काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
डोळ्यांच्या कडा ओलावण्याचे अनेक प्रसंग.. पण अत्यंत संयतपणे हाताळल्याने "पुढे काय?" ते पाहायला प्रेक्षक तयार असतो. एक कलंदर, जिगरबाज व्यक्तिमत्व.. कलेचा ध्यास घेतलेलं.. परिस्थितीपुढे झुकायची वेळ येताच स्वतःच्या हिमतीनं उभं राहणारं.. स्वतःच्या कलेचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता लोकांचं भलं व्हावं असा निरागस उद्देश असणारं.. वेळच तशी आली म्हणून कलेच्या या होमात स्वतःची आहुती द्यायला मागेपुढे पाहत नाही.. पण या भावनेच्या भरात, वेडात घेतलेल्या उडीची जबर किंमत त्याला द्यावी लागते.. आयुष्यभर्..एकट्याला.
अतुल कुलकर्णीच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पैलवान गुण्या ते 'मावशी' हा दोन टोकांचा प्रवास त्यानं इतक्या जबरदस्त ताकदीनं पेललाय की तो बदल पाहता पाहता भान हरपतं. एका वाघाची शेळी झालेली पाहवत नाही , मन हेलावतं. सहानुभूती , कणव वाटतेच पण त्यापेक्षाही त्याचं कौतुक, त्याच्या जिगरला द्यावीशी वाटणारी दाद जिंकून जाते. आणि हेच दिग्दर्शकाला अभिप्रेत असावं. अतुलने त्याच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. कल्पनेपलीकडचा अभिनेता डोळ्यांसमोर साक्षात उभा केला आहे. या ग्लॅमरस जगात येण्यासाठी, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या, स्वतःला 'अभिनय' येतो असं समजणार्या हौशी कलाकारांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!
अजय अतुलच्या संगीताची तर आधीच इतकी प्रसिध्दी झालेली आहे त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगणे न लगे! सोनाली कुलकर्णी सारखी देखणी , लावण्यमयी अभिनेत्री मराठीला लाभली हे आपले भाग्यच! अमृता खानविलकर पाहुणी कलाकार म्हणून 'आता वाजले की बारा' गाण्यात आहे. ही गाणी ऐकायला जबरदस्त आहेत. पण शीर्षकगीत 'नटरंग' सिनेमात जितकं 'जाणवत' नाही तितकं ऑडिओ सीडी ऐकताना वेड लावतं. यातला ढोलकीचा ठेका इतका दिलखेचक आहे की त्याच्या 'तटकारा' बरोबर अंगावर काटा फुलतो. हे गाणं एकदा तरी ऐकाच. गुरु ठाकूरची गाणी नेहमीप्रमाणेच अचूक शब्दांची उधळण करणारी. गुरु ठाकूर सिनेमातही आहे. गुणा ज्याच्या मळ्यात काम करत असतो तो पाटील म्हणजे गुरु. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिल्याने चित्रपट कुठेच 'कमी पडलाय' असं वाटत नाही. तरीही तमाशावर चित्रपट आणि त्यात 'गुणा' हा शाहीर ..तर एक "सवाल जवाबाची बारी" असती तर अजूनच चार चांद लागले असते असं वाटलं. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, जो चित्रपट इतका जबरदस्त आहे त्याची मूळ कथा डॉ. आनंद यादवांची 'नटरंग' ही कादंबरी काय चीज असेल हे पाहण्यासाठी तरी मी ती वाचायला उद्युक्त झाले आहे!
झी टॉकीजने असेच एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढावेत, त्यांची याहून जास्त जाहिरात करुन प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात खेचून घ्यावा अशा शुभेच्छा! असे जर 'अतुल गुणवंत नटरंग' मराठीमध्ये असतील तर मराठी चित्रपटाला, नाट्यभूमी, लोककलेचा सुवर्णकाळ येतोय असं म्हणायला हरकत नाही!
ए नाही. २०१० ची अवॉर्ड्ज
ए नाही. २०१० ची अवॉर्ड्ज जाहीर व्हायची आहेत अजून. ही ३० ऑगस्ट २००९ला जाहीर झालेली अवॉर्ड्ज आहेत. काल पुनःप्रक्षेपण होतं.
ही लिंक- http://www.youtube.com/watch?v=CnnfO-o0Q9o&feature=related
मी पण पाहिला नटरंग. मस्त आहे.
