रक्तपिपासू
भाग ८
गावातील किराणा मालाच्या दुकानात राजाभाऊ मालकांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यांच्याशी राजाभाऊंचं खूप सख्य होतं. त्यांचं बोलणं सुरु असतानाच एक चाळीशीचा व्यक्ती दुकानामध्ये आला. राजाभाऊंचं सहज त्याच्याकडे लक्ष गेलं. उंच, दांडगट अंगकाठी. सावळा वर्ण. करारी, रागीट नजर. या काही गोष्टी चटकन नजरेत भरल्या. पिवळा कुर्ता. सफेद पायजमा, असा पेहराव त्याने परिधान केलेला. गळ्यात सोन्याची साखळी. हातात कडे. त्याला पाहून, या माणसापासून जरा दोन हात लांबच रहावं, अशी भावना होत होती. आणि त्याने दुकानात प्रवेश केल्याबरोबर दुकानदार एकदम काहीसे गंभीर झाल्याचं राजाभाऊंच्या नजरेतून सुटलं नाही ; पण तो गावात नवीनच दिसत होता. त्यामुळे सहाजिकच राजाभाऊंना जरा उत्सुकता वाटली. थोडीफार चौकशी केल्याने काय बिघडतं, असा विचार करून त्यांनी (तरी जरा भीतच) त्याला प्रश्न केला -
"नमस्कार. आपण कोण ? गावात नवीन दिसता ?"
"नाव सुर्यभान पोतदार. आम्ही कालच इथे आलो." खिशातून तंबाखूची पुडी काढत, आपल्या शरीरयष्टी प्रमाणेच वजनदार आवाजात तो उत्तरला. चुना तंबाखू एकत्र करून त्याने तोंडात कोंबली. त्याचा आढ्यतापूर्ण स्वर आणि नंतरची ही कृती राजाभाऊंना मुळीच आवडली नाही. ते गप्प बसले. आपलं सामान घेऊन तो व्यक्ती निघून गेला. दुकानदार, तो गेला त्यादिशेने काहीवेळ बघत राहिले. राग, नापसंती आणि काहीशी भीती अशा परस्परविरोधी भावांचे मिश्रण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ते पाहून तर राजाभाऊंच्या मनात अजूनच कुतूहल निर्माण झालं. त्यांनी खुणेनेच त्या व्यक्तीबद्दल विचारलं.
"विचित्रच माणूस आहे. बोलण्या वागण्याची आजिबात रीत नाही. म्हणे 'आम्ही' कालच आलो. स्वतःला काय मोठा राजा महाराजा समजतो की काय कोण जाणे ?" दुकानदार तावातावाने म्हणाला. या माणसाच्या आढ्यताखोर स्वभावाचा त्यांना चांगलाच अनुभव आलेला दिसत होता.
"अहो पण हे आहेत कोण ?" राजाभाऊंनी विचारलं.
"अहो तो शेजारच्या चौकातला पोतदारांचा जुना वाडा आहे ना, तो यांच्या मालकीचा आहे."
"अच्छा, म्हणजे हे, ते पोतदार आहेत तर... कित्ती दिवस तो वाडा बंदच होता, नाही."
"दिवस?? अहो तब्बल पंचेचाळीस वर्ष झाली. यांचे आजोबा बळवंतरावांसोबत ऐन तरूण वयात ते सगळं घडलं... मग त्यांच्या लहानग्या मुलाला घेऊन बळवंतरावांचे थोरले भाऊ मुंबईला निघून गेले. त्यानंतर आता थेट हा बळवंतरावांचा नातू सुर्यभान गावात आला."
पोतदारांच्या त्या पडीक वाड्याबद्दल काही वदंता, अफवा गावातील लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. स्वतः राजाभाऊ, अनेकदा त्या वाड्यावरून गेले होते. त्यांनी तो वाडा खूपदा पाहिला होता. जसं या सुर्यभान बद्दल त्यांचं मत चांगलं झालं नव्हतं, तसाच तो वाडाही त्यांना कधी आवडला नाही. अर्थात, इतरांचं ऐकून मत बनवणाऱ्यांपैकी ते मुळीच नव्हते ; पण तो वाडा नजरेस पडताच ही जागा काही चांगली नाही, असं मात्र मनातून वाटायचं.
