काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
डोळ्यांच्या कडा ओलावण्याचे अनेक प्रसंग.. पण अत्यंत संयतपणे हाताळल्याने "पुढे काय?" ते पाहायला प्रेक्षक तयार असतो. एक कलंदर, जिगरबाज व्यक्तिमत्व.. कलेचा ध्यास घेतलेलं.. परिस्थितीपुढे झुकायची वेळ येताच स्वतःच्या हिमतीनं उभं राहणारं.. स्वतःच्या कलेचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता लोकांचं भलं व्हावं असा निरागस उद्देश असणारं.. वेळच तशी आली म्हणून कलेच्या या होमात स्वतःची आहुती द्यायला मागेपुढे पाहत नाही.. पण या भावनेच्या भरात, वेडात घेतलेल्या उडीची जबर किंमत त्याला द्यावी लागते.. आयुष्यभर्..एकट्याला.
अतुल कुलकर्णीच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पैलवान गुण्या ते 'मावशी' हा दोन टोकांचा प्रवास त्यानं इतक्या जबरदस्त ताकदीनं पेललाय की तो बदल पाहता पाहता भान हरपतं. एका वाघाची शेळी झालेली पाहवत नाही , मन हेलावतं. सहानुभूती , कणव वाटतेच पण त्यापेक्षाही त्याचं कौतुक, त्याच्या जिगरला द्यावीशी वाटणारी दाद जिंकून जाते. आणि हेच दिग्दर्शकाला अभिप्रेत असावं. अतुलने त्याच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. कल्पनेपलीकडचा अभिनेता डोळ्यांसमोर साक्षात उभा केला आहे. या ग्लॅमरस जगात येण्यासाठी, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या, स्वतःला 'अभिनय' येतो असं समजणार्या हौशी कलाकारांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!
अजय अतुलच्या संगीताची तर आधीच इतकी प्रसिध्दी झालेली आहे त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगणे न लगे! सोनाली कुलकर्णी सारखी देखणी , लावण्यमयी अभिनेत्री मराठीला लाभली हे आपले भाग्यच! अमृता खानविलकर पाहुणी कलाकार म्हणून 'आता वाजले की बारा' गाण्यात आहे. ही गाणी ऐकायला जबरदस्त आहेत. पण शीर्षकगीत 'नटरंग' सिनेमात जितकं 'जाणवत' नाही तितकं ऑडिओ सीडी ऐकताना वेड लावतं. यातला ढोलकीचा ठेका इतका दिलखेचक आहे की त्याच्या 'तटकारा' बरोबर अंगावर काटा फुलतो. हे गाणं एकदा तरी ऐकाच. गुरु ठाकूरची गाणी नेहमीप्रमाणेच अचूक शब्दांची उधळण करणारी. गुरु ठाकूर सिनेमातही आहे. गुणा ज्याच्या मळ्यात काम करत असतो तो पाटील म्हणजे गुरु. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिल्याने चित्रपट कुठेच 'कमी पडलाय' असं वाटत नाही. तरीही तमाशावर चित्रपट आणि त्यात 'गुणा' हा शाहीर ..तर एक "सवाल जवाबाची बारी" असती तर अजूनच चार चांद लागले असते असं वाटलं. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, जो चित्रपट इतका जबरदस्त आहे त्याची मूळ कथा डॉ. आनंद यादवांची 'नटरंग' ही कादंबरी काय चीज असेल हे पाहण्यासाठी तरी मी ती वाचायला उद्युक्त झाले आहे!
झी टॉकीजने असेच एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढावेत, त्यांची याहून जास्त जाहिरात करुन प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात खेचून घ्यावा अशा शुभेच्छा! असे जर 'अतुल गुणवंत नटरंग' मराठीमध्ये असतील तर मराठी चित्रपटाला, नाट्यभूमी, लोककलेचा सुवर्णकाळ येतोय असं म्हणायला हरकत नाही!
