सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? ही कल्पना खरी का? जंगलात खरोखरच कोणी राजा असतो का?
.
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? परंपरेने एखादे गृहितक चालत आलेले असेल तर ते तसेच स्वीकारायचे की त्यावर स्वतंत्रपणे विचार करायचा. आपण असे समजू शकतो की जे मागच्या पिढ्यांनी सांगितले ते सगळे बरोबरच आहे आणि त्यामुळे त्याला तसेच ग्रहण करायचे आणि अवलंबत जायचे.
.
या तर्काला मोडीत काढणारी काही उदाहरणे आपल्याजवळ आहेत. आधी कुणाचा तरी कोप झाला म्हणून माणसे मरायची आता विज्ञानाच्या शोधांमुळे विशिष्ट जिवाणूंमुळे माणसे मरतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे अनेक जुन्या प्रथा त्यामुळे आपण बदलल्या आहेत आणि नव्या ज्ञानाचा अंगिकार केलेला आहे.
.
तरीही आपण अनेक बाबतित परंपरागत चालत आलेल्या प्रथा आणि संकेत स्वीकारून जगत असतो. आपल्या पूर्वजांनी अनुभवातून आणि उपलब्ध ज्ञानातून या प्रथा सुरू केलेल्या असणार ही मान्यता असते. या प्रथा आपल्याला इतिहास कथांमधे, लोककथांमधे, लोकगीतांमधे विखुरलेल्या आणि जतन केलेल्या मिळतात. साहित्य आणि संस्कृतीमध्ये या प्रथा आणि संकेत आपले दिशादर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात. रोजच्या जीवनात आपल्याला त्याचा फायदा देखील होतांना आपण पाहतोच.
.
सरसकट जे मिळाले ते तसेच न स्वीकारता, जरा थांबून आपण काय करतोय त्याचा विचार करायला लावणारा एक मुद्दा एका पुस्तकात वाचनात आला. स्टिफन कव्ही यांच्या सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकात दृष्टीकोनात घडणारे मूलभूत बदल यावर त्यांनी विचार मांडले आहेत. त्यात ते म्हणतात की आपल्याला मिळालेल्या प्रथा आणि संकेत आपण आहेत तसे घेऊ नये. तर्कावर आधारित आणि विज्ञाननिष्ठ प्रयोगशील प्रक्रियेला वापरून त्यांना तपासावे आणि मग त्यांना स्वीकारावे. आवश्यकता भासल्यास संहितामधे संशोधन करून मग त्यांचा अवलंब करावा.
.
त्या अनुषंगाने विचार करतांना अनेक मुद्दे माझ्या मनात आले त्यातलाच एक मुद्दा म्हणजे सिंहाला जंगलाचा राजा कोणी केले?
.
याचे उत्तर शोधताना मनात आले की आपला इतिहास समाज निर्माण आणि जगण्याच्या पद्धतित घडणाऱ्या बदलांचा देखील इतिहास आहे. इतिहासातला बराच काळ आपण राजघराणी, राजे महाराजे यांनी व्यापलेला पाहतो. राजा ही संकल्पना सत्ताकारण आणि प्रजेचे रक्षण आणि नियोजन करण्यासाठी अस्तित्वात आली आणि बराच काळ ती व्यवस्था अस्तित्वात होती.
.
आपल्या कथा कहाण्या या साहजिकच त्या व्यवस्था अस्तित्वात असताना घडल्या. शक्तिशाली असे राजाचे वर्णन आणि स्तुती करताना राजाला सिंहाची उपमा दिल्या गेली असावी. शक्ती मधे ज्याला कुणी आव्हान देऊ शकणार नाही आणि ज्याला सगळे घाबरतील, ज्याला पाहताच त्याचा रूबाब जाणवतो अश्या प्राण्याची उपमा राजाला दिलेली आपल्याला दिसते.
.
याच उपमांचे पुढचे पाऊल म्हणजे सिंह हा जंगलाचा राजा असतो अशी संकल्पना अस्तित्वात आली असावी. आता सिंहाला राजा म्हटल्यावर राजाची कर्तव्ये त्याच्या आचरणावर प्रक्षेपित करून त्याच्या कथा आणि कहाण्या तयार झाल्या असाव्यात. मानवी समाज बदलत गेला. राजे-महाराजे आले आणि गेले, पण जंगलातील प्राण्यांचे जगणे तसेच राहिले, आणि अजूनही आपल्या कहाण्यांमधे सिंह जंगलाचा राजाच आहे.
.
सध्याच्या संदर्भात विचार केला तर आपण सध्या लोकतंत्र पद्धती स्वीकारून जगतोय. राजतंत्र आपण मागे सोडले आहे. आपण लोकतंत्राचे फायदे जगतो आहोत आणि राजतंत्र असण्यापेक्षा लोकतंत्र असावे असा आपला कल आहे.
.
जंगलातले प्राणी आणि त्यांचे जगणे पाहिले तर ते सगळे त्यांच्या जनुकांच्या प्रभावाने आपापले आयुष्य जगत असताना दिसतात. जंगलाची सत्ता, जंगलाचे राज्य आणि प्राण्यांचेच आधिपत्य या संकल्पना त्यांच्या जगण्यात आपल्याला दिसत नाहीत. आता आपण हे सगळे संदर्भ माहित असताना एका कोणत्यातरी प्राण्याला राजा म्हणून कथांमधे मांडणे गरजेचे आहे का? तसे केल्याने आपल्याला काय साध्य होईल यावर विचार करावा लागेल.
