त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. माझा आयडीही त्यांच्या आयडीला जुजबीच ओळखत होता. त्यांच्या मायबोलीवरच्या वावरातून, लेखनातून, अभिप्रायांतून, गप्पांमधून एक प्रतिमा मनात घडत गेली होती. विविधरंगी कागदी कपटे जोडून चेहरा जुळवावा तशीच आणि तेवढीच ओळख.
ही ओळख हृद्य होती मात्र. अगदी बालवयापासूनच सलग सहज निखळ नितळ सुख वाट्याला येऊच नये अशी एखाद्याची वाटचाल का असते याला काही उत्तर नाही. एका परीक्षेपाठोपाठ पुढची सत्त्वपरीक्षा असाच जणू आयुष्याचा अभ्यासक्रम आखलेला यांच्या बाबतीत. त्यामुळे घडलेला म्हणा किंवा गडद होत गेलेला म्हणा, इंग्रजीत 'आऊटलायर पर्सनॅलिटी' म्हणता येईल अशा प्रकारचा स्वभाव. पण त्यातूनही त्यांचा उमदा जीवनोन्मुख दृष्टीकोन लखलखत असायचा. त्यांनी कधी स्वतःची कणव केली नाही आणि इतर कोणाला ती करायची संधी दिली नाही.
अंगी धीर होता, धडाडी होती. 'मकान और दुकान' खंबीरपणे सावरलं होतं, मुलीचं एकल पालकत्व जबाबदारीने निभावलं होतं. आणि हे सगळं करत असतानाही स्वतःतलं एक वेडंबागडं, मिश्कील, खोडकर मूल त्यांनी जिवंत ठेवलं होतं. 'घरचा अभ्यास' झाला की हे मूल घरच्या पाळलेल्या आणि रस्त्यातल्या कुलुंगी कुत्र्यांशीही खेळायचं, त्यांच्यासाठी खिशात खाऊ बाळगायचं, 'मोठं झाल्यावर' बेडरूममध्ये छोटा फ्रीज ठेवून रात्री टीव्ही बघताना त्यातून कोल्ड्रिंक नाहीतर बिअर पिण्याची स्वप्नं बघायचं, नवीन कपडे घालून सिनेमा बघून यायचं, मध्येच व्हीगन व्हायचं खूळ डोक्यात घ्यायचं, कधी कोणाला मुळुमुळू रडण्यावरून फटकारायचं, कधी अर्धं चॉकलेट शेअर करत 'फिकर नॉट!' म्हणून धीरही द्यायचं!
तो शेर आहे ना,
मिरे दिल के किसी कोने में इक मासूम सा बच्चा
बड़ों की देख कर दुनिया बड़ा होने से डरता है
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेतून आलेलं, म्हणून लोभस होतं.
इथल्या अनेकांप्रमाणे मायबोलीमध्ये त्यांना त्यांचा कबिला सापडला होता. पण इथेही त्या कुठल्या एका कंपूच्या नव्हत्याही, आणि सगळ्याच कंपूंमध्ये होत्याही. त्यांचा वावर पारदर्शी असायचा. मनात आलं, लिहून टाकलं असा बाणा! नो फिल्टर्स! आपसुखच त्यांच्याशी जो संवाद घडेल तो - एकमत असेल वा मतभिन्नता - पण सहज व्हायचा, त्यात नसती आडवळणं लागत नसत. फटकेबाजी करत तशी खिलाडूपणे झेलतही!
अमेरिकेबद्दल त्यांना का कोण जाणे पण विशेष आस्था होती. इथल्या चालू घडामोडी, राजकारण, राहणीमान यांबद्दल त्यांना कुतुहलही असायचं आणि बरीच माहितीही असायची. त्या अर्थाने त्या खरंच ग्लोबल सिटिझन होत्या.
त्यांच्या बाकी बर्यावाईट अनुभवांबद्दल त्या ज्या सहजतेने - मॅटर ऑफ फॅक्टली - लिहायच्या त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं कॅन्सरचं निदान आणि त्यानंतरच्या लढाईबद्दलही लिहिलं. त्यांचा डेहराडूनचा फोटो बघून चरकायला झालं होतं. त्या गेल्याची बातमी कळली तेव्हा त्यामुळे दुर्दैवाने फारसं आश्चर्य वाटलं नाही. वाईट मात्र फार वाटलं. खरंतर आंतरजालाच्या आभासी दुनियेतली एक आभासी ओळख, पण जवळचं कुणी जावं तशी चुटपुट वाटली.
'दु:खद घटना' धाग्यावर त्यांच्याबद्दल कळल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, खूप हळव्या आठवणी लिहिल्या - आशुडीने 'स्वतःच्याच Wonderland मधली Alice' असं फार हृद्य आणि चपखल वर्णन केलं त्यांचं.
