
गावाच्या शेवटच्या टोकाला, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. तिथंच राहायचा अर्णव, एक शांत आणि गूढ स्वभावाचा तरुण!
गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायची सायली, जणू चंद्राच्या शीतलतेसारखी. सुंदर आणि हळवी!
पहिल्यांदा त्यांची भेट झाली गावातील जुना वडाच्या झाडाखाली.
सायलीला वाचनाची आवड होती, आणि अर्णवला लेखनाची.
एकदा वडाच्या झाडाखाली बसून सायली पुस्तक वाचत होती, आणि अर्णव त्याच्या वहीत काहीतरी लिहीत होता. अचानक वाऱ्याच्या झुळुकीनं सायलीचं पुस्तक हातातून सुटलं आणि अर्णवच्या वहीत अडकून पडलं. दोघंही एकमेकांकडे पाहून हसले. त्या हास्यात काहीतरी वेगळंच होतं—एक अनामिक ओढ, एक अतूट बंध!
सायली: सॉरी! पुस्तक वाऱ्याने उडून गेलं. तुमच्या वहीत अडकलं.
अर्णव: (हसत) कदाचित हे संकेत आहेत. शेवटी शब्द शब्दांना भेटण्यासाठी धडपडत असतात. नाही का?
सायली हसली.
सायली: तुम्ही लिहिता?
अर्णव: हो, थोडंफार. पण कुणासाठी ते अजून ठरलेलं नाही.
सायली: मग मला वाचून दाखवाल का?
अर्णव: (संकोचत) तुम्ही ऐकणार?
सायली: शब्द प्रेमानं ऐकले गेले की त्यांना जास्त आयुष्य मिळतं.
अर्णव: वा आवडले तुझे विचार! शब्दांबद्दलचे पण शब्दांच्या पलीकडे जाणारे.
अर्णवने वही उघडली आणि एक कविता वाचायला सुरुवात केली.
"सावल्या लांबच लांब होत जातात
संध्याकाळच्या ढगांच्या ओळींसारखे,
आणि शब्द सुरेखपणे हळूच उगवतात
मनातल्या ओलसर हिरवळीसारखे"
सायली: सुंदर! शब्दांना इतके सुंदरपणे सजवले जाऊ शकते हे पहिल्यांदा जाणवलं.
त्या दिवसापासून दोघांचं बोलणं वाढलं.
पुस्तकं, कविता, स्वप्न, आणि आयुष्य यावरच्या त्यांच्या चर्चा कधी संपायच्याच नाहीत. अर्णवच्या कवितेत सायली उमटायची, आणि सायलीच्या डोळ्यात अर्णव दिसायचा. पुस्तकांसारखंच ती रोज त्याला वाचायची आणि रोज तिला नवीन अर्णव कळायचा. जाणवायचा.
काही दिवसांनी, दोघे झाडाखाली पुन्हा भेटले. आता त्यांचा प्रवास "तुम्ही" कडून "तू" पर्यंत आला होता
अर्णव आकाशाकडे पाहत काहीतरी विचारात हरवलेला होता. कारण, त्याला सायलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कळलेली होती आणि त्याच्या मनात शंका होता की, कदाचित नियती त्यांच्या प्रेमाच्या मार्गात अडसर ठरेल. त्याच्या मनातील ते भाव सायलीने अचूक हेरले. पण तिला त्याच्याकडून ते जाणून घ्यायचे होते.
म्हणून तिने त्याला विचारले -
सायली: एवढं काय विचार करतोस?
अर्णव: विचार करतोय की, नियती खरंच अस्तित्वात असते का? नियतीला आपले प्रेम मान्य होईल का?
सायली: तू नियतीवर विश्वास ठेवत नाहीस?
अर्णव: मला वाटतं, आपण नियतीला शब्दांत बांधतो, कवितेत मांडतो, पण शेवटी तीच आपल्याला बांधून टाकते. कदाचित नियतीच माझ्याकडून शब्दांद्वारे कागदावर उतरत असते का?
सायली: (हसत) किती गूढ बोलतोस! पण मला वाटतं, नियतीच्या खेळाला आपलं मन कधीच पूर्णतः स्वीकारत नाही.
अर्णव: म्हणूनच आपण शब्दांत विरघळतो, शब्दांचा आधार घेतो. नाही का?
अर्णवने वहीत एक नवी कविता लिहिलेली होती. त्याने ती वाचून दाखवली.
