मभागौदि २०२५ - निसर्गायण - माघातली पहाट सुंदर ..!

Submitted by निर्लेप on 28 February, 2025 - 06:15

असोंड या दापोली जवळच्या माझ्या गावाला राहायला आले आहे. इथे असले की नेमाने रोज सकाळी फिरायला बाहेर जाते. काय करणार, व्यायाम आवडत नसला तरी गावाकडची हवा सकाळी घरी झोपून राहूच देत नाही. शहरातल्या हवेचे चटके खाल्लेले असले की मगच किंमत कळते या हवेची..! असो, तर सांगायचं म्हणजे या काही आठवड्यातले पहाटेचे क्षण "अ वि स्म र णी य" आहेत..! बा सी मर्ढेकरांची "माघामधली पहाट सुंदर" खऱ्या अर्थाने इथे जगायला मिळते. किती आनंददायी असतात आत्ता सगळ्या पहाटवेळा; प्रसन्न, विविधरंगी आणि मोहक गंधाच्या..!

सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

मी घरातून बाहेर पडते, तेव्हा साडे सहा वाजून जातात तरी अंधार रेंगाळतच असतो. माघातली सकाळ धुक्याची आवरणं घेऊनच हळूहळू पसरायला लागते. अगदी आठ वाजताही भोवताल आळसावलेलाच वाटत असतो. त्याचं कारण रोज धुकं फवारणारी निसर्गाची गाडी असावी. डासांचे औषध फवारणाऱ्या बिनकामाच्या गाड्यांची आठवण असणारी मी हे धुकं मात्र आसुसून श्वासात भरून घेते. गारूड करणाऱ्या त्या धुक्यातून वाट काढत मी पुढे जाते आणि गंधलावण्य चमचम करू लागतं.
'गंधलावण्य' ! या शीर्षकाचा एक लेख वाचायला मिळालेला मागे, निरनिराळ्या वासांचं नि आठवणींचं नातं यावर होता लेख.. साहजिकच जिव्हाळ्याचा विषय होता त्यामुळे लक्षात राहिला. पहाटे बाहेर पडताच रस्त्यालगतच्या करवंदीच्या जाळ्या लक्षवेधी चित्र उभं करतात. अंधाऱ्या कॅनव्हासवर जणू गडद हिरव्या, फुलाच्या पांढऱ्या, अंधाराच्या काळ्या आणि रस्त्याच्या लाल मातीच्या रंगांनी हे चित्र रंगलेलं असतं, त्या चित्राला गोडूस मंद गंधही असतो. तिथून पुढे जाताना आठवतात शांताबाईंच्या ओळी;