.
सिंह म्हणजे जंगलाचा राजा ही संकल्पना वास्तवाशी जुळत नाही, कारण सिंह हा फक्त एक मांसाहारी प्राणी आहे, जो इतर प्राण्यांना मारून खातो आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करतो. त्याला 'राजा' म्हणणे हे मानवी प्रक्षेपण आहे, ज्यात राजकीय व्यवस्था, सत्ता आणि पदानुक्रम यांचे प्रतीक सिंहाला राजा म्हणण्यात दिसते. जंगलात कोणताही प्राणी 'राजा' नसतो. प्रत्येक प्राणी परिसंस्थेतील एक विशिष्ठ भूमिका बजावतो. सिंह हा अग्रगण्य शिकारी असला तरी त्याचे अस्तित्व हे इतर प्राण्यांवर अवलंबून असते. हे सध्याचे वास्तविक ज्ञान आहे असे मानले तर जसे आधीच्या काळी सिंहाला राजा मानून लिहिण्यात आहे ते आपण बदलून वेगळे देखील लिहू शकतो.
.
बालकथांमधे वास्तविक जगाची समज निर्माण करण्याऐवजी सिंह जंगलाचा राजा हे रूपक सत्ता म्हणजेच श्रेष्ठत्व असा चुकीचा संदेश देतो का यावर विचार व्हायला हवा. जंगलात खरोखरच कोणीही 'राजा' नसतो; प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो. सिंह जंगलाचा एक भाग आहे पण सगळेच प्राणी उदाहरणार्थ गिधाडे, कीटक आणि वनस्पती देखील परिसंस्थेसाठी महत्त्वाचे असतात. वर्गभेद वर्गसंघर्ष, लिंगभेद आणि सत्तेची विषमता या संकल्पना मुलांना समजाव्या अश्या काळात आपण जगत असल्याने जंगलाचा राजा ही संकल्पना आपण विचारपूर्वक बदलावी का यावरही विचार करायला हवा असे मला वाटते.
.
आधुनिक बालकथांसाठी पर्यायी कल्पनांचा विचार करतांना मनात आलेले काही मुद्दे:
.
जर आपण मुलांना समतावादी, विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या कथा सांगाव्या असा विचार केला तर काही पर्याय मनात येतात ते असे:
.
1. सहकार्याचे जंगल – प्रत्येक जीवाची महत्त्वाची भूमिका
• कथानक: सिंह, हत्ती, मुंगूस, माशी, झाडे सर्वजण मिळून जंगलाच्या समस्यांचे निराकरण करतात.
• संदेश: कोणीही एकटे 'राजा' नसून, प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
• उदाहरण: एकदा जंगलात पाण्याची टंचाई पडली. सिंहाने गर्जना करून सर्वांना जमा केले, हत्तीने खड्डा खोदला, मुंग्यांनी पाण्याचे स्रोत शोधले, आणि झाडांनी सावली दिली. अशा प्रकारे सर्वांनी मिळून समस्या सोडवली.
.
2. निसर्गाचे संरक्षक – पर्यावरणवादी पात्रे
• कथानक: एक मुलगा/मुलगी किंवा प्राणी (उदा., कोल्हा, उंदीर) जंगलाचे संरक्षण करतात (झाडे लावतात, प्रदूषण थांबवतात).
• संदेश: मनुष्य आणि प्राणी यांना निसर्गात एकजूटपणे राहता येते.
• उदाहरण: एक मुलगा आणि त्याचा मित्र कोल्हा यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे दुखावलेल्या कासवाला वाचवले आणि गावकऱ्यांना प्लास्टिक वापरू नका असा संदेश दिला.
.
3. प्रश्न करणाऱ्या मुलांच्या कथा – अंधश्रद्धा आणि जुने विचार बदलणे
• कथानक: एक मुलगी विचारते, "सिंह जंगलाचा राजा का? तर मग हत्ती, वाघ किंवा माणूस का नाही?" आणि हळूहळू ती समजून घेते की ही फक्त एक मानवी कल्पना आहे.
• संदेश: प्रश्न करणे, तर्क करणे आणि जुन्या कल्पनांवर विचार करणे हे महत्त्वाचे आहे.
.
4. बिनराजाचे जंगल – समानतेवर आधारित कथा
• कथानक: जंगलातील प्राणी ठरवतात की आता कोणीही राजा नाही, सर्व निर्णय एकत्र घेतले जातील.
• संदेश: लोकतंत्र, सहमती आणि सामूहिक निर्णय हेच खरे शक्तिशाली आहेत.
• उदाहरण: जंगलातील प्राण्यांनी मिटिंग घेऊन ठरवले की आता कोणीही एकटा निर्णय घेणार नाही. सर्व मिळून नियम बनवतील. सगळे नियम पाळत सहकार्याने राहतील.
.
कथांमध्ये अजून काय काय बदलता येईल विचार केला तर असे वाटते की
.
1. पात्रांची विविधता वाढवता येईल जसे राजा-राणी ऐवजी शिक्षक, डॉक्टर, संशोधक, पर्यावरणवादी यांसारखी पात्रे आणि सिंह-वाघांऐवजी उंदीर, साप, पक्षी यांना पण महत्त्व देता येईल का पाहता येईल.