"नियतीच्या हातात हात देऊन
आपल्याला चालता आलं असतं,
तर नियतीलाही वाटलं असतं…
मनुष्याच्या सोबतीला खूप मोल असतं!
सायली: नियतीला बदलण्याची संधी आपल्याला मिळत नाही, नाही का?
अर्णव: नियती आपल्याला बदलतें. आपला नशीब बनून ती आपल्याला चिकटलेली असते! आयुष्यभर!
सायलीला अर्णवबद्दल तिच्या आई-वडिलांना सांगायचं होतंच, पण तिला ठाऊक होतं की तिचं कुटुंब परंपरावादी आहे. तिच्या घरात प्रेमविवाह हा पर्याय उपलब्ध नव्हता—तिथे मुलीच्या लग्नाचा निर्णय आई-वडिल घेत आणि तो अंतिम मानला जात असे.
तिला वाटत होतं की, जर तिनं अर्णवचा उल्लेख केला, तर तिच्यावर बंधनं येतील, तिला समजावलं जाईल, कदाचित धमकावलंही जाईल. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिला तिच्या आई-वडिलांचा विरुद्ध जाण्याची भीती वाटत होती. त्यांच्या भावना दुखावणं तिला शक्य नव्हतं.
शिवाय, अर्णव साध्या घरातला होता, स्थिर नोकरी नव्हती—फक्त त्याच्या लेखणीची त्याला साथ होती. सायलीच्या कुटुंबाला हे मान्य झालं नसतं. तिनं बरंच वेळा ठरवलं होतं की अर्णवचा विषय काढायचा, पण प्रत्येक वेळी ती घाबरली. तिला वाटलं, "काय उपयोग? शेवटी निर्णय त्यांचाच असेल. आणि जर मी आग्रह धरला, तर त्यांच्यासाठी मी नालायक ठरेन."
अखेर, तिनं गप्प राहायचं ठरवलं आणि स्वतःचं प्रेम मनात दडवून ठेवलं. कधी कधी, प्रेमापेक्षा कर्तव्य जिंकतं, आणि सायलीनं त्याच कर्तव्याला आपलं नशीब आणि नियती मानलं.
त्या दिवशी झाडाखाली -
सायलीनं अर्णवला सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे—तिच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार! दोघं बराच वेळ शांत बसले होते.
अर्णव: कधी कधी शब्द अपुरे पडतात.
सायली: आणि कधी कधी मौनच सगळं सांगून जातं.
अर्णव: जर मी तुला आर्जव करून थांबवण्याचा प्रयत्न केला तर?
सायली: (डोळ्यात अश्रू) तर मी आर्जव ऐकेन, पण ते ऐकूनही थांबू शकणार नाही. मला माफ कर. मला समजून घेशील अशी मला आशा आहे.
निःशब्द आणि हृदयापासून भावनेने ओथंबलेल्या असहाय अर्णवच्या डोळ्यातून एक अश्रूसुद्धा बाहेर यायला घाबरू लागला होता. जमा झालेले अनेक अश्रू डोळ्यांच्या आतच हातात हात धरून थांबून गेले होते.
अर्णव: मग, एक शेवटचा प्रश्न विचारू?
सायली: विचार.
अर्णव: जर नियतीला शब्दांत बांधलं गेलं असतं, तर तू तिला कोणतं नाव दिलं असतंस?
सायली: (डोळ्यातील अश्रू पुसत) "अर्णव."
अर्णवने वही उघडली, त्याने दोन ओळी लिहिल्या,
नियतीच्या लेखीच नव्हतं,
आपण हातात हात घ्यायचं कधी...
नियतीच्या लेखीच नव्हतं,
आपण हातात हात घ्यायचं कधी...
...
...
पण पुढे उरलेल्या ओळी तो लिहू शकला नाही. ते पान त्याच्या अश्रूंनी ओले झाले होते. त्याने वही बंद केली. पेन बाजूला ठेवला!
अर्णव थोडा वेळ स्तब्ध राहिला. मग हसून म्हणाला, "सायली, आपल्या गोष्टीला सुखद शेवट नाही. कदाचित काही प्रेमकथांत फक्त आठवणी असतात."
सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण तिनं ते लपवलं.
आणि ती न बोलताच निघून गेली.
काही दिवसांनी तिचं लग्न झालं, आणि ती दुसऱ्या गावात निघून गेली. अर्णव मात्र तिथंच राहिला—वडाच्या झाडाखाली, वहीत तिच्या आठवणी लिहीत!
आणि तिथंच ती प्रेमकथा अधुरी राहिली.
