२०२३ ची आवृत्ती : https://www.maayboli.com/node/84421
* * *
आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे वर्षाखेरीचे हे सदर २०२२मध्ये चालू केले. आपण सर्वांनी त्याला गेली २ वर्षे चांगला प्रतिसाद दिल्याने समाधान वाटले. आगामी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना यंदाची ही आवृत्ती सादर करताना आनंद होत आहे.
या संशोधनाचा पसारा अफाट असल्यामुळे एका लेखात त्याचा समाधानकारक आढावा घेणे अशक्य आहे. यंदा संशोधनाची वर्गवारी न करता ‘टॉप टेन’च्या धर्तीवर दहा महत्त्वाच्या घडामोडींचा धावता उल्लेख करतो.
१. जनुकीय रोगोपचार अर्थात CRISPER
शरीरातील जनुकीय संपादनाचे हे अत्याधुनिक तंत्र. विविध जनुकीय बिघाडांचा मुकाबला करणे हा त्याचा हेतू. हिमोग्लोबिनच्या जनुकीय आजारांपासून ते थेट कर्करोग आणि एड्ससारख्या गंभीर आजारांच्या उपचारांची दिशा यामुळे आमूलाग्र बदलता येईल.
२. 3-D printing तंत्रज्ञान
दीर्घकालीन अस्थिरोग आणि संधिरोग यांच्यावरील उपचार म्हणून विविध कृत्रिम अस्थि / सांधेरोपण केले जाते (implants). या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात व्यक्तिसापेक्ष अचूक उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे रोपण केलेला कृत्रिम अवयव रुग्णासाठी जास्तीत जास्त सुखकारक करता येतो.
३. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर
या विषयावर यापूर्वीच दोन स्वतंत्र लेख लिहिलेले आहेत : (https://www.maayboli.com/node/83016
https://www.maayboli.com/node/83047)
अचूक वैद्यकीय निदानाच्या दृष्टिकोनातून या तंत्रज्ञानाचा वाढता वापर फायदेशीर ठरावा. एक महत्त्वाचे उदाहरण घेऊ. मॅमोग्राफी या स्तन-संबंधित तपासणीमध्ये AIच्या वापराने 99% अचूकता साधता येईल. त्यातून आपल्याला कितीतरी रुग्णांच्या बाबतीत बायोप्सी हा त्रासदायक प्रकार वाचवता येईल.
४. मेंदूच्या अभ्यासाचे प्रगत प्रतिमा तंत्रज्ञान
यामुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा सखोल अभ्यास करता येतो. भविष्यात याचे उपयोग रोगनिदानाच्याही पलीकडे जाऊन शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही करता येतील.
५. आभासी वास्तव अर्थात virtual reality
यामध्ये कृत्रिम प्रारूपांचा वापर करून अनेक आघाड्यांवर त्याचा उपयोग केला जातो. त्यामध्ये वैद्यकीय प्रात्यक्षिक शिक्षण, दिव्यांग रुग्णांचे पुनर्वसन, वेदनाहरण, सर्जरीतील अचूकता आणि विविध मानसोपचारांचाही समावेश आहे.
६ . व्यक्तीनिष्ठ उपचार अर्थात प्रिसिजन मेडिसिन
अनेक आजारांच्या उपचारांमध्ये ‘सब घोडे बारा टक्के’ हे धोरण उपयुक्त नसते. म्हणून प्रत्येक रुग्णाचा जनुकीय आलेख काढून त्याचे व्यक्तिगत जीवनशैली आणि पर्यावरण यांच्याशी सांगड घालून व्यक्तीसापेक्ष उपचार ठरवता येतात जे अर्थातच अधिक प्रभावी ठरतात. कर्करोग उपचारांमध्ये याचा वाटा मोठा असेल.
७. एम-आरएनए तंत्रज्ञान
याचा लस निर्मितीमधील उपयोग गेल्यावर्षी स्पष्ट केला होता. आता त्याही पलीकडे जाऊन शरीरातील अन्य अनेक अभाव असलेल्या प्रथिनांचे उत्पादन करण्यासाठी याचा उपयोग भविष्यात करता येईल. सध्या काही आजारांसाठी जे अँटीबोडीजचे उपचार बाहेरून दिले जातात ते अत्यंत महागडे आहेत. त्याऐवजी हे नवे तंत्रज्ञान वापरल्यास शरीरामध्येच अपेक्षित अँटीबोडीज तयार करता येतील. या तंत्रज्ञानासंदर्भात अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेलेली आहेत. त्यावर वादविवादही होत राहतील. परंतु भविष्यात त्यातील अपायकारक भाग दूर होऊन उपकारक भाग अनुभवास यावा ही अपेक्षा.
8. . मानसोपचारातील आधुनिकता
नैराश्य ही सध्याची जागतिक प्रमाणावर भेडसावणारी मोठी समस्या आहे. त्याच्या उपचार पद्धतीमध्ये नवनवे प्रयोग प्रस्थापित होत आहे विशिष्ट ॲप्स आणि बॉटसच्या मदतीने असे उपचार सुलभ होऊ शकतात.