मी पण पाहिला नटरंग. मस्त आहे. आणि निर्मिती सावंतच कालंच नृत्य (?) सुद्धा
परी़क्षण वाचल्यानंतर चित्रपट
परी़क्षण वाचल्यानंतर चित्रपट पहायचा असे ठरवलेच होते. काल तो योग आला. मल्टीप्लेक्सला पैसे घालवण्यापेक्षा नीलायमला पहावा असे ठरवले होते. तिथेही ब्लॅक चालू होती ( मराठी चित्रपटाला खरंच चांलगेल दिवस आलेत ). नीलायमची ध्वनीयंत्रणा चांगली आहे. पहिल्या फ्रेमपासून चित्रपट पकड घेतो हे खरंच आहे. गाणी सुरू झाल्यानंतर शिट्ट्या ऐकून जुन्या काळाची आठवण झाली... मल्टीप्लेक्सला ही वातावरणनिर्मिती नाही ! संवाद एकदम खटाखट.... तिथेही हशा आणि शिट्ट्या !
सुरूवातीचा पैलवान गुण्या झक्कास !
गावची वातावरणनिर्मिती तर अफलातून आहे आणि नीलायमच्या भव्य पडद्यावर ती पाहतांना हिंदी चित्रपटापेक्षा एकही फ्रेम कुठेच कमी पडत नाही. अफलातून छायाचित्रण आहे.
विहिरीवर मोटर बसवल्याने बेकारीची कु-हाड कोसळलेल्या मजुरंचे चेहरे दाखवतांना मोटेचा दोर वेडावाकडा होत रहाटापासून वेगळा होत खाली पडतानाचे दॄश्य जबरदस्त ! अंगावर येणारे. या अशा सुरूवातीमुळे आणि एकंदरच झालेल्या जाहिरातीमुळे चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या जातात. सुरूवातीला मला जाऊ द्या ना घरी हे चित्रपट कानांना आनंद देऊन जाते. पडद्यावर अमॄता दिसलीये छान , पण सादरीकारण अजून चांगले करता आले असते असे वाटले. तमाशाचे स्टेज लहानसेच असते हे खरंय..पण सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्यास प्रेक्षकांनी कुरकूर केली नसती ! ( वैयक्तिक मत आहे मित्रांनो )..
चित्रपट तमाशाभोवती असणार हे माहीत असते. तसेच मुख्य कथानक पैलवानाची मावशी बनणे याभोवती काहीतरी असावे याचीही कल्पना असते..तरीही कथेची कल्पना नसते. या कथेतील (कि चित्रपटातील) जो आत्मा आहे तोच नेमका न पटल्याने पुढे चित्रपटाचा आनंद घेणे शक्य होत नाही. केवळ सहा महिन्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून नाच्या व्हायला तयार झालेला गुणा पहिलवान होण्यासाही घेतलेली अनेक वर्षांची मेहनत जाऊ द्यायला कसा तयार होतो हे प्रभावीपणे सांगता आलेले नाही. पहिलवानाला असलेली मस्ती, अभिमान पाहता हे अशक्य आहे !
कलाकारांची कामे उत्तम ! अतुल कुलकर्णीच्या कामाबद्दल खूप बोलले गेलेले आहे. त्यामुळे पुनरूक्ती करत नाही ..पण पांडबाचे काम किशोर कदम ने ज्या झोकात केलेय त्याला तोड नाही. अगदी मिश्री लावण्याचा प्रसंग असो, किंवा तांब्या घेऊन तोंड धुण्याचा... बारीकसारीक तपशील त्याने जबरदस्त ताकदीने उभे केलेले आहेत. जग पाहून आलेले असे पांडबा प्रत्येक क्षेत्रात असतात.. ते स्वतःला प्रॅक्टीकल समजतात ..त्यांच्या लेखी भावनांना स्थान नसते. काम असले कि या मंडळींमध्ये काहीतरी संचारते आणि मग कसालाही विधीनिषेध न बाळगता ते पूर्ण करणे हाच याम्चा खाक्या असतो.. अर्थात फसवणे हा काही त्यांचा उद्देश नसतो. किशोरने हे इतके जिवंतपणे उभे केले आहे कि गुणापासून त्याचा बाप मेल्याची माहीती दडवून ठेवल्याचे स्पष्टीकरण तो देत असताना त्याच्या देहबोलीला आणि अभिनयाला शिट्ट्या पडतात आणि हशा पिकतो.
नाच्यावर बलात्कार होण्याचा प्रसंग अंगावर येणारा आणि अनावश्यक वाटला. पौरूषत्वाचे इतके धिंडवडे पडद्यावर निघतात कि नको वाटते ते बघणे .. गुण्याचा सासरा, तमाशा परिषदेचा अध्यक्ष ही पात्रे झक्कास !! विशेषतः गुण्याच्या सास-याचे रोखठोक वागणे वास्तवात नेऊन सोडते तर गुण्याचे वागणे कुठेतरी वेडाच्या पातळीवर ! अशा दोन पातळ्यांवर सिनेमा चालतो आणि हे बेअरिंग सांभाळायला गुण्ञाचे नाच्या होणे हे अधिक प्रभावीपणे सादर होणे गरजेचे होते असे वाटते
खूप आवडला 'नटरन्ग'. मला पण
खूप आवडला 'नटरन्ग'. मला पण नाच्यावर बलात्कार आणि एकूणच राजकारण घूसवलेल वाटल. त्याशिवायही चित्रपट उत्क्रुष्ठच झाला असता.