2. निसर्गाची यथार्थ कल्पना समोर आणण्याचा प्रयत्न करताना जंगल हे केवळ 'शक्तिशाली विरूद्ध दुर्बल’ अशी यंत्रणा नसून, एक समतोल परिसंस्था आहे हे दाखवता येईल.
.
जर आपण मुलांच्या मनात समता, सहकार्य आणि बुद्धिवाद यांचे बीज रोवू पाहत असू, तर त्यांच्या कथांमधून जुन्या रूपकांना बदलणे गरजेचे आहे किमान काही रूपकांवर विचार करून आधुनिक कथा समोर आणणे आवश्यक आहे असे मला वाटते.
.
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, ११ एप्रिल २०२५
सिंहाला जंगलाचा राजा कोणी केले?
Submitted by तुष्कीनागपुरी on 10 April, 2025 - 14:18
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विचार चांगला आहे.
विचार चांगला आहे.
अश्या आधुनिक कथा अध्येमध्ये वाचल्या आहेत.
पण खरे सांगायचे तर त्या तितकी मजा देत नाहीत. कदाचित वर्षानुवर्षे मनावर बिंबवले गेलेले पुसणे कठीण असल्याने असेल.
यावर एक अजून पर्याय म्हणजे सिंहाला जंगलाचा राजा राहू देणे आणि नार्निया सारखी कथा सांगणे ज्यात तो सिंह कर्तव्यदक्ष राजा दाखवणे.
कारण प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा प्रत्येकाच्या भूमिकेला काही ना काही महत्त्व असले तरी सारेच समान नसतात. प्रत्येक समूहाचा कोणीतरी एक लीडर असतोच. त्यामुळे कोणी लीडर नसतोच असे सांगण्यापेक्षा लीडरने कसे असावे हे सांगणे जास्त योग्य राहील.
विचार करायला लावणारा लेख !!
विचार करायला लावणारा लेख !!
ऋन्मेश+१
Lion King मध्ये सुद्धा Simba चांगला, दयाळू, नितीवान राजा दाखवला आहे.
Lion is indeed the KING of
Lion is indeed the KING of the jungle!!!! People who coined such rich sayings are full of “Barn Yard” wisdom of sayings, proverbs, idioms, metaphors, allegories, aphorisms, Smilies, Epigrams,.. whatever..
.............Obviously, people who doubt and distort the meaning of such sayings have never gone to the forest and seen the nature as their ancestors did!! Yes, indeed, Large feline species like Lions and tigers are the King's of the jungle. What is implied here that this species has NO natural predators!!! They are fearless. Just go to Geer forest and watch some lion cubs growing up in the nature, they are fearless rolling in the mud grass whatever they please. No other animal pups have such "royalty, growing up. They are NOT afraid of anything or anybody. They have no stress response or surge of the adrenaline of somebody else is going to eat them up! They have surge of adrenaline only when they are approaching a prey!
Yes, there is "strength in numbers," and many animal species who evolved in a large social group are more "successful," than other solitary animals. in survival. Even lions bury their heads when a swarm of Tsetse flies attacks, but Lions are still King of the jungle. Unafraid, fearless, majestic, beautiful and full of grace, qualities humans admire. Don't read beyond in between the lines.
लायन किंग मध्ये आपल्याला
लायन किंग मध्ये आपल्याला खायला एक नवा भक्षक आलाय याचा या प्राण्यांना इतका काय आनंद झालाय की अगदी अहमिकेने त्याला बघायला जात आहेत
हरणे वगैरे सांगत असतील तो बघ तो छोटा सिंह आहे तोच मोठा होऊन तुला खाणारे बर का
फक्त पोटापुर्ती शिकार करतो म्हणून सिंह दयाळू तर मग बाकीचे मांसभक्षक काय जास्तीची शिकार फ्रीजमध्ये भरून ठेवतात काय
सगळेच पोटापाण्यासाठीच करतात शिकार
असो, विषय वेगळाय पण सरांना अनुमोदन
लहान मुलांच्या गोष्टी मध्ये फँटसी राहू द्यावी
अकखे आयुष्य पडले आहे तर्कशुद्ध विचार करण्यासाठी
त्या वयात पॉवरफुल असण्याची क्रेझ असते म्हणून तर सगळे सुपरहिरो आले
अकरावीला मराठीत भोपळ्यात
अकरावीला मराठीत भोपळ्यात बसलेली म्हातारी आणि विद्वान असा काही एक धडा होता त्याची आठवण झाली.
तुमचे लेख स्वसंवादासारखे
तुमचे लेख स्वसंवादासारखे वाटतात. त्यात आपण खडा मारावा कि अजून समजून घ्यावे हा विचार पडतो.
लेखाचा आत्मा पोहोचला आहे आणि तो मान्य आहे.
पण त्या साठी उदाहरणे जी घेतली आहेत त्या कविकल्पना आहेत. कविकल्पना आणि सारासार विवेक हातात हात घालून चालत नाही. मुलांना कल्पनेच्या भराऱ्या मारायला पण शिकवलं पाहिजे, जादूच्या कहाण्या पण ऐकवल्या पाहिजेत ज्यामुळे मनोरंजनाची मूल्ये जोपासण्यासाठी मानसिक तयारी होते नाही तर जीवन एकरेषीय आणि नीरस होईल.
त्याच वेळी हे फक्त मनोरंजन आहे, वास्तवात विज्ञान / निसर्ग हेच सत्य आहे हे संस्कार केले पाहिजेत. रॅशनलिजम ही जीवनशैली आणि कल्पनारंजन हे जीवनात रस निर्माण करण्यासाठी असे सर्वंकष संस्कार केले पाहिजेत.
