या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे... अर्थातच नाताळाच्या सुट्टीत इथे गर्दी नसते! पण आमचा काही दिवस निवांत घालवणे एवढंच उद्देश होता. हिवाळ्यातले पॅरिस म्हणजे अतिशय मरगळ... सदैव थंड हवा, ढगाळ आकाश आणि कमी सुर्यप्रकाश यामुळे फार फार डिप्रेसिंग वाटतं. या वातावरणापासून दूर जायचच होतं.
थोडी शोधाशोध केल्यावर नीस (Nice), कान्न (Cannes) आणि मोनाको (Monaco) बघायचं ठरलं. फक्त नीसला राहून हे शक्य होतं. मग जाण्याच्या आठवडाभर आधी रेल्वे आणि हॉटेलचे बुकिंग फ्रेंच रेल्वेच्या साईटवरून केलं. निघायच्या दिवशी पॅरिसच्या रेल्वे स्थानकावरुन आमच्या गाडीला निघायलाच एक तास उशिर झाला. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध TGV नी (माहिती आहे नं?!!) जाण्याची ही दुसरी वेळ होती. ही अतिवेगवान रेल्वे मार्सेय (Marseille) पर्यंतचे साधारण ७५० कि.मी. अंतर तीन तासात कापते आणि पुढे नीसपर्यंतचे २०० कि.मी. कापायला अडीच तास जातात. आम्हाला तशिही काही घाई नव्हती. मस्तपैकी पत्ते खेळत आम्ही रात्री नीसला पोचलो.
नीस तसे जास्त मोठ्ठे शहर नाही. इथे एकच ट्राम आहे पण सार्वजनिक बसचे जाळे (बाकी फ्रान्सप्रमाणेच) चांगले आहे. फक्त १५ युरोत सात दिवसाचा पास घेतला आणि ट्राम पकडून हॉटेलला निघालो. नाताळ असल्याने सगळे शहर उजळून निघाले होते. शहराच्या मुख्य चौकात - प्लास मासेना (Place Masséna) मध्ये - नाताळ बाजार (हा दर वर्षी आणि सगळ्या ठिकाणी एकसारखाच असतो), मोठ्ठा पाळणा आणि इतर जत्रा लागली होती. हॉटेल समुद्रकिनारीच होते. एकंदर इमारत आणि खोलीतले खुर्च्या-टेबलं बरीच जुनी होती. ताजेतवाने होउन पलंगावर बसतोच तोवर भुकेची जाणीव झाली. येताना प्लास मासेनाआधी एक 'बॉलीवूड कॅफे' नावाचं भारतीय हॉटेल बघितलं होतं. तिथे जायचं ठरलं. आत बघतो तर शाहरुख, करीना मंडळींची छायाचित्रे... मालक हॉटेलच्या नावाला इमान राखून होता. त्याचप्रमाणे तो भारतीय जेवणालाही इमान राखून होता. सामोसा चार कोनाचा होता आणि त्यात चक्क बटाटा आणि मटार निघाले. पॅरिसमधले सो-कोल्ड भारतीय हॉटेलवाले त्रिकोणी सामोस्यात गाजर कोबी काय वाट्टेल ते घालतात
दुसऱ्या दिवशी पहिलं काम केलं ते पर्यटन कार्यालयात जाऊन माहिती घेतली. तिथल्या बाईने आम्हाला भरपूर नकाशे आणि माहितीपत्रके दिली. शिवाय या आठवड्याचं हवामान विचारल्यावर चक्क नेटवरून हवामानाचा अंदाज छापून दिला!! मग आमचं ज्ञान, ही नवी माहिती आणि हवामानाचा अंदाज यांचा विचार करून आज नीस हिंडायचं ठरलं. पहिल्यांदा गेलो समुद्रावर! पाणीतर थंड होतंच पण थंड वारं देखिल वाहात होतं.
थोडा वेळ फिरून आम्ही जुन्या नीसकडे मोर्चा वळवला. जुन्या नीसमध्ये अगदीच छोटे छोटे रस्ते आहेत. कार अर्थातच आत येऊ शकत नाही. हलक्या गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या इमारती छान दिसत होत्या. इथे पर्यटकांची रेलचेल होती. नेहमीप्रमाणे सोवेनिअरची दुकानं आणि वेगवेगळी उपहारगृहं दिसत होती. अत्तर व इतर सुगंधी पदार्थांची देखील बरीच दुकानं होती. इथून जवळच असलेले ग्रास (Grasse) गाव सुगंधी द्रव्यं तयार करण्यासाठी बरेच प्रसिद्ध आहे.
