दुनिया मेरी मुठ्ठी मे ! -माझ्या ड्रायविंग ची कथा

Submitted by SharmilaR on 1 January, 2025 - 01:36

दुनिया मेरी मुठ्ठी मे !
माझ्या ड्रायविंग ची कथा

“एवढा कम्प्युटर वापरता येतो तुला तर मग गाडी चालवणं काय एवढं अवघड आहे?”
“कमाल आहे तुमची तरी! कॉम्प्युटर आणी गाडी.. काही तरी.. काही तरी.. तुलना होऊ शकते का? कम्प्युटर चालवतांना मी काही लोकांना ठोकरा देत सुटत नाही.”
“आणी गाडी चालवणारे सगळे लोकं पण काही इतर लोकांना ठोकरा देत सुटत नाहीत. उलट ज्यांना काहीच जमत नाही ते ड्रायवर होतात.”
हं! ह्यात पॉइंट आहे. पण माझ्या मुद्द्यावर हरेन ती मी कसली?
“पण मला जमतयं नं सगळं? (म्हणजे तेवढं गाडी सोडून!- हे अर्थातच मनात.) काही कामं अडताहेत का तुमची घरातली? बाहेरची?”
“पण तू चालवून तर बघ गाडी. तू फक्त मनावर घेतलं नं, तर काहीही जमतं तुला. आणी स्कूटर पेक्षा जास्त सुरक्षित असते गाडी.”
“आणि हात पाय मोडले म्हणजे? उगाच आपलं भलतं सलतं काहीतरी व्हायच..”
“गाडीत हात पाय नाही मोडत. ते टू व्हीलर वर मोडतात.”
“माझे नाही म्हणत मी. मी दुसऱ्यांना ठोकलं तर त्यांचे मोडतील.” वादात नेहमी मीच जिंकणार.

गाडी म्हणजे, आता चार चाकी. हो, उगाच गैरसमज नको. एकेकाळी तर मी लुनाला पण गाडीच म्हणायचे. सायकलींचा जमाना होता तो. चाळीस घरांच्या कॉलनीत एखाद दुसरी लुना असायची. त्यामुळे ती असणारा पण गाडीवाला किंवा गाडीवाली (खूपच कमी त्या काळात).

तर, मला सायकल चांगलीच चालवता यायची लहानपणापासून. पुढे लुना, स्कूटर अशी प्रगती झाली. आता तर मुलाचे क्लाससेस, घरची, बाहेरची सगळी कामं, माझी शाळा.. सगळं सगळं मी माझी स्कूटर वापरूनच करायचे. पण हे चार चाकीचं लफडं काही मला जमत नव्हतं.

नाही म्हणायला तब्बल पंधरा वर्षांपूर्वी आम्ही नवीन मारुती घेतली, तेव्हा ड्रायविंग क्लासला गेले होते मी. पण ड्रायविंग लायसन्स घेतलं तो शेवटचा दिवस, माझा गाडी चालवण्याचा. होतं काय, की ह्या क्लास मध्ये आपण त्यांच्या गाडीवर ड्रायविंग करतो. त्या गाड्यांचे ब्रेंकस त्यांच्या हातात, आपलं त्यांच्या पायात असतात. आपल्याला आपलं वाटत असतं की, आपणच गाडी कंट्रोल करतोय. पण मग स्वत:ची गाडी चालवतांना कळतं, आता गाडी चालू आपण करायची आहे, आणि ती थांबवायचीही आपणच आहे. शिवाय आपल्या शेजारी सीटवर, आपला (आणि रस्त्यावरच्या लोकांचा) रक्षणकर्ता तो ड्रायवर टीचर नाहीये, अखंड सूचना देणारा.. “डावीकडे.. डावीकडे.. जरा हळू घ्या.. हा, आता मारा ब्रेक.. टाका गियर मध्ये.. अहो, समोर एवढे स्पीड ब्रेंकर्स दिस्तयात ना? घ्या मं हळू..”

