मभागौदि २०२५- निसर्गायण - "समुद्रकिनार्‍यावरची एक सकाळ : माझ्या निसर्गवहीतील एक पान" - रायगड

Submitted by रायगड on 27 February, 2025 - 00:17

ऑलिंपिक नॅशनल पार्क मधी एक सुंदररम्य सकाळ!

गेले दोन रात्र ऑलिंपिक नॅशनल पार्क मध्ये प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर कँपिंग केलंय. समुद्राशेजारीच तंबू ठोकलाय! रात्री समुद्राची गाज ऐकत झोपायचं आणि परत पहाटे समुद्राच्या गाजेने उठायचं! आज पण पहाटे ४.३० च्या सुमारास, लाटांचा जोरदार आवाज ऐकून थोडीशी जाग आली. " एवढा रूद्र आवाज म्हणजे भरतीची वेळ असावी!", असं मनातच म्हणत परत झोपेच्या आधीन झाले. त्यानंतर जाग आली ती, ५.३०-६ वा. हरणाच्या हंबरण्याने! काल इथे तंबू ठोकताना, जातीने पहाणी करायला एक हरिण दांपत्य आलं होतं खरं! फार उत्सुकतेने तंबू लावताना बघत होते. जणू काही ते तंबू ठोकून रहाणारच आहेत.
६.३० च्या सुमारास तंबूतून बाहेर येऊन समोर दिसणारा तो अथांग सागर बघत बसलेय! बरोबर स्केचबुक आहेच, रेखाटनं करायला. पहाटे, सूर्योदयाच्या अल्याड-पल्याड काही वेगळीच जादू असते! सूर्याच्या कोवळ्या उन्हात समोर समुद्रातले छोटे-मोठे खडक चमकतायंत . ऑलिंपिकचा समुद्रकिनारा हा असा खडकाळच! पण सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांत न्हाहून ते पत्थरदेखील कोवळे-सोनसळी दिसतायंत! सोनेरी रंगात रंगलेल्या लाटांचं तर नृत्य अविरत चालूच आहे!
दूर क्षितीजाकडे नजर फिरवली तर... दूरवर समुद्रातून पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत...ओह! हे नक्कीच व्हेल्स! व्हेल्स त्यांच्या उच्छ्वासातून सोडणार्‍या हवेचे असे फवारे दिसतात. या भागातून ग्रे व्हेल्स, किलर व्हेल्स, हंपबॅक व्हेल्स यांचं उत्तर-दक्षिण स्थलांतर चालू असतं असं कालच वाचलं . ज्या संख्येने हे फवारे दिसतायंत ते पहाता, मोठा कळप असणार व्हेल्सचा! अर्थातच ते अतिशय दूर, कित्येक मैलांवर आहेत, त्यामुळे दुर्बिणीतूनही दिसणं अशक्य! पण तरीही ते फवारे बघणं, आणि तिथे व्हेल्स आहेत याची कल्पना करूनच मस्त वाटतंय!
बघण्याकरीता मात्र किनार्‍या जवळ दिसणार्‍या, पाण्यात खेळणार्‍या सील्स प्राण्यांवर समाधान मानावं लागणार!

O1.jpgO2.jpgO3_0.jpg

*************************
गेल्या उन्हाळ्यात ऑलिंपिक नॅशनल पार्क मध्ये समुद्रकिनारी केलेल्या कँपिंग दरम्यान खरडलेले एक निसर्गपान स्फुट, सोबत तिथेच काढलेली निसर्ग रेखाटने!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults