या मते तिला मंत्र यायचे. काही रोगी तिच्यामुळे बरे झाल्याच्या कहाण्या वस्तीत जुन्या झालेल्या होत्या. वस्तीने आक्काचे ऐकले. सहा महिन्या मन्नूने सुनंदाशी विवाह करावा या अटीवर त्यांचे संबंध राजरोस सुरू झाले.

मात्र आज वाईट प्रकार घडला. सुनंदाचा सात वर्षांचा सावत्र मुलगा रोज तिला खेटून झोपायचा. बाबा गेल्यामुळे त्याला भीती वाटायची. मन्नू आला की सुनंदा हलकेच मुलाला दूर करायची अन एक पाच फ़ुटांवर मन्नूच्या शेजारी येऊन पडायची. मुलाला रात्री जाग येण्याचे प्रकार यापुर्वी एकदोनदा घडले होते. पण तेव्हा मन्नूच चोरून आल्यामुळे अन त्याला तिने खोलीचा एक अंधारा कोपरा शोधून तेथे ढकलल्यामुळे मुलाला समजलेच नव्हते की खोलीत आणखी कुणीतरी आहे. मन्नू स्वत:च घाबरलेला असायचा. पण आता वस्तीने परवाना दिला होता. आज मुलगा जागा झाल्यावर सुनंदाने मन्नूला दूर ढकलले व ती मुलाला थोपटू लागली. मन्नू भडकला. त्याने तिला खेचली. मुलाने एकदम मन्नूकडे पाहिले. त्या मुलाला परिस्थितीची काहीच कल्पना नव्हती. पण मोठी माणसे रात्री कपडे काढून काहीतरी करतात असे आजूबाजूच्या टवाळ मुलांच्या बोलण्यातून त्याने वरवर ऐकले होते. मात्र आज मन्नूला अन आईला तसे पाहून तो एकदम ओरडला... आई... मन्नू काका!

मन्नूला आज जास्त झाली होती. त्याने कसलाही विचार न करता त्या मुलाच्या दंडाला धरून त्याला उचलला अन पिटायला सुरुवात केली. त्याचवेळेस तो मोठ्याने शिव्या देत होता. सुनंदा त्याला आवरायचा प्रयत्न करत होती. मुलगा मार खात होता.

झोपडपट्टीला हे प्रकार अजिबात नवीन नव्हते. निदान दहा पंधरा दिवसांतून तरी कोणत्या ना कोणत्या झोपडीत मारहाणी, शिवीगाळ हे व्हायचेच! काही लोक बाहेर येऊन सुनंदाच्या झोपडी बाहेर थांबून हाका द्यायला लागले. तसे दोघांनी आत पटकन कपडे घातले अन दार उघडले.

कुणीतरी ’काय झालं’ विचारल्यावर मन्नू भडकून म्हणाला:

’हे भलत्याच पोर! मी काय म्हणून सांभाळणार? हिचा असता तर पाहिलं असतं! मी याला सांभाळायची शपथ घेतलेली नाय. उगाच नवरा बायकोत मधे येतोय.’

दोनच दिवसात निकाल लागला. मुलगा रात्रीचा शेजारच्या रेहानामौसीकडे झोपत जाईल.

पण हे किती दिवस? शेवटी त्याचा खर्च वगैरे कुणी करायचा? मन्नूचा आता सुनंदामधला इंटरेस्टही पुर्वीइतका नव्हता. आता हळूहळू त्याने तक्रार करायला सुरुवात केली. सुनंदा खूप समजावून सांगायची त्याला. पण आता मनातून तिलाही त्या मुलाच्या अस्तित्वाचा जरा रागच यायला होता. कोणाचा कोण आणि आपण जन्मभर का पोसायचा? शेवटी तिचे अन मन्नूचे एकमत झाले.

आणि वस्तीतल्या कुणाचेही मत विचारात न घेता मन्नू अन सुनंदाने एका रात्री त्या मुलाला हाकलून दिले. सगळी वस्ती पाहात होती. पण त्याला सांभाळायला जाणार कोण? आयुष्यभराची ब्याद अशी घरात घेतात का? सगळे मन्नू अन सुनंदाला माणूसकी शिकवत होते. पण एकालाही ती स्वत: दाखवता येत नव्हती. त्या मुलाला आपल्याला घरातून हाकलंलय म्हणजे काय केलंय हेच माहीत नव्हतं! तो होता साडे सात वर्षांचा! त्याला वाटलं की त्याने बाहेर बसायचं! मन्नूकाका आहे तोपर्यंत आणि तेव्हा घरात जायचं नाही. पण तो जेव्हा घरापुढच्या फ़रशीवर बसला तेव्हा मन्नूने त्याच्या पाठीत लाथ मारली.

मुलगा वेदनेनी ओरडत होता. दोघातिघांनी त्याला जवळ घेऊन पाणी व गोळी दिली. मन्नूला दम भरला. मात्र, एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं! हे पोरगं काही या दोघांचही नाही! हे का म्हणून यांच्या सुखी संसारात? ती रात्र संपून सकाळ झाली तेव्हा वस्तीने पन्नास रुपये जमवून त्या मुलाला वस्तीबाहेर नेले. सौंदाणे राहुड मार्गाने त्याला टेंपोत बसवून चांदवड स्थानकावर नेले व बसस्टॆंडवर सोडून दिले. त्याला कोणत्याही बसमधे बस म्हणून सांगीतले. तो मुलगा भीतीमुळे व असहाय्य असल्यामुळे रडत होता. पण ही ब्याद परत न्यायची इच्छा कुणालाही नव्हती. मात्र फ़ारच दया आल्यामुळे त्या लोकांनी दोन गोष्टी मात्र केल्या. त्याच्याजवळ एक पाण्याची बाटली, खायला चिक्की एवढे दिले अन एका मालेगावहून नाशिकला जात असलेल्या बसमधे कंडक्टरशी काहीतरी खोटे बोलून त्याला बसवून मात्र दिले. याच बसमधे का??? तर कारण एकच! ही एकच बस अगदी त्या म्हणजे त्या क्षणी निघालेली होती अन कंडक्टर दार बंद करून घेत होता. कंडक्टरचा समज झालेला होता की पुढच्या नाशिकच्या बसमधे याच्या घरचे चुकून गेले अन हा खाली उतरलेला लक्षातच राहिले नाही. सहा भावंडे आहेत.

चांदवड अन सोडून बस वडाळी भुईच्या दिशेने सुसाट निघाली तेव्हा.......

’दीपक अण्णू वाठारे’ उर्फ़ दिपू उर्फ़ दिप्या या आठ वर्षांच्या मुलाने जगाच्या शाळेत प्रवेश घेतला होता. फ़ी होती... स्वत:चे आयुष्य बरबाद करण्याची! डबा होता, एक लहानसे चिक्कीचे पाकीट अन एक वॊटरबॆग! दप्तर होतं आठ वर्षांचा अनुभव आणि आईने सोडलेले असणे व मन्नूकाकाने मारलेले असणे या आठवणी! आणि... या शाळेला मधली सुट्टी तर नसायचीच पण... सुट्टीच नसायची!

दिपू भयाण रडत होता. सगळ्यात मागच्या सीटवर त्याला पाचजणांच्यामधे बसवला होता. कुणाचातरी चुकलेला मुलगा अशी त्याची सध्या ओळख होती. प्रवासी आपले त्याला समजावून सांगत होते. कुणी पाणी, कुणी गोळी वगैरे देत होते. कुणी सांत्वन करत होते. दिपूचा प्रॊब्लेम वेगळाच होता. पाणी अन चिक्की तर त्याच्याकडॆही होती. आई बाबांनाही, मुख्य म्हणजे आईला, तोही शोधतच होता. पण बस पुढे चालली होती अन आई मागे होती. लोक त्याची आई त्याला पुढे भेटेल असे आश्वासन देत होते. पण रडून रडून अशी अवस्था झाली होती की खरे सांगायला आवाजच फ़ुटत नव्हता.

मंगरुळला पुन्हा थोडी चढउतर झाली. दिपू दमून इकडे तिकडे बघत होता. एका बाईने विचारले. कुठल्या गावचा? महुरवाडी हे नाव त्याच्याशिवाय फ़क्त कंडक्टरला माहिती होते अन कंडक्टर पुढे होता.

सुन्न झालेला दिपू काही वेळ नुसताच इकडेतिकडे टकमक बघत होता. गाडी थांबवून कुणी आपल्याला न्यायला येतंय का याची त्याला आशा होती. मधेच आठवण येऊन तो रडू लागायचा. मधेच मागच्या सीटचे धक्के बसल्यावर पाठीची वेदना नव्याने जाणवायची. शेवटीशेवटी ऊन चढले व गाडी मंगरुळ - वडाळी भुई मार्गावरून तापत तापत निघाली तशी दिपूला ग्लानी आली. दहाच मिनिटात तो शेजारच्या एका आजोबांच्या मांडीवर कलंडला. त्यांनी प्रेमाने त्याला थोपटून झोपवून ठेवले.

जगाच्या शाळेतील मिळालेला हा खराखुरा पहिला ओलावा! निरागस दिपू जो झोपला तो थेट वडाळी भुईला गाडी धक्के खात खात थांबली तेव्हाच उठला.