त्यामुळे मी काही आता गाडी चालवायला तयार नव्हते. शिवाय ती नं चालवण्याचे फायदेच मला दिसत होते. जसे की, पाहुण्यांना आणा.. सोडा... करायला लागत नाही. ट्रॅफिक मध्ये स्कूटर कशी पटकन कुठूनही काढता येते... ओके. फायदे ह्यापुढे जात नव्हते. पण मग मी तेच फायदे गिरवून गिरवून सांगत होते घरात. पण गाडी चालवण्याचा कोणताही विचार माझ्या डोक्याच्या जवळपास पण फिरकत नव्हता.

मैत्रिणींना गाडी चालवतांना बघितलं, की थोडीशी, म्हणजे अगदीच किंचितशी असूया वाटायची. हो, उगाच खोटं कशाला बोला! पण ती असूया म्हणजे, लहानपणी शाळेत पहिल्या पाचात येणाऱ्या मुलींबद्दल वाटते तेवढीच. म्हणजे असूया बिसूया काहीही वाटलं, तरी तो प्रांत आपला नाही, हे पक्क ठाऊक असतं आपल्याला. हे असं पहिल्या पाचात (खरं तर दहात. पण मी अगदीच ढब्बू वाटायला नको म्हणून एक आकडी संख्या घेतलीय.) येणं दुसऱ्यांच काम. आपला काही संबंधच नाही त्याच्याशी.

शिवाय कुठेही एकत्र जायला मैत्रिणी लिफ्ट द्यायच्याच. त्यामुळे चारचाकी शिवाय कुठे काही अडत नव्हतच माझं.
अशी गाडी शिवाय काहीही नं अडता माझी बरीच वर्षे गेलीत. पुलाखालून बरंच पाणी गेलं, आणी पुलावरूनही बरंच डांबर गेलं. माझ्या शाळेत जाण्या येण्याच्या वाटेवरचे खड्डे बरेच मोठे झाले (त्यांच्या) वयाबरोबर. शाळेत टू-व्हीलर ने जाणं आता जोखमीचं वाटू लागलं होतं. एक हेल्मेट डोक्यावर असायचं हो, पण शरीरावर कुठे कुठे कवच घालणारं? मग शाळेकरता नाइलाजाने स्कूलबसचा पर्याय स्वीकारावा लागला. त्या करता रोज सकाळी पंधरा मिनिटे आधी घरातून निघणं आलं. येतांना, ‘पटकन मारली स्कूटरला किक, आणि आले चटकन घरी’ असं होईनासं झालं. बस करता रोज थांबायला लागायचं. रोज घरी यायला उशीर व्हायला लागला. मग मला रोजचं दुपारचं जागरण घडायला लागलं. घरी आल्यावर पार्किंग मध्ये गुमान उभी असलेली मारुती माझ्याकडे बघून वेडावून बघते, असं वाटायला लागलं होतं. शिवाय शाळेतून निघतांना केसांवर गॉगल लावलेल्या (हे असे केसांवर अगदी फिट बसणारे गॉगल ह्यांना कुठे मिळतात?) पोरी-सोरी, बायकांबद्दलचा हेवा वाढायला लागला होता ते वेगळंच. त्या बोटांवर अशी गरगर किल्ली फिरवत पार्किंग मध्ये यायच्या, गाडीच्या मागच्या सीटवर झोकात बॅग टाकायच्या आणी सुरकन रिव्हर्स मारून, फुरकन पुढे निघून जायच्या. मी असायची बस मध्ये, ‘एक चिमणी आली बाई, दुसरी चिमणी आली’ करत बस भरण्याची वाट बघत.

एकदा अशीच सकाळी बसने शाळेत पोहोचले, आणी पार्किंग कडे लक्ष गेलं. गेल्याच महिन्यात नव्यानं जॉइन झालेल्या तनवीरच्या कारने एक हलकसं डौलदार वळण घेतलं आणी कार पार्क केली. अहाहा! काय मोहक वाटत होती ती (गाडी नव्हे, तनवीर!), गाडीतून उतरतांना. सावळ्या आणी जराश्या स्थूल असणाऱ्या हसऱ्या तनवीर कडे, एक वेगळाच स्मार्टनेस आणि कॉन्फिडंस होता. ‘बॉस!! इतकं ग्रेसफूल असावं माणसानं!’ मागच्या सीट वरून तिने तिचा लॅपटॉप घेतला, गाडी लॉक केली, आणी ती माझ्या दिशेने यायला लागली.