ते उत्स्फूर्त आणि स्वाभाविक होतं, पण अमा 'बातमी' नव्हत्या. आपल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र धागा असावा असं फार फार वाटलं म्हणून हा धागा काढत आहे.
तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी इथेही लिहाल का?
- अमांकडे टॅरॉट कार्डस चा सेट
- अमांकडे टॅरॉट कार्डस चा सेट होता. त्यांना टॅरॉटमध्ये रस होता.
- इथे मी एकदा 'फ' शब्द वापरला होता. त्यावरुन त्या रागावल्या होत्या गुड फॉर मी.
- रशिअन व्यक्तीच्या प्रेमात नायिका पडते असा काहीसा एरॉटिसिझमकडे झुकणारा फेटिश नावाचा, माझा धागा होता त्यात त्यांनी मिष्कीलपणे लिहीलेले होते - बाकी रशिअन? हं ब्लॅक का नाही?! वन्स यु गो ब्लॅ क देअर इज नो टर्निन्ग बॅक असे अमरिकेतच ऐकले आहे. ख खो देजा. दॅट वुड हॅव बीन सम फेटिश.
ओह माय गॉड!!! देअर, अमा वन मी. सडेतोड + मिष्किल! अजब रसायन होत्या त्या.
- हौशी होत्याच, कला, पाककला, सिनेमे, गाणी अनेक गोष्टींचा आस्वाद घेत असत.
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेमुळे
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेमुळे नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेमुळे आलेलं, म्हणून लोभस होतं. >>> सहमत!
खरंतर आंतरजालाच्या आभासी दुनियेतली एक आभासी ओळख, पण जवळचं कुणी जावं तशी चुटपुट वाटली. >>> मलाही असेच वाटले.
तो मकान और दुकान वाला पॅरा अतिशय आवडला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चपखल वर्णन आहे ते.
असा धागा कोणीतरी काढावा असे
असा धागा कोणीतरी काढावा असे वाटले होते. काढलात हे छान केलेत.
क्या बात! क्या बात!!
क्या बात! क्या बात!!
फिकर नॉट अमा. जिंदादिली जिंदा रहेगी.
मस्त लिहिलंस! अमांसाठी वेगळा
मस्त लिहिलंस! अमांसाठी वेगळा धागा काढण्याबद्दल अगदी सहमत!
अंगी धीर होता, धडाडी होती. 'मकान और दुकान' खंबीरपणे सावरलं होतं, मुलीचं एकल पालकत्व जबाबदारीने निभावलं होतं. आणि हे सगळं करत असतानाही स्वतःतलं एक वेडंबागडं, मिश्कील, खोडकर मूल त्यांनी जिवंत ठेवलं होतं. 'घरचा अभ्यास' झाला की हे मूल घरच्या पाळलेल्या आणि रस्त्यातल्या कुलुंगी कुत्र्यांशीही खेळायचं, त्यांच्यासाठी खिशात खाऊ बाळगायचं, 'मोठं झाल्यावर' बेडरूममध्ये छोटा फ्रीज ठेवून रात्री टीव्ही बघताना त्यातून कोल्ड्रिंक नाहीतर बिअर पिण्याची स्वप्नं बघायचं, नवीन कपडे घालून सिनेमा बघून यायचं, मध्येच व्हीगन व्हायचं खूळ डोक्यात घ्यायचं, कधी कोणाला मुळुमुळू रडण्यावरून फटकारायचं, कधी अर्धं चॉकलेट शेअर करत 'फिकर नॉट!' म्हणून धीरही द्यायचं! >>>> हा पूर्ण पॅरा फार चपखल आहे!
तिकडचे माझे पोस्ट इथे आणतेय-
तिकडचे माझे पोस्ट इथे आणतेय-
रीसेन्ट पोस्ट्स वाचून काळजी वाटली होती अमांची. पण एवढ्यात श्रद्धांजली देण्याची वेळ येऊ नये असेच वाटत होते. अमा हे असं व्यक्तिमत्त्व होतं की आपण वर्षानुवर्षे त्यांना ओळखतो असेच वाटायचे! त्यांच्या पोस्ट्स नेहमी आवर्जून वाचल्या जायच्या, नाव न वाचताच त्यांची पोस्ट आहे हे कळणार. मोस्टली पॉझिटिव, प्रॅक्टिकल सल्ले, थोड्या विनोदी, कधी एकदम सार्कॅस्टिक ह्यूमर. आयुष्य अवघड आले त्यांच्या वाट्याला, पण शी वॉज अ फायटर! अ टफ वन! त्यातूनच आलेले बर्याचदा साध्यासरळ आयुष्य पाहिलेल्या जनतेला न झेपणारे तत्त्वज्ञानही दिसायचे त्यांच्या लिहिण्यात. एकदम युनिक पर्स्पेक्टिव असायचा.
अमा, यू विल बी मिस्ड!! श्रद्धांजली!! पुन्नी आणि स्विटीला यातून सावरण्याचे बळ मिळो!
