एका शास्त्रीय नृत्याचा स-भाव

Submitted by मनोज मोहिते on 18 March, 2025 - 15:57

मनोज मोहिते
ओडिसी नृत्याला ‘ओडिसी नृत्य’ हे नाव फार आधी नाही, मागच्या शतकातल्या साठच्या दशकात मिळाले, अशी मध्ये माहिती वाचली आणि आश्चर्य वाटले. कथक, भरतनाट्यम्‌ आदी शास्त्रीय नृत्यांना हजार-दोन हजार वर्षांचा इतिहास असताना ओडिसीला हे नाव या अलीकडच्या काळात असेकसे मिळाले, हे ते आश्चर्य!

विख्यात ओडिसी नर्तक आणि गुरू मायाधर राऊत यांचे मागील महिन्यात २२ तारखेला वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले, तेव्हा त्यांच्यावर एक टिपण लिहिले होते. ‘राऊत’ या आपल्याकडच्या आडनावानेच आधी लक्ष वेधले. हे आडनाव ओडिशातील प्रचलित आडनाव आहे अशी माहिती मिळाली. राऊत यांच्या निधनाची बातमी देईपर्यंत यांच्याविषयी काहीही ठाऊक नव्हते. ओडिसी हे भारतातल्या शास्त्रीय नृत्यांपैकी एक आहे, इतकी जुजबी माहिती तेवढी होती. राऊत यांच्याविषयी मग थोडे वाचत गेलो तेव्हा त्यांचा नृत्यपट समोर आला. यातील काही बाबी महत्त्वाच्या वाटल्या. त्या शेअर करण्यासाठीचा हा लेखनप्रपंच.

ही माहिती ओडिसी नर्तक मधुर गुप्ता यांनी २०१८मध्ये राऊत यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर बेतलेली आहे. सविस्तर मुलाखत ‘सहपीडिया’वर उपलब्ध आहे. एखादी शास्त्रीय कला, कलाविस्तार, कलाकार, तेव्हाचा काळ आणि आताचा काळ, कलावंताचे अंतरंग समजून घेण्यासाठी या अशा मुलाखती उपयोगी असतात. या मुलाखतीतील दोन मुद्द्यांवर भर देतो आहे. एक, आजच्या ‘ओडिसी नृत्या’ची शास्त्रीय बैठक कशी तयार झाली. आणि दुसरा, समविचारी माणसांनी एकत्र येऊन केलेले आविष्करण.

मायाधर राऊत हे ओडिसी नृत्याची पायाभरणी करणाऱ्यांपैकी एक. ‘जयंतिका’ या नावाने नृत्यगुरूंच्या एका गटाने पुढाकार घेतला. या पुढाकाराचे ओडिसी नृत्याला शास्त्रशुद्ध केले. यात मायाधर राऊत यांचे योगदान मोठे. ओडिसी नृत्याला ‘संचारी भाव’ राऊत यांनीच दिला. मायाधर राऊत सांगतात-

‘ओडिशात १९४८ साली ऑल इंडिया रेडिओ सुरू झाला, तेव्हा ‘कबिचंद्र’ अर्थात विख्यात उडिया कवी कालिचरण पटनायक यांनी राज्यातील पारंपरिक नृत्यशैलीला ‘ओडिसी’ असे नाव दिले. ते म्हणाले, ‘जसे ओडिसी संगीत, तसे हे ओडिसी नृत्य’. तेव्हापासून या नृत्यप्रकाराला ‘ओडिसी नृत्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.’

‘ओडिशात गोटीपुआ आणि महारी नृत्य प्रचलित होते. या दोन्ही नृत्यशैली भिन्न आहेत. गोटीपुआ हे नृत्य (कवायती आणि काही हालचालींनी युक्त असे) साधारण बंधनृत्य आहे. महारी नर्तक या पद्धतीने नृत्य करीत नाहीत. (महारी नृत्य देवदासी परंपरेतील नृत्य. जगन्नाथाच्या मंदिरात ते केले जात असे. या नृत्याला सुमारे एक हजार वर्षांची परंपरा आहे.) गुरू पंकज चरण दास हे महारी शैलीत नृत्य करीत असत. ते ‘महारीरत्न’ प्रभा देवी यांचे पुत्र. ‘जयंतिका’त आम्ही या दोन्ही नृत्यांतील विविध शैली घेतल्या. यातून ‘ओडिसी नृत्य’ आविष्कृत झाले. त्यापूर्वी हे गोटीपुआ किंवा महारी नृत्य म्हणून लोकप्रिय होते.’

‘जयंतिका’त साऱ्यांना एकत्र आणण्याचे श्रेय कुणाचे, या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत यांनी ते दिवस आठवले. म्हणाले, ‘तत्कालीन खासदार लोकनाथ मिश्रा हे उडिया संस्कृतीला प्रोत्साहन देत असत. त्यांच्या निवासस्थानी आम्ही नृत्याचे वर्ग घेत असू. या वर्गानंतर बराच वेळ गप्पा करत बसत असू. तेव्हा ‘ओडिसी’ म्हणून जे नृत्य सादर होत असे, त्यातील अशास्त्रीय बाबी वगळत हे नृत्य अधिक शास्त्रोक्त करण्याचा आमचा सततचा प्रयत्न सुरू असे. साधनेशिवाय शास्त्र आणि साधनेशिवाय शास्त्र या दोन भिन्न बाबी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.’

