शिवाजी महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,
'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’
दिवाळी GTGच्या वेळी निल वेद आणि घारूअण्णांनी जानेवारीतील रायगड प्रदक्षिणेचे सुचोवात केले होते. त्यावेळी उपस्थितांनी सवई प्रमाणे मान डोलववून (आप आगे बढो... हम तुम्हारे साथ है) टाईप होकार दिला होता. मात्र प्रत्यक्षात फक्त सातच मायबोलीकर दिल्या शब्दाला जागले... आणि ते ही पुर्ण रात्रभर जागले... त्याच झालं असं...
९ आणि १० जानेवारीचा दिवस निलने ठरवला होता तो पौर्णिमा गॄहित धरून (२००९ची दिनदर्शिका पाहून), मग शनिवारी ९ तारखेला पहाटे निघण्यापरीस ८ तारखेलाच शुक्रवारी रात्री उशिरा निघुन पहाटेलाच पाचाडला पोहचायचा पिलान फिस झाला... इतक्या रात्रीचा प्रवास महामंडळाचा त्रास सहन करत करण्यापेक्षा एखाद्या SUMO किंवा TAVERA मधून मस्त झोपा काढत पाचाडला पोहचायचं असा मनसूबा होता... घारुच्या मित्रकृपेने SUMOची सोय झाली खरी, पण विनाचालक गाडी... म्हंजी चप्पलेविना ट्रेक...
ते काहिही असो ट्रेकला जायचं म्हंजी जायच... किरूचे Driving प्रेम घारूला ज्ञात होते... लागलीच किरुला चक्रधराची भुमिका पार पाडण्याची गळ घातली आणि किरूनेही मोठ्या मनाने (झोपेचं खोबरं होणार हे माहित असूनही) मान्य केली... सगळ कसं मनासारख पार पडत होतं... मित्राची SUMO, ती पण डिजेल भरून, तिचा चालकही आपलाच, रात्रीचा प्रवास, आवडता रस्ता... आणि काय हवं देवाकडून... फक्त SUMOची टेस्ट ड्राईव्ह का काय ती झाली नव्हती आणि त्यामुळे किरू तिला स्वत:ची WagonR समजून दामटवत होता... कधी हलकेच तर कधी भलतेच धक्के खात आमचा प्रवास सुरू होता...
ब्रेक, क्लर्च, एक्सिलेटर, गिअर, सिडीप्लेअर, टेल लाईट, उप्पर्-डिप्पर असा सगळा सराव करत करत कर्नाळा कधी पार झाला कळलेच नाही... टोल नाका पार करून आमची गाडी खारपाड्याच्या अरुंद पुलावरून जाऊ लागली आणि अचानक किरू जोरात ओरडला "OOOhhhh Ssssssshhhhhhhiiiiiiiitttttttttttt@#$%$&&^%*"
पेंगुळलेले आम्ही घाबरून एकमेकाकडे पाहू लागलो... गाडी पुलावरून पळत होती मग किरू का ओरडला ते समजत नव्हते... “एक्सिलेटर तुटला" किरूने शांततेचा भंग केला आणि आमच्या डोळ्या समोर पुढून येणार्या गाड्यांचे उप्पर्-डिप्पर चमकू लागले... जल्ला एक्सिलेटर तुटायचा होता तो पण या अरुंद पुलावर... गाडी धक्का मारून मागे नेणे शक्य नव्हते... “तरी मी सांगत होतो नारळ द्या म्हणून"... युवराज करवदला... आत्ता???
परिस्थितीच गांभिर्य ओळखून आम्ही सगळे गाडी बाहेर पडलो आणि शक्य तितक्या जोरात गाडीला धक्का मारत पुल पार केला.... हाश्शSSS हुश्शSSS करत एका चौकी पाशी पोहचलो... तिथे गॅरेजची चौकशी केली असता कळले की गॅरेज एक तर मागे टोल नाक्यावर मिळेल किंवा समोरचा १ कि.मि.चा चढ चढून गेल्यावर मिळेल... मागे जाणे तर शक्य नव्हते... मग काय 'वेडात मराठे विर धक्का मारती सात'... मध्यरात्रीच्या थंडीत सगळे मावळे घामाघूम... कसा तरी एकदाचा चढ संपवून आम्ही हॉटेल सहाराच्या आश्रयला गेलो... तिथला गॅरेजवाला फक्त पंक्चर काढण्यात माहिर होता... तुटलेला एस्किलेटर बसवण्यासाठी टोल नाक्यावरून मेकॅनिक आणावा लागेल असे तिथल्या गार्ड ने सुचविले... त्वरीत योगायोग आणि युवराज एका ट्रकने रवाना झाले आणि १० मिनिटांत मेकॅनिकला घेऊन आले... तो पण बहाद्दूर ताप्तपुरती वायर जोडून देतो म्हणला... सकाळी कुढल्याही शहरातल्या गॅरेज मधून नविन केबल टाकून घ्या आणि पुढे जा असा आगाऊ सल्ला दिला...
