ढेरपोट्या आणि मी
अहमदाबादमधल्या कारागिरांनी ढेरपोटे नसलेले गणपती बनवले आहेत आणि ते खपतसुद्धा आहेत. 'फिट' आधुनिक गणपती गणपतीचे(सुद्धा) आधुनिकीकरण... भन्नाट कल्पना आहे ! पिळदार शरीरयष्टीच्या, 6-pack abs असलेल्या गणपतींची ही नांदी आहे. आपल्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब आपल्या देवांमध्येही पडू लागले आहे ही किती रोचक घटना आहे ! कालांतराने दोन्ही दात शाबूत असलेला गणपतीसुद्धा निघेल. तुटक्या दातामागे काहीएक कारण आपण मानतो, ते कदाचित भविष्यात एवढे महत्वाचे वाटणार नाही.... किंवा 'या गोष्टींमागे काही कारण असायलाच पाहिजे' ही मूळ भावनाही कदाचित भविष्यात राहणार नाही. तसेही आता ते पुढे आलेले पोट बदलून आपण त्यामागच्या कारणपरंपरेला टाळले आहेच. नव्या रुपाद्वारे एक नवीन कारणपरंपरा सुरू होईल. हे मला फार interesting वाटतं.
काय कारण असेल असे पोट असण्यामागे ? त्यातून काही सुचवायचे आहे का ? आणि मी तरी 'त्यातून काही सुचवायचे असेलच' असे का गृहित धरत आहे ? म्हणजे प्रत्येक चित्रपट हा 'संदेशदायक' असलाच पाहिजे असा आग्रह तर मी कधी धरत नाही, तीच गोष्ट कथा-कादंबर्यांची... पण देवाची मूर्ती ही त्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे. ते एक प्रतीक आहे आणि प्रतीकाला अर्थ असतोच. म्हणजे आता हे ढेरपोट काय शिकवते असा विचार करणे आले. एरवी उगीच प्रत्येक देवाच्या हाता-पायाचं मी विश्लेषण करत बसत नाही. पण गणेशाची गोष्ट वेगळी... तो आद्य मास्तर आणि आद्य मास्तर असल्याने आद्य शिक्षणतज्ज्ञसुद्धा. अस्सल मास्तर कोण? तर मास्तरकी ज्यांच्या रक्तातच भिनली असते ते. 'शिकवणे/न शिकवणे' हा त्यांच्या लेखी पर्याय नसतो... 'श्वासोच्छवास करणे / न करणे' हा पर्याय असतो का ? तसेच ते. त्यात इथे तर आपण बोलतोय आद्य मास्तराबद्दल... मग त्याची कृत्ये तर जाऊच देत, त्याच्या शरीरयष्टीमधूनसुद्धा तो नक्कीच काहीतरी शिकवत असणार, नाही का ? म्हणून गणेशाच्या ढेरीचा विचार
गणपती बुद्धीदाता आहे आणि विघ्ननाशक, मंगलकारकसुद्धा आहे. मला वाटतं, ही विघ्ने नाश करण्यासाठी ती ढेरी आहे. असे म्हणतात की सर्व विघ्ने, अमंगल असे ते गणपती पोटात घालतो म्हणून त्याचे पोट मोठे आहे. पण हे अर्धवट आहे, त्याच्या मोठ्या पोटाचे कोडे इतक्या सहज सुटणारे नव्हे. गणपती विघ्नांपासून पळून जात नाही, अमंगल असे जे ते तो नाकारत नाही, उलट जे जे अमंगल, अशुभ अशा सगळ्याला तो अक्षरशः तोंड देतो... गणपती ही सर्व विघ्ने, हे सर्व अमंगल खाऊन पचवतो. तो सांगतोय, अरे घाबरू नका, त्यांना सामोरे जा, पण कसे ? त्यांच्याशी युद्ध करून नव्हे, त्यांच्याशी 'लढून' नव्हे. गणपती विरुद्ध अमंगल असा हा लढा नाही... मुळात हा लढाच नाही. अशुभ येणारच, अमंगळ गोष्टी असणारच, 'ते मला स्पर्श करता कामा नये' असे म्हणून त्याला तुम्ही किती दूर ठेवणार आहात ? अणि किती काळापर्यंत ? विघ्नांची अनिवार्यता गणेशाने पूर्णपणे ओळखली आहे. जीवन हे अमंगळासकटच असते हे त्याने जाणले आहे. म्हणूनच ते टाळण्याऐवजी तो ते केवळ अंगावर घेत नाही, तर अंगी भिनवतो, त्या अशुभाला तो स्वतःचाच एक भाग बनवतो, इतक्या टोकाला तो जातो... पण इतक्या टोकाला जाऊनही तो स्वतः मात्र अमंगल होत नाही कारण त्याच्या पोटात ते अमंगल पचवण्याची ताकद आहे. तो कुठल्याही प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो आणि ते सोडवूनही दाखवतो. म्हणूनच ते साधे पोट नसून ती 'ढेरी' आहे... खाण्याच्या आणि पचवण्याच्या अमर्याद सामर्थ्याचे प्रतीक.