लेखाचा आत्मा बाजूला सारला आणि
लेखाचा आत्मा बाजूला सारला आणि सिंह जंगलचा राजा (राजा म्हणजे कल्याणकारी राज्याचा नेता नाही तर हुकूमत म्हणून) आहे का कि वाघ हा राजा असतो हा इंटरेस्टिंग प्रश्न होईल. या धाग्यावर अपेक्षित नसेल तर क्षमस्व!
@रानभुली,
@रानभुली,
या धाग्यावर काय अपेक्षित असेल काय नसेल हा प्रश्न अनुपस्थित आहे कारण मी लेख लिहून प्रकाशित केला तेव्हाच तो माझ्या कक्षेतून पुढे गेलेला आहे. आता वाचकांना जे पोहोचलेय आणि त्यामुळे जे तरंग उमटताहेत ते वाचकांचे सत्य आहे आणि मला ते सगळे वाचायची उत्सुकता असतेच.
.
> कल्पनारंजन हे जीवनात रस निर्माण करण्यासाठी
.
कल्पनारंजन करताना देखील जी जीवनमूल्ये आपण शिकवू पाहतो ती आपण बदलत नाही ना? नव्या कथांमधे गुलामी, सती प्रथा, एका वर्गाला फक्त ते वेगळे दिसतात म्हणून डांबून ठेवणे अश्या घटना आपण कल्पनारंजन करताना देखील लिहिणार नाही ना?
.
राजा ही संकल्पनाच जर आता नाही तरीही आपल्या कथांमधे कल्पनारंजनामध्ये कुणीतरी राजा असणे आपण सुरू ठेवावे का हाच तर मुद्दा आहे.
गुलामी, सती हे असंबद्ध आहे.
गुलामी, सती हे असंबद्ध आहे. अशाने प्रतिसादा पेक्षा डिस्क्लेमर मोठे द्यायला लागतील आणि उस्फूर्तता बाद होईल.
तरतमभावाबद्दल लिहिलेच आहे ते इथेही लागू.
प्राणी बोलतात, चंद्र तारे तोडून आणणे अशा उपमा हे सगळे बाद करावे लागेल.
कवितेत ताऱ्याऐवजी प्रेयसीला उद्देशून स्पेस स्टेशन मधून संदेश पाठवीन अशी सायंटिफिक आर्जवे करावी लागतील.
हे खोटं आहे हे माहिती आहे, ते निरूपद्रवी आहे आणि तरी फसवणूक हा उद्देश नाही असे कल्पना रंजन असायला हरकत काय आहे?
परी कथा, हॅरी पॉटर हे सगळे रद्दबातल ठरवायचे आहे का?
दिक्षित काकांच्या अभिप्रायात
दिक्षित काकांच्या अभिप्रायात राजाची एक व्याख्या वाचायला मिळते.
.
ज्याला कुणी नैसर्गिक मारणारा नाही. जो कुणाला घाबरत नाही. जो ऐटीत राहतो रूबाबदार दिसतो. ज्याला कधी भितीने धावावे लागत नाही. असा जीव म्हणजे राजा अशी ती व्याख्या आहे.
.
इतकीच मर्यादित राजा शब्दाची व्याख्या असेल तर आपल्या इतिहारातल्या राजांना देखील या व्याख्येने राजा म्हणणे कमीपणाचे होणार नाही का?
.
राजाची ही व्याख्या असेल तर मी समजत होतो तशी लोकनेता, प्रजेचा पालक, न्यायदाता असणारा व्यक्ती अशी व्याख्या बाजुला ठेवून फक्त रूबाबात राहून आणि आपलेच बघणारी व्यक्ती राजा म्हणावी लागेल.
@रानभुली,
@रानभुली,
.
| हे खोटं आहे हे माहिती आहे, ते निरूपद्रवी आहे आणि तरी फसवणूक हा उद्देश
| नाही असे कल्पना रंजन असायला हरकत काय आहे?
| परी कथा, हॅरी पॉटर हे सगळे रद्दबातल ठरवायचे आहे का?
.
माझ्या लेखात मी असे कुठेही लिहिलेले नाही की कल्पना रंजन नको किंवा असेही लिहिलेले नाही की विज्ञान म्हणेल तसेच लिहायची सक्ती असावी. मुळात कल्पना किंवा परिकथा लिहू नयेत असेही मी कुठे लिहिलेले नाही.
.
माझा मुद्दा वेगळ्या शब्दात पुन्हा लिहायचा प्रयत्न करतो बघुया पोहोचते का.
.
एक संकल्पना जी आता कालबाह्य झालेली आहे, तिला आपण आपल्या परिकथा किंवा कल्पनेतही आवश्यक किंवा चांगली दाखवत नाही असे मला वाटते. जसे परिकथेतल्या परीने चार नोकर ठेवलेले होते ज्यांना ती वाट्टेल तसे कामे करायला सांगायची असे आपण आताच्या समकालीन परिस्थितीत माडू का? तसे मुलांना चांगले असते असे शिकवायची इच्छा आपल्याला होईल का?
.
त्याच प्रमाणे राजा ही संकल्पना जर जुनी झालेली असून सहकार्याने लोकतंत्राने समाजाचे अधिक भले होते हे आपल्याला पटत असेल तर परिकथेतही परी ही एका राजाची मुलगी होती असे दाखवायची आपल्याला गरज वाटेल का?