त्याला वाटले आलो आपण! अर्थात, चांदवडही ओळखीचे नव्हते अन वडाळी भुईही! त्यामुळे आपण परत आलो असे तो स्वत:लाच समजावून सांगत होता. मग तो त्या आजोबांना मला घरी सोडा म्हणाला. कंडक्टरने चौकशी केली तेव्हा पोरगं महुरवाडीचं असल्याचं कळलं! मग आई वडील कुठे गेले आहेत विचारल्यावर तो घरीच आहेत म्हणाला तेव्हा उलगडा झाला. त्याला मारून घराबाहेर काढलेलं होतं

आता करायचं काय या पोराचं? बाकी प्रवाश्यांचं ठीक आहे. ते जातील निघून! पण शासनाच्या बसमधून एक एकटं पोरगं आलं अन कंडक्टर ड्रायव्हरने ते तसंच कुठेही सोडून दिलं हे चालणार नव्हतं!

कंडक्टरने दिपूला नियंत्रण कक्षात सोडले व थोडक्यात हकीगत सांगीतली. त्यांच्यातील एकाने मग त्याला चौकीवर नेलं! चौकीतील लोकांनी टेहरेशी संपर्क साधला. दोन पोलीस त्याला घेऊन उलटे निघणार होते. तेवढ्यात चौकीवर इलेक्ट्रिकचे काम करायला आलेल्या तुकारामने पोलिसांना सांगीतले की तो याला घेऊन जाईल. पोलिसांचा तुकारामवर विश्वास होता. तो जवळपासचाच राहणारा होता. पण तुकारामने सांगीतले की तो मुलाला मुलाच्या घरी घेऊन जाणार नसून त्याच्या स्वत:च्या घरी नेणार आहे व त्याला सांभाळणार आहे. याला अर्थातच मान्यता मिळाली नाही. तीन तास पोरगं चौकीवरच बसून होतं! मधेच रडायचं, मधेच नुसतं बघत बसायचं! जवळपास पाच तासांनी टेहरेकडून निरोप आला की हा मुलगा घरातून व वस्तीतून काढून टाकलेला आहे. त्याला परत आणता निश्चीतच येईल, पण आपले काहीच नियंत्रण राहणार नाही व नंतर त्याचा तिथे छळ होईल.

मग वडाळी भुईमधील एक वरिष्ठ पुढारी व दोन माणसांना पाचारण करण्यात आलं! त्यांची चर्चा झाली. चर्चेचा निष्कर्ष निघाला की याला पुन्हा घरी पाठवलं तर एखादा दिवस याला मारूनही टाकतील. त्यापेक्षा कुणाचीच हा हरवल्याची तक्रार नाहीये, तर याला इथेच ठेवा अन सांभाळा! काहीतरी शिकवा, पुढे आपल्या पायावर उभा राहील. किंवा नाशिकला नेऊन सुधारगृहात ठेवून द्या. कुणी हक्क सांगायला आलं तर कागदपत्रे तपासून त्यांच्या ताब्यात देऊन टाका.

फ़ार मोठा माणूसकीचा निर्णय घेण्यात आला. मुलाला तुकाराम सांभाळेल! अन त्यासाठी तुकारामला पुढारी माणसाच्या निधीतून महिन्याला तीनशे रुपये मिळतील.

काहीही कारण नसताना रडत रडत दिपू तुकारामच्या घरी आला. दोन खोल्यांचं घर! त्यात तुकाराम, त्याची बायको व एक दिपूपेक्षा चार, पाच वर्षांनी मोठा मुलगा!

प्रौढ माणसालाही अचानक ठिकाण, राहणीमान व अनोळखी माणसांमधे क्षणभरही सुचत नाही. हा तर लहान मुलगा होता.

घराच्या अंगणात बसलेल्या दिपूला तुकाच्या बायकोने भाकरी व भाजी दिली. दिपूने हातही लावला नाही. तो फ़क्त दमून दमून रडत होता.

खूप खूप वेळाने त्याला शहाणपण सुचले. आपली परिस्थिती काही बदलताना दिसत नाही. हे लोक निदान खायला तरी देत आहेतच! पण कुणीही घरी जाण्याचे नाव काढत नाही आहेत. आपल्याकडे कुणाचे लक्षही नाही आहे. बहुधा आपल्याला पकडलंय आणि इथे ठेवलंय त्या पोलिसांनी!

मग त्याला भूक लागली. त्याने मगाचच्या ताटलीतील चार घास खाल्ले. ते खातानाही तो तुकाच्या बायकोकडे भीतीने बघत होता. मग तिने त्याला असे अन्न टाकायचे नसते असे सांगीतले. दिपूला पहिल्यांदाच पोटात पडलेल्या खड्ड्याची खरी जाणीव झाली. त्याने ती उरलेली भाकरीही संपवली. ढसाढसा पाणी पिऊन तो उठला तेव्हा ती बाई त्याला म्हणाली की भांडी बाहेर धुवून टाकायची अन मग आत आणायची. त्याने ती कशीतरी धुतली. आपली आई भांडी कशी विसळायची हे त्याला माहीत होते. त्याच पद्धतीने भांडी विसळायचा त्याने प्रयत्न केला. घराच्या दारात उभे राहून भांडी त्या काकूकडे देताना त्याने पुन्हा विचारले...

दिपू - मला .. घरी जायचंय...
काकू - आता घरी नाही हं जायचं? आता इथेच राहायचं! आमच्याकडे....

आता इथेच राहायचं! घरी नाही जायचं! दोनच वाक्यं! काय उलथापालथी झाल्या असतील त्या एवढ्याश्या मनात? त्याला काय समजले असेल? काय सोसले असेल?

ते वाक्य ऐकून दिपू जो रडायला लागला तो त्या घरातील मुलाने डोळे मोठे केले तेव्हा घाबरून थांबला. याला बहुधा आपल्याला मारायला अन शिक्षा करायला ठेवला असावा.

घुसमट घुसमट होत होती त्याची. आपण कुठे आहोत, का आहोत काहीच समजत नव्हते. समजण्याचे वयच नव्हते.

दुपार टळली होती. दिपू अंगणामधील एका सावलीत नुसता मातीत बोटं फ़िरवत इकडे तिकडे बघत बसून राहिला होता. दोन तीनदा त्याने पाणी मागीतले होते व भरपूर पाणी प्यायला होता. या वेळेला आपली आई आपल्याला गोडाचा पांढरा भात खायला द्यायची हे त्याला आठवले. तो त्याच्या परीने विचार करू लागला. काय झाले? का झाले असे?

बहुधा... काल आपण रात्री.. मन्नू काका म्हणून ओरडलो... तो पानू म्हणतो तसं आई अन मन्नू काका... काहीतरी.. करत असतील का? आणि ... मग म्हणून चिडले... पण ...

त्याच्या मनात काहीही विचार येत होते. मधेच तो पुन्हा रडत होता. घरातला मुलगा, त्याला त्याची आई विशाल अशी हाक मारत होती, बाहेरच्या रस्त्यावर काही इतर मुलांबरोबर खेळत होता. एक बॊल होता, कसलीतरी आडवीतिडवी फ़ळी मागे लावली होती. एकाच्या हातात दांडुकं होतं! आणि त्या दांडुक्याने तो बॊल मारला की बाकीचे पळत तो आणत होते. आरडाओरडा चाललेला होता. आपल्याला घेतील का?? खेळायला??

दिपू हळूच त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. पाचच मिनिटांनी त्याच्या बाजूला बॊल आला. त्याने तो पटकन उचलून बॊल टाकणारा मुलगा होता त्याच्याकडे फ़ेकला. आपण केवढे उपयोगी पडलो असे त्याच्या मनात आले. तेवढ्यात विशाल धावत आला. त्याने सगळ्यांना विचारले. हा मुलगा आमच्याकडे ठेवलाय, दिपक नाव आहे, याला कीपर म्हणून ठेवायचा का? म्हणजे हा धावाधाव करेल...

सगळ्यांना अर्थातच ती कल्पना फ़ारच आवडली. आता कुणालाच श्रम पडणार नव्हते. दिपूला विकेटच्या मागे उभे केले. पण दुर्दैवाने त्याची उंचीच जेमतेम विकेटच्या थोडीशीच वर होती. त्यामुळे तो तेथे कुचकामी ठरला. मग त्याला खेळू नकोस असे सांगण्यात आले. पण पुन्हा बॊल जरा लांब गेल्यावर त्याला आणायला सांगीतल्यावर त्याने धावत जाऊन आणला.

मग पंधरा मिनिटांनी अंधार पडल्यावर खेळ थांबला. आपण दोन वेळा बॊल आणून दिला अन एकदा आपल्याला त्या फ़ळीच्या मागे उभे केले होते ही दिपूची आजच्या दिवसातली ऎचिव्हमेंट होती.

अन त्याचवेळेस त्याने तो प्रकार पाहिला. विशाल आत जाऊन खुर्चीवर बसला होता, टेबलवर एका ताटलीत काहीतरी छान दिसणारे खायला होते अन विशालची आई दिपूला मात्र सांगत होती... की हात पाय धुवून ओसरीवर बस... भाकरी ठेवलीय उरलेली ती खाऊन घे आणि मदतीला ये...

