काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
डोळ्यांच्या कडा ओलावण्याचे अनेक प्रसंग.. पण अत्यंत संयतपणे हाताळल्याने "पुढे काय?" ते पाहायला प्रेक्षक तयार असतो. एक कलंदर, जिगरबाज व्यक्तिमत्व.. कलेचा ध्यास घेतलेलं.. परिस्थितीपुढे झुकायची वेळ येताच स्वतःच्या हिमतीनं उभं राहणारं.. स्वतःच्या कलेचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता लोकांचं भलं व्हावं असा निरागस उद्देश असणारं.. वेळच तशी आली म्हणून कलेच्या या होमात स्वतःची आहुती द्यायला मागेपुढे पाहत नाही.. पण या भावनेच्या भरात, वेडात घेतलेल्या उडीची जबर किंमत त्याला द्यावी लागते.. आयुष्यभर्..एकट्याला.
अतुल कुलकर्णीच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पैलवान गुण्या ते 'मावशी' हा दोन टोकांचा प्रवास त्यानं इतक्या जबरदस्त ताकदीनं पेललाय की तो बदल पाहता पाहता भान हरपतं. एका वाघाची शेळी झालेली पाहवत नाही , मन हेलावतं. सहानुभूती , कणव वाटतेच पण त्यापेक्षाही त्याचं कौतुक, त्याच्या जिगरला द्यावीशी वाटणारी दाद जिंकून जाते. आणि हेच दिग्दर्शकाला अभिप्रेत असावं. अतुलने त्याच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. कल्पनेपलीकडचा अभिनेता डोळ्यांसमोर साक्षात उभा केला आहे. या ग्लॅमरस जगात येण्यासाठी, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या, स्वतःला 'अभिनय' येतो असं समजणार्या हौशी कलाकारांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!
अजय अतुलच्या संगीताची तर आधीच इतकी प्रसिध्दी झालेली आहे त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगणे न लगे! सोनाली कुलकर्णी सारखी देखणी , लावण्यमयी अभिनेत्री मराठीला लाभली हे आपले भाग्यच! अमृता खानविलकर पाहुणी कलाकार म्हणून 'आता वाजले की बारा' गाण्यात आहे. ही गाणी ऐकायला जबरदस्त आहेत. पण शीर्षकगीत 'नटरंग' सिनेमात जितकं 'जाणवत' नाही तितकं ऑडिओ सीडी ऐकताना वेड लावतं. यातला ढोलकीचा ठेका इतका दिलखेचक आहे की त्याच्या 'तटकारा' बरोबर अंगावर काटा फुलतो. हे गाणं एकदा तरी ऐकाच. गुरु ठाकूरची गाणी नेहमीप्रमाणेच अचूक शब्दांची उधळण करणारी. गुरु ठाकूर सिनेमातही आहे. गुणा ज्याच्या मळ्यात काम करत असतो तो पाटील म्हणजे गुरु. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिल्याने चित्रपट कुठेच 'कमी पडलाय' असं वाटत नाही. तरीही तमाशावर चित्रपट आणि त्यात 'गुणा' हा शाहीर ..तर एक "सवाल जवाबाची बारी" असती तर अजूनच चार चांद लागले असते असं वाटलं. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, जो चित्रपट इतका जबरदस्त आहे त्याची मूळ कथा डॉ. आनंद यादवांची 'नटरंग' ही कादंबरी काय चीज असेल हे पाहण्यासाठी तरी मी ती वाचायला उद्युक्त झाले आहे!
झी टॉकीजने असेच एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढावेत, त्यांची याहून जास्त जाहिरात करुन प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात खेचून घ्यावा अशा शुभेच्छा! असे जर 'अतुल गुणवंत नटरंग' मराठीमध्ये असतील तर मराठी चित्रपटाला, नाट्यभूमी, लोककलेचा सुवर्णकाळ येतोय असं म्हणायला हरकत नाही!
आशु,छान थोडक्यात परिक्षण..