कालच अप्सरा आली हे गाणे
कालच अप्सरा आली हे गाणे पाहिले तू नळीवर... लै लै भारी आहे..
परीक्षण आलं की तिथे दोन पळ्यांचं अर्घ्य द्यायचं. >>>
परीक्षण आलं की तिथे दोन
परीक्षण आलं की तिथे दोन पळ्यांचं अर्घ्य द्यायचं. >>
मी पाहीन उद्या संध्याकाळी नक्की
आशूने लिहिलेलं परिक्षण म्हणून उत्सूकतेनं वाचून काढलं, छान लिहितेस.
काल बोरीवलीत " शब्द
काल बोरीवलीत " शब्द "संस्थेतेर्फे आयोजीत कार्यक्रमात नटरंग ची कलाकार मंडळी आली होती.
मी मिटींगमुळे जाउ नाही शकलो. पण माझी बायको गेली होती.
अतुल कुलकर्णी (गुणा),किशोर कदम (पांडबा), रवि जाधव,प्रिया बेर्डे, विभा हे सगळे आले होते.
अतुल कुलकर्णी बेस्ट आहे, नाचांच्या आयुष्यावर त्याने त्याच्या गप्पांतुन माहिती दिली."स्त्रियांकडे samaajaachaa पहाण्याचा लोकांचा दॄष्टीकोन "यावर तो बराच बोलला.
किशोर कदम ने त्याला हा रोल कसा मिळाला ते सगळ्यांबरोबर शेअर केल.
प्रिया बेर्डे ने उत्सफुर्त्पणे मान्य केल की , मी आता क्वालिटी काम करायला लागले आहे.
जाम धमाल आली,त्यांच्या स्वाक्षर्या आणि बरोबर फोटो काढायची संधी मिळाली.
माझ्या मित्राने पूर्ण कार्य्क्रम रेकॉर्ड केला.
एक आजोबा प्रष्न विचारताना म्हणाले " तुम्ही सगळे आलात पण ' अप्सरा आली ' गाण्यातील हिरोईन आली असती तर दुधात साखर पदली असती. यावरुन सगळे कलाकार आणि प्रेक्षक जाम हसले.
पण ती का येउ शकली नाही यावर कारण देताना अतुल कुलकर्णी म्हणाला" की ती नटरंग मुळेच येउ शकली नाही. अजय अतुल नाईट करता ती पुण्याला का कुठे गेली आहे.
परीक्षण मस्त... बघायला हवाय
परीक्षण मस्त...
बघायला हवाय सिनेमा. गेल्या महिन्यात सहकुटूंब सहपरिवार ( २००X10 ) थ्री इडियट झाल्याने मनोरंजनाचे बजेट पुढच्या महिन्यात ढकलले होते..
आशु, छान. नटरंगच्या या
आशु, छान.
नटरंगच्या या भुमिकेसाठी अतुलने खुप कष्ट घेतले आहेत, त्यामुळे या सिनेमाची मी मनापासून वाट बघत होतो. रांगडा पहिलवान जेव्हा तमाशाचा नाच्या बनलेला बघतो, तेव्हा आपल्याला प्रचंड धक्का बसतो- आणि तिथेच प्रेक्षकांना अतुल जिंकून घेतो. शारिरीक काम करून बनलेले दणकट शरीर गुणा फक्त नाच्या बनण्यासाठी जाणीवपूर्वक सडपातळ करतो, एवढेच नव्हे तर संपूर्ण देहबोली प्रयत्नपूर्वक बदलून दाखवतो, तेव्हा आपल्याला हादरा बसतो. तमाशावर जीव तोडून प्रेम करणारा एक गावरान मर्द गडी स्वतःच्या फडाचे स्वप्न पुरे व्हावे म्हणून हे सारे करतो, पण हे सारे करताना स्वतःचा संसार, प्रतिष्ठा धुळीस मिळालेली बघून पिळवटतो, उध्द्वस्त होतो.