आपल्यात आणि विशालमधे फ़रक आहे हे त्या निरागसाला दिवसभरात पहिल्यांदाच समजले. जगाची शाळा होती ही... येथे ... वय पाहिले जात नाही.

ओट्यावरची काही किरकोळ कामे केल्यानंतर रात्री दिपूला नवे जेवण मिळाले होते. त्या जेवणानंतरही त्याने काकूंना थोडी मदत केली. काका विशालची प्रेमाने काही ना काही चौकशी करत होते, दिपूकडे बघतही नव्हते.

आईला खेटून झोपण्याची सवय सोडण्याची शिकवणी दिपूला त्या रात्री पहिल्यांदाच मिळाली. आपले , सावत्र का असेना, पण आजवर आपल्याबरोबर असलेले बाळ कुठे असेल अन कसे झोपले असेल याची काळजी सुनंदाला नव्हतीच. नवीन क्षितीजे तिच्या संसारात आली होती. आता फ़क्त ती आणि मन्नू!

अंगणातून येणारे किड्यांचे आवाज, खाली एक जाड जाजम, अंगावर एक घोंगडी, आजूबाजूला गुणगुणणारे डास आणि घराचे आतून बंद केलेले दार! पहिल्यांदाच दिपूला समजले. आपण काही तितके लहान नाही राहिलो आता. एकटे झोपता येईल इतके मोठे झालो आहोत. पण हे जिला सांगायचे अन कौतूक करून घ्यायचे ती..................... आई... नव्हती इथे...!

घोंगडी भिजेपर्यंत दिपू रडत होता. डासांना हाताने हाकलत होता. पहाटे तीन वाजले असावेत जेव्हा त्याला कशीबशी झोप लागली. आणि त्याला आठवत होतं! झोपल्यानंतर अगदी काहीच वेळात, म्हणजे, जरासाच वेळ झाला असेल, कुणाच्यातरी हाका ऐकू येत होत्या आणि आपल्या शरीराला धक्के बसत होते. काकूने पहाटे पाचला त्याला उठवलं होतं! स्वयंपाकघर झाडताना दिपूला झाडू कसा धरतात हेही माहीत नव्हतं! पावणेसहाला विशाल उठला. त्याला दूध बिस्कीटे मिळाली. दिपू बघत होता. विशालने विचारले. काल खेळायला मजा आली की नाही? दिपूला त्यातही आनंद वाटला. आपण खेळात होतो याची ऎकनॊलेजमेंट विशालने देणे म्हणजे काय झाले? दिपू निरागस हसला. तोवर काकूने त्याला ताटात कालची पोळी अन भाजी दिली. दिपूने विचारले, मला बिस्कीट... ! त्यावर काकू जे बोलली त्यावरून त्याला इतकेच समजले की जी मुले शाळेत जातात त्यांनाच दूध अन बिस्कीटे मिळतात!

पंधरा दिवसात दिपू काळवंडला! पण रमला बिचारा त्या घरातही! रमण्याशिवाय पर्यायच नव्हता. मधेच कुणीतरी बाहेरचे येऊन चौकशी करून जायचे. त्याची बडदास्त मस्त ठेवली आहे असे मत होत असावे त्यांचे! मात्र त्याला शाळेत घातले नव्हते. कारण त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेईन असे तुकारामने कबूल केलेलेच नव्हते.

जीवाने आवाक्यात असेल त्या जीवाचे शोषण करून जगणे या प्रक्रियेला जीवन असे म्हणतात वाटते. जो बळी तो कान पिळी ही म्हण बदलायला हवी. जो बळी तोच जगू शके अशी ती म्हण करायला हवी!

एक माणूस झिजला तरच दुसरा त्याच्या जीवावर उभा राहू शकत असावा.

आणि पंधरा दिवसांनी दिपूला एक नवीन व अत्यंत महत्वाचा साक्षात्कार झाला. आपल्यात एक बुद्धी नावाची गोष्ट असते आणि ती जर नीट व चपखलपणे वापरली तर आपल्याला आपली आईच काय, जगात कुणाचीही गरज भासत नाही. हा साक्षात्कार व्हायला एक प्रसंग मात्र निर्माण व्हायला लागला. पण त्या प्रसंगाने राजमान्य राजश्री दीपक अण्णू वाठारे ही आठ वर्षांची निरागस व्यक्ती आमुलाग्र बदलली.

कपडे धुताना पॆंट उलटी करून घासायची अशी शिकवण त्याला काकूंनी पाचव्याच दिवशी दिली होती. तो आपला बिचारा कपडे धुवायचा. कालपासून घरात काहीतरी कटकट चालली होती. तीनशे रुपये, तीनशे रुपये असं काहीतरी तुकाराम काका म्हणत होते. त्या तीन नोटा कपडे धुताना त्यांच्या पॆंटमधे दिपूला मिळाल्या. दुपारचे चार वाजले होते. विशाल शाळेतून पाचला येणार होता. पण तुकारामकाका घरी होते. काकूही होत्या. हे रत्न कपडे धुवत होतं! त्याला काय वाटलं काय माहीत? त्याने त्या नोटा विशालच्या हाफ़पॆंटच्या खिशात घातल्या अन अर्धवट धुतलेली पॆंट अत्यंत बावळट चेहरा करून आत नेऊन काकूंका दाखवली. काका चहा पीत होते.

झालं! विशाल आल्याआल्या वाईट पिटला गेला. त्याचे बोलणे ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत काका नव्हते. दिपू घाबरल्यासारखा रडत होता. दहा पंधरा मिनिटे पिटला गेल्यावर विशाल मुक्त झाला. काकूंनी मग काकांना खूप समजावून सांगीतलं! मग दिपूचा जबाब पुन्हा दोनवेळा घेतला गेला. दोन्ही वेळा त्याने खाकी हाफ़पॆंटमधे नोटा मिळाल्याचे सांगताना जो काही रडवेला चेहरा केला होता त्यावरून विशालचाही विश्वास बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की त्या नोटा आपण ढापल्या होत्या. त्या दिवशी विशाल खेळायला गेलाच नाही. मात्र हे दिव्य रत्न खेळायला गेलं! खोदून खोदून विचारल्यावर त्याने रडत रडत सांगीतलं की दादाला खूप मारलंय! त्याने बहुतेक पैसे घेतले होते.

दोन दिवसांत आजूबाजूच्या बारा घरांमधे कळलं! बायका आपापसात चर्चा करू लागल्या. अहो परवापासून म्हणतीय माझ्या पर्समधले पन्नास गेले, काही समजत नाही. मग दुसरी - आला होता का?? तो?? पुन्हा पहिली - तो सारखाच येतो ना???

आजूबाजूला कळलंय समजल्यावर दिपूला बडवायला तुकाराम धावला. तर हे चौकीवर पळालं! तिथे जाऊन भोकाड पसरला. पोलीस हे आपले संरक्षक आहेत असे त्याला नुकतेच समजले होते.

आता दिपूचा राग राग सुरू झाला. खायला कमी मिळेनासं झालं! पण त्याचा स्वत:वरचा विश्वास दसपटीने वाढला होता. शेजारच्या यंदेकाकूंनी विशालच्या आईला ’विशालला पाठवा, समोसे पाठवते त्याच्याबरोबर’ असा जाहीर निरोप दिल्यावर याने ’ते कर्तव्य मी स्वत: बजावेन की’ असा चेहरा करून त्यांच्याकडे धाव घेतली. येताना चारपैकी दोन समोसे एका घाणेरड्या गल्लीपाशी उभे राहून अक्षरश: गटागटा गिळले अन तोंड खसाखसा पुसून उदासवाणा चेहरा करून घरी आला. ’दोनच समोसे आहेत म्हंटल्यावर मला काय मिळणार आता’ असा काहीतरी भाव त्याच्या तोंडावर होता. काकूंनी यंदेकाकूंच्या कंजुषपणावर घरातल्या घरात अंतर्गत टीका केली. विशालने एक समोसा मटकावला. काका काकूंनी जवळपास अर्धा अर्धा खाऊन अगदीच लहान पारीचा तुकडा दिपूला दिला. त्यालाही तो निरागसपणे नको म्हणाला. पण तेवढा मात्र त्याने खाल्ला!

हाच प्रकार उलटाही एकदा घडला. इकडून तिकडे गेलेला पदार्थ वाटेत अर्धा संपला होता. गल्लीत आता जरासा असंतोष पसरायला सुरुवात झाली होती.

असाच एक दिवस तो आपला बसला होता घराच्या बाहेर! कामे वगैरे आटोपली होती. दुपारचे तीन वाजले होते. एक माणूस कुणाचातरी पत्ता विचारत निघून गेला. जाताना त्याने सिगारेटचे थोटूक फ़ेकले खाली. बाळ उठले. हा काय चमत्कार अशा नजरेने त्याने ते थोटुक पाहिले. मग विझवले. खिशात टाकले. आज तुकाराम काका आठच्या पुढे येणार होते. पाच वाजता विशाल आला व लगेच खेळायला गेला. दिपूला जरा वेळ झाला खेळायला जायला. मोठं काम करून तो खेळायला गेला. ते थोटुक त्याने विशालच्या दप्तरात टाकले. आता फ़क्त विशालचे दप्तर काकांसमोर उपडे होणे आवश्यक होते. मग काय करायचं? काही नाही. निवांत खेळत बसला. हल्ली त्याला फ़िल्डर समजायला लागले होते.