उदा. cognitive behavioral therapy (CBT) साठी Woebot चा उपयोग. तसेच Ellipsis हे व्यक्तीच्या आवाजावरून भावनिक ताणतणावांची प्राथमिक कल्पना देणारे software.
9. जागतिक पातळीवर पाहता करोनरी हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. हा आजार आणि रक्तातील विविध मेदांच्या पातळीचा जवळचा संबंध आहे. त्या अनुषंगाने भारतीय हृदय-आरोग्य संघटनेने भारतातील संशोधनावर आधारित काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना यंदा जाहीर केल्यात : (https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0019483223004698)
तो अहवाल विस्तृत असल्यामुळे त्यातील काही निवडक मुद्द्यांची ही नोंद :
- . भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा मेदबिघाड म्हणजे रक्तातील वाढलेले TG.
- . हृदयविकाराचा धोका ठरविताना रक्तातील मेदपातळी मोजण्याचे महत्व निर्विवाद आहे. ही पातळी उपाशीपोटी मोजण्याची परंपरा दीर्घकालीन आहे. परंतु नव्या सूचनेनुसार ही पातळी उपाशीपोटी सोडून अन्य कोणत्याही वेळी ( non-fasting) मोजावी, ही महत्त्वाची शिफारस.
- . Lipoprotein (a) या मेदाची पातळी मोजणे या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुमारे 25% भारतीयांमध्ये ही वाढलेली असते. त्यामुळे प्रत्येकाने ती आयुष्यात किमान एकदा तरी मोजून घ्यावी.
10. इजारहित प्रकारे हिमोग्लोबिन मोजण्याचे भारतातील संशोधन (EzeRx)
: यामध्ये रुग्णाला अजिबात सुई न टोचता बोटाचे निव्वळ स्कॅनिंग करून हिमोग्लोबिन मोजण्याची पद्धत विकसित केलेली आहे. हे तंत्र अत्यंत स्वस्त असून भारतातील मोठ्या प्रमाणावरील चाळणी चाचण्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या संशोधनाला यंदाचे ‘अंजनी माशेलकर प्रतिष्ठान गौरव’ पारितोषिक देण्यात आलेले आहे (https://ezerx.in/blog/ezerx-news/anjani-mashelkar-foundation-award-winne...).
येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन नव्या सुखकर रोगनिदान पद्धती आणि सुधारित औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा !
. . .
कोणतेही नवे संशोधन हाती घेताना संबंधित देशांमधल्या आजारांचा प्राधान्यक्रम ध्यानात घेणे हे तर महत्त्वाचेच. नवे तंत्रज्ञान जेव्हा प्रथम बाजारात येते तेव्हा ते महाग असते. त्यामुळे विकसित देशांमध्ये उगम पावलेले सर्वच तंत्रज्ञान विकसनशील देशांना लगेच वापरणे शक्य नसते. गरजेनुसार आवश्यक अशा तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य माणसापर्यंत पोचण्यासाठी सरकारी पातळीवर आर्थिक धोरण-नियोजन-अंमलबजावणी इत्यादी गोष्टींची व्यवस्थित आखणी करावी लागते. त्या दृष्टीने योग्य ती पावले पडावीत आणि नव्या आरोग्य-तंत्रज्ञानाचे लाभ सामान्य माणसांपर्यंत पोचावेत अशी आशा व्यक्त करून हा आढावा संपवतो.
रोगप्रतिबंधात्मक जीवनशैलीवर आपण अधिक लक्ष केंद्रित करावे या अपेक्षेसह आपणा सर्वांना कायम उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छाही व्यक्त करतो !
***********************************************************
संदर्भ : विविध विज्ञान आरोग्यपत्रिका, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य परिषदांमधील चर्चा.
3D चित्रसौजन्य : Freepik
* * *
रच्याकने. . .
आज लवकर झोप झाल्याने उठून ताजातवाना असल्याने हा लेख प्रकाशित करण्यास सज्ज झालो होतो. परंतु इथे येताच खालील वाक्याने स्वागत झाले :
“Maayboli is currently down for maintenance. ! We will be back in approx 2 hours , Around 7:45 am IST. बाहेर जाऊन थोडी स्वच्छ हवा खा !
ते वाचून चेहऱ्यावर स्मित उमटले आणि लगेच त्या सूचनेचे पालन केले ! आता संस्थळ पूर्ववत खुले झाल्यावर लेख प्रकाशित करीत आहे
गेल्या काही महिन्यांपासून आणि
गेल्या काही महिन्यांपासून आणि या लेखाच्या बाबतीतही लेखाचे मुखपृष्ठचित्र बाहेरील अनुक्रमणिकेत दिसत नव्हते. आता त्यासंबंधी वेमांना विनंती केल्यावर त्यांनी बरीच तांत्रिक खटपट करून त्यात यश मिळवून दिले.
