हाफ राईस दाल मारके - अंतीम भाग - भाग २३

Submitted by बेफ़िकीर on 1 June, 2010 - 01:17

'हाफ राईस दाल मारके' ही कादंबरी आज संपली. मायबोलीच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा मी ऋणी आहे. सर्व प्रेमळ वाचक व प्रतिसादक यांच्या प्रोत्साहनामुळेच मी ही कादंबरी लिहू शकलो. मला जे प्रश्न मांडावेसे वाटत होते ते किती प्रमाणात व कसे मांडले गेले याचा निर्णय आता तुमच्याकडे....

हाफ राईस दाल मारके ही डिश आवडावी अशी इच्छा!

============================================

गुन्हेगाराच्या मनस्थितीत, स्वभावात आमुलाग्र फरक पडावा यासाठी जो काळ जावा लागतो तो कायदेतज्ञांच्या व मानसशास्त्रज्ञांच्या मते बहुधा चवदा वर्षे असावा. त्यामुळेच म्हणे जन्मठेप चवदा वर्षे देतात असे ऐकून आहे.

गुन्हेगार! एक सापेक्ष विशेषण! काही काही गुन्हे तरी असे असतात की ज्याच्यात तो गुन्हा करणे हे गुन्हेगाराच्या मते समर्थनीयच असते. अगदी खुनासारखे काही प्रकार सुद्धा! अगदी दहशतवादही दहशतवाद्यांच्यामते समर्थनीयच असतो. त्यांची तत्वे प्रस्थापित शासन व बहुतांशी समाजाला किंवा एखाद्या भौगोलिक प्रदेशाला मान्य होत नसल्यामुळे हिंसेच्या मार्गाने ते ती तत्वे लादण्याचा प्रयत्न करतात.

कोणत्या कृत्याला गुन्हा म्हणावे याचे त्या त्या प्रदेशाचे कायदे आहेतच. जर्मनीत ऑफीसमधे आपल्याकडे चहाचे असते तसे बीअरचे मशीन असते म्हणे! भारतात तो गुन्हा ठरेल.. तिकडे नाही ठरणार!

दृष्टीकोनावर सर्व काही अवलंबून असते म्हणतात ते काही खोटे नाही. हाऊ यू लूक अ‍ॅट द थिन्ग्ज इज इंपॉर्टंट!

पण..... दोन दोन जन्मठेप भोगल्यानंतरही माणूस बदललाच नाही तर? आणि...

त्याने केलेला गुन्हा निसर्गात जन्माला आलेला प्रत्येक माणूस करत असूनही फक्त त्याच माणसाला गुन्हेगार ठरवले तर??

राम रहीम ढाबा आजही तिथेच आहे. केव्हाही जाऊन बघा! अर्थात, आपल्या वाढलेल्या राहणीमानानुसार आता आपल्यालाच तो ढाबा अत्यंत सुमार दर्जाचा वाटेल म्हणा!

पण... अजूनही ट्रक्स मात्र थांबतात. वैभव नाहीये आता पुर्वीचे! लायटिंगपण नाहीये. रमणची केबीन ढाब्याच्या मागे कुठेतरी पडलेली आहे. काही खोल्या पडून तिथे विटांचे ढीग आहेत.

दीपक अण्णू वाठारे!

यांना आता दिपू, दिप्या असे म्हणण्याची कुणाची टाप नाही. दीपकचाचा झाले आहेत ते!

ढाब्यावर सोळा ते चोवीस वयोगटातील तेरा मुले कामाला आहेत.

काशीनाथ अन अंजना एका खोलीत कायमचे वास्तव्यास आहेत. अत्यंत प्रेमाने एकमेकांचे पाहात आहेत. तेच दोघे असे आहेत जे...

त्या वेळेसपासून राम रहीम ढाब्यावर आहेत... आणि आणखीन एक जण पण आहे... मनीष सोमनाथ एरंडे!

... उर्फ मनीषचाचा... उर्फ... मन्नू...

तीस वर्षे झाली हो आता..कमी नाही... तीस वर्षे!

आजूबाजूचे जग कुठल्याकुठे गेले आहे. रामरहीम ढाब्याकडे पाहावेसेही वाटणार नाही असे दोन ढाबे समोरच झालेले आहेत. एकदम नाशिकच्या स्टँडर्डचे! तिथे लागत असलेल्या गाड्या पाहून दीपकला वाटते की अशा गाड्या आपल्या कळकट्ट ढाब्यावर लागणे शक्य नाही...

