हे गणराज्य की धनराज्य ?

Submitted by अभय आर्वीकर on 8 January, 2010 - 08:58

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!

एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!

डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!

विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही...!!

गंगाधर मुटे
....................................................................

गुलमोहर: 

काही शब्दांचे मोघम अर्थ

प्रजापती,सुलतान,नृप = राजा
प्रगल्भ = परिपक्व
लांगुलचालन = खुशामत
मदांध = माजलेले
धनमत्ता = मालमत्ता
उद्दाम = बेफाम
सुगी = समृद्धी
पोटपाणी = उदरनिर्वाहाची साधने.
यौवण = तारुण्य.
..................................................

प्रयत्न बर्‍याच अंशी यशस्वी होतो आहे. चालू ठेवा. वापरण्यापूर्वी शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या. भले-शहाणेनंतर तुम्हाला सुजन किंवा सज्जन म्हणायचे असावे. सृजनचा तो अर्थ नाही. देशी चलनमुद्रा राशी म्हणजे स्विस चलन म्हणायचे आहे की रुपये? देशी शब्द अनावश्यक वाटतो. बाकी ठीक आहे.

मुटे साहेब,
कविता छान जमलिय.
एवढे मोठ्ठाले मोठ्ठाले कधी न वाचलेले शब्द कुठुन शोधुन आन्ता जी.
वाचतान बँड वाजलीय माझी.

खूप विचारात पाडणारी कविता आहे. आशयघन असल्याने वृत्त वगैरे तांत्रिक बाबींकडे लक्षदेखील गेले नाही.. या कवितेचा आशय हेच तिचे सौंदर्यस्थळ आहे..
लिहीत रहा

चिन्नुजी,थोडा घोळ होता.आता बरोबर येतात.?
पुढील ओळीही पाहुन घ्या.
प्रत्येक ओळीत ३० हव्या आहेत.

<< मात्रा अन गण...... १० वी नंतर मराठी सोबत ते ही गेले! >>
चंपकभाऊ,
दुखत्या नसेवर बोट ठेवलत तुम्ही..
मात्रा अन गण...... समदु:खी आहोत आपण...
कविता करायला गेलो अन लघु-दिर्घ,मात्रा गणाचं भुत मानगुटीवर बसलं..
कविताच करायच्या तर लघु-दिर्घ,मात्रा गण नव्याने शिकावे लगेल.
पण आता रडून किंवा मैदान सोडुन पळणे उपयोगाचे नाही.
आलीया भोगासी......... मेहनत घ्यावीच लागेल.
शेती करा की कविता..... कष्ट काही पिच्छा सोडत नाही..... Happy

आता पहिल्या दोन ओळी ३० Happy
गंगाधरजी, तुमचे अभिनंदन आणि कौतुकही! अश्या छान छान कविता येऊ द्या सुगीच्या.
शेती असु का कविता का आणि काही, मेहनतीचे फळ गोडच असणार!

चान्गली जमलिये Happy
झब्बू मोड ऑनः
पण यात "जशी प्रजा तसाच राजा" हे त्रिकालाबाधित सत्य उतरत नाहीये
लोकशाहीत तर लोकान्च्या लायकीप्रमाणेच सत्ताधारी "निवडला जातो", तेव्हा या कवितेमार्फत एक बोट सद्य सत्ताधारी व त्यान्ची खादाडी यावर असेल, तर तिन बोटे निवडून देणार्‍या तथाकथित "जनता जनार्दनाकडे" देखिल वळली पाहिजेत, मला वाटते की भविष्यात आपण त्या आशयाला देशिल स्पर्ष कराल
तसा स्पर्ष केलेली कविता/लेख अन्जन घालणारे ठरतील. अन्यथा मागे मी कुठेतरी म्हणल्याप्रमाणे, केवळ "प्राप्त परिस्थितीचे वर्णन" यापलिकडे उपयोजिता उरत नाही
झब्बू मोड ऑफ.

गण मात्रा वगैरे बाबी चम्प्या म्हणतो तसे दहावीनन्तर आमच्या आयुष्यातुन जे उठले ते उठलेच! Sad
पण चला, तुम्ही प्रयत्न तर करताहात, अभिनन्दन!

