नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षी आम्ही थंडीच्या मोसमात एकतरी मोठा ट्रेक (दोन दिवसाचा)करतो.एक रात्र कुठल्यातरी गडावर राहतो.शहरी रहाटगाड्यापासुन दुर निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो.असाच मागच्या वर्षी हरिश्चंद्रगड अनुभवला होता.पण यावेळी कुठ जायच बर ? यावर आमची बरीच खलबते झाली. बर्याच विचारांती सह्याद्रीच्या रांगेतल्या अनमोल रत्नाला म्हणजे रतनगडाला पारखायच ठरल. रतनगड हा मुख्यत: अहमदनगर जिल्ह्यात येतो.त्याची उंची समुद्रसपाटीपासुन सरासरी ४२५५ फुट (१२९७ मी.) आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग कडेकपार्यात लपलेल्या या गडावरुन आजोबा पर्वत,अलंग,कुलंग,मलंग आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचे दर्शन घडते.नाशिक व नगर जिल्ह्याच्या वेशीवरील भंडारदरा धरण आणि सह्याद्रीच्या गगनचुंबी रांगामध्ये लपलेला रतनगड याची निसर्गाने केलेली मुक्त उधळण पाहण्यासारखी असते.
आता थोडेसे गडाच्या इतिहासाबद्दल जाणुन घेऊया.
इंग्रजांचे राज्य येण्यापुर्वी रतनगडास फार महत्व होते.अलंग,कुलंग,मदन हे किल्ले आणि राजुर,सोकलीचा प्रदेश रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता.इ.स. १७६३ मध्ये जावजी या कोळी सरदाराच्या ताब्यात हा गड होता.कॅप्टन गोडार्डने या किल्ल्यावर १८२० मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळवुन गडावरच आपला तळ ठोकला.पण त्याचा मुक्काम हलताच पूर्वीचा किल्लेदार गोविंदराव याने रामजी भंग्रियाच्या साथिने परत उठाव करुन रतनगड ताब्यात घेतला.
तस या ट्रेकला सात ते आठ जण उत्सुक होते.पण नेहमीप्रमाणे दोन जणांनी वेळेवर टांग दिली.मग शेवटी आम्ही पाच शिलेदारांनी जायच नक्की केल.एक रात्र गडावर राहायच या हिशोबाने सर्व सामनाचे गाठोड (सॅक) बांधले अन प्रवासास सुरुवात केली. तो दिवस होता १२ डिसेंबर २००९.पहाटे ५:५६ ची कसारा लोकल ठाण्यावरुन पकडली.दोन मावळे प्रदिप,संदिप भायखळ्याहुन आणि कुर्ल्याहुन गोपी आधीच स्वार झाले होते.अजुन एक बंदा भावीन डोंबिवलीला आमच्यात सामील झाला.पहाटेचा गार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता.इथे एव्हडी थंडी तर गडावर काय ? या कल्पनेनेच आम्हाला हुडहुडी भरली.थोड्या वेळाने सुर्यदेवाचे धावते दर्शन गाडीतुन झाले.धावत्या ट्रेन मधुन उगवलेल्या सुर्याला कॅमेरात टिपण्यासाठी अनेक प्रयत्न केले.पण प्रत्येक वेळी ग्रहण लागल्या सारखे काही ना काही मध्ये येत होते.शेवटी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो.
लोकलमधुन सुर्योदय टिपण्यासाठी केलेला हा प्रयत्न.
कसार्याला सकाळी पाउणे आठच्या दरम्यान उतरलो.एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते.स्टेशन वर ईडली-चटणी छान मिळते.मग आम्ही त्याच्यावर ताव मारला.येथुन पुढला भंडारदर्यापर्यंतचा प्रवास जीप (ट्रॅक्स) किंवा एस.टी. ने करु शकतो.पण कसार्याहुन अकोल्याला जाणारी बस दोन तासानंतर होती.शेंडी (भंडारदरा)ला जाणार्या जीप मध्ये कसेबसे बसलो.कसेबसे म्हणजे त्यांनी अक्षरशः आम्हाला जीपमध्ये कोंबले.पुढे सुमारे सव्वा तास पायाची हालचाल न करता (तुम्ही कल्पना करु शकता) अवघडलेल्या अवस्थेत शेंडी गावात येऊन पोहोचलो.शेंडी (भंडारदरा) येथे M.T.D.C. चे रिसॉर्ट आहे.तसेच येथुन पुढे १० किमी वर निसर्गरम्य रंधा धबधबा आहे.