इथुन आम्ही बस घेऊन रशियन ओर्थोडोक्स चर्च बघायला गेलो. या प्रकारचे रशिया बाहेरचे हे सर्वात मोठ्ठे चर्च आहे. जसं फ्रांस म्हणाल्यावर आयफेल टॉवर दाखवतात तसं रशियासाठी मोस्कोच्या लाल चौकातल्या एका चर्चचा फोटो दाखवला जातो. हे चर्च देखील तसेच होते. यावरील घुमटांना त्यांच्या आकारामुळे ओनिअन डोम म्हणतात. आतूनही हे चर्च सुंदर होते. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत असले चर्च बघितले नसल्याने हे भलतंच आवडलं.
इथून बसनी नीस बंदराला गेलो. इथे बघायला खास काही नसल्याने तसेच पुढे नीसबाहेरील 'मो बरोन' (Mont Boron) डोंगरावर गेलो. वर जाईपर्यंत अंधार झाला होता. इथून सगळं नीस दिसतं. रात्री तर अतिशय सुंदर दिसतं. वर जाणारा रस्ता जंगलातुन जाणारा अगदी सुन्सान असल्याने शेवटच्या थांब्यावरून फोटो काढायचं ठरलं. पण बसं थांबली तिथुन काहिच नीट दिसेना. इथे त्या फोटोसाठी परत यायचं ठरवून आम्ही पुढच्या बसने हॉटेलला परतलो.
एकंदर नीसमध्ये भारतीय उपहारगृह मोठ्या संख्येनी आहेत. म्हणजे पिझ्झेरीयाहूनदेखील जास्त! आज दुपारी पण एका भारतीय उपहारगृहातच जेवण केलं. इथेही कांदा भजी म्हणाल्यावर ओनिअन रिंग्स नं देता चक्क आपल्याकडची, ज्याला आम्ही खेकडा भजी म्हणतो, तशी भजी मिळाली.... (माझा आनंद गगनात मावेना वगैरे वगैरे वगैरे ...). रात्री देखील एका भारतीय फास्ट-फूड दुकानातून (इथल्या सॅडविच शॉप प्रमाणे) अगदी स्वस्तात जेवण मिळालं. पॅरिसपेक्षाही नीसमध्ये भारतीय उपाहारगृहांची घनता जास्त आहे आणि पदार्थांचा दर्जा तर कित्तेक पटीनी चांगला आहे. इथे मोठ्या प्रमाणात येणारे इंग्रज पर्यटक याला कारणीभूत असावेत. कारण काहीही असो पण खाण्याच्या बाबतीत चैन होणार होती हे आम्हाला दिसताच होतं.
हवामानाच्या अंदाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशी निरभ्र आकाश होते. आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही शमँ द फर द प्रोवान्स (Chemins de Fer de Provence) या छोट्याश्या रेल्वेनी नीसच्या उत्तरेला जाणार होतो. इथे नक्की काय बघायचं ते माहिती नसल्याने सरळ शेवटच्या थांब्याला जाऊन परतायचं ठरलं. हा एकंदर प्रवास सहा तासाचा झाला असता. त्यामुळे भल्या पहाटे उठून सकाळी आठची रेल्वे पकडली. तिथल्या तिकीट खिडकीवरच्या बाईला आमची कल्पना काही आवडली नाही. मग तिने सुचवल्याप्रमाणे शेवटी न जाता, मधल्याच एका आँथ्रेवो (Entrevaux) नावाच्या गावापर्यंतचे तिकिट काढले. आँथ्रेवोला एक जुना किल्ला आहे हे ही तिनी सांगितलं. ही रेल्वे बरीच जुनी आहे. रेल्वेचा एकचं मार्ग नदीशेजारून पुढे पुढे जात जातो. आजूबाजूला डोंगर, मधूनच एखादे खेडे असं सुरेख दृश्य होतं. सकाळी लवकर निघाल्याने सूर्य डोंगरामागेच होता. डिसेंबर महिना असल्याने तो तसाही वरती येणार नव्हता. डोंगराच्या ज्या बाजूला सूर्यप्रकाश पडत नाही तिथे बर्फ होता. वरती नदीवर साठलेलं धुकं आणि खाली रुळावर बर्फ अश्या वातावरणात रेल्वे पुढे चालली होती. अधून मधून छोटी छोटी स्थानकं लागत होती. आजूबाजूला फ्रेंच खेडी बघत आम्ही हळू हळू आमच्या गावाकडे पोहचत होतो.