....................................................................
पण यात "जशी प्रजा तसाच राजा" हे त्रिकालाबाधित सत्य उतरत नाहीये.
'राजा आणि प्रजा' या दोन्ही अंगाने समतोल साधन्याचा केलेला प्रयत्न शब्दात उतरला नसावा असे वाटते.
पण प्रयत्न केला आहे हे नक्की.
....................................................................
मतपेटीतुन गेंडा जन्मला,धन्य झाली गणशाही...!!
जन्म देणारे जनता जनार्दनच..
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती.
ही ओळ जनता जनार्दनाशीच संबधित.
...................................................................
पण यात "जशी प्रजा तसाच राजा" हे त्रिकालाबाधित सत्य उतरत नाहीये
लोकशाहीत तर लोकान्च्या लायकीप्रमाणेच सत्ताधारी "निवडला जातो", तेव्हा या कवितेमार्फत एक बोट सद्य सत्ताधारी व त्यान्ची खादाडी यावर असेल, तर तिन बोटे निवडून देणार्‍या तथाकथित "जनता जनार्दनाकडे" देखिल वळली पाहिजेत, मला वाटते की भविष्यात आपण त्या आशयाला देशिल स्पर्ष कराल
तसा स्पर्ष केलेली कविता/लेख अन्जन घालणारे ठरतील. अन्यथा मागे मी कुठेतरी म्हणल्याप्रमाणे, केवळ "प्राप्त परिस्थितीचे वर्णन" यापलिकडे उपयोजिता उरत नाही

या मताशी शतप्रतिशत सहमत.
भविष्यात नक्किच उपयोग होईल. धन्यवाद..!!

गन्गाधरजी, आपणाकडून काही "वेगळ्याची" अपेक्षा असल्यानेच मी वरील मत मान्डायचे धाडस केले
तुम्ही थोडाफार स्पर्ष केला आहेच, पण तो पुरेसा नाही असे मला वाटले. (अर्थात, सर्व मुद्यान्ना दरवेळेस स्पर्ष करावा अशी काही सक्तिही नाही)
न मागता डिस्केमर मोड ऑनः (हल्ली हा सगळीकडे द्यावा लागतो Proud - जरी त्याची कविस आवश्यकता नसली तरी)
हे म्हणजे कसे ते सान्गु का? की रस्त्यावरील, खास करुन "पुणेरी", बेशिस्त वाहतुकीबद्दल रोजच्या रोज पेपरवर काळे केले जाते, पण वृत्तपत्रिय वा मिडीया मधिल एकही माईचा लाल "पादचार्‍यान्च्या अघोरी बेशिस्तीकडे" कधीच बोट उचलुन दाखवित नाही! हे असे एकतर्फी कसे काय चालेल? कुठेच टाळी एका हाताने वाजत नाही! राजकीय क्षेत्रातील बजबजपुरीचे देखिल असेच काहीसे आहे. मात्र आम्ही (माझ्यासहीत) आमच्या दैनन्दिन सम्बन्धातील "आमच्या जिव्हाळ्याच्या" प्रश्नान्वरच लक्ष केन्द्रीत करतो अन मग त्यातुन बाहेर पडणारा जळफळाट वा सन्ताप वा तळतळाट हा बराचसा "एकान्गी" असतो असे मला तरी भासते.
आपल्या कवितेला बरे वा वाईट म्हणण्या ऐवजी मी केवळ विचारान्ची ही अजुन एक धारा दाखवुन दिली असे.
न मागता डिस्केमर मोड ऑफः

मुटेजी,
अगदी सत्य मांडलय !
पण हे बदलणार कधी आणि कसं बदलेल,कुणी यात बदल घडवु शकतो का ?
मला वाटतं हे बदलण्याचा प्रयत्न करायला जाण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत स्वतःच्या घरावर तुळशीपात्र ठेवुन अंगारावरुन चालण्यापेक्षा काही कमी नक्कीच नाही ,कारण जो कुणी कुठुनही
कसाबसा याविरुद्ध उभा राहतो, हे बदलण्याचा प्रयत्न करतो त्याला खिंडीत पकडण्याचे,तोंडावर पाडण्याचे,हरवण्याचे,अद्दल घडवण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत्,जे मुख्यतः पैशानी हवे तसे हवे तेव्हा वापरले जातात,आणि ज्यांना आपल्या देशातील सगळ्या समाजातले,सर्व वर्गातले लोक आजकाल सहज बळी पडतात ...
एखाद्या शेतकर्यांसाठी लढणारयां नेत्यांच्या सभेची बातमी,त्यात पोटतिडकीने मांडलेले अनेक ज्वलंत आणि त्याच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले मुद्दे,झालेली चर्चा यांना आजकाल वर्तमानपत्रात खरच जागा असते का ? त्यापेक्षा एखाद्या शेतीवर उभ्या आयूष्यात चकार शब्द न काढलेल्या पुढारयाच्या "वाढदिवसाची "सचित्र बातमी पहिल्या पानावर झळकते...

Pages