पावणेआठ वाजता अंधार पडल्यावर दोघे घरी आले. विशाल काहीतरी खात होता. हा अचानक आतल्या खोलीत काठी भिंतीवर आपटत जोरजोरात आवाज करू लागला. काकूंनी तत्क्षणी आत जाऊन पाहिलं! त्यांची चाहुल कधी लागतीय याच्याकडे त्याच लक्ष होतं! त्यांच्या पायांचा प्रकाश पडताक्षणी त्याने तीच काठी विशालच्या दप्तरावर आपटायला सुरुवात केली. चेहरा भीती बसल्यासारखा केलेला होता. डोळे वटारलेले होते. काकूंनी घाबरून विचारलं काय झालं तर म्हणे पाल आहे अन ती दप्तरात गेलीय!

झालं! काकू पालीला भयंकर घाबरायच्या. विशालचीही हिम्मत होईना! त्यात हा वर्णन करत होता. ही एवढीय, काळी आहे, वाट्टेल तशी धावतीय! काकू तर अंगणात जाऊनच उभ्या राहिल्या. विशाल बाहेरच्या खोलीतून आत बघत बिचकून थांबला. हा शूर मुलगा मात्र दप्तरावर काठी आपटत होता. विशाल अंगणात गेल्यावर याने बाहेर येऊन एक धिरडं पटकन तोंडात कोंबलं! तुकारामकाका आल्यावर त्यांनी दप्तर उपडं केलं! पाल कुठे गेली ते कुणाला समजलंच नाही. विशाल पुन्हा पिटला गेला. मात्र रात्री झोपतानाही काकू बिचकलेल्याच होत्या असे संभाषणावरून बाहेर ओसरीवर आनंदात पडलेल्या दिपूला समजत होतं! पोटही भरत होत अन इमेजही चांगली होत होती. दिपू आनंदात होता.

कामात मात्र तो कमी पडायचा नाही. त्यातच विशाल जे जे पाठ करायचा ते ते त्याने मनातल्या मनात पाठ करायचा सपाटा लावला. समजत आहे की नाही ते नंतर बघू अशी त्याची त्या वयातली पॊलिसी होती. तोंडपाठ तर होतंय! मुख्य म्हणजे वाचता काहीच येत नव्हतं! हळूहळू मदतनीस म्हणून तुकारामकाकांबरोबरही अधेमधे जायला लागला. आईची आठवण फ़क्त पुसट झाली होती. मिटली नव्हती.

एक दिवस तो प्रकार झाला. गल्लीतल्या एका मुलाबरोबर गल्लीतच दुपारचे उगीचच चालता चालता तो इतिहासातले काही भाग तोंडाने म्हणाला. त्या मुलाला भारीच नवल वाटले. त्याने स्वत:च्या घरी जाऊन सांगीतले. इतका कुशाग्र बुद्धीचा गरीब बालक असा एका घरात उगीचच सडतोय हे बघून त्या घरच्यांना अचानक उमाळा आला. त्यांनी तुकारामकाकांना याला मास्तर ठेवा स्वस्तातला असे सांगीतले. ती सूचना धुडकावली गेली. मग त्या मुलाची आईच त्याला घरच्याघरी लिहायला शिकवू लागली. या गोष्टीला मात्र घरातून मान्यता मिळाली. कामे झाल्यावर याने फ़ुकटात शिकायला आमची काही हरकत नाही अशी अत्यंत दयाळू प्रवृत्ती दाखवली तुकारामने!

आता उलटेच झाले. दोनच महिन्यात त्याने अक्षरे इतकी गिरवली की नंतर विशाल स्वत:ची पुस्तके वाचत नसेल इतक्यावेळा याने त्याची पुस्तके वाचून काढली. काकू दुपारच्या झोपल्या की हा तास दिड तासात बरेच वाचन करून घ्यायचा. आता त्याला रस्त्यावरच्या पाट्या, जाहिराती वाचणे याचा नाद लागला. बसस्थानक जवळच असल्याने बसवर लिहिलेल्या गावांच्या पाट्याही तो वाचायला लागला. दुकानांची नावे, वार्ताफ़लकावरील सुविचार, म्हणी इथपर्यंत त्याची मजल पोचली.

दिपूमधे होत असलेला बदल कुणालाच फ़ारसा समजत नव्हता. मात्र तुकारामकाकांचे काम त्याला आता समजायला लागले होते. शक्ती कमी पडत होती म्हणून, नाहीतर ते त्यानेही केले असते अशी परिस्थिती आली होती. दिपूने आता विशालला सतावायचे सोडून दिले होते. याच घरात राहून आपण इतकं सगळं शिकतोय याची त्याने आठवण ठेवली होती.

खायला मात्र सहसा सकाळचं किंवा शिळं असंच मिळायचं! तक्रार नव्हती! उलट गुटगुटीत होऊ लागला.

सहा महिने होत आले तेव्हा मराठी भाषेत काहीही लिहिले असले तरी वाचू शकणे, इलेक्ट्रिकची कामे काही प्रमाणात समजणे, अनेक बसेसचे टायमिंग अन रूट समजणे व मराठी, इतिहास, भुगोल हे विशालच्या यत्तेला असलेले विषय किंचित लक्षात येणे इतपत त्याची प्रगती झाली होती. व्याकरण मात्र ओ का ठो कळत नव्हतं! तोच प्रकार गणित अन इंग्लिशचा! हिंदी मात्र थोडफ़ार आजूबाजूला बोललं जात असल्याने त्याला बोलता येत होतं! जुजबी!

विशालला सुट्टी लागली. आता सगळ्यांनी संगमनेरला त्यांच्या भावाकडे जायचं ठरवलं होतं! याला कुठे न्यायचा तिथे? सरळ विचार होता. एक तर याचा नाही म्हंटले तरी खर्च भावाला पडणार! तिकीट! अन लटांबर नेत बसायचं ते वेगळंच! रद्द झालं! आता शोध सुरू झाला. याला कोण सांभाळेल वीस दिवस? कांबळेंनी उदार होत तयारी दाखवली. कांबळेंकडे ते, बायको अन दोन मुली होत्या. त्या कॊलेजला होत्या. हा घरचे कामही करणार होता अन खायलाही मिळणार होते. समोरच सुभाष पंक्चरवाल्या काळेचे दुकान होते तिथे रात्री झोपणार होता.

त्या वीस दिवसात दिपू पंक्चर काढायला मदत कशी करायची हे शिकला. ट्रकपासून ते कारपर्यंत कोणतेही! हातांना घट्टे पडायचे. पण रात्री झोपायला जागा हवी असेल तर काळेने त्याला काम करावे लागेल असे सांगीतले होते. दिपूच्या अंगात तेवढा जोरच नाही आहे म्हंटल्यावर काळेही जास्त काम करून घेऊ शकत नव्हता. पण प्रत्यक्ष पंक्चर कसे काढले जाते याची मात्र दिपूला माहिती झाली. त्याच वीस दिवसात त्याला कांबळेंच्या एका मुलीने चहा कसा करतात ते शिकवले. आपण चहा करू शकतो याचा त्याला केवढा अभिमान वाटत होता. तुकारामकाका आले की आपल्या हातच चहा त्यांना देऊन त्यांना अन काकूंना खुष करायचे त्याने मनात ठरवले.

माणूस सुरुवातीला बदलाला, बदलत्या परिस्थितीला विरोध करतो. पण नंतर जुळवून घेतो. नंतर रमतोही!

महुरवाडी या आपल्या गावाच्या नावाशिवाय दिपूला काहीही माहीत नव्हते. कोणत्याही बसच्या रूटवर ते नाव नसायचे. आपण कुठे आलो आहोत हेच त्याला समजत नव्हते. कांबळेंच्या मुलींनाही सुट्टी लागलेली असल्याने त्यांनी दिपूला पत्ते, कॆरम हे खेळ शिकवले. आता त्याला तो नादच लागला. कधी एकदा काम संपतय अन या ताया आपल्याला खेळायला घेतायत असे त्याला होऊन जायचे. परत विशाल गावाला गेलेला असल्याने संध्याकाळी क्रिकेट खेळणारी मुले त्याला क्रिकेटमधे घ्यायची. आता फ़लंदाज अन गोलंदाज असे त्याचे प्रमोशन झाले होते आणि पंक्चरला मदत केल्यामुळे मनगटांमधे आलेली ताकद प्रमोशन सत्कारणी लागले आहे हे सिद्ध करत होती.

दिपूने केलेली प्रगती कुणीच पाहात नव्हते. लहानग्यांना कौतुकाचे शब्दच नसतील तर? कोमेजणार नाहीत? दिपू तरी नाही कोमेजला. कारण फ़क्त एकच, त्याला माहीत होते व नीट समजलेले होते. जितक्या अनेक प्रकारे आपला समाजाला उपयोग होऊ शकतो तितक्याच प्रकारे आपली गरज वाढणार आहे आणि... त्यातच आपली सर्व्हायव्हल आहे... अन्यथा... आपण नसलो तरी फ़रक पडणार नाही.