येथुन पुढे रतनवाडीला जायला दोन पर्याय होते.एक म्हणजे रस्त्याने आणि दुसरा पर्याय बोटिने भंडारदरा बॅकवाटर ओलांडुन.खर म्हणजे बोटीचा अनुभव म्हणजे एक वेगळीच मजा असते.पण बोटवाला जास्त पैसे मागत होता.येथे आम्ही घासाघिस करुन पाहीली.पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.मग आम्ही स्वतंत्र जीप ने थोड्या कमी दरात पुढील प्रवास करायचे ठरवले.जरी आम्ही जीप ने जायच ठरविले असले तरी बोटवर भरपुर फोटोसेशन केले.
भंडारदरा धरण.......
येथुन पुढे जाणारा रस्ता हा पुर्ण वळणावळणाचा नागमोडी असा आहे.एका बाजुला गगनाला भिडणार्या सह्याद्रीच्या रांगा आणि दुसर्या बाजुला हात-पाय पसरलेला भंडारदरा पाहुन आपण हळुहळु निसर्गाच्या कुशीत शिरतोय याची जाणीव होते.
भंडारदरा बॅकवाटर...
पुढे जात असताना शाळेची मुले दिसली.हा दुर्गम भाग असल्याकारणाने ही मुले घरापासुन दुर आश्रम शाळेत शिकतात.आता सुट्टीला घरी चालली होती असे आम्हाला जीपवाल्याकडुन समजले.त्यांच्या चेहर्यावरचा सुट्टीचा आनंद ओसंडुन वाहत होता.
साधारणतः एक पाऊण तासाने आम्ही गडाच्या पायथ्याच्या गावात रतनवाडीला पोहोचलो.येथे शंकराचे फार सुंदर मंदिर(अम्रतेश्वर मंदिर)आहे. सुमारे १००० वर्षा पुर्वी दगडा मध्ये बांधलेले हे मंदिर म्हणजे
स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाच.हेमाडपंती वास्तूरचनेतील नानाविविध कोरीव कामाच्या शिल्पाने नटलेले हे अम्रतेश्वर मंदिर पाहुन मन प्रसन्न होते.
हजारो वर्षापूर्वी केलेल्या मंदिरावरचे कोरीव शिल्प अवर्नणीय...त्याला तर तोडच नाही.आमच्यातला फोटोग्राफरने मनाला हाक दिली आणि मग आम्ही वेग-वेगळ्या कोनात(अँगलने)मंदिर अणि त्याच्या आजुबाजुच्या निसर्गाला कॅमेरात टिपले.
मंदिरातील घंटा...
मंदिरातील खांब...
शंकराची पिंड...
मंदिरावरील कोरिव काम....
इतक्या आडबाजुला असलेले सुंदर मंदिर आणि शेजारुन वाहणारा प्रवरा नदीचा खळाळता प्रवाह पाहुन मन तृप्त होते.मंदिराच्या थोडे पुढे दगडामध्ये बांधलेली एक पुष्करणी लागली.पुष्करणी म्हणजे दगडात बांधलेली मोठी विहिर.त्यामध्ये गावातील लहान मुले मस्त डुबक्या मारत होती.मंदिर व त्याच्या आजुबाजुचा परिसर पाहुन प्रवासातला सगळा क्षीण निघुन गेला.आता सडकुन भुक लागली होती.रतनवाडी गावात जेवणाची सोय होउ शकते असे गावकर्याकडुन समजले.पण आम्ही प्रत्येकाने आणलेल्या शिदोरी उघडल्या आणि पोटातल्या आगीला शमविले.देवाचे दर्शन घेऊन ट्रेक साठी सज्ज झालो.येथुन गाईड सुद्धा मिळतो.पण आम्ही आमच्या जवळ असलेल्या माहितीच्या आधारे पुढे निघालो.शेवटी गिर्ह्यारोहकाला स्वतःच वाट शोधण्यात मजा असते नाही का?
येथुन पुढे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काठाने निघालो.
म्हशीने पण छान पोज दिली....smile please
पुढचा निसर्ग डोळ्यात आणि कॅमेरात साठवित पुढे निघालो.
मळलेल्या वाटेने तर कधी पाण्याच्या ओढ्याला ओलांडुन पुढे निघलो.