काल पाहिला आणि खूप
काल पाहिला आणि खूप आवडला.
प्रसिद्धी अगोदरच खूप झाली होतीच. त्या प्रसिद्धीत झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमामध्ये कुणीतरी गायलेली लावणी 'जाऊद्या ना घरी' याचासुद्धा फार मोठा सहभाग आहे हे लोक विसरलेले दिसतात.
<<<पण नाच्यावर बलात्कार आणि एकूणच राजकारण घूसवलेल वाटल. त्याशिवायही चित्रपट उत्क्रुष्ठच झाला असता. >>>
मला तसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे तसं राजकारण घडताना मी वीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात पाहिलेलं आहे. आणि नाच्या म्हटला की तो 'त्यातलाच' असणार हे गृहित धरलं जातं. कितीतरी मुलांवर बलात्कार होतात आणि त्यांचं आयुष्य उध्वस्त होतं हे सुद्धा एक सत्य आहे.
<<'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे किंवा 'थ्री इडियट्स' मधल्या आमिरच्या अभिनयाचे, देहबोलीचे कौतूक ज्यांना वाटत असेल, त्यांनी अतुलचा हा 'नटरंग' जरूर बघा.>> साजिराचं हे मला १०० टक्के पटलं. हे तिन्ही चित्रपट मी पाहिले पण हा विचार मनात आला नव्हता. आता तो जागृत झाला. साजिरा, धन्यवाद.
शरद
केवळ सहा महिन्यांची मेहनत
केवळ सहा महिन्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून नाच्या व्हायला तयार झालेला गुणा पहिलवान होण्यासाही घेतलेली अनेक वर्षांची मेहनत जाऊ द्यायला कसा तयार होतो हे प्रभावीपणे सांगता आलेले नाही >>
तो गुणा रोज तालमी अन कुस्त्या खेळणारा अन वर्षानुवर्षांच्या खुराकावर 'तयार' झालेला पहिलवान नसून पोट भरण्यासाठी शारिरीक कष्ट करावे लागल्यामुळे तयार झालेला आहे. हे कष्टाचं काम जेव्हा सुटतं, तेव्हा इतर काहीही काम न येणारा पण 'तमाशा' या कलेवर भरभरून प्रेम करणारा हा माणूस दुसरं काय करणं अपेक्षित आहे? तेही अख्खा फड उभा राहिलाय, पण 'नाच्या' शिवाय काम पुढे सरकत नाही- हे बघितल्यानंतर?
इतर ढोबळ चूका नक्कीच आहेत. पण पैलवानाचा नाच्या होणे हे मात्र अतिशय ताकदीने दिग्दर्शकाने आणि कलाकारानेही दाखवले, उभे केले आहे.
दिनेश, मी अद्याप नटरंग पाहिला
दिनेश, मी अद्याप नटरंग पाहिला नाही. यादवांची कादम्बरीही वाचली की नाही आठवत नाही. कारण याच विषयावर यादवांचीच 'कलेचे कातडे' हीही कादम्बरी आहे. ती मी वाचली आहे. त्यात नायकाला सोंगाड्या व्हायचे असते.
तमाशा महाराष्ट्रात पेशवाईपूर्व काळापासून आहे.पेशवाईत तिला राजाश्रय मिळाल्याने तिची भरभराट झाली. पूर्वीपासूनच तमाशाला स्त्री कलावन्त मिळत गेल्या.कारण मुळात हा कलाप्रकार मागास वर्गीय कलाकारानी चालवला. पेशवेकाळात होनाजी बाळा, सगन भाऊ ,अशा ब्राम्हण कलाकारामुळे त्याला थोडी प्रतिष्ठा मिळाली पण त्यांचे कर्त्रुत्व लावणी व वग लेखनाइतकेच होते.पठ्ठे बापूराव हे मात्र कलाकार आणि फडमालक दोन्हीही होते. पठ्ठे बापूरावाना तमाशातले 'बालगंधर्व ' म्हणायला हरकत नाही. दोघांची कलानिष्ठा वादातीत आणि दोघांचाही शेवट तसा विपन्नावस्थेतच. आजही तमाशातल्या गाण्यात पठ्ठे बापूरावांचा 'तखल्लुस' अल्यावर तमाशा कलाकारांचे हात अभावितपणे जोडले जातात. समाजातील कनिष्ठ स्तरावरील मुलाना तेव्हा तरी पोट भरण्याची विद्या काही नसायची. या समाजात संगीत गाणी उपजतच असायची. इतकी की एक जुनी म्हण आहे
' बामणाच्या घरी लिवणं
कुणब्याच्या घरी दाणं
महाराच्या घरी गाणं '
अशी मुले बहुधा तमाशात जात्.त्यातील ज्याना नाचाचे अंग असे त्या कोवळ्या मुलाना नाच्याचे काम दिले जाई.पुढे अनुभवाने अभिनयाचे अंग असल्यास वगात काम दिले जाई. प्रवेशातच वगात काम मिळणे शक्य नसे कारण शिक्षण नाही. पाठान्तर नसे इ. मराठी नाटाकात नाटकासाठी कुलीन स्त्रिया मिळत नसत म्हणून पुरुषानी स्त्री भूमिका कराव्या लागत अशी स्थिती तमाशात कधी नव्हती.