चांगलं लिहिलं आहेस. मकान आणि
चांगलं लिहिलं आहेस. मकान आणि दुकान हा पॅरा परफेक्ट आहे त्यांच्या पर्सनॅलिटीला. त्या युनिकच होत्या. त्यांच्या वयाची बाई मी गेमिंग इवेंट्समध्ये पार्टिसिपेट करुन खेळताना पाहिलेली नाही तशीच BTS फॅन असलेलीही नाही. अपवाद असतीलही पण माझ्या पहाण्यात नाही. अमेरिकेला जाताना काय नेऊ वगैरे कोणी विचारलं की तिकडे दीपचे सामोसे वगैरे मिळतात हे सांगायच्या :).
त्या आपल्यात नाहीत हे अजूनही खरं वाटत नाहीये पण त्रासातून सुटल्या. त्यांना श्रद्धांजली.
हो अमांनी लिहिल्यामुळे मीही
हो अमांनी लिहिल्यामुळे मीही ते मर्ज ड्रॅगन डाउनलोड केले आणि आता कायम खेळत असते
अमा नेहमी कोतबो वर वगैरे वरचेवर डिप्रेस्ड मनासाठी पेट थेरपी सुचवायच्या तेव्हा पूर्वी ते तर्हेवाइक वाटायचे पण माझ्याकडे माउई आल्यावर त्या तसं का म्हणतात त्याचा अर्थ समजला!
सुरेख आणि चपखल लिहिले आहेस.
सुरेख आणि चपखल लिहिले आहेस. अमांच्या स्मृतींना वंदन. धागा काढल्याबद्दल आभार.
त्यांचे माझे शेवटचे इंटरॅक्शन डेथ क्लिनिंगच्या धाग्यावर झाले होते. तेथे त्या देवघराच्या पोस्टींवरील प्रतिक्रियांमुळे नाराज वाटल्या होत्या. आता या क्षणी मला किमान एवढं समाधान वाटतंय की मी त्यांच्या भावना invalidate न करता सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. कारण त्यांना बरं नाही हे लक्षात आलेले होतेच पण तीव्रतेची कल्पना नव्हती. ते शेवटचेच ठरले. आरोग्य धनसंपदाम् मधेही कर्करोगाच्या धाग्यावर अधुनमधून आजारपणाबद्दल वाचले होते. तेथे मी क्वचितच जाते, त्यामुळे हल्लीचे काही माहिती नाही. तेथे पहिल्यांदा कळलं तेव्हा मलाच मनस्ताप झाला. आयुष्य एका माणसाला इतकी आव्हानं देणं अनफेअर वाटले. त्यांच्या आव्हानात्मक आयुष्याबद्दल कल्पना होतीच. किमान हे तरी नको व्हायला होतं असं वाटलं. त्यांनी मला वेळोवेळी 'ताई, तुम्ही dazzling लिहीता, तुम्ही प्रोफेशनली लिहायला हवं' या शब्दांत प्रोत्साहन दिले होते. हा dazzling शब्द त्यांनी तीन- चार वेळा लिहीला होता. त्या माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या होत्या. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या मला उद्देशून नसलेल्या पोस्टीही लक्षपूर्वक वाचायचे. रेल्वेच्या रूळावरून घसरलेले डबे दिसतात तसे सुटे सुटे शब्द असलेल्या पोस्टी असायच्या. काही तरी टायपिंग एरर असावा.
याआधीही त्यांनी इतकी आव्हानं आणि संघर्ष बघितला आहे की आता मृत्यूचे विमान आले तरी हसतहसत कृष्णविवरात जाईन असे कुठेतरी लिहिले होते. दुसरीकडे सगळी कर्तव्य पार पाडली की युधिष्ठिर जसा त्याच्या कुत्र्यासोबत चालत स्वर्गारोहिणीला गेला तशी जाईन, तेथे माझे पहिले कुत्रं वाट बघत असेल. सुंदर झाडं असतील. त्या झाडाखाली आम्ही बसू असं लिहिलं होतं. डेथ क्लिनिंगच्या धाग्यावर आयुष्यातले सगळे सुखदुःखाचे क्षण सारखे वाटायला लागून मन एका पाईप सारखे होऊन त्यातून भसाभसा सगळे वाहून जाईल असे लिहिले होते. एवढा एक्स्ट्रीम त्रास तरीही स्थितप्रज्ञता फार लोकांना समजू शकत नाही. कमांडोचे सर्वायव्हल गाईड बुक चौकीदाराला 'जास्तच' वाटते. चौकिदाराचे कमांडोला 'पुरेसे' वाटत नाही. असं समजू शकणारी लोक मायबोलीवर फार नाहीत. त्यामुळे जी दोन-चार आहेत ती अनमोल वाटतात.
