वाली

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 February, 2010 - 08:36

भुईने पुरावे खुले मांडलेले
नभाशी दुरावे किती वाढलेले

पिपासू घनांचे घसे कोरडे अन
घडे नक्षत्रांचे रिते सांडलेले

उन्हे पेटलेली शिवारास जाळी
चरे नित्य भाळी नवे गोंदलेले

दिसे मृगजळाचे पसारे अधाशी
उडे स्वप्न वेडे, पिसे छाटलेले

झुरावे ? मरावे ? कसे 'नोंद' व्हावे ?
गळा प्रश्न फासापरी बांधलेले

उठे हात दोन्ही, "कुणी होय वाली ?"
अता देव सारे कुठे गुंतलेले ?

गुलमोहर: 

सुंदर !

मस्त.

दिसे मृगजळाचे पसारे अधाशी
उडे स्वप्न वेडे, पिसे छाटलेले

अता देव सारे कुठे गुंतलेले ?
छान.
१-२ लहानसे बदल करुन ही एक सुंदर गझल होईल.

उन्हे पेटलेली शिवारास जाळी
चरे नित्य भाळी नवे गोंदलेले

ऐवजी

उन्हे पेटलेली शिवारा(स) जाळती (उन्हे हे अनेक वचन असल्याने "जाळी" ऐवजी "जाळती" असावे वाटते)
चरे नित्य भाळी नवे गोंदलेले

आणि

दिसे मृगजळाचे पसारे अधाशी
उडे स्वप्न वेडे, पिसे छाटलेले

ऐवजी

पिसे मृगजळाचे; पसारे अधाशी ( "पिसे" "वेड" या अर्थी. इथेही "पसारे" अनेक वचनी आहे आणि "दिसे" एक वचनी म्हणूनही असा बदल असावासा वाटतो.)
उडे स्वप्न वेडे, दिसे छाटलेले

......अज्ञात

कडक

@ अज्ञात,
'पिसे छाटलेले' म्हणजे 'खुरटलेल्या आशा-आकांक्षा असलेले' असे ते वेडे स्वप्न आणि 'वेडे-पिसे' या जोडाक्षरी शब्दातील दोन शब्द दोन वेगळ्या संदर्भांत वापरूनदेखील एकत्र ठेवण्याची सुंदर किमया कौतुकने येथे समर्थरीत्या पेलली आहे. त्यामुळे त्या दोन शब्दांना अलग करणे योग्य नाही, असे मला वाटते.

धन्यवाद !
अज्ञात, 'ऊन' आणि अनेकवचन 'उन्हे' हा प्रकारच मला गंमतीदार वाटतो. यावर मराठीचे जाणकारच भाष्य करू शकतील.
मुळात 'उन्हे पेटलेली' हा एक समुच्चय आहे आणि त्यामुळे ते एकवचनी होते. पर्यायाने पुढचा बदल अनावश्यक ठरतोय. शिवाय 'लगागा लगागा' या वृत्ताचाही भंग होईल.
मृगजळ हे इथे पिसे म्हणून विचारात घेतलेले नाही. 'पाण्याच्या तहानेने आसुसलेल्या जीवाला होणारा भास' हाच अर्थ इथे मी घेतलाय. परिस्थिती बिकट आहे पण इच्छा अजूनही जिवंत आहेत. इच्छांच्या पुर्ततेच्या आशेचा अंधुक आभास हेच ते मृगजळ. हे मृगजळ माणसांच्या जगण्याच्या आशा कायम पल्लवित ठेवते. आपलं ध्येय समोरच आहे या भासात माणूस कायम धडपडत असतो. जवळ पोहोचतो तेव्हा हाती काहीच नसते. ती सगळी धडपड वाया गेलेली असते. तोवर मृगजळाने आयुष्यातला एक भाग खाऊन टाकलेला असतो.
बाकी दुसर्‍या ओळीचे मुल्यमापन अनय यांनी केलेले आहेच.
एकंदरीत, हल्ली मी फारच वैचारिक लिहायला लागलोय अस दिसतय. (इथे नेमकी कुठली बाहुली टाकावी बरे ?)

>उठे हात दोन्ही, "कुणी होय वाली ?"
>अता देव सारे कुठे गुंतलेले ?

खरंच आहे.
एकुणच सुंदर लिहीली आहे.

झुरावे ? मरावे ? कसे 'नोंद' व्हावे ?
गळा प्रश्न फासापरी बांधलेले
>>>>>>>>>>>>>>>>>>>

नेमकी व परिणामकारक मांडणी.

झुरावे ? मरावे ? कसे 'नोंद' व्हावे ?
गळा प्रश्न फासापरी बांधलेले

उठे हात दोन्ही, "कुणी होय वाली ?"
अता देव सारे कुठे गुंतलेले ?

कौतुक,
कवितेची धाटणी आवडली..

मस्त!