.
अजूनही जंगलातल्या प्राण्याची परिकथा कल्पक कथा लिहितांना, जंगलचा राजा सिंह होता, त्याने अमूक केले असे सांगून राजा असणे म्हणजे मोठी उपलब्धी असते असे सूक्ष्म संदेश आपण द्यावेत का? हा विचार करण्याचा मुद्दा मला वाटतो
हजार हजार वर्षे राज्य करणारे
हजार हजार वर्षे राज्य करणारे राजे, हजार वर्ष पूर्ण होत आले आणि तपात इंद्राने खोड घातली की लगेच पुढील हजार वर्षे तप करायला मागे पुढे न पहाणारे ऋषि, आणि त्यात कित्येक राजांना नरशार्दूल, नरव्याघ्र अशा उपमा आहेत.
त्यामानाने जंगलाचा राजा सिंह/वाघ ही तर फारच छोटीशी निरुपद्रवी फँटसी वाटते.
------
रानभुली यांनीही फॅन्टसीबद्दल हाच मुद्दा मांडला आहे. ती निरुपद्रवी आहे, मनोरंजक आहे.
तुमचा लेख पोहोचला असे आधीच
तुमचा लेख पोहोचला असे आधीच म्हटले आहे.
तो प्रतिसाद पुन्हा वाचलात तर तुम्हाला मला काय म्हणायचे ते समजेल.
पुनरुक्ती टाळतेय.
मला वाटतं बालकथा या
मला वाटतं बालकथा या त्यांच्या तात्पर्यासाठी ('मॉरल ऑफ द स्टोरी') सांगितल्या जातात न की रूपके मनावर ठसविण्यासाठी. (आणि त्या तशाच सांगणे पूर्वीपासूनच अपेक्षित आणि अभिप्रेत होते, कदाचित या बाबतीत अनभिज्ञ असलेल्या पालकांची अधिक तयारी करून घेणे गरजेचे असावे तो वेगळा विषय ). कथेचा गाभा योग्यप्रकारे समजावल्यास त्यामध्ये येणारी रूपके ही गौण असतात असं माझं मत आहे, कारण जरी कळत नकळत त्या रूपकाचा प्रभाव काहीप्रमाणात बालमनावर पडला तरी पुढे जाऊन आयुष्यात ती रूपके आणि त्याच्या वास्तवातील संकल्पनाच उलगडा बहुतेक सर्वानांच होतो. रहाता राहिला प्रश्न रूपके बदलून मनात
समता,सहकार्यआणिबुद्धिवादयांचे बीज रोवण्याचा तर, यांचा बोध बालकथांच्या तात्पर्यातून नक्कीच घेता येतो त्यामुळे केवळ रूपके बदलून हे बीज रोवणे, हा प्रकारचं मला मुळात आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरीतला वाटतो आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात जितका हातभार बुद्धीवादाचा लागला आहे तितक्याच प्रमाणात Imagination, Cognitive Flexibility, Creativity, Abstract Thinking, Analogies या मानवी गुणांचा देखील हातभार लागला आहे. मुलांचे बालपण आपण पूर्णपणे Rationalize गोष्टीनी भरून टाकून आपण त्यांच्या विचारशक्तीला, बालसुलभ जिज्ञासेला, प्रतिभेला आणि त्यायोगे एकूणच मानवाच्या प्रगतीला एका चौकटीत बंदिस्त करू जे माझ्यामते 'रोगा पेक्षा इलाज भयंकर' असा काहीसा प्रकार होईल.| मुलांचे बालपण आपण पूर्णपणे
| मुलांचे बालपण आपण पूर्णपणे Rationalize गोष्टीनी भरून टाकून
| आपण त्यांच्या विचारशक्तीला, बालसुलभ जिज्ञासेला, प्रतिभेला आणि
| त्यायोगे एकूणच मानवाच्या प्रगतीला एका चौकटीत बंदिस्त करू
.
हे वाक्य वाचून गम्मत वाटली.
.
खरे तर माझ्या मते जीव जन्माला येतो तेव्हा तो अनंत, अनिर्बंध असतो, आपण शिक्षण आणि परंपरा आणि कथा कहाण्या सांगून त्याला चौकटीमधे बांधत असतो. म्हणजे कदाचित ही चौकट की ती चौकट असा आपला मुद्दा सध्या दिशा घेतोय. स्वतःहून शोधून काढून समजून घेण्याची प्रत्येकाजवळ संधी आणि वेळ नसते त्यामुळे सुरवात या चौकट्या घेऊनच होत असते. म्हणूनच चौकटीत बंदिस्त करू नव्हे तर आपण करतोच आहोत येणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला चौकटीत.
.
जे कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे फुलाला गुलाब म्हटले तरीही एक चौकट लागली आपल्या मनात असलेल्या गुलाबाची चौकट आता आपली मर्यादा आहे.
.
कथा कहाण्यांमधून देखील सूप्तमनाच्या पातळीवर सूक्ष्म प्रशिक्षण होत असते त्यामुळे काय बिघडले अजुनही कथांमधे सिंहाला राजा रंगवले तर असे म्हणले तर? राजा ही जगण्याची चौकट जी आता आपण सामाजिक जीवनात आचरत देखील नाही ती चौकट आपण पाळत नाही आहोत का? चांगले असण्यासाठी, शूर असण्यासाठी, न्याय करण्यासाठी, जी कामे करावी लागतात ती आपल्या गोष्टींमधे फक्त राजा लेवल चिच व्यक्ती करत असते यातून कोणते काम कुणी करायचे असते याची एक सूक्ष्म चौकट आपण घालून देत नाही का?