त्यांच्या श्वानप्रेमामुळे मी जेव्हा कोकोनटला दत्तक घेतले. तेही पपी मिल मधून न घेता जो रेस्क्यू मिळाला तो घेतला याचे त्यांना फार समाधान वाटले होते. त्या नेहमी त्याचे कौतुक करायच्या. हल्लीच नवरात्रात दोडक्याची चटणीची रेसिपी माझ्याकडे आलेल्या दोडक्याच्या अमाप पिकावर उपाय म्हणून त्यांनी हसतखेळत 'कोकोनटला बसवा चिरायला' असं म्हणत सांगितली होती. मी म्हणाले होते 'अमा, तो कशाचा बसतोय. तो राजाबाबू आहे.'
माझं बहुतेक संभाषण सकारात्मकच राहिले होते. फार मैत्री झाली नाही, पण त्यांचा मनस्वी वावर आवडायचा. She will be missed. /\
वाड्यावर आणि तिकडे लिहिलेलं
वाड्यावर आणि तिकडे लिहिलेलं इकडे आणतो.
कसला आड पदडा नसलेलं रोखठोक, आणि हुशार, आणि त्याबरोबर मिश्किल व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्याशी पटलं नाही आणि काही वाद घातले तरी मजा यायची. तो धागा संपला की तो वाद ही संपत असे. मनाचा तळ कोणाला दिसलाय.. पण त्या कायम ट्रांझ्याक्शनल आणि वर्तमानात जगणाऱ्या वाटायच्या. मुलुंडला गेलं की भेटावं वाटायचं पण कधी भेटलो नाही. समरसून जगायाच्या असं कायम वाटत असे. सगळ्यात रस असे त्यांना. अमेरिका आणि फ्री वर्ल्ड याबद्दल जवळीक आणि फार विविध क्षेत्रातील जागतिक भान सजगता कायम दिसत असे.
कायम सकारात्मक बघणारे आणि वेगळाच दृष्टिकोन मांडणारे व्यक्तिमत्त्व होते. जगाबद्दल, चाकोरी बाहेरच्या माणसांबद्दल त्यांना खूप जिव्हाळा आपुलकी आहे हे जाणवत असे. त्यात पुणेरी नर्म विनोदी तिरकस भाषा.
अमा, तुमची उणीव कायम भासेल!
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
अमांनी किती लोकांची मनं जिंकली आणि सगळ्यांना हुरहुर लावून गेल्या.
अमांना श्रद्धांजली.
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
अमांनी किती लोकांची मनं जिंकली आणि सगळ्यांना हुरहुर लावून गेल्या.
अमांना श्रद्धांजली.>>>>+१
बाप्रे !
बाप्रे !
अजिबातच माहिती नव्हतं. दु:खद बातमी या धाग्यावर गेलो नव्हतो.
अमांच्या पोस्ट्स पाहून त्या बर्या होतील असे वाटलं होतं. माझ्या भावाच्या वेळी त्यांनी धीर दिला होता. तसेच शेवटी शेवटी हे पण करून पाहू म्हणून उपचार करण्यासाठी इथे विचारणा केली तेव्हां त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले होते. खूप प्रॅक्टीकल आणि आनंदी व्यक्तीमत्व अशी त्यांच्या बद्दल इमेज होती मनात. मायबोलीवर भेटायचं होतं अशात त्या सर्वात वरच्या नावात होत्या. आता त्या कधीच भेटणार नाहीत ! वाटलं नव्हतं ही वेळ येईल.
तो “मकान और दुकान” वाला पॅरा
तो “मकान और दुकान” वाला पॅरा एकदम चपखल आहे. सुंदर लिहिलंय!!
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
अमांनी किती लोकांची मनं जिंकली आणि सगळ्यांना हुरहुर लावून गेल्या.
अमांना श्रद्धांजली.>>>>+१
स्वाती, हा धागा काढल्याबद्दल
स्वाती, हा धागा काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेतून आलेलं, म्हणून लोभस होतं. +१
आशुडीने 'स्वतःच्याच Wonderland मधली Alice' असं फार हृद्य आणि चपखल वर्णन केलं त्यांचं. +१
मी अमाकरता तिचे लहानपण गेलेल्या भागवत बिल्डींगचा फोटो काढला होता. पण तिला कसा पाठवायचा हे कळले नाही आणि राहूनच गेले. तिला कर्करोग होता हे माहीत नव्हते. ती गेल्याचे वाईट वाटणे अजून थांबत नाहीये. का ते ही कळत नाहीये. मला तिच्यासोबत एकदा भागवत बिल्डींगला भेट द्यायला आवडली असती.
अमा गेल्या ? That’s sad.
अमा गेल्या ? That’s sad. त्यांची तब्येत खराब आहे हे त्यांच्या पोस्टवरून समजत होतं पण exit घेतील इतक्यात असं वाटलं नाही. She was a fighter.