आँथ्रेवो येण्याआधी तो किल्ला दिसू लागला. आँथ्रेवोला उतरणारे आम्ही दोघेच होतो. बाहेर प्रचंड थंडी होती. आधी स्थानकाशेजारच्या उपहारगृहात जाऊन गरम कॉफी (आणि मी गरम वाईन!!) घेतली. त्याने थोडी तरतरी आली तसा समोरचा रस्ता ओलांडून गावात गेलो. गावं अगदी मध्ययुगीन... मागे डोंगरावर किल्ला आणि समोरून वळसा घालून जाणारी नदी या दोन्हीमध्ये वसलेले! या बाजून गावात जायला नदीवर एक जुना दगडी पूल आणि साखळीने खाली पडणारे दोन दरवाजे होते. गावात प्रवेश केल्यावर डावीकडे 'बंद' पर्यटन कार्यालय दिसलं. बाहेर आँथ्रेवोचा नकाशा लावला होता त्याचाच एक फोटो घेतला. तसाच चालत पुढे गेल्यावर गावाचा मुख्य चौक होता. फार काही मोठ्ठा नव्हता. दोन दुकानं... एक उपाहारगृह.. बस. नकाशाप्रमाणे रस्ता शोधत गावाच्या चर्चकडे आम्ही निघालो. गावात अगदीच सामसूम होती. पण लोकं राहतायत हे जाणवत होतं. (अगदीच व्हेनिससारखी भुताटकी नव्हती!) छोट्या गल्ल्यातून पुढे जात जात शेवटी चर्च आलं.
इथेच गावाच्या तटबंदीमधले दुसरे प्रवेशद्वार होते. चर्चमध्ये गेल्यावर कळलं गावात एवढी शांतता का होती ते... आत बहुतेक तो संडे मास का काय असतो ना तो चालला होता. पन्नासएक लोकांसमोर एक पाद्री काहीतरी म्हणत होता. क्षणभर कळेना आत जावं का नको... शेवटी पटकन जाऊन शेवटच्या खुर्च्यांवर बसलो. चर्च बरचं जुनं होतं. उंच छत, रंगीत काचांच्या खिडक्या सगळं बघतच होतो तेवढ्यात सगळे उठले... मागून ऑर्गनचे सूर येऊ लागले आणि त्यांची प्रार्थना सुरु झाली. आम्हीपण उभारलो. पाद्री आता मंचावरून खाली येऊन एक-दोघांशी हस्तांदोलन करत होते. पुढे पुढे येत ते शेवटी आमच्यापर्यंत आले. पाद्री एकदम टिपिकल पाद्री होते! अगदी गुटगुटीत, हसर्या चेहेर्याचे!! मागे प्रार्थना सुरूच होती. त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमचीपण चौकशी केली. प्रार्थना झाल्यावर एक एक मंडळी जाऊ लागली. पाद्री दारात उभारून प्रत्येकाचा निरोप घेत होते. आम्हीपण पुढे जाऊन चर्च बघितले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर आलो.
आता आम्ही डोंगरावरच्या किल्याकडे मोर्चा वळवला. त्याची उंची पाहता मी एकट्यानेच जायचं ठरलं. सूर्य बऱ्यापैकी वरती आला होता पण हवेत अजून गारवा होताच. दगडी बांधलेल्या रस्त्यांनी जसं जसं मी वरती जाऊ लागलो तसं तसं उकडायला सुरवात झाली. सितादेलापर्यंत पोचलो तेंव्हा जाकीट, स्वेटर काढावा लागला. वरती बऱ्याच खोल्या होत्या. सगळीकडे दिशादर्शक बाण आणि माहिती व्यवस्थित होती. अख्या सितादेलावर मी एकटाच असल्याने जरा वेगळं वाटत होतं.