“गुड मॉर्निंग ..”
“गुड मॉर्निंग ..किती छान दिसतेस तू. आणि किती सफाईदारपणे गाडी चालवते..”
“छान तर तू पण दिसतेस. आणी गाडी चालवायला लागलीस की, तू पण सफाईदारच चालवशील. तुझं तर प्रत्येक कामच छान असतं.”

येस! हाच तो क्षण. ‘मला गाडी चालवता आलीच पाहिजे.’ असं वाटण्याचा. ठरवलं मी, ‘शुभस्य शीघ्र्म!’ आत्ता डोक्यात आलंय ना, तर आता ताबडतोब सुरवात करू. माझ्या जागेवर जाऊन मी ताबडतोब माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या करता, तिच्या घरी येऊन, तिच्या कारवर तिला ड्रायविंग शिकवणारा ड्रायवर शोधला होता. तिच्याशी इतर काही नं बोलता मी त्या ड्रायवरचा नंबर मागितला. इतर काही नं बोलणं एवढ्या करता, की एक तर मला पटापट त्या ड्रायवरला शोधायचं होतं. शिवाय तिच्याकडून तिच्या ड्रायविंग बद्दल आत्ता अज्जीबात काही ऐकायचं नव्हतं. कारण थोड्याच दिवसांपूर्वी ‘आपल्याला तींन पाय का नसतात?’ हा प्रश्न विचारून तिने मला पण विचारात पाडलं होतं. तींन पाय कशाला काय? तर क्लच, एक्सीलेटर आणी ब्रेक करता!

त्या दिवशीच दुपारपासून अस्मादिकांनी सुरवात केली ड्रायवर बरोबर माझी मारुती चालवायला. पंधरा वर्षांपूर्वी ड्रायविंगच बेसिक ज्ञान मिळालच होतं. ते आता आठवायला लागलं. आता गाडीचे कंट्रोल माझ्या हाता, पायात होते, त्यामुळे हा ड्रायवर टीचर खूपच काळजीपूर्वक सूचना देत होता. त्याच्या जवळ कंट्रोल नसल्यामुळे ओरडतही भरपूर होता माझ्यावर. शेवटी त्यालाही त्याचा जीव प्यारा होताच! त्याचं माझ्यावर ओरडणं हेच माझ्याकरता मोठ्ठं मोटिवेशन ठरत होतं. इतकं की, चार दिवसांनंतर मलाच वाटलं, ‘हा नकोच बरोबर. एकटच चालवू या आपण आपली कार.’
आणि पुढच्या आठवड्यातच पहिला दूसरा गियर करत मी शाळेत कार न्यायला लागले. इथे माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीचा सल्ला उपयोगी पडला. तिने सांगीतलं होतं, ‘कार रस्त्यात मध्येच बंद पडली ना, आणी ती पडणारच आहे चारदा तरी, तर कार बंद पडेल तेव्हा आपण ठार बहिरे आहोत असं समजायचं. कुठल्याच हॉर्न कडे, लोकांच्या आरडा-ओरडी कडे वैगेरे लक्ष अजिबात द्यायचं नाही. आणी रस्त्यात काही प्रॉब्लेम आला तरी घाबरायचं नाही. हा ‘इंडिया’ आहे. चार लोकं येतात धावत मदतीला.’

तर अशा रीतीने, माझ्या ड्रायविंग पर्वा मुळे, आयुष्यात एक नवीन सुरवात झाली. आणी खरं सांगते, पूर्वी वेडावून दाखवणारी माझी कार आता माझी जवळची मैत्रीण झाली होती. मला सतत सोबत करणारी... थंडी, ऊन, वारा, पाऊस ह्या पासून वाचवणारी, माझं भलं मोठ्ठं सामान सांभाळणारी मैत्रीण.