माझ्या धाग्यांवर हमखास प्रतिक्रिया येत त्यांच्या. Mostly unique, with funny twist. हैदराबाद कनेक्शन कॉमन होते आमचे, हल्ली तिकडे फार रमत नव्हत्या. पण कधी न भेटताही “तुमकू होना तो बोलो, बच्ची के हाथ सालन भिजवातुं” अशी आपुलकी.
इतक्यात माझ्या Dostadning धाग्यावर काही प्रतिक्रियांनी अमा दुखावल्या असे वाटले, fortunately most of us, including me, clarified that we intended only the good for her.
She used to pour her heart and life on maayboli म्हणून कधी भेट-मैत्री नसतांना सुद्धा जुनी ओळख असल्यासारखे वाटते. May she find the peace, serenity and calm that eluded her in this world.
फिकर नॉट करणारी व्यक्ती
फिकर नॉट करणारी व्यक्ती म्हणजेच अमा अशी त्यांची ओळख आहे. धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे अनुभवांचा खजिना होता. खूप काही शिकवून गेल्या. त्या गेल्याची बातमी वाचल्यावर खूप वाईट वाटले.
स्वाती,तुम्ही माझ्या मनातलं
स्वाती,तुम्ही माझ्या मनातलं लिहिलं आहे.
दुसऱ्या एका धाग्यावर त्यांचा प्रतिसाद वाचून, त्यांची तब्येत बिघडली असावी असा संशय आला होता. तो दुर्दैवाने खरे ठरला.
जे आयुष्य वाट्याला आले ते त्यांनी रसिकतेने जगून घेतले.
खूप आत्मियतेनं लिहिले आहेत
खूप आत्मियतेनं लिहिले आहेत बाई तुम्ही! Ama deserves a special mention! वर उल्लेख आला आहे माझ्या पोस्टचा म्हणून इथे देते ती पोस्ट.
***
काल दुपारी अमा गेल्या कळल्यापासून अस्वस्थ वाटतेय खूप. २००८ की ९ पासून त्यांच्या पोस्ट वाचत आलो आपण. खट्याळ मिश्किल नर्म विनोदी लिहीत आणि तरीही आयुष्यातल्या अनुभवांची डूब असे त्यांच्या लिहिण्यात. वाहत्या बाफावरचे विषय असो की एखादी रेसिपी किंवा सल्ला त्यांचं वेगळेपण उठून दिसे. गटगला भेटलो तेव्हाही जाणवले की पोस्ट मधे प्रतिबिंबित होणारं हेच ते मऊ मेणाहून व्यक्तिमत्व पण आयुष्यातल्या कठोर वज्रास भेदून गेल्या प्रत्येक वेळी.
किती वेगळेच बंध आहेत हे. जाणीवेच्या चौकटीतील एक भरीव चौकोन रिकामा झाल्यासारखं वाटतंय. तो भरलेला होता तेव्हा लक्ष जात नव्हतं आता रिकामा झालाय तर पुन्हा पुन्हा नजर जाते आहे.
त्यांची नुसती " आज रात्री मी तुमच्या साठी प्रार्थना करेन " असे वाक्य असणारे पोस्ट वाचूनही हरलेल्या मनाला उभारी यायची. बीचवर थंड पिता पिता छत्रीत पाय पसरून विनोदी पुस्तक वाचणे अशी सुटीची कल्पना असलेल्या अमा, ऑफिसला जाताना झाडाच्या ढोलीत खारुताई साठी दाणे अक्रोड ठेवणाऱ्या अमा, स्वतःच्याच Wonderland मधली Alice होती ती!
आठवणींचे कढ नुसते. म्हंटले तर इतक्या दिवसात कधी त्यांना विचारले पण नाही. तशी त्यांची जगाकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. हे सगळं असंच असणार, माणसं आपल्या कल्पनेच्या विपरीत च वागणार यावर ठाम राहण्या इतके अनुभव गाठीशी होते त्यांच्या. आणि त्यावर पाय रोवून मुलीसाठी आणि स्वतः साठी घट्ट उभ्या होत्या त्या. त्यांना कोलमडलेली बघितले नाही ते बरेच झाले असे वाटते. तशाच आत्मविश्वासपूर्ण, येईल त्या संकटाला हसत सामोऱ्या जाणाऱ्या आणि जाता जाता कोपऱ्यात हास्याची पखरण करत जाणाऱ्या अमा मनात कायम राहतील.
त्यांना आठवले की एकच गाणे आठवत आहे आज - आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा..!
स्वाती, धागा काढलास धन्यवाद,
स्वाती, धागा काढलास धन्यवाद, छान लिहिले आहेस. प्रतिसाद ही सगळे छान आहेत.
आशूडी तुझी पोस्ट इकडे ही आणलीस ते बरं झालं. रेडिमेड वाचता येईल. सुंदर लिहिलं आहेस.
त्यांचा डेहराडून धाग्यावरचा शेवटचा फोटो पाहून काळजात चर्र झालं होते पण त्याच वेळी असा फोटो सोमी वर दाखविण्याच त्यांचं धैर्य खूप appreciate केलं होतं.