आशु,छान थोडक्यात परिक्षण.. पाहिला पाहिजे लवकरच हा चित्रपट..
आशु मी पाहीला first Day First
आशु मी पाहीला first Day First Show. खरच मस्त आहे. खुप वर्षानी लावणीप्रधान पण नेटका अणि चांगला चित्रपट आला. अतुल कुलकर्णीच्या अभिनयासह गुरु ठाकुरच्या गाण्यां द्यावी तेवढी दाद कमीच.
सोनाली कुलकर्णी लई भारी. छान नाचते , छान दिसते. आणि बर्यापैकी अभिनेत्रीही वाटली. किशोर कदम आणि बाकी सगळेही उत्तम.
अजय अतुलचं संगित मस्तच. गुणगुणावंस वाटणारं. "आता वाजले की बारा" मधे बेला शेंडेने लडिवाळपणाही मस्त पकडलाय. पण अमृता खानविलकरला लावणी नृत्य जमलंच नाही असं वाटलं मला. ती अरोबिक्स करते आहे असंच वाटलं. लावणी नर्तकीच्या हालचालींमधे जी मृदुता असायला हवी ती नव्हती. नुसत्या धांगडधिंगा हालचाली. मग सोनाली कुलकर्णी तिच्यासमोर तर अगदी झकासच नाचते. अप्सरा आली झकासच., खासच.
एकच गोष्ट खटकली -गणा वग लिहायला इतकी पुस्ताकं काढुन बसतो अभ्यासाला. मांग दाखवलाय एका खेडेगावातला. कदाचित जेमतेम लिहिता वाचता येत असेलही पण म्हणुन इतके मोठ्ठी पुस्तकं? पटलं नाही.
असो एकुण छान वाटला, पुन्हा बघण्याचा विचार आहे.
आताच नटरंग पाहिला. अतुल
आताच नटरंग पाहिला. अतुल कुलकर्णीने अतिशय सुंदर काम केलेय. केवळ त्याच्यासाठी एकदातरी पाहिला पाहिजेच. त्यामानाने सोनाली एवढी आवडली नाही. किशोर कदम नेहमीप्रमाणे.... अजय्-अतुल ने संगितात अगदी कमाल केलीय. खेळ मांडला हे गाणे एकदम बेस्ट.. फुलवा खामकरने 'अप्सरा आली' गाणे अतिशय सुंदर बसवलेय..
साधना, नटरंग बघायचा राहिलाच.
साधना, नटरंग बघायचा राहिलाच. टिव्ही वरच्या जाहिरातीत, सोनाली ओळखू येत नव्हती. तिच्या नृत्यात बरीच सुधारणा झालीय.
आणखी काही दिवसानी (म्हणजे सिनेमाच्या गल्ल्यावर परिणाम होणार नाही, अशी वेळ आली कि), सविस्तर लिहिणार का ?
अतुलचाच, सुखांत पण चांगला आहे ना ?
या सिनेमाचे परिक्षण आणि के ई एम मधल्या शानभाग नर्सचे ३६ वर्ष कोमात असणे, हि बातमी, एकाच दिवशी वाचली.
टिव्ही वरच्या जाहिरातीत,
टिव्ही वरच्या जाहिरातीत, सोनाली ओळखू येत नव्हती. तिच्या नृत्यात बरीच सुधारणा झालीय.
तुम्ही ती मुक्ता, दोघी वाली सोनाली कुलकर्णी आणि ही सोनाली यांची गल्लत करताहात बहुतेक..
सुखांत पण छान आहे, पण मी पाहिला नाहीय.
धन्यवाद साधना "नटरंग" चा
धन्यवाद साधना "नटरंग" चा रिविव्हु दिल्याबद्दल ..
मलाही पहायचाय .. फर्स्ट डे ला "दादर", "सायन" ला गेलो होतो .. पण निराशाच झाली :(.. दोन्हीकडे "हाऊस्फुल्ल!!! तोबा गर्दी " .. मग ठरवलं की निवांत पहायचा ..