अबू मरून एकवीस वर्षे झाली आता. अती मद्यपानामुळे नशेतच मृत्यू! काय पण बातमी आली होती. कोण मेले आहे ते बघतच नाहीत. या माणसाने मालेगावच्या दंगलीपासून किती जणांचे भले केले आहे हे ती ती माणसे जाणतात. पेपरवाल्यांना काय? अर्थात, राम रहीम ढाबा पंधरा दिवस बंद ठेवला होता म्हणा चाचाने! अबूचा मोठा फोटो होता आता ढाब्यावर! रोज त्यापुढे काशीनाथ उदबत्ती लावतो.

"अय.. मुंडी मरोडके देख... चिल्लायेंगा तो मुर्गा.. चिल्लायेंगी तो मुर्गी..."

"ये.. इसीकीच बहन थी भावना.. ये ....किट्टूकी"

"अबे पोट्टे.. तू अठरा बरस का होगयाय ना?? अबीबी मुफ्त की चीजांच वापरेंगा लोगांकी..???"

"मेराभी हिसाब कर डाल किट्टू......"

अबूबकर! ................नाहीये आता या जगात अबूबकर! फोटोत आहे तो आता... चाचाने खास मोठा फोटो करून घेतला.. ढाब्याच्या गेटवर पाटी रंगवून लावली..

'अबूबकर यांचा रामरहीम ढाबा.. पेटभर खाना ओ.. और पैसा भी देना..... अबूबकर यांच्या हुकुमाने... '

चाचा! गणपतचाचा.... एकदा हसला म्हणा.. पुन्हा परत नाहीच हासला..

मेलेली माणसे कुठे हसतात?? आणि... अबू मेला म्हणजे.. तसाही मेलाच की चाचा... जिवंत होता दोन वर्षे... पण.. मेल्यासारखाच.....

पोटात रक्तस्त्राव झाला. जुनी जखम आत्ता उफाळून आली. घटना घडल्यानंतर आठ वर्षांनी!

अमितने खूप प्रयत्न केले... नाही वाचला.. दोन दिवसात गतप्राण!

"चाची.. ये पोरगं उठ्या... इसको धोनेको लेजा... "

"देखो. ये बच्चा कलसे आया है! इसका नाम दिपक अण्णू वाठारे करके है! इसको दिप्या बोलनेका! क्या? ये यही रहेगा! ये छोटा है अभी! इसको कामपे नही लगानेका है! दो तीन सालके बाद काम शुरू करेगा ये! तबतक इसको सबकुछ सिखानेका! अबू, तुम्हारे पास रहेगा ये पोरग्या! इसको सिखाओ! और इसको किसिने कुछ बोलनेका नही! ये नया भी है और छोटा भी है! मा बापने हकालेला है फालतूमे! अब इसका मा और बाप दोनो अबू है और मै भी है! तुम सब इसके बडे भाई है! इसके साथ टाईम मिलेगा तब तब खेलनेका! इसको जो चाहिये वो खानेको देनेका! ना नय करनेका! दादू, तेरे साथमे रहेगा ये कमरेमे! रमणको बोल, आजसे इधर सोयेगा वो! ये बच्चा अंदर सोयेगा!"

गणपतचाचा गेला...

वासंती काकू मात्र अजून आहे. पासष्ट वर्षाची आहे. दीपक ढाब्याचा फायदा तिच्याकडेच पाठवतो. मग ती अमितला त्यातला बहुतेक सगळा भाग देते आणि थोडासा स्वतःसाठी ठेवते.. अमित मुंबईला आहे.. बायको.. दोन मुले.. आईची खूप काळजी घेतो.. पण नोकरीच्या निमित्ताने मुंबईला राहावे लागते.

झरीनाचाची मात्र भुलोबाच्या वस्तीत जाऊन येऊन असते. ढाब्यावरच्या खोलीत महिन्यातील चार दिवस, मुलाकडे म्हणजे चांदवडला पंधरा दिवस अन बाकी भुलोबाच्या वस्तीवर! काटक आहे. चक्क ऐंशी वर्षांची असूनही तरातरा चालते. बोलत मात्र नाही. एक शब्द बोलत नाही.

"यही है क्या रे वो ब्याद?.. चल बेटा.. न्हाले.. बडा धरमिंदर है... शर्ट निकाल..."

"ये ओढा है.. इसलिये पहिली बारको मै आयी... कलसे नही आयेंगी.. ये देख.. ये पत्थरसे हिलनेका नही... हिलेगा तो डूबके मरेगा... समझा??? .... ये तपेला ऐसे पानी लेके उलटा कर... साबून लगा... और कमसे कम आधा घंटा न्हा यांपर.. उठनेका नय... क्या??? मै इधरच है.. देखरहेली है तेरेको.. कैसे न्हाता है... चल न्हा..."