महाराष्ट्रात 'तमाशा' या पारंपारिक लोककलेला सरकार-दरबारी मान मिळाला, महोत्सवांमधली बक्षिसे, मदत मिळाली. उद्धारासाठी सरकारने प्रयत्न केल्याचेही दाखवले गेले. ग्रामीण करमणूकीत ध्रुवपदही तमाशाने मिळवले. पण अत्यंत थोडे अपवाद सोडले, तर या कलाकारांना सामाजिक प्रतिष्ठा मात्र कधी मिळाली नाही. लोकांनी या सार्यांकडे एक वस्तू, फार झाले तर करमणूक करणारे, फारशी किंमत अन इतर काहीच पर्याय नसलेले सोंगाडे म्हणूनच पाहिले. समाजात सामान्य जीवन जगण्याचा त्यांचा हक्क नाकारला. या सगळ्यात या कलेवर मनस्वी प्रेम करणार्या ज्या कलाकारांची अक्षरशः ससेहोलपट झाली, त्यांचा हा प्रतिनिधी.. नटरंगचा 'गुणा'.
सोनाली आणि किशोर कदम (कवी सौमित्र) या दोघांचे काम सुरेख. विशेषतः किशोरचा 'पांडबा' खरोखर तमाशाच्या फडात कित्येक वर्षे राहिल्यासारखा वाटतो. गुणाचे स्फुर्तीस्थान बनलेला पांडबाही शेवटी गलितगात्र होतो, हार मानतो तेव्हा गुणासारख्याची वाट शेवटी एकट्याचीच होते. न मळलेली. आपण, लब्धप्रतिष्ठितांनी वाळीत टाकलेली.
अजय-अतुलचे संगीत आधीच चर्चेत आले आहे. 'नटरंग उभा', 'खेळ मांडला, 'वाजले की बारा', 'अप्सरा आली' ही सारीच अप्रतिम झाली आहेत. एखाद्या खुप अनुभवी संगीतकारासारखी या जोडगोळीने तमाशाप्रधान संगीताची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. 'अप्सरा आली' हे तर नितांतसुंदर झाले आहे.
'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे किंवा 'थ्री इडियट्स' मधल्या आमिरच्या अभिनयाचे, देहबोलीचे कौतूक ज्यांना वाटत असेल, त्यांनी अतुलचा हा 'नटरंग' जरूर बघा. या दोन्ही चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने 'नटरंग' सुंदर झाला आहे, मनाला पटणारा, हृदयात उतरणारा झाला आहे. हिंदीतले मोठे कलाकार 'रोल्स' निवडून घेतात, अन त्यावर मेहनत करून एखादा प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवतात- त्याचे आपण नेहेमी कौतूक करतो. मराठी सिनेमात ही वेळ आता फार दूर राहिलेली नाही, हे नटरंग बघून पटले.
चित्रपट जरूर बघा. मनापासून कौतूक करा, अन इतरांनाही सांगा.
आशू छान परिक्षण. मला पण आवडला
आशू छान परिक्षण.
मला पण आवडला 'नटरंग'. पण खुप उदास वाटले बाहेर पडताना.
शारिरीक काम करून बनलेले दणकट शरीर गुणा फक्त नाच्या बनण्यासाठी जाणीवपूर्वक सडपातळ करतो, एवढेच नव्हे तर संपूर्ण देहबोली प्रयत्नपूर्वक बदलून दाखवतो, तेव्हा आपल्याला हादरा बसतो. >>
खरच हादराच बसतो.
त्याचे वडिल गेल्याचे समजल्या नंतर तो आणि पांडोबा बोलत बसलेले असतात, तिथे एक हालचाल अशी आहे अतुल कुलकर्णी ची, की अरे हा कायमचा असा होणार या जाणिवेने व्याकुळ व्हायला झाले.
निव्वळ देखणा अभिनय. खुप परिरश्रम घेतले आहेत अतुल कुलकर्णी ने. १५ किलो वजन वाढवुन , १६ किलो कमी केले असे ऐकले आहे.