वरून खाली येताना वर जाणारी काही माणसं दिसली. आधी ठरल्याप्रमाणे बायको मुख्य चौकातल्या उपहारगृहात वाट बघत होती. उपहारगृह खच्चून भरलं होतं. आमचं जेवण येईपर्यंत बराच वेळ गेला. आम्हालाही काही घाई नव्हती. जेवण करून पुन्हा रेल्वे स्थानकावर गेलो तर पुढच्या रेल्वेला अजून बराच वेळ होता. पण बाहेर थंडी अजून वाढली असल्याने प्रतीक्षालयातच बसलो. गाडी साडेसहाला आली आणि परत नीसला पोचायला रात्र झाली.
रात्री नाताळ निमित्त केलेल्या सजावटीचे फोटो काढले.
यावर्षी इथे रशियन बाहुल्यांचं प्रदर्शन देखिल होतं.
तिथेच 'A फॉर डॉक्टर' असला काहितरी रशियन मुळाक्षरांचा बोर्डपण होता.
पुढच्या दिवशी सकाळी कान्न (Cannes) ला जायला रेल्वे पकडली. तसं कान्नमध्ये बघायला काही नाही. चित्रपट मोहोत्सवामुळे या गावाचं नाव झालं. असं म्हणतात की, जेंव्हा चित्रपट मोहोत्सव असतो तेंव्हाच कान्नमध्ये बघण्यासारख काही असतं. पण कान्न काय, पिसाचा मनोरा काय किंवा मोनालिसा काय... कितीही 'हे' असलं तरी आपल्या माहितीतल्या गोष्टी बघण्यातच आपल्याला रस असतो. हा चित्रपट मोहोत्सव जिथे होतो ते 'पॅले दे फेस्टिवल ए दे कॉन्गेस्' (Palais des Festivals et des Congrès)ठराविक दिवशीच उघडे असते. तसाही नुसता हॉल काय बघायचा! आम्ही गेलो तेंव्हा तो बंदच होता. मग त्या समोरच्या 'रेड कार्पेट'वरच फोटो काढले आणि मिनी-ट्रेन घेऊन कान फिरलो.
ती ट्रेन रस्त्यावरून जाणारीच होती. सोबत आजूबाजूच्या स्थळांची माहितीही चालली होती. त्यात कुठलेसे प्रसिद्ध हॉटेल त्यात कोण कोण हॉलीवूड तारे-तारका राहिले होते वै.वै. चालू होतं. पुढे ही ट्रेन थोडासा चढ चढून जुन्या कान्नमध्ये गेली. इथे पुन्हा छोटे रस्ते फिकट रंग दिलेल्या इमारती ई. होते. सर्वात वरती एक चर्च होतं. त्याच्या शेजारून अख्खं कान्न बघायला मिळालं.
टूर झाल्यावर आम्ही जेवण केलं. कान्नजवळ एका बेटावर जंगल कम बाग काहीतरी आहे ते बघायला जायचा बेत होता पण बोटीच्या धाक्यावर जाईपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे तिथे समुद्रकिनारी थोडी टंगळ मंगळ करून नीसला परतलो.
आता उद्या दुसऱ्या देशात जायचं होतं! हो, मोनाको (Monaco) हा जगातला दुसरा सगळ्यात छोटा देश. (पहिला वॅटिकन सिटी). क्षेत्रफळ जेमतेम दोन वर्ग किलोमीटर!! नीसहून रेल्वेनी कान्नच्या विरुद्ध दिशेनी गेलं कि अर्ध्या तासात मोनाको येतं. हे शहर समुद्रकिनारी असलेल्या डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे अख्या शहरात बऱ्याच ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जीने आहेत. मोनाको प्रसिद्ध आहे इथल्या फॉर्मुला-१ ग्रॉन् प्री मार्ग आणि मोंटे कार्लो कसिनो साठी. (पार्ल्यानी बिस्कीटाला मोनाको नाव का दिलं मला ठाऊक नाही!) इथेही नेहमीप्रमाणे पहिल्यांदा पर्यटन कार्यालयात गेलो. तिथे बरीच माहिती आणि नकाशे मिळाले. मग बसचे एका दिवसाचे तिकीट काढून (फक्त ३ युरो!!) राजवाड्यात 'चेंज ऑफ गार्ड्स' बघायला गेलो. राजवाडा मुख्य डोंगरापासून वेगळा असलेल्या एका मोठ्या टेकडीवर आहे. बस थांबते तिथेच एक मोठ्ठं मत्स्यालय आहे. हे पण चांगलं आहे म्हणतात. पण आम्ही आत गेलो नाही. या इमारतीच्या मागच्या टेकडीला सरळ कापल्यासारखा कडा आहे, जो सरळ समुद्रात जातो. इथून जुने मिनाको सुरु होते. परत छोटे रस्ते, आकर्षक रंगत रंगवलेली घरं वै. बघत आम्ही राजवाड्यासमोर पोचलो.