डोक्यावर सुर्य तळपत होता.पण आजुबाजुला असलेल्या झाडीमुळे तो जाणवत नव्हता.आता थोडी चढण लागल्यामुळे सगळ्यांची इंजिन धापा टाकु लागली होती.मग एका झाडाखाली थोडे विसावलो.पाणीरुपी इंधनाने शरीराचे इंजिन शांत केले.पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर पुढची चढाई सुरु केली. थोडे चालल्यानंतर पुढे दोन रस्ते दिसले.आता जायचे कुठे ? या विचाराने थोडे घुटमळलो.मग मी एका रस्त्याने तर भाविन पुढच्या रस्त्याने वाट शोधण्यासाठी पुढे गेलो.
मी ज्या रस्त्याने पुढे गेलो तो रस्ता सरळ वरती जाणारा होता. वरती म्हणजे.......
हो .. पुढे खोल दरी होती.त्या पिवळ्या गवतामुळे दिसत नव्हती.थोडा जरी तोल गेला असता तर....
मग मी मागे फिरलो.तोपर्यत दुसर्या मित्राला मार्ग मिळाला.जवळजवळ पायथ्यापासुन दोन तासानंतर आम्ही एका टेकडीवर पोहोचलो.सगळ्यांच्या अंगातुन जलधारा (घामाच्या) वाहु लागल्या होत्या.येथे आम्ही थोडासा विसावा घेतला.
थोडे पुढे गेल्यावर हिरवळ दिसली.गारवा वाटला.
वाटेवरची ही रानफुले लक्ष्य वेधुन घेत होती.
अजुन बराच पल्ला गाठायचा होता म्हणुन थोडा वेग वाढवला.
येथुन पुढे आमची कसोटी लागली कारण सर्व चढण कठिण होती.थोडी दमछाक झाली खरी पण डेस्टिनेशन जवळ आलेले बघताच थोडा हुरुप आला.
येथुन पुढे दोन लो़खंडी शिड्या लागल्या.फार काळजीपुर्वकरीत्या एका वेळी एकच जण शिडी चढु शकत होता.कारण चढताना शिडी हालत होती. दुसर्या शिडीच्या वेळी पायर्यानी (खडकामध्ये कोरलेल्या)जायचा पर्याय सुद्धा होता.ह्या शिड्या लावण्यापुर्वी या मार्गाने लोक कसे येत असतील असा विचार मनाला शिवुन गेला.
शेवटी एकदाचे आम्ही या छोटेखानी दरवाजावर पोहोचलो. हाच तो गणेश दरवाजा.या दरवाज्याच्या डावीकडच्या काळस्तंभावर गणेशाची मुर्ती कोरलेली दिसली.
पुढे एक छोटासा रॉक पॅच पार करुन आम्ही हनुमान दरवाजा जवळ पोहोचलो.
हनुमान दरवाज्याच्या वरुन आम्ही पुढे गडाच्या माथ्यावर आलो.तेथे दगडात बांधलेली वर्तुळाकार बुरजासारखी रचना दिसली.पण तो बुरुज म्हणजे रानीचा हुडा (महाल) होता.शेवटी साडे-तीन तासाच्या अथक परिश्रमा नंतर गडावर पाऊल ठेवले होते.सुर्य ही कंटाळून मावळला होता.त्यामुळे सुर्यास्ताचे दर्शन काय झाले नाही.आम्ही आमची बुडे खाली टेकवली अणि उरले सुरलेले पाणी घशाखाली उतरवले.गडावरचा निसर्ग पारखत बसलो आणि थोडी फोटोग्राफी केली.गड जरी सर झाला असला तरी मोहिम फत्ते नव्हती झाली.गडावर आम्ही सर्वजण प्रथमच आलो होतो.राहण्याची गुहा(cave) कुठे असतील याची काही कल्पना नव्हती. आता चांगलेच अंधारुन आले होतो.त्यामुळे उघड्यावरतीच झोपायला लागनार की काय? असा सवाल सगळ्यांना पडला.शेवटी गुहा शोधण्याशिवाय काय पर्याय नव्हता.गारवा आता चांगलाच जाणवु लागला होता.मग आम्ही रात्रीचे हत्यार बाहेर काढले.रात्रीचे हत्यार म्हणजे बॅटरी.माझ्याजवळ गडाच्या माहितीची कागद होती.आमची शोधाशोध सुरु झाली. (विचार करा,अशा अंधारात शोधताना एक जरी पाय चुकीचा पडला असता तर...) मी व अजुन एक शिलेदार संदिपनी हे कार्य हाती घेतले.प्रथम मी गडाच्या पुर्वेला एका पायवाटेने सरळ चालत निघालो.पण पुढे जात असताना कमरेएव्हढे गवत लागले.अशा गवतामधुन पुढे चालल्यानंतर एक शेवाळ साचलेली पाण्याची टाकी दिसली.तेथुन पुढे गवताची उंची चार ते पाच फुट होती.पाय पुढे जायला तयार नव्हते म्हणुन मी मागे फिरलो.पण आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे गुहा ही पूर्वेलाच होती.मग शेवटी गुहा सापडली. जेथुन आम्ही हनुमान दरवाजातुन वरती आलो होतो.तेथुनच उजवीकडे जाणारी वाट गुहेची होती.(तेथे लक्षात नाही आले.गड सर केल्याच्या आनंदात आम्ही वरती निघुन आलो होतो.)