'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे
'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे किंवा 'थ्री इडियट्स' मधल्या आमिरच्या अभिनयाचे, देहबोलीचे कौतूक ज्यांना वाटत असेल, त्यांनी अतुलचा हा 'नटरंग' जरूर बघा. >> अगदी अगदी.
साजिर्या छान लिहीलंस .. नेमकं माझ्या लिखाणात राहून गेलेलं तेवढंच..
याच्या फक्त गाण्यांची VCD/DVD
याच्या फक्त गाण्यांची VCD/DVD आली आहे का ? मी तू नळीवर शोधले पण संपूर्ण गाणी मिळाली नाहीत
हो हो आलेली आहे. माझ्याकडे
हो हो आलेली आहे. माझ्याकडे आहेत. जपानात माहीत नाही पण ठाण्यात मिळतात.
आशूडी, सविस्तर परीक्षणाबद्दल
आशूडी, सविस्तर परीक्षणाबद्दल धन्यवाद. चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढली आहे.
दिनेश, 'सख्या सजणा' चित्रपट पूर्वी अर्धाच पाहिला होता. आता मिळेल तेव्हा संपूर्ण पाहीन.
>>पाहणार म्हणजे
>>पाहणार म्हणजे पाहणार.
जिकडून जमेल तिकडून डिव्हीडी मिळवून पाहणार.
आशुडी छान अन नेटकं परिक्षण
आशुडी छान अन नेटकं परिक्षण
कसली सॉलीड गाणी आहेत , मी आत्ता ऐकली , एकदम दिवाना झालो गाण्यांचा .
'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे किंवा 'थ्री इडियट्स' मधल्या आमिरच्या अभिनयाचे, देहबोलीचे कौतूक ज्यांना वाटत असेल, त्यांनी अतुलचा हा 'नटरंग' जरूर बघा. >> > प्रत्येक मराठी माणसाने ह्या वाक्याचा विचार करावा , तरच मराठी सिनेमाचा उत्कर्ष होईल .
प्रत्येक मराठी माणसाने ह्या
प्रत्येक मराठी माणसाने ह्या वाक्याचा विचार करावा , तरच मराठी सिनेमाचा उत्कर्ष होईल>>>
हे कसे काय होईल ते समजले नाही. अमिताभचा गेटअप आणि आमिरची देहबोली आवडण्याने मराठीचे नुकसान कसे होते? आमिर,अमिताभ वा अतुल हे आपापल्या परीने श्रेष्ठ कलाकार आहेत त्यांची तुलना करण्यात आणि त्याहूनही त्याला भाषीक रंग देण्यात काहीच अर्थ नाही
हे कसे काय होईल ते समजले
हे कसे काय होईल ते समजले नाही. अमिताभचा गेटअप आणि आमिरची देहबोली आवडण्याने मराठीचे नुकसान कसे होते?
नुकसान होत नाहीये तर ह्या ग्रेट अभिनेत्यांचा ग्रेट अभिनय पाहण्यासाठी तुम्ही जशी थेटरात गर्दी करता तशीच गर्दी मराठीत कोणी ग्रेट काम केले तर तेही पाहण्यासाठी करा. म्हणजे कलेबरोबर धंदा पण चांगला होतोय हे जाणुन अजुन चांगले मराठी चित्रपट लोक बनवतील....
ज्यानी बघितलाय त्यानी, कथानक
ज्यानी बघितलाय त्यानी, कथानक उघड न करता, माझ्या एका शंकेचे निरसन कराल का ?
आजकाल तमाशात नाच्या खरेच अपरिहार्य असतो का ? नायकाला नाच्या न बनता, तमाशा उभा करणे खरेच अवघड होते का ?