इंग्लिश मध्येमध्ये कधी कधी पोस्ट लिहीत असत त्या तेव्हा त्यांचं english ही खूप छान आहे हे जाणवत असे.
स्वाती , चपखल आणि हृद्य
स्वाती , चपखल आणि हृद्य लिहिले आहे.
त्यांनी आपल्या मायबोली प्रोफाइलमध्ये आवडीचे वाक्य - टाइम टु फिकर लिहिले आहे. पण प्रत्यक्षात "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया - हर फिक्र को धुएं में उडाता चला गया", अशाच जगल्या. when life gives you lemons, make lemonade” हा त्यांचा जीवनमंत्रच होता जणू. त्यांनी नुसतं लेमोनेडच नाही, लिंबाचं रसरशीत लोणचं आणि असंच काय काय बनवलं.
किती आठवणी लिहाव्या ! त्यांना आपल्या आजाराबद्दल कळल्यावरही अजिबात खचल्या नाहीत. उलट अधिक समरसतेने जगू लागल्या. काळा घोडा फेस्टिव्हल मायबोलीकरांसोबत फिरण्याचा बेत आखला तो राहून गेला कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन काही खाल्लं, त्याचंही किती रसभरित वर्णन केलं. त्या कोरियन बँडमधला एक तरुण मिलिटरी सर्व्हिस संपवून येणार, ते सेलिब्रेट करायचं आहे, असं म्हणाल्या.
आपल्याला होणार्या त्रासाबद्दल लिहिलं तरी तिथेही चांगलंच शोधत होत्या. हॉस्पिटलमध्ये , विमानतळावर काय सुविधा आहेत. मध्ये त्यांनी डॉल्फिन मसाजर घेऊन त्याबद्दल लेख लिहिला. तो वाचून मीही तसा मसाजर घेतला.
गेल्या वर्षी हॉस्पिटलच्या वेटिंग एरियात बसून दिवाळी अंक वाचून त्यांची त्यांच्या विनोदी शैलीत चिरफाड केली होती. आई कुठे काय करतेचे शेवटचे एपिसोड्स पाहताना त्यांची फार आठवण आली. त्या पार्श्वसंगीतही नीट ऐकून त्यावर कमेंट्स करायच्या.
सगळ्या प्रसंगांना अगदी हिंमतीने सामोर्या गेल्या. कुमार यांच्या धाग्यावर त्या अपडेट्स लिहायच्या. तिथेही मला घर एकटीने शिफ्ट करता आलं पाहिजे असं लिहिलं होतं.
अनेकांनी त्यांच्या इंग्रजीबद्दल लिहिलं आहे. त्यांनी कॉपीरायटर म्हणून सुद्धा काम केलं होतं.
त्यांच आयुष्य इथे तुकड्या तुकड्यांत कळत गेलं. ते सांगण्यात कुठेही दु:खाचा कढ नव्हता. हे खरंच विलक्षण आहे.
फक्त अमेरिकेबद्दल नव्हे तर जगभरात काय चाललंय याबद्दल सजग होत्या. भारतात इंडिपेंडंट न्युज एजन्सीला सपोर्ट करायला हवं म्हणून एका पोर्टलला पैसे भरून सब्स्क्राइब केलंय असंही त्यांनी लिहिलं होतं.
अनेक गोष्टींवरचा त्यांचा टेक वेगळाच असे. तो वाचून अनेकदा अमा रॉक्स असंच झालंय.
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेतून आलेलं, म्हणून लोभस होतं. >> 100%!
अश्विनीमामी असा आयडी होता त्यांचा. पुपुवर गप्पांमध्ये मी त्यांना "अमा" संबोधायला सुरुवात केली जे त्यांना आवडलं होतं. मग हळूहळू सगळ्यांच्याच त्या अमा झाल्या. त्यांचे जुने दिवस आठवून त्यात हरवत जाणं असो की आम्हा मुलींच्या नवीन संसारातल्या फुटकळ तक्रारी असो अमांचे प्रतिसाद वाचनीय असत. त्यांच्या ऑफिस मधे त्यांनी कुणाला करारा जवाब दिलेले किस्से वाचून अमा एकदम dashing वाटत तोच त्यांची दुसऱ्या धाग्यावर भविष्याची किंचित काळजी वाटणारी पोस्ट असे. निखळ पारदर्शी लिखाण होते त्यांचे कोणताही अजेंडा किंवा मुखवटा घेऊन नाही वावरल्या कधी.
अमांच्या निधनाची बातमी
अमांच्या निधनाची बातमी वाचल्यावर आपल्यातलंच कोणीतरी गेल्यासारखं वाटलं होतं. त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या काही गोष्टी माबोवर वाचून माहीत आहेत. प्रॅाब्लेम्स असून पण त्यावर कटकट करणं, रडगाणं गात राहणं त्यांचा स्वभाव नव्हता. जे आहे ते स्विकारून त्या छान सकारत्मक व हसमुख होत्या. त्यांचा तो मागच्या ट्रिपचा फाटो पाहून मलापण धक्का बसला होता.
