महाविद्यालयांची घसरणारी गुणवत्ता

Submitted by तुष्कीनागपुरी on 26 February, 2025 - 23:12

आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा क्रमिक पुस्तके असायची. वर्गात प्राध्यापक खडू ने काळ्या फळ्यावर शिकवायचे. तेव्हा पण एकविस अपेक्षित आणि गुरूकिल्या मिळायच्या बाजारात, पण त्यांना तितका मान आणि महत्व नव्हते. ज्यांना गांभिर्याने अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी क्रमिक पुस्तकेच अभ्यासाचा आधार घटक होता.

कालांतराने अंकीय तंत्रज्ञान आणि साधने विकसित होत गेली आणि काळा फळा आणि खडू जाऊन पांढरा फळा आणि मार्कर आले, त्याही नंतर अंकीय फळे आणि पावरपाईंट प्रेझेंटेशन आले. कॉलेजात देखील आता बघतोय की क्रमिक पुस्तकांपेक्षा कॉलेजातल्या प्राध्यापकांनी तयार केलेले (असे मला वाटायचे) नोट्स चे पीडीएफ म्हणजेच अंकीय नोट्स देण्यात येतात.

आंतरजालावर सुद्धा अभ्यासाला लागणारे विषयाचे साहित्य अनेक जागांवर उपलब्ध असते. त्यात समस्या इतकीच आहे की ते साहित्य कोणत्याच गुणवत्ता कसोटीवर तपासलेले नसते. क्रमिक पुस्तकात जे लिहिलेले असते ते किमान एक लेखकाच्या नावाने प्रकाशित होते तेव्हा त्यात काही त्रृटी आढळल्या तर त्या लेखकाची प्रतिष्ठा त्यात पणाला लागलेली असते. त्यामुळे किमान त्या पुस्तकात चुकीच्या किंवा अर्धवट माहिती असण्याची शक्यता खूप कमी असते.

आंतरजालावर विद्यार्थी ज्या विषयाची माहिती शोधत आहेत त्या त्या विषयाची माहिती लिहून टाकत गेलो की ती गुगल मधे शोधली जाऊन तुमच्या संकेत स्थळाची लोकप्रियता वाढेल या एका फायद्यासाठी अनेक जण जमेल तिथून माहिती घेऊन अशी संकेत स्थळे तयार करत असतात. मी अनेकदा अश्या संकेत स्थळांपासून विद्यार्थ्यांना सावध करत आलोय.

www.w3schools.com हे असेच संकेत स्थळ होते जे अनेक लोकांच्या टीकेला बळी पडले होते. गुगल वर वेब डेवलपमेंट साठी काहीही शोधले तरी या संकेत स्थळाची पाने आधी दिसत पण यातली माहिती फारच त्रोटक आणि वरवरची आणि कधी कधी तर चूक सुद्धा असते असे अनेकांना लक्षात आले. तरीही हे संकेत स्थळ सुरूच राहील आणि वरवरची माहिती ते देतेच याच एका कारणाने अनेकांना ते आवडतही राहील. पण मी नेहमी सावध करतो की अश्या संकेत स्थळावरची माहिती तपासल्याविना खरी मानू नका. तुम्हाला लिहिणारे कोण हे दिसत नसेल तर ते लिखाण कुठूनही उचललेले असू शकते आणि विश्वासपात्र समजायचे नसते.

सध्या www.geeksforgeeks.org हे संकेत स्थळ असेच विद्यार्थ्यांमधे गाजते आहे कारण याची अनेक पाने गुगल शोधात आधी दिसतात. सुरवातीला हे संकेत स्थळ चांगली माहिती देतही असेल पण आता या संकेतस्थळावर कुणी लिहिले त्याचे नाव न देता भरमसाठ लेख टाकलेले असतात. हे लेख नवशिके, विद्यार्थी यांचेकडून मोबदला देऊन लिहून घेतले जातात असे दिसते आहे. अनेक लोकांच्या मते हे संकेतस्थळ बरेचदा चुकीची आणि बाळबोध माहिती देते. [१] अश्या संकेतस्थळांची माहिती वापरताना सावध रहावे हे खूप महत्वाचे आहे.[२]

आज माझे डोके सटकले ते या संकेतस्थळावरची माहिती एका प्रतिष्ठीत अभियांत्रिकी कॉलेजातून जेव्हा विद्यार्थ्यांना अधिकृत नोट्स म्हणून देण्यात आलेली पाहिली. विद्यार्थ्यांनी ही संकेत स्थळावरची माहिती चुकून वाचली तर त्याला मी समजू शकतो. जेव्हा एका प्रतिष्ठीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांध्यापकांनी अशी माहिती घेऊन नोट्स तयार केलेल्या असतात तेव्हा त्यांच्या या वैचारिक दिवाळखोरीला काय म्हणायचे हे मला समजत नाहीये.

यावर असे सांगण्यात येते की क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करायची तुम्हाला गरज नाहीये, आम्ही देतो ते नोट्स वाचून घ्या आणि तुम्हाला त्यातूनच परिक्षेत प्रश्न विचारले जातील तेव्हा फक्त त्या नोट्स वाचून तुमचा अभ्यास होईल आणि त्या नोट्स मधे हे असे शब्दशः अर्धवट आणि सापेक्ष माहिती कॉपी पेस्ट केलेले उतारे दिसतात तेव्हा त्या नोट्स ची विश्वासार्ह्यता धुळीला मिळालेली असते.