मी हे विचारतोय कारण, निदान शहरात तरी, तमाशाला पांढरपेशा प्रेक्षक लाभला आहे. श्रेय कदाचित डॉ मीना नेरुरकरांच्या, सुंदरा मनामधि भरली ला असेल. पण नंतर सुरेखा पुणेकर, मधु कांबीकर, जयश्री नगरकर आदी कलावतीनी, केवळ स्वतःच्या नृत्यकौशल्यावर कार्यक्रम यशस्वी केले आहेत. (पण या अलिकडच्या गोष्टी आहेत )
आजकाल तमाशात नाच्या खरेच
आजकाल तमाशात नाच्या खरेच अपरिहार्य असतो का ? नायकाला नाच्या न बनता, तमाशा उभा करणे खरेच अवघड होते का ?
या प्रश्नाचे उत्तर वरच्या एका पोस्टच्या उत्तरात आले आहे. मलाही ही गोष्ट ओढुन ताणुन आणल्यासारखी वाटली, पण त्याचे उत्तर चित्रपटातच आहे. बाकीचे भरपुर तमाशे असताना, आपल्याकडे जरा वेगळे, म्हंजे बाईबरोबर नाच्याही असला तर लोक बघायला येतील असे नायिकेचे आणि तिच्या आईचे मत पडते.
चित्रपटाचा काळ जुना आहे. कथेच्या ओघात असे येते की गावात तेव्हापर्यंत पाण्यासाठी विहिरींवर मोटा बसवल्या होत्या आणि मग पाटिल पहिलेवहिले इंजिन आणुन बसवतो. त्यामुळे अर्थात लगेच सगळे बेकार होत नाहीत, पण एकाचे पाहुन दुसराही आणेल आणि मग सगळ्यांच्याच पोटावर पाय येईल असे त्यांना वाटते. यावरुन काळ ६०-७० सालचा असावा असे वाटले मला. तेव्हा नाच्याची गरज जास्त असेल.
थॅंक्स साधना , @ आगाऊ , ह्यात
थॅंक्स साधना ,
@ आगाऊ , ह्यात भाषिक रंग काय आहे ? मराठी माणुस दुर्दैवाने मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा ह्या ऑप्शन्स मधुन निवडण्याची वेळ येते तेव्हा हिंदी सिनेमा निवडतो . आणि मी कुठेच हिंदी सिनेमा बघु नका असं कुठेच म्हटलेलं नाहीये . उगाच सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रकार करु नको .
मराठी माणुस दुर्दैवाने मराठी
मराठी माणुस दुर्दैवाने मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा ह्या ऑप्शन्स मधुन निवडण्याची वेळ येते तेव्हा हिंदी सिनेमा निवडतो>> असं का करतो हो तो? एका मल्टीप्लेक्समधे 'अवतार'. 'थ्री इडीयट्स' आणि 'नटरंग' लागला असेल तर कोणता सिनेमा पहावा हे त्याच्या भाषेवरुन ठरवावे काय? सूत काढणार्या मूढास मार्गदर्शन करावे.
@आगाऊ , प्लिज हे वाक्य परत
@आगाऊ , प्लिज हे वाक्य परत एकदा वाचा , {{{ 'पा' मधल्या अमिताभच्या गेटपचे किंवा 'थ्री इडियट्स' मधल्या आमिरच्या अभिनयाचे, देहबोलीचे कौतूक ज्यांना वाटत असेल, त्यांनी अतुलचा हा 'नटरंग' जरूर बघा. >> > प्रत्येक मराठी माणसाने ह्या वाक्याचा विचार करावा , तरच मराठी सिनेमाचा उत्कर्ष होईल . }}}
आशुडी , माफ कर एवढा चांगला बीबी भरकवटल्याबद्दल , ह्या विषयावर हेमाशेपो .
ओके, खरचं बीबी भरकटतो आहे
ओके, खरचं बीबी भरकटतो आहे ,माझं मत,गोंधळ,काहीही असो त्याची चर्चा इथे नको. कन्व्हिन्स झालो नसलो तरी मीही थांबतो.