त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !
चांगला आढावा.
चांगला आढावा.
वेमा स्वतःला फालतू
>>>>>>>>>आता त्यासंबंधी वेमांना विनंती केल्यावर त्यांनी बरीच तांत्रिक खटपट करून त्यात यश मिळवून दिले.
वेमा स्वतःला फालतू डिमांडसमध्ये गुंतवुन घेत नसावेत पण योग्य तिथे नक्की मदत करत असतात - असे नीरीक्षण आहे.
गोषवारा छान.
गोषवारा छान.
मेंदूच्या अभ्यासाचे प्रगत प्रतिमा तंत्रज्ञान - भविष्यात शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उपयोग ? तो कसा याचे कुतुहल आहे.
… वेमा स्वतःला फालतू
.
उत्तम सारांश. प्रत्येक
उत्तम सारांश. प्रत्येक मुद्याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला महत्वाचे वाटणारे पॉइंटर्स / दुवे देऊ शकलात तर लेखाची उपयुक्तता अजुन वाढेल असे वाटते. धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
* शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उपयोग ? तो कसा >>> अतिशय चांगला आणि अपेक्षित प्रश्न !
क्रीडा क्षेत्रातला उपयोग अनेक प्रकारे रोचक आहे.
नव्या तंत्रज्ञानामध्ये Muse 2 यासारखे काही डोक्याला बांधायचे पट्टे असतात. त्यामधून त्या व्यक्तीच्या मेंदू लहरींचा अभ्यास होतो आणि त्यातून खेळाडूंचे मनोधैर्य कसे उंचवायचे याच्या काही सूचना मिळतात. महत्त्वाच्या स्पर्धात्मक खेळांमध्ये मनावरील ताण, स्वयंनियंत्रण आणि तातडीने हालचाली करण्याची क्षमता या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तिथे हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल.
इतकेच नाही तर लहान वयात जी मुले संभाव्य मैदानी खेळाडू म्हणून निवडली जातील त्यांच्यातली भविष्यात कोणती उच्च प्रतीचे खेळाडू होऊ शकतील, याचा सुद्धा अभ्यास याच्या मदतीने करता येणार आहे.
https://choosemuse.com/blogs/news/how-neurotechnology-is-helping-female-....
https://www.frontiersin.org/journals/human-neuroscience/articles/10.3389...
Meet ,
Meet ,
मुद्दे क्र. ३, ९ व १० चे दुवे मी मूळ लेखात आधीच दिलेले आहेत. आता येणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने इतर काही नक्की वाढवता येतील.
मूळ 'आढावा-लेख' फार लांब आणि बोजड होऊ नये हाच असे करण्यामागचा हेतू आहे.
वैद्यकातील AI वर पूर्वीच दोन स्वतंत्र लेख लिहून झालेले आहेत व त्यांचे दुवे दिलेच आहेत.
डॉक्टर, तुम्ही आम्हा सर्वांना
डॉक्टर, तुम्ही आम्हा सर्वांना आरोग्याविषयी आणि त्यात चाललेल्या संशोधनाविषयी नेहेमी जाग्रुत ठेवता. खूप खूप धन्यवाद.
चांगला आढावा. >>> +1
चांगला आढावा. >>> +1
Virtual Reality चा वैद्यकीय शिक्षणामध्ये खूप उपयोग होत असावा असे वाटते. प्रत्यक्ष चिरफाड न करता देखील शरीराची अंतर्गत रचना जाणून घेण्यास फायदा होत असावा.
* Virtual Reality चा वैद्यकीय
* Virtual Reality चा वैद्यकीय शिक्षणामध्ये खूप उपयोग होत असावा >>> +१११
simulation-based medical education (SBME) ही संकल्पना भारतातही राबवली जात आहे.
त्याची काही प्रारूपे अतिशय डोकेबाज आणि सुंदर आहेत. ती मी नुकतीच बघून आलो.
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6798020/#:~:text=Immersive%20VR...?
छान लेख...
छान लेख...
डॉक्टर आभासी वास्तव आणि दिव्यांग पुनर्वसन काय आहे? जरा समजवा.
Virtual reality चा दुवा रोचक
SBME चा दुवा रोचक आहे.
वाचताना काही प्रश्न पडले पण लेखात खाली त्याच्या मर्यादा सांगितल्या आहेत त्यात उत्तर मिळाले.
* आभासी वास्तव आणि दिव्यांग
* आभासी वास्तव आणि दिव्यांग पुनर्वसन
>>>
https://www.scnsoft.com/healthcare/virtual-reality#adoption
चांगला आढावा
चांगला आढावा
धन्यवाद डॉक्टर..
धन्यवाद डॉक्टर..
गोषवारा छान.
गोषवारा छान.
<3-D printing तंत्रज्ञान> भन्नाट आहे.