नाच्याची कामे करणारे पुरुष सगळे अथवा बरेचसे तृतीयपंथी होते हे साफ चूक आहे. त्यांचे मॅनरिझम तसे असत. गणपत पाटलांचा तर चांगला संसार झाला. चंद्रकांत ढवळपुरीकर नुकतेच वारले. ते उत्कृष्ट नट, फडमालकही होते. पण त्याची सुरुवात नाच्या म्हणूनच झाली. नाच्या म्हनजे तमाशातली बिगरीच म्हणा ना.
सुरेखा पुणेकर, काम्बीकर, नगरकर, खुटेगावकर या बारीवरील कलाकार आहेत. तमाशातल्या नव्हेत.
तमाशात केवळ लावण्याच नसतात. पोवाडे, भावगीते, विरहगीते,लोकगीते सर्व प्रकार कथेच्या अंगाने उलगडत जातात.खरे तर तमाशा हा स्वतंत्र बीबी चा विषय आहे. कोणतीही लिखित संहिता नसताना अशिक्षित कलावंतानी ४-५ तासाचा कार्यक्रम अत्यन्त फ्लेक्झिबल फॉर्ममधे सादर करणे हे एक स्वतंत्र आश्चर्य आहे.
तमाशा तीन अंगाने पुढे जातो गण गवळण , बतावणी आणि वग.
गण गवळण म्हणजे तर जवळ जवळ धार्मिकच स्वरूपाचा कार्यक्रम . गणात कार्यक्रमासाठी गणपतीला उपस्थित राहन्याचे आवाहन असते . अर्थात नृत्याच्या साथीने .
हा एक क्लासिक गण बघा..
'आधी गणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना'
धन्य शारदा ब्रम्हनायका घेउन येईन रुद्रवीणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दावीन यंत्र खुणा खुणा..
सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु मेरुवरचा गुरु आणा आणा,
ब्रम्हान्ड भवता तो एक सवता दिवाच लावील म्हणा म्हणा
माझ्या मनाचा मी तू पणाचा गाळून केला चुना चुना
पठ्ठे बापूराव कवी कवनाचा , हा एक तुकडा जुना जुना....
नाही तर रंग पुन्हा सुना सुना...
त्यात अद्वैत वादाचीही झाक दिसेलं.
नन्तर च्या गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये लावणी अंगाने जाणारी असत. निमित्त असे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणींची चेष्टा करून रस्ता अडवणार्या कृष्ण आणि त्याच्या मित्रांची रस्ता सोडण्यासाठी विनवणी युक्त गाणी. व नृत्य.
यातच ती सुप्रसिद्ध 'मावशी ' असे. मावशी म्हणजे तो इनव्हेरिअबली पुरुष कलाकारच असावा लागतो अन तोही मुख्य सोंगाड्या. यात मात्र कृश्णाची खूप टवाळी केलेली असे. पण त्यात अध्यात्मिक चर्चा ही असे. मागे काही 'शिष्ट' लोकानी कृष्णाची बदनामी होते म्हणून गणगवळणीवर बन्दी आणावी अशी मागणी केली होती . प्रकरण अगदी विधानसभेपर्यन्त गेले होते. या शिष्टाना कृष्णही कळाला नाही आणि राधाही.
तो संवाद असाही असे
'कोन रं तू ? अन कुठ रहातो?'
'अगं कुठं म्हंजी काय? मी सगळीकडे आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे'
'आगं बया, काष्ट्यात बी हायेस का तू?'- इति मावशी
'अगं तसं नाही काष्ट म्हंजी लाकूड.. लाकूड. पाण्यात, लाकडात, दगडात सगळीकडे मी वास करून असतो. समजलीस?' -- कृष्ण
'आसं? मंग तू संडासात बी आसतोस का वास करीत ?' -- मावशी आणि प्रचन्ड हशा. या मुद्द्यावर त्यांचा बराच वाद. शेवटी नाईलाजाने कृष्णाला मावशीचे म्हणणे मान्य करावे लागे.. वगैरे.