अवतीभवती भरून राहीला जुना अनामीक वास,
चमचमणा-या तिमिरालाही फुटले अद्भूत भास

करवंदीच्या फुलांना पाहूनच हिऱ्यांच्या कुड्यांची नक्षी सुचली असावी असं वाटतं ..! कुड्या कितीही सुबक दिसल्या तरी पण त्यात गंधाची जादू मात्र उणीच राहते. ज्याची इकडे ही फुलं भरभरून लयलूट करतात रोज..! त्या मायेतून सुटका करून घेत मी माझ्या रस्त्याला वळते. नदीच्या साकवावरचं धुकं अंगावर थंडगार शहारे पसरवत मला पुढे ढकलत नेतं, अजिबात त्या गारठ्यात थांबावं वाटत नाही. पुढे जाताना वळणावर बुजुर्ग आंबा आहे ओळखीचा, नेहमी एव्हाना पानोपान मोहरून झळाळणारं झाड यंदा अगदीच ओकं बोकं आहे. निसर्ग वादळाच्या तडाख्यात किती दुखावले असतील सगळे बिचारे, आत्ता त्याचे दुष्परिणाम अजून दिसताहेत. ताप येऊन गेल्यावर जशी मरगळ येते, तशीच ही दुखावलेली झाडं बघताना वाटत होतं. आता यंदाच्या पावसाने तरी त्यांना उभारी द्यायला हवी. इथे वळणावरच्या धुक्यात उदासीची छटा असते, ग्रे शेड..! शांत सुस्त पसरलेली ही झाडं पाहताना परत 'उदासीत या कोणता रंग आहे..' आठवायला लागतं. मोजक्याच आवडणाऱ्या 'संदीप खरे'मधलं हे एक गाणं.
एव्हाना धुकं अजूनच गडद व्हायला लागतं, अगदी चार फुटावरच पण दिसत नाही. तरीही पुढे जायला भीती वाटत नाही, रस्त्यावर गडद शांतताही असते. पक्षी आता कुठे जागे होत असतात बहुतेक. पफ थ्रोटेड बॅबलर, सातभाई, बुलबुल हे सगळे बिनीचे खेळाडू आहेतच चुळबूळ करायला लागलेले. धुक्यातच पुढे काटेसावर, पांगारा, पळस एकाच जागी तिघेही भेटतात , त्यावर हे चुळबुळे पक्षी असतातच. व्यायामासाठीचं चालणं हे असं कोणी ना कोणी भेटून सारखं थांबवतं नेहमीच, मग माझा मलाच परत धक्का मारावा लागतो आठवणीने.. आज दीड एक किलोमीटर होताना परत शिवणीचा सडा मला अडवायला रस्ताभर पसरलेला दिसला आणि तिथून लगेच निघणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर मी मागे फिरले आणि आता एकेकाची खबर घेत परतीची वाट घ्यायचं ठरवलं.
शिवणीचं झाड मला कधीच ओळखू यायचं नाही पण याच आठवड्यात दोन तीन ठिकाणी त्याच्या फुलांनी नजर वेधून घेतली, आणि आठवणीत कोरली गेली. इथे फुलांच्या सड्याच्या सुंदर पिवळ्या रंगाने सोनसळी झालेला रस्ता , या झाडाची दखल घ्यायलाच लावत होता. मध्यभागी छान तपकिरी छटा, त्यात पांढरे लांब केसर अशी छान सोनफुलं बऱ्यापैकी निष्पर्ण झालेल्या झाडावर घोसांनी फुलून आलेली.. वाऱ्याच्या झोताने, किंवा गाडी गेल्यावर तेवढयाशा कंपनांनीही खाली पडत होती. शहरात असतो तेव्हा बहावा, सोनमोहोर यांचीच कौतुकं माहीत होती, इथे मात्र सगळीकडे 'शिवण' दिमाखात चमकत होते. विसविशीत झालेलं, आळसावलेलं ऊन अस्ताव्यस्त पसरलं होतं. धुक्यावर मात करायचं सामर्थ्य उन्हात नव्हतं, धुंद उजेडाचे हे नाट्य पाहत पुढे सावरीकडे जायला निघाले. काटेसावर एका बाजूला नि पांगारा एका बाजूला असे मस्त लालेलाल झाले आहेत सध्या. आतापर्यंत मैना, कोतवाल, बुलबुल, पर्णपक्षी, फुलटोच्या, हळद्या सगळे जमले होते. पांगारा आणि शाल्मलीच्या फुलांची या पक्ष्यांच्या धसमुसळेपणाने खाली पखरण होत होती. काटेसावरीपेक्षा शाल्मली नाव किती छान आहे. दोन्ही झाडं काटेरी भीतीदायक, पण फुलं किती मोहक आणि मधुर असतात, उगाच का सगळे तुटून पडतात त्यावर..!! या सगळ्यांची एवढी जंगी पार्टी पाहताना भान हरवलेलं असतं, खालचा लाल खच पाहून अजूनच मजा वाटते. आपणही ती फुलं खाऊन पाहावीत अशी तीव्र इच्छा होते नेहमी, पण अजून धाडस नाही झालंय..