त्याचे खाद्यप्रेम हा आपल्यासुद्धा खाद्यप्रेमाचा विषय तेही मोठे सुंदर आहे. विघ्नांना भिडण्याची त्याची पद्धत त्याने काय टोकाला नेली आहे पहा... त्याचे पचवणे हे आपण नावडीची भाजी खाऊन पचवतो तसे नाही, तर तो या गोष्टी आवडीने, मोदक खाव्यात तितक्याच आवडीने, 'खातोय' ! तो हे काम आवडीने करतोय, गरज म्हणून नाही आणि नाइलाज म्हणून तर नाहीच नाही. हे फारच महत्वाचे आहे. तो आवडीने शोधून शोधून या प्रश्नांना सामोरे जात आहे. त्या प्रश्नांना मोदकाचे रूप देऊन गणपती आपल्याला सांगतो, there are no problems, only opportunities. एक प्रश्न सोडवला की त्याचे समाधान होत नाही, त्यामुळे तो मोदक शोधावेत तसे प्रश्न शोधतो. हे तो सातत्याने करत आहे. ते करण्यासाठी आवश्यक ढेरी त्याच्याकडे आहे. त्यामुळेच तो खरोखर मंगलकारक आहे.
त्याची सर्वोच्च दर्जाची बुद्धीसुद्धा त्याच्या या ढेरीशी निगडित आहे. वाईट पचवले म्हणजेच 'वाईट म्हणजे काय ? ते कसे आहे?' हे उमजले. ते जेव्हा उमजेल, तेव्हाच उत्तम काय, भले काय हेसुद्धा उमजेल. गणपती हे करतो. 'हे भले, हे उत्तम' असे त्याने आधीच ठरवलेले नाही , 'भले काय' याचे त्याने स्वयंभू उत्तर काढलेले नाही... तर हे उत्तर त्याने वाईटाला सर्वांगीण समजून मग काढले आहे. असे करणे खूप वळसा घालून असेल, तिरपागडे असेल, पण असे करत असल्यामुळे त्याला जे शहाणपण लाभले आहे त्याला तोड नाही. त्याची बुद्धी श्रेष्ठ का ठरते ? कारण त्याच्या बुद्धीला या शहाणेपणाचा भक्कम पाया आहे. त्यामुळे त्याच्याकडे बुद्धी मागताना आपण वरकरणी जरी 'डिस्टींक्शन मिळू दे' अशी बुद्धी मागत असलो तरी प्रत्यक्षात आपण 'डिस्टींक्शन मिळेल अशी मेहनत करण्याचे' शहाणपण मागत असतो.
म्हणूनच हा उत्सव साजरा करायचा. प्रश्नांचे अस्तित्व स्वीकारणे, प्रश्नांना हातचे राखून न ठेवता सर्वांगाने भिडणे, त्यात स्वतः खचून न जाता, स्वतःच एक प्रश्न न बनता उलट ते पचवण्याची ताकद असणे, अन् हे केल्यावर तिथेच संतुष्टी न मानता परत प्रश्नांना शोधत राहणे, शोधून काढून 'आवडीने' प्रश्नांना भिडणे.... ही प्रक्रिया सतत चालू ठेवणे.... वर्षातले १० दिवस उत्सव होतो तो या वृत्तीचा. वर्षातले निदान १० दिवस तरी बाजूला काढावेत, जेव्हा आपल्याला आपलाच एक आढावा घेता येईल. ही वृत्ती आली का ? नसेल तर अजून काय करता येईल ? हा विचार या दहा दिवसांत करायचा आणि त्यानुसार परत कृतीला सुरुवात करायची. ही वृत्ती किती महत्वाची ? इतकी की कुठलेही काम करताना याच वृत्तीने करावे म्हणून प्रत्येक कामाच्या आरंभाला आपण 'श्रीगणेशा'चे नाव दिले आहे.