पाना, वायर, टॉर्च, चावी या खेळात २.३० वाजले आणि गाडी सुरू झाली... कर्नाळ्याच्या घाटात १०च्या स्पिडने जाणार्या ट्रकला ज्या जोषात ओव्हर टेक केले होते, त्यालाच किरू आता ११च्या स्पिडने ओव्हर टेक करू पहात होता... पहाटे ४.३० च्या सुमारास नागोठण्यात आलो... तिथे निलचे बरेच जण ओळखीचे होते, पण एव्हढ्या सकाळी कोणाला त्रास द्यावा याचा विचार करत असताना... टपरीवर गरमा गरम मिसळ खात बसलेल्या निलला त्याचा वर्गमित्र भेटला आणि सगळी सुत्र पटापट हलली... त्या वर्गमित्र रमेशने गॅरेजवाल्या वर्गमित्राला ५ वाजता फोन करून उठवलं... त्या गॅरेजवाल्या वर्गमित्राने त्याच्या हार्डवेअर विकणार्या मित्राला उठवलं... तो बिच्चार झोपेतून उठून १ किमी लांबून बाईकवरून केबल विकायला दुकानात आला... केबल घेऊन आम्ही मॅकेनिक कडे गेलो तर म्हणतो कसा.. "केबलची कॅप का नाही आणली"... झालं परत मागच्या पानावरून सगळं सुरू... दुसर्यावेळी तो दुकान मालक म्हणाला की, "गाडी सुरू झाल्यावरच दुकान बंद करतो आणि अंघोळीला जातो"... कॅप लाऊन गाडी पुर्ण दुरुस्त झाल्याची खात्री झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन गाडी एकदाची रस्त्याला लागली...
पुढे माणगावात निलच्या आजीकडे थांबून वॉशपॉश घेऊन आजीने सुचविलेल्या शॉर्टकटने पाचाडला निघालो... वाटेत टायर मधील हवा कमी वाटली म्हणून २ - ३ ठिकाणी थांबून टायर मधिल हवा चेक करून घेतली. गाडी कधी खड्ड्यातून, तर कधी रस्त्यातून पळत होती. शॉर्टकटची कटकट झाली होती... अंगणात बसलेल्या एका आजोबांना पाचाडचा रस्ता विचारण्यासाठी त्यांच्या घरा जवळ गाडी उभी केली... आपल्याकडे मुंबईचे पाहूणे आले असं समजून बिच्चारे आजोबा आदारातिथ्य करायला गाडी जवळ आले, ते पाहून किरूला वाईच गहिवरून आलं...
Yo Rocksची कमतरता रस्त्यातील दगड धोंडे भरून काढत होते... सकाळी ९च्या सुमारास एका टेकडीच्या वळावर निसर्गाने काढलेल्या धुरकट चित्राचे छायाचित्रण करण्यासाठी थांबलो...
श्वेतसागर
कावल्या बावल्याची खिंड
लिंगाणा
आपण इथेच नाष्टा करूया असे घारूने फर्मान काढले... चटणी आणि ब्रेड काढे पर्यंत गाडीने पुन्हा मान टाकली... बोनेटच्या खाली एक रबरी वायर लटकत होती आणि त्यातून पाण्याचे थेंब टपकत होते... गाडी सुरू करायचा पहिला प्रयत्न फोल ठरला... नशिब बलवत्तर म्हणून दुसर्याच प्रयत्नात किरूने गाडी सुरू केली... आता कुठेही न थांबता तडक मुक्कामी जायचे ठरले... सगळे जण मनातल्या मनात 'आल ईज वेल'ची माळ जपत होते... मागून येणार्या Scorpioला किरूने दिलदार पणे पुढे जाण्यास जागा दिली आणि शेवटाला पाचाडला जिजाऊंच्या समाधी पर्यंत येऊन पोहचलो...
चोरी झालेल्या जिजाऊंच्या पुतळ्याच्या जागी मासाहेबांची तसबिर ठेवली होती... स्वराज्याचे स्वप्न बाळगणार्या राज्यांच्या आऊसाहेबांची ही विटंबना पाहून मन विषण्ण झाले.