अंधारात एकमेकांना आधार देत गुहेपाशी आलो.तेथे दगडात कोरलेल्या दोन गुहा होत्या.एका गुहेत आधीच एका ग्रुपने डेरा टाकला होता.दुसरी आम्हाला योग्य वाटली नाही.त्या गुहेच्या बाजुला अजुन एक छोटीशी गुहा होती.त्या गुहेत श्री रतनदेवीची मुर्ती दिसली.पाच जणांना पुरेल एव्हढी जागा होती.म्हणुन आम्ही मंदिरात राहण्याचा निर्णय घेतला.बाहेर रतनगडाला केव्हाच काळोखाने आपल्या कवेत घेतले होते.राहण्याची सोय तर झाली होती .आता मोर्चा पोटाकडे वळवला.खिचडी-भात करण्याचा प्रस्ताव मांडला. जेवण बनवण्याची कामगिरी गोपिकडे सोपविली.(दुसरा पर्याय नव्हता).तोपर्यंत लाडु ,चिप्स,चिवडा सारखे तत्सम पदार्थ पोटात सरकविले.प्रत्येकाने जेवणासाठी लागणारे काही ना काही साहित्य(भात,तेल,मसाला.....)आणले होते.
इकडे भात शिजत होता तर तेथे प्रदिप अणि संदीपची विकेट पडली होती.(कंटाळुन पसरले होते) मग मी आणि भाविन पाणी आणण्यासाठी बाहेर पडलो.रानी महालाच्या पुढे एका छोट्याशा दरीत दोन पाण्याच्या टाक्या लागल्या.पाणी चांगलेच थंड होते.पाण्याच्या टाकीच्या बाजुला अजुन एका ट्रेकर ने तंबु ठोकला होता.आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या.त्यांच नाव नारायण आणि विशेष म्हणजे ते आपल्या मुलासह ट्रेकिंगला आले होते.त्यांचा अनुभव दांडगा होता.ते हरिशचंद्र गडावरुन मधल्या वाटेने (कात्राबाई खिंडीतुन)रतनगडावर आले होते.त्यांच्या कडुन आम्हाला छान माहिती मिळाली.नंतर पाणी घेऊन आम्ही गुहेवर परतलो.तोपर्यंत जेवण तयार झाले होते.मग काय ... आम्ही त्याच्यावर ताव मारला.
सुर्यास्ताचे दर्शन झाले नाही निदान सुर्योदयाचे तरी व्हावे म्हणुन पहाटे पाचचा गजर लावला.गारवा अजुन वाढला होता.अंगावर चादरी लपेटुन आम्ही गप्पा मारत झोपी गेलो.रात्री कधी तरी ग़जर वाजला म्हणुन आम्ही उठुन बसलो आणि बघतो तर काय पहाटेचे तीनच वाजले होते.गोपिने चुकिचा गजर लावला होता.मनात दोन शिव्या हासडत आम्ही परत लवंडलो.पाच वाजता जाग आली पण बाहेर अजुन काळोखाचेच साम्राज्य होते.मग आम्ही सकाळचा विधी उरकुन घेतला.सुर्य अजुन वर आला नव्हता.पण क्षितीजावर वेगवेगळ्या रंगाची उधळण चालली होती.
हाच तो राणीचा हुडा..
त्या महालावर वेगवेगळ्या कोनात फोटो घेतले.त्यातलाच हा 3 idiots...
शेवटी एकदाचे सुर्यनारायण आम्हाला प्रसन्न झाले.