विशाल गावाहून आला तसा दिपू पुन्हा घरी आला. पहिल्यांदाच त्याने धाडसाने एक प्रश्न विचारला. ’काका चहा घेणार’??

तुकारामकाकाने अचंब्याने त्याच्याकडे पाहिले. दिपूने धावत जाऊन कांबळेंकडून दूध आणले अन दोन कप चहा केला. त्या चहाची चव नेमकी काकू करायच्या तशी किंवा काकांना हवा असायचा तशी नसली तरी.. नक्कीच चांगली होती. नऊ वर्षाचा मुलगा? चहा करतो???

मात्र दिपूने एक केले. घरचे सगळे आले तरी झोपायला काळेच्या पंक्चरच्या दुकानावरच जायला लागला. तेथे डास नसायचे. आणि मुख्य म्हणजे... आईची आठवण येऊन रडला तरी कुणाला कळणे शक्य नव्हते. काळेने मोठ्या मनाने ते मान्य केले होते. त्या बदल्यात तो सकाळी काळे यायच्या आत सफ़ाई करून ठेवायचा.

मात्र या काळात एक झालं होतं! कांबळें कुटुंबियांना दिपूची उपयुक्तता अचानक जाणवली होती. आता तेही त्याला काहीतरी खायला वगैरे देऊन त्याला वेळ असेल तेव्हा घरातील काही कामे करून घ्यायचे. काकूंना या गोष्टीची अडचण फ़ारशी जाणवली नव्हती.

विशालचा रिझल्ट लागला. गुण ठीक होते. पुढच्या यत्तेत गेला होता. एक वर्षानंतर तो दहावीला जाणार होता.

अधे मधे विशालचे जुने कपडे दिपूला मिळायचे.

दिपूला आता मागे केलेल्या खोड्यांचे वाईट वाटू लागले. त्याने एक दिवस संध्याकाळी घरात सगळ्यांसमोर कबूल केले. नोटा काकांच्याच पॆंटमधे होत्या अन दप्तरात थोटुक त्यानेच टाकले होते. विशाल ताठ मानेने वडिलांकडे बघत होता. काकू जळजळीत नजरेने दिपूकडे! अन काका! त्यांनी विशालला मारले नसेल इतके त्या दिवशी दीपूला मारले. पण तो चौकीवर पळून गेला नाही. हे संस्कार कुठून आले? रक्तातून? जन्मातून? सभोवतीच्या परिस्थितीतून? तो मार खात असताना विशालनेही त्याला काही फ़टके लगावले. काका विशालला काहीही बोलले नाहीत.

तुकारामने मात्र चौकीत जाऊन सगळं सांगीतलं! ते पुढारीही आले. आणखीन एक दोन जण आले. तुकारामने या मुलाला सांभाळणे शक्य नसल्याचे सांगीतले. त्याला सगळे सांगत होते. बघ, तो स्वत:च कबूल झाला. तुला तर कधी कळलेच नसते. अरे खरा वागणारा मुलगा आहे तो. पण घरात आगी लावणारं मूल तुकारामाला अजिबात नको होतं!

संपूर्ण गल्लीच्यादेखत दिपूचं किरकोळ सामान, जेही तुकारामनेच दिलेलं होतं, कांबळेंच्या घरी हाललं! सत्य बोलण्याची शिक्षा होती ती!

दुसरा दिवस उजाडला. आजपासून सगळ्यांमधे खेळणं बंदच होणार होतं! आता फ़क्त कांबळेंच्या घरी राबायचं! मात्र कांबळे कुटुंबीय मनाने खूप चांगले होते. त्यांनी उलट दिपूला मानसिक आधारच दिला. मोठी मुलगी स्वाती अन धाकटी मनीषा! दोघीही त्याला खेळायला घ्यायच्या. स्वयंपाकातले प्रकार तो हळूहळू शिकू लागला. कांबळेंच घर रोज झाडणं, पुसणं, भांडी घासणं अन किराणा वगैरे आणायचा असल्यास आणणं अशी कामं तो करायचा.

स्वातीने त्याचे पाठांतर बघून त्याला इंग्लिश लिपी शिकवली. ती शिकायला मात्र त्याला खूपच वेळ लागला. तब्बल चार महिने तो अक्षरं गिरवत होता. या सहा महिन्यात पोळी, भाजी, भात व आमटी इतके तरी प्रकार त्याला यायला लागले. दोन्ही तायांच्या अभ्यासाची जाडच्याजाड पुस्तके अन तीही इंग्लिशमधली बघून मात्र त्याने ध्यासच घेतला. एकदा लिपी शिकल्यावर तुफ़ान वेगात त्याने पाठांतर सुरू केले. शब्द लिहिणे, वाक्य जुळवणे, व्याकरण, सर्व गोष्टी जुजबी यायला लागल्या.

त्यातच मनीषा लुनावरून पडली. तिच्या पायाला फ़्रॆक्चर झाले. तीन दिवस ती दवाखान्यात होती. दिपूला काम काहीच पडायचे नाही. पण तो सतत तिच्याजवळ बसून राहायचा. तो असल्यामुळे औषधे व इतर तातडीच्या बाबी झाल्यानंतर काकूंना जरा अवधी मिळायचा. या तीन दिवसात व मनीषा घरी बरी होत असतानाच्या एका महिन्यात दिपूने विलक्षण आपुलकीने घरात वास्तव्य केले. मनीषा बरी झाली होती. खरे तर प्लॆस्टर, ट्रीटमेंट व आराम यामुळे ती बरी झाली होती. त्यातच आई, वडील व ताई या तिघांनी तिचं सगळं केल्यामुळे ती बरी झाली होती. पण काही का असेना, दिपू नुसता होता तरी सतत! दिपूचे फ़ारच नाव झाले घरात! आता तो हळूहळू एक भाग बनू लागला कांबळे कुटुंबियांचा!

विशालकडून निघाल्यामुळे अनेक मित्र तुटले होते. पण गेल्या पाच महिन्यात काही ना काही कारणाने संबंध आल्यामुळे त्यातले बरेच जण पुन्हा बोलू लागले होते. विशाल मात्र अजून बोलत नव्हता. एक दिवस सुनील, बाळू आणि लोकेश या गल्लीतल्या मुलांबरोबर तो सहज बसलेला असताना त्यांच्यात संवाद झाला. ते सगळे पंधरा, सोळा वर्षांचे होते. हा एकटाच नऊ, दहा वर्षांचा!

लोकेश - दिप्या क्या क्या काम करता है देख... और वो बल्लू सौ रुपये के लिये छोडदिया चायवालेको
दिपू - मतलब?
सुनील - अरे इसको क्युं बतारहा है.. ? ये बच्चा है!
दिपू - क्या हुवा?
लोकेश - कुछ नही...
दिपू - बोलो ना??
बाळू - अरे तेरेको घुमारहेले है...
लोकेश - क्या घुमारहेला है मै? इसिको पुछ.. होय दिप्या, काय काय करतो सांग बरं घरात काम तू..??
दिपू - काम? यही... झाडू पोछा..
सुनील - बर्तन..
दिपू - हा...
बाळू - कुछ नही रे... तू घर जा...
सुनील - बाळू ... तू गप!
लोकेश - तेरेको पता है इस काम का हमारी कामवाली कितना लेती है??
दिपू - कामवाली?

अर्ध्या तासात भरपूर पढवलेला दिपू स्वातीताईच्या आईंसमोर उभा राहिला.

दिपू - काकू... वो ... लडके कह रहे थे ना..
काकू - क्या?
दिपू - वो पगार की बात... कर रहे थे..

स्वाती अन मनीषा दारात येऊन उभ्या राहिल्या. कांबळे काका बाहेरच्या खोलीतूनच बघत होते. काकूंना खूप दु:ख झाले होते. त्या कनवाळूपणे दिपूकडे पाहात म्हणाल्या...

काकू - हां रे! मी विसरलेच ना??? पगार द्यायचाच राहिला... अहो... आहेत का अठराशे रुपये? तीनशे महिना प्रमाणे..???

दिपूला काहीही समजत नव्हते. आपण इतके दिवस मागीतले नाहीत म्हणून पैसे न देणारे हे लोक वाईट की आपल्याला पढवणारे आपले मित्र??

काकांनी बाराशे आणून दिले. सहाशे उद्या आणतो म्हणाले. काकूंनी ते दिपूच्या हातावर ठेवले. दिपू निरागसपणे स्वच्छ स्वच्छ हसला. पहिली कमाई होती ती! त्याने स्वातीताई अन मनीषाताईकडे पाहिले दोघीही त्याच्या हसण्याकडे बघून उतरलेल्या तोंडाने पण प्रेमाने हसल्या.

दिपूने पैसे हाफ़पॆंटच्या खिशात ठेवले. आज आपले मित्र नसते तर आपण इथे मूर्खासारखे राबत बसलो असतो.

आता हे बाराशे रुपये? हे जपायचे कसे? आणि... एवढ्या पैशांचे करतात काय?? ते तरी कुठे माहितीय आपल्याला???

विचारात असतानाच तो पाने घेऊ लागला. काकूंनी त्याला आजच्या दिवस पाने घेऊ नकोस म्हणून सांगीतले. कारण आजचा त्याचा पहिला पगाराचा दिवस होता. त्यांनी त्याच्यासाठी खीर केली.

