दुपारची उन्हं कलली, सूर्य अस्ताला जाऊ लागला की पश्चिमेच्या क्षितिजावर लालिमा चढते. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि पश्चिमेचे रंग अधिकच गहिरे होत केशरी, गुलाबी, जांभळे, करडे होत होत हळू हळू अंधाराची धार गडद होत जाते आणि त्याच वेळी पश्चिमेला शुक्र चमकताना दिसू लागतो. ज्यावेळी आकाशातील गहिरे होत जाणारे रंग पश्चिम क्षितिजावर लोप पावत असतात, त्याचवेळी शुक्र मात्र एकटाच दिमाखात तेजस्वीपणे उठून दिसत असतो. तसे पाहिले तर शुक्र हा आकाशातील एक ग्रह, आपल्या सूर्य मालेतलाच. तरीही, तो ज्या वेळी आकाशात आपल्या असल्याने आपले लक्ष वेधून घेतो त्यासाठी त्याला शुक्र तारा हे पद मिळालेले आहे.
गर्द झालेल्या अंधारलेल्या आकाशात किती तरी वेळ तो एकटाच चमकत असतो आपसूकच आकाशाकडे नजर जाते अन् नकळतच कवी भा. रा. तांबेंची कविता असलेले गीत ओठांवर येऊन जाते.
घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी
किती यथार्थ वर्णन आणि उपमा दिलेली आहे ना! तांबे यांच्या कवितेचे रसग्रहण करण्याची माझी पात्रताच नाही. तरीही प्रेरणादायी असलेले ही गीत आहे आणि निराशेचे काळे ढग जेव्हा मनाला व्यापून टाकतात तेव्हा हे गीत जादूई काम करते.
सांजवेळ, कातरवेळ म्हणूनच त्यावेळी दिवेलावणी आणि परवचा म्हणायची प्रथा घरोघरी आहे. त्यायोगे या कातरवेळी या प्रार्थनेतून आपल्याला बळ मिळते आणि निराशेच्या सोबतीने आलेले काळे रंग ही प्रार्थना आपल्या मनात शिरू देत नाही.
त्याचवेळी आकाशात डौलाने चमकणाऱ्या ह्या शुक्रताऱ्याचे दर्शन आपल्या मनाला सुखावून जाते. कवी म्हणतात, गर्द काळोख्या अंधारात हा शुक्र बघ कसा एकटाच डौलाने चमकतो आहे.
एका उदास असलेल्या मनाला उभारी देण्यासाठी म्हणून त्यांनी शुक्राचे उदाहरण दिले आहे.
आकाशासारखेच माणसाचे मनही अनंत, अथांग असते. सगळे काही सुरळीत असताना अचानक काही अघटित घडतं, आणि होत्याचं नव्हतं होतं, आणि कधी तर काही कारणही घडत नाही तरीही आयुष्यात एक पोकळी निर्माण होते आणि हे मन उदास, निराश होऊन स्वतःला दूर एकटे कोंडून घेते. निराशेच्या त्या कठीण वेळी मनाला कुणी जवळचे नाही ही सल असते. आपल्याला कुणाचा आधार नाही अशी मनाची अवस्था असते.
कधी कधी उरीचे दुःख, उदासीनता, एकटेपणा कुणाला बोलून दाखवता येत नाही. मन आतल्या आत कुढत राहतं. बाह्य जगातील आपले व्यवहार सुरळीत सुरू असले तरी मन मात्र आतल्या आत दुःखाने जळत असतं. हे दुःख कुणाला सांगावं असं वाटून मन आणखीनच व्याकुळ होतं. स्वतःला एक कोशात बांधून घेतं, निराशेच्या गर्तेत खोल खोल जात राहतं. अशा वेळी या मनाला उभारी देण्याऱ्या या ओळींमधून कवी म्हणतात,
ये बाहेरी अंडे फोडूनी
शुभ्र कोवळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी...
घन तमी...
#सुरपाखरू
घन तमी...
Submitted by शिवानी बलकुंदी on 24 February, 2025 - 00:41
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
सुंदर!
सुंदर!