सोबत मी त्या नोट्स च्या पिडिएफ च्या एका पानाचे चित्र लावतो आहे आणि त्या संकेत स्थळाच्या पानाचे चित्र देखील लावतो आहे, ते पाहून तुम्हाला कल्पना येईल. तुम्ही थोडे जरी संगणक क्षेत्रात अनुभवी असाल तर सॉफ्टवेयर आणि प्रोग्राम यांच्यातिल फरक सांगणारा हा उतारा किती विचित्र आहे याची कल्पना तुम्हाला येईल. त्या संकेत स्थळावर जी माहिती लिहिली आहे ती कधीकधी सॉप्टवेयर असे असते कधीकधी प्रोग्राम असे असतात, ढोबळमानाने ते असे असतात अश्या प्रकारे लिहिलेले आहे त्यामुळे त्याला पूर्णतः चूक म्हणता येत नाही. पण तीच माहिती प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरादाखल कुणी लिहिली तर मी त्याला अंक देऊ शकत नाही. मी संगणक क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थाकडून कितीतरी वरच्या अपेक्षा करतो. पण ही माहिती अधिकृत नोट्स म्हणून जेव्हा विद्यार्थी वाचतात असे दिसते तेव्हा काळजी वाटते.

first-year-cse-notes.pnggeekforgeeks-notgood.png

या एका उदाहरणामुळे महाविद्यायलांमधे दिल्या जाणाऱ्या अधिकृत नोट्स बद्दल माझ्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत आणि आता त्याची गुणवत्ता मान्य करता येत नाही. विद्यार्थ्यांनी फक्त त्या नोट्स वर अवलंबून न राहता स्वतःचे वाचन आणि क्रमिक पुस्तकांचा अभ्यास यालाच अधिक महत्व द्यायला हवे हे कळकळीचे सांगणे आहे. तुमच्या माहितीत जर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थि असतीत तर त्यांना या विषयाबद्दल नक्की सांगा.

[१] https://www.quora.com/What-is-your-review-of-GeeksforGeeks
[२] https://www.reddit.com/r/learnprogramming/comments/lot6ah/geeksforgeeks_...

#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५

(अवाक आणि हतबल पालक)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार २४ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults

सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम यातला फरक मला २० वर्षे याक्षेत्रात काम करुन ही सांगता येणार नाही. कारण त्या दोघांची अशी काही व्याख्याच अस्तित्वात नाही. जगात कुठे त्यातील फरकाचे मुद्दे स्पष्ट करा असं विचारत असतील तर त्यापासून चार हात लांब रहा. मग ते पुस्तकात लिहिलेलं असो का नोट्स मध्ये.
आमच्याकाळी तरी प्रोसेस आणि थ्रेड यातील फरक विचारायचे. Lol हे सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम कोणी विचारत असेल आणि शिक्षणसंस्था बदलणे शक्य नसेल तर त्या नोटस पाठ करा. निदान गुण तरी मिळतील. असले फरक पुस्तकात वाचून काही ज्ञान असेल ते ही निघुन जाईल.

बाकी पुस्तकातील बरोबर इंटरनेट वरचे चूक अशा भाबड्या समजुतीत कोणी राहू नये. मुलांना अगदी शहाणे करुन सोडावे टाईप शिकवायचंच छंदच असेल तर नीरक्षीर विवेक शिकवता आला तर शिकवावा. कुठल्या एका गोष्टीवर विश्वास ठेवू नये. तावूनसुलाखुन परीक्षा घेऊनच सगळे ग्रहण करावे. इतकेच शिकवावे. गाईड, क्रमिक पुस्तके आणि फोरम्स ... सगळे एकाच तागडीत तोलायला हरकत नाही. तुम्ही काय आणि कुठून आणि कसं ग्रहण करता ते महत्त्वाचे. त्यातून निवड करायची वेळ आली तर मी फोरम्सची निवड करेन. कारण त्यात पीअर चर्चा असते, वेगवेगळे कोन असतात किंवा असण्याची शक्यता तरी असते.

अमितव छान पोस्ट , सहमत.

प्रत्येक माहितीची ( लिहीलेली असो, तोंडी माहिती) सत्यता तपासून पहावी.

अमितव छान पोस्ट , सहमत.> +१

सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम यात फरक काय हा प्रश्न शाळेत एखादा धडा वाचल्यावर मूळ कथा / भावार्थ सोडुन खाली मुलांना शब्द /व्याकरण कळले का यासाठी प्रश्न विचारले असतात तशा टाइप वाटतो. त्या साईटवर जी तुलना केली आहे ती वाचता त्यात दोघांचे स्पेलिंग वेगळे आहे, उच्चार वेगळे आहेत अशी भर घालायला वाव आहे असे वाटले.

नविन टूल्स टेक्निक्स वापरायला काहीच हरकत नाही किंबहुना वापरायलाच हवेत. पण एकंदरीत उथळपणा आणि बेदरकारपणा सगळीकडेच पसरत आहे, शिक्षण क्षेत्राचा फर्स्ट हॅन्ड अनुभव नाही पण त्यात दिसतो आहेच.

Sorry for English typing.

Recently I happen to refer the 1st and 2nd year Computer Engineering diploma books for some reason. (Pune University). The subjects are Basic Linux programming. The text book being referred for teaching, the 80% content is as is copy paste from www.geeksforgeeks.org .
Another subject was Environmental Engineering and Sustainability. I checked two books - one from Tech Publications and another from Nirali Publications. The authors are so called Doctors (PhD). But the quality of the content is so superficial, the flow of information from one para to another and one chapter to another is very disconnected and poor. That shows the level of education even for PhD holders here.