इकडे आम्ही सुर्याला कॅमेरात टिपण्यात मश्गुल झालो होतो.पण तिकडे त्या idiots नी(माकडांनी) नी आमच्या राहत्या जागेवर हल्ला केला.त्याच काय झाल.... भाविन अंगावरची शाल ठेवायला गुहेपाशी गेला आणि बघतो तर काय माकडांनी त्याची बॅग ओढत गुहेच्या दरवाजापाशी आणली होती.प्रदिप अणि संदिप ची सॅक आधिच उघडी होती.संदिपने आणलेले सफरचंद आणि ब्रेडचे पुडे आणि प्रदिप ची केळी व चिप्स
त्यांनी कधीच लंपास केली होती.सुर्याला तसाच ताटकळत ठेवत आम्ही सर्व गुहेपाशी आलो.पण ते काय मागे हटायला तयार नव्हते.मी त्यांच्या म्होरक्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण तोच आमच्या अंगावर धावुन आला.हिंसेच्या मार्गाने काही साध्य होणार नाही म्हणुन आम्ही शांततेचा मार्ग स्विकारला.बाजीप्रभुंनी जशी खिंड थोपवुन धरली होती.त्याप्रमाणे आम्ही गुहेच्या तोंडापाशी बसुन राहीलो.तो आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होता.पण आम्ही त्याला आत जाऊ दिले नाही.आमच्या नाश्त्याचे त्यानी तीन-तेरा वाजविले होते.भरपुर वेळसुद्धा वाया गेला.मग सर्व सामान पॅक करुन तेथुन आम्ही निघालो.
हेच ते 3 idiots...
रतनदेवीचे मंदिर......
थंडगार पाण्याचे टाके..
शेवटी उरलेसुरलेला चिवडा आणि बिस्किटावरच पोट भागवुन पुढच्या प्रवासास कुच केले.
येथुन पुढे गडाच्या पश्चिमेला मळलेल्या वाटेने आम्ही चालु लागलो.
गडाची ही वाट जणु काय अंगावर पिवळी शाल पांघरलेल्या सारखी दिसत होती.येथुन सह्याद्रीच्या रांगा खुणावत होत्या.
खरच महाराष्ट्राला " राकट देशा,कणखर देशा ,दगडांच्या देशा " का म्हणत असतील याची प्रचिती क्षणा-क्षणाला येत होती.
आपले नाव सार्थ करत उभा असलेला हा आजोबा पर्वत.....
पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर जमिनीत अर्धा गाडलेला कोंकण दरवाजा लागतो.त्याचा प्रवेशमार्ग दगडधोंड्यानी बुजलेला होता.
येथुन पुढे उंच वाढलेल्या गवतातुन जावे लागले.पुढे तर गवताची उंची पाच फुटापेक्षा जास्त होती.चालताना पायाखालचे काय दिसत नव्हते.
येथुन पुढे गेल्यावर कातळकोरीव सहा टाक्या लागल्या.या टाक्या पाण्याने भरलेल्या होत्या.त्यातील पाणी पिण्यायोग्य होते.एवढ्या उंचीवर पाणी पाहुन अचंबा वाटतो.शेवटी काय..
निसर्गाची करणी आणि ....
या टाक्याशेजारुन जाणार्या पायवाटेने पुढे निघालो. पाण्याने भरलेल्या अजुन तीन टाक्या लागल्या.
पायवाटेने जात असताना एकाबाजुला खुप खोल दर्या दिसतात.
(त्या दर्यांमध्येच निसर्गनवल संधन दरी आहे.)
तर एकाबाजुला गडाच्या उत्तर टोकाजवळ असलेली ही कातळ भिंत.....
ही चढण खुप कठीण आणि दमछाक करणारी होती.
हुश्श...एकदाचे पोहोचलो.पाठीवरचे गाठोड बाजुला टाकले आणि वारा खात बसलो. हेच ते गडाचे आकर्षण...या कातळभिंतीला आरपार मोठे छिद्र(भगदाड) पडलेले दिसले.यालाच नेढ म्हणतात.येथे आम्ही थोडा विसावा घेतला.
या नेढ्यात बसायला खुप छान वाटले.येथे सोसाट्याचा वारा वाहत होता.ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखे स्वतःत हरवुन गेलो होतो.
या नेढ्याच्या वरती म्हणजे त्या कातळभिंतीवरतीवरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर म्हणजे काय हे तिथे गेल्याशिवाय समजायचे नाही....