माबो वरचा त्यांचा वावर कायम लक्षात राहील. त्यांच्या अनेक कमेंटस लक्षात राहतील अशा आहेत.
अमांना श्रद्धांजली.
तुमची खूप आठवण येईल अमा.
तुमची खूप आठवण येईल अमा. तुमची खास शैली आणि उत्साह वातावरणच बदलून टाकायचा. वाहत्या धाग्यांवर किती धमाल केलेली आपण. गटगमधल्या भेटी सुद्धा चैतन्याने रसरसलेल्या असायच्या. फायटर होतात तुम्ही. लढण्याची स्फूर्ती देणार्यांपैकी एक होतात तुम्ही. अलविदा..
***
आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल कमालीच्या तटस्थपणे लिहिण्याची त्यांची अफाट ताकद होती >> She was a Fighter.
आताआतापर्यंत त्या पोस्ट्स टाकत होत्या. १० वर्षांपुर्वीचा गोळीबंदपणा नव्हता त्यांत, पण रोजच्यातला तो साचलेपणा, अवघडलेपण आणि थकल्याची-हरल्याची भावना- हे सारं सशक्तपणे नाकारत त्या लिहित होत्या.
त्यांचा जबरदस्त सेंस ऑफ ह्युमर हा त्यांच्या बुद्धीमत्तेचं प्रॉडक्ट होतं, आणि त्यांची बोलण्या-लिहिण्याची शैली हे त्यांच्या अॅटिट्युडचं. अस्सल हैदराबादी टोन आणि स्टाईलने त्यांनी वाहत्या धाग्यांवर अशक्य धमाल केलेली. इतरांच्या विनोदबुद्धीला दाद देण्याची रसिकता त्यांच्यात होती. नवीन काही बघायला, शिकायला आणि अनुभवायला इतका दांडगा उत्साह त्यांच्यात संचारत असे, की ते पाहून त्यांच्या आजूबाजूच्यांचीही मरगळ पळून जावी. विरोधी मत मांडतानाही किती बॅलन्स्ड पोस्ट्स असत! किंचित पुणेरी खवट-विनोदी अंगाने शालजोडीतले तर अमांनीच हाणावेत. त्यांचा शब्द आणि अनुभव- दोघांचा संग्रह मस्त होता. वाहत्या बाफावर अनेकदा त्या आल्या की आपली बडबड बंद करून त्यांना ऐकत राहावं असं वाटायचं. कोतबो वाचताना अनेक सल्ल्यांचा वैताग येत असताना अमांचे सल्ले म्हणजे शांत स्निग्ध आणि अनुभवी शब्दांचं गारूड असायचं. कुठच्याही प्रश्नावर त्यांचं म्हणणं ऐकलं की 'इतनी भी क्या बडी बात है!' असं अखेरीस वाटायचं.
अस्सल जिंदादिली- अमा.
***
अमांना श्रद्धांजली. तिथल्या पोस्ट या अमांच्या स्वतंत्र धाग्यावर एका ठिकाणी असाव्यात म्हणून पेस्ट केल्या..
माझ्याकडे त्यांनी दिलेली अनेक
माझ्याकडे त्यांनी दिलेली अनेक अत्तरं आहे. Punni and I are with you, Punni and I support you, असं सांगणारे काही मेसेजेस आहेत.
माझ्या एका फोनवर त्या हैदराबादहून मुलीला घेऊन दुसऱ्या दिवशी पुण्याला आल्या. स्वखर्चाने हॉटेलात राहिल्या. एक लेखनप्रकल्प होता. जिच्यावर पुस्तक लिहायचं होतं, ती मुलगी विचित्र वागल्यामुळे त्यांना पुण्याला तिकीट रद्द करून दोन दिवस जास्त राहावं लागलं. तरी त्यांनी तक्रार केली नाही. तो प्रकल्प पुढे गेला नाही, पण त्याबद्दल त्या काही बोलल्या नाहीत.
असे अनेक प्रसंग आहेत. आमचं फोनवर बोलणं आहे. मायबोलीवर त्या सुरुवातीस आल्या, तेव्हा कोणी काही लिहिलं की त्यांना लगेच वाईट वाटे. त्यांनी मायबोलीवर स्वतः बद्दल, आयुष्याबद्दल लिहिलेला मजकूर, इथल्या एका लेखिकेने लोकसत्ताच्या लेखात वापरला, यामुळे त्या दुखावल्या होत्या. इथे लिहिणं म्हणजे आयुष्य सार्वजनिक करणं, हे कळल्यावर त्यांचा वावर बदलला.