'अशा'प्रकारे खंड पडल्यानंतर आधीच्या चर्चेचा धागा पुन्हा सांधणं शक्यच नव्हतं. स्वतःच्याच विचारांत राजाभाऊ बाहेर पडले, आणि बंगल्याच्या वाटेने वळता वळताच थबकले. जिकडे सुर्यभान निघाला होता, त्याच वाटेने रूपाली येत होती. सुर्यभानने रूपालीला थांबवलं. स्वतःच्याच तंद्रीत हरवलेल्या रूपालीने नवलाने, आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने सावकाश वरून खालपर्यंत तिच्यावर नजर फिरवली ; पण तिच्या चेहऱ्यावर जराशीही राग, नापसंती उमटली नाही. आजूबाजूला एक नजर फिरवून तो तिच्याशी काहीतरी बोलला. हसत हसत. आणि आपल्या वाटेने निघून गेला. रूपाली काही क्षण तिकडे बघत उभी होती.
*******
"काय राजाभाऊ... गावातून आल्यापासून गंभीर दिसताय ?" हसत हसत श्रीने विचारलं.
"श्री, तो इथल्या चौकातला जुना वाडा ज्यांचा आहे ना, ते मि. पोतदार आलेत."
"काय ?" श्रीच्या स्वरात कुतूहल होतं. "पण मग तुम्ही का एवढे टेन्स दिसताय ?"
"श्री.." जमिनीवर नजर खिळवून ठेवत राजाभाऊ पुढे म्हणाले "जवळच्या किराणा दुकानात गेलो होतो ना, तिथे भेट झाली." राजाभाऊंनी दुकानात घडलेला प्रकार कथन केला. "मला तर तो जरा घमेंडी, आणि माणूसघाणाच वाटला..."
"हम्म.. पण असतात हो असेही लोक ? तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेताय ?" श्री मध्येच म्हणाला.
"हो तेही खरंच ; पण श्री, फक्त एवढंच नाही."
"मग ?"
"तो माणूस गेल्यावर, मीही लगेचच घरी यायला निघालो. रस्त्यावर येऊन पाहतो तर तो, आपल्या रूपालीसोबत काहीतरी बोलत होता. तेही.. हसत हसत."
"अच्छा ?" आता मात्र श्री चांगलाच उत्सुक आणि गंभीरही दिसत होता. "असं काय बोलत होता तो ?"
"ते मात्र मला समजू शकलं नाही. ते माझ्यापासून बऱ्याच अंतरावर उभे होते."
"रूपालीची प्रतिक्रिया काय होती ? त्यांचे चेहरे तरी पुरेसे स्पष्ट दिसत असतील ना ?"
"ती लक्ष देऊन ऐकत होती. त्याचं बोलून झाल्यावर तो लगेच निघून गेला, आणि ती स्वतःशीच हसली."
यावर काहीच न बोलता, श्री स्वतःच्याच विचारात मग्न झाला.
*******
रात्र बरीच झाली होती. आजही रूपाली टक्क जागी होती. आतापर्यंत मोठी विचित्र अवस्था झाली होती तिच्या मनाची. एकीकडे तिचे वडील गेल्याचं दुःख. मोकळं घर खायला उठत होतं. मात्र त्यापेक्षाही जास्त होती ती ओढ.. 'ती' हवीहवीशी संवेदना अनुभवण्याची ओढ. त्या म्हातारीचं जाणंही तिच्यासाठी फारच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. आता तिचं काय होणार ? आता, ती सुखद जाणीव पुन्हा अनुभवणं, तिला शक्य होणारच नव्हतं का ? हाच प्रश्न तिच्या मनाला भेडसावत असतानाच, त्या पोतदारांशी तिची भेट झाली होती. आणि त्याच्या शब्दांनी आपोआप, तिला मनातली हुरहूर कमी झाल्यासारखं वाटत होतं. काय करायला हवं ते तिने चांगलं ओळखलं होतं ; ती फक्त आता वेळ येण्याची वाट पाहत होती. रात्र चढत होती. वेळ सेकंदांनी, मिनिटांनी पुढे सरकत होता. आणि एका क्षणी एकदम रूपालीला ती जाणीव झाली. ती चटकन अंथरूणावरून उठली. अंगावर शाल पांघरून बाहेर पडली. एकवार तिने इकडे तिकडे नजर फिरवून पाहिलं. दोन्ही बाजूचा परिसर अंधारात बुडून गेलेला होता. ती डाव्या बाजूला वळून चालू लागली. ही काहीशी खडबडीत वाट तिच्या इच्छित स्थळाकडे जात होती... पोतदारांच्या जुन्या वाड्याकडे.
क्रमशः
@प्रथमेश काटे
वाचतेय
वाचतेय
छान
छान
उत्सुकता वाढतेय
पण भाग जरा लवकर (आणि मोठे) आले तर बर, नाहीतर वाचकांचा आणि तुमचाही उत्साह कमी व्ह्यायचा