आता दोन दोन "अतुल" आहेत म्हणट्ल्यावर चित्रपट अतुलनीय असणार यात काडीची शंका नाही ...
पण तुम्ही "नटरंग" बद्दल सविस्तर लिहलंत (मायबोलिकरांसाठी) तर उत्तम....
फुलवा खामकरने 'अप्सरा आली' गाणे अतिशय सुंदर बसवलेय..
खरचं खुपच सुंदर गाणं आहे .. लाजवाब .. कालच मी "सारेगमपा" मधे अतुल च्या आवाजात ऐकलं.. झ्क्कास ..
आणि हो "अभिलाषा " ने ही "मला जाउद्याना घरी" लावणी एकदम ठसक्यात सादर केली ...
आणि दिनेशदा या "सोनाली कुलकर्णी" यांनी पुर्वी "गाढ्वाचं लग्न" मध्ये मकरंद अनासकरसोबत .. अप्सरेची भुमिका केली आहे ..
टिव्ही वरच्या जाहिरातीत,
टिव्ही वरच्या जाहिरातीत, सोनाली ओळखू येत नव्हती. तिच्या नृत्यात बरीच सुधारणा झालीय.
>> LOL
सविस्तर लिहिणं मुद्दाम
सविस्तर लिहिणं मुद्दाम टाळलंय. हा चित्रपट 'अनुभवण्याचा' आहे. त्यामुळे कितीही लिहीलं तरी लेखणी कमीच पडेल! अमृताच्या एरोबिक्स बद्दल अनुमोदन! 'वाजले की बारा' गाणं जितकं ऐकताना भारी वाटतं तितकं त्याचं चित्रीकरण भावत नाही. फार दणादणा नाचते.
'अप्सरा आली ' शब्दशः लावण्यमय आहे! आणि अतुल ला फुलवाने जे 'ट्रेनिंग' दिलंय त्याला तोड नाही!
ही सोनाली कुलकर्णी म्हणजे ".. नामदेव घोटाळे" हा भरत जाधव चा सिनेमा आला होता त्यातली. "प्यार तूने क्या किया" मधली फरदीन ची बायको दाखवलेली नाही.
आता खरेच हळहळ वाटते, बघितला
आता खरेच हळहळ वाटते, बघितला नाही म्हणुन. आता सीडीची वाट बघावी लागेल.
मला या विषयावरुन, सख्या सजणा या जून्या सिनेमाची आठवण झाली.
गणपत पाटील या कलाकाराला, एकदा नाच्याची भूमिका केल्यावर सतत तश्याच भूमिका कराव्या लागल्या (पुढे आयूष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागले ) या ईमेजमधून बाहेर पडण्यासाठी, सख्या सजणा नावाचा सिनेमा आला होता. यात पैज हरल्याने, एका नर्तकीला (उषा चव्हाण ) नाच्याशी लग्न करावे लागते. मग ती जिद्दीने, त्याला माणसात आणते. सिनेमा चांगलाच होता, पण खास म्हणजे, लताने बर्याच कालावधीनंतर यात लावण्या गायल्या होत्या. दोन लावण्यांचे काहि शब्द आठवताहेत, ते असे
सख्या सजणा नका तूम्ही जाऊ
तूम्हाविना एकली कशी र्हाऊ मी
शूरवीर शिपाई शिवबाचं, डोईमंदी शिरपेच मानाचं
यशवंत होऊनी या घरला, भवानीला जोडीनं जाऊ
----
गत करु काई, कळं ना गं बाई
सजण शिपाई परदेसी
नीट सांडताती, आसवांचे मोती
डोळियाच्या शिंपी, तूझ्या पायी
लताने फारच छान गायल्या आहेत या लावण्या. पण बर्याच वर्षात ऐकल्या नाहीत.