वरची चर्चा वाचुन आणि चर्चेचा
वरची चर्चा वाचुन आणि चर्चेचा गोड शेवट वाचुन मला आनंदाश्रु का काय म्हणतात ते डोळ्यात तरळल्याचा भास झाला
हल्ली बरेच दिवस माबोवर चांगल्या चर्चा होताहेत, वाद होत नाहीयेत.. इथे वाद वाचुन भीती वाटायला लागलेली..पण शेवटी ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.... (तिळगुळाचे दिवस जवळ आलेत वाटते.. :))
उकृष्ट चित्रपट आणि छान
उकृष्ट चित्रपट आणि छान परिक्षण. मला कथा, पटकथा, संवाद, गीतं, संगीत, अतुल आणि किशोरचा अभिनय.. सगळ आवडलं. सोनली दिसते आणि नाचते छान.
आगाऊ, हिंदी-इंग्रजी
आगाऊ, हिंदी-इंग्रजी चित्रपटातल्या कलाकारांच्या कष्टाला जी दाद मिळते, तीच दाद अतुलला पण मिळायला हवी- असे म्हटले. यात भाषेचा संबंध नाही. बाकी अवतार, थ्री इडियट्स आणि नटरंग यांपैकी कोणता सिनेमा पुन्हा बघायला आवडेल असं मला कुणी विचारलं, तर मी नटरंग असं उत्तर देईन. यातही भाषेचा संबंध नाही. अनासपुरेचा एखादा बावळट सिनेमा असता (त्याचे चांगले पण आहेत काही) तर नसता पुन्हा बघितला. 'पा'च्या ऑरो आणि '३ इडियट्स'च्या रँचो पेक्षा नटरंगचा 'गुणा' सरस आहे- हे माझं वैयक्तिक मत.
श्री यांच्या पोष्टीत चमचाभर आवेश जास्त पडला इतकेच. पण मराठी असल्याचा तेवढा तरी फेअर बेनिफिट घ्यायला नको का?
दिनेशदा, साधनाचे स्प्ष्टीकरण मला बरोबर वाटते. हा अंदाजे ७०च्या दशकातला काळ आहे. आता या काळाशी किंचित विसंगत वाटतील, अशा काही गोष्टी आहेतच. पण त्या अ आणि अ मधून टाकून शांतपणे बघावा सिनेमा, म्हणजे त्रास होत नाही.
तमाशाच्या फडाला गावोगाव फिरावे लागत असे. त्यात कलाकार बायका-मुली तसेच अनेक पुरूषही असत. या बायकांच्या जवळ राहून सगळ्या गोष्टी समजून घेणारा, त्यांना हवं नको ते बघणारा हा नाच्या तमाशाच्या जनानखान्यात विशिष्ट स्थान मिळवून बसला. त्याच्यावर 'संपूर्ण' विश्वास ठेऊ शकत असल्याने या बायकांचे अन नाच्याचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाल्याचे ६०- ७० च्या दशकातल्या अनेक सिनेम्यांमध्ये आपण बघितलेच आहे. (का कुणास ठाऊक, पण आजच्या फॅशन इंडस्ट्रीतल्या माडेल्सच्या 'अत्यंत' जवळ राहून त्यांचे कपडे डिझाईन करणारे आजचे 'गे डिझायनर्स' आता मला आठवले ). याच्या जोडीला नाच्याने वगामध्ये सोंगाड्याचे, गवळणीत मावशीचे काम केल्यामुळे, ती कामे लोकांच्या पसंतीसही उतरली. बायका किंवा पुरुषांना सहजासहजी उघडपणे न करता येणारे थोडेफार 'खालचे' विनोद हा नाच्या सहज करून-बोलून जाई, अन त्यात कुणाला वावगे तर वाटत नसेच उलट ग्रामीण प्रेक्षकांची भरघोस दाद तो घेऊन जाई. या सर्व कारणांमुळे त्या काळात फडामध्ये 'नाच्या' आवश्यक होता हे ओघाने आलेच. मात्र 'आजच्या' तमाशा-वगात तो कितपत 'आवश्यक' ठरेल हे माहिती नाही.