गणपतीचे आणि माझे संबंध देव-भक्त असे नाहीत, निदान मला तरी तसे वाटत नाही. प्रतीके मला नेहमीच खुणावतात, त्यात देवांमध्ये तो मला नेहमीच खुणावत आलाय. बहुतेक जणांच्या बाबतीत ओळख होणारा हा पहिलाच देव असतो. लहानपणी पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा हत्तीचे शीर व माणसाचे शरीर हे अद्भुत वाटलं होतं, ते अजूनही वाटते. थोडा मोठा झालो तेव्हा त्याची स्पष्ट दिसणारी ढेरी, त्याचा तुटका दात आणि त्याचे ते वाहन हे सर्व कधीतरी एकदा नोंदवले गेले (तोपर्यंत बघणे व्हायचे फक्त). थोडे कळते झाल्यावर आणखी काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. बुद्धीमत्तेच्या देवतेलाच फक्त असे विचित्र आणि रुढार्थी ओंगळ शरीर का आहे ? वानर आणि शक्ती-युक्ती यांचा संबंध एक वेळ समजू शकेल पण बुद्धीमत्ता आणि असे शरीर यांचा संबंध काय हा प्रश्न नेहमीच पडतो. मंगल-अमंगल, शुभ-अशुभ अशा अमूर्त विचारांचे प्रतीक इतके वैचित्र्यपूर्ण ठाशीव कसे ? हा प्रकार तो विचार व्हावा म्हणून उद्युक्त करण्यासाठी की त्या विचारातले अध्याहृत धोके लक्षात आणून देण्यासाठी ? व्यवस्थित तर्कसुसंगत मांडणीतून शेवटी असे अतार्किक रूप कसे बाहेर येते ? प्रतिष्ठापना करुन नंतर विसर्जनसुद्धा का करायचे ? हे आणि अनेक. थोड्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, बर्याच प्रश्नांची नाही. प्रश्न पाडतोय म्हणून interesting. प्रश्नांचे निराकरण करण्यात तज्ज्ञ असलेल्याने उत्तरांपेक्षा जास्त प्रश्नच उपस्थित करणे हेसुद्धा त्याला साजेसेच. साजेसेच असे म्हणण्याचे कारण हे की गणपतीत अथपासून इतिपर्यंत विरोधाभास ओतप्रोत भरलेला आहे... मानवी जीवनाइतकाच. त्याच्यात आपले प्रतिबिंब नसून तोच आपले प्रतिबिंब आहे. त्यामुळे गणपती मला नेहमीच 'आपल्यातला' वाटत आला आहे.
सपाट
सपाट पोटाच्या गणपतीचा फोटो टाका एखादा...
छान चिंतन
छान चिंतन केलेस रे स्लार्टी.
बाप्पाच्या रूपामागची अशी तर्कसुसंगतता प्रत्येकाने आपापल्या परीने समजावून घेतली, तर आपल्याऐवजी बाप्पाच उत्सव साजरा करेल रे..!
--
हे लिहायच्या दहाच मिनिटे आधी शिवदर्शनचे कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी आले. संपूर्ण ऑफिसभर ते काय काय खाऊन पिऊन आले होते, त्याचा वास पसरला. बटणे उघडी असलेले, अक्राळ विक्राळ दाढीवाले, काळी-जाळीचे बनियन्स घातलेले, पोनी टेलवाले अन बरंच काय-काय-वाले कलाकार होते. कोणत्याही परिस्थितीत वर्गणी देणार नाही, उलट माझ्याकडे काही गरजू लोकांची माहिती आहे, त्यांनाच तुमच्या मंडळातर्फे मदत करा असं मी म्हटलं. पण ते हातघाईवर आले. अनंतचतूर्दशीला तुमच्या काचा फुटतील, असे म्हणू लागले..!
शेवटी मी बाप्पाचं पोट भरपूर मोठं आहे, असं म्हणालो- तेव्हा कुरबूर करीत एकेकाने काढता पाय घेतला.
खुपच सुंदर
खुपच सुंदर विश्लेषण.... पटलं आणि आवडलंही.