झरीनाचाची! आता स्वतःची स्वतःलाही धड आंघोळ करता येत नव्हती तिला... अंजना मदत करायची..

अंजना! वय वर्षे साठ! दीपक आता तिचा धाकटा भाऊ झाला होता.. त्यालाच राखी बांधायची.. आणि काशीनाथ.. काशीनाथ अजूनही रात्री एकदा तरी दीपकची विचारपूस केल्याशिवाय झोपायला जायचा नाही...

पद्या गेला हार्ट अ‍ॅटेकने! आठ वर्षे झाली. सत्तावन्न वर्षांचा होता. ढाब्यावर नाही गेला. चांदवडला गेला. तिकडे हॉटेल काढले होते. आता वैशाली अन तिचा मुलगा बघतात. वैशाली घरीच असते.. पण मुलाला थोडीफार मदत करते. तिची सासू तर केव्हाच गेली.. पद्या... पद्यादादा...

" क्या टायमपास कररहा बे??"

"तेरेको क्या दुनियादारी??"

"अंहं.. तू नय जानेका.. पीछे काजल अकेली है.. उसको संभालनेके लिये इधरच रय"

प्रदीपदादाची आठवण आली की उन्मळून उन्मळून रडतो दीपक! पण मूकपणे! आपल्या खोलीच्या दाराला असलेल्या फटीतून ताटली सरकवणारा पद्या.. ऑम्लेट्स.. पद्याने केलेली ऑम्लेट्स खाऊन बावीस वर्षे झाली आता.... पण.. अजून तोंडावर चव रेंगाळते..

बाळू आहे.. पण नाशिकला स्थायिक झाला आहे.. कांबळे काका अन काकू दोगेह्ही गेले.. स्वाती ताईही नाशिकलाच अन मनीषाताईही! ... दीपक सहा महिन्यातून एकदोनदा जाऊन येतो अजून.. मनीषाताई तिची नातवंडे आलेली असली तर सांगते..

"मामाआजोबा आलेत... नमस्कार करा बेटो..."

मग बाळू त्याला घेऊन फिरायला जातो.. बाळूही आता असेल बासष्ट, त्रेसष्ट! दोघे कुठेतरी चहा घेत बसतात अन जुन्या... जुन्या आठवणी काढतात..

झिल्या कसा पळालावता नय?? विकी भेटतो का रे? मला मागे एकदा फोन आलावता.. साखरूचं दुकान चांगलं चालतं म्हणे.. वगैरे वगैरे... याला काय अर्थ आहे आता???

गुजरा हुवा जमाना.. आता नही दुबारा... हाफिझ खुदा तुम्हारा.. हाफिझ खुदा तुम्हारा..

झिल्या आपला मेहुणा इरफानला मदत करतो त्याच्या व्यवसायात! रेहानादीदी उर्फ अब्दुलची मेहरुन्निसा मात्र अब्दुलला भेटायला निघून गेली. हे दोघे मालेगावलाच आहेत.

झिल्या वर्षातून एकदा वगैरे येतो ढाब्यावर! मागच्या बाजूच्या आपल्या खोलीच्या ढिगार्‍याकडे खिन्नपणे पाहतो थोडा वेळ! काशीनाथच्या हातची बासुंदी घेतो.. गप्पा मारतो .. अन जातो.. तोही साठीला आलाच की.. ! जाताना मात्र दीपकला अशी मिठी मारतो की पाच पाच मिनीटे कुणी एकमेकांना सोडतच नाही. सोडतात तेव्हा घळाघळा डोळे वाहत असतात. अन अंजना ते बघून हुंदके देत असते. काशीनाथ आपला दोघांच्या पाठीवरून हात फिरवत असतो..

चाचा अन अबूची खोली जरा व्यवस्थित राहिलीय तीही मन्नूने जुन्या आठवणी कायम ताज्या ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे! पण त्याला तरी कुठे फारसे झेपते म्हणा आता!..

विकी गुजरातमधे असतो. बंदरावर! जुन्या जहाजांचे टेंडर काढायच्या कामात त्याने बस्तान बसवलंय! लग्न केलंच नाही त्याने! अजून त्याच्या हातावर बापाने दिलेला डाग तसाच आहे.. आणि राम रहीम ढाब्यावर झालेल्या मारामारीत डोक्याला झालेल्या जखमेची खूणही तशीच आहे...