नन्तर बतावणी नामक एक प्रहसन असे छोटेसे. त्यात दोन मित्र भेटून त्यांची टिन्गल टवाळी असे. खरे तर विंगेच्या आत वगाची तयारी चालू असे. मेक अप, ड्रेपरी, सेटिंग. त्यासाठी टाईमपास म्हणून ही बतावणी असे.त्यातही विनोद गाणी यांची पखरण असे.
नन्तर वग . म्हनजे फीचर फिल्मच म्हणाना. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक कथानके असत. शिवाजीकालीन कथानके अतिशय लोकप्रिय असत. त्यातही गाणि . नृत्ये प्रसंग पाहून टाकलेली असत्.यात तर चक्क लढायाही असत. तलवारींचा खणखणाट असे.
तमाशातले 'दोन हवालदार' हे एक खूप विलक्षण आणि रंगभूमिच्या इतिहासात आगळे स्थान असलेले वेगळेच अभूतपूर्व 'मिथ' आहे. त्याच्यावर खूप लेखन होणे गरजेचे आहे.
असो. तर असा हा स्थूल मानाने तमाशा. सगळे सांगण्याचे कारण म्हणजे नाच्या म्हनजे तृतीय्पंथी नव्हे. ती कलाकार घडण्याची एक स्टेज आहे.काही काही पुरुष कलाकार खूप सुन्दर नाचतात्.माझ्या ऑफिसमधला एक अधिकारी खूप अद्भुत लावणी नृत्य करतो.साडी नेसून. ओळखू देखील येत नाही. आणि प्रत्येक वेळी कल्चरलला त्याच्यासाठी प्रचंड फर्माईश असते.
ज्या फडाना स्त्री कलाकार परवडत नाहीत ते मात्र ' नाच्ये' ठेवत. नाच्यांचा काळच जुना. मी इतके तमाशे पाहिले पण त्यात नाचे अभावाने दिसले. (इथे नाच्या म्हणजे पुरुषाने केलेले नाचणार्या स्त्री पार्ट असा घेतला आहे). तमाशातील नृत्य करणार्या कलावतीला ' नाचणारीण' म्हटले जाते. वगात काम करणार्या व डायलॉग बोलू शकणार्या स्त्री कलाकाराना जरा जास्तच 'प्रतिष्ठा' असते फडात.
दिनेशने उल्लेख केलेल्या कलावतींचा परफोर्मन्स 'बारी' किंवा 'बोर्डा' वरचा आहे. खानदानी तमाशाची सर त्याला नाही.खानदानी तमाशात दौलतजादा, 'लावणी तोडणे' असे प्रकार नसतात.
'लावणी तोडणे' हा प्रकार नर्तिकेला फायदेशीर पन अत्यन्त बाजारू प्रकार आहे. असो. बरेच विषयान्तर झाले....
हूड, माहिती छान दिली आहे..
हूड, माहिती छान दिली आहे..
तो गुणा रोज तालमी अन कुस्त्या
तो गुणा रोज तालमी अन कुस्त्या खेळणारा अन वर्षानुवर्षांच्या खुराकावर 'तयार' झालेला पहिलवान नसून पोट भरण्यासाठी शारिरीक कष्ट करावे लागल्यामुळे तयार झालेला आहे. हे कष्टाचं काम जेव्हा सुटतं, तेव्हा इतर काहीही काम न येणारा पण 'तमाशा' या कलेवर भरभरून प्रेम करणारा हा माणूस दुसरं काय करणं अपेक्षित आहे? तेही अख्खा फड उभा राहिलाय, पण 'नाच्या' शिवाय काम पुढे सरकत नाही- हे बघितल्यानंतर?
साजिरा
कष्टाचे काम करणा-यांचे शरीर असे नसते. कष्टक-यांचे अंग हे काटक असते. भरदार छाती आणि पीळदार शरीरयष्टी ही केवळ कसरतीनेच होते. दगडफोडणा-यांचे दंड आणि छाती नक्कीच अशी असते पण त्यांच्या मांड्या त्या प्रमाणात नसतात. या सिनेमात अतुल सुरूवातीलाही काही दॄश्यांत आणि नंतर त्याच्या नाच्या होण्याचा पश्चात्ताप झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालतांना दाखवला आहे...!!
त्यातूनच नायक कसरत करणारा, मस्तीत जगणारा "राजामाणूस" आहे हा संदेश सुरूवातीलाच गेलाय. तसंच त्याला तमाशाचा फड बघण्याचे व्यसन इतक्यातच लागले आहे हे देखील समजते. त्यापायी पांडबाला गुणाचा बाप शिव्याशाप देताना दाखवलाय.. त्याच्या अंगात कला आहे हे सुरूवातील कुठेही ध्वनीत केलेले नाही. त्यामुळे गावात वग आलाय म्हणून वग पहायला जाणारा गुणा एकदम स्वतःच वग काढायची भाषा करतो हे न समजण्यासारखे..
तुलना अस्थानी होईल पण केल्यावाचून राहवत नाही..