स्लार्टी,
स्लार्टी, मस्त लिहिले आहेस. वरच्या तुझ्या चिंतनावरुन मला तरी तुझे व गणेशांचे संबंध गुणसंकिर्तन करणार्या भक्ताचे व देवाचेच वाटत आहेत (तुला वाटत नसले तरी :-)). एक विनंती, असेच त्यांच्या सुपाएवढ्या कानांबद्दल, वाकुड्या सोंडेबद्दल, देत्या घेत्या हातांबद्दल, मुषकाबद्दल पण काही तुला जाणवत असेल तर लिही.
कसले
कसले लिहिलेयस पण खास रे !!!
>>गणपती मला
>>गणपती मला नेहमीच 'आपल्यातला' वाटत आला आहे
छानच!
खुपच छान
खुपच छान लिहिले आहेस, गणपती नेहमीच नवी शिकवण देतो
ढेरपोट्याच्या
ढेरपोट्याच्या उत्सवानिमित्ताने हे आठवले आज.
असे मनातले द्वंद्वरूपी उत्सव आता आपल्याला दुर्मिळच. रस्त्याचौकांतले आवाजी उत्सव सरस ठरू लागलेत. ढेरपोट्याचं पोट दिवसेंदिवस वाढत जाणार असं दिसतंय. असो.
धन्यवाद साजिरा, हे वर
धन्यवाद साजिरा, हे वर आणल्याबद्दल.
सॉलीड आहे की हे, आवडलेच!
सॉलीड आहे की हे, आवडलेच!
<<वाईट पचवले म्हणजेच 'वाईट म्हणजे काय ? ते कसे आहे?' हे उमजले. ते जेव्हा उमजेल, तेव्हाच उत्तम काय, भले काय हेसुद्धा उमजेल. गणपती हे करतो. 'हे भले, हे उत्तम' असे त्याने आधीच ठरवलेले नाही , 'भले काय' याचे त्याने स्वयंभू उत्तर काढलेले नाही... तर हे उत्तर त्याने वाईटाला सर्वांगीण समजून मग काढले आहे. असे करणे खूप वळसा घालून असेल, तिरपागडे असेल, पण असे करत असल्यामुळे त्याला जे शहाणपण लाभले आहे त्याला तोड नाही.>>> जबरदस्त
slarti, >> नव्या रुपाद्वारे
slarti,
>> नव्या रुपाद्वारे एक नवीन कारणपरंपरा सुरू होईल. हे मला फार interesting वाटतं.
माझ्या माहीतीप्रमाणे गणपतीची रूपे वेगवेगळ्या कालखंडात बदलत आलेली आहेत. कोणे एके काळी गणपती धूम्रवर्ण होता, तसेच त्याच्या हातात वेगळी आयुधे होती. नक्की बारकावे आठवत नाहीत. अधिक माहीती सनातन संस्थेच्या गणपती या पुस्तकात सापडेल.
बाकी, उर्वरित लेख आवडला!
आ.न.,
-गा.पै.
स ही च आहे हे. पुन्हा पुन्हा
स ही च आहे हे. पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. साजिरा, धन्यचवाद.
साजिरा, हे वर आणल्याबद्दल
साजिरा, हे वर आणल्याबद्दल धन्यवाद.
हे लिहिले त्याच सुमारास इथे पोस्टी लिहिणे बंद केले होते स्लार्टीने
अरे! मी वाचलंच नव्हतं
अरे! मी वाचलंच नव्हतं हे.
धन्यवाद, साजिरा.
मी पण हे आत्ताच वाचलं. चिंतन
मी पण हे आत्ताच वाचलं. चिंतन आवडलच.
'लंबोदर पीतांबर'... न म्हणता,
'लंबोदर पीतांबर'... न म्हणता, 'six pack shorts' चालीत कसे बसवायचे
सडपातळ पीतांबर म्हणा.
सडपातळ पीतांबर म्हणा.
छान चिंतन केलेस रे
छान चिंतन केलेस रे स्लार्टी.
अनुमोदन. +असंख्य.
सालाबादाप्रमाणे वर
सालाबादाप्रमाणे वर आणण्यासाठी..
(No subject)
स्लार्तीला तर धन्यवाद देउन
स्लार्तीला तर धन्यवाद देउन उपयोग नाही.. राडा तुम्हालाच धन्यवाद
छान चिंतन...
छान चिंतन...