राजवाडा काय अगदी लै भारी नव्हता. बाहेर दोन रक्षक पहारा देत होते. बरोबर ११:५५ ला त्यांच्या हलचाली सुरु झाल्या. आतून अजून रक्षक आले. समोरच्या पोलीस मुख्यालयातून ताजे रक्षक आहे. त्यांच्याबरोबर वाद्यवृंद देखील होता. मग त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे जुने रक्षक परत निघून गेले आणि त्यांची जागा नवीन रक्षकांनी घेतली. आम्हीपण नव्या पर्यटकांना जागा करून देऊन उरलेले मोनाको बघायला निघालो.
खालच्या चार फोटोत आख्खा देश येतो!!
जुन्या मोनाकोतून फेरफटका मारला, दुपारची पेटपूजा आटोपून घेतली. पुढे बस घेऊन अनोख्या/विलक्षण बागेत (Jardin Exotique de Monaco) गेलो. ह्या बागेत मुख्यतः निवडुंगाची बरीच वेगवेगळी झाडं आहेत. डोंगर उतारावर नागमोडी वाटा करून आजूबाजूला बऱ्याच वेगवेगळया प्रकारचे निवडुंग लावले होते. कड्यावरून समोर राजवाड्याची टेकडी दिसते.
तसंच उतरत खाली आल्यावर तिथे एक गुहा आहे. दर तासाला त्याची टूर असते. चुनखडीतून पाणी झिरपून तयार झालेल्या या गुहेत उतरायला तीनशे पायऱ्या होत्या. आत सगळीकडून पाणी ओघळत होतं. जसं जसं आत जावं तसं उकडायला सुरवात झाली. त्या क्षारयुक्त हवेचा वास देखील विचित्रच होता. पण मी पहिल्यांदाच अशा गुहेत आलो होतो, त्यामुळे मला चिक्कार आवडली.
आता मोनाको मधलं शेवटाचं ठिकाण, म्हणजे मोंटे कार्लो कसिनो, बघायला आम्ही गेलो. त्याच्यासमोर नाताळनिमित्त चिक्कार सजावट केली होती. तिथे आधी पर्यटकांना आत जाता येतं कि नाही याबद्दल शंका होती. मग चारी बाजूनी चक्कर मारली. सगळ्या भारी भारी गाड्या आजूबाजूला लावल्या होत्या... (त्यातच एक इटुकली स्मार्ट कारपण होती!) मग काही पर्यटकांना आत जाताना बघितल्यावर आम्ही पण आत शिरलो.
प्रवेश फी प्रत्येकी २० युरो होती. आता एवढी गर्दी नव्हती. पहिल्या दालनात सुटाबुटातील लोकं black jack खेळत होते. मी पहिल्यांदाच हे प्रत्यक्ष बघत होतो. त्या खेळाचे नियम मलाही माहिती नाहीत. पण सिनेमात इतक्या वेळेला पाहिलंय कि प्रत्यक्ष पाहताना सिनेमाचे चित्रीकरण बघतोय असंच वाटत होतं. कमीत कमी किती पैसे लाऊ शकता हे प्रत्येक टेबलावर लिहिलेले होते. वीस युरो प्रवेश फी देताना दहादा विचार केला होता, ते आकडे बघितल्यावर तर काढता पाय घेतला. कसिनोची इमारत बरीच जुनी आहे. पूर्वी हे ओपेरा हाउस होते. त्यामुळे भिंतीच काय छतदेखील दगडी मुर्त्या आणि चित्रांनी सजवलेले आहे. (फोटो काढायला बंदी होती) दुसऱ्या दालनात रुलेत (Roulette) होते. इथेही पैसेवाल्यांची चलती होती. एकंदर खेळणाऱ्यांत चिंकी पर्यटक (नक्की कुठल्या देशाचे ते कसे कळणार?!!) भरपूर होते. थोडा वेळ ते बघितल्यावर आम्ही शेवटच्या दालनात गेलो. ते दालन फट असलेल्या यंत्रांनी (Slot Machine) भरलेलं होतं. माझं कसिनोत उडवायचं बजेट ठरलेलं आहे... आख्खे दहा युरो! इथे त्याहून जास्त पैसे प्रवेश करण्यासाठीच द्यावे लागले असल्याने मला अजून पैसे उधळायचे नव्हते.
