टपरीवरची टीवटीव

Submitted by विक्रम मोहिते on 13 February, 2025 - 03:44

"सिगारेट प्यायला येतोस का?"
मी मित्राला मेसेज केला,
नेमका त्याच्या बापाने पहिला,
नाही काकांनी पहिला वगैरे म्हणालो असतो,
पण आता मेसेज पहिलाच होता तर उगाच सभ्यतेची औपचारिकता कशाला!
तर..

"सिगारेट प्यायला येतोस का?"
मी मित्राला मेसेज केला,
नेमका त्याच्या बापाने पहिला,
आणि मित्र बेघर होता होता राहिला,
जसं मित्राच्या हातात मोबाईलचं डबडं आलं,
मेसेज वाचताक्षणी त्याचा मोबाईल झाला होता जप्त,
पालकांच्या मते सगळ्याचं कारण म्हणजे मोबाईल फक्त,
त्यांना काय माहिती गंगाधरच शक्तिमान आहे,
त्यांचं पोरगं फक्त घरात गपगुमान आहे,
तर जसं मित्राच्या हातात मोबाईलचं डबडं आलं
सगळ्यात पहिलं काम जे त्याने केलं,
आमचा whatsapp चा ग्रुप त्याने सोडला,
एवढ्या वर्षांचा एकोपा आमचा मोडला,
चार दिवस भीतीने जे मेसेज तुंबले होते,
आम्ही सर्वांनी स्वतःला अभ्यासात कोंबले होते,
ग्रुप वर परत दणादण मेसेज येऊ लागले,
मित्राला मेसेज करणाऱ्या मला सगळे शिव्या देऊ लागले,
मी म्हणालो त्याचं उद्याचं मरण आजवर आलं,
माझा मेसेज हे फक्त निमित्ताला कारण झालं,
सिगारेट जर ओढायची तर अशी भीती वाटू नये,
सुरुंगाला वात लावून नंतर आपली फाटू नये,
त्यापेक्षा मग सिगारेट न ओढलेली बरी,
उगाच नंतर राडे-लफडे होऊ नये घरी,
माझी हि गोष्ट तशी सगळ्यांना पटली,
पण आम्हाला त्या मित्राची काळजी वाटली,
कारण पकडला जातो तोच चोर ठरतो,
आणि सुट्टा काय आजकाल प्रत्येकजण मारतो,
त्या मित्राला सगळ्यांनी मेसेज केले काही,
पण मेसेजला डबल टिक झालीच नाही,
बहुतेक काकांनी आम्हाला तडीपार केलं होतं,
प्रकरण आता जाम हाताबाहेर गेलं होतं,
काहीतरी मांडवली करणं आता गरजेचं झालं,
तेवढ्यात नशिबाने अजून एक प्रकरण समोर आलं,
सिगारेटमुळे आम्हाला तडी देणारे काका
स्वतःच सिगारेट पिताना आम्हाला दिसले,
लोका सांगे ब्रम्हज्ञान म्हणीचे,
साक्षात उदाहरण समोर भासले,
छाती २ इंच फुगवून आम्ही गेलो काकांच्या समोर,
मनात खाल्ले मांडे कि कसा पकडला गेला चोर,
वाटलं काका सिगारेट फेकतील आणि करतील गयावया,
काका म्हणे तुमचीच वाट बघतोय असे सगळे समोर या
पंधराव्या वर्षी हातात मी सुद्धा अशीच सिगारेट घेतली होती,
पहिली आणि शेवटची हि शपथ हजारदा घोकली होती,
आज माझा पोरगा सुद्धा पंधराचा झालाय,
अजून माझी सिगारेट काही सुटायचं नाव घेत नाही,
आणि माझ्यासारखं माझ्या पोरानेपण व्हावं,
हा माझ्या मते काही त्याच्या जीवनाचा बेत नाही,
शेवटची म्हणून रोज एक सिगारेट पेटवली जाते
डोक्यातली खळबळ काही क्षण मिटवली जाते,
आम्ही मोठी माणसं पण चुकलेलो असतो,
खूप काही आयुष्यात हुकलेलो असतो,
म्हणून वाटतं पुढच्या पिढीने आमच्या चुकांवरून शिकावं,
सगळ्या चुका स्वतः करून आयुष्य का विकावं,
तुमच्या सगळ्यांची मैत्री मला फार आवडली,
एका मित्रासाठी सगळी गॅंग येऊन नडली,
पण हीच यारी दोस्ती जरा प्रगतीच्या मार्गावर नेऊ दे,
तुम्ही सगळे यशस्वी झालेले आम्हा म्हातार्यांना पाहू दे,
आमच्या चुकांवरून तुम्ही शहाणं व्हावं,
आणि हाच आशीर्वाद कि तुमच्या आयुष्याचं सोनं व्हावं,
सिगारेट संपवून काका त्यांच्या वाटेने निघून गेले
जाताना एकदा परत सगळ्यांकडे करुणेने बघून गेले,
आम्ही सगळ्यांनी मग एकत्र केला थोडा विचार,
आणि तेवढ्यात येऊन टपरीवाला म्हणाला -
साब ये आपका चाय और सिगारेट चार,
ऑर्डरला नाही म्हणायला जीभ नाही रेटली,
पण सगळ्यांची सिगारेट आज शेवटची पेटली... शेवटची पेटली...
- विक्रम मोहिते

#not_based_on_a_true_story

Group content visibility: 
Use group defaults

वाह..

छान!

मस्त आहे!
माझी एक दूरची आत्या आठवली.. किस्सा पुन्हा कधीतरी