स्वत: ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर मला जो आनंद मिळाला ना, तो आत्ता पर्यंत इतर कश्या कशातच मिळाला नव्हता. ड्रायविंग एवढा आत्मविश्वास दुसऱ्या कुठल्याच गोष्टींनी दिला नव्हता आजपर्यंत. पाहुण्यांना आणण.. सोडणं.. हे जिकिरीचं नाही, तर अभिमानाचं काम झालं होतं. कुणालाही फोन करून मी आता सहज म्हणू शकत होते, ‘कुठे उतरलाय? सांगा, मी येते घ्यायला.’, ‘मी सोडते ना तुम्हाला’. त्यात प्रचंड आनंद वाटत होता. आत्ता पर्यंत मैत्रिणंकडून मी फक्त लिफ्ट घेत होते. पण ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.’ ह्या ओळींनुसार, मी आता सगळ्यांना लिफ्ट देऊ शकत होते. गाडीचं स्टीअरिंग व्हील हातात आल्यावर वाटलं, ‘एस्स!!! दुनिया मेरी मुठ्ठी मे!’

*******************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहलंय. शिकुन पहिल्यांदा स्वतः चारचाकी चालवण्याचा आणि सुरवातीच्या दोन तीन महिन्यांचा आनंद, भावना औरच असतात.

छान लिहिलेय…

मी वयाच्या पस्तिशीनंतर सायकल शिकले. मुलीच्या वर्गात व क्रेशमध्ये एक मुलगा होता, त्याच्या पालकांशी ओळख झाली. त्याचे बाबा सायकलवरुन ऑफिसात जायचे. ते मला म्हणाले तुम्ही सायकल का घेत नाही? रिक्शाने फिरण्यापेक्षा सायकल वापरा, फिटनेसही वाढेल. मग मी सायकल शिकले व
तीच्यावरुन बेलापुर ते नेरुळ भाजीबाजार, डिमार्ट वगैरे करायचे.
नंतर ऑफिसने टु व्हिलरवर इन्टरेस्ट फ्री लोन देऊ केले म्हणुन टु व्हीलर घेतली, ती शिकले आणि ती घेऊन फिरायला लागले.
भावाला त्याची ४ व्हिलर विकुन नवी गाडी घ्यायची होती म्हणुन त्याची गाडी विकत घेऊन ती शिकले.

चारचाकी शिकले पण सुरवातीला चालवायला भिती वाटायची. सिन्गल रोडवर तर फेफे उडायची. शिकवणार्याने हातात गाडी देऊन आता चालव म्हणुन जबरदस्ती केली म्हणुन नाईलाजाने चालवायला लागले. मुम्बै-आम्बोली रस्त्यावर सातारा ते कोल्हापुर मी गाडी चालवतेय, माझे टेंशन बघुन गाडीतले हसताहेत आणि त्यामुळे भयंकर भडकुन एकिकडे गाडी चालवत मी गाडीतल्यां पॅसेंजरांना शिव्याही घालतेय ही आठवण अजुन डोक्यात आहे Happy नंतर मुम्बै आंबोली एकहाती कित्येक फेर्‍या केल्या. सुरवातीला मला गाडीतल्या रेडिओचाही त्रास व्हायचा. मी चालवायला लागले की आधी रेडिओ बंद करायचे.

४ व्हिलर रोज वापरायला लागल्यावर दोन चाकी चालवायचा कॉंफिडन्स गेला. आता स्कुटर व सायकल चालवायची खुप भिती वाटते पण चारचाकी घेऊन बिन्दास्त फिरते.

छान
१ जानेवारी २०२५

गाडी असून न शिकणाऱ्या साठी प्रेरणादायी

शर्मिला सेम अस्संच माझं होतं. त्यातून मुंबईसारख्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बऱ्यापैकी असलेल्या शहरात स्वतः चालवायची गरज फार नसते.
अगदी वेळेवर आलाय लेख तुमचा. तुमच्याकडून प्रेरणा घेतेय. २०२५ मध्ये चारचाकी काहीही करून चालवायचीच आहे. सगळीकडे लिहून ठेवतेय. म्हणजे तरी चालवेन.