.
साधक बाधक चर्चेसाठी सर्वांचे आभार
यातून कोणते काम कुणी करायचे
यातून कोणते काम कुणी करायचे असते याची एक सूक्ष्म चौकट आपण घालून देत नाही का?>>> 'रोगा पेक्षा इलाज भयंकर' या माझ्या वाक्यातच ते आले, सूक्ष्म चौकटी(रोग) बनतात यावर दुमत नाही, पण एक अशी चौकट जी पुढे जाऊन आयुष्यात आजच्या जगात बहुतेकांच्या खिजगिणतीत ही रहात नाही, ती मोडण्याच्या नादात या ट्रेडऑफ मध्ये इतर महत्वपूर्ण गोष्टीनां, ज्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा/विचार प्रक्रियेचा गाभा बनतात त्यांना नकळत नख लागते असा अर्थ मला अभिप्रेत होता.
समारोप?
समारोप?
समारोप?
समारोप?
आपण सोप्या भाषेत बोललो तर माझ्यासारख्यांना समजेल.
सिंह जंगलचा राजा हे पंचतंत्र ईसाप नीती सारख्या गोष्टी शिकवतात. यातून मिळणारे शहाणपण हे रंजक पद्धतीने सांगण्यासाठी प्राण्यांचा वापर केलेला असतो. मुलं प्राणी पक्षी अशा गोष्टी आवडीने ऐकतात.
चिमणी माकडांशी बोलू शकत नाही हे नंतर त्यांना कळत. किंवा तेव्हा ही माहिती असतं. मग जी गोष्ट घडतच नाही ती गोष्टीतून वजा करायची का?
त्या गोष्टीतून मूर्खांना शहाणपणा शिकवणे हा मूर्खपणा आहे हे मुलांना समजतं. हेच उपदेश म्हणून सांगितले तर लक्षात न राहणे, कंटाळा येणे असे प्रकार घडतात.
उद्देश महत्त्वाचा नाही का?
राजा म्हणजे जो बलवान आहे त्याच्याशी कसा व्यवहार ठेवायचा हे मुलांना शिकवणे गरजेचे आहे. बोधकथा ते शिकवतात.
जगात समता नाही ती प्रस्थापित करावी लागते. आपल्या आजूबाजूला गुंड, राजकारणी, बलवान लोक असे लोक असतात. त्यांच्याशी कसं डील करायचं याचं शिक्षण अशा कथा करतात..
समता आणि उच्च मानवी मूल्ये रूजवणारे शिक्षण पण द्या ना. ते देऊ नये असं कोण म्हणतं? पंचतंत्र शिकल्याने ते अशक्य होईल का?
सिनेमात हिरो खालून वर उडी मारतो.. ते खोटं आहे हे सर्वांना माहित असते. ते मनोरंजन म्हणूनच पाहिले जाते.
सिंह हा जंगलातला सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. तो दुसर्या सिंहाला जंगलात प्रवेश करू देत नाही म्हणजेच ही माझी टेरिटरी ही भावना त्यांच्यात असतेच. ज्या जंगलात सिंह असतो तिथे शक्यतो वाघ नसतो. वाघाचे जंगल वेगळे असते. तो सुद्धा त्या जंगलचा राजा असतो.
हे झालं सायन्स. यामुळे जंगलात प्राणी संख्या टिकून राहते, जीवन लुप्त होत नाही. एका पेक्षा जास्त राजे झाले तर शिकार वाढेल आणि प्राणी लुप्त होतील.
त्यामुळे राजा आहे हे खरेच आहे.
आपल्याकडे राजे गेले तरी त्यांची जागा इतरांनी घेतली नाही का? साधा पोलीस सुद्धा अधिकारामुळे शक्तीशाली असतो.
आपण मुलांना तत्वं शिकवली आणि व्यवहार शिकवला नाही तर हे शक्तिशाली लोक त्यांना शिकवतील. कधी कधी ते महागात पडेल.
असा प्रसंग आला तर मुलांना चतुराईने वागता आलं पाहिजे. तिथे सगळे समान आहेत अशी मूल्ये सांगून काय फायदा?
हा माझा कदाचित अपुरा प्रयत्न असेल. पण यापेक्षा जास्त नाही सांगता येत ही मर्यादा आहे.
@रानभुली, वेळ देऊन तुम्ही
@रानभुली, वेळ देऊन तुम्ही तुमचे मत सविस्तर सांगताय त्यासाठी अनेक धन्यवाद.
.
| उद्देश महत्त्वाचा नाही का?
| राजा म्हणजे जो बलवान आहे त्याच्याशी कसा व्यवहार ठेवायचा हे
| मुलांना शिकवणे गरजेचे आहे. बोधकथा ते शिकवतात.
.
तुम्ही तुमचेच शब्द आता वाचून सांगा की कथांमधे राजाची आज्ञा पाळणे, राजाला सदैव मान देणे असे आपल्या कथांमध्ये आहे हो ना? म्हणजे बलवान आहे म्हणून त्याचया सगळ्या आज्ञा पाळायच्या त्याला घाबरायचे हे अभिप्रेत असेल तर असे वागणे खरेच तुम्हाला शिकवायचे आहे का मुलांना?