बाकी, आजवर तमाशात नाच्याचे काम करणार्यांपैकी कितींना निसर्गानेच तसे बनवले आणि किती नाईलाज म्हणून नाचे झाले हे मला सांगता येणार नाही. पण नटरंग मधला नाच्या मुळात एक खराखुरा 'मर्दगडी' असूनही निव्वळ स्वतःच्या फडाचे स्वप्न पुरे करण्यासाठी 'नाच्या' बनतो. आणि तो निसर्गतःच 'असा' आहे असे समजून जेव्हा काही लोक त्याच्याशी वागतात तेव्हा त्याच्यातला मर्दच नाही, तर आपणही पिळवटून निघतो..!
असो. आज पुण्यात अजय-अतुल शो आहे. त्यात सोनाली स्वतःच 'अप्सरा आली' हे गाणे सादर करणार आहे, असे ऐकले.
खूप छान धागा आहे आणि सर्वांनी
खूप छान धागा आहे आणि सर्वांनी मनापासून लिहीलेले आहे.. नक्कीच पहायला हवा हा चित्रपट..
यानिमित्ताने तमाशा या कलाप्रकाराचे महत्त्व ( ऐकण्यात आलेले )
भारतात हिंदुस्थानी संगीत हे ब-यापैकी मुघलांकडून आलेले आहे. ब-याच मुस्लीम कलाकारांकडून संगीताची निरनिराळी घराणी आणि त्याद्वारे हे ज्ञान पुढच्या पिढीला देत त्याची जपणूक केली गेली आहे. पं भीमसेन जोशींपासून संगीतातील दिग्गज मंडळींचे गुरू पाहीले असता याची प्रचिती येते.
पण लोककलेच्या स्वरूपात देखील संगीत हा प्रकार जतन झालेला आहे. तमाशा याच प्रकारात मोडतो. हे सर्व कलाकार मात्र दैन्यावस्थेत राहीले.. हल्ली चांगले दिवस आले आहेत असे म्हटले जाते. तमाशा या प्रकाराबाबात या बाजूचाही विचार व्हायला हवा असे वाटते
आगाऊ आणि श्री, बीबी न
आगाऊ आणि श्री, बीबी न भरकटवल्याबद्दल तुमचेच आभार! साधनासारखेच माझ्याही डोळ्यात आनंदाश्रू आले!
मी परवा पुन्हा पाहिला 'नटरंग'. पहिल्यांदा पाहताना अतुलच्या कलाकारीपुढे विस्मयचकित होऊन आपण अवाक होतो, पण दुसर्यांदा त्यातले बारकावे बघताना अक्षरशः टाळी वाजवून दाद द्यावीशी वाटते. उदा. मध्यंतराआधी आरशातून अतुल जे बायकी हसतो, ते पाहून पहिल्यांदा त्याची कीव येते पण दुसर्यांदा पाहताना 'क्या बात है!' असं म्हणून फिदा व्हावंसं वाटतं त्याच्या त्या मोहक अदेवर ..
गेल्या कित्येक वर्षातला थिएटर मधे जाऊन एकाच आठवड्यात दुसर्यांदा पाहिलेला हा पहिलाच चित्रपट, असं आवर्जून सांगावंसं वाटतं!
मी पाहीला काल अतुलच्या
मी पाहीला काल
अतुलच्या कलाकारीपुढे विस्मयचकित >> अगदीच. इथे परिक्षण वाचलेच अन हा सिनेमा पाहत असतानाच मैत्रीणीचा समस... शनीवारी हाउसफुल होता सगळीकडे म्हणून रविवारी १२.३० ला जयश्री थिएटर मधे पहावा लागला ! पण मी फारच डीस्परेट होतो म्हणून जयश्री तर जयश्री आज पाह्यचाच असं ठरवूनच गेलो होतो घरातून अन मी केलेली पळापळ सार्थ ठरली असं वाटलं हा सिनेमा बघून.