मस्त लिहिले आहे..
मी कुठल्याच चाकी गाडी शिकायच्या नादाला लागलो नसल्याने रीलेट तर करता आले नाही पण वाचायला आवडले Happy

खूपच छान लिहिलंय.
.
मला गरगर फिरवण्यात का आनंद वाटतो लोकांना?
काय बै style म्हणावी

मला गरगर फिरवण्यात का आनंद वाटतो लोकांना?
काय बै style म्हणावी

नवीन Submitted by किल्ली >>>>> Lol Lol Lol

लेख छान झालाय Happy

मुंबईसारख्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बऱ्यापैकी असलेल्या शहरात स्वतः चालवायची गरज फार नसते.>> खर आहे माझही बरेच वर्ष तसच होत..
लेख वाचताना स्वतः चा चालक होईपर्यंतचा प्रवास आठवला
नुसतं लायसन्स घेऊन ठेवलेलं. एकदा प्रयत्न केला..फजिती झाली.
मग परत बरेच वर्ष गाडी चालवणं बंद.
मग परत चालवली.
परत मोठा ब्रेक आणि आता regular चालवते. लेखात म्हटल्यासरख.. दुनिया मेरी मुठ्ठी मे ! काही अंशी वाटतं / सुरुवातीला वाटलेल..

छान लिहिलंय!
मुंबईसारख्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बऱ्यापैकी असलेल्या शहरात स्वतः चालवायची गरज फार नसते.>>
ह्या उलट परिस्थिती असूनही पुण्यात गर्दीतून सटासट काढता येते, अगदी तुळशीबाग रविवार पेठेत दुकानाच्या दारापर्यंत नेता येते म्हणून स्कूटर बरी वाटायची.
कार बंद पडेल तेव्हा आपण ठार बहिरे आहोत असं समजायचं. कुठल्याच हॉर्न कडे, लोकांच्या आरडा-ओरडी कडे वैगेरे लक्ष अजिबात द्यायचं नाही. >> अगदी रिलेट झालं. पुण्यात सेनापती बापट रोड वर पत्रकार नगर - कृषी महामंडळाच्या चढावरच्या सिग्नल ला फे फे उडाली होती. तेव्हा अगदीं तीन पायांची गरज भासली -))

धन्यवाद अमितव, ममो, मानव पृथ्वीकर, केया, साधना, कुमारसर, निलुदा, माझेमन, ऋन्मेष, किल्ली, ललिता-प्रीति, छन्दिफन्दि, अनघा_पुणे.
@साधना,
वयाच्या पस्तीशीत सायकल पासून सुरवात करणे म्हणजे खरंच ग्रेट!!!! पुढचा प्रवास पण कौतुकास्पद. मला अजूनही ३०/३५ किमी च्या परिघाबहेर जायची वेळ आली नाही. पर अर्थातच तेवढीही गेले नसते तर मात्र अवघडच होतं. हल्ली लोकं लग्नही पार गावाबाहेर रिसॉर्ट वर ठेवतात. स्वत:चे वाहन नसले तर तेथे जाणे अवघडच होते.
@ माझेमन,
नक्की चालवा. एकदा मनात आलंय तर लगेच सुरवात करूनच टाका. शुभेच्छा.

पुण्यात सेनापती बापट रोड वर पत्रकार नगर - कृषी महामंडळाच्या चढावरच्या सिग्नल ला फे फे उडाली होती. तेव्हा अगदीं तीन पायांची गरज भासली >> पुण्यात गाडी चलवणाऱ्या सगळ्यांनाच माझा सांष्टांग दंडवत.

मस्त लिहिलयं!
तींन पाय कशाला काय? तर क्लच, एक्सीलेटर आणी ब्रेक करता! >> Lol २८ वर्षांपूर्वी पुण्यात गाडी चालवायला शिकले तेव्हा मलाही असेच वाटे. तिथे फक्त लायसन्सपुरते शिकले त्यानंतर कधी चालवायचे डेअरिंग केले नाही. इथे ऑटोमॅटिकमुळे प्रश्नच आला नाही. मात्र तीन वर्षांपूर्वी लेकाने पहिली कार घेतली ती हट्टाने स्टिक शिफ्ट वाली! वर मला म्हणे आधी शिकली होतीस ना , ट्राय केलास तर आपोआप येइल. Uhoh

धन्यवाद Digg12, सामो, स्वाती.