तेथुन आम्हाला हा तुकतुकीत सुळका दिसला.रतनगडाचा खुट्टा नामक सुळका......
येथुन आम्हाला दुरवर बिकट वाट असलेले अलंग,कुलंग,मलंग हे किल्याचे फार सुंदर त्रिकुट दिसले.त्याच्याबाजुला इंग्रजी (W) आकारसुद्धा दिसला. हा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ओळखण्याची खुण्..त्या (W) च्या बाजुला असणारा उंच सुळका म्हणजे कळसुबाई.
रतनगडाचा खुट्टा......
अलंग,कुलंग,मदन या सह्याद्रीच्या रांगेला कॅमेरात टिपण्याचा हा एक प्रयत्न.....तुम्ही निरखुन पाहिल्यास या चित्रात घाटगर प्रकल्पसुद्धा दिसतो.
नेढ्याच्या पलीकडुन खाली जाणारी वाट दिसली.ती वाट त्रंबक दरवाजाजवळ घेउन जाते.त्रंबक दरवाजापासुन खाली सुमारे खडकात कोरलेल्या दिडशे पायर्या लागतात.याच बाजुच्या वाटेने सामुद्र गावात जाणारी वाट आहे.नारायण आणि त्याचा मुलगा त्या वाटेने पुढे निघाले.ते मध्ये एक दिवस थांबणार होते.पण आम्हाला त्याच दिवशी परतायचे होते म्हणुन आम्ही आलेल्या वाटेने परतीच्या प्रवासाला लागलो.
निसर्गाच्या या दर्शनाने भारावुन गेलो होतो.येथुन जायला मन बिलकुल तयार नव्हते पण.......आता परतायचे होते.
खर म्हणजे गड चढताना जो उत्साह असतो.तो उतरताना जाणवत नाही.काही तरी मागे राहिलेय याची खंत सारखी मनाला टोचते.जस आपल्या एका मित्राला सोडून दुर चाललोय असे वाटते.
पण सरतेशेवटी परत येण्यासाठी त्या मित्राला सोडुन दुर जावेच लागेल ना...
असा हा सह्याद्रीच्या रांगेतला अनमोल रत्न रतनगड सर केल्याचा आनंद आणि भरपुर आठवणीची शिदोरी घेउन आम्ही गडाच्या पायथ्यापर्यत पोहोचलो.गड जवळजवळ दोन तासात्(निम्म्या वेळेत) उतरलो.रतनवाडी या पायथ्याच्या गावात पोहोचलो.
हिच ती दगडात बांधलेली पुष्करणी....
तेथे गावातील मुले मस्त पोहत होती.मग मला रहावले नाही.मी आणि संदिपनी पोहण्याची हौस भागवुन घेतली.पाणी खुप थंड होते.पण चांगले होते.पायर्यावर थोडे शेवाळ साचले होते.
गावातल्या मुलाने वरतुन उडी मारली तो क्षण.....
तोपर्यंत भाविनने फोन करुन त्या जीपवाल्याला बोलवुन घेतले.कारण बोटसुद्धा आम्ही येण्याच्या थोडा वेळ अगोदर निघुन गेली होती.बोटीतल्या प्रवासाला पुन्हा एकदा मुकलो.पण हरकत नाही.तेवढीच मजा आम्हाला जीपमधुन जाताना आली.त्याच काय झाल....मी आणि गोपी जाताना जीपच्या टपावरती बसलो.
जस एस्सेल वर्ल्ड ला राइड मध्ये बसल्यावर मजा वाटते तसच वाटल.कारण हा रस्ता पुर्ण वळणावळणाचा नागमोडी असा आहे.मजा तर आलीच पण पार्श्वभागाची पार वाट लागली.
जाताना आजुबाजुच्या निसर्गाला कॅमेरात टिपत पुढे निघालो...
पाणी घेउन जाणारी ही बाई...
बाजुला भंडारदरा तलाव असताना सुद्धा यांना डोक्यावर हंडे घेऊन जावे लागते याची थोडीसी खंत वाटली.यांच्या घराघरात नळ का नाहीत ? असा प्रश्न मनी दाटला.
येथे सगळीकडेच अशी कौलारु घर पहायला मिळाली.
खेड्यामधले घर कौलारु....
आम्ही फक्त मजेखातर गाडीच्या टपावर बसलो होतो.पण ही माणसे आपला जीव मुठीत घेउन रोज प्रवास करतात.पर्याय नाही...