बाहेर आलो तेंव्हा सगळं मोनाको बघून झालं होतं आणि चिक्कार म्हणजे भयानकच आवडलं होतं. एवढासा देश पण किती वेगवेगळी आकर्षण होती! एक दिवस कसा गेला तेच कळलं नाही. हा एक दिवस आणि कान्नमधला एक दिवस... जमिन आस्मानाचा फरक!!! तरी थंडी असल्याने समुद्रकिनारी आम्ही गेलो नाहीच. रात्री रेल्वेने परत नीसला आलो. उद्या इथला शेवटचा दिवस होता. परवा सकाळी परत घरी निघायचं होतं.
शेवटच्या दिवशी आम्ही कॅसल हिल वर गेलो. वरून नीस आणि सभोवतालचा भूमध्य समुद्र मस्त दिसतो. इथे कोणे एके काळी किल्ला होता. नंतर झालेल्या बऱ्याच लढायांमध्ये तो जमीनदोस्त झाला आता तिथे एक छान बाग केलीये. भरपूर फिरल्यावर जुन्या नीसमध्ये पुन्हा एक चक्कर मारली.
नीसमध्ये अजून एक गोष्ट बाकी होती. परवा रात्री रात्रीच्या नीसचा फोटो घ्यायची संधी हुकली होती. आज मी एकटाच त्या टेकडीवर जाणार होतो. बसनी मधल्याच थांब्यावर उतरलो. खरच निर्मनुष्य रस्ता होता. मधेच एखादा जॉगर टेकडीवर पळत जात होता. बरंच धुकं असल्याने फोटो काही खास आले नाहीत. पण चलता है... नीसचे असेच चांगले चांगले फोटो काय गुगलवर भरपूर मिळतील, त्यापेक्षा माझा अनुभव महत्वाचा!
आता उद्या रेल्वेनी घरी परत! एकंदर खरोखर निवांत मजा करायला यायचं असेल तर नीस उत्तम. भारतीयांना तर खाण्यापिण्याचीही चंगळ आहे. उन्हाळ्यात आलं तर सुर्याहून पिवळं!! या प्रवासात हवामानानी आमची साथ काही दिली नाही. आँथ्रेवोचा एक दिवस सोडला तर बाकी ढगाळ हवा होती. थंडी तर होतीच (डिसेंबरमध्ये उकडायला हे काय ऑस्ट्रेलिया आहे!!) पण मस्त मजा आली.
ह्म्म छान आहे फ्रान्स म्हन्जे
ह्म्म छान आहे फ्रान्स म्हन्जे परिस शिवाय बरेच काहि आहे पहायला हे कळाल
फार सुंदर .. फोटो आणि वर्णन
फार सुंदर .. फोटो आणि वर्णन पण ..
असं सगळं बघायचं असेल तर युरोपात वास्तव्य हवं असं दिसतंय .. उगीच उठून ८-१० दिवसात युरोप ची tour करायची म्हंटली तर अशा जागा बघून व्हायच्या नाहीत ..
मस्त वर्णन आणि फोटोजसुद्धा.
मस्त वर्णन आणि फोटोजसुद्धा. मोनाको आटोपशीर आणि सुंदर दिसतोय. एक भा.प्र. आपल्याइथे म्हणजे भारतात मोन्टे कार्लोचे स्वेटर्स मिळतात, थंडीचा सिझन सुरु झाला की जाहिराती सुरुच होतात, ते इथे मिळतात कां?
मस्त वर्णन. फोटो पण मस्त
मस्त वर्णन. फोटो पण मस्त आहेत.
मस्तच रे !!! छान फोटो आणि
मस्तच रे !!! छान फोटो आणि वर्णन..
सशल म्हणते तसच हे सगळं पहायला युरोपात रहायला हवं..
सुंदर फोटो आणि वर्णन!!
सुंदर फोटो आणि वर्णन!!
