माहेरवाशीण

Submitted by joshnilu on 27 February, 2025 - 11:39

मराठी भाषा दिनानिमित्त एकतरी कविता लिहावी असे डोक्यात होते.एक मुलगी, माहेरवाशीण काय विचार करेल? असे डोक्यात आले आणि भाषाही हीदेखील एक प्रकारे मुलगीच जी जगाच्या अनेक प्रदेशात नांदत आहेत, त्यावर आधारित माहेरवाशीण नजरेतून लिहिलेली नवीन कविता.
मुद्दाम पहिले कडवे आणि शेवटचे कडवे संलग्न लिहिण्याचा (प्रारंभ-अंत्य) असा नवा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केलाय. नक्की अभिप्राय द्या.

सासरी दरवळतो नित्य मोगरा तरी
मृद्गंध माहेरचा कसा विसरू ?

नवीन हक्काचे घर अन् माणसे तरी
माहेरचे जागांचे ठसे कसे विसरू ?

नवरा,नातलग माझेच असले जरी
भावंडासोबतचे जूने दिवस कसे विसरू ?

झाले जरी सासुरवाशीण तरी,
मनातील माहेरवाशीपण कसे विसरू ?

सासुबाईच्या स्नेहाचे गोड बोल तरी,
आईच्या मायेचा स्पर्श कसा विसरू ?

सासरे आहेत बाबांसारखेच मायाळू तरी,
बाबांच्या प्रेमाचा वर्षाव कसा विसरू ?

नव्या संसाराच्या गुंत्यात गुंतले तरी,
माहेरच्या आठवणींचा धागा कसा उसवू ?

सण आले की वाट पाहते तरी,
इकडचे सोडून माहेरी मी कशी जाऊ ?

सासरच्या सुखातही तृप्त असले तरी,
माहेरच्या आभाळाची ओढ कशी विसरू ?

नव्या जगण्यात रुजले तरी मी,
माहेरच्या मातीतल्या मुळांची ओढ कशी विसरू ?

शेवटी माहेरवाशीण असूनही
आता सासरची जबाबदारी कशी विसरू?

म्हणूनच सासरच मोगऱ्याचा नित्य दरवळ,
दोन मिनिटांचा मृद्गंध आता कसा पकडू ?
- निलेश जोशी

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults