त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. माझा आयडीही त्यांच्या आयडीला जुजबीच ओळखत होता. त्यांच्या मायबोलीवरच्या वावरातून, लेखनातून, अभिप्रायांतून, गप्पांमधून एक प्रतिमा मनात घडत गेली होती. विविधरंगी कागदी कपटे जोडून चेहरा जुळवावा तशीच आणि तेवढीच ओळख.
ही ओळख हृद्य होती मात्र. अगदी बालवयापासूनच सलग सहज निखळ नितळ सुख वाट्याला येऊच नये अशी एखाद्याची वाटचाल का असते याला काही उत्तर नाही. एका परीक्षेपाठोपाठ पुढची सत्त्वपरीक्षा असाच जणू आयुष्याचा अभ्यासक्रम आखलेला यांच्या बाबतीत. त्यामुळे घडलेला म्हणा किंवा गडद होत गेलेला म्हणा, इंग्रजीत 'आऊटलायर पर्सनॅलिटी' म्हणता येईल अशा प्रकारचा स्वभाव. पण त्यातूनही त्यांचा उमदा जीवनोन्मुख दृष्टीकोन लखलखत असायचा. त्यांनी कधी स्वतःची कणव केली नाही आणि इतर कोणाला ती करायची संधी दिली नाही.
अंगी धीर होता, धडाडी होती. 'मकान और दुकान' खंबीरपणे सावरलं होतं, मुलीचं एकल पालकत्व जबाबदारीने निभावलं होतं. आणि हे सगळं करत असतानाही स्वतःतलं एक वेडंबागडं, मिश्कील, खोडकर मूल त्यांनी जिवंत ठेवलं होतं. 'घरचा अभ्यास' झाला की हे मूल घरच्या पाळलेल्या आणि रस्त्यातल्या कुलुंगी कुत्र्यांशीही खेळायचं, त्यांच्यासाठी खिशात खाऊ बाळगायचं, 'मोठं झाल्यावर' बेडरूममध्ये छोटा फ्रीज ठेवून रात्री टीव्ही बघताना त्यातून कोल्ड्रिंक नाहीतर बिअर पिण्याची स्वप्नं बघायचं, नवीन कपडे घालून सिनेमा बघून यायचं, मध्येच व्हीगन व्हायचं खूळ डोक्यात घ्यायचं, कधी कोणाला मुळुमुळू रडण्यावरून फटकारायचं, कधी अर्धं चॉकलेट शेअर करत 'फिकर नॉट!' म्हणून धीरही द्यायचं!
तो शेर आहे ना,
मिरे दिल के किसी कोने में इक मासूम सा बच्चा
बड़ों की देख कर दुनिया बड़ा होने से डरता है
त्यांचं मूलपण अपरिपक्वतेतून नव्हे, तर 'बड़ों की दुनिया' पचवून आलेल्या परिपक्वतेतून आलेलं, म्हणून लोभस होतं.
इथल्या अनेकांप्रमाणे मायबोलीमध्ये त्यांना त्यांचा कबिला सापडला होता. पण इथेही त्या कुठल्या एका कंपूच्या नव्हत्याही, आणि सगळ्याच कंपूंमध्ये होत्याही. त्यांचा वावर पारदर्शी असायचा. मनात आलं, लिहून टाकलं असा बाणा! नो फिल्टर्स! आपसुखच त्यांच्याशी जो संवाद घडेल तो - एकमत असेल वा मतभिन्नता - पण सहज व्हायचा, त्यात नसती आडवळणं लागत नसत. फटकेबाजी करत तशी खिलाडूपणे झेलतही!
अमेरिकेबद्दल त्यांना का कोण जाणे पण विशेष आस्था होती. इथल्या चालू घडामोडी, राजकारण, राहणीमान यांबद्दल त्यांना कुतुहलही असायचं आणि बरीच माहितीही असायची. त्या अर्थाने त्या खरंच ग्लोबल सिटिझन होत्या.
त्यांच्या बाकी बर्यावाईट अनुभवांबद्दल त्या ज्या सहजतेने - मॅटर ऑफ फॅक्टली - लिहायच्या त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं कॅन्सरचं निदान आणि त्यानंतरच्या लढाईबद्दलही लिहिलं. त्यांचा डेहराडूनचा फोटो बघून चरकायला झालं होतं. त्या गेल्याची बातमी कळली तेव्हा त्यामुळे दुर्दैवाने फारसं आश्चर्य वाटलं नाही. वाईट मात्र फार वाटलं. खरंतर आंतरजालाच्या आभासी दुनियेतली एक आभासी ओळख, पण जवळचं कुणी जावं तशी चुटपुट वाटली.