काही काही प्रसंग खरच अंगावर काटा आणतात. सोनाली म्हणते "नाच्याचं म्हातारपण लय वंगाळ .."
अतुलचा मुलगा त्याच्यावर थुंकतो तो प्रसंग जबरदस्त आहे सिनेमा, पून्हा पाहणार एकदा चांगल्या थिएटरला.
आभार रे सगळ्यांचे. सिनेमातला
आभार रे सगळ्यांचे. सिनेमातला एखादा कलाटणीचा प्रसंग जर पटला नाही, तर सिनेमाच आवडत नाही. म्हणून शंका आली. (जसे पिंजरा मधे, मास्तराला तमाशात आणेनच, अशी नायिका शपथ घेते, त्या प्रसंगानंतर सगळे पटत जाते. ) मी अनेक वग प्रत्यक्ष पण बघितले आहेत्, पण गणपत पाटील, यांना खरेच तूलना नव्हती.
तमाशा कलाकारंच्या सत्य परिस्थितीवर, रानपाखरं नावाचा पण सिनेमा आला होता.
अप्रतिम सुंदर सिनेमा.. अतुल
अप्रतिम सुंदर सिनेमा.. अतुल कुलकर्णीच्या अभिनयापुढे विस्मयचकित झाले! कमाल, कमाल अदाकारी! त्याने शिकलेला नाच, हेल, हातवारे, आशूने लिहिलेला मध्यंतरापूर्वीचा त्याचा चेहरा- बापरे! चटका बसला!! त्यानंतरही भूमिकेचं बेअरिंग इतकं झकास पेललं आहे, की बास! सर्व सहकलाकारांचेही अभिनयही तोडीचे! पटकथेत थोडे दोष आहेत, पण एका नाच्याचे आयुष्य किती वाईट असू शकते ह्याचे झणझणीत चित्रण केले आहे..
सोनाली 'अप्सरा'च वाटते. दिसलीये, नाचलीये सुंदर. एरवीही गोड दिसते.
मला वाटतं त्यांचा तमाशा हा फक्त लावण्यांचा नसून त्यात 'वग'ही असतो. वगाच्या संवादात विनोदनिर्मितीसाठी 'नाच्या' आवश्यक पात्र आहे, म्हणून नाच्याची अपरिहार्यता! खरंतर त्यांच्या 'बारी'त बाईही उशीरानेच येते- गुणाला उभा करायचा असतो तो प्रामुख्याने वगच. पण 'बाईशिवाय तमाशा नाही' म्हटल्यावर 'फोकस'च बदलतो सगळा!
रच्याकने, गेल्या वर्षीच्या झी मराठी २००९ अवॉर्ड्जमध्ये 'आता जाऊद्या ना घरी'वर सोनाली आणि अमृता दोघी नाचल्या होत्या.. (कालच पाहिलं परत) म्हणजे चित्रपट कधीपासून तयार होत होता? अतुलच्या मेकोव्हरसाठी इतका वेळ गेला असणार! आधी वजन कमवा, मग कमी करा! फार कष्टाचे काम! पण worth the effort! Hats Off to Atul!
नटरंग खरंच छान आहे! आशूडी
नटरंग खरंच छान आहे! आशूडी अगदी योग्य परिक्षण केलं आहेस.
पूनम काल दाखवलेले झी मराठी अॅवार्ड्स २००९ सालामधे प्रदर्शित झालेल्या चित्रपट, नाटकांसाठी होते नां? जे २०१० साली जाहीर केले गेले. कार्यक्रम याच वर्षातला होता (बहुतेक).
धन्यवाद सर्वांचे...या
धन्यवाद सर्वांचे...या परीक्षणामुळे उत्सुकता ताणली गेलीये..
Pages