पिंजरा चित्रपटातले "मास्तर" चे अधःपतन चटका लावून जाते, तसे इथे होत नाही. मास्तरचा प्रवासही शोकांतिकेच्या मार्गानेच होतो पण तो सर्व प्रवास पटत जातो. संगीत देखील असेच. पिंजराची गाणी आजही (कुठल्याही डॉल्बी वगैरे इफेक्टशिवाय ) आजही दाद घेऊन जातात. अजय अतुल ने नक्कीच छान काम केलेय...पन पिंजराची तोड या गाण्यांना नाही.. नटरंगची जाहिरातबाजी हीच अशा पद्धतीने घातक ठरतेय... तुलना करायला लावतेय. अशाच कथेवरचा गणानं घुंगरू हरवलं हा चित्रपट देखील अरूण सरनाईक आणि दादा साळवी या पाटील बाप लेकातील संघर्ष आणि तमाशाच्या वेडाचे प्रदर्शन ताकदीने घडवतो. सुमार तांत्रिक बाजू आणि कॄष्णधवल चित्रपट असूनही नायकाचे खूळ खरेखुरे वाटते..
असो...प्रत्येकाची आवड वेगळी..
हुड खुप खुप धन्यवाद , आजवर
हुड खुप खुप धन्यवाद , आजवर तमाशा म्हटलं की फक्त लावणीच नजरेसमोर यायची .
खरतर तमाशा ह्या विषयावर स्वतंत्र बी बी काढुन लिहायला हरकत नाही , ह्या लुप्त होत असलेल्या लोककलेविषयी बर्याच लोकांना माहीती नाही .
आशूडी, खूप खूप धन्यवाद !
आशूडी, खूप खूप धन्यवाद ! प्रचंड उत्सुकता आहे चित्रपट पाहण्याची. सध्या यू ट्यूब वर असलेल्या गाण्यांच्या तुटपुंज्या व्हिडिओज वर भागवावे लागत आहे.
अतुल कुलकर्णी भन्नाट ताकदीचा कलाकार आहे. कुणाला त्याचे 'अंधाराच्या पारंब्या' ( पिंपळपान ) ह्या मालिकेतील काम आठवते का ? त्याने जो बॅरिस्टर साकारला होता त्याला तोड नाही.
वा हूड! चांगली माहिती दिलीत.
वा हूड! चांगली माहिती दिलीत.
हुडा भरपुर माहिती
हुडा भरपुर माहिती दिलीत.
धन्यवाद.
मी पाहिलेला एकमेव तमाशा म्हणजे त्यात फिल्मी गाणी वाजवुन डान्स सुरु होता. अर्थात हे गणगवळण नंतर आणि बतावणीच्या आधी. (पब्लिक डीमांड जशी असेल त्याप्रमाणे हा प्रकार घुसला तमाशात)
ती गाणीच रात्री बारा-साडेबारापयंत चालली होती. मग ज्या गावात तमाशा होता तिथुन आमच्या गावात रात्री चालत यायच होत. सोबतीला पुर्ण काळाकुट्ट अंधार, बिबट्याच भय, गावकडचा पेशल रस्ता आणि घरी न सांगता गुपचुप बाहेर झोपलेलो उठुन तमाशा बघायला गेलोलो आम्ही अस सगळ समीकरण एकत्र झाल आणि नाइलाजाने परत गावी आलो होतो.
वग अजुन्पर्यंत पहायला मिळाला नाहिये. बतावणीदेखील नाही.
वग उत्तरोत्तर रंगत जातो आणि तो पहाटेपर्यंत चालतो ही फक्त ऐकीव माहिती आहे झाल.
एकदा तमाशा बघण्याची ईच्छा आहेच.
रॉबिनहुड अतिशय छान माहिती..
रॉबिनहुड अतिशय छान माहिती.. एक बाफ किंवा ललित लिहाच तुम्ही या विषयावर
मला वाटते संतोष पवार चे यदा-कदाचित नाटक वग या प्रकारात मोडत असावे..
त्यात पण गण- गवळण बतावणी वैगेरे प्रकार आहेत.
saw this movie today, did not
saw this movie today, did not liked it so much. Its okay to watch once, but not must
रॉबिनहुड अतिशय छान
रॉबिनहुड अतिशय छान माहीती.
मला एक शंका आहे. "सुरेखा पुणेकर, काम्बीकर, नगरकर, खुटेगावकर या बारीवरील कलाकार आहेत. तमाशातल्या नव्हेत." अस म्हणालात पण बारीवरील म्हणजे नक्की काय?
हूडा, छान माहिती. एक स्वतंत्र
हूडा, छान माहिती. एक स्वतंत्र ललित लिहिल्यास बरे होइल. मला लावणी आणि तमाशाबद्दल फारच कौतुक आहे पण अस्सल तमाशा अजून पाह्य्ला नाही एन सीपीए मधे पाहिला तेवढाच.