‘या गप्पागप्पांतूनच ‘जयंतिका असोसिएशन’ची स्थापना झाली, सप्टेंबर १९५९मध्ये. मी तेव्हाच (मद्रासच्या) ‘कलाक्षेत्र’मधून कटकला परत आलो होतो. १३ सप्टेंबर रोजी आम्ही शास्त्रीय नृत्याचा एक कार्यक्रम घेतला. तेव्हा ओडिशात काँग्रेसचे सरकार होते. आमच्या या कार्यक्रमाने प्रभावित होऊन सरकारने १ हजार १ रुपये पुरस्कार दिला. ही ‘जयंतिका’ला मिळालेली पहिली देणगी.’

‘जयंतिका’च्या आधी कोणते घटक सादर होत असत, हा मधुर यांचा पुढचा प्रश्न. राऊत म्हणतात, ‘तेव्हा नृत्यासोबतची गाणी पारच वेगळी असत. यात कोणता ‘विभाग’ असा नसे. तो आम्ही खूप नंतर अंतर्भूत केला. माझे पूर्ण लक्ष ओडिसी नृत्यातील मुद्रांवर केंद्रित झाले होते. ‘नाट्यशास्त्र’, ‘अभिनय दर्पण’ आणि ‘अभिनय चंद्रिका’तील संदर्भांशी ते पडताळून पाहत होतो. ‘कलाक्षेत्र’मध्ये ‘मुद्रा विनियोग’ कटाक्षाने पाळायचे शिकलो. प्रत्येक मुद्रेसाठी ‘विनियोग श्लोक’ असतो वा असायला हवा हे तिथे कळले. मी हा ‘विनियोग’ ओडिसी नृत्यात आणला. तुम्हाला विनियोग लक्षात राहिला की, मुद्रा आपोआप येते.’

यथो हस्त तथो दृष्टी, यथो दृष्टी तथो मन
यतो मन तथो भाव, यथो भाव तथो रस

-असे नाट्यशास्त्र सांगते.
मधुर विचारतात, तुम्ही ‘कलाक्षेत्रा’ जो विनियोग शिकलात, तोच ओडिसी नृत्यात आणला का? त्यावर राऊत म्हणतात, ‘तसे म्हणता येणार नाही! मी ओडिसी शैलीशी त्याचा मेळ साधला.’ मद्रासवरून (आता चेन्नई) परत असल्यानंतर राऊत यांनी ओडिसी नृत्यातील ‘गतिभेद’ आणि ‘जातिभेद’चा विस्तार केला. हे विविध ओडिसी नृत्यगुरूंना शिकविले, जेणेकरून शिकणाऱ्या मुलांपर्यंत ते पोहोचेल. ‘आमच्या ‘मुद्रां’ना पंकजबाबूंनी सुरुवातीला विरोध केला. साहजिकही होते, ते पारंपरिक पद्धतीने नृत्य करीत असत’, असेही राऊत यांनी या मुलाखतीत नोंदवले.

गोटीपुआ आणि महारी नृत्यातील पेहराव आणि आताच्या ओडिसी नृत्यातील पेहराव यांच्यात काय फरक आहे, या मधुर यांच्या प्रश्नावर राऊत यांनी एक प्रसंग सांगितला- ‘महारी नृत्यशैलीत साडी ही बारा यार्डांची असायची. संजुक्ता पाणीग्रही या जेव्हा ‘कलाक्षेत्र’मध्ये शिकत होत्या, तेव्हा त्यांनी एक सॅम्पल आणले होते. मी त्यांना म्हणालो, ‘फॅन’ (पदराचा पुढचा डेकोरेटिव्ह भाग) खूप लांब आहे आणि त्यामुळे तो भरतनाट्यम्‌च्या पेहरावासारखा वाटतो. मग आमच्यात चर्चा झाली. हा ‘फॅन’ गुडघ्यापर्यंत ठेवण्याचे ठरले.’ ओडिसी नृत्याच्या पेहरावात ओडिसी राऊत यांनी नंतर ‘चुडा’ आणला, पटचित्रांचा अभ्यास करून. ओडिसी नृत्याला आजचे रूप हे असे एकेक करून मिळत गेले.

‘जयंतिका’ची वाताहत कशी झाली? मधुर यांनी प्रश्न विचारलाच!
‘‘जयंतिका’तील गुरू हे नंतर नंतर स्वत:च्याच शैलीत नृत्य सादर करू लागले. आम्ही बदलांची, नवे चांगले काही स्वीकारण्याची शपथ घेतली होती. पण नंतर एका टप्प्यावर स्वत:त बदल करण्यास फारसे कुणी उत्सुक दिसले नाहीत. शिवाय आम्हाला आमच्या नोकरीनिमित्त विविध स्थळी जाणे भाग पडले. त्यामुळे संपर्कही हळूहळू कमी झाला.’