समीर केव्हाच गेला. पण जाताना दिपूच्या चेहर्‍यावरून हात फिरवून म्हणाला..

"तेरीच हय वो.. जिंदगीभर तेरीच रहेंगी वो.."

समीरने एवढे गुन्हे करूनही तो गेला तेव्हा मात्र दीपकने हंबरडा फोडलाच होता..

साखरूने शिरवाडला दुकान काढलंय! ढाब्याचे बरेच रॉ मटेरिअल तो पुरवतो. पण व्याधीमुळे त्याला येता मात्र येत नाही इथे फारसे! मग दीपकच जमेल तेव्हा जातो अन त्याला भेटतो.. मग समीरला झालेल्या अपघाताच्या वेळी साखरूने प्रवाशांना किती मदत केली होती याची आठवण दीपकने काढली की साखरूला आठवण येते त्याची चोरी दीपकने पकडली याची.. मग दोघेही जोरात हसतात.. आणि...
..आणि.. मग.. रडतात.. गळ्यात गळे घालून रडतात...

दादू समीर गेला तेव्हा आंध्रमधून धावत आला होता. मात्र तेवढेच.. त्या आधी नाही.. अन नंतर नाही.. तो म्हणे हुमनाबादला एका ढाब्यावर होता.. त्याला तिथे कसे कळले समीरचे माहीत नाही.. पण समीर त्याचा जिवश्च कंठश्च यार होता.. एकदाच आला होता..

मनीस सोमनाथ एरंडे.. मन्नू... मन्नूचाचा झाला होता आता.. गल्ल्यावर बसायचा..

'यहांपे काजल रयती थी.. दिपूकी काजल..'

ही अक्षरे अर्थातच सारखी विरायची... मग तो ती पुन्हा पुन्हा लिहायचा.. दोन वर्षे ते चाललेले होते.. मग तेही बंद झाले.. नंतर मग भुलोबाच्या यात्रेच्या वेळेस मात्र त्याने नियम केला होता.. यात्रेच्या दिवशी ती अक्षरे पुन्हा लिहायची.. ते मात्र आजवर पाळत होता..

राम रहीम ढाबा उभा आहे अजून.. पण.. ती शान नाही आता त्याला..

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे.. हा हा.. मजेशीरच कारण आहे...

काल संध्याकाळी मन्नूने ती अक्षरे पुन्हा लिहीली.. ढाब्यावरील बहुतेक सर्व मुलांना त्याचे कारण माहीत झालेले होते... पण.. दिनू नावाचा एक मुलगा नुकताच नवीन आला होता... त्याने विचारले..

दिनू - मनीषचाचा.. हे का लिहिताय असं?
मन्नू - भुलोबाच्या यात्रेच्या दिवशी लिहितो बेटा.. बाकी काही नय..

आणि दिनूने सगळ्यांना नवीनच सांगीतल्यासारख सांगीतलं होतं! दीपकचाचाकी काजल नामकी मैत्रिन थी.. वो उधर रयती थी.. वो देखो.. मनीष चाचा लिखरहे उस दीवारपे ना?? वहीच घरमे...

सगळे हसत होते.. अगदी दीपकसुद्धा थोडासा निराशपणे का होईना हसलाच..

दीपकने लग्न केलेच नव्हते. शक्यच नाही. महुरवाडीलाही जाण्यात काही अर्थ नव्हताच. आई मरून तर पंचवीस वर्षे झालेली होती. कुणासाठी जायचे??

काजलचा शोध घेणे थांबलेले होते.. जवळपास पाच वर्षे तो वेड्यासारखा मालेगाव पिंजून काढत होता.. पण ती शिफ्ट झाल्याचेच समजत होते.. कुठे ते नक्की कुणाला कळत नव्हते.. तिचा नवरा पुर्वीचा स्थानिक नेता असल्यामुळे जरा जरा कल्पना तरी येत होती की मुंबईत गेली वगैरे... मग मुंबईच्या चकरा सुरू झाल्या होत्या.. पण.. कधीच दिसली नाही ती.. दिसलीसुद्धा नाही..

सुरुवातील म्हणालो नव्हतो का? गुन्हेगाराच्या दृष्टीने गुन्हा समर्थनीयच असतो.. प्रेम हा जर एखाद्याच्या दृष्टीने गुन्हा असला तर.. दुसर्‍याच्या दृष्टीने ते त्याचे आयुष्य असते... मग.. दोन दोन जन्मठेपा देऊनही माणसात बदल कसा व्हायचा??