तमाशाची बारी आणि वग हे वेगळे
तमाशाची बारी आणि वग हे वेगळे आहेत का ? वगनाट्य हे एकेकाळी करमणुकीचे एकमेव साधन होते. शिवरायांच्या काळात ते आग्र्याहून पुन्हा स्वराज्यात परतत असतांना रयतेमधे घबराट पसरू नये म्हणून त्यांना संदेश जाणे गरजेचे होते..त्याचवेळी शत्रूला समजू नये अशीही व्यवस्था करायला हवी होती. शिवरायांच्या यंत्रणेने मग वासुदेव, पिंगळा, कीर्तनकार आणि वग या माध्यमांतून रयतेला "योग्य" तो संदेश देण्याचे काम केले..
वग या प्रकाराबद्दल हे ऐकून आहे.
रॉबीनहूड खुप चांगली माहिती
रॉबीनहूड खुप चांगली माहिती आहे.
खूप छान माहिती रॉबिनहूड .
खूप छान माहिती रॉबिनहूड . धन्यवाद . मला हे काहिच माहित नव्हते. तमाशा म्हणजे लावणी हेच समीकरण पक्कं होतं डोक्यात.
हूड, फार उपयुक्त माहिती
हूड, फार उपयुक्त माहिती दिलीत! अगो, मला आठवतंय.. आणि तेव्हापासूनच मी त्याच्या अभिनयाची , त्याची 'फॅन' झाले आहे! वेड लावतो..
किरण, ठीक आहे! सगळ्यांना चित्रपट आवडलाच पाहिजे असं थोडीच आहे? प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर ते अवलंबून आहे! पण एक मूलभूत फरक आहे 'पिंजरा' व 'नटरंग' मध्ये. इथे त्यांना शोकांतिका दाखवायची नाहीच आहे. उलट त्याची करुणा वाटण्याऐवजी त्याची जिद्द, चिकाटी वाखाणायची आहे. असं मी वर परीक्षणात लिहीलं आहेच. शिवाय पिंजर्यात मास्तर नाईलाजाने, सूडापोटी खेचले जातात त्या दुष्टचक्रात आणि त्यांची शोकांतिका होते. आणि इथे गुणा आपणहून या होमात उडी घेतो , होरपळतो पण तावून सुलाखून बाहेर पडतो! परिस्थितीला शरण जाऊनही खचून न जाता त्यावर मात करण्याची जिद्द त्यांना दाखवून द्यायची आहे. परवाच्या 'सा रे ग म प' मध्ये हे कलाकार आले होते तेव्हा अतुलने स्पष्ट केलं की ,"हा सिनेमा फक्त तमाशापट नाही. तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ध्येय असतं. ते गाठण्यासाठी जिद्द असते, त्यामागे तो धावतोही. पण जेव्हा त्या वाटेवर त्याला अपयशाला सामोरं जावं लागतं तेव्हा सोबत कधीकधी कुणीच नसतं. मग वेडाच्या भरात घेतलेल्या उडीचा निर्णय चुकला की काय असं वाटू लागतं. पण काही माणसं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून जिवंत होतात आणि आपलल्या कर्तृत्वापुढे जगाला नतमस्तक व्हायला भाग पाडतात. ही कहाणी अशा सार्या ध्येयवेड्यांची आहे! " हे ऐकल्यावर मला सिनेमा जास्तच आवडायला लागला. ( अतुल जितका अभिनयात कमाल आहे, तितकेच त्याचे वाचन दांडगे आहे, विचारांनी तो प्रगल्भ आहे. विचारांची इतकी सुंदर बैठ्क असल्याशिवाय कोणतीच कला इतक्या उत्कृष्टरित्या साकार होऊ शकत नाही! अतुल लाजवाब आहे!)
रॉबीन, लहानपणी खुप बघितले
रॉबीन, लहानपणी खुप बघितले होते. पण मग राहुनच गेले. मग पुढे तमाशा सवंग होत गेला, निदान तसे सांगण्यात येऊ लागले, मग जाणे राहिलेच. त्यापुर्वी मुंबईत देखील आम्ही घरचे सर्वच जण बघायला जात असू. नंतर त्याचा संकोच वाटू लागला.
इथेच अलिकडे कुनी तृतीय पंथीयांचा तमाशा, होत असल्याचा उल्लेख केला होता. असे पण होते, याचे नवल वाटले.
तू छानच लिहिले आहेस. पण आणखी लिहावेस रे.
इतकं सगळं वाचून कधी एकदा हा
इतकं सगळं वाचून कधी एकदा हा सिनेमा बघायला मिळतो.... असं झालंय.