सावलीसारखी...
सूर्याच्या प्रकाशात हरवणारी.
त्याने लिहायला घेतलेली कविता दोन ओळीतच अपूर्ण राहिली!
काही वर्षानंतर -
गावातील जुनी जत्रा आजही तितकीच रंगतदार होती—तीच गाणी, तोच उत्साह, तीच गजबज.
जत्रेच्या कोलाहलापासून थोडं दूर, ते जुनं वडाचं झाड तसंच होतं. उन्हामुळे त्रासल्यानंतर काही वेळ विसावा घ्यावा म्हणून सायली त्या झाडाखाली आली आणि तिच्या मुलीच्या हाताला धरून उभी राहिली.
सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि कंठ दाटून आला. तिच्या मुलीच्या डोळ्यात कुतूहल होतं. अचानक, तिला पायाखाली कुणाच्यातरी लांब सावलीचा स्पर्श जाणवला आणि एक आवाज आला, कुठून तरी दूर भूतकाळातून आल्यासारखा!
"सायली?"
सायली हळूच वळली. समोर अर्णव उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच शांत हास्य होतं—काहीसं थकलेलं, पण अजूनही तसंच ओळखीचं. त्याच्या बाजूला एक लहान मुलगा होता, जणू अर्णव लहानपणी कसा दिसत असेल तसाच!
क्षणभर काहीच आवाज आला नाही. फक्त जुन्या आठवणी हळूच मनात उमटत गेल्या. काही अश्रूंनी डोळ्यातून बाहेर पडल्या.
सायली: (थोडंसं खोटं हसत आणि अश्रू पुसत) अर्णव! इतक्या वर्षांनी...?
अर्णव: (अश्रू पुसून हलकेच मान हलवत) खरंच… इतक्या वर्षांनी.
त्यांच्या मुलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि बाजूला एका झाडाच्या सावलीत खेळायला लागले.
सायली: काय करत आहेस हल्ली?
अर्णव: लिहितोय अजूनही. पण आता माझ्या शब्दांना "तो" एक छोटासा वाचक मिळालाय. आणि असेच अनेक छोटे वाचक.
त्याने खेळणाऱ्या आपल्या मुलाकडे पाहिले.
अर्णव: कथा आणि कविता लिहितो मी. लहान मुलांसाठी. लहान मुलांत रमणारा बाल साहित्यिक झालो आहे मी आता! काही ठिकाणी कथा वाचन करतो. कवी संमेलनात भाग घेतो आणि कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालवतो.
सायली: (डोळ्यात चमक) खरंच? म्हणजे तू तुझं लेखन थांबवलं नाहीस! मला वाटलं होतं की तू लग्न...
अर्णव: मी लग्न केलं. पण काही शब्द मात्र जसे कायम अधुरे राहिले होते तशीच मला अधुरं करून ती पण निघून गेली.
सायली: निघून गेली? म्हणजे?
अर्णव: गावात आलेल्या एका साथीच्या आजारात मी गमावलं तिला.
सायली काही क्षण शांत झाली. निःशब्द झाली. आता काय बोलावं हे तिला कळत नव्हतं पण मग हलक्या आवाजात ती बोलू लागली.
सायली: कधी कधी, अधुरेपणातच पूर्णत्व असतं, नाही का?
अर्णव: (हसत) हो... पण अधुरेपणात प्रश्नही खूप असतात. ज्यांचे उत्तर कधीच मिळत नाहीत.
सायली: नाहीतरी पूर्णत्व असं काही अस्तित्वात नसतं आयुष्यात. नेहमी काही न काही घडतं जे अपूर्णत्वाची जाणीव करून देतं. त्यापेक्षा कधी कधी तर अपूर्णत्वात पूर्णत्वाचा भास होतो.
अर्णव: (हसत) पण तो फक्त भास असतो. सत्य नाही.
सायलीकडे पाहून तो काही क्षण शांत राहिला.
अर्णव: मी तेव्हा तुला एक शेवटचा प्रश्न विचारला होता, आठवतंय?
सायली: (हलकसं हसत) हो... नियतीबद्दल. ज्याला मी "अर्णव" असं नाव दिलं होतं. माझी बदललेली नियती, माझे पती, थोड्या वेळात इथे येतील. खूप चांगल्या स्वभावाचे आहेत ते, त्यांची तुझ्याशी भेट...