'दु:खद घटना' धाग्यावर त्यांच्याबद्दल कळल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, खूप हळव्या आठवणी लिहिल्या - आशुडीने 'स्वतःच्याच Wonderland मधली Alice' असं फार हृद्य आणि चपखल वर्णन केलं त्यांचं.
ते उत्स्फूर्त आणि स्वाभाविक होतं, पण अमा 'बातमी' नव्हत्या. आपल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र धागा असावा असं फार फार वाटलं म्हणून हा धागा काढत आहे.
तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी इथेही लिहाल का?
खूप छान लिहिलंय.. या
खूप छान लिहिलंय.. या सगळ्यांच्याच मनातल्या भावना आहेत. अमा सारखी व्यक्ती होणे नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, प्रेमळपणा , लढाऊ बाणा, मिश्किल स्वभाव, थोडासा फटकळपणा, रसिकता, बहुश्रुतता, बाणेदारपणा आणि जीवन रसरसून जगण्याची विजिगीषा या साऱ्या गुणांमुळे त्यांनी मायबोलीवर स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण केले होते. कोताबो वर त्यांनी दिलेले सल्ले आवर्जून वाचावे असेच असत.
इथला प्रतिक्रियांमधून देखील अमा नव्याने उलगडत जातात.. विल मिस यू अमा. चित्र खूप भारी.
अमांबद्दल ऐकून फार वाईट वाटलं
अमांबद्दल ऐकून फार वाईट वाटलं! त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. २०१०च्या दिवाळी अंकाच्यावेळी त्यांचा लेख आणि त्यांनी दुसर्या लेखासाठी काढलेली चित्र ह्या संदर्भात बरीच चर्चा झाली होती. माझ्या बेकिंकच्या धाग्यांवर आवर्जून प्रतिसाद द्यायच्या. बाकी चर्चांबद्दल त्यांची मतं कधी लगेच पटणारी तर कधी अजिबात न पटणारी असायची पण लिहायच्या ते एकदम मनापासून लिहायच्या!
त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
कॅन्सरला आळा बसणे ही अमांना
कॅन्सरला आळा बसणे ही अमांना खरी श्रद्धांजली होईल.
एका कॅन्सर सर्जनची कॅन्सरबद्दल ही एक मुलाखत आवडली.
https://www.youtube.com/watch?v=pLTvFRtklT0
Dr. Anshuman Kumar, Director of Surgical Oncology,
MS in Surgery (2003), M.Ch in Surgical Oncology (2006), and MRCS
स्वाती, फार छान लिहिलं आहेस.
स्वाती, फार छान लिहिलं आहेस. माझी त्यांची ओळख प्रत्यक्ष ओळख कधीच झाली नाही. मला त्यांचं व्यक्तिमत्व जाणवलं ते त्यांच्या लिखाणातून आणि लेखांवर दिलेल्या अभिप्रायातून फक्त! त्यातूनच त्यांच्याबद्दल एक आपलेपणा व जिव्हाळा नेहमीच वाटत आला.
अमांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
सर्वांचीच मनोगतं आणि अमांच्या
सर्वांचीच मनोगतं आणि अमांच्या आठवणी वाचताना भरून आलं. ही बातमी कळली तेव्हा पासून आपलं अगदी जवळच्या ओळखीचं कुणीतरी गेल्यासारखं वाटतं आहे. प्रत्यक्षात भेटीचा योग आला नाही. मात्र केळकर कॉलेजचा एक धागा कॉमन होता.
त्यांचा sense of humor जबरदस्त होता. त्यातला पुणेरीपणा आणि timing नंबर वन. अनेकदा चालू धाग्यावर आपल्या खास टिपण्णीने अमांनी धमाल आणली आहे आणि मी त्यांची पोस्ट वाचून खोखो हसले आहे.
अचूक आणि सुक्ष्म निरीक्षणशक्ती यामुळे अमांच्या पोस्ट्स आणि लेख एका वेगळ्या उंचीवर जायचे. विशेषतः गाण्यांची त्यांनी केलेली रसग्रहणे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत.
वयाने मोठे झाल्यावर नवीन पिढीच्या नवीन गोष्टींकडे बघताना "आमच्यावेळी" टाईपचे विचार कधीच अमांनी व्यक्त केले नाहीत हा मला त्यांचा मोठा गुण वाटतो. बदलत्या काळानुसार बदलण्याची त्यांची कायम तयारी असायची. रादर तेच त्यांना योग्य वाटायचे. त्यांना कायम तरूणांच्या ट्रेंड्स विषयी कुतुहल असायचे.
मात्र एखाद्या गंभीर प्रश्नावर (कोतबो धागे) अमा आपल्या आयुष्यातील अनुभवाचे सार सुंदर शब्दात मांडायच्या आणि उत्तम सल्ला द्यायच्या.
इतक्यात कोणत्या तरी धाग्यावर I am very sick या अर्थाची त्यांची पोस्ट वाचली तेव्हा त्यांची चौकशी करावी असं वाटलं होतं.
आयुष्यात अनेक कठीण परीक्षा यशस्वीपणे पार पडल्यानंतर अमांसारख्या जिंदादिल व्यक्तीला दीर्घायुष्य लाभायला हवे होते असे राहून राहून वाटते आहे.
अमा, I will miss you very much!
अवांतर आहे हे पण मी काल उषा
अवांतर आहे हे पण मी काल उषा उथुपची मुलाखत बघत होते आणि मला एकदम अमाच आठवल्या.
विशेषतः गाण्यांची त्यांनी
विशेषतः गाण्यांची त्यांनी केलेली रसग्रहणे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत.
वयाने मोठे झाल्यावर नवीन पिढीच्या नवीन गोष्टींकडे बघताना "आमच्यावेळी" टाईपचे विचार कधीच अमांनी व्यक्त केले नाहीत हा मला त्यांचा मोठा गुण वाटतो. बदलत्या काळानुसार बदलण्याची त्यांची कायम तयारी असायची. रादर तेच त्यांना योग्य वाटायचे. त्यांना कायम तरूणांच्या ट्रेंड्स विषयी कुतुहल असायचे.
मात्र एखाद्या गंभीर प्रश्नावर (कोतबो धागे) अमा आपल्या आयुष्यातील अनुभवाचे सार सुंदर शब्दात मांडायच्या आणि उत्तम सल्ला द्यायच्या.
>> अगदी परफेक्ट. त्यांनी स्मरणरंजन जरूर केले पण कधीही आमच्या वेळी सगळे कसं चांगलं आणि आत्ताचं सगळं कसं वाईट हा सूर लावला नाही. नवीन गोष्टी ट्राय करायचा वापरात आणायचा त्यांचा स्वभाव होता. रादर याच गोष्टीमुळे मी त्यांना पहिल्यांदा नोटीस केलं. कुठल्याश्या सीरियलमध्ये नायिका पदराने तोंड पुसते असा उल्लेख होता. त्यावर मी कमेंट केली होती की तिच्याकडे रुमाल नाही का? त्यावर कडी करत त्यांनी म्हटले होते आजकालच्या वर्किंग विमेन वेट वाईप्स वापरतात. त्या जगाबरोबर चालायच्या.
त्यांचं 'अब के सावन में जी जले' गाण्याचं रसग्रहण वाचून मला ते गाणं आवडायला लागलं.
त्यांनी पुण्यात घर घेण्याविषयी धागा काढला तेव्हा सगळ्यांचे सल्ले नीट वाचून उहापोह करून मग योग्य सल्ला अंमलात आणला. मी जग पाहिलंय तर माझंच म्हणणे खरं असे बरेचदा होतं. पण अमांनी ते टाळले.
माझी कधी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नाही पण त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा वाटायचा. काही खुळचटपणे लिहिले तर त्या चांगली कानउघाडणी करतील याची खात्री होती
>>>काही खुळचटपणे लिहिले तर
>>>काही खुळचटपणे लिहिले तर त्या चांगली कानउघाडणी करतील याची खात्री होती Bw
होय दरारा होता खरा. गुड फॉर अस.
फार सुंदर आहे मैत्रेयी यांनी
लेख छान लिहिलाय.
आणि फार सुंदर आहे मैत्रेयी यांनी काढलेलं चित्र.अमांचं लेखन वाचून आणि पोस्टिवरून त्यांचं इंग्रजी वरचं प्रभुत्व दिसून यायचं कित्येक शब्द माझ्या मराठी मिडीयम च्या आवाक्याबाहेरचे त्यांच्यामुळे कळले .त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरही जबरदस्त होता. त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती .मिस यु अमा...
माझी त्या धाग्यावरची श्रद्धांजली .इथेही पोस्ट करते.
कालपर्यंत लिहीणाऱ्या अश्विनीमावशी नाहीत यावर विश्वास बसत नाही .आई कुठे काय करते धाग्या वरच्या पोस्ट मजेशीर असायच्या त्यांनी केलेल्या पोस्ट वाचण्यासाठी सिरीयल बघितली जायची .कधीही भेट न होताही त्यांच्याबद्दल फार आपुलकी वाटायची. खूप काही शिकता आलं त्यांच्याकडून ,आजाराशी तोंड देता आनंदी कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण होत्या. जिंदादिल ,मिश्किल पण तितक्याच प्रेमळ आणि प्राणी प्रेमी .तुमचं लेखन पाहताना खूप आठवण येईल अमा .भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मुलीला दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.
Pages