रात्रीची आवराआवरही त्याला करू दिली नाही. साडे नऊ वाजता मनीषाताई इंग्लिश शिकवायची. आज ती तिला बरे नाही आहे असे म्हणाली. मग
दिपू झोपायला पंक्चरच्या दुकानात गेला. रात्री त्याला झोपच येत नव्हती. सहज त्याने फ़टीतून बाहेर पाहिले तर कांबळे काका कुठेतरी घाईघाईत बाहेर जात होते. काहीतरी प्रॊब्लेम झाला की काय? आत्ता काका कसे काय बाहेर गेले? त्याने लक्ष ठेवले. दहा मिनिटे झाली तरी काका येईनात. मग स्वयंपाकघरातला दिवा लागलेला त्याने पाहिला. काय वाटले कुणास ठाऊक! तो पटकन बाहेर आला अन स्वयंपाकघराच्या खिडकीखाली जाऊन उभा राहिला. स्वातीताई काकूंशी बोलत होती.

स्वाती - पगाराचा प्रश्न होता का पण? आमच्या भावासारखा घरात राहात नव्हता का तो?
काकू - अगं मित्र सांगतात काहीतरी.. मग आपल्यालाही वाईट वाटतं की नाही??
स्वाती - त्याला एक दोन दिवसांनी देऊन टाकायचे मग... एवढे मनीषाचे एक्स रे झाल्यावर ... तो काही म्हणाला नसता...
काकू - तसं नाही गं! आपण असं उगाच राबवणं चांगलं आहे का एवढ्याश्या मुलाला?
स्वाती - आई? तू राबवतेस त्याला? तुझं तर मुलासारख प्रेम आहे.. आम्ही पण दोघी इतक्या प्रेमाने त्याला सगळं शिकवतो.
काकू - मग काय तर? एका मुलाला बरं वाटावं म्हणून माझ्या मुलीची तपासणी थांबली तर त्यात काय??
स्वाती - काहीच हरकत नाही आई.. पण... दिपूला नीट सांगीतलं असतंस तर त्याला समजलं असतं..
काकू - अंहं! त्या एवढ्याश्या मुलाला जेव्हा स्वत:च्या मनातून प्रेम वाटेल ना आपल्याबद्दल... तेव्हा तो आपोआप समजेल सगळं!
स्वाती - पण इतक्या उशीरा बाबांना काकांकडे जाऊन पैसे मागायला......
काकू - अगं उद्या सकाळी सहा वाजता न्यायचंय मनीषाला... म्हणून...

पायातला जोरच गेला होता. दिपू अक्षरश: मटकन बसला जमीनीवर! त्याचा एक हात खिशावर होता. दुसरा हात त्याने तोंडावर ठेवून जोरजोरात हुंदके द्यायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका झाला की आतमधे या दोघींनाही ऐकू गेला. बाहेर येऊन त्या पाहतायत तर दिपू रडतोय.

काकूंनी त्याला पटकन जवळ घेतला.

काकू - काय झालं दिपू? का रडतोयस? कुणी मारलं वगैरे का?? सांग ना? रडू नकोस... चल आत चल

दिपूने खिशातून शंभराच्या सगळ्या बारा नोटा काढून काकूंच्या हातात कोंबल्या व तो अजूनच जोराने रडू लागला.

चांदवडला बसमधे बसल्यानंतर एका आजोबांच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना त्याला जसे वाटले होते ...

अगदी तसेच आज रडत रडत आवेगात काकूंच्या कुशीत शिरताना त्याला वाटले.

चुकलो मी... काकू... चुकलो.. असे म्हणून तो आणखीनच त्यांना बिलगत होता. शेवटी स्वाती व मनीषाने खूप वेळ त्याला प्रेमाने समजून सांगीतल्यावर हुंदके देत देत तो बाजूला झाला. पहिल्यांदाच त्याने पाहिले... काकू अन दोन्ही ताया रडत होत्या....

एक घर... मायेचं... तुटता तुटता वाचलं होतं...

कांबळे काका आले. त्यांना सगळा प्रकार मनीषाने सांगीतला. दिपूला भीती वाटत होती. ते हसले. त्यांनी त्याला जवळ घेतले व म्हणाले...

आत चल.. आजपासून समोर झोपायचं नाही...

त्या रात्री... कित्ती कित्ती तरी वेळ ... काकूंच्याजवळ झोपलेल्या दिपूला... बरेच दिवसांनी सारखी त्याची आई आठवत होती.

दिवाळी आली. जिकडे तिकडे नुसती जमेल तशी रोषणाई! फ़टाके! नवे कपडे! गोडधोड! आता विशालही बोलायला लागला होता. आता संध्याकाळी दररोज दोन तास खेळल्यामुळे दिपूचे शरीर चांगले तंदुरुस्त व्हायला लागले होते. आता तो पूर्ण दहा वर्ष तीन महिन्यांचा झाला होता.

घरोघरी लोक आपल्या घरचे फ़राळाचे नेऊ देत होते. तिकडचे घेऊन येत होते. एकमेकांच्या फ़राळाच्या चवीचे कौतुक चाललेले होते.

दिपूला एक नवीन शर्ट पॆंट काकूंनीच घेतली होती. आणखीन एक जोडी त्याला पुढारी येऊन देऊन गेले होते. तो आभाळातच होता. त्यातच त्याला चाळीस रुपयांचे हवे ते फ़टाके घे असे स्वातंत्र्य काकांनी दिले. आणलेले फ़टाके नुसते पाहण्यातच त्याचा वेळ जात होता.

त्याला आठवलं! मुहरवाडीची दिवाळी अशी नसायची. आणि... गेल्या वर्षीची आपली इथली... वडाळी भुईची दिवाळीही अशी नव्हती! या दिवाळीला म्हणजे आपण राजाच! फ़टाके काय, कपडे काय, चकल्या काय, करंज्या काय? त्यातच स्वातीताईला एका स्थळाने पसंती कळवल्याची बातमी आली. घरात नुसता उत्साह भरून वाहू लागला. मनीषाताई तिची थट्टा करू लागली. बुद्धीला जितके समजेल तितकी थट्टा मग दिपूही करू लागला. त्याने थट्टा केली की स्वातीताई त्याला मारायला धावायची. मग तो पळून जायचा.

मस्त धमाल चालली होती. दिपू बाहेर आला. रस्त्यावर मोठी मुले बाण लावत होती. तो मजा बघत बसला. चमनचिडी हा एक फ़टाक्याचा विचित्र प्रकार आहे हे त्याला समजलं! मोठ्या माळा कशा काय लोकांना परवडतात त्याला समजत नव्हतं! तो बाण लावत असलेल्या मोठ्या मुलांच्या अगदी जवळ उभा होता. त्यातला एक आला आणि बाण लावत असलेल्याला काहीतरी बोलला. वाक्य दिपूला ऐकू आलं! पण अर्थ कळला नाही. ’वो देख पटाखा जा रहा है, पटाखेपे पटाखा छोड’! यातला पहिला पटाखा मनीषाताईला म्हंटलं जातंय हे त्याला समजलं! पण तिच्या अंगावर कसा बाण सोडतील? नुसती थट्टा करत असतील! पण नाही. त्या मुलाने खरच बाणाची बाटली तिच्या दिशेला तोंड करून धरली. दुसरा एक जवळ आला. त्याने काही समजायच्या आतच बाणाची वात पेटवली. दिपूने मनीषाताईच्या नावाने जोरात हाक मारली तेव्हा ती पटकन दिपूकडे वळली अन सेकंदातच तिच्या लक्षात आले की काहीतरी विपरीत होत आहे. जोरात ती बाजूला सरकली. सरकली नसती तरी चाललं असतं! बाण नेमक्या दिशेने गेलाच नव्हता. पण मनीषाताई प्रचंड घाबरून घराकडे धावली. मुले जोरात हसू लागली. आणि दिपू मात्र पराकोटीचा संतापला. त्याने जवळ पडलेली एक बाटली उचलून जीव खाऊन त्या बाण लावत असलेल्या मुलाच्या डोक्यात घातली. बाटली हातातून सुटून त्या मुलाला नुसतीच चाटून गेलेली त्याला माहीतच नव्हते. त्याला वाटले ती जोरात त्याच्या डोक्यात आपटून फ़ुटली. कारण बाटली फ़ुटल्याचा आवाज आला होता. पण हे सगळं पाहायला तो थांबलाच नव्हता. आपल्या हातून तो कदाचित मेलेलाही असेल अशा वेड्या कल्पनेने दिपू तुफ़ान वेगात स्टॆंडवर धावला. समोर धुलिया-नाशिक बस निघाली होती. कसलाही विचार न करता तो बसमधे तीरासारखा घुसला. बस निघाली तेव्हा कंडक्टरने विचारले पैसे आहेत का? त्याने हो म्हणून सांगीतले. मात्र पंधराच मिनिटात समजले की त्याच्याकडे फ़ारच कमी पैसे आहेत. पाऊण तासाने जेव्हा पिंपळगाव (बसवंत) आणि शिरवाडच्या मधील एका ढाब्यावर बस जेवायला थांबली तेव्हा त्याला उतरवण्यात आले व इथे कुणी ओळखीचे भेटले की पुढचा प्रवास कर असे सांगण्यात आले.

