हे गणराज्य की धनराज्य ?

Submitted by अभय आर्वीकर on 8 January, 2010 - 08:58

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!

एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!

डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!

विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही...!!

गंगाधर मुटे
....................................................................

गुलमोहर: 

मतपेटीतुन गेंडा जन्मला,धन्य झाली गणशाही...!!>>>>छान आहे.

साक्षात दोन हाताचा दोन पायांचा गेंडा डोळ्यासमोर दिसला!

कविता छानच आहे.

अभय आर्वीकर आणि गंगाधर मुटे ह्या वेगळ्या व्यक्ती आहेत ना ? टोटल लागली नाही म्हणुन विचारतोय.

सर्वांना मनपूर्वक धन्यवाद!

@नितीनचंद्र, कशाची टोटल नाही लागली? Happy

तुमच्या कवितेच्या खाली गंगाधर मुटे अस लिहलय. अस वाटाव की ही कविता गंगाधर मुटे यांची आहे. बर जर असेल तर स्पष्ट असा उल्लेख नाही. त्यानेही काही अडत नाही. पण अभय आर्वीकर आणि गंगाधर मुटे एकच व्यक्ती आहेत की काय असाही प्रश्न पडतो पण कवी फक्त टोपण नाव घेतो. याची टोटल लागली नाही.

नितीनचंद्रजी,
अभय आर्वीकर हा माझा मायबोलीवरील आयडी आहे.
अभय हे माझे काव्यात वापरायचे टोपणनाव. आर्वीचा राहणारा म्हणून आर्वीकर Happy

- गंगाधर मुटे

Pages