गेली तीनचार वर्ष त्या अचानक संपर्कात यायच्या, मग गायब व्हायच्या. गेल्या वर्षी काही महिने आम्ही एकमेकांना अनेक टुकार मीम पाठवले, कुत्र्यामांजराचे व्हिडिओ शेअर केले. त्यांच्या आजाराचा ना त्यांनी उल्लेख केला, ना मी.
अजून लिहिता येत नाही.
I will miss her.
पण त्यांची अत्तरे माझ्याकडे आहेत.
सगळ्यांच्या किती हृद्य आठवणी
सगळ्यांच्या किती हृद्य आठवणी आहेत अमांबद्दल...
स्वाती, छान लिहिलयं तुम्ही..!
मायबोलीवर त्यांची माझी जास्त ओळख नव्हती मात्र
अमांचे प्रतिसाद मला आवडायचे. विशेष करून ' आई कुठे काय करते ' ह्या धाग्यावरचे त्यांचे मिश्किल प्रतिसाद आणि त्यांच्या हैद्राबादच्या आठवणी देखील वाचायला छान वाटायच्या.
भरत, काळा घोडा फेस्टीवल बेत जमला नाही पण माझी खूप इच्छा होती तेव्हा सगळ्यांना भेटायची.. मला वाटते, अमांनी पुढाकार घेतला होता तेव्हा .. त्यावेळी जमलं नसतं तरी पुढे कधी असा बेत त्यांनी ठरवला असता तर मी नक्की त्यांना भेटायला येणार होते.
हरहुन्नरी, मिश्किल आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असावं त्याचं असं त्यांच्या लेखनावरून नेहमी जाणवायचं..
एक समरसून जगणारं व्यक्तीमत्व
एक समरसून जगणारं व्यक्तीमत्व सर्वांच्या लिखाणातून उलगडले. असं मनस्वी सुंदर व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेल्याचे वाईट वाटले.
अमांना श्रद्धांजली... हे
अमांना श्रद्धांजली... हे लिहितांना मी चार वेळा विचार करतेय, खरंच गेल्या का त्या?! त्यांची तब्येत सुधारते आहे असे वाटत होते अलिकडच्या पोस्ट्स वरून.
मागच्या आठवडयात पुण्याहून येता जाता कोकिलाबेन अंबानी hospital दिसले. तेव्हा त्यांची आठवण झाली होती. त्या तिथल्या स्टाफला आणि एकूणच मॅनेजमेंटल खूप appreciate करायच्या.
एकदा त्यांच्याशी ओझरती भेट झाली होती. बाकी इथल्या वावरातून त्या खूप समजत गेल्या.
मिस्टरांच्या निधनानंतर त्यांनी मधुरीमाल एकहाती छान मोठ केलं. तिच्याबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. त्या financially literate होत्या (कमी स्त्रिया असतात). शेअर्स, म्युच्युअल फंड याबद्दल पण चर्चा करायच्या.
मधुरीमा, तुला या दुःखातून सावरायचं बळ मिळो अशी प्रार्थना करते!
तुला योग्य वाटल्यास तुझे milestones/achievements आमच्यासोबत शेअर करशील का? तू लहान असल्याासून तुझ्याबद्दल माहीत आहे. त्यामुळे तू जरी आम्हाला ओळखत नसलीस तरी आम्हाला तू जवळची वाटतेस. (Only if you feel comfortable sharing with us).
______________
स्वाती, खूप चपखल लिहिले आहेस. Despite of so many changes in her life she always carried fikar not attitude!
अतिशय हृद्य मनोगत. मी
अतिशय हृद्य मनोगत. मी वाड्यावर दिलेला प्रतिसाद आठवून थोडा इथे देत आहे. माझीही काही ओळख नव्हती, पण इथेच एकमेकांना प्रतिसाद दिले गेले. त्यांच्या कोरियन धाग्यावर एका प्रतिसादानंतर त्यांनी माझा गमतीने हर्पा ओपा केला होता आणि मी त्यांची अमा नूना केली. नेहमी सडेतोड, कुठलाही आड पडदा न ठेवता त्या प्रतिसाद देत. त्यांची उपहासात्मक विनोदाची शैली आवडायची.
कुठल्यातरी धाग्यावर भांडी घासणे विषयावर नेहमीप्रमाणे चर्चा लांबली होती. दोन्ही विरुद्ध विचारांचे लोक एकमेकांना "मुद्देसूद" विरोध करत होते. त्यात कुणीतरी अमा यांना मावशी असा उल्लेख केल्यावर त्यांनी आधीचा अमा हा आयडी बदलून अश्विनीमावशी असा केलेला आठवतो. ज्यांना ती चर्चा आठवते, त्यांना त्यातला विनोद लक्षात येईल. तो बदल अल्टिमेट होता! पुढे अनेक दिवसांनी त्यांनी पुन्हा बदलून मूळचं अश्विनी मामी हे नाव घेतलं.
Pages