गाडीच्या हातापाया पडून तीला रोप वे पर्यंत घेऊन गेलो. तेथेच पार्किंग मधे गाडी लावून कोण कसं जाणार या बद्दल चर्चा सुरू झाली... 'सगळ्यांची दप्तर घेऊन मी आणि किरू रज्जू मार्गे जातो' म्हणत घारूने काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला... पण उर्वरीत मावळ्यानी तो हाणून पाडला... गडावर निघण्या आधी गाडीच्या दुरुस्तीचे काम 'रोप वे'च्या एका कर्मचार्याकडे दिले... इंजिन समोरील फॅनची वायर तुटन वितळून गेली होती... तरीही इथं पर्यंत पोहचल्या बद्दल त्याने आमचे / गाडीचे कौतूक केले... त्याच्या हातात एक हिरवे गांधीजी आणि गाडीची किल्ली टेकवली.. उद्या परत येईतोवर फॅनची वायर बदलून ठेवण्याच्या शब्दावर आम्ही तेथून काढता पाय घेतला आणि गडाकडे कूच केली...
नाना दरवाजा
खुबलढा बुरुजा कडून दिसणारे रायगडचे टकमक टोक...
तोफ
खुबलढा बुरुजा कडून पायर्यां ऐवजी नाना दरवाजातून जाण्याचा बेत घारूला आवडला नव्हता... आम्ही त्याचा एकमताने पराभव केला... नाना दरवाजा कडून मशिद मोर्चाकडे जाताना दहा-पंधरा फुटाचा रॉक पॅच लागला, तिथेही घारूने घुमजाव करण्याचा अयशस्वि प्रयत्न केला... हो ना करता करता घारूला आम्ही अंधारीच्या वाटेने महादरवाजा पर्यंत घेऊन आलोच...
अंधारीकडे जाताना
अंधारी
योगायोग... दुसरं काय
वाटचाल
छत्री निजामपूर
महाद्वाराशी पोहचायला दुपारचा दिड वाजला होता.
गोमुखी दरवाजा
महाराजांना मुजरा करून थकलेले सगळे जिव जोगांच्या विश्रामगृहात निद्राधीन झाले... संध्याकाळी ७ वाजता आकाश निरक्षणाचा कार्यक्रम होता... तसा फोन येताच विशाल, निल, किरू आणि मी निघालो... खासा कार्यक्रम दरबारात असतानाही आम्ही होळीच्या माळाला वळसा घालून तेथे पोहचलो... रोहिणी आणि मृग नक्षत्राची माहिती होते न होते तोच रायगडाचे पहारेकरी आले आणि त्यांनी आमचा रंगात येणारा डाव उधळून लावला...
गाडीची खबर घेण्यासाठी निलने गडाखालील 'रोप वे'च्या कर्मचार्याला फोन लावला. मास्तरांनी फॅनची नविन केबल आणली होती खरी पण ती SUMOच्या नविन मॉडेलची होती... नादुरुस्त गाडी मुंबईला जाणार कशी? सगळे चिंतातूर... या वेळेला निलचे महाडचे काका धावून आले... त्यांनी एका गॅरेज वाल्याचा नंबर दिला... त्याच्याशी १० - १२ वेळा संपर्क करून सकाळी पाचाडला येऊन गाडी ठिक करण्याचे आश्वासन घेतले...
युवराजला काही अपरिहार्य कारणामुळे दुसर्या दिवशी सकाळी लवकर जाणे भाग होते... म्हणून त्याच्यावर गाडीची सगळी जबाबदारी सोपवून आम्ही दुसर्या दिवशी सकाळी रायगड प्रदक्षिणेला निघालो... मेणा दरवाज्यातून प्रवेश करत सात महाल, पालखी दरवाजा, राजांचा महाल, मेघडंबरी, नगारखाना करत कुशावर्ताकडे आलो.
नगारखाना
मेघडंबरी
महाराजांचा महाल
सात महालाचे मनोरे
सज्जातून दिसणारे जग्दिश्वराचे मंदिर
तेथेच सोबत घेतलेली न्याहरी उरकून वाघ दरवाजा कडे निघालो... पण रस्ता कुणालाच माहीत नव्हता... वाघ दरवाजा शिवाय रायगड प्रदक्षिणा पुर्ण होणार नाही हे माहीत होते... पण जायचे कसे??? मावळे हार मानणारे नव्हते... योगायोगने होळीच्या माळावर जाऊन एक शाळकरी गाईड ५० रुपयाच्या बोलीवर घेऊन आला... उतरणीच्या वाटेवरून १०- १५ मिनिटांत त्याने आम्हाला वाघ दरवाजात आणून सोडले... दरवाजा संपताच समोर खोल दरी होती... योगायोगने थोडं खाली जाण्याचं धाडसं केलं... योगाचं धाडस पाहून घारूही उत्साहात उठला आणि त्याच उत्साहात खाली बसला... समोरील दरीचे आणि पुठ्ठ्याच्या डोंगराचे छायाचित्रण करून आम्ही बार टाकी कडे निघण्यासाठी मागे वळलो..
