लेयर - १:
शेवटी एक माणूस म्हणजे असतं तरी काय? एक चेहरा? एक शरीर? एक व्यक्तिमत्व? का त्या माणसाला ओळखणाऱ्या इतरांच्या त्याच्याविषयीच्या भावना, त्यांचा एकत्र सहवास, त्यांच्या आठवणी ह्या सगळ्याची गोळाबेरीज? मग, कोणीच ओळखत नसेल तुम्हाला, तर? तरीही तुमचं अस्तित्व आहे, तुम्ही आहात, का नाही?
मी बाथरूममधल्या आरशासमोर उभा होतो. पुन्हा एकदा ओंजळभर थंडगार पाण्याचा हबका मारला तोंडावर. चेहरा खसखसून घासला. पाण्याने डोळे चोळले. माझे ओले थंडगार हात मला जाणवताहेत; माझ्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी जाणवताहे. आणि तरी...
नाही, कदाचित गोष्ट सुरुवातीपासून सांगणंच जास्त बरं होईल! तर, सर्वप्रथम माझी ओळख. मी रुपेश राऊत. नुकतीच तीस पुरी झाली मला. चांगल्या पगाराची नोकरी आहे; नोकरीत खूष आहे मी. कामाविषयी एवढंच म्हणेन की थोडं गुप्त स्वरूपाचं आहे ते. दिसायला चिकना, उंचापुरा दणकट आहे - हे असं माझ्या गर्लफ्रेंड्स म्हणतात, मी नव्हे. पोरीपोरींच्या कुचूकुचू गप्पांमध्ये माझा उल्लेख म्हणे नेहमी दॅट हँडसम गाय किंवा दॅट हंक असाच होतो. मला आजपर्यंत कधी पोरगी पटवायला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही; म्हणजे मी बहुतेक बरा दिसत असेन. तर एकूण काय, जिंदगी गुलजार है!
म्हणजे होती, आज सकाळपर्यंत.
सकाळपासून काहीतरी चुकचुकतंय. लहानसहान क्षुल्लक गोष्टी; पण आता आठवल्यावर मात्र मला त्या अर्थपूर्ण सूचक वगैरे वाटायला लागल्या. बघा, सकाळी ऑफिसला जातांना मी नेहमी त्या वाटेतल्या कॉफी शॉपमध्ये थांबतो. तिथली ती नेहमीची पोरगी, डेबी, मला नेहमीसारखं फ्लर्टी मधाळ 'हेय हँडसम, गु S ड मॉर्निंग!' म्हणाली नाही. साधं कॉफी हातात देताना नेहमीसारखं पाच सेकंद बोटं हातात धरून खट्याळ हसली सुद्धा नाही! आता, मी काही नार्सिसिस्ट वगैरे नाही; पण सवय झालेली असते ना गोष्टींची!
ऑफिसमध्ये पोचल्यावर माझं आजचं कॅलेंडर बघितलं; एकही मीटिंग नाही! सगळे स्टॅटस रिपोर्ट्स भरून झालेले, काही काम बाकी नाही... असं कधी नाही होत! आता, दिवसातून छप्पन्न वेळा कोणीतरी माझ्या डेस्कजवळ काहीतरी फालतू प्रश्न घेऊन येतं - हे कसं करायचं, हे का चालत नाहीय किंवा असं कसं झालं. आज, कोणी नाही! चिटपाखरू सुद्धा फिरकलं नाही! पाखरूवरून आठवलं, स्टेसी, लिंडा नाहीतर नॅन्सी... माझी नेहमीची गिऱ्हाईकं. काहीतरी कारण काढून माझ्याजवळ येणार, डेस्कवर बसणार, फालतू प्रश्न विचारणार, ऑफिसातल्या लेटेस्ट गॉसिपची माहिती देणार, एकमेकींबद्दल कुचाळक्या करणार, सगळा वेळ केसांना झटके देत, त्यातून हात फिरवत. आज? कोणीही नाही! एकदा तर मी नॅन्सीच्या डेस्कजवळ मुद्दाम थोडा रेंगाळलो. तिच्या अनोळखी थंड नजरेने आणि रुक्षपणे विचारलेल्या 'येस?' ने मला धक्काच बसला. हे, एवढी काही पडली नाही मला; गेलीस उडत! मी सरळ माझ्या डेस्कवर परत आलो.