.
| जगात समता नाही ती प्रस्थापित करावी लागते.
| आपल्या आजूबाजूला गुंड, राजकारणी, बलवान लोक असे लोक असतात.
| त्यांच्याशी कसं डील करायचं याचं शिक्षण अशा कथा करतात..
.
गुंड, राजकारणी, बलवार लोकांशी डील करायला शिकवणे हे शिक्षण गोष्टीतला राजा कसे देतो आणि सिंह जा जंगलाचा राजा दाखवून हे कसे शिकायला मिळते ते समजून घ्यालला मला आवडेल. मला वाटत होते की राजा ही संकल्पना आपण एका प्रदेशाचे सार्वभौम राज्य जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात अनिर्बंध असते त्या ला आपण म्हणतो, तसा राजा खरेच आपल्या मुलांना गुंड, राजकारणी, बलवान लोकामशी डिल करायला कसे शिकवतो याची काही उदाहरणे आठवली तर सांगा म्हणजे अधिक समजेल.
| सिंह हा जंगलातला सर्वात शक्तिशाली प्राणी आहे.
| तो दुसर्या सिंहाला जंगलात प्रवेश करू देत नाही म्हणजेच
| ही माझी टेरिटरी ही भावना त्यांच्यात असतेच. ज्या जंगलात
| सिंह असतो तिथे शक्यतो वाघ नसतो. वाघाचे जंगल वेगळे असते.
| तो सुद्धा त्या जंगलचा राजा असतो. हे झालं सायन्स. यामुळे जंगलात प्राणी संख्या टिकून राहते, जीवन लुप्त | होत नाही. एका पेक्षा जास्त राजे झाले तर शिकार वाढेल आणि प्राणी लुप्त होतील.
| त्यामुळे राजा आहे हे खरेच आहे.
.
या वाक्यांमधे राजा ही संकल्पना जी तुम्ही मांडली आहे ती माझ्या माहितीमधल्या राजा संकल्पनेपासून वेगळी आहे. एका प्रदेशात एकच राहू शकतो आणि इतर कुणाला राहू देत नाही तो राजा. त्याच्या इतका क्रूर शिकारी दुसरा त्या प्रदेशात असू नये हे करणारा शिकारी म्हणजे राजा अशी राजा शब्दाची व्याख्या व्हायला लागली तर असा राजा मला कोणत्याही गोष्टीमधे येऊन मुलांना नक्की काय शिकवेल हे समजत नाहीये.
.
| आपल्याकडे राजे गेले तरी त्यांची जागा इतरांनी घेतली नाही का?
| साधा पोलीस सुद्धा अधिकारामुळे शक्तीशाली असतो.
| आपण मुलांना तत्वं शिकवली आणि व्यवहार शिकवला नाही तर
| हे शक्तिशाली लोक त्यांना शिकवतील. कधी कधी ते महागात पडेल.
| असा प्रसंग आला तर मुलांना चतुराईने वागता आलं पाहिजे.
| तिथे सगळे समान आहेत अशी मूल्ये सांगून काय फायदा?
.
चतुराईने वागता आले पाहिजे, पोलिसांनी अतीप्रसंग केला तर त्याला प्रतिकार करता आला पाहिजे हे सिंद राजा आहे हे सांगुन कसे शिकवायचे हे पण मला कळत नाहीये. मुळात मानवाने राजतंत्र असताना वैचारिक चळवळ करून ते लुप्त केले आणि लोकनिर्धारित प्रतिनिधी हा अधिकार आनि पदाच्या जागेवर असेल असे लोकतंत्र शोधून काढले. त्यात त्या पदावर बसलेल्या प्रतिनिधिला देखील काही काळाचे बंधन राहील असे उपाय संविधानात केले.
.
सिंह जंगलाचा राजा असतो असे सांगुन गोष्तीमध्ये आपण पोलिसांशी किंवा गुंडांशी कसे डिल करायचे हे कसे शिकवणार याचा विचार करतोय.
मी स्वतःला मुक्तप्रयोगशाळा
मी स्वतःला मुक्तप्रयोगशाळा गटातला मानतो आणि वेगळे दृष्टीकोण वाचून माझी मते आणि विचारपद्धतीमधे नवीन भरती होते का हे पहायला मला आवडते, अभिप्रायांतून वेगवेगळी मते वाचून मदत मिळते. अभिप्राय लिहिणे यासाठी पण वेळ द्यावा लागतो याची मला जाणीव आहे त्यामुळे सगळ्या अभिप्रायदात्यांचा मी ऋणी आहे.
तुम्हाला मी मागच्या
तुम्हाला मी मागच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा असे म्हटले होते.
त्यानंतर स्वतः होऊन मी प्रतिसाद दिला ही माझी चूक झाली.
तुम्ही राजा ही एकच एक कल्पना मनात धरून बसला आहात आणि माझा प्रतिसाद अर्धवट वाचून प्रतिवाद करत आहात.
हा संवाद नाही. क्षमस्व.
आम्ही नाही केले.
आम्ही नाही केले.
गेंडा नाही कुणाला घाबरत.
वेगळा विचार म्हणून आवडला. पण
वेगळा विचार म्हणून आवडला. पण लोकशाहीसाठी वेगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील. पारंपरिक गोष्टीत बदल केले तर किती बोरिंग होतील पहा.
उदा. एक मध्यम आकाराचे नगर असते, त्यात एक नगरसेवक राहत असतो. त्याला एक मुलगी असते ....
.....