असाच बराच वेळ गेला, पुढे 'फुलवेट्टा'ची शीळ ऐकू आली आणि त्या शोधात निघाले. पळस आता सगळा भार उतरवण्याच्या तयारीत दिसला, उशिरा फुललेली काही चुकार फुलं सोडल्यास बाकी फिक्की जुनी फुलंच दिसत होती. मोठा उंच पळस, इथला जुना बुजुर्ग आहे हा सुद्धा. छोट्या (pigmy) सुताराची काहीतरी खुडबुड चालू होती त्यावर. फुलवेट्टा मात्र सापडला तो पुढच्या धायटीवर, बारक्या इवल्याशा फुलांत काय मिळालं काय माहित, माझी चाहूल लागताच उडाला लगेच. पुढे धायटीचीची तीन चार बारकी झुडुपं दिसली, जी इतके दिवस दिसलीच नव्हती मला. आता त्यावर उजेड पडलेला निस्तेज सूर्याचा, त्याच्या फुलांवर शिंजिर, सुभग नाचत होते. फांदीला भार पेलवत नव्हता तरी बुलबुल पण त्यावर बसायचा प्रयत्न करत होता. या फुलांत एवढा मध असतो माहीतच नव्हतं. हे सगळे धायटीवर उड्या मारताना बघून गंमत वाटत होती. या धायटीची दारू पिऊनच यादवी माजली आणि यादवकुल निर्वंश झाले असं म्हणतात, आणि इथे मात्र ही यांची भलतीच मजा चाललेली!!
सकाळी न दिसलेली अजून एक वेल परतताना दिसली, कुसरीची..! रस्त्याच्या एका कडेला तीन झाडांवर मिळून पसरलेली ही रान जाईची कलाकुसर अप्रतिम दिसत होती. घरातल्या जाईजुई पेक्षाही या कुसरीचा, म्हणजेच रानजाईचा वास मोहक असतो.
परतताना नदीजवळ शामा पक्ष्याची मंजुळ सुरावट ऐकायला मिळाली. ही रंग गंधाची उधळण बघताना रोजच्या सारखं आजही खूप अप्रूप वाटत होतं. किती समृद्ध निसर्ग आहे भवताली याचं अप्रूप, रंगीत सुगंधी सकाळ रोज बघायला मिळतेय याचं अप्रूप, निर्मनुष्य रस्त्याचं आणि भारावणाऱ्या शांततेचंही अप्रूप !
आज चालताना कितीतरी कवितांच्या ओळी, मला फील्ड बॉटनी शिकवणाऱ्या मित्रांचे संवाद आठवत होते, रंग गंध आणि आठवणींनी ही सकाळ उत्तम झाली. तेव्हाच आता हिवाळा संपत आलाय त्यामुळे रोज बाहेर पडलंच पाहिजे आणि मिळतंय तेवढं पदरी पाडून घेतलंच पाहिजे, जरा थांबून हे साठवून घेतलंच पाहिजे हे ही जाणवलं.
आता धुरकट झालेलं धुकं कवितेप्रमाणेच हुबेहूब चुलीच्या धुराचा, करवंद-कुसरीचा, जुन्या डांबरी रस्त्याचा, शांततेचा परिमल मिरवत होतं आणि मी त्यातलंच कडवं आठवत घरात शिरले, अजस्त्र नसली तरी प्रसन्न जिवंत गडबड सुरू झालीच होती की,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माघामधली पहाट सुंदर....व्वा !
माझी आवडती कविता Happy
निर्लेप, फारच सुंदर आणि चित्रदर्शी लेख लिहिला आहे.
लिखाण, शैली आवडले.
प्रकाशचित्रे असती तर आणखी देखणा झाला असता लेख
पुलेशु.

धन्यवाद ऋतुराज . photo टाकण्याचे लक्षात आले नाही , बघते परत edit करायला जमताय का ते..
धन्यवाद मनीमोहोर .

>>>>निर्लेप, फारच सुंदर आणि चित्रदर्शी लेख लिहिला आहे.
लिखाण, शैली आवडले.>>>+१
तुमची निसर्ग सुंदर, शांत पहाट सुगंधी गाणं गातेय.

सुंदर लिहिले आहे..
फोटो आले तर चांगलेच आहे.. पण बरेचदा शब्द त्याहून सुंदर चित्र मनात उभे करतात.