काल सिनेमा पहायला मिळाला. <<
काल सिनेमा पहायला मिळाला. << अतुल लाजवाब आहे! >>...........१००%. सिनेमा पण छान जमला आहे. वरती कोणीतरी म्हणल्याप्रमाणे <<<पण नाच्यावर बलात्कार आणि एकूणच राजकारण घूसवलेल वाटल.>>> हे दाखवताना थोडं अतिरंजित वाटलं.
सिनेमा आवडला/ नाही आवडला तरी अतुल कुलकर्णींचे काम जबरदस्त आहे हे मात्र नक्की. या कामासाठी प्रचंड मेहनत घेतलीय आणि ती सार्थकी लावलीय. वाह अतुल!
"नटरन्ग" first day first show
"नटरन्ग" first day first show बघीतला होता पण खुप दिवसापासुन त्यावर लिहिणे जमत नव्हते...
चित्रपट अप्रतिम आहे म्हणजे कलाकार ,दिग्दर्शक, तन्त्रन्द्..सर्वान्नी अप्रतिम काम केलेले आहे...
प्ण इथे बहुतेक जणान्ना जसा प्रश्न पडला मलाही पडलेला आहे म्हणजे अतुल कुल्कर्णीचे नाच्या होणे..
कदाचित ते जरूरी असेल पण चित्रपटात ते तितक्या प्रभावीपणे येत नाही..पटत नाही...म्हणजे वर कुणीतरी उल्लेख केला आहे की वग प्रकारात नाच्या असणे जरुरी असते पण येथे अतुल कुलकर्णी वग लिहितो त्याला ही माहीती नसते..अगदी किशोर कदम जो की तमाशाचा जाणकार असतो त्याला सुध्ध्दा हे माहीत नसते...त्याना जेन्व्हा सोनाली आणी प्रिया भेटतात त्या नाच्याची अट घालतात पण त्या सुध्ध्दा असे स्पष्टिकरण देत नाही, त्या फक्त म्हणतात की वेगळे काहीतरी द्यायचे म्हणून नाच्या हवा....!
दुसरी गोष्त म्हणजे हे मान्य जरी केले की नाच्या असणे गरजेचे आहे..तरी ते अतुल कुल्कर्णीनेच व्हावे हे जरूरी नसते..म्हणजे ते फक्त गावातल्या चार -पाच लोकान्नाच विचारतान्ना दाखवले आहे..ते दुसरीकडे सुध्धा शोध घेउ शकतात ..जशी सोनाली त्यान्ना कोल्हापुरला सापडते..तसाच एखादा नाच्या मोठ्या शहरात सापडू शकतो..आणि जितका वेळ अतुल नाच्या होण्यासाठी घेतो ,म्हणजे २-३ महीने तितक्या वेळात हे सहज शक्य आहे किन्वा असते हे मला वाटले...!!
रॉबीन, छान माहिती.
रॉबीन, छान माहिती.
खुप्पच चाम्गला आहे हा सिनेमा
खुप्पच चाम्गला आहे हा सिनेमा
चित्रपट गण्याला मध्यवर्ति
चित्रपट गण्याला मध्यवर्ति ठेउन बान्धलेला आहे. त्यामुळे अतुल कुलकर्णि म्हणाले त्या प्रमाणे
<< प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ध्येय असतं. ते गाठण्यासाठी जिद्द असते, त्यामागे तो धावतोही. पण जेव्हा त्या वाटेवर त्याला अपयशाला सामोरं जावं लागतं...>>
हे सगळ जरि मान्य केल तरि, गण्याच्या बायकोवर अन्याय होतो अस सतत जाणवत रहात
तिच पण स्वप्न असेलच कि आपल्याला नवर्यानि चार धड्के कपडे द्यावेत, पोटाला पुरेस अन्न द्याव. तिच एवढहि स्वप्न गण्या पुर्ण करताना दाखवलेला नाहि.
त्याच स्वप्न तो पुर्ण करायला तो एवड् जिवाच रान करतो. पण बायकोच्या स्वप्नाच काय?
नटरंग पाहिला आणि प्रचंड आवडला
नटरंग पाहिला आणि प्रचंड आवडला .......... केवळ अप्रतिम . सगळ्यांची कामं खुप छान झाली आहेत .
चित्रपट पाहिला आणी आवडला
चित्रपट पाहिला आणी आवडला सुद्धा, अतुल कुलकर्णीने जबरदस्त ताकदिने भुमिका पेलली आहे, स्पेशली तो नाच्याचा मेकप करत आरशात टोपी घालतो तो सिन एकदम अंगावर येतो.पांडबाचे काम करणार्या किशोर कदमने भुमिकेच बेअरिंग चांगल सांभाळलय.
मला जाणवलेल्या त्रुटी अशा..
चित्रपटात अजुन दमदार आणि ताकदीने सादर होणारी गाणि हवी होती, रंगत जाणारे वग, दोन फडातला होणारा संघर्ष अशा अनेक गोष्टिंना वाव होता.
Pages