नाहीच झाला...

झरीनाचाची नेमकी ढाब्यावर होती... आणि तिला आज रात्री भुलोबाला जायचंच होतं.. बर.. तिचा मुलगाही इथे नव्हता..

दीपकला तिला घेऊन जावं लागलं.. तेहेतीस वर्षांपुर्वी ती दीपकला अन काजलला त्या अंधार्‍या वाटेने घेऊन गेली होती.. आता ती वाट फारशी अंधारी नसली तरी.. झरीनाचाचीचे वय झाले होते.. तिचेच काय.. दीपक अण्णू वाठारेच आता पन्नास वर्षांचे होते..

चाचीचा हात धरून थोडे चालल्यावरच एक शेअर रिक्षा मिळाली त्या दोघांना.. पंधरा मिनिटात वर पोचले..

भुलोबाच्या यात्रेतील मजा संपून दोन दशके झाली होती.. थियेटर निघाले होते.. हॉटेल्स होती.. खोट्या भांडणांची प्रथा बंद पडली होती.. सगळेच व्यावसायिकीकरण झाले होते.. माणूस तेवढा भेटत नव्हता..

पण.. भेटला... दीपकला भेटला...

मागून कुणीतरी खांद्यावर हात ठेवून म्हणाले..

"दिपू...."

शरीरातल्या सगळ्या रक्ताचे अश्रू व्हावेत.. पायाखालची वाळू सरकावी... डोळ्यांचे प्राण व्हावेत अन प्राणांचे डोळे..

तीस वर्षे.. तीस वर्षांनी असा काय फरक पडणार ... तीस च्या तीस वर्षे जर.. त्याच माणसाच्या आठवणीत काढली असली तर.. मग फरक कसा पडेल?? पडलेला फरक जाणवेल कसा??

काजल...

काजल.. काजल.. काजल..

झरीनाचाची हतबुद्ध होऊन काजलकडे पाहात होती.. भुलोबाच्या यात्रेचे आवाज हजारो मैलांवरून यावेत तसे भासत होते...

दीपक अण्णू वाठारे... शरीर राहिलेच नव्हते ते.. त्यांचे रुपांतर झाले होते अश्रूंच्या धबधब्यात...

मटकन खाली बसला होता दिपू.. काजल त्याच्या जवळ बसली...

एकमेकांच्या डोळ्यांमधून डोळे काढणे शक्य होत नव्हते...

बावन्न वर्षांची काजल.. बावन्न? ... होय.. प्रेयसी... बावन्न वर्षांची.. नसावी?? का नसावी??

तोच रंग.. तीच ठेवण शरीराची.. तेच... जिभेची गरजच भासणार नाही इतके बोलके डोळे..

फक्त.. केसांमधे कित्येक केस रुपेरी.. कपाळ्यावर.. दोन आठ्या.. डोळ्यांखाली.. किंचित सुरकुत्या...

आणि... डाव्या गालावर. कसलातरी मोठा व्रण....

कोणताही संवाद शब्दांमधून होत नव्हता.. अगदी.. झरीनाचाचीही एक अक्षर बोलत नव्हती...

शेवटी काजलनेच शांततेचा भंग केला...

काजल - भुलोबाको.. अकेला आया .. दिपू???

भर रस्त्यात जर एखादा प्रौढ पुरुष एखाद्या प्रौढ स्त्रीच्या मांडीत डोके खुपसून हमसून हमसून रडत असेल तर ती स्त्री संकोचून त्याला बाजूला करणार नाही का??

नाही.. काजलने त्याला बाजूला तर केलेच नाही.. उलट ती त्याच्या डोक्यावर डोके ठेवून त्याच्यापेक्षा जास्त रडू लागली..

तीस वर्षे.. दोघांच्याही डोळ्यांमधून तीस वर्षे घळाघळा वाहात होती...

आवेग न संपणारा होता...

================================

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी समोरच्या ढाब्याचे मालक तोंडात बोटे घालू राम रहीम ढाब्यावर लोटलेली गर्दी बघत होते.. आणि.. बाहेर तर चक्क पाटी होती...

'आज ढाबा बंद रहेंगा वो.. आना है तो फोकट का खानां खानेको आओ.. अबूबकर यांच्या हुकुमाने'

हा कोण अबूबकर? मोठे हुकूम बिकूम सोडतोय??

खाली मन्नूने ठळक.. अगदी ठळक अक्षरात लिहीले होते...

दिपूको काजल मिलगयी याराओ... मिलगयी उसको काजल...