मस्त नेटक परिक्षण, बघायला हवा
मस्त नेटक परिक्षण, बघायला हवा
सीडीची वाट बघावी लागेल असे
सीडीची वाट बघावी लागेल असे वाटतेय्....इकडे नाही बघायला मिळणार.....
सविस्तर लिहिणं मुद्दाम
सविस्तर लिहिणं मुद्दाम टाळलंय. हा चित्रपट 'अनुभवण्याचा' आहे. त्यामुळे कितीही लिहीलं तरी लेखणी कमीच पडेल! <<<<<<<<<<
अगदी अग्दी
लावणीची गाणी बेला शेंडेकडुन
लावणीची गाणी बेला शेंडेकडुन गाऊन घेतली इथे थोडी चुक झालीय.. कारण लावणीचा जो ठसका हवा तसा तो गाण्यातुन आपल्या मनात उतरत नाहि काहितरी कमी आहे अस लावणीची गाणी ऐकताना जरुर वाटतं त्यापेक्षा मला वाटतं वैशाली माडे हिने छान गायल असत कदाचित.. अजय -अतुल चं संगीतच इतक छान असत त्यामुळे हि बाब जरा गौण वाटली असेल पण तो ठसका नाहि.. उगाच खुपच नाजुकपणा वाटतो गाण्यात.
बेलानेही छान गायलीत असे मला
बेलानेही छान गायलीत असे मला तरी वाटले. वैशालीचे गाणे मी फार ऐकले नाहीय, कदाचित तिनेही छान गायली असती
मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे नाच्या पाहिजेच नाहीतर आम्ही काम करणार नाही हा मायलेकींचा हट्ट. आयुष्य काढलेल्या पांडोबाला आधी कसे सुचत नाही नाच्याचे?
साधना, हा हट्ट नसता तर
साधना, हा हट्ट नसता तर चित्रपट झाला असता का?
जोक्स अपार्ट, परिस्थितीपुढे हतबल होऊन हे काम करायला भाग पडणे, आणि तो एक आयुष्याला लागलेला कलंक होणं.. असं काहीतरी दाखवायचं असेल. शिवाय, तार्किक विचार करायचा तर
आयुष्य काढलेल्या पांडोबाला आधी कसे सुचत नाही नाच्याचे?
>> पांड्बा मायलेकींना म्हणतो की, "जेव्हा बायका तमाशात काम करत नसत तेव्हा पुरुषांनाच ते काम करावं लागत असे, म्हणून नाच्या असायचा. आता त्याची गरज काय??"
त्यावर त्या म्हणतात की, "लोकांना नवं काही दिलं तरच आपला फड चालेल. नाहीतर असले पन्नास फड सुरुच आहेत. आमच्यासाठी."
भांडवल नसलेल्या नवीन फडाला नशीबानं मिळालेली 'बाई' बदलण्याचा पर्याय्ही दुरापास्त आहे असंही ते बोलताना दाखवले आहेत.
खरंतर स्पष्टी. ची गरज नव्हती. पण या तर्कावर अजून चिरफाड नको म्हणून ही पोस्ट.
मी पण बघितला 'नटरंग', पण
मी पण बघितला 'नटरंग', पण कुठेच रिलेट करु शकलो नाही... कदाचित बाकीच्या प्रेक्षकांमुळेही असू शकेल.. कारण काही ठराविक वेळेस शिट्ट्या आणि आरडा ओरडी एवढ्याच गोष्टी ऐकू येत होत्या..
दुसरे कारण असेही असेल की तमाशा हा प्रकार फारसा माहिती नसल्यामुळे ही चित्रपट मनाची पकड घेऊ शकला नाही..
अतुल कुलकर्णीचा अभिनय सुरेखच.. आणि बाकीच्यांनी त्याला दिलेली साथ सुद्धा चपखल पण तरीही चित्रपट ठसला नाही...
पण एकदा बघायला काहीच हरकत नाही..
कसा पाहू, कुठे पाहू, कधी
कसा पाहू, कुठे पाहू, कधी पाहू...