वाघ दरवाजा
वाघ दरवाज्या समोरील दरीकडे सरकणारा योगायोग
बार टाकी कडे जाणारा रस्ता जरा बेरकीच होता... घारू प्रत्येक ठिकाणी योगायोगची मदत घेत पुढे सरकत होता.. एक सुकलेला ओढा ओलांडून आम्ही दारूकोठाराच्या टेकडीवर पोहचलो... तेथून वाघ दरवाजाची भिषणता अधिक जाणवत होती...
दारूकोठार?
बार टाकीचे थंडगार पाणी पिऊन पुढे जगदिश्वराकडे निघालो...
बारा टाकी
शिल्प
जग्दिश्वराकडून दिसरणारा नगारखाना...
शिलालेख
जगदिश्वराचे मंदिर
जग्दिश्वरा समोरील नंदी
महाराजांची समाधी
जगदिश्वर, बाजार पेठ येथे सुरू असलेले काँक्रिटीकरण पाहून फार वाईट वाटले...
घाऊक बाजारपेठ
बाजारपेठेतील जोते
पुढल्या वेळी हिरकणीला जाऊ असे मनाला समजावत आम्ही रज्जू मार्गे उतरण्याचा कठोर निर्णय घेतला...
५ मिनिटात गडउतार झाल्यावर आधी गाडीची खुशाली तपासली... एव्हाना सगळेच भुकेने बकूळ झाले होते... जे रोप वे च्या कॅन्टिंग मधे मिळाले नाही ते बाहेरील एका टपरीवर मिळाले... तिख्खटं ठेच्च्यात बनवलेल गरमा गरम आमलेट पाव... WOW!!! खास या आमलेट पाव करीता एखदा तरी रोप वे ला भेट द्यावी... वडापाव-आमलेट पाव असे मिनी जेवण पार पाडून गाडी मुंबईच्या दिशेने सुसाट निघाली... वाटेत माणगांवला 'आनंद भुवन' मधे चिकन हंडी, काजू मसाला आणि मुहंतोड-पान खाऊन संतुष्ट मनाने ढेकर दिले...
घारूने गाडीत बसण्या आधीच जाहिर केले की मी आता मागिल सिटवर जाऊन झोपणार... पण गाडी आणि किरूच्या ओव्हर टेकिंगच्या कौशल्यामुळे त्याला झोप लागेना... "किरू एक वेळ टेक ऑफ कर... पन ओव्हर टेक नको रे..." अश्या भयानक सूचना मागून येत होत्या... या वेळी आमची गाडी अगदी गुणी बाळा सारखी सरळ जात होती... तर समोरचा यस्टीवाल्याची ब्रेक लाईट बिघडली होती... त्यामुळे ओव्हर टेकिंगला त्रास होत होता... एव्हढा त्रास ट्रेकिंगमधे पण झाला नव्हता... ईती किरू.
वा.... भ्रमणमंडळाचा टांगा तर
वा.... भ्रमणमंडळाचा टांगा तर सुटला..... आता इऊ द्या फटाफट फुडचे ठेसन.....
अबे जरा मोठे मोठे भाग लिहि
अबे जरा मोठे मोठे भाग लिहि की.
लिवलस भारी. मला सुमो ढकलणारे मायबोलीकर दिसले.
त्यावेळी किरु खुश होता काय??
केवढा लहान भाग आहे हा इंद्रा!
केवढा लहान भाग आहे हा इंद्रा! वाचायला सुरुवात केली म्हणता म्हणता संपला!
सुरूवात तर मस्त केलीये
सुरूवात तर मस्त केलीये लिखाणाची आता पुढचा भाग पण असाच येवुन द्या.
शैलजा
अग किरू अकराच्या स्पीड नी जातोय, एवढ्या स्पीडनी गेल्यावर जेवढे अंतर ते गेले तेवढासाच भाग टाकलाय इंद्राने, हो ना इंद्रा?