असरारसुद्धा आला होता असरार..

रिटायर झालेले.. त्यावेळी तरुण असलेले काही ड्रायव्हर्स, कंडक्टर्स.. शिरवाड, पिंपळगाव (बसवंत)मधील काही अगदी जुनी व अजूनही हयात असलेली गिर्‍हाईके..

साखरू...

वासंतीकाकू... वैशाली अन तिचा मुलगा.. बाळू अन मनीषाताई.. स्वातीताई.. दोघी मुले बाळे नातवंडांसकट..

भरीस भर म्हणून बातमी कळल्याने इतक्या लांबून.. दादू अचानक प्रकटला..

त्याच्या येण्याने चार चांद लागून एक तास होत नाही तोवर.. इरफानच्या गाडीतून..

झिल्या आला..

आणि... विकीचा ढाब्यावर फोन आला.. तो वीस वीस मिनिटे काजल अन दिपूशी बोलला...

आणि रमण? एक्याऐंशी वर्षांचा रमण...

हाफ राईस दाल मारकेचा.. हिरो ठरला होता..

त्यालाच काजल पहिल्यांदा मुंबईला भेटली होती.. खूप कसून प्रयत्न करून रमणने हा सगळा घाट घातलेला होता.. रमण आजचा उत्सव मूर्ती होता.. दिपूच्या ऐवजी... अन काजलच्या ऐवजी...

सगळ्या पोरांना बाजूला सारून काशीनाथने त्याचा स्पेशल खाना आज बनवला होता.. याही वयात..

आणि जेवण वगैरे झाल्यावर...

चाचा भरवायचा तशी मीटिंग बोलावली दीपकने मागच्या बाजूला.. कारण ढाब्याचा प्रमुख आता तोच होता..

सगळे बसले असताना थंडगार हवेच्या त्या रात्री.. काजल बोलू लागली...

काजल - भोत रोयी मै.. भोत मारा था बाबाने.. आईनेबी.. मैने खानाच छोडदिया था.. यहांसे जाते हुवे तेरे कमरेको देखा तो... ऐसा लगा के .. मै मरगयी है... ओढून ओढून नेलं मला इथून.. अबूचाचा.. गणपतचाचा.. सगळे मधे पडले.. बाबांनी मोठा वाद काढला.. आमची पोरगी... आम्ही कुटंही निऊ...

मालेगावच्या त्या मुलाला मला दाखवले.. खोटं बोलले होते ते.. कसलेही पुढारी बिढारी नव्हतेच.. प्रयत्न करत होते राजकारणात येण्याचा.. कारण दुसरं काही करणंच शक्य नव्हतं.. शिक्षण नय.. नौकरी नय... कुछबी नय...

महिनेमे शादी बना डाली.. यहांसे एक आदमी बी नय आया.. मै भोत राह देख रही थी.. मेरेको लगा प्रदीपदादा तो आयेंगेच.. नय आये.. कोई बी नय आया...

लडका गुंड होता तो... मवाली होता.. बाबा फसले होते.. हुंडा म्हणून .. त्या काळात बारा हजार दिले.. मी.. सासरचे घर आपले मानून काम करायचे... सुरुवातीला.. माझ्यावर खूप प्रेम असल्याचे दाखवायचा लडका.. नंतर उसको और बी कोई लडकिया भाती.. ये समझमे आया..

खूप छळलं.. पण.. बाबा गुजरगये थे.. आई अकेलीच.. ती काय करणार..?? आता ढाब्यावर येऊन मदत मागायला तोंडच नव्हतं..

मला दिवस गेले.. हे पोरगं कोण सांभाळणार.. तुझा बाप पैसे पाठवणारय का.. विचारून.. पाडले ते मूल.. मग.. नंतर मला.. नकोच वाटायला लागले आई होणे... यांच्या घरी उलटा प्रकार होता.. मूल होत नाही म्हणून छळणारे माहीत होते.. ये अलग किसमके लोगां थे..

त्याला वर्षातून एकदोनदा तरी अटक व्हायची.. जुगार.. बायकांची लफडी.. बरेच काय काय...

मलाच हाकलून दिलवतं एकदा.. लेकिन मै जायेंगी किधर?? आईके पास गयी तो आजूबाजूके लोगां आईको भोत कुछ बोले.. आई आके ससुरालके सामने आचल फैलाया..

फिर पैसा लिया.. जितना था वो लेलिया.. दो सालके बाद.. आईबी गुजरगयी..