शेवटी एकदाचे आम्ही शेंडी गावात येउन पोहोचलो.येथुन कसार्याला जाणारी बस (अकोल्याहुन येणारी )
साडेपाचला येणार होती.अजुन अर्धा तास बाकी होता.आता मोर्चा पोटाकडे वळविला.मिसळ-पाव आणि चहा पिउन थोडे ताजेतवाने झालो.आज रविवार असल्याने इथला बाजार आटोपला होता.त्यामुळे बसला खुप गर्दी झाली होती.शेवटी एस.टी बरोबर साडेपाचला आली.ती आधीच गच्च भरुन आल्याकारणाने कसार्यापर्यंतचा प्रवास उभ्यानेच करावा लागला.तेथुन लोकलमार्गे सर्वजण आपआपल्या घरी परतले.
असा हा रतनगडाचा रोमांचकरी अनुभव......
खरच महाराष्ट्राला लाभलेल्या ह्या सह्याद्रीच्या रांगा,गड,किल्ले ही निसर्गाची अनमोल देणगी आहे.ती जोपासण्याची आणि टिकवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे.
हा प्रवास येथे संपणारा नाही आहे.ही ओढ अशीच मनात राहील.
तोपर्यंत.................
मस्त फोटो आणि वर्णन. ती तीन
मस्त फोटो आणि वर्णन. ती तीन माकडं किती शाहाण्यासारखी बसलीयेत!!
माझे दुर्गभ्रमण मधेही चालले असते... बाकीच्या किल्यांबरोबर!
खूप छान...
खूप छान...
छान वर्णन व फोटोही. एवढं
छान वर्णन व फोटोही. एवढं वर्णन वाचून मलाही आमचा रतनगडचा अनुभव टाकायचा मोह आवरत नाहीये. लेखकाची माफी मागून.
आम्ही पण रतनगडला जाताना पहाटे-पहाटे च्या MTDC च्या रिसॉर्टला पोहोचलो होतो. तुमच्याचसारखं जीपने रतनवाडीपर्यंत गेलो, अर्थात आम्ही आमच्या गाडीने गेलो होतो. गडावर तुम्ही राहिलात त्याच गुहेत राहिलो होतो असं वाटतंय. रात्री आम्ही मस्त खिचडी व खीर केली होती. त्याच्या पुढे एक मोठी ओपन गुहा आहे नां? आमच्यानंतर एक GS Medical कॉलेजचा मोठ्ठा ग्रूप आला व त्या गुहेत राहिला. सकाळी त्या गुहेतून उतरताना त्यांच्यातल्या एका व्यक्तिचा पाय सरकला व ते पडले. मेडिकल कॉलेजची मुले असल्यामुळे त्यांना लगेच कळलं की फ्रॅक्चर झालंय. मग काय, उतरताना त्यांची खूपच पंचाईत झाली. सॅकला मागच्या बाजूला जी स्टील पटटी असते ते काढून त्यांच स्ट्रेचर बनवलं. पण त्या शिड्यांवरून त्यांना उतरवणं म्हणजे महामुश्किलीचं काम झालं होतं. बराच वेळ गेला त्यांचा त्यात. पण शेवटी यशस्वी झाले. खाली उतरल्यावर आमच्याही पोटात कावळे ओरडत होते, व नूडल्स उरल्या होत्या. मग काय, पाण्याची जागा बघून तिथेच मॅगी केलं. त्याची चव काय वर्णावी.....अहाहा....या आठवणी कधीच विसरणं शक्य नाही. पूर्ण पातेलं चाटून-पुसून साफ करून मगच परतीच्या प्रवासाला लागलो.
मस्तच फोटो आणि वर्णन
मस्तच फोटो आणि वर्णन
़़खुप जुन्या आठवणी ताज्या
़़खुप जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुमच्या लेखामुळे! आम्ही वाय एच ए च्या सार्पास ट्रेक ची तयारी करण्यासाठी आसपासचे ट्रेक करत होतो. त्यावेळी रतनगडला गेलो होतो. फारच मजा आली होती! अम्रुतेश्वराच्या मंदीरात रात्री मुक्काम करुन पहाटे ट्रेकला सुरुवात केली. शिड्यांवरुन उतरतांना खुपच मजा आली. एक किस्सा एका मैत्रीणीचा. ती त्या शिड्यांवरुन उतरायला तयारच नव्हती. सगळ्यांनी तिला खुप समजावले. पण ती उतरेचना. शेवटी तिचा मित्र (आता तिचा नवरा) तिला खालुन ओरडुन म्हणाला, 'तु जर आता उतरली नाही तर मी ईथे कपडे काढायला लागीन' तरी ती तयारच होत न्व्हती शेवटी त्याने शर्ट काढला तेव्हा ती म्हणाली , 'नको नको थांब मी उतरते पण तु कपडे काढु नकोस!' :))
मस्त फोटो आणि वर्णन
मस्त फोटो आणि वर्णन
फोटो नि वर्णन दोन्हीही छान
फोटो नि वर्णन दोन्हीही छान
व्वा! वर्णन अन फोटोचा सान्धा
व्वा! वर्णन अन फोटोचा सान्धा चान्गला जुळलाय!