दिपू उतरला. तो भयानक घाबरलेला होता. त्याची अशी कल्पना होती मागून लगेचच आलेली जी दुसरी बस होती त्यात पोलीस असण्याची शक्यता होती. एका हौदामागे तो लपून बसला. दोन्ही बस जेवून जायला जवळपास पन्नास मिनिटे लागली. पण दिपू जागचा हालला नाही. बसेस गेल्यावर मात्र ढाबा एकदमच सुनसान झाला. दोन, तीन कारमधून आलेले कस्टमर्स सोडले तर आता स्टाफ़शिवाय कुणीच नव्हते.

हळुच दिपू गल्ल्यावरील मालकासमोर जाऊन अपराधी मुद्रेने उभा राहिला.

मालक - कौन बे तू?

दिपूने मान खाली घातली होती.

मालक - बससे उतरा क्या? छुटगयी बस?

दिपुने नकारार्थी मान हलवली.

मालक - अरे कहॊंसे आया तू???

आता एक दोन पोरे तिथे जमा झाली.

मालक - कौनसे गाव का है?
दिपू - मुहरवाडी
मालक - ये कहापे आया रे पद्या?
पद्या - क्या?
मालक - मुहरवाडी सुना है?

पद्याने नकारार्थी मान हलवली. त्याला त्या मुलात काहीही इंटरेस्ट नव्हता.

मालक - अबे बोलता क्युं नही?

दिपू गप्पच होता.

मालक - भागके आया क्या? चोरी की है???

दिपूने खाडकन वर मान करून जोरजोरात नकारार्थी मान हलवली.

मालक - भूख लगी है क्या??
दिपू - ... हां!

मालकाने विचार केला. पोरगं लहान आहे. कामावर तर ठेवता येणार नाही कायद्याप्रमाणे! पण भटारखान्यात किरकोळ कामाला टःएवलं तर उपयोगीही पडेल अन जरा ताणही कमी होईल.

मालक - काम करेगा यहॊं?

दिपूने पुन्हा जोरात मान हलवली.. पण यावेळेस... होकारार्थी...

मालक - जा ... पहले खाना खाले

दिपूला भटारखान्यात नेण्यात आलं! तिथल्या वासानेच त्याला गुदमरलं! रस्से, चिकन, दाल, बटाटे, मटार! सगळ्याचा एक नवीनचह वास तेथे भरून होता. कुणीतरी त्याला थाळीत काहीतरी रोटी अन सब्जी दिली.

दिपूने विचार केला. नंतर हाकलून दिलं तर माहीत नाही.. आत्ता तर खाऊन घ्यावं!

बकाबका तो खात होता. पण आणखीन मागीतलं नाही. नंतर पाणी पिऊन परत मालकासमोर उभा राहिला.

मालकाने आवाज दिला:

मालक - पद्या, ये लडका कलसे अंदर काम करेंगा.. अभी इसको ऒर्डर लेना सिखा...अभी कोई गाडी नही आनेवाली मालेगाव छोडके...

दीपक अण्णा वाठारे! आयुष्याला पूर्णपणे भिन्न वळण लागेल अशा उंबरठ्यावर उभा होता. आणि तो व्यवसाय त्याला तूर्त तरी मान्य होता. पद्या त्याला एका टेबलापाशी घेऊन गेला. कस्टमर काहीतरी बोलला. पद्याने दिपूला सांगीतले.

पद्या - सुना? ये वहॊं जाके बोल
दिपू - कहॊं??
पद्या - वो काउंटरपे... वो अंदर आदमी खडा है ना काला? उसको...

दिपूला तो आतला काळा माणूस अक्राळविक्राळच वाटला होता. मगाशी जेवताना हा कसा दिसला नाही? दिसला असता तर कदाचित दिपू जेवलाही नसता.

त्याच्याकडे एकदाच बघत चाचरत चाचरत दिपू म्हणाला. त्याचं नवं आयुष्य या क्षणाला सुरू होत होतं!

दिपू - ऒर्डर है...
तो - क्या???
दिपू - हाफ़ राईस... दाल मारके....

गुलमोहर: 

बाप रे IPL T-20 पेक्षा सुद्धा फास्ट आहात - आधीची कादंबरी संपते न संपते तोच नवीन कादंबरी घेऊन तयार... एकदम bullet train...

तुफान वेग्..पण छान आहे...
विचार केला त्या पेक्षा वेगळी कथा आहे..
पुढील भाव लवकर येऊ दे...

खरच छान आहे कादंबरी...
<<दीपक अण्णू वाठारे’ उर्फ़ दिपू उर्फ़ दिप्या या आठ वर्षांच्या मुलाने जगाच्या शाळेत प्रवेश घेतला होता. फ़ी होती... स्वत:चे आयुष्य बरबाद करण्याची! डबा होता, एक लहानसे चिक्कीचे पाकीट अन एक वॊटरबॆग! दप्तर होतं आठ वर्षांचा अनुभव आणि आईने सोडलेले असणे व मन्नूकाकाने मारलेले असणे या आठवणी! आणि... या शाळेला मधली सुट्टी तर नसायचीच पण... सुट्टीच नसायची!>> मनाला भिडलच Sad

बेफिकीर मायबोलीचे सर्व रेकॉर्डस तोडल्याबद्दल अभिनंदन आणि आभार... नाहीतर वाचकांच्या डोळ्यांना झापडं, आधीचे भाग वाचून नाहीतर पुढच्या सस्पेंस्चा विचार करकरून मेंदूला झिणझिण्या आणि पुढच्या भागाची विनंती करून तोंडाला फेस आणल्याखेरीज कथा पूर्ण न करण्याचं वचन त्यांनी मॉडरेटरला दिलंय...

अपवाद काही एकपानी ललितलेख टाइप शॉर्ट आणि स्वीट कथालेखकांचा!

मताचा आदर करून हाफ राईस दाल मारके सुरू केलंत त्याबद्दल शतशः धन्यवाद! वाचते आता...

अ प्र ति म... ! अशक्य लिहीलेय.... जीवनाची पाठशाला....जितक्या अनेक प्रकारे आपला समाजाला उपयोग होऊ शकतो तितक्याच प्रकारे आपली गरज वाढणार आहे आणि... त्यातच आपली सर्व्हायव्हल आहे... अन्यथा... आपण नसलो तरी फ़रक पडणार नाही.>> वा वा मान गये उस्ताद...

प्रत्येक कादंबरीगणिक... प्रमोशन होतंय बरं तुमचं वाचकांच्या मनात... पण अपेक्षाही वाढताहेत... येउद्या सुपरफाश्ट!!!!

तो बाणाचा प्रसंग जराSS जास्त वाटला (म्हणजे खर्‍या आयुष्यात हे सगळं होण्याची शक्यता बघता..
अर्थात तुम्ही म्हणता तसं तुमचा अनुभव जास्त आहे.. त्यामुळे असूही शकतं)
अदरवाईज आवडली..

सर्वांचे मनापासून आभार!

नानबा,

आपण लिहिले आहेत त्याप्रमाणे स्पष्ट प्रतिसाद कृपया देत राहावेत, त्याने लिखाणातील संभाव्य चुका टळण्यास मदत होईल.

मात्र - हा प्रसंग (म्हणजे अगदी बाणाचा) जरी झाला नसला तरी दोन प्रसंग मी स्वतः पाहिलेले आहेत, जे खाली देत आहे, ज्यांच्यामुळे मला बाणाचा प्रसंग लिहायची कल्पना सुचली.

१. सोसायटीतील क्रिकेटमधे बॅट्समनने गोलंदाजाला विशिष्ट पद्धतीने लेदरचा बॉल टाकायला सांगणे जेणेकरून त्याला तो बॉल त्याच्या बॅटने पाठमोर्‍या चालत असलेल्या मुलीच्या अंगावर मारता येईल. त्यावेळेस नेम चुकला होता.

२. दुसर्‍या मजल्यावरून एक आपटबार एका रस्त्यावरून चालत असलेल्या मुलीवर टाकला जाणे ज्यात तो तिच्या पायापाशीच फुटणे.

सर्वांचे पुन्हा धन्यवाद!

-'बेफिकीर'!

कथेचा वेग चांगला आहे .
काही वाक्य खुप आवडली <<< घोंगडी भिजेपर्यंत दिपू रडत होता >>>
काही वाक्य पटली नाहीत ,
<<< जसं झोपड्पट्टीत राहणार्‍या सुनंदाच्या नवर्‍याने ( ज्याने पहिल्या बायकोला जाळुन मारले ) त्याने सुनंदाला मुलं न होऊ देणे
<<< मन्नु सारख्या अट्टलं दारुड्याने फुलं आणुन देणे
<<< दिपुचा वयाला न शोभनारा कावेबाजपणा ,
<<< २० दिवसांच्या अंतरात त्याच्यावयात ७ वर्ष ते ९ वर्ष फरक .

धन्यवाद श्री!

मैत्रीपूर्ण प्रतिसाद आवडला. स्पष्टीकरणाचा प्रयत्न करतो.