अर्णव: नको, सायली. हा नकार यासाठी नाही की, मी कुणावर जळतो. हा नकार यासाठी आहे की, मला नियतीचा बदललेला चेहरा बघायचा नाही. नियतीने तुझ्यासाठी बदलवलेल्या चेहऱ्याला बघायचे नाही. कदाचित मला त्या चेहऱ्यात मीच दिसेन... ते मला नको आहे.
सायलीला त्याच्या म्हणण्याचा गर्भितार्थ समजला. दोघं काही वेळ मौनात हरवले. मग सायली समोर बघत म्हणाली.
सायली: तुझ्या प्रेमावरच्या कविता अजूनही तितक्याच सुंदर असतील, नाही का?
अर्णव: (थोडंसं हसत) त्या आता कुणासाठी लिहिल्या जातात, हे मात्र बदललंय.
तेव्हा अर्णवच्या आठवणीत त्याची पत्नी आली.
सायली हलकंसं हसली. तिच्या डोळ्यात हलकंसं पाणी दाटलं. अर्णवही थोडा भावूक झाला, पण त्याने स्वतःला सावरलं.
सायली: आपण वेगळ्या वाटा निवडल्या, पण त्या पुन्हा इथे येऊन मिळाल्या.
अर्णव: हो… पण फक्त एका भेटीसाठी. नियतीने केलेली थट्टा आणि तिचे अस्तित्व आपल्याला तिने पुन्हा जाणवून देण्यासाठी आपली भेट घडवली. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे तिने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं. आपली छोटीशी भेट घडवून.
थोड्या वेळाने त्यांनी आपापल्या मुलांना बोलावलं. मुले खेळ सोडून आई-बाबांकडे आले.
सायली: (मुलीच्या केसांवरून हात फिरवत) तिला मी रोज खूप गोष्टी सांगते. कधी माझ्या गोष्टीत तू असतोस. अनामिक बनून.
अर्णव: (मुलाच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवत) आणि हो, याला मी कधी कधी काही कविता ऐकवतो…
त्यानंतर काही क्षण सायली आणि अर्णव यांनी एकमेकांकडे डोळ्यांत बघितले आणि ते दोघे खूप बोलले पण शब्दांविना. एका मनातून दुसऱ्या मनाकडे निःशब्द संवाद होत होता.
जत्रेचा गजर पुन्हा ऐकू येऊन ते भानावर आले. तोपर्यंत सायलीचा नवरा दूरवरून येतांना दिसला. सायलीच्या डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून अर्णवला ते जाणवलं.
खाली वाकून सायलीने आपल्या मुलीचा फ्रॉक झटकला आणि तिचा हात घट्ट धरला आणि वर बघितले तेव्हा...
समोर कुणीही नव्हतं.
"काय गं, तिकडे झुडुपांकडे शून्यात कुठे बघतेस?", सायलीच्या नवऱ्याने विचारले.
"कुठे नाही. चला, जाऊया. पुढच्या नियतीच्या प्रवासाकडे!'
सायलीच्या नवऱ्याला तिचे कोड्यात टाकणारे हे उत्तर समजले नाही आणि ते तिघे जत्रेच्या दिशेने निघून गेले.
इकडे एका झाडामागे आपल्या मुलासहित लपलेल्या अर्णवच्या मनात, त्या सायलीच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाटेकडे पहात, मनात पूर्वी अपूर्ण राहिलेली कविता आता पूर्ण होत होती...
नियतीच्या लेखीच नव्हतं,
आपण हातात हात घ्यायचं कधी...
तुझ्या सावलीत शोधत राहिलो,
प्रेमाच्या हरवलेल्या वाटा किती?
सावलीच्या वाटेवर, अंधूक प्रकाश होता…
तुझी आठवण, मनात खास होती.
हातातला हात सुटला, शब्दही हरवले...
संपणाऱ्या सावलीत, आठवणींचे क्षणही विझले.
© सर्व हक्क लेखकाकडे
पुस्तक कसे उडुन जाइल? काग्द
पुस्तक कसे उडुन जाइल? काग्द उडुन जाउ शकतो
हलके होते पुस्तक.
हलके होते पुस्तक.
छान आहे , आवडली कथा. आणि
छान आहे , आवडली कथा. आणि कथेतल्या कवितासुद्धा मस्त आहेत .
कथा चांगली आहे. आवडली.
कथा चांगली आहे. आवडली.
एखादी क्लासिक आर्ट फिल्म
एखादी क्लासिक आर्ट फिल्म बघितल्याचा फील येतो.
धन्यवाद
धन्यवाद