जबरीच !!.. फोटो आणि वर्णन
जबरीच !!.. फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
मस्तच! फोटो आणि वर्णन दोन्ही
मस्तच! फोटो आणि वर्णन दोन्ही खूप आवडलं. (तसं ते नेहमीच आवडतं म्हणा!)
पण ते शक्य नाही 
गेंटिंग हायलंड (मलेशिया)च्या कॅसिनोमधेही मला अगदी असंच वाटलं होतं.
प्रत्येक फोटोवर काहीतरी छान छान कमेंट टाकायची इच्छा आहे
ही अशी देखणी पण छोटी छोटी पर्यटनस्थळं त्या त्या देशात रहात असाल तरच बघता येतात. नाहीतर १५-२० दिवसांच्या पॅकेज टूरमधे ते शक्य नाही.
कॅसिनोतली 'चित्रपटांतील दृष्य पाहतोय असं वाटलं' ही टिप्पणी आवडली आणि पटलीही.
(एक जाणवलं - सार्वजनिक ठिकाणच्या फोटोत अगदी क्वचित रस्त्यावरची इतर माणसं वगैरे दिसतात. नाहीतर आपल्या इथे क्राऊडला त्यातल्यात्यात टाळून फोटो काढायचे म्हणजे एक डोकेदुखी असते.)
सॅम नेहमी प्रमाणेच छान...
सॅम नेहमी प्रमाणेच छान...
सॅम, सुरेख !
सॅम, सुरेख !
धन्यवाद!!! सशल, >> असं सगळं
धन्यवाद!!!
सशल,
>> असं सगळं बघायचं असेल तर युरोपात वास्तव्य हवं असं दिसतंय .. उगीच उठून ८-१० दिवसात युरोप ची tour करायची म्हंटली तर अशा जागा बघून व्हायच्या नाहीत ..
बरोबर, इथे राहिल्याशिवाय हे शक्य नाही... तसं आपल्याकडच्या 'काही नामांकित' ट्राव्हल कंपन्या युरोप टुरमध्ये नीस दाखवतात... पण त्यात काही अर्थ नाही... काय पटापट शहरं दाखवत फिरतात ते, जसं काही देवदर्शनाला निघालेत... आपण काय काय 'बघितलं' याचं मानसिक समाधान ज्यांना हवय त्यांच्यासाठी या टुर्स असतात असं माझंतरी मत आहे!!
आऊटडोअर्स,
>> भारतात मोन्टे कार्लोचे स्वेटर्स मिळतात... ते इथे मिळतात कां?
मोनाको बिस्किट प्रमाणेच त्याचा काही संबंध नाही... तो ओसवाल वुलन मिल्स (नहार गृप) चा ब्रान्ड आहे.
ललिता-प्रीति,
>> प्रत्येक फोटोवर काहीतरी छान छान कमेंट टाकायची इच्छा आहे... पण ते शक्य नाही
का नाही... लिही की... रोज एक लिही!
>> सार्वजनिक ठिकाणच्या फोटोत अगदी क्वचित रस्त्यावरची इतर माणसं वगैरे दिसतात.
मुळात इथे लोकसंख्या कमी.. त्यातुन गावातली लोकं फिरायला गेलीच तर जवळच्या बागेत वै जातात, नाहीतर घरीच बसतात. आम्ही गेलो होतो तो पर्यटनाचा मौसम पण नव्हता... नाहीतर उन्हाळ्यात बघायचं सगळीकडे पर्यटकच दिसतात...
अरे मस्त प्रवासवर्णन रे..
अरे मस्त प्रवासवर्णन रे..
अरे सहीच सॅम. मस्त आलेत सगळे
अरे सहीच सॅम. मस्त आलेत सगळे फोटोज.
यातले मी फक्त नीस आणि मोनॅको बघीतलय. कान नाही बघायला मिळाले. मोनॅको सगळ्यात स्वच्छ शहर/देश म्हणून प्रसिद्ध आहे ना. जर्मनी एवढे स्वच्छ असूनही तिथून मोनॅकोला गेल्यावर मला स्वच्छतेत खूप फरक जाणवला होता. पण त्यामुळे सगळं मोनॅको मला खोटा सेट उभा केला आहे असच वाटत होते फिरत असतांना इतके सगळे सुबक आणि जागच्या जागी आहे.
सॅम : खुपच छान प्रवासवर्णन
सॅम : खुपच छान प्रवासवर्णन ...........