मै दुनियामे अकेली होगयी.. तबी किसीसे लडकेने सुन लिया.. तुम्हारा और मेरा ढाबेपे अलग रिश्ता था..

उस दिन.. मैने आजतक नय खाया ऐसा मार खाया.. ये देखो.. ये गालपे.. जलनेका डाग है.. पैरपेबी हय.. भोत मारा.. आजूबाजूवाले बचानेके लिये आगये..

एक दिन मैच भागगयी.. लेकिन फिर पकडके लाया.. घरकी बदनामी करतीय करके फिर मारा.. लेकिन उस वक्त उसको अ‍ॅरेस्ट होगयी.. कोई नया नियम आया था बोले.. घरात मारहाण झाली तरी पकडतात..

मुंबईला जावे लागले.. मालेगावात फारच बदनाम होता तो..

मला क्षणाक्षणाला वाटायचं.. इथे निघून यावं.. पण जीवाची भीती होती.. माझ्या कमी.. तुझ्याच जास्त..

आयुष्यभर छळ छळ छळून.. दोन महिन्यापुर्वी मेला तो राक्षस..

रमणचाचा.. अचानक मिले मालेगावमे...

उन्हो भोत समझाया..

बोले.. अबीतक तू मेरी राह देखताय.. खरच दिपू?? अजून वाट बघत होतास??

तुला काय विचारायचं म्हणा.. माझ्या घराच्या भिंतीवर लिहीलच आहे की.. 'दिपूकी काजल'

अब मै. ऐसी.. जलेली.. बुढी..

चलेंगीना .. तेरे पास आयी तो...?????

हे वाक्य काय बोलली काजल... अश्रूंचे पाट वाहिले सगळ्यांच्या डोळ्यांमधून.. आणि.. क्षणभरातच.. अश्रूंचे रुपांतर झाले हास्यात...

बाहेर मनीष सोमनाथ एरंडेने फटाक्यांच्या माळा लावल्या.. रमणला डोक्यावर घेऊन नाचली पोरे..

समोरच्या ढाब्याची गिर्‍हाईकेच नाहीत.. तर मालकही येऊन बघून गेले की प्रकरण आहे तरी काय...

फक्त तीनच माणसे नव्हती.. दैत्य अबूबकर... न हसणारा गणपतचाचा.. आणि.. पद्या...

पहाटे साडेचारला जेव्हा काजलला घेऊन दिपू आपल्या खोलीत गेला... तेव्हा

मनीष सोमनाथ एरंडे यांनी दिपूच्या खोलीच्या बाहेरच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहीले..

'और... अब यहां रयती हय वो...."

आजही जा... शिरवाड अन पिंपळगाव (बसवंत)च्या मधे विचारा.. राम रहीम ढाबा कुठे आहे हो??

सांगतील लोक.. ते नाही का?? इथून सरळ गेल्यावर.. ते.. दिपू अन काजल नाही का राहात..???

तोच राम रहीम ढाबाय...

दिपू अन काजल राहतात तो... तोच राम रहीम ढाबा..

-'बेफिकीर'!

==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळ्यांतुन पाणी काढलत राव!!! अजुन काय बोलु??
आज सर्व २३ भाग पुन्हा एकदा वाचुन काढावेसे वाटताहेत, नाही वाचतोच.
पु.ले.शु.
असच लिहित रहा.

Happy Happy Happy आता कसं.. अब सब ठीक हो गया Happy
धन्यवाद 'बेफिकिर' .. वाचकांच्या इच्छेला किती मान देता तुम्ही..धन्स!!!
आता दुसरी कादंबरी कधीपास्न????

ओहो..... ओहो..... शब्द नाहित..........सुरुवाति पासुन शेवट पर्यन्त नचुकता रोज वचात होते....
पण आजचा शेवट वाचुन रहावलेच नाहि. दाद द्यविच लागलि.

Yipppeee!!!! मजा आली...उतार वयात तरी दोघे एकमेकांना भेटले...अतिशय उत्कृष्ट कादंबरी झाली भूषणजी...खुप खुप खुप खुप आवडली. तुमच्या लेखनाचं खरंच व्यसन लागलंय...पुढची कादंबरी कधी? Happy

"तेरीच हय वो.. जिंदगीभर तेरीच रहेंगी वो..">>
काय.. हापिसात हमसुन हमसुन रडंवलंत.. Sad

दिपू अन काजल राहतात तो... तोच राम रहीम ढाबा.. >>
ह्म्म ५० वर्षाचे का होइना.. दिपु न काजल.. भेटले.. Happy
आनंद झाला.. एकाच भागात गुंडाळायल नको होती.. थोडं अजुन वाढवायला हावी होती..