तुम्ही म्हणणार, काय सेल्फ सेंटर्ड घमंडी अतिशहाणा आहे हा राऊत! दुसऱ्यांना इतरही कामं असतात ऑफिसात, एवढं सुद्धा समजत नाही ह्याला?
हो का? मग आता तुम्हाला सांगतो ऑफिसातून घरी येतांना काय झालं!
दिवसभराच्या ह्या सगळ्या कटकटींनी माझा भेजा तडकला असावा. लक्षातच आलं नाही काय स्पीडने गाडी चालवतोय. अचानक सायरनच्या त्या कर्कश्य वांयवांय आवाजाने माझी तंद्री भंगली, आणि रिअर व्ह्यू मध्ये ते फ्लॅशिंग लाल-निळे लाईट्स दिसले. मग काय, गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. जवळ आलेल्या पोलिसाला लायसेन्स आणि रजिस्ट्रेशन दिलं. तशी काही चिंता नाही; पहिलाच ऑफेन्स आहे, आपलं सगळं एकदम ठीकठाक असतं नेहमी.... फक्त, एवढा वेळ का लावतो आहे हा पोलीस?
'स्पीड लिमिटच्या वरती पंचवीस मैल वेगाने, आणि लायसेन्सशिवाय' ह्या दोन गुन्ह्यांवर टिक केलेलं तिकीट त्याने माझ्या हातात दिलं. 'लायसेन्सशिवाय?', मी दिलं होतं ते काय मग? मी रागारागाने विचारलं. 'सर, ते लायसेन्स खरं नाहीय. अशा नांवाची, जन्मतारखेची कोणी व्यक्ती अस्तित्वात नाही. खरं तर मी तुम्हाला त्याबद्दल अटक करू शकतो. सभ्य दिसता म्हणून ह्या वेळी एकदा सोडून देतो आहे; ताबडतोब नीट कायदेशीर लायसेन्स घ्या'. 'व्यक्ती अस्तित्वात नाही म्हणजे?' मग मी कोण रे भैताडा? ह्या गाडीत बसलेलो तर आहे ना, तुझ्या डोळ्यादेखत? हे माझंच नांव आहे, माझी खरी जन्मतारीख आहे ही! पण माझा वासलेला जबडा मिटण्याआधी तो त्याची गाडी बाहेर काढत होता. लायसेन्स वॉलेटमध्ये ठेवताना मला क्रेडिट कार्ड दिसलं. पोरकटपणे मी बँकेला फोन केला; मला माझं नांव दुसऱ्या कोणाकडून एकदा ऐकायचं होतं. सतराशेसाठ बटणं दाबल्यावर शेवटी एक बाई फोनवर आली. 'हा क्रेडिट कार्ड नंबर चुकीचा आहे' हे दोनतीन वेळा झाल्यावर तिने 'गुडबाय!' असं तोंडावर फेकून फोनच कट केला. आता पार चकरावून मी लिंडाला फोन केला; आन्सरिंग मशीन! स्टेसीने तर दोन रिंग्जनंतर न उचलताच फोन कट केला. भयंकर भडकलो होतो. कसाबसा अपार्टमेंटपर्यंत पोचलो. आता दाराचं कुलूप उघडणार नाही की काय? पण नशिबाने ते उघडलं. भले शाब्बास...
माझ्या चेहऱ्यावरून आणि हातांवरून ओघळणाऱ्या पाण्याने जमिनीवर छोटंसं तळं झालं होतं. म्हटलं शेवटचं एकदा पुन्हा प्रयत्न करून बघू. आरशात पाहिलं...
पुन्हा एकदा, आरसा कोराच होता!
(क्रमशः)
छान वाटते आहे कथा . लेखनशैली
छान वाटते आहे कथा . लेखनशैली वेगवान व गुंतवून ठेवणारी आहे . पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे .
Interesting. वाचतोय.
Interesting. वाचतोय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
छान आहे… हिरो मेला म्हणावं
छान आहे… हिरो मेला म्हणावं तर ऑफिसात दिसतोय, पोलिसाला दिसतोय…
पुढचा भाग येऊदे लवकर…