१. सुनंदाला मन्नूने फुले आणून दिली होती, तिच्या नवर्‍याने नाही.
२. चार महिने, दोन महिने असे उल्लेख दिपूचे वर्णन करताना केले आहेत. सहा महिन्यात मराठी वाचायला शिकला. चार महिन्यात इंग्लिश लिपी गिरवली वगैरे वगैरे! त्यातून कथा तितके दिवस पुढे नेत आहे. कदाचित नजरेतून सुटले असावे आपल्या. तरी पुन्हा विचार करतो.

दिपूचा त्य्या वयातील कावेबाजपणा - हा मुद्दा मात्र खरच तपासायला हवा मला. (ही गोष्ट वेगळी की इतका नसलो तरी मी त्या वयात बर्‍यापैकी खोडकर होतो.)

कृपया, असेच प्रतिसाद देत रहावेत अशी विनंती! मी आपल्या स्पष्ट प्रतिसादांची वाट पाहेन.

आभार!

-'बेफिकीर'!

खूप खिळवून ठेवणारी आणी उत्सुकता वाढवणारी कथा आहे. टायटल तर प्रचंड आवडलं.. कथेचा वेग आवडला.नाहीतर कादंबरी म्हटलं की मला जरा आळसच चढतो ..पण ही मात्र मी सुरुवातीपासून शेवटापर्यन्त पूर्ण वाचणारे Happy

कादबरि चा flow जबर्दस्त आहे. आतिशय वेगवान घेतलि आहे. तुम्हि खान्देश मधे फिर् लेले दिसतात. गावा मधे आस् लेला मालेगावि हिन्दि चा परिनाम छान टिप् ला आहे. Keep it up.

दिपुचा वयाला न शोभनारा कावेबाजपणा >>> श्री तुम्ही मुंबई लोकल्स ने कधी प्रवास केलाय??? त्यात फेरीवाले, भिकारी असे वय वर्ष पाच सहा ते अठरा पर्यंतचे मुलं मुली असतात... यातले बरेचसे मुलं मुली परिस्थितीचे शिकार असतात... त्यामुळे अजाण वयात अतिसमंजसपणा, स्वार्थीपणा... त्यांच्यात मुरलेला असतो, शिकत जातात... आजुबाजूच्या लोकांकडून... शिव्या देणे, स्वतःच्या मालाची जाहीरातबाजी करणे... कॉम्पीटिटर असेल तर (त्याच्याशी पंगा न घेता) त्याचीही जाहीरातबाजी करून त्याचा माल विकून देणे आणि नंतर सुमडीमध्ये "मुनाफा" वाटून घेणे... या गोष्टी शिकवण्याइतका वेळ त्यांच्या आईबाबांकडे असेल का??? की तीपण दिपू सारखीच सोडून दिलेली आणि याच्या त्याच्या जीवावर जगणारी मुले असतील...?? कोणास ठाउक!

एक उदाहरण सांगते, बहूदा मायबोलीवरच वाचलं आहे... मायबोलीवरच्या एका सखीने ट्रेनमधल्या सहा-सात वर्षांच्या भिकारी मुलीला पारले जी बिस्कीटाचा पुडा देउ केला... त्या मुलीला बहुदा पैसे अपेक्षित होते.. पण तिने तो घेतला, एक बिस्किट कुरतडत खायला सुरुवात केली.. तेवढ्यात स्टेशन आले... घोळक्याबरोबर मायबोलीकर सखी आणि ती भिकारी मुलगी उतरले... त्या मुलीने चक्कर आल्याचा अभिनय करत त्या सखीकडे बोट दाखवत म्हटले "उन्होने ये बिस्किट दिया... खाया तो सिर घुम रहा हे..." मदत करणारीला लोकांच्या संशयी नजरांचा सामना करावा लागला असणार...

ही झाली परिस्थितीची शिकार झालेली मुले.... चांगल्या घरातील, सुसंस्कारी मुलांनाही माहीत असतं "कोणाचा कुठे कसा फायदा करून घ्यायचा ते..." आईवडीलांच्या भांडणाचा व्यवस्थित फायदा घेणारी, अभ्यास करण्यासाठी लाच खाणारी मुले वयापेक्षा खुप कावेबाज असतात... (सर्वच नाही म्हणत आहे, पाहीलेली उदाहरणं आहेत) आणखी एक उदाहरण... माझी मामेबहीण खुप सोशल आहे आणि भावजी त्यामानाने रिझर्व आहेत... मामेबहीणीच्या दोन्ही मुली वयापेक्षा जास्त आगाउ फटकळ आहेत... एक दिवस मामेबहीण मोठीला (वय वर्षे १०) ओरडत होती.. क्लास सुटल्यानंतर त्या मुलांबरोबर काय ह्या ह्या फि फि खिदळत असतेस...??? तर धाकटी (वय वर्षे ७) फटकन बोलली ताईला कशाला ओरडतेस? तू नाही का त्या दिवशी लिपस्टिक लावून तुझ्या कॉलेजच्या मित्राला भेटायला गेलेलीस... बहीण आणि तिच्यापेक्षा जास्त मी आवाक्क! बाकी सगळ्या बाबतीत झिंजा ओढून भांडणं करणार्‍या बहीणींची ही मिलीभगत त्यांना कोणी शिकवली होती????

म्हणून तर याच वयात त्यांना चांगले वाईट शिकवणे जरूरी असते... पण ते शिकवायला वेळ नसतो, आईवडील दोघेही नोकर्‍या करणारे असतात...आजी आजोबा जवळ नसतात... संस्कारवर्ग गल्लाभरू असतात... मुले "जगण्याची स्पर्धा" लहानपणापासूनच शिकतात... ३ इडियट्स मध्ये दाखवलेल्या कोकिळेच्या पिल्लांप्रमाणे.... श्री, नानबा हल्लीची पिढी खुप हुषार झालेय, स्मार्ट झालेय... करियर ओरिएंटेड झालेय... डिप्लोमॅटिक झालेय, तुमच्या आमच्या समजापलिकडे... याला तुम्ही एकत्रितपणे कावेबाजपणा म्हणू शकता... Happy

कथा काही ठिकाणी व्यवस्थित पटतेय... छान चालू आहे...

<<<आणि पंधरा दिवसांनी दिपूला एक नवीन व अत्यंत महत्वाचा साक्षात्कार झाला. आपल्यात एक बुद्धी नावाची गोष्ट असते आणि ती जर नीट व चपखलपणे वापरली तर आपल्याला आपली आईच काय, जगात कुणाचीही गरज भासत नाही.>>> काय वाक्य आहे हे....एकदम मनाला भिडलं!

पुन्हा एकदा एक सुखद धक्का देणारी नवीन कादंबरी...ग्रेट आहात तुम्ही बेफिकिर...खरंच मागे कुणीतरी लिहिलंय ना, तसं नावाच्या (आयडी) अगदीच विरुद्ध आहात तुम्ही. ढाब्यावर गेल्यावर तिथल्या चमचमीत, तिखट जेवणाचा आस्वाद घेण्यापलिकडे आम्हा सामान्यांना दुसरं काही सुचत नाही...तुम्ही तर थेट तिथल्या मुलाच्या आयुष्यात इतक्या बारकाईने डोकावलंत...ह्यासाठी फार संवेदनक्षम मन लागतं!

असो, मीना नंतर फारच पटकन दिपूही वाचायला दिलात त्याबद्दल धन्यवाद! लहानपणी 'गोट्या' ही मालिका पाहायचे, त्याची एकदम आठवण झाली. 'बळी तोच जगू शके' ही नवीन म्हण आवडली-पटली.
गरिब बिचार्‍या अनाथ दिपूची लहान निरागस मुलापासून एका 'कावेबाज' पोराकडे होतांनाची वाटचाल वाचता वाचता मध्येच हसू येत होतं तर मध्येच डोळयातून पाणी येत होतं... पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

dreamgirl, तुम्हाला अनुमोदन...छान लिहिलंय तुम्ही. परिस्थिती माणसाला (अगदी त्याचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही इतके) बदलते...हे अगदी खरं आहे.

आपण जंगली प्राण्यांना क्रुर म्हणतो, पण मला वाटते मनुष्यप्राण्याइतका क्रुर कोणीच नसेल. दिपूला त्याची सावत्र आई घराबाहेर काढते तो प्रसंग वाचून डोळ्यात पाणी आले. अशी कशी वागू शकतात ही माणसे. जरी हे उदाहरण काल्पनिक असले तरी असे होत असणार यात शंका नाही.
जेमतेम आठ वर्षांचा मुलगा.. इतका निरागस..
बेफिकीर... आतडं तुटत होतं एक एक वाक्य वाचताना..

मास्तर........................... जिंकलात होssssss तुम्ही ..... खिळवून ठेवलंत एका जागी... मी ह्याचे प्रिंट्स काढून binding करायला दिले आहेत...

बेफिकीर... फुल जेवून आलो आणि हाफ राईस घेतली आत्ता वाचायला... Lol

मी चांदवड - धोडोप आणि वडाळी भुई वगैरे ह्या भागात फिरलेलो आहे. Happy

..जितक्या अनेक प्रकारे आपला समाजाला उपयोग होऊ शकतो तितक्याच प्रकारे आपली गरज वाढणार आहे आणि... त्यातच आपली सर्व्हायव्हल आहे... अन्यथा... आपण नसलो तरी फ़रक पडणार नाही exlnt line and also true

Pages