बहुतेक देशात चक्कर होईल तेंव्हाच पहाणं होईल...
तब तक... इंतजार...
आशू, परीक्षण आवडलं. थोडक्यात
आशू, परीक्षण आवडलं. थोडक्यात आणि नेटकं.
परिक्षण आवडलं, <<आवर्जून
परिक्षण आवडलं, <<आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!>> हे फारच आवडलं!
आशू - परीक्षणाने उत्कंठा
आशू - परीक्षणाने उत्कंठा वाढवली आहे.
झी मराठी वर 'अप्सरा आली' गाण्याचा प्रोमो बघितला होता, तेव्हाच ठरवलेलं की हा सिनेमा बघायचाच.
इतके त्याचे चित्रिकरण गाण्या बरहुकूम होते की ब्बास !! आवडलेच.
छान परीक्षण. येथे बहुधा कला
छान परीक्षण. येथे बहुधा कला किंवा महाराष्ट्र मंडळ आणेल तेव्हा पाहता येइल. इतरही ठिकाणी बरेच चांगले वाचले आहे या चित्रपटाबद्दल.
आशु, चांगलं लिहिलंयस
आशु, चांगलं लिहिलंयस परिक्षण.
मी होतो तोपर्यंतच पाहून घ्यायला हवा होता. झीच्या सगळ्या चॅनल्सवर केवढी ती जाहिरात केली होती. आता ऑनलाईनच पहावा लागेल.
ऑनलाईनच पहावा लागेल >> म्हणजे
ऑनलाईनच पहावा लागेल >> म्हणजे पायरेटेड?
पाय ? हे कुठलं नवंच रेटींग
पाय ? हे कुठलं नवंच रेटींग आहे? एक्स माहिती आहे, वाय म्हणायचे आहे काय ?
नकुल/नंद्या, उगीच TP करु
नकुल/नंद्या, उगीच TP करु नकोस! :p
हो.. नाहीतरी मराठी सिनेमे
हो.. नाहीतरी मराठी सिनेमे कुठे आणि कसे पहायचे अमेरिकेत हा प्रश्नच आहे.
हल्ली बर्याच ठिकाणची
हल्ली बर्याच ठिकाणची महाराष्ट्र मंडळं organize करतात शोज् .. नाहीतर मग VCD/DVD (स्वतः जाऊ तेव्हा किंवा कोणाकडून तरी मागवून) बघता येईल .. पण अगदीच शक्य नसेल तर ऑनलाईन पर्यायाचा विचार कर ..
सचिन, सिनेमा १ जानेवारीला
सचिन, सिनेमा १ जानेवारीला रिलीज झालाय तेव्हा तू होतास का इथे? नसशील तर वाईट नको वाटून घेऊ. ए, प्लीज आता पुन्हा पायरसीवरुन इथे वाद घालू नका. तिकडे स्वतंत्र बीबी आहे तिथे जा. प्रत्येक नव्या सिनेमाचं परीक्षण आलं की तिथे दोन पळ्यांचं अर्घ्य द्यायचं.
परीक्षणाचं कौतुक केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
तटी. शेवटून दुसर्या परिच्छेदात थोडी भर घातली आहे.
अज्जिबात सीडीवर पाहु नये हा
अज्जिबात सीडीवर पाहु नये हा चित्रपट. थिएटरमध्ये जसा अनुभवता येईल तसा फिल सीडीवर पाहुन येणार नाही. जमत असेल तर थिएटरमध्ये जाऊनच पहा.
'एक अप्रतिम कलाकृती' इतकंच सांगता येईल. सोनाली कुलकर्णीचं काम भन्नाटच.
सुरवातीपासुन शेवटापर्यंत कुठेही मनाची पकड, चित्रपटाचा वेग सुटत नाही. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत हेच सिद्ध होईल ह्यावरुन.
धन्यवाद आशु आणि सगळेच. पाहणार
धन्यवाद आशु आणि सगळेच. पाहणार म्हणजे पाहणार.
Pages