मस्तच रे भो! झक्कास
जसे कुठल्याही जुन्या मन्दिरातून फोडलेल्या मूर्ति दिसतात तसे साला कोणत्याही किल्ल्यावर जा, इन्ग्रजान्नी केलेल्या विध्वन्साची दृष्ये दिसतातच! वरील लोखण्डी शिडी हा त्याचाच परिणाम!
शाब्बास रे मावळ्या. फोटो आणि
शाब्बास रे मावळ्या. फोटो आणि वर्णन दोन्ही खासच.
मस्त
मस्त
खुपच छान...........
खुपच छान...........
तुझा तुझ्या म्हसी बरोबरचा
तुझा तुझ्या म्हसी बरोबरचा फोटो तर व्वा.. व्वा...वा...
पन का रं म्हस का घिउन गेलतास.
मस्त
मस्त
तुम्ही आतापर्यंत दिलेल्या
तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
प्रथमच मी मायबोलीवर लिहीलेले आहे.त्यामुळे तुम्ही दिलेला प्रतिसाद माझ्यासाठी खुप खुप मोलाचा आहे.
मस्त
मस्त
मस्त वर्णन इथेच जायच घाटतय
मस्त वर्णन इथेच जायच घाटतय आमचं
कविता, जायचं असलं तर लवकरात
कविता, जायचं असलं तर लवकरात लवकर जाऊनच या. एकदा उकाडा सुरू झाला की हाल होतील.
फोटो आणि वर्णन मस्तच... आणि
फोटो आणि वर्णन मस्तच...
आणि हो ते (? ) ३ idiots मस्तच...
मस्त आहे रे हे पण . मी गड
मस्त आहे रे हे पण . मी गड चढण्याच्या बाबतीत "पायलट" आहे . नुसत बघुनच समाधान मानते.
आठवणीतला ट्रेक
आठवणीतला ट्रेक
धन्यवाद.....त्रिवार धन्यवाद
धन्यवाद.....त्रिवार धन्यवाद सर्वांना...
एक आठवण.....
एक आठवण.....
आम्ही ५ ते ६ मित्रांनी पण फार
आम्ही ५ ते ६ मित्रांनी पण फार पुर्वि म्हणजे २० वर्षा रतनगड पाहिला आहे . परन्तु त्या वेळी कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नाही काढता आले . परन्तु तुमचे फोटो पाहुन आठवणी ताज्या झाल्या . अतिशय सुंदर फोटो आहेत . धन्यवाद .
धन्यवाद...बी विजयकुमार...
धन्यवाद...बी विजयकुमार...
वा रोहित!!! दिल खुश हो गया...
वा रोहित!!! दिल खुश हो गया... फोटो आणि वर्णन मस्तच लिहिलेयस...
धन्यवाद .... सानी
धन्यवाद .... सानी
मुळ लेखात अन फोटोत थोडासा बदल
मुळ लेखात अन फोटोत थोडासा बदल केलाय...
आवडतो का ते बघा
रोमा... एकदम जबरदस्त अनुभव
रोमा... एकदम जबरदस्त अनुभव यार....
वर्णन वाचताना आणि फोटो बघताना एक क्षण अस वाटल कि मी पण गडा वर फिरतोय..
खरच खुप छान वर्णन अणि सुंदर फोटो...
धन्यवाद ... दिपक
धन्यवाद ... दिपक
रोहित.. अप्रतिम फोटो,सुरेख
रोहित.. अप्रतिम फोटो,सुरेख वर्णन,रोमांचकारक दृष्यं.. तुझ्यासारख्या मावळ्यांमुळे आम्हाला घरबसल्या दर्शन घडतं .धन्स मनापासून!!
Pages