ती शपथ कोणती होती?
मायाधर राऊत सांगतात- ‘त्या काळी प्रत्येकाची नृत्य सादर करण्याची वेगळी शैली असे. जसे की, विविध नर्तक एकच मुद्रा विविध पद्धतीने सादर करीत. माझ्या लक्षात आले की, ‘अभिनय चंद्रिका’मध्ये बव्हंशी मुद्रा विशद केल्या आहेत. तेव्हा पदन्यास आणि मुद्रेत एकवाक्यता येण्याची अतिशय निकड जाणवली. केलुचरण महापात्र, देबप्रसाद दास, रघुनाथ दत्ता, दयानिधी दास आणि माझे या विषयावर एकमत झाले. आम्ही मग आम्ही शपथ घेतली की, जयंतिकामधील निर्णयाला आम्ही बांधिल राहू आणि जयंतिकावर विपरीत परिणाम होईल, अशी कोणतीही कृती आमच्यापैकी कुणीही करणार नाही.’
०००

वाटा वेगळ्या झाल्या तरी, तोवर बहु काम करून ठेवले या साऱ्यांनी. माझ्या समजुतीप्रमाणे गुरू मायाधर राऊत यांनी कणभर अधिक.

शास्त्रीय विषयाला चर्चेतून बैठक मिळवून देण्याची प्रक्रिया किती रंजक असते, अगदी साध्या चर्चेतून दिशा बदलणारे असे काही घडू शकते, हे सांगणाऱ्या मायाधर राऊत यांच्या या आठवणी. कधी एखाद्या चर्चेतून, कधी निरंतर चर्चांतून, कधी साध्याशा गप्पांतून काही काही सकारात्मक घडत गेले. या घडण्याला शास्त्रीय बैठक होती. विज्ञानातले प्रयोग आणि शास्त्रीय विषयांतले संशोधन हे असेच होत असावे!

गुरू मायाधर राऊत यांनी ओडिसी नृत्यात भाव जोडला. त्यांचा हा स-भाव प्रवास उण्यापुऱ्या सात दशकांचा आहे. हा इतका काळ ते या शास्त्रीय नृत्यप्रकाराची आराधना करीत राहिले. हा दोन शतकांना सांधणारा काळ आहे. पन्नासच्या दशकात एका पारंपरिक नृत्याला ‘ओडिसी नृत्य’ हे नाव आणि नवा आयाम देण्यापासून या नृत्याची तंत्रशुद्ध-शास्त्रीय मांडणी करून करून तिच्यातील रंग-अंतरंग खुलविण्याचा हा दीर्घ प्रवास आहे. या प्रवासात अनेक ओडिसी नर्तक जुळत गेले. आराधना करीत राहिले. आपापल्या रीतीने नृत्य आविष्कृत करीत केले. ही प्रक्रिया सुरूच आहे.

मायाधर राऊत यांच्या काळजापासच्या नृत्याविषयीची चाहत अनेकांपाशी अजूनही शाबूत आहे. ती शाबूत राहणार आहे!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर ओळख.
बर्‍याच माहित नसलेल्या संकल्पना तुम्ही लिहिल्या आहेत. त्याबद्दल वेळ मिळेल तसे शोधतो. यांची मुलाखतही शोधतो.इथे आवर्जुन लेख लिहिल्या बद्दल धन्यवाद. Happy

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. अनेक गोष्टी नव्याने कळल्या. ओडिसी बाबत फार माहिती नव्हती. >>>+ १

"साधनेशिवाय शास्त्र आणि साधनेशिवाय शास्त्र या दोन भिन्न बाबी आहेत" म्हणजे नक्की काय म्हणायचं असावं ह्याचा अंदाज बांधता आला नाही.

Happy सुरेख ओळख. ओडीसी नृत्याबाबत काहीही माहिती नव्हते. लेखाबद्दल धन्यवाद. मायाधर राऊत यांच्या मुलाखतीची लिंक देता येईल का येथे, आवडेल बघायला.

"साधनेशिवाय शास्त्र आणि शास्त्राशिवाय साधना" असेल ते हर्पेन, हा माझा आपला अंदाज. Happy

खुप खुप धन्यवाद. बरीच नवीन माहिती मिळाली ओडिसी नृत्य आणि त्याच्या इतिहासाबद्दल. आज पर्यंत ओडिसी म्हणजे गुरू केलुचरण महापत्रा एवढेच असायचे पण आपल्या मुळे गुरुवर्य राऊत ह्यांची मौल्यवान माहिती आणि त्यांचे ओडिसी साठी असलेले योगदान कळले

"साधनेशिवाय शास्त्र आणि शास्त्राशिवाय साधना" असेल ते हर्पेन, हा माझा आपला अंदाज. >>> Makes sense!