तीन वर्षांपूर्वी लेकाने पहिली कार घेतली ती हट्टाने स्टिक शिफ्ट वाली!>> माझा लेकही उसगावात रहातो.. तोही हट्टाने mannual कारच वापरतो. Automatic चालवायला मजा नाही येत म्हणे.

मॅन्युअल वरून ऑटोट्रान्स्मिशनवर गेलात तर डाव्या पायाने ब्रेक उजव्याने ऍक्सलरेटर असे अजिबात करू नका!

डावा पाय वापरायचाच नाही. उजव्यानेच ऍक्सलरेटर व ब्रेक.
डाव्या पायाला धाडकन क्लच दाबण्याची सवय असते. त्याने ब्रेक दाबला तर तो करकचून लागुन गाडी स्कीड होईल किंवा तेवढा वेग नसेल तर मागुन कोणी ठोकेल.
थोडक्यात ऑटोट्रान्समिशन असेल तर फक्त डावा पाय विसावतो, उजव्या पायाची कामे तीच रहातात.

परत सुरू करणार्‍याची हो - ना एकदम परफेक्ट पकडली आहे.

मी देशात थोडेसे जुजबी ड्रायव्हिंग तेही रिकाम्या रस्त्यावर वगैरे केले होते - अमेरिकेत आल्यावर दोन तास क्लास घेतला नि नंतर कंपनीने प्रोजेक्ट्साठी एकदम आडगावी पाठवले जिथे वाहनाशिवाय पर्यायच नव्हता. पहिला आठवडा ऑफिसमधे कोणी ना कोणी मदत केली पण ते पण कंटाळताहेत हे दिसत होते. त्यातल्याच एकाने गाडी रेंट कर नि माझ्या पाठी दोन दिवस चालव असे सांगितले. अगदी लिटरली तसेच केले. लाईट्स काय, टर्न्स काय, ट्रॅफिक काय, पार्किंग लॉट काय , हायवे काय (पट्ठ्याने दुसर्‍यादिवशी थेट हायवे नि मग टोल वे वर नेऊन आसमान दाखवले होते. टेलगेटचा माझा पहिला अनुभव होता असे म्हणू शकता Happy ) एकदम त्याच्या गाडीछ्या बुडाला चिकटवून गादी चालवली होती दोन दिवस ती आठवण आली तरी हसायला येते.

धन्यवाद रुपाली, असामी..

@असामी,
छान अनुभव. येथून गेल्यावर एकदम तिथल्या वातावरणाशी आणि वेगाशी जुळवून घेणे अवघड गेले असणार. शिवाय डावं उजवं आहेच.

मस्त खुसखुशीत लिहीलंय शर्मिला.
ललिता चा लेख वाचते नंतर.
साधना टोटल रिस्पेक्ट .
आमच्या चौघी बहिणींमधे मीच एकटी अशी गाडी न शिकलेली. बाकीच्या मस्त पैकी चालवतात.
मला गाडी चालवणाऱ्या बाया आवडतात, पुण्यात तर जवळ जवळ सगळ्याच बायका गाडी किंवा स्कूटर,बाईक चालवताना दिसतात Happy

धन्यवाद धनुडी.
ललिता चा लेख जुना असला तरी अगदी आजही ताजा वाटतो.
साधना कडून तर शिकण्यासारखं खूपच आहे.

धनुडी, तुम्हीही खरच शिका गाडी. खूप छान अनुभव असतो तो. पुण्यात बायकांनी दुचाकी चालवण्याची तर खूपच जुनी परंपरा आहे. पूर्वी स्वयंचलित दुचाकी नव्हत्या तेव्हाही तिथे बायका सायकलने कॉलेज, ऑफिस ला जायच्या.

>>>>>>> पुण्यात बायकांनी दुचाकी चालवण्याची तर खूपच जुनी परंपरा आहे.
होय मी ही फर्गुसनला लुना ने जात असे.