ती मुलगी त्या बेडकाचे चुंबन घेते आणि त्या बेडकाचा एक सामान्य माणूस होतो.
शी! त्यापेक्षा राजकन्या राजपुत्र छान वाटतात.
हर्पा..
हर्पा..
रोजच्या आयुष्यात तोच तोच पणा
रोजच्या आयुष्यात तोच तोच पणा येतो म्हणुन तर माणुस कथा कविता रचुन स्वप्नरंजनात रमुन थोडे मनोरन्जन शोधतो. नगरसेवकाच्या मुलीच्या आयुष्यात काय असे वेगळे होणार आहे ज्यात वाचक किंवा श्रोता गुंतुन जाईल.. त्यात तो श्रोता दोन वर्षांचे बाळ असेल तर त्याला नगरसेवकाच्या आयुष्यात पद मिळाल्यापासुन ह्या अ आणि अ गोष्टी घडल्या त्यात रस नसेल. एका नुकत्याच फुललेल्या फुलबाळावर एक फुलपाखरु बाळ येऊन बसले अशी सुरवात असलेली गोष्ट त्याच्या कल्पनाशक्तीला चालना देऊ शकेल.
मुळ धाग्यात जे लिहिलेय ते तर्कसुसंगत आहे पण माणसांना सतत काहीतरी वेगळे हवे असते. जे समोर घडत नाहीय त्याच्या कल्पनेत भरार्या मारायला त्याला आवडते. त्याच्या मानसिक वाढीसाठी ह्या गोष्टी कदाचित मदत करु शकत असाव्यात.
जंगलाचा राजा सिंह जरी असला
जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी दरारा वाघाचा असतो.
रानभुली यांच्याशी सहमत.
रानभुली यांच्याशी २००% सहमत.
जिथे आपल्यापेक्षा समोरचा शक्तीने बळकट असेल (वाचा : सिंह) तरी त्याला शक्तीने नमवता येते.. वरवर त्याला मान देतो आहोत असे भासवून (सुसरबाई तुझी पाठ मऊ) त्याची हत्या सुद्धा घडवून आणता येते (पाहुण्याच्या काठीने साप मरणे) असे पंचतंत्रातील अनेक गोष्टींमधून कळते. त्यामुळे राजा सिंह असूनही त्याला युक्तीने ठार करणारा ससा मला आवडतो.
आजच्या समाजात आपल्याला ९०% गुंडाराज ला सामोरे जावे लागतेय. देव न करो पण सद्य परिस्थिती आपल्या पुढच्या पिढीला याहून जास्त जंगलराज / गुंडाराज / झुंडशाहीला सामोरे जावे लागेल असेच चित्र दिसते. आजुबाजूच्या काही प्रगत आणि "गाफील" देशांकडे नजर टाकली तर हे अगदी सहज लक्षात येते.
अशा वेळी या गोष्टीच उपयोगी पडणार आहेत मुलांना. पंचतंत्र तर नावाला मुलांसाठी लिहिलेले आहे. त्यातून मिळणारे कितीतरी बोध खरे adults ना आजकाल रोजच्या वापरात आणावे लागतात अशी सिच्युएशन आहे (चिमणी आणि माकड).
त्यामुळे मुलांना पंचतंत्र आहे तसेच आहे त्या फॉरमॅट मध्येच सांगावे / बिंबवावे. आपल्याकडे जे ज्ञान (विशेषतः साम दाम दंड भेद वापरून समाजात आपले व आपल्या कुटुंबाचे आणि सामग्रीचे रक्षण कसे करावे हे शिकवले आहे) गोष्टीरूपाने पुढे सांगण्यासाठी पूर्वजांनी एवढा खजिना ठेवला आहे त्याला काहीतरी आधुनिक फाटे फोडून व्हेरिएशन करत बसू नये.
त.टी.
१. या बाबतीत मला लिंबूटिंबू या आयडीची प्रचंड आठवण येते आहे. ते पूर्वी कानीकपाळी ओरडून सांगत असलेल्या कितीतरी गोष्टी आज पटतात मला.
२. कृपया माझा पूर्ण प्रतिसाद आपापल्या मतीनुसार between the lines सकट वाचावा. सगळ्या गोष्टी ओपन फोरमवर ओपनली लिहिता येत नाहीत.
३. याउप्पर रानभुली यांना केले त्याप्रमाणे अर्धवट प्रतिसाद वाचून किंवा सगळा प्रतिसाद face value वर घेऊन स्वतः चेच म्हणणे रेटत बसणार असाल तर माझा पुढील चर्चेस पास.
४. तरीही कथा बदलायच्या असतील तर पु. लांच्या कथेतील रावसाहेब आठवा. आपल्या पूर्वजांनी कष्टाने पंचतंत्र सारखे ग्रंथ लिहिले तसा तुम्हीही एखादा कथासंग्रह लिहून दाखवा नी मग काय ते व्हेरिएशन करा.
इति लेखनसीमा.
हर्पा
हर्पा
कथा बदलायच्या असतील तर बद्दलताही येतील पण त्या आवडतील का? समानता पर्यावरण जागृतता वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी इतर बोधकथा आहेत नवीन येतीलच . राहिला प्रश्न समजुतीचा तर मोठं झाल्यावर जंगलाचा राजा असा कोणी नसतो , प्राणी गोष्टीतल्यासारखे बोलत नाहीत हे समजतेच.त्यासाठी उगाच बालपणातली गंमत हरवू नये .