आता उद्या काय म्हणुन मा. बो. वर येउ.. दिपु न काजल भेटणार आहेत का आता Sad Sad

अप्रतिम..... फारच छान. पण शेवट अजुन रंगवता आला असता इतक्या वर्षांनी भेटले दिपू आणि काजल... इतकि वर्ष मनात जपलेल प्रेम, सहन केलेल दु:ख, एकमेकांना पुन्हा कधितरि भेटण्याची आस हे सगळ उफाळून आल असणार भेट्ल्यावर ते थोड कमी वाटलं. बाकि कथा अप्रतिम...
आता नविन कादंबरी कधी चालु करताय...
तुमच्या लिखाणाने addict केलय मला...
पु. ले. शु.......

संपूर्ण कादंबरी खुप आवडली आणि शेवट तर खासच. इतके भाग होऊनही, कुठेही कंटाळवाणे वाटले नाही लिखाण. उलट प्रत्येक भाग संपला की पुढे काय होणार याची एक जबरदस्त उत्सुकता असायची. अगदी कमी वेळात मस्त आणि दीर्घ कादंबरी वाचायला मिळालीय. सगळीच पात्रं मस्त गुंफली आहेत.
आता लवकरात लवकर अजुन एक कादंबरी लिहायला घ्या. पुलेशु. Happy

शब्दच नाहीयेत. खरोखर अप्रतिम.
व्यसन लागलंय तुमच्या लिखाणाचं.
विनंती : नविन कादंबरी लवकर सुरु करा.

सर्व भाग अप्रतिमच. इतके दिवस वाट बघून वाचत होते. मस्त लिहिलत इतक कि नविन भाग आल्यावर चालता चालता मोबाईलबर पण वाचायचे. घरि जाऊन वाचे पर्यंत धीर नसायचा.
Happy

याला म्हणतात बेफिकीर टच!!!! खरोखर डोळ्यातून पाणी काढलेत.... शाहरुख- प्रिटी झिंटाच्या वीर-झारा फिल्मची आठवण करुन दिलीत अगदी...

आज मध्यरात्री सुरु करुन सकाळी पोस्ट केलीत ना कादंबरी??? कौतुक आहे हो तुमचं... खरोखर अक्षरशः जागलात आणि जगलातसुद्धा तुम्ही ही कादंबरी...

शिवाय सर्व वाचकांची इच्छा सुद्धा पूर्ण केलीत... मला दिपू-काजल शेवटपर्यंत एकत्र पाहायचे होते...किमान आयुष्याच्या शेवटी तरी ते एकत्र आले...हे काय कमी आहे?

तुम्ही बेफिकीर नाही,,, तर बेफिकीरांना संवेदनक्षम बनवणारे...असा नवीन अर्थ उलगडला...

ह्या अतिसुंदर कादंबरीच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला एका वेगळ्या विश्वाची सैर घडवलीत, ह्याबद्दल तुमची शतशः आभारी आहे!

नवीन कादंबरीच्या प्रतिक्षेत....अतिशय आतुरतेने.
पुढिल लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या लेखनावर प्रेम करणार्‍या सर्व वाचकवर्गाला निरामय दीर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना.... Happy

तुफान वेग..आणि तेव्हढेच वेगवान कथानक..फारच मस्त....खरच कौतुक आहे..

आता पुढे काय..वाट पहात आहे..

बेफिकीर,
आम्ही सर्व वाचक आपले मनापासुन आभारी आहोत............खरच कथेचा शेवट आपण छान पैकी केला . नाहीतर आम्हाला फार टेन्शंन आले होते......................पण दिपुला काजल मिळाली.............आयुष्यात कधीतरी राम रहीम ढाब्याचे दर्शन घेण्याची ईच्छा झालीय .

बेफिकीर,

आयुष्यात काही जवळच्या व्यक्ती विसरणे शक्य नसते. त्यात तुमची भर पडली.

अत्यन्त सूरेख कादम्बरी!!!!

बेफिकीर ! ग्रेट !! सिंपली ग्रेट !!!

आता उद्या मायबोलिवर काय शोधायचं हो ?
पुढच्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा !

सुन्दर!! मी तर आमच्या वेळेप्रमाणे रात्री ४:०० वाजता जाग आली तेव्हाच वाचून काढला हा भाग.
प्रतिसाद आता देत आहे. व्यसन लागले आहे तुमचे लिखाण वाचायचे.

Pages