इंद्रा भारी सुरवात. आतापुढच
इंद्रा भारी सुरवात. आतापुढच लवकर लिही.
आणि काय रे विश्वेशला तो ट्रेक नाही ट्रिप आहे अस ए चा इ करुन कोणि सांगितल? काही हरकत नाही त्यामुळे त्याच रायगड बारगळल आणि आमचा गोरखगडचा ट्रेक झाला
किरू तिला स्वत:ची WagonR
किरू तिला स्वत:ची WagonR समजून दामटवत होता >> , इथेच चुकले
मस्त.. पुढचा भाग पटकन येउदे
इंद्रा, लय भारी.
इंद्रा, लय भारी.
इंद्रा, अरे पुढचा भाग कधी
इंद्रा, अरे पुढचा भाग कधी टाकतो आहेस?
कविता,
आम्ही स्वतंत्र गाडी करुन जाणार आसल्याने ही ट्रीप आहे, ट्रेक नाही असा शोध खुद्द विश्वेशनेच लावला होता...
अस झाल होय होता है वो भले के
अस झाल होय होता है वो भले के लिये त्यामुळे आमच गोरख तरी झाल नाहितर तुमच्या ऑल बॉईज ट्रेक मुळे आमचा बायकांचा ट्रेक कँसल झालेला
हे सात वीर कोण कोण होते?
हे सात वीर कोण कोण होते?
जल्ला तुम्हीलोक्स धमाल
जल्ला तुम्हीलोक्स धमाल सुरवात !
मंजु, ते सात वीर... मी, किरु,
मंजु,
ते सात वीर... मी, किरु, घारु, इन्द्र, युवराज (स्वप्निल), योगयोग आणी माझा मामा विशाल.
इंद्रा मस्तच, येऊन
इंद्रा मस्तच, येऊन दे,
तिथल्या मेकॅनिकला काय काय मस्का मारलाय हे आठवल्यावर आता हसु येत आहे.
(No subject)
इंद्रा, रात्रीच्या थंडीतली ती
इंद्रा, रात्रीच्या थंडीतली ती धक्का ट्रिप आठवली.
किरु, तुला काल पासुन फोन
किरु, तुला काल पासुन फोन करतोय... उचल ना...
इंद्रा एस्किलेटर आता ठिकठाक
इंद्रा एस्किलेटर आता ठिकठाक झालाय. तुमची लेखणी सुसाट सोडा आता. अशीच अडखळली तर बाकीच्या सहा जणांना लेखणी हातात घ्यावी लागेल.
इन्द्रा फोटु बिटु नाय टाकले
इन्द्रा फोटु बिटु नाय टाकले रे???
भारी लिवलस.
इन्द्रा मस्तच!! पुढचा भाग
इन्द्रा मस्तच!! पुढचा भाग लवकर येऊ द्यात (फोटोसहित)
फोटोची लिंक सुरवातीलाच दिली
फोटोची लिंक सुरवातीलाच दिली आहे... 'रायगड प्रदक्षिणा' आणि 'समाप्त'वर टिचकी मारा...
जोरात झाला की ट्रेक एकदम ....
जोरात झाला की ट्रेक एकदम ....
लै भारी! फोटो मस्त.. पण
लै भारी! फोटो मस्त.. पण शेवटची लिंक सहिये!!
भारीच झाली की
भारीच झाली की प्रदक्षिणा..
जल्लां रोप वे ने खाली आले हे लोकं.. त्याला ट्रेक काय म्हणतेस आरती
मंजे, वरती जाताना सगळे रोप
मंजे, वरती जाताना सगळे रोप (दोर) कापले होते आमच्याकरता..
मस्तच.
मस्तच.
मस्त रे इंद्रा.. फोटो पण सही
मस्त रे इंद्रा.. फोटो पण सही आहेत आणि शेवटची लिंकही
इंद्रा, लय भारी तुमची सुमो
इंद्रा, लय भारी तुमची सुमो रायगडवारी .
फोटो तर एकदम भारी , रायगडावर १० वर्षापुर्वी गेलो होतो त्या आठवणी परत जाग्या झाल्या .
लेख आणि फोटो मस्त
लेख आणि फोटो मस्त
आरे फोटो अपलोड करा ना
आरे फोटो अपलोड करा ना रायगडचे, केले असतील लिंक पाठवा.
बाकी लेख झकास झाला आहे.
विधाता पहिल्या ओळीत " रायगड
विधाता पहिल्या ओळीत " रायगड प्रदक्षिणेचे " वर क्लिक केलत तर पिकासामध्ये फोटो दिसतील .
Pages